चंचुपात्र आणि सुरई

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
24 Sep 2008 - 10:11 pm
गाभा: 

मागे एका गझलेच्या संदर्भात चतुरंग म्हणाले :

परीक्षानळी आणि चंचुपात्रातून गजलेचा प्रवास लवकरच नक्षीदार सुरईकडे होईल ही खात्री आहे!

पुढे -

परीक्षानळीतून, छानशा किटलीत गजल प्रवेशकर्ती झाली आहे! (मला गालिच्याच्या कडेला नाजुक सुरई अंधुकशी दिसते आहे!)

त्यावरून मला ही दोन लिपी-चित्रे सुचली :
१. सुरई
suraaii
शब्द :
हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है
डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है

आणि हे :
२. चंचुपात्र आणि परीक्षानळी
acid
शब्द : शराब तेज़ाब

(ही "कच्चा खर्डा" प्रकारची चित्रे आहेत. त्यामुळे तशी गचाळ आहेत. म्हणून मुद्दामून लहान आकाराचीच चित्रे देत आहे.)

अनेक आस्वादकांच्या मनात चंचुपात्र आणि परीक्षानळ्यांनी सौंदर्य-नसलेल्या-वस्तूंच्या अडगळ कप्प्यात ठेवलेले असते. मला वाटते हा घोकंपट्टीच्या शिक्षणपद्धतीमुळे झालेला पूर्वदूषितग्रह आहे.

कित्येक विद्यार्थी शालांत परीक्षेसाठी सुंदर मराठी-इंग्रजी कविता घोकाव्या लागल्यामुळे खट्टू होतात. काव्यालाच किचकट आणि सौंदर्यहीन समजू लागतात. तसेच विज्ञानाबाबत होत असावे का?

चंचुपात्राचे रूपक असलेली वैज्ञानिक/तार्किक विचारसरणी ही रटाळ समजली जाते. मग फक्त व्यहारोपयोगी म्हणून लोक अभियांत्रिकी वगैरे तंत्रांचे प्रशिक्षण घेतात. तंत्रज्ञानात आणि विज्ञानात रस वाटण्यात हा मोठा फरक असतो - तंत्रज्ञाला स्फूर्ती देणारी भावना "उपयुक्तता" होय, आणि वैज्ञानिकाला स्फूर्ती देणारी भावना "सौंदर्य" होय.

काव्याच्या रसग्रहणासाठी त्यातील विषय आपल्याला वाचक म्हणून आवडावा लागतो, हे आवश्यक आहे. पण कवीची (आणि कलाकाराची) प्राथमिक जबाबदारी ही असते की कवितेच्या (किंवा कलाकृतीच्या) विषयाशी त्याचे मन प्रामाणिक असावे. वाचकाला विषय आवडेल की नाही ही त्याच्यापुढची जबाबदारी. वाचकाला जर विषय रटाळ वाटला तर ते काव्य स्वांतसुखाय होते. तरी वाचक अनेक असल्यामुळे, प्रत्येक वाचकाला विषय रोचक वाटणे अशक्य आहे. बहुसंख्यांसाठी कवितेचे मार्केटिंग करावे, की "नीश-niche" मार्केटिंग करावे, यांच्यापैकी कुठलाही निर्णय वेगवेगळ्या वेळी योग्य असू शकतो.

मला वाटते की समीक्षकाने त्याच क्रमाने परीक्षण करावे : (१) कलाकार प्रामाणिक आहे का - कलाकृतीचा जो काय विषय आहे, तो सांगायची कळकळ कलाकाराला आहे काय? (२) त्या विषयासाठी तंत्र योग्य रीतीने वापरले आहे काय? ताक आणायला जायचे तर वाटी कशी लपवून चालणार. तेज़ाब दाखवायचे तर परीक्षानळी-चंचुपात्र कसे लपवून चालणार? (३) कलेचा आनंद कुठल्या niche आस्वादकाला मिळणार आहे?

