गोवन थाळी

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म
15 Aug 2013 - 2:39 am

'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या सदरास सुरुवात करून आज १ वर्ष झाले. ह्या वर्षभरात अनेक पाककृती सादरकरण्याची मला मिपाने संधी दिली, मिपा सदस्यांनी कौतुक केले. भरून पावलो. आजच्या ह्या वर्धापनदिनानिमित्त ही 'गोवन थाळी' सादर करताना आनंद होतो आहे. स्विकार व्हावा.

Thali

थाळीतील पदार्थ आणि त्यांची पाककृती.
समोर भात आणि तांदूळाच्या भाकरी. भाकरीला लागून कुर्ल्या मसाला. मधली वाटी करंदीची चटणी/भाजी. त्याच्या बाजूला सोलकढी आणि सोलकढीला लागून कांदा-टोमॅटो कोशिंबीर. भाकरी आणि कुर्ल्या मसाला ह्यांच्या मधे लिंबू.

कुर्ल्या मसाला.

साहित्यः

कुर्ल्या (खेकडे) - ३ नग.
नारळ - अर्धा.
सुक्या मिरच्या - ८ नग.
धणे - ४ लहान चमचे (टि स्पून)
काळीमिरी - ८ दाणे.
लवंग - ५ नग.
दालचिनी १ इंच.
जायपत्री - १ फुल.
जायफळ - १/८
कांदे - २ मध्यम.
तेल - ४ मोठे चमचे (टेबल स्पून)
हळद - १ चमचा.
तिखट - २ चमचे.
मीठ - चवीनुसार.

तयारी:

कुर्ल्या साफ करून धुवून घ्या. त्यांचे लहान पाय, पाण्याबरोबर, मिक्सरमध्ये फिरवून पाणी गाळून घ्या. मुख्य नांगे किंचीत ठेचून (तडा जाईल इतपतच) घ्या. मुख्य धडाचे मधून चिरून दोन भाग करून घ्या.
कांदे उभे चिरून घ्या.

कृती:

सुक्या मिरच्या, धणे, काळीमिरी, लवंग, दालचिनी, जायपत्री, जायफळ तेलावर खमंग परतून घ्या.
त्यावर उभे चिरलेले कांदे परतून घ्या. शेवटी त्यातच नारळ घालून लालसर रंगावर परतून घ्या. आता हा सर्व मसाला बाजूला काढून थंड होऊ द्या. थंड झाला की मिक्सरवर मुलायम वाटून घ्या.

आता ह्या मसाल्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून उकळण्यास ठेवा. त्यात हळद, तिखट घालून मिसळून घ्या. मसाला उकळला की त्यात लहान पाय वाटून, गाळून घेतलेले पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला. आता ठेचलेले नांगे आणि चिरलेले खेकडे घालून शिजवा.

करंदीची चटणी/भाजी.

साहित्य:

करंदी - १ वाटी.
कांदा - १ मध्यम.
टोमॅटो - १ मध्यम.
आमसुलं - ४ नग.
हळद - अर्धा लहान चमचा (टी स्पून)
तिखट - १ लहान चमचा.
तेल - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
कोथिंबीर.

तयारी:
करंदी वाहत्या नळाखाली धुवून घ्या. भिजत ठेवू नका. आता करंदी निथळत ठेवा.
कांदा आणि टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या.

कृती:

करंदी कोरडीच भाजून घ्या. बाजूला ठेवा.
तेल तापवून त्यात कांदा परतून घ्या. त्यावर टोमॅटो टाकून परता. टोमॅटो शिजला की त्यात भाजलेली करंदी, मीठ, हळद, तिखट, आमसुल घालून परता. किचिंत पाणी घालून करंदी शिजवून घ्या. पाणी आटे पर्यंत परतत राहून करंदी कोरडी करा. कोरडी झाली की कोथिंबीर घालून सजवा.

सुरमई फ्राय.

