पुरातनासोबत काही क्षण : मध्यप्रदेशातील मितावली आणि पडावली मंदिरे

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in भटकंती
31 Oct 2013 - 7:15 pm

मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकीच ह्या दोन जागा : मितावली आणि पडावली. नुकतीच इथल्या प्राचीन मंदिरांना भेट दिली. यापैकी नवव्या शतकातील बांधकाम असलेले मितावली येथील वर्तुळाकार मंदिर अजूनही बरेच सुस्थितीत आहे. आपल्या संसदेची वास्तू या मंदिराची प्रेरणा घेऊन बांधण्यात आली असे मानण्यात येते. छोट्या टेकडीवर स्थित मितावली थोडे दुर्गम भागातच आहे. ग्वाल्हेर - कानपुर हायवेवर १० किमीनंतर हायवे सोडल्यावर, पुढील २५ किमीचा रस्ता बरेच ठिकाणी खचलेला आहे. मात्र सभोवतालचे दृश्य रस्त्याबद्दलच्या वैतागाला थोडे सुसह्य करते. हिरवीगार शेते, लहानमोठ्या टेकड्या आणि त्या दिवशी कधी नव्हे ते दिसलेले निळे आकाश यामुळे मजा आली. अशात उजव्या हाताला मितावलीची टेकडी दिसू लागली. पायथ्याला तीन-चार वाहने एका वेळी लागतील एवढीच पार्किंगची जागा आहे. भोवताली विस्तीर्ण मळे आहेत पण जमीन सपाट नाही त्यामुळे पायथ्याशी पार्किंग मिळाले नाही तर अर्धा पाऊण किमीवर गाडी लावून चालत जावे लागते. आम्ही सुदैवाने आरंभाचे पक्षी (अर्ली बर्ड्स) होतो त्यामुळे त्रास झाला नाही. लगेच चढण सुरू झाली.
From mitawli 131013

१०० फूट दगडी पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते.

चढण छोटी असली तरी एकदम खडी आहे त्यामुळे बर्‍यापैकी दम लागला. शेवटची पायरी चढली आणि मंदिराची वास्तू एखाद्या प्रचंड भित्तीचित्राप्रमाणे अचानक समोर आली.

या छोट्या दरवाजातून मंदिरात प्रवेश होतो.

आत जाताच विस्तीर्ण वर्तुळाकार स्तंभरचना मन वेधून घेते. या प्रकाराच्या मंदिरांना चौसष्ठ योगिनी मंदिर म्हणतात असेही कळले. बाहेरील वर्तुळाला आतील बाजूने चौसष्ठ कोनाडे आहेत आणि प्रत्येकात एक छोटे शिवलिंग स्थापित आहे.

मध्यभागी गर्भगृह आहे, यातही शिवलिंग आहे. मात्र आता पूजा वगैरे होत नाही. पूर्वी एक कायमस्वरुपी पुजारी असायचा.

मंदिराची इमारत छतावरुन कशी दिसेल अशी उत्सुकता वाटल्याने तिथेही चढून पाहिले. तिथून इमारतीचा सुबक वर्तुळाकार आणि भव्यता आणखीनच उठून दिसत होती. दूरवर हिरवी शेतीही दिसत होती, आमच्या गाड्याही सुरक्षित दिसल्या.

तेवढ्यात एक स्थानिक आपणहून ओळख करून घ्यायला आला. त्याने आणखी माहिती दिली. त्यानुसार स्थानवैशिष्ट्यामुळे इथे खगोलशास्त्र आणि गणित यांची अभ्यासकेंद्रे होती. त्या माणसाने भिंतींवरील कोरीव कामाकडेही आमचे लक्ष वेधले. मंदिराखाली पूर्वी पाण्याची कुंडे होती आणि मंदिर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी आपसूक त्या कुंडांत जावे अशी रचना असल्याचेही त्याने सांगितले.

मितावली पाहून झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून खाणे-पिणे उरकले, काही काळ विश्रांती घेतली आणि खाली उतरून ४-५ किमीवर असलेल्या पडावलीच्या वाटेला लागलो.
जवळच सखल भागात असलेल्या पडावलीतील मंदिराची मात्र बरीच दैना झाली आहे. बाहेरुन भक्कम बुरुज दिसतात, बाहेरची मोठी बागही छान सांभाळली आहे मात्र आतील मंदिराचे आणि पुढे १९ व्या शतकात जाट राजांनी बांधलेल्या गढीचे भग्नावशेषच उरले आहेत.

