नायिका भेद

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 Nov 2013 - 12:05 am

मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.

खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.

१. पुत्रवल्लभा.

ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.

a

सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.

a

ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.

a

२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.

a

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.

a

कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.

a

३. आलस्यसुंदरी.

ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.

a

४. कर्पूरसुंदरी

ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी

a

खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.

a

५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.

a

गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.

a

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.

a

भुलेश्वरातील ही एक दर्पणा

a

हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.

a

६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्‍या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.

पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.

a

ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.

a

ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.

a--a

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.

a

७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्‍या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.

a

८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.

a

९. शुकसारिका.

हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्‍या हातात पोपट असतो.

पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका

a

१०. विषकन्या.

तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.

शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.

पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.

a

भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.

a

प्रतिक्रिया

उद्दाम's picture

6 Nov 2013 - 12:31 pm | उद्दाम

छान आहेत. खिद्रापूरची विषकन्यका आवडली.

---------------------

खिद्रापूरच्या विषकन्यकेकडून आयुष्यभराचा दंश मारुन घेतलेला उद्दाम.

मनराव's picture

6 Nov 2013 - 4:19 pm | मनराव

उत्तम माहिती........

विटेकर's picture

6 Nov 2013 - 4:38 pm | विटेकर

अप टू योर रेप्यूटेशन..
मस्तच ! यापूर्वी फक्त संस्कृत वाडमयातील ( हा शब्द कसा लिहायचा? wadmay ) अष्ट्नायिका माहीती होत्या..
जरा चंची उघडा.. येऊ दे अजून ..
नवनायिकांवर श्री ब्याट्मन यांनी लेख लिहावा अशी विणंण्ती करण्यात येत आहे..चित्रप्रदर्शन असावे पण लेखाच्या गरजेपुरतेच ! ( हिंदी शिनेमात नायिका कथेची गरज म्हनून अंगप्रदशन कर्तात तितकेच !)

बॅटमॅन's picture

6 Nov 2013 - 4:46 pm | बॅटमॅन

वाङ्मय = wAGmay

ङ = Ga

बाकी प्रस्तावाबद्दल धन्यवाद, पण नवनायिकांवर लेख लिहिण्याइतका आपला आजिबात अभ्यास नै विटेकरजी. ते काम वल्ली, चित्रगुप्त नैतर जयंत कुलकर्णी यांचे. :)

अरे त्यांना नवनायिका म्हण्जे तुमच्या क्याटवूमन, इलेक्ट्रा, स्टॉर्म सारख्या अभिप्रेत असाव्यात. :)

अर्र्र्र्र्र्र तसंय होय...गल्लतच झाली खरी समजण्यात =)) धन्स रे वल्ली.

एनीवेज़ विटेकरजी, आमच्या पिच्चरपुरते हे काम यावच्छक्य अवश्य केल्या जाईल :)

प्रथमतः मार्जारनायिकांबद्दल लिहीन ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2013 - 5:52 pm | अत्रुप्त आत्मा

@आमच्या पिच्चरपुरते हे काम यावच्छक्य अवश्य केल्या जाईल Smile
प्रथमतः मार्जारनायिकांबद्दल लिहीन>>> प्रतिक्षेमधे आहे. :)

प्यारे१'s picture

7 Nov 2013 - 4:27 pm | प्यारे१

वाट बघतो आहे!

विटेकर's picture

7 Nov 2013 - 3:10 pm | विटेकर

ओल द बेष्ट !
आणि आवड असली की सवड मिळतेच की !
होऊ दे खर्च .. हे आप्लं खरंच !

प्रचेतस's picture

6 Nov 2013 - 5:36 pm | प्रचेतस

आताच माझ्या संग्रहातील फोटो धुंडाळता धुंडाळता खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका दिसली.
वर धाग्यातही अद्यतन केले आहेच. इथेही शुक मूर्तीभंजकांनी भग्न केलाय.

a

यशोधरा's picture

7 Nov 2013 - 6:31 am | यशोधरा

किती देखणे शिल्प आहे!

