सुधागड - एक अनुभव

आशु जोग's picture
आशु जोग in भटकंती
5 May 2013 - 4:54 pm

बरेच दिवसांपासून आमचे सहलीचे बेत ठरत होते.
कधी ठिकाण निश्चित होत नव्हते, तर कधी आमच्या मित्रांना सवड नव्हती.

आणि मग शेवटी बर्‍यापैकी चंद्रप्रकाश असेल असा शनिवार निवडला,
पुरेसे खाणे, जमेल तेवढे पाणी घेतले आणि सुधागडला निघालो.

राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता.
पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात. एवढी माहिती आम्हाला सुधागडबाबत होती.

जाताना एक एस टी बस चूकली त्यामुळे तैलबैलाला आम्ही जे दुपारी चारला पोचणार होतो ते
पावणे सहा वाजता पोचलो.

संध्याकाळी सहालादेखील उन कडक होते. सावलीलासुद्धा कुठे झाड दिसत नव्हते.
त्यावरूनच लक्षात येत होते की उन्हाळा किती कडक आहे आणि या भागात पाण्याची अवस्था काय आहे.

तैलबैलाच्या एका अंगाने चालू लागलो. वाटेत म्हशींना घेऊन जाणारा मनुष्य दिसला.
त्याला जवळपास पाणी कुठे आहे विचारले. त्याने बोट दाखवले तिकडे गेलो. एक डबके दिसले.
त्यात पाणी साठलेले होते. म्हशींसाठी तो त्यातूनच बादलीने पाणी नेत होता.

तैलबैला. मधे फट असलेला कडा

जवळच्या बाटल्यांतील पाणी प्यायलो आणि बाटल्या या डबक्यातून भरून घेतल्या.
शेतातून वाट काढीत पुढे चालू लागलो. अद्याप सुधागडचे दर्शन व्हायचे होते.

चालण्याचे श्रम फारसे जाणवत नव्हते पण उन मात्र जीवघेणे होते.

-- सुधागड. बुरुजाप्रमाणे दिसणारा कडा --

एके ठिकाणी शेते संपली आणि दरी लागली. पलिकडे सुधागड दिसू लागला.
सूर्यास्ताचे वेळी गड छानच दिसत होता.

इथे दुरून डोंगर साजरे म्हणावे अशी स्थिती होती. आम्ही सगळेच फार दमलो होतो.
दरी पार करायची आणि गड चढायचा ही कल्पनाच तशी अवघड होती.

पण दरी उतरायला सुरुवात केली. पायाच्या धक्क्याने एखादा दगड निसटला तर तो सट सट करीत थेट दरीच्या तळाशी जाऊन पोहोचतो. हा उतार अतिशय तीव्र आहे. चपला असतील तर जरा बरे.
शूजवाल्यांच्या पायाच्या बोटावर खूपच भार येत होता. अखेर दरीच्या तळाशी जाऊन पोहोचलो.

घामाघूम झालो होतो. वारा अजिबात नव्हता. बाटलीतील पाणी थोडे थोडे प्यालो. सहज मोबाईल काढून पाहीला. कुणाच्याच मोबाइलला रेंज नव्हती.

एका बाजूला आम्ही उतरलो तो डोंगर, एका बाजूला सुधागड. मधे दरी.

धबधब्यामुळे दरीत ओढा तयार झालेला होता. त्यातून चालू लागलो. सध्याच्या दिवसात ओढा कोरडा पडला आहे. ओढ्यातील दगड धोंडे नि शिळा यातून मार्ग काढत पुढे चालू लागलो.
'अशा कोरड्या ओढ्यातून चालू नये' ही गो नी दांडेकर इत्यादींची शिकवण आम्ही विसरलो होतो.
ओढ्याच्या पाण्याने दगडांमधली माती वाहून जाते. दगड आधाराविना एकमेकांना कसेबसे टेकून उभे असतात. हा खरा म्हणजे धबधबाच. त्यामुळे कधी एखादा खड्डा चार, कधी पाच कधी दहा फूटाचाही असू शकतो. एखादी शिळा पाय ठेवता क्षणी निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोरड्या धबधब्यातून जाणे धोकादायकच.