केवळ एक गाभारा सुस्थितीत आहे ज्याच्या छतावर आणि भिंतींवर कोरीव काम पाहायला मिळते.

एक दोन ठिकाणी खजुराहो शैलीतील शिल्पांच्या ओळीही कोरलेल्या आढळतात.

जिथे जाण्यासाठी आजही बरेच कष्ट पडतात तिथे नवव्या-दहाव्या शतकात इतक्या उच्च प्रतीचे बांधकाम करणार्‍या अनामिक कारागीरांसाठी अपार आदर वाटला. उत्तम स्वच्छता आढळली. एक मात्र आहे की या दोन्ही ठिकाणी खाण्या-पिण्याच्या वा तत्सम सोयी फारशा नाहीत. पण एका अर्थी बरेच आहे, त्यामुळे या स्थानांचे अलिप्त - गंभीर व्यक्तिमत्व टिकून राहिले आहे असे वाटले.
फारशा परिचित नसलेल्या या प्राचीन स्थळांची ही सहल पुरातनाशी काही काळ नाते जोडून गेली आणि खूप आनंद देऊन गेली हे मात्र नक्की.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे भेट द्यायची असेल तर ग्वाल्हेर मध्ये मुक्काम करुन कारने जाण्याखेरीज पर्याय नाही. बस वगैरेची काहीही सोय नाही. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभराचे खाणे-पिणे बरोबर घेऊन जावे लागते.

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

31 Oct 2013 - 7:23 pm | चित्रगुप्त

वाहवा. अगदी नवीन जागेची माहिती दिलीत. फोटो आणि माहिती सुंदर. अश्याच आणखी जागांना भेटी देऊन लिहित रहा. शुभेच्छा

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2013 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ :)

बाबा पाटील's picture

31 Oct 2013 - 7:51 pm | बाबा पाटील

मितावली फक्त मंदीर वाटत नाही.आणखी काही तरी अभ्यास केंद्र वाटते.जाणकारांकडील माहितीच्या प्रतिक्षेत. ग.वि. कॉलिंग ग.वि.

मुक्त विहारि's picture

31 Oct 2013 - 8:30 pm | मुक्त विहारि

असेच वाटते...

रामपुरी's picture

1 Nov 2013 - 2:13 am | रामपुरी

वर्तुळाकार, कोरलेल्या नक्षीतले चौरस अगदी अचूक वाटतात. नवव्या दहाव्या शतकात इतके अचूक कोरीवकाम कसे साधले असेल? खिद्रापूर वगैरे सारख्या देवळातील एकसारखे गोल खांब पाहूनही हाच प्रश्न पडतो.
नवीन जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... बघू कधी जमतंय जायला

दीपा माने's picture

1 Nov 2013 - 2:20 am | दीपा माने

शंकर आणि भवानी ही दैवते भारताच्या स्रर्वच ठिकाणी दिसतात. ही आदि दैवते ध्यानाची, तपाची आणि मुक्तीची द्दोतके जशी आहेत तशीच ती क्षात्रतेजाची, अंगाराची आणि समुळ नाशाचीही द्दोतके आहेत.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:28 am | प्यारे१

खूपच सुंदर!

रमेश आठवले's picture

1 Nov 2013 - 4:04 am | रमेश आठवले

lyuten या ब्रिटीश architekt ने नव्या दिल्लीची वास्तू ८५ वर्षापूर्वी बांधून पूर्ण केली. त्यातील लोकसभेच्या इमारतीमध्ये आणि पडावलीचे मंदीराम्ध्ये असलेले साम्य विलक्षण आहे. त्या सम्बन्धी त्याने कुठेतरी उल्लेख केला असला पाहीजे. ASI मध्ये मध्ये किंवा नेशनल म्यूझीउम मध्ये या बाबतची माहिती मिळू शकेल.
फतेपूर सिक्री येथे अकबर बादशहाने एका साधरणत: दहा फूट उंचीच्या स्त्म्भावर स्वत:चे तख्त व त्याच्या भोवती अष्ट प्रधानांच्या गोलाकार असलेल्या आठ मसनदी अशी रचना केलेली आहे. याची या लेखावरून आठवण झाली.

