तुम्ही जात मानता का?: विश्लेषण

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
27 Dec 2012 - 5:06 pm
गाभा: 

याआधी: तुम्ही जात मानता का?: सर्वेक्षण
'जात मानणे' या वाक्प्रयोगाला व्यापक अर्थ आहे. मानवी व्यवहार आणि त्याची जात याची सांगड तुम्ही घालता का? आयुष्यातील विविध प्रसंगी तुमच्या आयुष्यात जातीचे स्थान काय आणि किती आहे? वगैरे विविध पैलू या विषयाला आहेत. यावर विविध माध्यमांतून विविध मते मांडली जातात. मात्र तुमच्या-माझ्यासारख्यांच्या प्रत्यक्ष दुनियेत 'जात' हे एक सत्य आहे. या सत्याने आपल्या आयुष्यात किती प्रभाव टाकला आहे हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण.

हे सर्वेक्षण परिपूर्ण आहे, सर्वार्थाने व्यापक आहे वगैरे दाबा अजिबात नाही. या सर्वेक्षणात भाग घेणेही ऐच्छिक असल्याने सर्व विचारांचे, विभागांचे यात प्रतिबिंब पडले असण्याची शक्यताही कमी आहे. हे जालावर होणार्‍या विविध सर्वेक्षण / पोल्स सारखेच एक असल्याने त्या माध्यमाचे फायदे आणि सीमा दोन्ही याही सर्वेक्षणाला लागू आहेत.

ज्या व्यवहारात जातींच्या आधारावर निर्णय घेतले जाताना दिसतात त्यांची बेटी व्यवहार (अर्थात लग्नसंबंध जोडणे), रोटी व्यवहार (शिवाशीव, अन्न, मुलांची देखभाल वगैरे) आणि दैनंदिन वागणूक अशी तीन भागात विभागणी करता येईल.

बेटी व्यवहार

या सर्वेक्षणाचे बेटीव्यवहारासंबंधी काय निष्कर्ष निघाले ते बघण्याआधी प्रत्यक्षात भारतात अश्या प्रकारच्या सर्वेक्षणातून काय निष्कर्ष आले आहेत ते बघूया.

भारतात २०१० मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात काय दिसले ते बघा:१

भारतात ८९.०४% लग्ने ही सजातीय असतात. आंतरजातीय लग्नांमध्ये मुलाची अथवा मुलीची जात उतरंडीवर खालच्या जातीची असण्याचे प्रमाण साधारण समसमान आहे. अपेक्षेप्रमाणे पश्चिम भारतात आंतरजातीय लग्नांचे प्रमाण सर्वाधिक(१६.७५% ) असून पूर्व भारतात हे प्रमाण सर्वात कमी (९.०४% ) आहे. उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात हे प्रमाण १०% च्या आसपास असून पूर्वोत्तर राज्यांत १०.८% आहे.

गोवा राज्यात सर्वाधिक आंतरजातीय लग्ने होतात (२०.६९% ) तर मिझोराममध्ये आंतरजातीय लग्ने अजिबात होत नाहीत

आंतरजातीय लग्नाचा आणि वयाचा किंवा शहरी/ग्रामीण भागांचा फारसा संबंध लावता येऊ नये. सर्व वयोगटात आणि शहरी भागातही साधारण सारख्याच प्रमाणात आंतरजातीय लग्ने होतात. गंमत अशी की अधिक शिक्षण असलेल्या व्यक्तींमध्ये आंतरजातीय लग्ने कमी आढळतात. (हे बहुदा ठराविक जातींमध्ये शिक्षण केंद्रित असल्याने असावे). धर्माच्या पट्टीवर वर्गीकरण केले तर हिंदूंमध्ये आंतरजातीय लग्ने (१०.६१% ) मुसलमानांपेक्षा कमी होतात (१४.०९% ). अजून एक रोचक माहिती अशी 'मास मिडिया' शी संपर्क अधिक असणार्‍या व्यक्तींमध्ये आंतरजातीय लग्नांचे प्रमाण तुलनेने अधिक दिसते आहे.

ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण
बेटी व्यवहाराबद्दलचे निष्कर्ष देण्यापूर्वी कोणी उत्तरे दिली आहेत याचा अंदाज घेऊ.

