नमस्कार ,
मध्यंतरी सागरेश्वर येथे गेलो होतो ..
अधिक माहिती
कराडच्या जवळ आहे. इथे सातशे-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. मुख्य मंदीर शंकराचे आहे ..आणि अनेक पिंडी आहेत.. लहानपणानंतर अनेक वर्षांनी भेट देत असल्याने फक्त देव दर्शन एवढाच दृष्टीकोन नव्हता..तिथे दर्शन घेताना काही प्राचीन शिल्पे आढळून आली..
बरीचशी नेहमीपेक्षा वेगळी वाटली.. एक वीरगळ , लक्ष्मी नारायणाची मूर्ती हे नेहमी सारखे होते..
परंतू विष्णूची एक नितांत सुंदर मूर्ती होती ..त्या वातावरणाशी विसंगत ..ती मूर्ती पहाताच हैदराबादच्या बिर्ला संग्रहालयामधल्या मूर्तीची आठवण झाली ..
तिथे २ शिलालेख आहेत ..
खालील चित्रामध्ये शिलालेखा वरचा कोल्हा किंवा तत्सम प्राणी दिसतो आहे.
दुसर्या शिलालेखाच्यावर एक सूर्य आणि एक चंद्र आहे
आणि २ मूर्ती आहेत ज्या ॠषी च्या आहेत म्हणून सांगितल्या जातात..
त्यांची चेहरेपट्टी आणि वेष
एक उभी मूर्ती
हा एक चेहरा एक तर खुपच अलिकडचा किंवा खूपच जुना असेल
ओवर्या ..पूर्वी यामधे पिंडी होत्या .. त्यापूर्वी रहाण्यासाठी वापरत असाव्यात.
या मांजर्या खडकात कोरल्या आहेत ..
तिथे असलेले अजून एक भग्न शिल्प
वीरगळ : येथे नेमका युद्धाचा प्रसंग नष्ट झाला आहे
गणपतीची मूर्ती नंतर 'अॅड'वलेली वाटली
दोन हत्ती : हे दोन वेग वेगळे असावेत ..दोन्हींचा आकार , कलाकुसर पाहता त्यांचा जोडा सध्याच जमवलेला दिसतोय
ही विष्णूची मूर्ती : एवढी सुंदर मूर्ती मी फक्त म्युझियम मध्येच पाहिल्या आहेत.
गाभार्यात असल्याने चोरून फोटो काढला आहे .. त्यामुळे तिच्या सौंदर्याचा अंदाज येत नाही..केवळ या मूर्ती साठी एकदा तिथे जाउन यावे ..
हे कोणाचे चरणकमल ?
या मंदिराच्या परीसरात सर्व शिल्पे विखरून पडली आहेत.. शिलालेखाला देव समजून नारळ फोडणे सुरू आहे..
देवळाचा जीर्णोद्धार करताना डेकोरेशन कराव्या तशा मूर्ती लावल्या आहेत ..त्या मुळे मूळ क्रम , स्थिती आता कळत नाही ..
आपल्या वारशाबद्दल पुन्हा एकदा कोरडी हळहळ व्यक्त करून नाना पाटलांचे दर्शन घेतले..
आणि घराकडे निघालो ..
अवांतर : मला मुर्ती किती जुनी आहे , तिचा कालखंड , शिलालेख वाचणे यात फार काही कळत नाही. वल्ली , जयंत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली तर आनंद होइल .
प्रतिक्रिया
14 Jun 2013 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शाहीर सागरेश्वरांच्या शिल्पांबद्दलचे छायाचित्र पाहतांना रमलो होतो. माहितीची जराशी कसर आहे, एवढेच.
बाकी, शिलालेख कशाचा आहे ? वल्लीशेठ आणि जयंतकाका माहिती देतीलच.
अॅडवलेला गणपती आवडला. गोड आहे. मस्तपैकी गुढघ्यांवर हात टेकवून बसला आहे. :)
-दिलीप बिरुटे
14 Jun 2013 - 6:11 pm | खेडूत
छान. अनेकदा पाहिले आहे पण शिल्पांबद्दल माहिती मिळत नाही.
विकी पानावरची माहिती काहीशी अपुरी आहे.
हे अभयारण्य सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रे नावाच्या गावाजवळ आहे. देवराष्ट्रे मंदिर समूह सुमारे हजार वर्षापूर्वीचं आहे असे म्हणतात. इथे बारा ज्योतिर्लिङ्गाच्या प्रतिकृती (म्हणजे मूर्ती मूळ मंदिराबरहुकूम) असल्याचे म्हटले जाते. तसेच जुने ग्रंथ तिथल्या पुजार्यांकडे असल्याचे तिथल्या मंडळींनी सांगितलं, मात्र नक्की ठाऊक नाही.