साहित्यः
सुरमई - १ तुकडा.
आलं-लसूण पेस्ट - अर्धा लहान चमचा.
हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून)
तिखट - १ लहान चमचा.
चिंचेचा कोळ - १ मोठा चमचा.
मीठ - चवीनुसार.
तांदूळाचे पीठ - वरून लावण्यासाठी.
तेल - तळण्यासाठी.
कृती:

सुरमई तुकडी धुवून एखाद्या फडक्यामध्ये हलक्या हाताने दाबून कोरडी करून घ्या.
सुरमईला आल-लसूण पेस्ट, हळद, मीठ चोळून घ्या. नंतर तिखट आणि चिंचेचा कोळ लावून अर्धातास, मुरण्यासाठी, बाजूला ठेवून द्या.
अर्ध्या तासानंतर, फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवून, सुरमईला तांदूळाच्या पिठात घोळून, मध्यम आंचेवर, दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.

तांदूळाची भाकरी.

साहित्यः
तांदूळाचे पीठ - १ कप.
पाणी - १ कप.
मीठ - चवीनुसार.
तेल - १ मोठा चमचा (टेबल स्पून).

पाणी उकळण्यास ठेवा. पाणी उकळताना त्यात मीठ आणि तेल घाला. पाणी उकळले की त्यात पीठ मिसळून कलथ्याच्या दांड्याने ढवळत राहा. पीठाचा गोळा झाला की झाकण ठेवून मंद आंचेवर एक वाफ येऊ द्या.
गॅसवरून उतरवून पीठाचा गोळा परातीत काढून घ्या. जरा थंड झाल्यावर पण अजून सहन होईल इतका गरम असतानाच भरपूर मळून मऊ करून घ्या.
मध्यम आकारांचे गोळे करून, लाटून भाकरी तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरम गरम वाढा.

सोलकढी:

साहित्यः

नारळ - अर्धा.
लसूण - ४ पाकळ्या.
हिरव्या मिरच्या - ३ नग.
मीठ - चवी नुसार.
बीट रुट - सुपारी एवढे.
आमसुलं - ७-८ नग.
कोथिंबीर - सजावटीसाठी.

तयारी:

आमसुलं अर्ध्या तासाकरीता पाण्यात भिजत घाला. पिळून त्यांचा रस काढून घ्या.

कृती:

नारळ, लसूण, मिरच्या, मीठ, बीट रूट मिक्सर मध्ये पाणीघालून एकदम बारीक वाटून घ्या. हे मिश्रण पातळ कपड्यातून गाळून/पिळून त्याचा रस काढून घ्या त्यात आमसुलाचा रस मिसळा आणि कोथिंबीर घालून सजवा.

बाकी भात, कांदा-टोमॅटो कोशिंबीर ह्यांची कृती सर्वांना माहित असतेच.

शुभेच्छा...!

प्रतिक्रिया

काकाकाकू's picture

15 Aug 2013 - 3:00 am | काकाकाकू

... मातीच्या जमिनीवर ठेवलेली आहे? कोकणातलं सारवलेलं स्वयंपाकघर आठवलं. सामिष खात नसलो तरी नेटकि वाढलेली थाळी बघून तोंडाला पाणी सुटलं! आमची मजल बटाट्याची आमटि करण्यापर्यंतच आहे.

नेत्रेश's picture

15 Aug 2013 - 3:09 am | नेत्रेश

आता कीती दिवर श्रावणाचे राहीले आहेत ते मोजायला घेतले :)

नंदन's picture

15 Aug 2013 - 4:00 am | नंदन

ख ल्ला स!

अर्धवटराव's picture

15 Aug 2013 - 4:29 am | अर्धवटराव

काका... तुम्ही खरच लाजवाब आहात. लज्जतदार जेवण हेच सर्वसुख मानणारे आम्हि. हेच आमचं सगुण साकार पूर्णब्रह्म. जय हो.

अर्धवटराव

नुसत ताट? पाट कुठाय? मी बसायच कुठे?

आनन्दिता's picture

15 Aug 2013 - 7:51 pm | आनन्दिता

पाटावर मी आधीच बसले आहे.. काकांनी माझ्या समोरच्या ताटाचा फटु काढलाय!! :)

रेवती's picture

15 Aug 2013 - 10:04 am | रेवती

Tumhala danDawat aahe Kaka! Great aahat.
FoToo masta aalaay.

