ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला, माहुली. उंची सुमारे २८१५ फूट. माझ्या एका मित्राने २०१० साली हा किल्ला सुचवला, तिथे जायची योजना आखली, आणि आम्ही तीन मित्र तिथे ट्रेक ला गेलोही. पण काठिण्य पातळीचा चुकलेला अंदाज, पाण्याची कमतरता, शिवाय तापलेला सूर्य, अशा कारणांनी अर्ध्यातून परत आलो. पण तेंव्हापासून `माहुली' आमच्या अजेंड्यावर होता. २३ फेब्रुवारी २०१३ ची योजना फिक्स झाली. बघता बघता आठ जण जमलो आणि माहुली ला निघालो.
ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे. नाशिक हायवे वर पडघा सोडताच डावीकडे ६-७ छोटे मोठे सुळके आपलं लक्ष वेधायला लागतात. एक आडवी पसरलेली ही डोंगररांग आहे. हा किल्ला बांधला कुणी याची खात्रीशीर नोंद इतिहासात नाही. शहाजी राजे, बाल शिवाजी आणि जिजामाता यांनी काही काळ इथे वास्तव्य केले आहे. पुरंदर च्या तहात मराठ्यांनी हा किल्ला गमावला. पुढे ३ वर्षात शिवाजी महाराजांनी एकंदरित २५० किल्ले पुन्हा काबीज केले, त्यात माहुलीचा समावेश होता. या आडव्या डोंगरावर खरंतर तीन गड आहेत, पळसगड, मध्यात माहुली, आणि भंडारगड. भंडारगडाच्याच बाजुला, नवरा-नवरी आणि भटजी, वजीर, नव-याची करवली, नवरीची करवली, अशी नामाभिधानं असलेले सुळके आहेत. हे ट्रेकर्स व रॉक क्लाईंबर्स ना आकर्षित करतात.
माहुली किल्ला तसा सोप्या श्रेणीत येतो. पण ट्रेक कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी की सतत खडा चढ आहे आणि थांबायला मिळेल अशा किंवा जिथे पायांना आराम मिळेल अशा जागेचा अभाव. त्यामुळे कठीण नसला तरी दमवणारा ट्रेक आहे. अनुभवी ट्रेकर ला दोन ते सव्वा दोन तास पुरतात वर जायला. साधारण दीड्-पावणे दोन तास उतरायला. असा एक दिवसात होणारा हा ट्रेक आहे.
आम्ही सकाळी ९ ला पायथ्याशी पोहोचलो. चहा व मिसळ असं फ्युएल पोटात भरलेलं होतं. पायथ्याशी, विलास ठाकरे नामक व्यक्तीचं दुकान्/हॉटेल आहे. शिवाय गडवाटेची माहितीही ते आनंदाने पुरवतात. ९२०९५ २६२६८ हा त्यांचा भ्रमणध्वनी. गडाच्या पायथ्याशी असलेल्या देवळात गडाचा नकाशा आहे, त्याचा फोटो जरूर घेऊन ठेवावा. उपयोगी पडतो.
त्यांच्याकडून वाटेचा अंदाज घेतला आणि मार्गस्थ झालो. जे पटापट चढले त्यांना २ तास वरपर्यंत पोहोचण्यास पुरले. बाकीचे सुमारे ३ तासांनी पोहोचले. साधारण ४ टेकड्या पार करून गेलो की एक शिडी लागते. शिडी ब-यापैकी सुस्थितीत आहे. गड ८०% चढल्यावर पुढे २-३ कातळाचे पॅच लागतात. वरतून दिसणारा परिसर सुरेख आहे. हवेत फार ढग, धुकं, धूर नसल्यास तानसा जलाशयही दिसतो. पावसाळ्यात सगळा परिसर हिरवागार असतो. धबधबे वहात असतात. पण आत्ता उन्हाळ्यात मात्र निवडुंगांचं आणि रानफुलांचंच राज्य असतं.
वाटेत काही खत्राट स्पॉट लागतात. तिथून निसर्गाचं अप्रतिम दर्शन होतं.
गडावर विशेष काहीही उरलेलं नाही. गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक पाण्याचं मोठं टाकं दिसतं. त्याच्या डावीकडून पुढे गेल्यावर आपण एका मोठ्या वृक्षापर्यंत पोहोचतो. जिथून लगेच खाली आपल्याला कल्याण दरवाजा, व काही गुहा आढळतात. गुहा स्वच्छ नाहीत. गावातल्या किंवा गावाबाहेरच्या बेजबाबदार लोकांनी येऊन या गुहांमधे चिकन/दारू चे सॉलिड बेत केलेत, करतात, हे समजतं. शिवाय `स्वप्नील बदाम स्वप्नाली', `अजय बदाम मोना' अशा महान व्यक्तींचा उल्लेख गुहांच्या भिंतींवर आढळतो.
