हुस्ना..

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
26 Aug 2013 - 7:05 pm

पाकिस्तानात कोण जायला बसलंय? जायलाच कशाला पाहिजे, तुमचा-आमचा, प्रत्येकाचा सेप्रेट, पाकिस्तान तुमच्या-आमच्या मनात आहे.

तो कधी नव्हता? केन-एबलच्या मनात होताच की! महाभारतातल्या भाऊबंदकीत तो आहेच, मध्ययुगातल्या बेबंदशाहीत बेलगाम उधळला तो. हातपाय ऐसपैस पसरले त्याने. लांब का जा? आजही जनतेचे सेवक निढळाचा घाम गाळून पेरत असतातच की एकेका पाकिस्तानाची बीजं गल्ली-मोहल्ल्यात! तुमच्या-आमच्या फक्त मनातच असतो असं नाही पण मनातही असतो. आणि बाहेरही. मनातला असतो जरासा धूसर, पाचोळ्यानं झाकलेल्या विस्तवातुन येणार्‍या धुराच्या वळशांसारखा. आणि तोच जन्म देतो बाहेरच्याला. ते महत्त्वाचे. तुमचा पाकिस्तान मोठा असेल तर मला कदाचित काही सुटका नाही हो त्यातुन. मी आलंच पाहिजे. किंवा गेलंच. काय फरक पडतो तुम्हाला?

तर हा होता, आहे, असणार. आहे का? असावा का? असतोच का? वगैरे वगैरे म्हणजे वांझेच्या ओकार्‍या. पण 'आहे' म्हटलं म्हणुन याची टोचणी टळत नाही. आणि लाख मान फिरवलीत तरी याचा दाह पोळून काढणारच.

जावेद आणि हुस्नाच्या कहाणीच्या पार्श्वभूमीला हा पाकिस्तान होऊ घातलेला हिन्दुस्थान आहे. सर्वत्र खदखद आहे. पण जावेद आणि हुस्नाच्या मनात लाहोरच्या धुक्यात हरवलेल्या वाटा, दवं पांघरलेल्या सुंदर बागा आहेत. लग्न ठरलंय, भेटीगाठी होऊ लागल्यात, ओढ वाटु लागलीये.

कामानिमित्त जावेद लखनौला आला काय आणि ते सगळं अभद्र सुरू झालं. लोक दिशा हरवले, बागेतल्या गुलाबांवर रक्ताचे शिंतोडे उडाले. जावेदची परतीची वाट काटेरी कुंपणात अडकली. तडफडला काही दिवस पण मग शहाणा झाला. आता दोन गोंडस पिल्लं आहेत त्याची. सगळं सुखाचंच चाललंय, पण डोळे मिटले की मनातला एक तरूण अडखळत, धूंडाळत शोधत असतो हुस्नाच्या पाऊलखुणा. लाहोरमध्ये. त्या दुसर्‍या मुलुखात. पाकिस्तानात. मनातली वेदना झरू लागते, अंधुक-निवडक स्मृतींचा झिम्मा शब्दांतुन उमटू लागतो.

लाहौर के उस पहले जिले के दो परगना में पहुंचे
रेशम गली के, दूजे कूचे के, चौथे मकां में पहुंचे
और कहते हैं जिसको दूजा मुल्क, उस पाकिस्तां में पहुंचे
लिखता हूँ ख़त मैं हिन्दोस्तां से, पहलू-ए हुस्ना में पहुंचे
ओ हुस्ना..

मैं तो हूँ बैठा, ओ हुस्ना मेरी, यादों पुरानीयों में खोया
पल-पल को गिनता, पल-पल को चुनता, बीती कहानी में खोया
पत्ते जब झड़ते हिन्दोस्तां में यादें तुम्हारी ये बोलें
होता उजाला हिन्दोस्तां में बातें तुम्हारी ये बोलें

ओ हुस्ना मेरी
ये तो बता दो
होता है, ऐसा क्या
उस गुलिस्तां में
रहती हो नन्हीं कबूतर सी
गुमसुम जहाँ
ओ हुस्ना..

आणि बाकी सगळं कसं आहे तिकडे? अजुन हुझुरी बागेशेजारी, बाजाराच्या वाटेवर तो मोठा पिंपळ, तो दगडी पार तसाच आहे का? त्याचं एक तळहाताएवढं पान, शीरांच्या जाळ्यासकट अजुन आहे पुस्तकाच्या पानात ठेवलेलं माझ्याकडे. तुझंच पुस्तक ते, बुल्ले शाहच्या रचनांचं. माझ्याकडेच राहिलं. पिंपळ अजुन तसाच सळसळतो का? पानं तशीच गळतात का गं अजुन? इथेही एक पिंपळ आहे त्यासारखा पण तो निराळाच.