सँपल बेस

वर दाखवल्याप्रमाणे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६८% आयडीमागील व्यक्ती या विवाहित होत्या तर ३२% अविवाहित होते. तर विवाहित व्यक्तींपैकी २९% व्यक्तींनी आंतरजातीय विवाह केला आहे तर ७१% व्यक्तींनी सजातीय व्यक्तीशी विवाह केला आहे. अर्थातच हे प्रमाण राष्ट्रीय पातळीवरील विदा बघता बरेच पुरोगामी आहे ;). मात्र यातून असे म्हणता येईल की या सर्वेक्षणात सहभागी झालेला 'सँपल बेस' हा पुरेसा व्यापक आणि/किंवा पुरेशा संख्येत नव्हता.

असो. आता लग्नाळू व्यक्तींचा विचार करूया. इथे लग्न झाले नसल्यास त्या व्यक्तीस लग्नाळू असे धरले आहे (म्हणजे लग्नाची इच्छा नसल्यास प्रतिसादकाला समजा लग्न करायचे आहे असे समजून उत्तर द्यायला सांगितले होते). अशा अविवाहित व्यक्तींना लागू असणार्‍या प्रश्नांचा हा निष्कर्ष आहे:

अविवाहित

आंतरजातीय लग्नांना अनुकूल असणार्‍यांच्या गटातील काही असे लग्न करायच्या विचाराने इतके प्रेरित असतात का - की सजातीय का विजातीय जोडीदार असा प्रश्न आल्यास विजातीय जोडीदारास प्राधान्य देतील? या प्रश्नाला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक व्यक्तींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ३०% अविवाहित व्यक्ती जर स्वतःला एकट्याला निर्णय घ्यायची मुभा असेल तर विजातीय जोडीदारास प्राधान्य देतील. दुसरीकडे अरेन्ज्ड मॅरेज करताना आंतरजातीय जोडीदार बघणे काय विचार करणेही एकेकाळी दुरापास्त होते तिथे ऐसी-मिपावरील प्रतिसादक अविवाहित व्यक्तींपैकी ७०% व्यक्ती आंतरजातीय जोडीदाराचा विचार करण्यास तयार आहेत. त्याहून रोचक निष्कर्ष असा निघतो की जरी कुटुंबाने मिळून एकत्र निर्णय घ्यायची वेळ असेल तरीही ऐसी-मिपावरील प्रतिसादक अविवाहित व्यक्तींच्या कुटुंबांपैकी ६०% कुटुंबात जातीबाहेरच्या जोडीदाराचा विचार केला जाऊ शकतो.
दुसरीकडे जे अविवाहित किंवा त्यांचे कुटुंबीय जातीबाहेर लग्नाला तयार नाहीत त्यांच्यामध्ये त्यामागे सामाजिक दबाव नसून रोजच्या व्यवहारातील सवयी, खाण्याच्या सवयी वगैरे आहेत. यातून अनेकदा दिसणार्‍या एका समजावरही शिक्कामोर्तब होते की व्यक्तींच्या काही सवयी, अन्न, रोजची वागणूक याला त्या व्यक्तीच्या जातीशी अजूनही जोडले जाते. जरी प्रत्यक्षात यातील बहुतांश गोष्टी त्या व्यक्तीची जडणघडण कोणत्या प्रदेशात झाली, आर्थिक स्तर, शिक्षण वगैरेशी निगडित असतात, तरी आपल्याकडे त्याला जातीशी जोडले जाते. हा निष्कर्ष तिसर्‍या सेगमेन्टमधील प्रश्नात अधिक ठळकपणे अधोरेखीत झाला आहे.

आता स्वतःच्या लग्नाचा विचार करताना (किंवा जेव्हा केला तेव्हा) जातींचा विचार झाला असेल, नसेल किंवा करावा लागला असेल, मात्र ही जातींची बंधने आपल्या पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा कल जाणून घेण्यासाठी काही विचारलेल्या प्रश्नातून असे चित्र दिसून आले:

पुढील पिढी

सध्या जे विवाहित आहेत त्यापैकी तब्बल ८१% व्यक्ती आपल्या अपत्यांचा विवाह जातीबाहेर लावून देण्यास आनंदाने तयार आहेत आणि बाकीचेही नाखुशीने किंवा स्वतः सहभागी न होता का होईना लग्नास तयार आहेत, अन् सर्वेक्षणात सहभागी ऐसी-मिपावरील अशा एकाही विवाहिताने जातीबाहेर लग्नाला संमती न देण्यास विरोध केलेला नाही. इथेही SC/ST समाजाला मिळणार्‍या वेगळ्या वागणुकीची झलक दिसते आणि ७६% व्यक्ती त्यांच्याशी लग्न लावण्यास तयार आहेत तर ५% व्यक्ती मात्र अश्या लग्नाच्या विरोधात आहेत.