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 10:19 am | प्रभाकर पेठकर

काकाकाकू, नेत्रेश, नंदन, अर्धवटराव, aparna akshay, रेवती सर्वांना खुप खुप धन्यवाद.

काकाकाकू - सारवलेल्या जमिनीचा परिणाम माझ्या मित्राने फोटोशॉपच्या साहाय्याने साधला आहे.
aparna akshay - पाटाची खरंच गरज आणि तेवढा धीर आहे?
रेवती - गेले वर्षभर 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे सदर समर्थपणे चालविल्याबद्दल खास धन्यवाद .

अभ्या..'s picture

15 Aug 2013 - 10:31 am | अभ्या..

मस्तच एकदम पेठकर काका. अप्रतिम रचना.
.
.
फोटोशॉप आहे होय. तरी मी म्हणत होतोच चांदीच्या ताम्ब्यावर जमीन वेगली का दिसतेय प्रतिबिम्बात.;-)

आहाहाहाहा...झकास. एक्दम भारी ,

सविता००१'s picture

15 Aug 2013 - 10:56 am | सविता००१

काका, काय सुंदर नजाकतीने वाढ्लेलं ताट आहे. झक्कासच. सामिष खात नसलो तरी वाचायला आणि बघायला फार छान वाटलं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2013 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्र बघूनच खल्लास ! सगळे प्रकार अत्यंत आवडीचे आहेत !! तोंपासु !!!

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Aug 2013 - 12:03 pm | लॉरी टांगटूंगकर

+१००००००००००
कमाल!!!

दिपक.कुवेत's picture

15 Aug 2013 - 11:25 am | दिपक.कुवेत

सकाळि सकाळि हे एवढे प्रकार बघुन खुप जळजळ झाली आहे. ताट एवढं सुंदर सजवलय/दिसतय कि त्याकडे नुसतं पहात बसावस वाटतय. बरं झालं तुम्हि खेकड्याची पाकॄ दिलीत. मला प्रचंड आवडतात पण कसे करायचे माहित नव्हते. आता नक्कि करुन पाहिन.

आदूबाळ's picture

15 Aug 2013 - 11:29 am | आदूबाळ

झक्कास, काका!

प्रभो's picture

15 Aug 2013 - 11:57 am | प्रभो

भारी!

श्रावण संपला नाही अजुन,एव्हड भन्नाट काही तरी दाखवता,मग कसे रहावे भान मनाला,कसा मनाचा तोल जपावा.आता जर या महिन्यात मी जर हे खाल्ल तर आईला पहिल तुमच नाव सांगणार पेठेकर काकांनीच लालूच दाखवली म्हणून.....निव्वळ अप्रतिम पाककृती.....!

पेठकर काका, श्रावण महिना चालू आहे हो. तुम्ही अश्या खेकडे, सुरमई सारख्या पाकृ टाकल्यावर आम्ही पामरांनी श्रावण महिना कसा पाळायचा? गेले आठवडाभर जिभेवर ताबा ठेवला आहे. तुम्ही श्रावण महिना मोडायला भाग पाडणार बहुदा.

वा काका!!! खुप सुंदर दिसते आहे ताट. काका, इथले काहिच मिळत नाहि हो... मला पाठवुन द्या ना. :)

मनीच्या बाता : का का का? का उघडलास हा धागा? माहित नव्हंत तुला आत असले जीव घेणे फोटो असणारेत?

(धारातिर्थी पडलेला) -गणा

तिमा's picture

15 Aug 2013 - 2:27 pm | तिमा

कधी येऊ जेवायला ? अगदी जानवं घालून, पळी,पंचपात्री घेऊन यायची तयारी आहे.

काय मस्त थाळी आहे हो, बघूनच खपल्या गेलो आहे एक्दम!!!

मालोजीराव's picture

22 Aug 2013 - 5:54 pm | मालोजीराव

हा धागा फोरवर्ड केलेल्यांपैकी दोघांनी तात्काळ श्रावण मोडलेला आहे…पेठकर काका याची जबाबदारी कोण घेणार ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर

विजुभाऊ, सविता००१, इस्पीकचा एक्का, मन्द्या, दिपक्.कुवेत, आदूबाळ, प्रभो, बाबा पाटील, भाते, Mrunalini, गणपा, तिमा, बॅटमॅन - तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

दिपक.कुवेत - खेकडे करणे सोपे आहे. विशेष कठीण नाही. पण कोलेस्टेरॉल सांभाळून.