जाता-जाता लहानपणची ही आठवण सांगतो. एका संगीतसमारोहाला उस्ताद बिस्मिल्ला खानांचे सुर या अशिक्षित कानांवर पडायचे भाग्य मला मिळाले. अर्धा कार्यक्रम झाल्यानंतर खानसाहेबांनी फर्माइशी मागितल्या. समोरच्या एकाने म्हटले "मालकंस गा". खानसाहेब म्हणाले की आज मन नाही करत, दुसरे काही माग. मग दुसरी कुठली फर्माईश घेतली. पुन्हा विचारता, पुन्हा तो बुवा "मालकंस"च मागायचा! असे तीनदा झाल्यावर, शेवटी खानसाहेब म्हणाले - घे तुझा मालकंस. सुंदर होते इतकेच आठवते. (त्याहून अधिक आठवण्याइतपतही माझी अभिजात संगीताची जाण नाही.) मन नसताना असे सुंदर स्वरमहाल उभारू शकणारा कोणी पोचलेला उस्ताद बिस्मिल्ला खानच. कलेची अभिव्यक्ती करणारा कोणी सामान्य माणूस असेल तर पहिले विचारावे - "तुझे मन याच्यात आहे, ते स्पष्ट दिसते का?" आणि मग "तुझी तयारी नीट झाल्याचे दिसते आहे का?"

(अरेरे - हे पुन्हा वाचताना नको तितके कूट-क्रिप्टिक झालेले दिसते. सारांश काही असा : चतुरंग यांची चंचुपात्र-परीक्षानळी उपमा मला आवडली, पण पटली नाही. माझ्या मते चंचुपात्रे, लखलखत्या नळ्या सुंदर असतात त्या असतातच, पण ती विचारसरणीही सुंदर असते. आपण कित्येकदा कॉलेजातील शाखांची विभागणी करतो - कला-साहित्य, वाणिज्य-वकिली, विज्ञान-अभियांत्रिकी-?वैद्यक? या विभागणीत जणू काही आपण विसरतो की मनुष्याच्या ज्या मूलभूत स्फूर्ती असतात त्या सर्व शाखांत असतात. ही स्फूर्तिस्थाने कुठली - सत्य, शिव (कल्याणकारी), सुंदर. कलेत फक्त सौंदर्य नसते, तर सत्यशोध आणि उपयुक्तताही असते. वाणिज्यात केवळ उपयुक्त "हिशोबी"पणा नसतो, केवळ किचकट कायद्यांमध्ये हरवणे नसते, तर समाजाच्या उपजीविकेबद्दल सत्यशोध असतो, आणि मानवाच्या रोजव्यवहारात सौंदर्याचा शोध असतो. विज्ञानात कोरडा सत्यशोध, आणि उपयुक्त तंत्रनिर्मिती नसते, त्या तर्कांमध्ये सौंदर्यही शोधले जात असते.
म्हणून चंचुपात्राच्या रूपकाचे निमित्त करून मी हा लेख लिहिला. वेगवेगळे लोक आपला खास सौंदर्यानुभव व्यक्त करू बघत असतात. तो वेगवेगळ्या लोकांना भावेल. अनपेक्षित विषयात आणि तर्‍हेत कोणी सौंदर्य व्यक्त केले तर आपल्याला ते अनोळखी वाटेल. मग ती अभिव्यक्ती जोखताना हा विचार करणे जरुरीचे - अभिव्यक्ती करणारा प्रामाणिक आहे का? मग त्याला चंचुपात्रे सुंदर वाटत असतील, हे समजून घ्यावे. वगैरे, वगैरे.)

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2008 - 11:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिपीचित्रे सुरेख !!! काथ्याकुटातील विवेचन पाहता, मला जे समजलं त्यावर हिम्मत करुन दोन शब्द खरडतो.

काव्याच्या रसग्रहणासाठी त्यातील विषय आपल्याला वाचक म्हणून आवडावा लागतो, हे आवश्यक आहे. आणि कलेचा आनंद कुठल्या niche आस्वादकाला मिळणार आहे?