हा परिसर खूपच रम्य आहे. लहानपणी अनेकदा आमच्या शाळेची सहल तिथे जात असे (१९८०). मंदिर, अभयारण्य. एखादा साखर कारखाना बघून संध्याकाळी परत. असा सहलीचा बेत असे. शिवाय इथूनच खाली दिसणारी झुक झुक गाडी फार छान वाटे. आम्हा खेडुताना रेल्वेचं पहिलं-वहिलं दर्शन तिथेच होई.
सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक रेल्वेने वा रस्त्याने कर्हाड सांगली मार्गावर ताकारी नावाचं गाव आहे तिथे उतरून चालत, कार किंवा रिक्षाने जाता येते. मी सात वर्षापूर्वी कारने ही गेलो होतो. सर्वत्र रस्ते चांगले आहेत.
दुसरा मार्ग कर्हाड हून आमचे कडेगाव- तेच ते! भानामती फेम :) आणि मग दक्षिणेला सुमारे पंचवीस कि. मी वर देवराष्ट्रे आहे.
वृक्षमित्र धो. म. मोहिते यांच्या प्रयत्नातून एक अभयारण्य १९७५ च्या सुमारास निर्माण झालं. त्यांनी स्वतः काही लक्ष्य झाडे स्वतः लावून जंगल विकसित केले होते. हरीण, ससा, कोल्हा तरस वगैरे प्राणी आणले होते. काळवीट पण इथेच प्रथम पाहिल्याचे आठवते.
मात्र १९८५ नंतर अभयारण्याची अवस्था केविलवाणी झाली होती. आणि त्यानंतर आत गेलोच नाही. मंदिर रस्त्याला लागून आहे आणि अभयारण्य थोडसं एक दीड किलोमीटर आत आहे. आत एक जपानी पद्धतीचा प्यागोडा पण होता. एका माणसानं एव्हडी झाडं लावली याचं आश्चर्य वाटतं.
14 Jun 2013 - 8:47 pm | प्रचेतस
अद्भूतच आहे मंदिर.
एकंदर शैलिवरून शिलाहार/ यादव कालातील असावे असे वाटते.
कोरीव स्तंभ चालुक्य शैलीतिल आहेत. पण शिलाहार यादवांनि हीच शैली अंगीकृत केल्याने नेमका काल ओळखणे अवघड जाते.
शिलालेखाचा दगड माझ्यामते गधेगाळ आहे. खाली दिसतोय तो कोल्हा नसून गाढव आहे. वर एखादे दान व् नंतर शापवाणी असावी. पण अर्धवटच काम आहे.नुसते आरेखन करून फ़क्त लेख कोरून उरलेले काम तसेच सोडलेले दिसते. विरगळावर सहसा शिलालेख नसतोच.
नंतरच्या मूर्ती ऋषींच्याच स्त्रीची मूर्तीबहुधा दासीची असावी. तो एक नुसता चेहराच दिसतो तसे चेहरे काही ठिकाणी पाहिलेले आहेत. पेडगावच्या बहादुरगडातील मंदिरात तसे काही चेहरे आहेत. अनाकलनीय वाटतात. काही वेळा मुखलिंगे अशा पद्धतीची पण असतात.
हे बघा तसे चेहरे, पण ही मुखलिंगे नव्हेत.

ते नुसतेच चरणकमल असलेली मूर्ती बहुधा सूर्याची असावी पण नक्की सांगता येत नाही.
बाकी सर्वांगसुंदर विष्णू मूर्ती दिवेआगरच्या रूपनारायण मंदिरात आहे. त्याची सर कशालाच नाही.
14 Jun 2013 - 9:21 pm | पैसा
छान माहिती आणि फोटो. हत्ती आणि गणपती मजेशीर म्हणावे असे आहेत, तर ऋषी पगडीवाला ही मजेशीर वाटला. दिवेआगरचा रूपनारायण सुंदर आहे याबाबत वल्लीशी सहमत.
15 Jun 2013 - 8:02 pm | अत्रुप्त आत्मा
मत्त मत्त फोतू
22 Jun 2013 - 2:33 pm | अनिल मोरे
माझे गाव बोरगाव तिथुन १० किमी वरती आहे. शाळेत असताना दर श्रावण सोमवारी पहाटे आम्ही सायकलवरुन दर्शनासाठी जायचो आणि परत येताना तेथील लाल फुलाच्या डहाळ्या सायकला लावून आणायचो. शेवटच्या श्रावण सोमवारी तिथे मोठी यात्रा भरते.
26 Jun 2013 - 6:03 pm | सौंदाळा
छान माहिती आणि फोटो.
नाव वाचुन वेंगुर्ल्याचे सागरेश्वर वाटले. तिथे शिल्पे कुठे आहेत असा विचार करत धागा उघडला आणि आवडला.