बाबा पाटील - नाही. आईसाहेबांना दुखवू नका. एक महिना कळ सोसा. आपण नाही का, लग्ना आधी, चित्रपटांमधून मधुचंद्रांची अनेक दृष्य पाहिलेली असतात?

भाते - श्रावण आणि गणपती होऊन जाऊ दे. पाककृती कुठे जात नाही. इथेच असणार आहे.

Mrunalini - काय? पाककृती नं? ही काय पाठवली आहे की.

गणपा - अरे, खरा खवय्या धारातिर्थी पडला असेल तरी 'गोवन थाळी'च्या सुवासाने ताडकन उठून बसेल.

तिमा - थोडी कळ सोसा. उपहारगृहासाठी चांगली जागा शोधतो आहेच. मिळाली की 'गोवन-मालवणी' खासियतचे उपहारगृह सुरु करणार आहे. सर्वांनाच आमत्रण असेल.

पैसा's picture

15 Aug 2013 - 5:05 pm | पैसा

माझ्या काही पदार्थांच्या कृती जरा जरा वेगळ्या आहेत. पण ताट, त्यातली पदार्थांची रचना, फोटो सगळंच अप्रतिम!

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2013 - 9:08 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या काही पदार्थांच्या कृती जरा जरा वेगळ्या आहेत.

अरे व्वा! येऊ दे की मग तुझ्याही पाककृती. काहीतरी नविन, वेगळे शिकायला तरी मिळेल.

'माझ्याच पाककृती सर्वोत्कृष्ट, मीच सर्वोत्तम आणि सर्वज्ञानी आहे, तुम्ही माझ्याकडून पाककला शिकून घ्या तुमचे आयुष्यात भले होईल' असा दुराग्रह माझ्याजवळ नाही. इतरांच्या मतांचा मी आदर करतो. माझ्या कांही चुका दाखवून दिल्या तर त्याचा स्विकारही करतो. ही: ही: ही:

पैसा's picture

15 Aug 2013 - 9:28 pm | पैसा

आधी तुम्ही दिलेल्या प्रकारात करून बघेन आणि मग चवीत काय फरक पडतो ते सांगेन! :)कारण तुमचा अनुभव नक्कीच जास्त आहे, तेव्हा तुम्ही दिलेला फरक हा चव जास्त चांगली करणाराच असेल याची खात्री आहे.

उपाशी बोका's picture

15 Aug 2013 - 11:50 pm | उपाशी बोका

'माझ्याच पाककृती सर्वोत्कृष्ट, मीच सर्वोत्तम आणि सर्वज्ञानी आहे, तुम्ही माझ्याकडून पाककला शिकून घ्या तुमचे आयुष्यात भले होईल' असा दुराग्रह माझ्याजवळ नाही.

पेठकरकाका, बहुधा तुमचा अध्यात्माचा अभ्यास कमी पडतोय. (कृपया हलके घेणे) :)

सानिकास्वप्निल's picture

15 Aug 2013 - 5:45 pm | सानिकास्वप्निल

श्रावण पाळत नसल्यामुळे जळजळ कमी झाली ;)
बाकी थाळी का तो जवाब नही :)

स्वाती२'s picture

15 Aug 2013 - 5:50 pm | स्वाती२

अहाहा!
ताट बघूनच मन तृप्त झाले!

उपाशी बोका's picture

15 Aug 2013 - 6:59 pm | उपाशी बोका

नुसता फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटले. खल्लास...
फोटोवर अगदी मधोमध, बटबटीत कॉपीराईट टाकला नाहीत, म्हणून विशेष धन्यवाद.