कल्याण दरवाजा भंगलेल्या अवस्थेत आहे. तिथे असलेल्या माहिती देणा-या फलकावरही आधुनिक कोरीवकाम केलेले आढळते. आपल्या इतिहासाबद्द्ल असलेल्या आस्थादारिद्र्याचं हे एक उदाहरण.
तिथे थोडा वेळ विसावून विलास ठाकरेंना फोन केला. भंडारगडावर जाऊन यायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज घ्यायला. पण उरलेलं पाणी, उरलेला वेळ, सर्वानुमते उरलेला स्टॅमिना, हे लक्षात घेऊन पुढच्या खेपेला भंडारगड करू असं ठरवलं आणि परतीच्या वाटेला लागलो. उतरतानाही दोन फळ्या झाल्या, एक एक्स्प्रेस, दुसरी पॅसेंजर. सुमारे ५ पर्यंत सगळे जण खाली आलो. पायथ्याशी देऊळ आहे, आणि त्या बाजूला विहीर. विहिरीचं थंड पाणी काढून हात, तोंड धुतल्यावर सगळा शीण गेला आणि आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो.
या आणि मागच्या ट्रेक च्या आठवणी काढत गाड्या हायवेला लागल्या. आता सोनेरी शाल पांघरलेला माहुली `पुन्हा या' असं सांगत आम्हाला अच्छा करत होता.
प्रतिक्रिया
26 Feb 2013 - 10:45 pm | प्रचेतस
फोटो आणि वर्णन छानच. थोडा विस्तार चालला असता.
फुलांपेक्षाही गडाचे फोटो अधिक यायला हवे होते.
27 Feb 2013 - 3:15 pm | सुहास झेले
यप्प... भंडारगडाच्या वाटेवर खूप जुने अवशेष बघायला मिळतात...वाडे, मंदिर, तलाव
26 Feb 2013 - 11:03 pm | आदूबाळ
आवडलं. हे "क्ष बदाम य" हे भयंकर मनस्ताप देणारं आहे.
27 Feb 2013 - 3:58 am | nishant
फोटो व धावते वर्णन आवडले..
27 Feb 2013 - 9:01 am | किसन शिंदे
फोटो सगळेच क्लास आहे, वर्णनही आवडले.
फक्त फोटोंच्या मध्ये ती नक्षी पाहून चुकचूकायला होतंय.
27 Feb 2013 - 9:24 am | स्पा
क्लासच
27 Feb 2013 - 9:28 am | अनिकेतदळवी
अप्रतिम फोटो. आणि माहिती सुद्दा
27 Feb 2013 - 1:17 pm | वेल्लाभट
@ वल्ली, निशांत, आदुबाळ, किसन, मन्या, स्पा, अनिकेत:
आभार.
@ किसन, आदुबाळ :
त्या नक्षांचा फोटो मुद्दाम काढला. जगात दोनच प्रकारच्या गोष्टी लक्षात रहातात. खूप चांगल्या किंवा खूप वाईट. ही खूप वाईट गोष्ट होती, आहे. म्हणून तिचा फोटो वगळला नाही. जाम खुपतात ही कोरीवकामं. समोर मिळाला कुणी असं करताना तर...
27 Feb 2013 - 1:29 pm | प्रचेतस
किसनदेव तुम्ही टाकलेल्या वॉटरमार्क्सबद्दल बोलत आहेत हो.
27 Feb 2013 - 2:22 pm | वेल्लाभट
वल्लीसर, वॉटरमार्क बरेच फोटो काढणारे टाकतात. चौर्यकर्म कमी करण्याचा एक प्रयत्न असतो तो. उद्या कुण्या दुस-याच साईटवर, ब्लॉगवर तुमचा फोटो दुस-याच्या नावाने दिसणं खुपण्यापेक्षा, बघणा-या चार जणांना वॉटरमार्क खुपला तर बेहत्तर. त्याला इलाज नाही. असं; माझं म्हणणं.