तरीही त्यातूनच आमची मार्गक्रमणा चालू होती. ओढ्याच्या बाजूला जरा कुठे पाऊलवाटेसारखे काही दिसले की त्या मार्गाने जाऊन पाहायचे. ती वाट बंद होत असेल तर परत यायचे. पुन्हा ओढ्यातून चालू लागायचे असे सुरू झाले. या प्रकारात शरीरही खूप थकले. एक पाऊलही पुढे टाकवेना.
शिळेवर जरा वेळ दम खात उभे राहिलो. एवढ्यात मेसेजची रींगटोन वाजली. मोबाइलला रेंज मिळाली.
लगेच प्रियजनांना फोन लावले. त्यांचे आवाज ऐकले. बरे वाटले. पुन्हा नव्या उत्साहाने चालू लागलो.

एव्हाना शरीरातील आणि बाटल्यातील पाणी संपत आले होते. जे होते ते एका घोटात संपले असते.
वर जाणारी वाट कुठे दिसते आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. जरा कुठे झाडे विरळ झालेली दिसली की तिथे पाऊलवाट आहे का याचा अंदाज घेऊ लागलो. पण कोणतीच वाट पुढे जाइना.
आम्ही पाहिल्या त्या सगळ्याच वाटा पुढे बंद होऊ लागल्या.

या प्रकारात घामाने असे चिंब झालो की जणू पावसाने भिजून चिंब झालो होतो.

प्रचंड उकाडा होता. ओढ्यातील दगडही अजून गरम लागत होते. दरीत वारा अजिबात नव्हता. आता परिस्थिती बिकट बनली होती. खूप थकलो होतो. पायातल्या चपलांचेही ओझे वाटू लागले. शरीरातील पाणीही खरोखर संपत चालले होते.
तोंडाला पूर्ण कोरड पडली होती. आता चालताना डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली.
घड्याळात साडे आठ झाले होते. याचा अर्थ मागचे काही तास चालत होतो.

थोडे थांबून विचार केला. वर जाणारी वाट मिळाली नाही, तर वेळेत गडावर पोचता येणार नाही. बाटलीत घोटभरच पाणी शिल्लक होते. तेही संपेल. सगळेच थकून दगडाचा आधार घेऊन बसलो
मनात एक वेगळीच चिंता निर्माण झाली. पुढच्या काही तासात पाणी मिळाले नाही तर चार देह या दरीत पडतील. आमच्या घरचे मग आमचा कसा बरे माग काढतील. कुणाला कुणाला कॉल केले यावरून ? सेल लोकेशन्सवरून ?. आत्ता फारसे काही वाटत नाही पण तेव्हा गांभीर्याने हाच विचार करीत होतो.

यावेळी चंद्र डोक्यावर होता. त्याच्या प्रकाशाचा आधार होता.

शेवटी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. आता वर पोचणे अवघड आहे. पाणी संपलेले असताना
वरचा रस्ता शोधण्यात वेळ घालवणेही वेडेपणाचे ठरेल. तेव्हा ओढ्यातून मार्ग काढत सरळ दरी पार करू. गावात जाऊन पोहोचू. घोटभर पाणीतरी मिळेल. जीव वाचेल.

बरीच वाट तुडवल्यानंतर छोटेसे मैदान लागले. इथे थांबलो. आमच्या मित्राने विचारले
खाली जायचे की वर गडाकडे जायचे ? एवढे थकूनही वर जायचे असाच निकाल सर्वांनी दिला.
ही ताकद कुठून आली कुणास ठाऊक.

पर्यटकांनी सहलीला गेल्यावर कचरा करू नये ही अपेक्षा असते. सिगारेटची पाकीटे, चॉकलेटचे कागद टाकून देऊ नयेत. असा संकेत आहे.

पण आम्ही मात्र आज नेमक्या याच गोष्टी शोधत होतो. आम्ही गडावर जाणारी वाट सापडते का पाहात होतो. त्यासाठी पूर्वी आलेल्या लोकांनी मागे ठेवलेल्या खूणा आम्ही शोधत होतो.

अखेर एका वाटेवर चॉकलेटचे कागद, रिकाम्या काड्यापेट्या दिसू लागल्या आणि हायसे वाटले.
बबलगम, चॉकलेटच्या या खूणा आम्हाला हनुमानाच्या देवळाकडे घेऊन गेल्या. मग पायर्‍या लागल्या.
अजून किती जायचे माहीत नव्हते पण दिशा तर सापडली होती.

