सगुणा बाग

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
27 Mar 2013 - 4:51 pm

यंदा माझ्या “रौप्य महोत्सवाच्या” निमित्ताने कुठे तरी फिरायला जावे अशी मीच टुम काढली.. घरची मंडळी पण भलत्याच उत्साहात चर्चा करू लागली. मी पण तातडीने मि .पा वर माहित असतील नसतील त्या सगळ्यांना व्य.नि करून टाकला आणि वर ही पण तंबी दिली की "सोबत १० महिन्याचा छोटा अबीर आहे तेव्हा त्या हिशोबाने काय ते सुचवा.." ५० राव, मोदक, बॅटमॅन सगळ्यांनी उत्साहानी ठिकाणे सुचवली.शेवटी भरपूर शोधाशोध करून "सगुणा बाग " हे ठिकाण निश्चित केले.खरं तर तिथे ट्रेननेच जायला पाहिजे,नेरळ स्टेशन वरून फक्त १० मिनिटा वर हे ठिकाण आहे. पण मी "अबीर ला झेपेल का? नाही जागा मिळाली तर त्याला घेऊन कुठे बसू? पण मग गर्दी पाहून तो घाबरला तर?" असे १०० प्रश्न विचारून सगळ्यांच्या डोक्याची मंडई केली.शेवटी दादाने चिडून "कार काढूया " असे फर्मान सोडले.(तसंही कुणीही शनिवारी सकाळी ७ ची ट्रेन पकडणार नव्हतंच).पण माझ्या वर खापर फोडून सगळे ७ ला निघायचं ठरवून ९ ला कार मधून निघाले.. मागच्या २ दिवसात सगुणा बागेतुनही फोन येऊन गेले होतेच.."कधी येताय? कसे येताय? घ्यायला गाडी पाठवु का स्टेशनवर?" इतकी व्यवस्थित चौकशी त्यांनी केली.
मुंबई -पुणे हायवे वरुन निघालो.हायवे सोडल्यावर नेरळ कडे जाणारा एक भयाण रस्ता लागला. आणि आम्हाला आपण रस्ता चुकलो की काय असे वाटू लागले. आयती संधी चालून आलीच आहे म्हणून बाबांच्या भलतीकडेच घेऊन जाण्याच्या आणि पत्ता न विचारण्याच्या सवयीवर आईने तोंडसुख घेणं चालू केलं. जेव्हा अबीर ने गळा काढला तेव्हा मग खरी चलबिचल सुरु झाली. एव्हाना सगुणा बागेच्या पाट्या दिसायला लागल्या होत्या. नेरळ गावच्या अरुंद रस्त्यातून गाडी एकदाची सगुणा बागेत पोहोचली.तोवर माझा जीव कधी एकदा ह्या कार्ट्याला बाहेर मोकळ्या हवेत नेते ह्या विचाराने कासावीस झाला होता. दाराशीच एका मुलीने आम्हाला नाव विचारून १ नंबर च्या Dormetory कडे पाठवले.. आणि तिथवर जाई पर्यंतच "आपण योग्य ठिकाणी आलो आहोत" असं माझं मत झालं..भरपूर झाडं..२-४ तळी..पाँड हाऊस..आमराई ..झुले.. ७ फुट उंच घोडे..खिल्लरी बैलांची जोडी.. शेणाने सारवलेली जमीन..शेतं पाहून गारगार वाटायला लागलं..सगळं कसं एकदम "बांबूचे घर..बांबूचे दार..बांबूची जमीन पिवळीशार..हाऊस ऑफ बॅम्बु sss ..." होतं..