3 Mar 2013 - 8:04 pm | धन्या
आपण गड-किल्ल्यांवर, समुद्रकिनारी किंवा उंच पहाडांवर जातो. आपल्या मालकीच्या नसलेल्या निसर्गाने केलेल्या सौंदर्याची उधळण "आपल्या" कॅमेर्यात टीपतो. हे फोटो नंतर आपण त्यांच्यावर वॉटरमार्क टाकून सोशल साईटसवर "आपले" फोटो म्हणून टाकून देतो.
आपल्या मालकीच्या नसलेल्या निसर्गाचे फोटो आपण "आपल्या" कॅमेर्याने घेतले म्हणून जर "आपले" म्हणू शकतो, तर उदया पब्लिक फोरमवर तुम्ही अपलोड केलेला फोटो एखादयाने "त्याचं" इंटरनेट कनेक्शन वापरुन डाऊनलोड केले आणि माझेच फोटो म्हणून ब्लॉगवर टाकले तर ते चौर्यकर्म कसे?
चांगले फोटो घेऊन नंतर त्या फोटोंची वॉटरमार्क टाकून वाट लावणार्यांच्या "मी" पणाची कीव करावीशी वाटते. मी म्हणतो अशा लोकांनी "आपले" फोटो सोशल वेबसाईटसवर अपलोड करुच नयेत ना. पडू दयावेत आपल्या कॅमेर्याच्या मेमरी कार्डमध्ये.
प्रतिसाद खुपच कठोर आहे, पण तो व्यक्तीशः तुम्हाला उद्देशून नाही. चांगले फोटो घेऊन नंतर त्यांची वॉटरमार्क टाकून वाट लावणार्या प्रत्येकासाठी आहे.
5 Mar 2013 - 10:56 am | वेल्लाभट
मी काय म्हणतो, 'निसर्गाने' निर्मिलेल्या मातीला भाजून केलेल्या विटांचं 'बिल्डर' ने पैसे देऊन 'गवंड्याकडून' बांधून घेतलेलं घर केवळ तुम्ही चार 'पैसे' देऊन 'तुमचं' 'तुमचं' कसं करता? केवळ एक हार 'तुम्ही' घातला म्हणून एखाद्या व्यक्तीला तुम्ही 'तुमची' कसं म्हणता? 'रिझर्व' बँकेने छापलेले पैसे केवळ तुमच्या हातात आले म्हणून ते 'तुमचे' कसे होतात?
प्रतिक्रिया कठोर नाही, कीव करण्याजोगी आहे.
27 Feb 2013 - 1:41 pm | जिवेन्द्र
सर्व छायाचित्र refreshing आहेत.
रानफुलांचा फोटो सर्वाधिक आवडला.
मला तरी watermark चा काही problem वाटला नाही.
असेच फोटो काढत राहा
28 Feb 2013 - 7:29 am | वेल्लाभट
धन्यवाद जिवेंद्र!
28 Feb 2013 - 9:33 am | पैसा
सगळी माहिती आणि फोटो फार छान आलेत. नवीन कोरीवकाम करणारा कोणीही सापडला तर तिथल्या तिथे त्याचा बंदोबस्त करा ही विनंती!
28 Feb 2013 - 10:47 am | वेल्लाभट
जरूर !
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
28 Feb 2013 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा
फोटू मस्त आलेत
28 Feb 2013 - 10:48 pm | वेल्लाभट
धन्यवाद!
4 Mar 2013 - 5:40 pm | बॅटमॅन
मस्त फटू अन वर्णन. पण थोडक्यात आटोपते घेतलेत.
4 Mar 2013 - 6:03 pm | मन१
माहुलीचं खर्म तर शिवकाळात एक खास स्थान आहे.
शिवाजींनी स्वराज्य स्थापलं हे सर्वश्रुत. पण त्यांच्यापूर्वी शहाजीराजांनीही तसाच एक प्रयत्न केला होता.
निजामशाहीचे सर्व प्रमुख वारस मृत्युमुखी पडल्याने किंवा कैदेत गेल्याने निजामशाहीला भक्कम असा राजा नवह्ताच. त्यामुळे निजामशाही जिंकून घ्यायचे आदिलशाही आणि मुघलांनी संयुक्त प्रयत्न सुरु केले.
शहाजीराजे ह्यावेली निजामशाहीत होते. त्यांनी मुर्तुझा निजामशहा ह्या बालकास निजामशाहीचा नवा वारस घोषित केले व त्याच्याआडून स्वतः तेच कारबहर पाहू लागले. राज्याची संपूर्ण य्म्त्रणा त्यांच्या हाती होती. जणू शिवाजींपूर्वीच एक स्वतंत्र मराठा राज्य अस्तित्वात येउ पहात होते.