तुमचा अभिषेक's picture

15 Aug 2013 - 9:45 pm | तुमचा अभिषेक

आईग्ग जबरदस्त.. तांदळाच्या भाकरीसोबत मच्छीफ्राय, करदी, कुर्ल्या अन .. सोलकढी.. मला तर तिचा रंगच प्रेमात पाडतो नेहमी... तेवढी वाटीच्या जागी तिला तांब्यात दाखवा किंवा सोबतीला एक सोलकढीचा भरलेला जग दाखवा.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2013 - 12:02 pm | प्रभाकर पेठकर

उपाशी बोका, सानिकास्वप्निल, स्वाती२, तुमचा अभिषेक - सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

@पैसा,

असं नसतं. मी पुस्तकं वाचून पाककृती शिकलो/शिकत आहे. पण बायका पारंपारीक पद्धतीत आपल्या आईकडून किंवा सासूकडून म्हणजेच अत्यंत अनुभवी हातांकडून पाककृती शिकतात. त्यांच्या पाककृती नक्कीच उजव्या असतात. असो.

विसुनाना's picture

16 Aug 2013 - 12:21 pm | विसुनाना

त्रासदायक फोटो. पाण्यातून काढलेल्या माशासारखी अवस्था होत आहे.

विसुनाना's picture

16 Aug 2013 - 12:24 pm | विसुनाना

उपहारगृहासाठी चांगली जागा शोधतो आहेच. मिळाली की 'गोवन-मालवणी' खासियतचे उपहारगृह सुरु करणार आहे.>>>>

-पेठकर साहेब, कुठे? कधी? लवकर सांगा.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2013 - 4:25 pm | प्रभाकर पेठकर

मस्कत मध्ये.

भाते's picture

16 Aug 2013 - 9:37 pm | भाते

बापरे? म्हणजे आम्हाला मुंबईहुन मस्कतला यावे लागेल? मस्कतमधुन मुंबईला पार्सल मिळु शकेल का? काका, तशी सोय असेल तर नक्की कळवा.

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

म्हणजे आम्हाला मुंबईहुन मस्कतला यावे लागेल?

असेच कांही नाही. पुण्यात कधी कट्ट्याला आलात तर आपण गोवन-मालवणी बेत करू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2013 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

केव्हा आहे कट्टा ?

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 3:56 pm | प्रभाकर पेठकर

भारतात आलो की.

सध्याच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरच्या ३र्‍या आठवड्यात. गणपती वगैरे गेल्यानंतर आपल्याला रान मोकळे असेल.

बॅटमॅन's picture

19 Aug 2013 - 5:58 pm | बॅटमॅन

पॉइंट नोटेड युरॉनर.

सुहास..'s picture

16 Aug 2013 - 12:29 pm | सुहास..

जीवघेणे आहे हे सर्व ;)

त्रिवेणी's picture

16 Aug 2013 - 12:43 pm | त्रिवेणी

काका माझी तुमच्याशी कट्टी फू.

सौंदाळा's picture

16 Aug 2013 - 12:47 pm | सौंदाळा

मज्जा आली.
मात्र गोव्यात बर्‍याचदा सोलकढी ऐवजी तिवळ असते. नारळ नसल्यामुळे लई स्ट्राँग लागते आणि जास्त पिऊ शकत नाही मी तरी. पण मस्त लागते. (कोकम, हींग, मिरी, मिरच्या कोथिंबीर घालुन करतात)
करंदीची चटणी भाव खाऊन गेलीये..जब्राट
आता पावसाळा सरला की करतोच..
पैसा ताईंनी दिलेली 'रेषाद' मसाला घालुन बांगड्याची पोर्तुगीज स्टाइल पाकक्रुती पण अजुन केली नाही :(
लॉब्स्टर (शेवंड) पण कसा करतात साफ करण्यापासुन ते ताटात येईपर्यंत हे वाचायची पण खुप इच्छा आहे.
आणि पुण्यात तो कुठे मिळेल हे देखिल कोणी सांगितले तर उत्तम.

बॅटमॅन's picture

19 Aug 2013 - 5:59 pm | बॅटमॅन

तिवळ मस्त अस्ते हां बाकी. मासेमारी हाटलात देतेत ते चांगलं असतं.पण अंमळ आंबट जास्तच.

अनन्न्या's picture

16 Aug 2013 - 4:19 pm | अनन्न्या

थाळी खरच खूप सुंदर दिसतेय.