डॉर्मेटरी  समोरील दृश्य
डॉर्मेटरी मस्त होती.आधी मला वाटलं कि डॉर्मेटरी म्हणजे लोक बाथरूम बाहेर लाईन लावून उभे आहेत असं दिसणार.पण तसं काही नव्हतं.सगळी सोय असलेला छोटासा हॉल होता तो.शिवाय माळवद होते..समोर अंगण होते..शेतं दिसत होती.. झाडांना झुले होते..
सगुणा बागेतील परिसर
जोरदार भूक लागली होतीच.पण आधी अबीर ची सोय पहायची होती.म्हणून नवर्‍याला पिटाळले थोडा भात किंवा पोळी मिळते का ते पहायला.५ मिनिटात नवरा माझे + अबीरचे जेवण होईल इतका भात,उकडलेलं कणीस आणि कस्टर्ड घेऊन हजर. म्हणलं "हे रे काय" तर म्हणे "त्यांनी दिलं एवढं..".. हा आणि असे अनेक धक्के मला इथे मिळाले.. कशाच्या बाबतीत मोजून मापून नाहीच.. अबीरसाठी दुध/जेवण काहीही आणि कितीही घेतलं/मागवलं तरी त्यांनी त्याचा हिशोब ठेवला नाही.उ लट बाटल्या उकळून दे.. दुध गरम करून दे अशीही मदत न कुरकुरता केली. जेवणाचा बेतही मस्त होता.पोळी, पालक पनीर, छोले, कस्टर्ड, सॅलड, ताक, वरण-भात आणि उकडलेले कणीस.चवही छान होती. दाबून जेवलो. आता एवढं जेवल्यावर थोडं चालुन येणं भागच होतं. म्हणुन जवळच पाण्यावर शिकारा सोडला आहे तिथे जाऊन बसलो. खरतर आल्यापासुनच नदीचे डोहाळे लागले होते. त्यामुळे घाई गडबडीने लोकं पाण्याकडे निघाले. मला नदीकडून फारशा अपेक्षा नव्हत्याच. कारण आम्ही गाडीतून पाहिलं होतं तेव्हा अगदीच थोडं पाणी दिसलं होतं. त्यामुळे मी फारशी घाई न करता निवांत शेतातून चालत होते.मंडळी मात्र पाण्यात पोहोचली होती..
शेत
शेतातून चालत गेल्या वर एक उतार लागतो आणि मग एकदम नदी दिसते.माझ्या तंद्रीत चालता चालता एकदम समोर नदी दिसली आणि मी थक्क झाले..अप्रतिम...दुसरा शब्दच नाही... सुंदर बांधलेला घाट, स्वच्छ नितळ पाणी ..इतकी सुंदर नदी मी पाहिलीच नाही.. ताबडतोब पाण्यात उड्या मारल्या..२-३ तास भरपूर खेळलो.. आम्ही खेळत असताताना तिथे सगुणा बागेचे मालक शेखर भडसावळे त्यांच्या परिवारासह आले. आमचा सावळा गॊंधळ पाहून त्यांनी आम्हाला पोहण्याच्या ३ सोप्प्या टिप्स दिल्या..मंडळी लगेच गुरुवार्यांना वंदून कामाला लागली. मला काही सूर बीर मारता आला नाही..पण थोडं फार जमलं.नवरा मात्र बर्‍यापैकी शिकला.