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकालाच एखादी गोष्ट आवडेल असे नाही.एखाद्याला जी गोष्ट आवडते ती दुसर्‍याला आवडणार नाही. म्हणजेच प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. असे असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असते. तो त्या आवडणार्‍या कलाकृतीचा आस्वाद घेत असतो. आस्वाद घेण्यासाठी त्याला सांगण्याची गरज नाही. मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो. हा, आता त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ असावी लागते. कोणतीही उच्च कलाकृती आस्वादकांवर संस्कार करते आणि त्याला उत्तम रसिक बनविते. आस्वादकाकडे ही रसिकता संस्काराने येते, ती विकसीत होते असते. त्यामुळेच त्याला चांगल्या-वाईटातला फरक कळतो. अर्थात आस्वादकाच्या ठिकाणी संवेदनक्षमता ही महत्वाची असते. कलाकाराने उत्तम कलाकृती सादर केली आहे, आणि रसिकाच्या ठिकाणी आस्वादाच्या नावाने बोंब असेल तर कलाकाराने कितीही जीव ओतला तरी त्या कलाकृतीची किंमत शुन्यच.

आता मला गणितात वीस पर्यंत पाढे सोडले तर बाकी गणित माझ्यासाठी 'ढ' चा प्रवास आहे. विज्ञानाच्या कोणत्या दोन घटकांपासून पाणी तयार होते, यात मला रुची नाही. कोणत्या काचेचा वापर कसा केला म्हणजे अवकाश निरिक्षण करतांना ग्रह स्पष्ट दिसतात, हे माझे नावडते विषय आहेत. त्यात मला कोणताही आनंद मिळणार नाही.
पण जेव्हा बहिणाबाईंची गाणी जेव्हा ऐकतो .........
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसे माझे येते गाणे ओठी

तेव्हा होणार्‍या आनंदाचे वर्णन करता येत नाही. म्हणुन कलाकार आपल्या कलेशी प्रामाणिक असला तरी आस्वादकाचा आनंद तपासण्यासाठी समीक्षकांच्या कसोट्या वापरु नये, तर समीक्षक आणि नुसता रसिक यात फरक केला पाहिजे असे प्रामाणिकपणाने वाटते.

अवांतर : काथ्याकुटातील विचार समजून घेतांना आणि नंतर प्रतिसाद लिहिल्यावर दमलो. इतके खरडूनही मला माझा प्रतिसाद विषयाशी संबधीत आहे की नाही, यावरच शंका येत आहे. धनंजयचे लेख समजून घेतांना फार गोची होते राव :)

-दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

24 Sep 2008 - 11:33 pm | लिखाळ

>>काथ्याकुटातील विवेचन पाहता, मला जे समजलं त्यावर हिम्मत करुन दोन शब्द खरडतो. <<
हा हा.. हे मस्त !

अश्या वेळी "तुझे मन याच्यात आहे, ते स्पष्ट दिसते का?" असे विचारावे..ते दिसत असेल तर झाले.. :) (ह.घ्या.)

लिपीचित्रे मस्त आहेत, सुरई ही नेहमीच सुंदर असते असे मानले जाते असे मी मानतो (या पेक्षा जास्त कूट वाक्ये बनवता येत नाहित ;) )

काथ्याकूट थोडा समजला असे थोडे वाटले. पण प्रयोजन समजले नाही.
समिक्षक नेहमीच समिक्षा करताना कवीचे निश काय आहे ते पहात असावेत. आणि कवी सुद्धा अनेकदा जे लिहितात ते ठराविक वर्गासाठीच ठरते.
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणुती दु:ख कुणाचे...किंवा
झाडाशी निजलो आपण झाडात पुन्हे उगवाया..
हे मला आवडले किंवा समजले असे म्हणणारा वाचकवर्ग म्हणजेच निश :)