स्पंदना's picture

7 Nov 2013 - 7:17 am | स्पंदना

पाय इकडे करा वल्ली!
अक्षरशः नजरिया बदलुन गेला शिल्पांकडे पहाण्याचा.
एका पेक्षा एक सुरेख, अन अश्या शिल्पांच्या अभ्यासाचा तुमचा ध्यासही तेव्हढाच सुरेख!
वरील बट्टुचार्यचा अन प्यारे काकांचा दंगा लय भारी, अन पैसाताई अन चित्रगुप्तांचा अभ्यासपूर्ण सहभाग आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2013 - 12:47 am | अत्रुप्त आत्मा

@ बट्टुचार्य>>> =)) http://static.ddmcdn.com/gif/how-to-draw-cartoons-2.jpg

छोट्टा बट्टम्याणू बट्टूआचार्य! =))

अपर्णा तै: बटूच करून टाकलेत की हो मला, सोडमुञ्ज व्हायची वेळ आली आता ;)

आत्मूसः चित्र उत्तम आहे, फक्त वरती वाघळी टोपी तेवढी लावा. मिनी गदाही उत्तमच आहे ;)

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 4:25 am | स्पंदना

सोडमुंज....:))
(सोडमुंजीचे लाडू मिळणार या आशेने पल्लवित)

प्यारे१'s picture

8 Nov 2013 - 4:09 pm | प्यारे१

>>>सोडमुञ्ज व्हायची वेळ आली आता

वाट बघतो आहे. ;)

१) कुठे ही जाताना शिल्पे घाई घाईत पाहू नका.
२) त्या त्या काळची एकादी रीतभात शिल्पातून व्यक्त होउ शकते. उदा बेलूर ला उंच टाचेची चप्प्ल घालतेली बाई ( शिल्पातली )पाहिल्याचे आठवते.
३)एखादा प्रसंग चित्रित ( शिल्पित )केला असेल तर पात्रांचे भाव पहा !
४)दागदागिने , केशरचना, निरखून पहा.
५)शिल्पासाठी वापरलेल्या दगडाची बलस्थाने वा मर्यादा यांची माहिती शिल्पाद्द्लचे मत बनविताना जरूर घ्या
६)काही पुन्हा पुन्हा दिसणार्‍या मुद्रा उदा. सिंह मुख , ड्रॅगन सद्द्र्श राक्षस मुदा ई चा अभ्यास करा.

स्पा's picture

7 Nov 2013 - 10:29 am | स्पा

अप्रतिम रे वल्या
मस्त माहितीपूर्ण लेख

खाजुरावो प्लान कर आता

सौंदाळा's picture

7 Nov 2013 - 10:48 am | सौंदाळा

अफलातुन लेख आणि फोटो.
नजाकतदार डीटेलिंग

मालोजीराव's picture

7 Nov 2013 - 12:22 pm | मालोजीराव

मस्त रे वल्लोबा…समद्या नायिका आवडल्या…

आलस्यसुंदरी आणि शुकसारिका कातिल…त्यांना वाड्यावर पाठवा ;)

वरील नायिका या मुख्य नायिकाभेदातील उपभेद असाव्यात…

अ) धर्मानुसार भेद:
१) स्वीया अथवा स्वकीया: स्वत:ची पत्नी वा स्त्री
२) अन्या अथवा परकीया: दुसऱ्याची स्त्री
दोन प्रकार १) ऊढा- लग्न झालेली २) अनूढा लग्न न झालेली
३) साधारण- गणिका, वेश्या, पैश्यासाठी प्रेम करणारी

ब) वयोमानानुसार अथवा दशानुसार भेद:
१) मुग्धा: जिच्या अंग प्रत्यंगात नुकतेच यौवानाकुर फुलू लागले आहेत व जी कामक्रीडे विषयी संपूर्णपणे उनभिज्ञ आहे
दोन भेद: १) अज्ञात यौवाना: यौवानाची जाणीव नसलेली, २)ज्ञात यौवाना: यौवानाची नुकतीच जाणीव होवू लागलेली
२) मध्या: लज्जा व काम जिच्यात समप्रमाणात आहेत. ( जिला कामक्रीडा माहित आहे, आवड आहे, परंतु प्रचंड लाजाळू स्त्री )
३) प्रौढा: किंचित लज्जा व कामाचे परिपूर्ण आणि संपूर्ण कामकलेमध्ये प्रविण असलेल्या स्त्रिया. अथवा प्रगल्भा.