पायर्‍यांनी वर चढू लागलो. एका ठिकाणी आल्यावर दोन वाटा लागल्या. आम्ही एका वाटेने निघालो. आमच्यातला एक मित्र मात्र दुसर्‍या वाटेने निघाला. इथे आमच्यातल्या एकाने त्याला गमतीने विचारले, "जी आप किसी दुसरे किल्ले पे जा रहे है ?"

जोक दर्जेदारच होता. पण हसण्याचे त्राण कुठे होते. मनात नोंद करून ठेवली. वर पोचल्यावर या जोकला नक्की हसायचे असे ठरवले.

आणखी वर गेल्यावर पाण्याचे एक टाके लागले. पाणी काढले. ते प्यायलो. त्याची चव अप्रतिम होती.
जवळ जवळ स्वर्गाला हात लाऊन आलेल्या आमच्यासाठी ते पाणी म्हणजे अमृत होते.

'पाणी हे जगातले सर्वोत्तम पेय आहे' हे समजण्यासाठी आम्हाला सुधागड चढून यावे लागले होते.

इथे थांबलो. आता आम्ही जेवण करू शकणार होतो. कारण तहान लागली तरी हाताशी पाणी होते.
जेवण उरकले आणि पुन्हा चढू लागलो. चंद्र अगदी डोक्यावरच होता.

काही अंतर चढल्यावर पुन्हा एक टाके लागले. पाणी हवेच होते. पाण्यापाशी गेलो.
पण आतमधे वटवाघळे मोठ्या प्रमाणावर असल्याने पाण्याचा विचार सोडून द्यावा लागला.

अखेर वर पोचलो. गडावर बाकी कुणीच नव्हते. रात्रीचा एक वाजला होता.

-- भोराई देवी --

भोराईचे देऊळ उघडले. अंथरुणे पसरली. पाठ टेकताच झोप लागली.

-- किल्ल्यावर असलेला वाडा --

सकाळी उठलो. गडावर फेरफटका मारला. वर झोपडीत राहणार्‍या मामांकडे चहा घेतला.

--ठाकरवाडीच्या बाजूला उतरणारी शिडी--

उतरण्यापूर्वी कुठल्या बाजूने उतरायचे ? यावर सार्वमत घेतले. तैलबैलाकडून पुन्हा जाण्यास कुणीच तयार नव्हते. म्हणून मागील बाजूने शिडी उतरून ठाकरवाडीत पोहोचलो.
बस पकडली. वाटेत पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. संध्याकाळी आमच्या स्वार्‍या घरी परतल्या.

अनेक धडे देणारी सुधागडची एक अविस्मरणीय सहल आम्ही पार पाडली होती.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 May 2013 - 7:11 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे..

आतिवास's picture

5 May 2013 - 7:16 pm | आतिवास

सुधागड भेटीचा अनुभव आवडला.

किसन शिंदे's picture

5 May 2013 - 7:17 pm | किसन शिंदे

मस्त चांदण्यात गेलात आणि त्याचे फोटो नाही टाकलेत??

भर पौर्णिमेच्या रात्री या गडावर मुक्काम करायची खुप इच्छा आहे!

आशु जोग's picture

5 May 2013 - 7:17 pm | आशु जोग

सुधागडला जाण्यासाठी लोणावळ्यापासून तैलबैलाची गाडी मिळते
किंवा लोणावळा-पाली-ठाकूरवाडी असेही जाता येते. तैलबैलाकडून गेल्यास दरी पार करून जावे लागते.
ही वाट अधिक खडतर आहे. ठाकूरवाडीची वाट त्या मानाने सुसह्य आहे, काही रॉकपॅच सोडल्यास.

जाण्यासाठी उत्तम काळ म्हणजे उन कमी असणारा कोणताही.
वर रहायची तयारी असेल तर पौर्णिमेच्या आसपासचा दिवस पाहून जावे.

बॅटमॅन's picture

5 May 2013 - 7:41 pm | बॅटमॅन

हे वर्णन मस्त!!!

सूड's picture

5 May 2013 - 7:52 pm | सूड

छान !!

विसोबा खेचर's picture

5 May 2013 - 8:45 pm | विसोबा खेचर

छानच लिहिलंत. भोराईदेवीला नमस्कार...