माझे लेखन भरकटले असेल तर खुषाल विचार की माझे मन होते का त्यात..मी हो म्हणेन..पण पुरेशी तयारी झाली नव्हती हे न सांगताच कळेल :)

--लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

24 Sep 2008 - 11:34 pm | भडकमकर मास्तर

अवांतर : काथ्याकुटातील विचार समजून घेतांना आणि नंतर प्रतिसाद लिहिल्यावर दमलो. इतके खरडूनही मला माझा प्रतिसाद विषयाशी संबधीत आहे की नाही, यावरच शंका येत आहे. धनंजयचे लेख समजून घेतांना फार गोची होते राव

हे अवांतर अगदी खास... :)
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ's picture

25 Sep 2008 - 3:23 pm | विजुभाऊ

सहमत
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

भडकमकर मास्तर's picture

24 Sep 2008 - 11:36 pm | भडकमकर मास्तर

धनंजय उर्दूमध्ये कॅलिग्राफी की काय म्हणतात ते करत आहेत का ?
...
अवांतर : उर्दू अक्षरओळख कुठे होईल? कोणी दुवे देईल का?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू's picture

24 Sep 2008 - 11:41 pm | बेसनलाडू

येथे
(दुवादार)बेसनलाडू

धनंजय's picture

25 Sep 2008 - 1:07 am | धनंजय

आपली गंमत म्हणून. खरेखरचे उर्दू सुलेखन करणारा झीट येऊन पडेल. बहुतेक वेळी मी जाड पात्याच्या पेनने रोमन अक्षरे लिहितो, आणि कधीकधी देवनागरी अक्षरे (यांच्या तंत्रात खूपच फरक आहे).

उर्दू लिपी शिकायला मी बालभारती उर्दू यत्ता पहिलीचे पुस्तक आणले, आणि त्यानंतर म्हापशाच्या सरकारी शाळेतल्या शिक्षकाकडून एक वेळ लिपी समजावून घेतली. मला अजूनही अरबी क्रमात अक्षरे म्हणता येत नाहीत. (अरबीत आपल्या ग-म-भ-न सारखी आकार-साम्याने अक्षरे एकत्र शिकवली जातात. - खाली बेसनलाडू यांनी दिलेला दुवा बघावा.) मराठी अ-आ-इ-ई...क-ख-ग... याच क्रमात शिकायला मला सोयीचे गेले.
उर्दूतले अर्धेअधिक शब्द आपण हिंदीत वापरत असल्यामुळे सोपे-सोपे उर्दू वाचायला बरे असते - एकदोन अक्षरे लागली की अनुमानधपक्याने शब्द कळतो!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 11:37 am | बिपिन कार्यकर्ते

धनंजय, तुम्ही गंमत म्हणून खूपच छान कॅलिग्राफी केली आहे. तुम्हाला पण वेगवेगळ्या भाषा आणि लिप्या शिकायची आवड आहे हे वाचून बरे वाटले. तुमची लिपिचित्रे आवडली. लेख वाचतोय, समजला की अभिप्राय देईन. (ह.घ्या) ;)

अरबी आणि उर्दू लिप्यांचा मूळ स्त्रोत सारखाच असला तरी लिखावटी आणि काही उच्चारांमधे फरक आहे. जसे, अरबी 'रमदान' चा उर्दूत 'रमझान' होतो. उर्दू भाषा तर आपल्याला तशी पण कळते, त्या मुळे नेट लावून वाचले तर सगळे कळते.

(अरबी / उर्दू वाचणारा आणि सध्या कानडी मुळाक्षरे गिरवणारा) बिपिन.

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 1:10 am | विसोबा खेचर

धन्याशेठ, नेहमीप्रमाणेच लै भारी लिहिलं आहेस.. :)

मला वाटते की समीक्षकाने त्याच क्रमाने परीक्षण करावे : (१) कलाकार प्रामाणिक आहे का - कलाकृतीचा जो काय विषय आहे, तो सांगायची कळकळ कलाकाराला आहे काय? (२) त्या विषयासाठी तंत्र योग्य रीतीने वापरले आहे काय? ताक आणायला जायचे तर वाटी कशी लपवून चालणार. तेज़ाब दाखवायचे तर परीक्षानळी-चंचुपात्र कसे लपवून चालणार? (३) कलेचा आनंद कुठल्या niche आस्वादकाला मिळणार आहे?