सूड's picture

16 Aug 2013 - 8:52 pm | सूड

दोन मांसाहारी थाळ्या झाल्या, एक तरी शाकाहारी येऊ दे!!

भाते's picture

16 Aug 2013 - 9:39 pm | भाते

श्रावण महिना म्हणुन तरी एखादी शाकाहारी थाळी येऊ दे.

प्रभाकर पेठकर's picture

16 Aug 2013 - 9:55 pm | प्रभाकर पेठकर

धीर धरी रे धीरा पोटी, असते शाकाहारी थाळी गोमटी....!

पिवळा डांबिस's picture

16 Aug 2013 - 10:37 pm | पिवळा डांबिस

मस्कतवासी पेठकरमियांचे धागे फक्त शुक्रवारीच उघडायचे असं मी ठरवलेलं आहे. म्हणजे मग जे काही दाखवलं असेल ते वीकेंडला करून खाता येतं....
मधल्या वारी पाहिलं तर उगाच उरलेला आठवडा जिवाला त्रास!! कुणी सांगितलंय च्यामारी? :)
असो. ओली/ सुकी मासळी जेवणात नेहमीच असते त्यामुळे तिचं काही विशेष नाही, पण या वीकेण्डला कुरल्या आणून खाण्यात येतील....

अवांतरः पण पेठकरशेठ एक खरं शिक्रेट सांगू?
म्हणजे आमच्या देवा मंगेशाला साक्ष ठेवून वगैरे कानात सांगतात तसं!!!
गोवेकरांची मासळी अत्यंत चवदार असतेच त्यात शंका नाही...
पण कुरल्या ह्या (चिंबोर्‍या म्हणून) कराव्यात त्या सीकेप्यांनीच!!!
साला, जवाब नाही!!!!

काय टाईपावे तेच सुचत नाही थाळी पाहून. फक्त वरील थाळीतील पदार्थ समोर यावेत आणि ते फस्त करावेत अस वाटत आहे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर

विसुनाना, भाते, सुहास.., त्रिवेनि, सौंदाळा, अनन्न्या, सूड आणि पिवळा डांबिस - प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

त्रिवेनि - कट्टी फू तर कट्टी फू. पण जेऊन तर जा. असं भरल्याताटावरून रागाऊन उठून जाऊ नये.

सौंदाळा - तिवळ मलाही खुप आवडते. आम्ही त्याला फुटी कढी म्हणतो.

अनन्या - करंदी म्हणजे अगदी छोट्टीशी कोलंबी. ती वाळवलेली मिळते, ज्याला सुकट किंवा सुंगटंही म्हणतात, त्याची ही चटाणी/भाजी केली आहे.

पिवळा डँबिस - चिंबोर्‍याच कशाला सिकेपींच्या इतर पाककृतींचाही मी पंखा आहे. त्याच बरोबर मालवणी, गोवन, हैद्राबादी, केरळीय, मद्रासी, बंगाली, पंजाबी, काश्मिरी ह्या सर्व पाककृती करून खायचा आणि खाऊ घालायचा नादच आहे म्हणाना.

पद्मश्री चित्रे's picture

20 Aug 2013 - 6:13 pm | पद्मश्री चित्रे

मस्त थाळी... काय कोम्बिनेशन आहे!
चिंबोर्या फक्त जरा कमी गरम मसाला वापरुन करतो आम्ही-म्ह्ण्जे सी के पी . फक्त लवंग नि दालचिनी.. बाकी सेम. सध्या मांसाहार बंद आणि चिंबोर्या इतक्या मस्त येत आहेत बाजारात.. आजच पाहिल्या-फक्त पाहिल्याच.. :(

गोवन थाळी आणि ती मालवणी थाळी .