.. पाण्यात खेळुन दमून भागून बसले होते.. समोर नदीच निळशार पाणी होतं..सह्याद्रीचे डोंगर होते..झुकझुक गाडी जात होती.. मावळत्या सूर्याची किरणे पसरली होती..आजू बाजूला हिरवीगार शेतं डुलत होती..दूरवर एक भगवा फडकत होता..माझी भावंड पाण्यात खेळत होती..ज्यांच्या बरोबर मी माझा सगळा बालपण घालवलं..नवरा पाणी पाहून थुई थुई नाचत होता..आणि "बायको sss...हे बघ.."म्हणून पोहुन दाखवत होता..आई बाबा आमचं हे सगळं कौतुक पाहत होते.. आणि आमचा नंगु पंगु अबीर पाण्यात हात मारून खुश होऊन २ इवले दात दाखवत हसत होता..सूर्याची किरणं त्याच्या सोनेरी जावळा वर पडली होती...त्याचे केस वार्यावर भुरुभुरु उडत होते..आणि जगातली सर्वात सुखी व्यक्ती...मी... हा आनंद सोहळा "याची देही याची डोळा" पाहत होते...!! अरे अजुन काय हवं गालिब..!!

नदी आणि सूर्यास्त

सूर्यास्त झाल्यावर दमून भागून आम्ही परत आलो.कोरडे होऊन मस्त चहा मागवला.आणि गप्पा मारत बसलो.खरंतर जेवणाची वाट बघत बसलो..!!८ ला जेवण आलं..आणि वाट पाहिल्याचच काय तर या मनुष्य देहाला धारण केल्याच समाधान झालं.तांदुळाची भाकरी, पिठलं,मसुराची डाळ,ठेचा,कैरीचे लोणचं,पापड,कांदा,सलाड,आणि सुंदर आटवलेली खीर.गरम गरम वरण भात होताच...आडवा हात मारला..तृप्त होऊन उशिरा पर्यंत गप्पा मारत बसलो.आमचे अजून २ नग मुंबई हून आले. त्यामुळे त्यांना काय काय केलं हे सांगून तुफान जळवलं..१.३० ला झोपी गेलो ते थेट ६.३० ला उठलो.लग्गेच आवरून,चहा घेऊन ८ ला नदीवर...!!!पुन्हा प्रचंड मस्ती केली..चित्र विचित्र फोटो काढले...लोकांना एव्हाना माझा वाढदिवस आहे याचे विस्मरण झाल होतेच.. (किंवा त्यांनी त्याचा विचार कारण सोडून दिलं..)आणि परत गाडी माझ्या वर घसरून ख्या ख्या ख्या सूरु झाले..मी गपगुमान पळ काढला..

परत येउन रुम सोडली आणि नाश्त्यावर तुटून पडलो. तो झाला की तळ्याकडे मासे मारायला प्रस्थान केले.मंडळी गळ लावून बसली..दर ५ मिनिटाला मासा मिळत होता आणि मी आरडा ओरडा करून तो पाण्यात सोडायला लावत होते.. पाण्याशिवाय नाही पण माझ्या आवाजमुळे हार्टअटॅकने तो मासा नक्की मरेल ह्या भितीने त्याला ताबडतोब पाण्यात सोडत होते.
तिलाप्या मासा
मग लोक्स जाळे टाकून मासे पकडण्याच्या मोहिमेवर निघाले.मी मात्र दोन झाडांमध्ये बांधलेला..तळ्याकाठाचा झुला पाहून ताणून दिली.लोकं मध्येच किंचाळत होते..मासे मिळाल्याच्या आनंदात, पण मी साफ दुर्लक्ष करून पसरले.ती माश्याची तडफड मी बाप जन्मात पाहू शकणार नाही परत.
मग आम्ही भडसावळे ह्यांच्या घरी सरबत प्यायला गेलो..मला आधी कळेचना की असे कसे ते आपल्याला सरबत देतील.पण जाउन पाहिलं तर त्यांच्या अंगणात सरबताचे मोठे पिंप ठेवले होते.आणि लोक वाटेल तितके सरबत निवांत पीत बसले होते..पुन्हा एकदा मला धक्का बसला..मोजमाप नाही की काही नाही.. या आणि प्या.
Saguna Bag