पण आदिलशहा आणि मुघल ह्यांना ह्याची कल्पना असल्याने त्यांनी एकत्रित मोहिमा सुरुच ठेवल्या. त्यांच्या त्या आघाडीपुधे आर्थिक ताकद व कुमक जराशी कमी पडत गेली अघोषित स्वराज्याची. काही काळ हे अघोषित स्वराज्य अस्तित्वात होते. नंतर शर्थीचे प्रयत्न करुनही एकामागोमाग एक किल्ले त्यांना सोडावे लागले.
.
शेवटचा निजामशाहीच्या(अघोषित स्वराज्याच्या) त्यावेळेसच्या राजधानीचा किल्ला त्यांनी बराच काळ झुंजवला. पण रसद संपल्याने सोडून द्यावा लागला. मुर्तुझा निजामशहा कैद झाला. शहाजींना आदिअलशाहाशी तह करुन बंगळूरास जावे लागले. त्यांची मूळ भूमी पुणे-सुपे -चाकण ह्यापासून त्यांना दूर ठेवायचा तो प्रयत्न होता.
.
तर ही जी शेवटची लढाई झाली; आणि शेवटचा किल्ला लढला शहाजीराजांच्या तर्फे तो म्हणजे माहुली.
.
शहाजींच्या हयातीतच शिवाजींनी तो जिंकला.(व बहुदा त्याच वेळी तो पिताश्रींना अर्पणही केला.(पण ह्याबद्दल मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.))
4 Mar 2013 - 6:05 pm | मन१
मी अधिक माहिती देत आहे. जाणकारांनी दुरुस्ती करावी :-
.
माहुलीचं खर्म तर शिवकाळात एक खास स्थान आहे.
शिवाजींनी स्वराज्य स्थापलं हे सर्वश्रुत. पण त्यांच्यापूर्वी शहाजीराजांनीही तसाच एक प्रयत्न केला होता.
निजामशाहीचे सर्व प्रमुख वारस मृत्युमुखी पडल्याने किंवा कैदेत गेल्याने निजामशाहीला भक्कम असा राजा नवह्ताच. त्यामुळे निजामशाही जिंकून घ्यायचे आदिलशाही आणि मुघलांनी संयुक्त प्रयत्न सुरु केले.
शहाजीराजे ह्यावेली निजामशाहीत होते. त्यांनी मुर्तुझा निजामशहा ह्या बालकास निजामशाहीचा नवा वारस घोषित केले व त्याच्याआडून स्वतः तेच कारबहर पाहू लागले. राज्याची संपूर्ण य्म्त्रणा त्यांच्या हाती होती. जणू शिवाजींपूर्वीच एक स्वतंत्र मराठा राज्य अस्तित्वात येउ पहात होते.
पण आदिलशहा आणि मुघल ह्यांना ह्याची कल्पना असल्याने त्यांनी एकत्रित मोहिमा सुरुच ठेवल्या. त्यांच्या त्या आघाडीपुधे आर्थिक ताकद व कुमक जराशी कमी पडत गेली अघोषित स्वराज्याची. काही काळ हे अघोषित स्वराज्य अस्तित्वात होते. नंतर शर्थीचे प्रयत्न करुनही एकामागोमाग एक किल्ले त्यांना सोडावे लागले.
.
शेवटचा निजामशाहीच्या(अघोषित स्वराज्याच्या) त्यावेळेसच्या राजधानीचा किल्ला त्यांनी बराच काळ झुंजवला. पण रसद संपल्याने सोडून द्यावा लागला. मुर्तुझा निजामशहा कैद झाला. शहाजींना आदिलशाहाशी तह करुन बंगळूरास जावे लागले. त्यांची मूळ भूमी पुणे-सुपे -चाकण ह्यापासून त्यांना दूर ठेवायचा तो प्रयत्न होता.
.
तर ही जी शेवटची लढाई झाली; आणि शेवटचा किल्ला लढला शहाजीराजांच्या तर्फे तो म्हणजे माहुली.
.
शहाजींच्या हयातीतच शिवाजींनी तो जिंकला.(व बहुदा त्याच वेळी तो पिताश्रींना अर्पणही केला.(पण ह्याबद्दल मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.))
5 Mar 2013 - 10:48 am | वेल्लाभट
माहिती बद्द्ल खरंच धन्यवाद. यातलं बरंचसं ठाऊक नव्हतं.