पत्ते क्या झड़ते हैं पाकिस्तां में वैसे ही
जैसे झड़ते यहाँ
ओ हुस्ना..
होता उजाला क्या वैसा ही है
जैसा होता हिन्दोस्तां में हाँ
ओ हुस्ना..

वो हीरों के रांझे के नगमें
मुझको अब तक, आ आके सताएं
वो बुल्ले शाह की तकरीरों के
झीने झीने साये..

मला आठवते ईदच्या वेळची ती सगळी धामधूम.. फझ़र नमाझासाठी उठायची गडबड. डोळे चोळत, कसंबसं आवरून मशिदीत पोचलं की दिसणारी गर्दी. अन् मग थोड्या वेळानं आवारात नजर जाईल तिकडे झुकलेले नमाझी. मशिदीच्या बाहेरचा तो खमंग कलकलाट.. ते रेवडीचे ढीग, ती शेवयांची झालर. आणि आठवते ती दिवाळीत लालाजींच्या दुकानातली रोषणाई - मिठाई, गुरदीपचा बैसाखीतला भांगडा, ते रंग, ती चिमट्यांची खणखण्, ढोलावर डग्गा-तिलीचा तडाखा! थंडी ओसरायला लागली की टालावरून उचलून आणलेल्या लाकडांची, ढलप्यांची साठवण व्हायची. अन् मग जी होळी पेटायची! गर्दी दहादिशा झाल्यावर, चट्चट् आवाज येणार्‍या ओंडक्यांवर दोघांनी धरलेल्या ओंजळी, तो उबदार, हवाहवासा स्पर्श..

वो ईद की ईदी लम्बी नमाजें
सेंवैय्यों की झालर
वो दिवाली के दीये संग में
बैसाखी के बादल
होली की वो लकड़ी जिनमें
संग-संग आंच लगाई
लोहड़ी का वो धुआं जिसमें
धड़कन है सुलगाई
ओ हुस्ना मेरी
ये तो बता दो
लोहड़ी का धुंआ क्या
अब भी निकलता है
जैसा निकलता था
उस दौर में हाँ वहाँ
ओ हुस्ना..

क्यों एक गुलसितां ये
बर्बाद हो रहा है
एक रंग स्याह काला
इजाद हो रहा है

ये हीरों के, रांझों के नगमे
क्या अब भी, सुने जाते है हाँ वहाँ
ओ हुसना
और
रोता है रातों में
पाकिस्तां क्या वैसे ही
जैसे हिन्दोस्तां
ओ हुसना

आठवणी आता धूरकट होत चालल्यात.. पण काळजातला व्रण अजुन जागा आहेच. तो कधी जायचा नाही. मनातल्या फुलबागेत डागण्या देणारे ते दिवस अजुन डोके वर काढतात. वाटतं सगळ्या हवेतच भरून राहिलीय ती तडफड, ती घुसमट.. मागे जाऊन कायकाय बदलु मी? तेव्हा मीही वेगळा होतो आजच्याहुन. अन् तूही बदलली असशीलच माझ्या कल्पनेपेक्षा.. पण सांग ना गं काही बदललंय का आज खरोखर? अजुन लोक तुडुंब जेऊन पाय मोकळे करायला येतच असतील शालिमार बागेजवळ. गप्पा, कहाण्या इकडून तिकडे जमा होतच असतील की! आणि गेलेल्या दिवसांच्या, माणसांच्या आठवणीही निघत असतील कदाचित, नाही? मला तर अजुन छातीत कळ येते बघ..

आणि कदाचित तुलाही साहवत नसेल हे सगळं... हो ना गं?

इथे हुस्ना ऐका..

संगीतसमीक्षा

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

26 Aug 2013 - 7:18 pm | आनन्दिता

श्वास अडकतोय अगदी वाचताना,,,, केवळ अप्रतिम !! पियुष च्या प्रतिभेला सलाम..

ही देखणी प्रतिभा आमच्या पर्यंत तेवढ्या ताकतीने पोहचवल्या बद्दल तुम्हाला खुप धन्यवाद.. ओ हुस्ना या आधी ही कोक स्टुडीओ मधे ऐकलं होतं... आज मात्र ते जास्त अपील झालं...