Badak

Flowers

duck

ह्या नंतर आम्ही आमराई कडे कूच केले.सगळ्यांचा इरादा झुल्यावर लोळत पडण्याचा होता.पण आईने सगळ्याना शिव्या घालून उठवले. पकडा पकडी,विषाम्रुत,जोडसाखळी,डुक्कर मुसंडी असले प्रकार स्वत:सोबत खेळायला लावले.गुडघेदुखीच्या गोळ्या घरीच विसरल्या म्हणजे गुडघेदुखी पण घरीच विसरली असा समज तिने करून घेतला असावा.भरपूर पळापळी करून लोक दमून भागून बसले आणि आई मात्र "जरा तिकडे काय आहे ते पाहून येते" असं म्हणत तुरुतुरु निघून गेली.
एवढा वेळ लोक्स पळापळी करत होते म्हणून अबीर गप्प बसला होता.पण जसा हा करमणुकीचा कार्यक्रम थांबला तसा त्याने गळा काढला.मग आम्ही पण जेवणाकडे धाव घेतली.आजही जेवण छान होते पण एक ट्रिप आली होती म्हणून गडबड उडाली होती. मासे खाणारे जेवणाची फारच वाट पहात होते कारण त्यांनी सकाळीच माश्याची ऑर्डर दिली होती. माशाचा डबा समोर आला आणि त्यांचे चेहरे उजळले. पण डबा उघडल्यावर त्यांचे चेहरे पाहण्या सारखे झाले. महाराष्ट्रातील दुष्काळाची आठवण करून देणारे मरतुकडे मासे पाहून सगळ्यांचे पित्त खवळले आधी त्यांनी तिथल्या पोराला बोलवून विचारला की हे काय?? त्याने निरागसपणे सांगितले.. "तिलाप्या " .. "पण आम्ही तर रोहू मागितला होता" .."पण तो नाही ना मिळाला आज" ... "अरे हे काय कारण झाला का?" .."मी दुसर्या कुणाला तरी बोलावू का" असं म्हणून तो निघून गेला आणि ज्याने ऑर्डर घेतली त्याला बोलवलं. त्यानेही अशीच गमतीशीर उत्तरे दिली. एक तर मंडळीना भूक लागलेली. त्यात पित्त खवळलेलं.. पण समोर मासे बघून तोंड खवळलं.. त्यात वर बहिण म्हणाली "मी सांगते काय होणारे..तो हे मासे घेऊन जाणार.पैसे नाही घेणार.हे मासेही नाही मिळणार.कारण आता तो रोहू कुठून आणणार?" असं म्हणाल्या बर्रोब्बर लोक्स भानावर आले आणि "जाऊ दे.. मासे तर आहेत ना..होतं असं कधी कधी.." अशा भूमिकेवर आले.. !!

जेवणानंतर "स्नेक शो" झाला.नेमकी अबीर बाजूच्या अनोळखी माणसाच्या शर्टची बाही ओढून खाण्याच्या प्रयत्नांत होता.त्यामुळे मी त्याच्या मागे होते.पण नवरा मध्येच "बायको कोब्रा पाहिलास का ?" असं विचारत होता.त्यामुळे कोब्रा असावा तिथे.त्यानंतर "अभिप्राय" विचारणारा फॉर्म आला.आई लग्गेच सरसावून लिहायला बसली.सर्व काही चान चान च होते फक्त मासे खाणारे लोक नाराज होते.मी "जे तुला वाटतंय तेच मला वाटतंय " सांगून मोकळी झाले. नवरोबा "constructive critisism" वर घसरला आणि फर्ग्युसन मध्ये शिकलेला (आणि म्हणून ३७ % सदाशिव पेठी )भाऊ म्हणाला "जे मागवले ते मासे मिळाले नाहीत एवढंच लिही"...इतकं सरळ लिहील ती मराठी/संस्कृतची शिक्षिका कसली." जेवण सात्विक होतें मात्र मत्स्याहारी लोकांच्या पदरी मात्र निराशाच ..." असं काही तरी अलंकारिक लिहित बसली..
Bailgadi
आता मात्र निघायचे वेध लागले होते.सगळे सामान घेऊन गाड्यांमध्ये टाकले.ग्रुप फोटो काढला.अबीरला घेऊन बैलगाडीत बसले.म्हणलं हेच राहिलंय तेवढीही ट्राय करू.दोन मिनिटातच पोरगा जिवाच्या आकांतानी घट्ट मिठी मारून, डोळे मिटून बसला.आमचा जीव सदैव टांगणार्या मुलाला फॉर अ चेंज घाबरलेला पाहुन मजा आली.. दाराशी कार होतीच.. तृप्त मनाने आम्ही पुण्याकडे निघालो..!!

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Mar 2013 - 5:41 pm | पैसा

फोटो पण छान आहेत. वाचताना खूप मजा आली!

धन्या's picture

27 Mar 2013 - 5:46 pm | धन्या

मस्त लेख. अनुभव आवडला.

लीलाधर's picture

27 Mar 2013 - 5:55 pm | लीलाधर

आहा आहा मस्तच की ओ फारच आवडेश वरण न मस्तच झालेय की ओ.

५० फक्त's picture

27 Mar 2013 - 6:18 pm | ५० फक्त

मस्त लिहिलं आहे, बहुधा प्रतिसाद सोडुन तुमचं पहिलंच लिखाण आहे.