दोन्हीचे एवढे सुंदर फोटो टाकून . आम्हाला ते खाऊ शकत नाही "आत्ता" याची परत एकदा जाणीव करून दिल्या बद्दल पेठकर काका आणि सानिकास्वप्नील आ दोघांचाही तीव्र णीषेध व्यक्त करण्यात येत आहे :( :-/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2013 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब, गोवन थाळी आवडलीच. पाककृत्यांचे विविध प्रकार आणि पदार्थाची आपण नेहमीच उत्तम ओळख करुन दिली आहे. 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे सदर तुम्ही सर्वांनी ज्या नेटानं चालवलं त्यालाही आमचा सलामच आहे. आपलं कौतुकच आहे, अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

17 Aug 2013 - 5:04 pm | मुक्त विहारि

झक्कास...

चाणक्य's picture

17 Aug 2013 - 6:44 pm | चाणक्य

तों.पा.सु.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2013 - 8:49 pm | प्रभाकर पेठकर

राव साहेब, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मुक्त विहारि आणि चाणक्य मनःपूर्वक धन्यवाद.

रावसाहेब, विरहात प्रेम वाढते. श्रावण (आणि कदाचित गणपतीही) संपल्यावर तुटून पडा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - 'अन्न.....' च्या यशात आपणा सर्व रसिकांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. तुम्ही वाखाणता, कौतुकाचा वर्षाव करता त्यानेच पुढील पाककृतीसाठी बळ मिळतं. असाच लोभ कायम असू द्या ही विनंती.

मी_देव's picture

19 Aug 2013 - 11:22 am | मी_देव

खल्लास..

वाटूळ's picture

19 Aug 2013 - 1:40 pm | वाटूळ

bhook lagalee :)

पेठकर सर, फारच सुदंर व अप्रतिम थाळी. वा क्या बात है. मस्त

राही's picture

20 Aug 2013 - 4:16 pm | राही

आधी प्रतिसाद दिला होता पण काय गडबड झाली कोण जाणे इथे दिसला नाही म्हणून परत एकदा.
थाळी सुंदर दिसते आहे. निवडही हट के आहे. सुक्या मासळीच्या कृती फार कमी सापडतात. वाढदिवसाला साजेशी भेट. सुरमईचा तुकडासुद्धा एरवी लंबगोल आणि टोकाशी बोथट असा पाहिला आहे. या थाळीतला तुकडा मात्र छान मध्ये फुगीर आणि टोकाशी निमूळता असा पानाच्या आकाराचा दिसतोय. सुंदर.
जाता जाता : सोलकढीमध्ये बीट-रूटचा वापर रंगासाठी का? बीटरूट्ची चव मातकट असते म्हणून विचारले. रंगच हवा असेल तर बीट्ची एखादी छोटीशी चकती कढीतून तीनचारवेळा बुडवून काढली तरी अपेक्षित रंग येईल असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2013 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर

होय बीट रुटचा वापर रंगासाठीच आहे. नारळ, लसूण आणि मिरच्यांचा ऐवज पाहता सुपारी एवढ्या बीटरुटाने चवीत फरक पडत नाही. तसेच कोकमं नवीन आणि उत्तम प्रतिची असल्यास बीटरूटची गरजच भासत नाही.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पेठकर काका, सोलकढीला तुपाची व ओव्याची फोडणी देऊन बघा, प्यायला व गरम गरम भाताबरोबर जेवायला एकदम झकास मस्त ब्येस.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 5:44 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म! कांही जणं देतात अशी फोडणी पण मला बिनफोडणीची सोलकढी जास्त आवडते. तरीपण, कधीतरी, तुम्ही म्हणता तसा प्रयत्न करून पाहीन.

'तिवळ' असेल तर फोडणी देऊन छान लागेल असे वाट्ते.

तुपाची फोडणी जर आवडत नसेल तर काका, ओवा खोबर्‍यात घालुन जरी वाटला तरी पण सोलकढी मस्त लागते.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2013 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर

मी_देव, वाटूळ आणि निश - प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

निश - ओव्याचा वापर करून पाहीन.

आयुर्हित's picture

11 Jan 2014 - 12:02 am | आयुर्हित

सुंदर फोटो, सुपाच्य भोजन, उत्तम सादरीकरण!!!
थंडीच्या या मोसमात लई झकास ब्येत आहे हा!!!
कडकडून भूख लागली ही थाळी बघीतल्या बरोबर.
व्वा काका, जवाब नाही तुमचा.

आपला मिपास्नेही : आयुर्हीत