क) अवस्थानुसार भेद:
१) वासक सज्जा: प्रियकर घरी येणार म्हणून साजश्रुंगार करत नटणारी व त्यातच दंग असणारी स्त्री.
२) वीरहोत्कांठीता: प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेली स्त्री.
३) स्वाधीनपतीका: पती जिच्या संपूर्ण अधीन आहे अशी स्त्री
४) कलहांतरिता: प्रथम प्रियकराशी भांडण उकरून काढणारी व तो रागावून निघून गेल्यावर भांडण मिटवण्यास उत्सुक असणारी पश्यातापदग्ध स्त्री
५) खंडिता: प्रियकराच्या अंगावर रतीचिन्हे पाहून रागावणारी, दु:ख,व्यक्त करणारी स्त्री
६) विप्रलब्धा: प्रियकराने सांगितलेल्या संकेतस्थळी येवून तो तेथे न आल्याने दु:खित झालेली स्त्री
७) प्रोषितपतिका: जिचा पती परदेशात गेला आहे अशी स्त्री
८) अभिसारिका: कामार्त होऊन कशाचीही लाजलज्जा न बाळगता प्रियकराला भेटण्यासाठी धावत सुटलेली स्त्री

ड) वर्णानुसार भेद:
१) दिव्या: देवांच्या ( ब्राह्मणांच्या ) स्त्रिया
२) आदिव्य: मानव स्त्रिया
३) दिव्या दिव्या: भूतलावर जन्म घेतलेल्या देव स्त्रिया. उदा. सीता

ई) प्रकृत्यानुसार भेद:
१) उत्तमा: पतीच्या सुखात आपले सुख मानणारी. तो कितीही हरामखोर असला तरी न रागावता स्वतः सदाचरण करणारी
२) मध्यमा: पतीचे दोष-गुण पाहून राग-लोभ-प्रेम व्यक्त करणारी
३) अधमा: पती कितीही चांगला वागला तरी दुराचरण करणारी

फ) स्वभावानुसार भेद:
१) अन्यसुरत दु:खिता: दुसऱ्या स्त्रीच्या अंगावर आपल्या पतीची रतीचिन्हे पाहून दु:ख करणारी स्त्री
२) मानवती: पतीचा अपराध त्याच्या लक्ष्यात आणून देणारी मानीपणा करणारी स्त्री
३) गर्विता:
प्रेमगर्विता: पतीच्या स्वतःवरील प्रेमाचा गर्व करणारी
रुपगर्विता: स्वतःच्या रूपाचा गर्व करणारी
गुणगर्विता: स्वतःच्या गुणाचा गर्व असणारी

प्रशांत's picture

7 Nov 2013 - 1:17 pm | प्रशांत

छान माहिती दिलिस...

अवांतरः वरील नावावरुन स्त्री-आयडींची त्सुनामी येण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

प्रचेतस's picture

7 Nov 2013 - 2:01 pm | प्रचेतस

धन्स हो राजे.
खच्चुन माहिती दिलीस.
'खंडिता' हिलाच अन्यःसंभोगदु:खिता' असेही म्हणतात. :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2013 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा

कडक सलाम टू मालूजीबाबा. __/\__ :)

चित्रगुप्त's picture

7 Nov 2013 - 12:54 pm | चित्रगुप्त

@ मालोजिरावः व्वा. छान अर्थ उलडून सांगितलात. पाश्चात्त्य देशातील नाना लफडी कुलंगडी करणार्‍यांना देखील एवढे प्रकार सुचले नसतील. इंग्रजी साहित्यात वा ग्रीक वगैरे पुराणकथात आहेत का असे काही नायिकाभेद?

याशिवात ते शंखिणि, पद्मिनी, हस्तिनी वगैरे प्रकरणही आहेच. त्याचीपण माहिती द्यावी कुणीतरी. असतील तर शिल्पेही द्यावीत.
पिकासो बाबांनी पाश्चात्त्य पंचनायिकाच तर चित्रित केलेल्या नाहीत इथे?
(बीभत्सिणी, खत्रूडिनी, भैताडिनी, विक्षिप्तिनी, कालतोंडिनी बगैरे....

.