मे च्या प्रचंड उन्हाळ्यात इथं जायचा प्लॅन करण्यात येईल.

बाकी खर्च किती कसा याबद्दल काही लिहा.

सगुणा बागेची वेब साइट . इथे सर्व माहिती मिळेल.
आम्ही १० जण होतो. पैकी २ जण रात्रीच्या जेवणाला आले. आम्हाला फक्त २४ तासासाठी रुम मिळाली. जेवणा व्यतिरिक्त आम्ही भुर्जी आणि मासे मागवले होते. ह्या सगळ्याचे बिल ११ हजाराच्या आसपास झाले.
माझे आई-वडील २ वर्षापुर्वी मे महिन्यात गेले होते. त्यांना काहिही त्रास झाला नाही.
जाण्या आधी tripadvisor येथील रिव्ह्यु वाचुन जा. पावसाळ्यात पाणी गढुळ होत असावे असे वाटते.
बाकी मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सगुणा बागेचे अति-व्यवसायिकरण झालेले नाही. वातावरण घरगुती आहे. पण ह्या नादात गैरसोय होऊ देत नाहीत.

अभ्या..'s picture

28 Mar 2013 - 11:25 am | अभ्या..

ह्या सगळ्याचे बिल ११ हजाराच्या आसपास झाले.

धन्यवाद. आम्हाला जे (नदी, शेत, जेवण आणि तिथला मुक्काम) जवळपास फुकटात मिळते(कधी मित्रांमुळे, कधी नात्यांमुळे) त्याची किंमत तरी कळाली.
छान ट्रीप.

प्यारे१'s picture

28 Mar 2013 - 7:33 pm | प्यारे१

थोडं महाग वाटलं.
१० तांबे सरबत प्यायलात नि अम्मळ कितीही खाल्लात तरी एका माणसाचा दिवसाचा 'खर्च' मॅक्स. ४०० च्या वर जायचा नाही .
(नाष्टा, चहा, २ जेवणं दुपारचा खाऊ, चहा/सरबत इतर)

-फुल्ल जेवण १०० च्या हिशोबानं भरपेट खाऊ घातलेला (ह्या सोत्र्याची सवय लागायला लागलीये) प्यारे

पिलीयन रायडर's picture

28 Mar 2013 - 7:47 pm | पिलीयन रायडर

अहो.. त्यात २४ तासासाठी डोर्मेटरी (१० माणसांची रहायची सोय), ३ वेळा जेवण , २ नाश्ते, ३ - ४ वेळा चहा, मासे, भुर्जी आणि बाकी साईट सीईंग आहे.
आता आमच्या ओळखीत कुणाचेच शेत नाही म्हणल्यावर दमड्या मोजुनच जावे लागणार ना..!!

त्यांची १ दिवसाची ट्रिप ५००/- मध्ये आहे. तरी जास्त वाटु शकतं. पण आजकाल साधारण एवढा खर्च येतोच.

(खरं सांगायचं तर मलाही थोडं महाग वाटलं आधी पण एकंदरित अनुभव पहाता हरकत नाही असंही शेवटी वाटलं...)

तर्री's picture

27 Mar 2013 - 8:21 pm | तर्री

आवडेश.

मस्त लिहिलं आहे. आवडेश.

सस्नेह's picture

27 Mar 2013 - 9:16 pm | सस्नेह

नावावरून हा बाग बघणेबल असेल असे वाटले नाही. पण वर्णन वाचून तृप्त झाले.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2013 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू पाहुन आणी वाचुन जीव लै सुखावला. :-)

अवांतर- डुक्कर मुसंडी- =)) हा खेळ माहित नाही. नक्की कसा खेळतात?पण अगोबा आणी मी भेटल्यावर जे चालतं तेच असणार... ;-) याविषयी खात्री आहे. =))

पण अगोबा आणी मी भेटल्यावर जे चालतं तेच असणार...

अगायाया... :-))

काय चालतं हो त्यांचं? तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला कळलंय बहुतेक.