मला काव्यातले फारसे कळत नसल्यामुळे समोर आलेली कविता ही मला आवडली किंवा नाही, एचढेच फक्त सांगता येते... :)

असो, चित्रेही छान! :)

स्वगत : हा धन्याशेठदेखील अंमळ चमत्कारिकच दिसतो! :)

तात्या.

नंदन's picture

25 Sep 2008 - 1:39 am | नंदन

दोन्ही सुलेखने आवडली, त्यातही सुरईचे शब्दचित्र मस्तच.

>> अनेक आस्वादकांच्या मनात चंचुपात्र आणि परीक्षानळ्यांनी सौंदर्य-नसलेल्या-वस्तूंच्या अडगळ कप्प्यात ठेवलेले असते. मला वाटते हा घोकंपट्टीच्या शिक्षणपद्धतीमुळे झालेला पूर्वदूषितग्रह आहे.
-- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

25 Sep 2008 - 3:00 am | चतुरंग

आधी मी तुझे हे लेखन वाचले तेव्हा नीटसे समजले नाही. दुसर्‍या वाचनात तू पुनःसंपादित केलेला शेवटचा राखाडी रंगातला परिच्छेद वाचला आणि चित्र स्पष्ट झाले.
प्रथम हे सांगतो की माझ्या प्रतिक्रियेवर मला तुझ्याकडून असे काही लेखन अपेक्षित होतेच, त्यामुळे तुझा हा लेख आला आणि मला फार आनंद झाला! माझ्या प्रतिक्रियेवर एवढा विचार दिलास त्याबद्दल धन्यवाद!

मला उर्दू लिपी समजत नाही पण चित्रे कळतात त्यामुळे सुरई आणि चंचुपात्र ह्यांच्या 'चित्र''लिपी' मधली लिपी समजली नाही तरी चित्र नीट समजले! :)
माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती, संवेदना सारख्या असतात. भावना व्यक्त करण्याची माध्यमे वेगवेगळी असू शकतात/असतात. भावना व्यक्त करण्याची पद्धतीही वेगळी असते.
तू लिहिलेली गजल ही प्रायोगिक अवस्थेतली होती ह्याचे निर्देशक म्हणून मी परीक्षानळी आणि चंचुपात्र ह्या रुपकांचा/उपमांचा वापर केला. त्यात मला कोठेही हे रुक्ष आहे, कलात्मक नाही असे अजिबात सांगायचे/सूचित करायचे नव्हते तर हे प्रायोगिक आहे आणि ह्यातल्या प्रतिभेच्या रसायनाचा प्रवास हा तिथून सुरु होऊन सुरईतल्या मदिरेपर्यंत होणार आहे एवढेच सांगायचे होते.

अनेक आस्वादकांच्या मनात चंचुपात्र आणि परीक्षानळ्यांनी सौंदर्य-नसलेल्या-वस्तूंच्या अडगळ कप्प्यात ठेवलेले असते. मला वाटते हा घोकंपट्टीच्या शिक्षणपद्धतीमुळे झालेला पूर्वदूषितग्रह आहे.
हा तुझा विचार मान्य आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी परीक्षानळ्या किंवा चंचुपात्रे ह्यांना कधीही अडगळीच्या कप्प्यात ठेवलेले नाही! लखलखणारी उपकरणे असलेल्या प्रयोगशाळेत गेल्यावर मला सराफाच्या दुकानात गेल्यावर स्त्रियांना व्हावा एवढा आनंद होतो! :) एवढेच काय पण अस्ताव्यस्त पसरलेली इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्री, टेस्टिंग इक्विपमेंट्स ह्यात बसून मी विडंबनही करतो! ;)
त्यामुळे घोकंपट्टीमुळे झालेला हा माझा पूर्वग्रह निश्चित नाही हे मी सांगू इच्छितो.