सुहास झेले's picture

5 May 2013 - 9:06 pm | सुहास झेले

सुधागड मस्तच... भर पावसात हा किल्ला केला होता आणि उतरताना पार वाट लागली होती. कारण आम्ही ठाकरवाडीमधून किल्ल्यावर गेलो होतो आणि उतरताना धोणशे गावात उतरलो पण मस्त अनुभव होता... किल्ल्याला एक प्रसिद्ध चोर दरवाजादेखील आहे. तिथे उतरताना पार वाट लागली होती...काही फोटो देतो

१. १

२. २

३. ३

४. ४

५. ५

शैलेन्द्र's picture

5 May 2013 - 9:46 pm | शैलेन्द्र

मस्त... आवडला..

शिल्पा ब's picture

5 May 2013 - 10:29 pm | शिल्पा ब

छान आहे. पण जिथे कुठे जायचं तिथली माहीती आधी काढुन घ्यायची. वेवसाईट, पुस्तकं किंवा जे कोणी आधी तिथे जाउन आलेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर अगदीच चुकायला होणार नाही. अगदी अ‍ॅडव्हेंचरच करायचं असेल तर मग ठीक आहे.

आशु जोग's picture

6 May 2013 - 8:30 am | आशु जोग

हो तेही खरेच ...

दुसर्‍या दिवशी गडावर गेल्यावर मामांकडून कळले की आम्ही जेव्हा दरीत अडकलो होतो त्याचवेळी त्या भागात बिबट्याचा वावर होता.

शैलेन्द्र's picture

6 May 2013 - 10:51 am | शैलेन्द्र

प्रश्न अ‍ॅड्व्हेन्चरचा नसतो.. पण असं सगळं पॅकेज टुरसारखं नसतं होत ट्रेकींगमधे..

खूप थकलो होतो. पायातल्या चपलांचेही ओझे वाटू लागले. शरीरातील पाणीही खरोखर संपत चालले होते.
तोंडाला पूर्ण कोरड पडली होती. आता चालताना डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली.

बाटलीत घोटभरच पाणी शिल्लक होते. तेही संपेल. सगळेच थकून दगडाचा आधार घेऊन बसलो

पॅकेज टूरसारखे नसते हे मान्य परंतु इतकीही वाईट परिस्थीती नसावी, समजा मिळाले नसते पाणी, सापडले नसते गांव तर..??

डोळसपणे धाडस करा रे मित्रांनो!!!

शैलेन्द्र's picture

6 May 2013 - 9:35 pm | शैलेन्द्र

पाण्याच्या बाबत "लास्ट बॉटल फॉर द ऱोड" हे तत्व नेहमी पाळावं,

आशु जोग's picture

10 May 2013 - 12:15 am | आशु जोग

वास्ताविक आम्हा चारापैकी मी आणि आणखी एक जण या गडावर पूर्वी जाऊन आलो होतो.
त्यामुळे कसे कुठल्या मार्गाने पायथ्याच्या गावात पोचायचे ते ठरले होते. बस चुकली याचे कारण लोकल बस गाड्यांचे वेळापत्रक इंटरनेटवर मिळत नाही.

इथे दुकाने वगैरे नाहीत त्यामुळे खाण्याचे सामान नेणे आवश्यक आहे हे माहीत होते.
हा किल्लाही उंच आहे त्यामुळे दिवसा चढणे टाळायला हवे हेही आधीच ठरले होते.
इंटरनेटवर माहिती आणि ब्लॉग्ज पाहीले. गमतीची गोष्ट त्यामधे पूर्वीच्या माझ्याच सहलीचे आणि माझेच फोटो सापडले पण नवीन माहिती मिळाली नाही.

रात्री जायचे ठरल्याने चंद्राचा बर्‍यापैकी प्रकाश असेल असाच दिवस ठरवला होता.
(बहुतेकदा हे सगळे प्लॅनिंग चोखपणे पार पडते. आकाशदर्शन करायचे तर ढगाळ नसेल अशी अमावस्या निवडतो)

त्यामुळे खरी गडबड झाली ती ओढा नेमक्या ठिकाणी न ओलांडल्याने.

आदूबाळ's picture

5 May 2013 - 10:55 pm | आदूबाळ

सुंदर लेखन.

मी_आहे_ना's picture

6 May 2013 - 9:35 am | मी_आहे_ना

मस्त वर्णन...आवडलं.