अगोबा अन बुवा भेटल्यावर तर लवणमरीचिकाचूर्णतर्पणविधी होतो मुख्यतः कुठल्याही वाक्यानंतर =))

वृत्तांत आवडला; बागही आवडली. नोंद करुन ठेवली आहे :-)

रेवती's picture

27 Mar 2013 - 11:33 pm | रेवती

वा!! मजा केली तर! ठिकाणाची नोंद घेतली आहे.

उपास's picture

28 Mar 2013 - 12:13 am | उपास

सुंदर लिहिलय, फोटो पण मस्तच. नक्कीच जाऊन येणार!

स्पंदना's picture

28 Mar 2013 - 5:55 am | स्पंदना

गुणाची दिसतेय सगुणा बाग!

मस्त लिहिलं आहे.

किसन शिंदे's picture

28 Mar 2013 - 8:09 am | किसन शिंदे

छान लिहलंय!

काल पेबच्या किल्ल्यावरून येताना वाटेत ह्या सगुणा बागेच्या अनेक पाट्या लागलेल्या दिसत होत्या. रच्याकने बर्‍याच वर्षानी विषामृत हा शब्द पाह्यला. मे महिन्यात जाईन सगुणा बागेत त्यात तिथे नदी आहे म्हटल्यावर तर नक्कीच.!

धन्यवाद!!

मस्त धम्माल केलीस ग पिलियन ,लेखन अगदि खुसखुशीत आहे :)

अक्षया's picture

28 Mar 2013 - 10:37 am | अक्षया

मस्त लेखन. आवडले.

नन्दादीप's picture

28 Mar 2013 - 10:42 am | नन्दादीप

गेल्या पावसाळ्यात जाऊन आलो दोस्त मंडळींसोबत...
मस्त लांबवर एक मोठ्ठा धबधबा होता, तिकडे नेल होत त्यांनी त्यांच्या गाडीतून......
बफेलो रायडींग हा एक भारीच प्रकार होता तिथे.... एकंदर मज्जा आली....

इरसाल's picture

28 Mar 2013 - 12:17 pm | इरसाल

आवडले.
ह्या भडसावळे मॅडम (मे बी शेखर(वयानुसार) यांच्या मातोश्री किंवा पत्नी) आम्हाला झूलॉजी शिकवायला होत्या. अभिनव ज्ञानमंदिर कर्जत येथे.

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2013 - 11:35 am | प्रभाकर पेठकर

सगुणा बागेसंबंधी ऐकले आहे भरपूर. वर्णन आणि छायाचित्रे मस्त आहेत. नक्कीच भेट देण्यात येईल.

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2013 - 3:45 pm | पिलीयन रायडर

सगळ्यांचे आभार..
पहिल्याच लेखनाला एवढे प्रोत्साहन दिल्याबद्दल..!!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Apr 2013 - 10:10 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर!

मस्त लिहिलेस गं! जायचे अहे इथे.

सुहास झेले's picture

4 Apr 2013 - 1:56 pm | सुहास झेले

ऐकून आहे ह्याबद्दल... एकदा जायची संधी मिळाली होती, पण बॉसच्या कृपेने हुकली. तुमचा अनुभव वाचून नक्की जाईन :) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2013 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. आवडेश. अकरा हजार जरा जास्तच वाटलेच पण चलता है.

अभिप्रायाबद्दल ''.इतकं सरळ लिहील ती मराठी/संस्कृतची शिक्षिका कसली." जेवण सात्विक होतें मात्र मत्स्याहारी लोकांच्या पदरी मात्र निराशाच ..." असं काही तरी अलंकारिक लिहित बसली''

पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. अभिप्राय कसा लिहावा हा काथ्याकुटाचा विषय आहे. :)

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

4 Apr 2013 - 3:08 pm | कवितानागेश

छान लिहिलय. मी मागे एकदा गेले होते तेंव्हा भयंकर गर्दी होती आणि जेवण बोअर होत. आता गर्दी नसलेला दिवस बघून जाईन.