किसन शिंदे's picture

1 Nov 2013 - 9:33 am | किसन शिंदे

वाह! मितावलीचे मंदिर अतिशय सुरेख दिसतेय.

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 3:18 pm | बॅटमॅन

फेसबुकवर या देवळाचे फटू पाहिले होते. पुन्हा पाहताना जब्राट मजा आली. नादच खुळा!!!! अन माहितीबद्दल आभार, एकदा तरी नक्कीच जाणारे इकडे.

विटेकर's picture

1 Nov 2013 - 3:41 pm | विटेकर

..वंदे मातरं !
पुण्यभूमी, देवभूमी !

प्रचेतस's picture

1 Nov 2013 - 3:59 pm | प्रचेतस

जबरदस्त.
ह्या मध्य प्रदेशात खजिना भरलाय अक्षरशः.

जे.पी.मॉर्गन's picture

1 Nov 2013 - 5:29 pm | जे.पी.मॉर्गन

सुंदर फोटू आणि वर्णन. पहायला पाहिजे एकदा!

जे.पी.

'एकदा तरी जायला पाहिजे' असं वाटायला लावणारे फोटो आणि वर्णन.

छान आणि नवीन जागा दाखवलीत ."मूर्ती कुठे गेल्या " : ग्वालिअर किल्याच्या पायथ्याशी गुजरी महाल आहे त्याचे आता संग्राहलय केले आहे तेथे बऱ्याचशा मूर्ती ठेवल्या आहेत .

पैसा's picture

2 Nov 2013 - 1:20 am | पैसा

जबरदस्त वर्णन आणि फोटो! इतकी सुंदर आणि प्राचीन वास्तू अशी दुर्लक्षित कशी राहिली कोणजाणे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 2:13 am | डॉ सुहास म्हात्रे

एका अतिशय वेगळ्या बांधकाम शैलितले मंदीर पाहून आश्चर्य वाटले की अशा मदिराची काहीच प्रसिद्धी कशी नाही? असेच फिरत रहा आणि असेच नविन काही दाखवत रहा !

वा! फारच सुरेख! अत्यंत देखणी मंदिरे आहेत! प्रकाशचित्रेही छान आली आहेत.
माहितीबद्दल आभार.

चौकटराजा's picture

4 Nov 2013 - 9:13 am | चौकटराजा

ग्वालियर सर्कल मधले हे ठिकाण खरंच माहीत नव्हते. अलोकिक जागा आहे. एक शंका- इथे जर काही वस्ती असेल तर ही ही माणसे कारनेच ग्बालियरला येतात का ? ग्वालियर ते पडावली अंतर किती ? वेळ किती लागतो ?

सुरेख फोटो आणि महत्वपूर्ण माहिती...

दीपा माने's picture

15 Nov 2013 - 8:00 am | दीपा माने

व्वा! जग किती सुंदर असू शकते याचा जणु परिपाठच दिलात.

झंम्प्या's picture

15 Nov 2013 - 8:17 am | झंम्प्या

"जिथे जाण्यासाठी आजही बरेच कष्ट पडतात तिथे नवव्या-दहाव्या शतकात इतक्या उच्च प्रतीचे बांधकाम करणार्‍या अनामिक कारागीरांसाठी अपार आदर वाटला."

अजब आहे नै. अचाट ज्ञान काळाच्या पडद्या आड मिटून जात. राहतात अशी भग्न अवशेष, ज्या वरून आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
मग दडलेलं ज्ञान पुन्हा हळू हळू नव्या रुपानं समोर येत आणि काही काळाने पुन्हा लुप्त होतं. कळत नाही कशासाठी हा खेळ आहे.

सुमीत भातखंडे's picture

27 Nov 2013 - 11:29 am | सुमीत भातखंडे

जायला पाहिजे यार...कधी योग येतोय कुणास ठाऊक

सुहास..'s picture

27 Nov 2013 - 11:42 am | सुहास..

वेगळेच !! खुप आवडले !!

वाश्या
(त्याच त्याच भटकंती-चित्रणाला वैतागलेला )