मला वाटते की समीक्षकाने त्याच क्रमाने परीक्षण करावे : (१) कलाकार प्रामाणिक आहे का - कलाकृतीचा जो काय विषय आहे, तो सांगायची कळकळ कलाकाराला आहे काय? (२) त्या विषयासाठी तंत्र योग्य रीतीने वापरले आहे काय? ताक आणायला जायचे तर वाटी कशी लपवून चालणार. तेज़ाब दाखवायचे तर परीक्षानळी-चंचुपात्र कसे लपवून चालणार? (३) कलेचा आनंद कुठल्या niche आस्वादकाला मिळणार आहे?
हे तुझे मुद्दे अगदी योग्य आहेत! तुझ्या कलेशी असलेल्या इमानाबाबत किंवा प्रामाणिकपणा बाबत मला यत्किंचितही शंका नाही. तुला विचार पोचवण्याची कळकळ आहे हेही निर्विवाद! गजलेच्या तंत्राबाबत मी काही बोलावे एवढा माझा गजलेचा अभ्यास नाही पण रसग्रहण करताना प्रायोगिक आणि उत्तम ह्यातला विवेक करु शकेन इतपत जाण आहे.

(अवांतर - माझ्या प्रतिक्रियेने तू थोडासा दुखावला तर गेला नाहीस ना असे मला वाटून गेले. तसे असेल तर मी माफी मागतो.)

चतुरंग

बिन्धास्त बबनी's picture

25 Sep 2008 - 7:07 am | बिन्धास्त बबनी

लेख फारसा कळला नसला तरी आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2008 - 8:27 am | प्रकाश घाटपांडे

मिपा नाडी केंद्रात धनंजय नाडीतील ही कूट लिपीतील अक्षरे आहेत. काहींना ती चित्र लिपी वाटते. पण कुठलीही लिपी ही ती न समजणार्‍यांसाठी चित्रलिपीच असते. काही घोटकारांच्या मते त्याचा उलगडा ( Decoding) हा आस्वाद घेतल्यावरच होतो.पण त्यासाठी नाडी मैफिलीत 'अन्वयार्थ' सांगणारे नाडीवाचक लागतात. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांना त्याचा अन्वयार्थ सांगुन समजत नाही. तो अर्थ समजुन घेण्यासाठी त्यांना असात्विक व्हावे लागते.

(सात्त्विक -असात्त्विक- सात्विक - अर्धअसात्त्विक)
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

25 Sep 2008 - 9:30 am | ऋषिकेश

"???????? "
-(बाऊंसरमुळे गोंधळलेला) ऋषिकेश
ही अस्तालिक का?

प्रमोद देव's picture

25 Sep 2008 - 9:32 am | प्रमोद देव

उर्दु अक्षरांतून 'साकार'लेली सुरई मस्तच आहे.
धनंजय ही व्यक्ती चांगलीच पोचलेली दिसतेय. किती विविध विषयात गती आहे ह्या माणसाला!

आणि दोन्हीही उच्च.

अवांतर-
धनंजय, तुम्हाला गझला/कविता कराव्याशा वाटतात ना?
आणि गझला/कविता एकाचवेळी एका सरळ अर्थाच्या आणि एका गूढ अर्थाच्या असाव्यात असे तुमचे स्वच्छ, प्रामाणिक मत आहे ना?
मग तशाच गझला/कविता तुम्ही करत रहा.
शेवटी प्रत्येक कृती ही स्वांतसुखाय असली पाहिजे. मगच ती इतरांना आनंद देऊ शकेल.
अन्यथा त्या कृतीत 'आत्मा'च नसेल... (आत्मसुखाय विशिष्टाद्बैत! ;) )