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2013 - 3:22 pm | पिलीयन रायडर

याही वेळेस रविवारी गर्दी होती. जेवण अगदी अप्रतिम आहे अस नाही पण मला ताजे आणि चवीला छान वाटले.
मला असं वाटायला लागलयं की गरोदर असल्या पासुन कुठेच न गेल्याने मला "सगुणा बाग" भलतीच आवडली असावी! त्यात परत कंपनी पण छान होती. नदी वगैरे तर मला आवडतेच. त्यामुळे काही खटकलं तरी मी आनंदाने दुर्लक्ष केलं!
पण तरी टाईमपास म्हणुन छान आहे..

लीमाउजेटशी सहमत आणि अधिक काही..

पावसाळ्यात जाऊ नये.
वृद्ध / बाळ यांपैकी मेंबर सोबत असल्यास पावसाळ्यात मुळीच जाऊ नये.
अत्यंत त्रासदायक अनुभव आलेला आहे या ठिकाणी..

अर्थातच अनुभव हा प्रत्येकासाठी एकसारखाच आणि सर्वकाळासाठी खरा असतो असं नव्हे, पण निदान पावसाळ्यात जाऊ नये अशी मनापासून विनंती.

चिखलाचा चिकचिकाट, अंधार, उघड्या आणि माश्या घोंघावणार्‍या कॉमन जेवणगृहात रात्री चिखल तुडवत जाण्याखेरीज ऑप्शन नसणे, लहान बाळ किंवा वृद्ध स्त्रिया यांच्यासाठीतरी किमान अपवाद म्हणूनही खोलीत अन्न देण्याची कर्टसी नसणे, त्यांनाही ठेचकाळत बॅटरी धरुन घोटाभर चिखलात चालावे लागणे, खोलीत डासकिड्यांचा बुजबुजाट, वरुन वासाड दमट चादरी, कोंदट खाजरे आणि अत्यंत अनमेंटेन्ड गचाळ ठिकाण अशी प्रतिमा तयार झाली होती.
तो तिलापिया मासा कौतुक म्हणून मागवला. इतका पोकळ, जळकट, बेचव आणि वाईट मासा मी आत्तापर्यंत खाल्ला नव्हता. मासा मुळात कसा असतो ते माहीत नाही, पण बनवला इतका वाईट होता की ज्याचे नाव ते. मांजराला टाकला तरी खाईना. बाकी जेवणही यथातथाच. घरगुती जेवण म्हटलं तरी जरातरी वेगळं काही आणि किमान घरच्याइतकं चविष्ट इतपत अपेक्षा असते. असो..

पुन्हा एकदा.. सीझन प्रमाणे आणि व्यक्तीगणिक प्रतिमा बदलू शकते. पुन्हा जाऊन हे ट्राय करण्याची इच्छा मात्र मेली आहे.

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2013 - 3:52 pm | पिलीयन रायडर

माझंही वर लिहिल्या प्रमाणे ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरील मते वाचुन "पावसाळ्यात जाऊ नये " असे मत बनले आहे. कारण पाऊस पडल्यावर हे आता छान वाटणारे माळरान, नदी आणि रात्री दिवे नसणे (चांदणे फक्त...), सारवलेली जमीन आणि कच्चे रस्ते हे सगळे मिळुन उन्हाळ्यात "गार्गार" आणि पावसाळ्यात "चिक्चिकाट" असे कॉम्बिनेशन होऊ शकते.

मात्र बाळाच्या बाबतीत मला तरी चांगला अनुभव आला. त्यांनी पुर्ण सहकार्य केले..

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2013 - 3:56 pm | पिलीयन रायडर

तुम्ही माझ्या दादाशी बोलाच.. कसा "मन्मोकळं" बोलेल तो "तिलापिया" विषयी.. काय सांगु..!!
पण एकंदरीतच "नॉन- व्हेज" एवढे छान नसावे.. मंडळी वैतागली होती.. मला खात नसल्या मुळे अंदाज नाही चवीचा..

गविंच्या प्रतिसादावरुन नाव 'सगुणा' नसावं असं वाटू लागलंय.

श्रिया's picture

4 Apr 2013 - 3:39 pm | श्रिया

वृत्तांत आणि फोटोही छान! सगुणा बागेबद्दल खूप ऐकले आहे, बघू आता कधी जमते ते.