प्यारे१'s picture

7 Nov 2013 - 2:01 pm | प्यारे१

>>>बीभत्सिणी, खत्रूडिनी, भैताडिनी, विक्षिप्तिनी, कालतोंडिनी बगैरे....

मेलो मेलो मेलो!

चित्र-गुप्त नाही 'चित्रप्रदर्शक' असं नाव ठेवायला हवं तुमचं!

बॅटमॅन's picture

7 Nov 2013 - 4:09 pm | बॅटमॅन

बीभत्सिणी, खत्रूडिनी, भैताडिनी, विक्षिप्तिनी, कालतोंडिनी

=)) =)) =))

चित्रगुप्तजी, खपलो वारलो, मेल्या गेले आहे. साष्टांग _/\_

उद्दाम's picture

7 Nov 2013 - 1:49 pm | उद्दाम

१००

सूड's picture

7 Nov 2013 - 10:28 pm | सूड

छान माहिती!!

माहितीपूर्ण लेखन आणि काही प्रतिसादही त्यात भर घालणारे.
अनेकदा माहिती नसल्याने जुन्या मंदिरात बघण्याजोगे काय आहे ते समजत नाही. अशा लेखांतून होणारे मार्गदर्शन उपयुक्त ठरते मग.

सुधीर मुतालीक's picture

8 Nov 2013 - 1:19 pm | सुधीर मुतालीक

व्वा मित्रा, मजा आली वाचताना. मी मंदिरे, राजवाडे, किल्ले, निसर्ग सौंदर्य वगैरे प्रांतातला आजिबात नाही, म्हणजे या सगळ्यात सौंदर्य पाहण्याची दृष्टी माझ्याकडे अजिबात नाही. त्यामुळे मला कधी कधी या सगळ्या प्रकारात प्रचंड बुडून जाणा-या लोकांचा हेवा वाटतो. पण तुझे लिखाण आणि त्या बरोबर असणारे फोटो बघताना मजा आली. थोडे फार कळले सुद्धा. छान लिहिलंयस. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Nov 2013 - 3:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्ली महाराज की जय

सगळे फोटु आणि वर्णन आवडले आहे.
मनापासुन धन्यवाद.

रमताराम's picture

10 Nov 2013 - 6:45 pm | रमताराम

सद्गुरु _/\_

दिपक.कुवेत's picture

12 Nov 2013 - 11:37 am | दिपक.कुवेत

आज एक वेगळिच पण अतिशय अभ्यासपुर्ण अशी माहिती मिळाली. आता कधी काळी अशी शील्प दिसलीच तर वल्लींचा हा लेख आठवेल.

इन्दुसुता's picture

14 Nov 2013 - 7:57 am | इन्दुसुता

माहितीपूर्ण लेख ... (तसेच काही प्रतिसाद देखिल )
अतिशय आवडला..
@ वल्ली : या विषयातील तुमचा अभ्यास / ज्ञान पाहून कौतुक मिश्रित आदर वाटत आला आहे नेहमीच.

झकासराव's picture

14 Nov 2013 - 4:09 pm | झकासराव

वल्ली द ग्रेट!!!!!!!!!!!!!!!!!!!!

:)

सस्नेह's picture

14 Nov 2013 - 5:27 pm | सस्नेह

सौंदर्यातली शिल्पकला की शिल्पकलेतले सौंदर्य ?
भारी अहेत सगळ्या नायिका. त्यातल्यात्यात 'दर्पण' वाल्या लैच भारी !

दीपा माने's picture

15 Nov 2013 - 7:57 am | दीपा माने

वल्ली, तुमच्या चष्म्याने तुमचे किंवा तुम्ही प्रतिसादलेले इतरांचे लेख आणि त्यातील शिल्प पाहताना नजरेला आणखीन वेगळी अभ्यासू डायमेन्शन लाभते.
आपले मनःपुर्वक आभार.

प्रसाद गोडबोले's picture

18 Dec 2014 - 3:16 pm | प्रसाद गोडबोले

आता एकदा वल्ली सोबत खिद्रापुर कोपेश्वरला जाणे आले :)

आता वल्लीने पद्मनाभस्वामि मंदिराच्या प्रदक्षिणामार्गास भेट द्यावी (पण फोटो नाही काढायला मिळणार योगमुद्रेतील साधूंचे).