अतिअवांतर-
याच्यापुढे असे की एकदा एका प्रकारच्या वाटचालीत आपण पुढे गेलो, अधिकाधिक लोकांना ती वाटचाल आवडू लागली, कदाचित यश मिळाले, पायवाट रुळली/मळली की मग त्यात कृत्रिमपणा येतो, बनचुकेपणा येतो. यावेळी मग वाट आपल्यासाठी नसते,आपण वाटेचे होतो. लोकांना हे आवडते मग असेच करावे/पाडावे असे वाटू लागते. त्यावेळी हा आत्मा नाहीसा होतो.
असो. खरडवहीत लिहायचे ते इथे लिहिले.

मनिष's picture

25 Sep 2008 - 2:35 pm | मनिष

अवांतर-
धनंजय, तुम्हाला गझला/कविता कराव्याशा वाटतात ना?
आणि गझला/कविता एकाचवेळी एका सरळ अर्थाच्या आणि एका गूढ अर्थाच्या असाव्यात असे तुमचे स्वच्छ, प्रामाणिक मत आहे ना?
मग तशाच गझला/कविता तुम्ही करत रहा.
शेवटी प्रत्येक कृती ही स्वांतसुखाय असली पाहिजे. मगच ती इतरांना आनंद देऊ शकेल.
अन्यथा त्या कृतीत 'आत्मा'च नसेल... (आत्मसुखाय विशिष्टाद्बैत! Wink )

अतिअवांतर-
याच्यापुढे असे की एकदा एका प्रकारच्या वाटचालीत आपण पुढे गेलो, अधिकाधिक लोकांना ती वाटचाल आवडू लागली, कदाचित यश मिळाले, पायवाट रुळली/मळली की मग त्यात कृत्रिमपणा येतो, बनचुकेपणा येतो. यावेळी मग वाट आपल्यासाठी नसते,आपण वाटेचे होतो. लोकांना हे आवडते मग असेच करावे/पाडावे असे वाटू लागते. त्यावेळी हा आत्मा नाहीसा होतो.
असो. खरडवहीत लिहायचे ते इथे लिहिले.

प्रतिसाद अतिशय आवडला!

विकेड बनी's picture

25 Sep 2008 - 3:00 pm | विकेड बनी

पण लेख कळण्याच्या नावाने बोंब आहे.

अहो, जर कृती स्वांतसुखाय असेल आणि दुसर्‍याला कळते की नाही याची पर्वा नसेल तर जाहीर स्थळावर घालावीच का? ठेवा की भित्तीचित्र बनवून घरात आणि बघत बसा खुशाल. माणूस प्रयत्न करून दुसर्‍यांनी वाचावं म्हणून प्रकाशित करतो ते आपली वाहवा करून घेण्यासाठीच ना. मग पामरांना कळेल अशा भाषेत लिहिले तर काय बिघडले?

- विकेड बनी

धनंजय's picture

25 Sep 2008 - 8:59 pm | धनंजय

विकेड बनी यांनी परखड प्रतिसाद देऊन लेखकाला वठणीवर आणण्याचा नावलौकिक जागला.

कृती स्वांतसुखाय असेल आणि दुसर्‍याला कळते की नाही याची पर्वा नसेल तर जाहीर स्थळावर घालावीच का?

हे तर पटण्यासारखेच आहे. पण तो लेखाचा मुद्दा नाही.

लेखात क्रमवारी लावली आहे - १. प्रामाणिकपणा, २. तंत्र, ३. वाचकांशी (सर्व नसेल तर थोड्या तरी) संवाद

"दुसर्‍याला कळते की नाही याची पर्वा नसेल" हा मुद्दा लेखाच्या रोखाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे प्रामाणिक मुद्दा त्यांनी स्वांतसुखाय लिहिला असावा, लेखाच्या प्रतिसादात नाही. त्यांच्या तंत्राचा कलात्मक नमुना असल्यामुळे, मी येथे भरभरून दाद देतो.