शिल्पा ब's picture

26 Aug 2013 - 8:50 pm | शिल्पा ब

+1

किलमाऊस्की's picture

26 Aug 2013 - 10:03 pm | किलमाऊस्की

अप्रतिम लिहिलय. आता परत ऐकलं कोक स्टुडीओ. जास्त अपील झालं. एक अफाट कलाकृती तितक्याच ताकदीने पोचवलीत. खरंच मनपूर्वक धन्यवाद!!

निवांत पोपट's picture

26 Aug 2013 - 8:28 pm | निवांत पोपट

हे निव्वळ अप्रतिम आहे.रसग्रहणातून मूळ गाण्यातले उत्कट भाव त्याच समरसतेने पोहोचतायत. जावेद, लाहोर,हुझुरीबाग हे गाण्यात नसलेले संदर्भ कोठून आले हा प्रश्न मात्र पडला! गाणं ही अप्रतिम आहे.(चालीमुळे मधून मधून 'जाने कहॉ गये वो दिन' आणि 'तेरे नयना सावन भादो' आठवत राहतं)

शिवोऽहम्'s picture

26 Aug 2013 - 9:22 pm | शिवोऽहम्

या गाण्याची कुळकथा तू-नळीवर आहे एका ठिकाणी. त्यात जावेद-हुस्नाची गोष्ट पियुष मिश्राला कशी सुचली ते त्रोटक शब्दांत त्यानं सांगितलंय. लाहोरचा उल्लेख तर गाण्यातच आहे. हुझुरीबाग, शालिमार बाग वगैरे तुकडे लाहोरच्या अनुषंगाने जोडलेत. मूळ रचनेतल्या हाँटींग नॉस्तॅल्जियाचे कवडसे पकडायचा माझा प्रयत्न.

दत्ता काळे's picture

26 Aug 2013 - 9:27 pm | दत्ता काळे

अप्रतिम.. महुआ मधलं " दोनोने किया था प्यार मगर ...." हे गाणं आठवलं.

पैसा's picture

26 Aug 2013 - 11:05 pm | पैसा

गाण्यातले भाव अतिशय उत्कटतेने आमच्यापर्यंत पोचवलेत!

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2013 - 11:53 am | स्वाती दिनेश

गाण्यातले भाव अतिशय उत्कटतेने आमच्यापर्यंत पोचवलेत!
ज्योतिसारखेच म्हणते,
स्वाती

निमिष ध.'s picture

26 Aug 2013 - 11:59 pm | निमिष ध.

आणि तसाच अनुभव आला तुमचे रसग्रहण वाचताना. मागच्या वर्षीपासून ऐकतो आहे हुस्ना. तुमच्या वर्णनात खूप ताकद आहे. पियुष मिश्राबद्दल लिहिताना हुस्नासाठी एक वेगळा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद!!

स्पंदना's picture

27 Aug 2013 - 4:19 am | स्पंदना

जबरदस्त!!
गाण्याच्या शब्दात, त्या मागच्या भावनेत, इतिहासात असे घुसला आहात तुम्ही की यॅंव रे यँव!
सुरेख! अतिशय वजनदार गाण्याच तोडीस तोड रसग्रहण.

शिवोऽहम्'s picture

27 Aug 2013 - 9:12 am | शिवोऽहम्

सर्वांना धन्यवाद!

या गाण्यातल्या संगीत संयोजनाविषयी सुद्धा पुष्कळ लिहीता येईल. फार छान संयोजन आहे. पण जास्त टेक्निकल न होता कसे लिहिता येईल ते समजत नाही.. प्रयत्न सुरू आहे.

चाणक्य's picture

27 Aug 2013 - 11:58 am | चाणक्य

पियुष मिश्रा आणि त्याच्या कलाकृतींची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

किसन शिंदे's picture

27 Aug 2013 - 9:32 am | किसन शिंदे

रसग्रहण जबराटच लिहलंय हो, पण आधी त्या पियुष मिश्राला पुर्ण तरी करा.

कोमल's picture

27 Aug 2013 - 10:39 am | कोमल

जबरदस्त..
वाचतांना प्रत्येक ओळ अशी आत पर्यंत पोहचत जाते..
खूप छान लिहिलय तुम्ही
जावेद तर अगदी मस्त उभारलाय पियुषने..

पियुष मिश्राच्या पुभाप्र.

पियुष मिश्र आणि कोक वाल्यांना तर सलाम आहेच

पण लेखकालाही आपला सेल्युट .

मस्त लिहिलंय

सुरेख लिहले आहे, अगदी तरल!!!