सुज्ञ माणुस's picture

6 May 2013 - 4:03 pm | सुज्ञ माणुस

मस्त लेख, तैलबैल तुफान :)
पुण्याकडून मुळशी कडून गेल्यास तैलबैल , सुधागड बरोबर घनगड पण होऊ शकतो.
फोटो अजून टाका राव :)

पैसा's picture

6 May 2013 - 6:28 pm | पैसा

जन्मभर लक्षात राहील असा अनुभव!

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:29 pm | ढालगज भवानी

आदिमायेची मूर्ती आवडली.

मनराव's picture

7 May 2013 - 11:17 am | मनराव

मस्त मस्त मस्त.....

अनिरुद्ध प's picture

7 May 2013 - 2:16 pm | अनिरुद्ध प

अरे पण दुसरया वाटेने गेलेल्या साथिदाराचे काय झाले ?

आशु जोग's picture

7 May 2013 - 3:52 pm | आशु जोग

ही वाट एकदा पायर्‍या मिळाल्यानंतरची होती.
इथे उगाच दोन पर्याय निर्माण झाले होते.
पण जरा अनुभवी मित्र ज्या मार्गाने जात होता त्याच मार्गाने आम्हीही गेलो.

सगळेजण एकाच मार्गाने गेलो.

आशु जोग's picture

3 Aug 2014 - 2:04 pm | आशु जोग

एका झाडाखाली बसलो होतो. उठल्यावर आम्ही त्या झाडाच्या डाव्या बाजूने, एक जण उजव्या बाजूने असे जाऊ लागलो. झाडाला प्रदक्षिणा घालून लगेच एकाच वाटेला लागणार होतो...

प्यारे१'s picture

10 May 2013 - 1:10 am | प्यारे१

छान लिहीलंय जोग अण्णा. :)

सुधागडसारख्या फारच थोड्या गडकिल्यांवर जाण्याच्या वाटेवर पाणी आहे .

हे अगदी बरोबर निरीक्षण आहे

प्रकाश जनार्दन तेरडे's picture

11 May 2013 - 11:42 pm | प्रकाश जनार्दन तेरडे

किल्ल्यापसुन माझे गाव फक्त ११कि/मि वर आहे तरि मी एवढ्यावर्षात गेलो नाहि,

आशु जोग's picture

13 May 2013 - 11:15 pm | आशु जोग

सही !

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 8:50 am | वेल्लाभट

सही आहे, वर्णन छान. थ्रिल चांगलंच झालं यार तुमचं !
आम्ही या पावसाळ्यात जाण्याचा बेत करतोय. बघू कधी कसं ते. पण तेलबैलाकडून नाही जाणार. मुख्य मार्गाने जाऊ.

फोटो पण छान. अजून असतील तर लिंक द्या की.

कंजूस's picture

12 May 2013 - 11:25 am | कंजूस

काही फोन नंबर . (१)लोणावळा डेपो चौकशी ०२११४ -२७३८४२ .भांबुर्डे बस (तेलबैला साठी)९ .०० ,१२ .१५ ,४.३० ,आणि ६.०० .(२)पाली डेपो चौकशी ०२१४२ - २४२२३३ . (२अ)पाली ते पाच्छापूर-ठाकूरवाडी बस ७.०० ,८।३० ,१०.४५ ,१२.४५ ,१५. ००,१८.००,१९.१५ (२ब)पाली ते नाडसूर/धोंडसे बस ७।१५., ९.४५(ठाणे खोपोली- पाली -नाडसूर -ठाणाळे)११.००,३.३०,६.०० .(३)धोंडसे फाटा/वैतागवाडी ते धोंडसे गाव चालत अर्धा तास आहे . (४)ठाणाळे हून ४.००वाजता थेट ठाणे बस आहे(५)धोंडसे गावातील संतोष गोपाळ खंडागळे (सुधागडावरच्या भोराई देवळाचे गुरव)जेवणाची ,वस्तीची व्यवस्था करतात फोन ०२१४२६८१८९२,आणि ९२७३३६९२१७ .सर्व फोन आणि बसच्या वेळा मार्च २०१३ चे आहेत .पावसाळयात खात्री करावी लागते .

आशु जोग's picture

26 May 2013 - 1:59 pm | आशु जोग


- दुरुन बुरुज साजरे -


- किल्ल्यवरील जरा पाणी व झाडी असणारा भाग -


- मागची बाजू - सगळा रखरखाट -


- जळालेले शेत, दरी आणि गड -


- वीरगळ -