सदर निष्कर्ष अविवाहित व्यक्तींच्यात घेतले तर मात्र वेगळे चित्र दिसून येते. इथे केवळ ५०% व्यक्ती आनंदाने जातीबाहेर करून द्यायला तयार आहेत तर १०% व्यक्ती अश्या लग्नाच्या विरुद्ध आहेत. त्यातही सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ऐसी-मिपावरील ३०% व्यक्तींना अपत्याने SC/ST जोडीदारांशी लग्न करणे मंजूर नाही. आता या निष्कर्षावरून भविष्यात जातिभेद वाढेल असे भाकीत करणे हास्यास्पद ठरेल तरी स्वतःचे लग्न झाल्यानंतर अनेक बाबतीत व्यक्ती अधिक समंजस होते असे म्हणता येईल का? ;)

मिळालेला विदा वापरून अजून एक रोचक निष्कर्ष असा आहे:

Jaat_chart4

स्वतः सजातीय विवाह करूनही आंतरजातीय विवाहास अनुकूल असणार्‍यांचे प्रमाण एकूण संख्येच्या ६२% आहे, शिवाय स्वतः आंतरजातीय विवाह करून अपत्यांसही हरकत नसणारे एकूण संख्येच्या २४% आहेत. मात्र अशाही व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः जाती बाहेर लग्न केले आहे मात्र अपत्यांनी तसे करू नये असे वाटते आणि स्वतः सजातीय लग्न करून अपत्यांनीही तेच करावे असे वाटणारेही ९% व्यक्ती आहेत.

रोटी व्यवहार

या प्रकारचे व्यवहार अधिक खाजगी पातळी वर चालत असल्याने याबद्दल बराच कमी विदा उपलब्ध आहे.५ मला आंतरजातीय लग्नांसारखा व्यापक प्रमाणावर सर्वेक्षण करून विदा मिळवण्याचे प्रयत्न जालावर शोधून मिळाले नाहीत. मात्र समाजात रोटी व्यवहारातही जातिभेद पाळला जातो याचे ठळक उदाहरण आहे 'मिड-डे मिल" या योजनेत दिसून आलेला जातिभेद. भारतातील अनेक राज्यांत या योजनेची अंमलबजावणी करतेवेळी ठराविक जातीच्या व्यक्तींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे समोर आले होते. त्यावर बरीच राजकीय चर्चा झाली परंतू हा प्रकार अजूनही बर्‍याच गावांतून दिसतो असे सांगणारे रिपोर्ट्स प्रकाशित होत असतात.

शाळांमध्ये जर अधिक SC/ST शिक्षक ठेवले तर तिथे येणार्‍या श्रीमंत विद्यार्थ्यांच्यात घट होते हा शाळाचालकांचा लाडका समज आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ४८.५% शिक्षकांची आणि प्रोफेसरांची राखीव पदे २०१०-११ मध्ये रिकामीच राहिली आहेत२, याला "पात्र" शिक्षक उपलब्ध नाहीत असे कारण जरी दिले जात असले तरी अश्या प्रकारच्या नोकर्‍यांसाठी पात्र तरीही बेकार व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. तामिळनाडूमध्ये दुपारचे जेवण बनविण्याचे काम हलक्या जातीच्या व्यक्तीला दिल्याचे कळल्यावर अनेक पालकांनी मुलांच्या शाळा बदलल्याची बातमी वाचली असेलच, त्याहून धक्कादायक असे की तेथील 'ब्लॉक डेवलपमेन्ट ऑफिसर'ने त्या व्यक्तींची बदली केली.

तेव्हा या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारची मते ऐसी-मिपावर फारशी मिळाली नाहीत. असो. इथल्या सहभागी सदस्यांनी दिलेल्या मतांचे विश्लेषण बघूया..

ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण

Jaat_chart5

इथे सहभागी झालेल्या सदस्यांपैकी जेवण बनविणार्‍या व्यक्तीची जात ८०% व्यक्ती बघत नाहीत तर १०% व्यक्ती धर्म बघतात. याच्या कारणांचे विश्लेषण केले तर जेवणातून जेवण बनविणार्‍याचे विचार/आसक्ती वगैरे झिरपतात असा समज ३३% प्रतिसादक बाळगतात तर १७% व्यक्तींच्या कुटुंबीयांतील काहींचा अजूनही या समजावर विश्वास असल्याने जात बघणे आवश्यक ठरते. स्वतःला फारसे जातीचे नसले तोच वारसा आपल्या अपत्याला देताना मात्र या प्रमाणात अधिक घट होते. अपत्याला जी व्यक्ती सांभाळणार आहे (प्रसंगी काही शिकवणार आहे) त्या व्यक्तीची जात किंवा किमान धर्म ३६% प्रतिसादकांना बघणे आवश्यक वाटते. व त्याचे कारण जातीय/धार्मिक संस्कारांशी आहे. इथे हे नमूद करावे लागेल की बहुतांश व्यक्तींनी एका ठराविक धर्माला विरोध दर्शवला आहे. याचा अर्थ सर्वेक्षणात सहभागी झालेला 'सँपल बेस' हा पुरेसा व्यापक आणि/किंवा पुरेशा संख्येत नव्हता हे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून येते. त्याचवेळी हॉटेलात जाताना मात्र जवळजवळ ९०% लोक जातीचा विचार करत नाहीत.

इतर व्यवहार
इतर व्यवहारांचा उहापोह करायचा तर अनेक विषयांना स्पर्श करावा लागेल. या सर्वेक्षणासाठी जरी मोजकेच प्रश्न होते तरी जालावर भारतातील जातिभेदावर माहिती शोधली असता विविध क्षेत्रात जातिभेद प्रकर्षाने दिसतो. खाजगी क्षेत्रात जातिभेद नसतो असा एक गोड समज बाळगलेले अनेक जण असतील. मात्र विविध भारतीय आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीजने केलेल्या शास्त्रशुद्ध सर्वेक्षणांतून प्रत्यक्ष स्थिती वेगळी दिसून आली आहे. उदाहरणादाखल Paul Attewell and Sukhdeo Thorat यांनी एका अमेरिकन युनिव्हर्सिटीसाठी जो अभ्यास केला३ त्यात त्यांनी एक प्रयोग केला. मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली, नॉयडा आदी महानगरात एकसारख्याच पात्रतेचे, सारख्या प्रकारच्या कव्हर लेटरची विविध अ‍ॅप्लिकेशन्स पाठवली. प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन्सवर फक्त नाव वेगळे होते. गुणात्मक रित्या किंवा लेखी कम्युनिकेशन मध्ये कोणताही रेझ्युमे कमी किंवा अधिक प्रतीचा नव्हता. मात्र असे दिसून आले की दलित व्यक्तींची आडनावे असणार्‍या व्यक्तींना सवर्ण आडनाव असणार्‍या व्यक्तींपेक्षा ३३% कमी कॉल आले. इतकेच नव्हे तर अल्पसंख्य धर्मातील व्यक्तींना बहुसंख्यांपेक्षा येणार्‍या कॉलेचे प्रमाण ६६% ने कमी होते.

अर्थातच याचा परिणाम राजकीयही असतो. आपल्या राजकीय पक्षांचे मनात खोलवर एका जातीचा पक्ष असे झालेले विभाजन एका युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून प्रकटला४. उत्तर प्रदेशात "तुमच्या जातीचा पक्ष कोणता?" या प्रश्नावर बसपा आणि सपा मध्ये सरळ विभाजन दिसून आले. (जितक्या बहुसंख्यांना भाजप हा आपला पक्ष वाटत होता त्याच्या कित्येक पट अल्पसंख्याकांना तो बहुसंख्यांचा पक्ष वाटत होता ;) )

असो. थोडक्यात या जातीच्या गणितांनी अनेक क्षेत्रात आपले बस्तान कैक वर्षांपासून बसवले आहे. आता ऐसी-मिपावरील कल पाहू

ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण

Jaat_chart6

९७% प्रतिसादक भांडण झाले तरीही जातीवाचक शिव्या देत नाहीत तर उर्वरित ३%ही अगदी क्वचित जातीवाचक अपशब्द उच्चारतात. मात्र काही मोजक्या प्रतिसादकांनी हे आवर्जून सांगितले की ते भारतीय कठोर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे अश्या शिव्या देण्यापासून स्वतःला रोखतात. मात्र अपेक्षेप्रमाणे (आणि आधीच्या प्रश्नात बघितल्या प्रमाणे) जवळजवळ ५५% व्यक्ती रोजच्या सवयींचा संबंध जातीशी जोडतात.जातींचा आणि आर्थिक व शैक्षणिक पातळीचा काही प्रमाणात तरी संबंध असतो असे जवळजवळ ८३% लोकांना वाटते. तर ५८% व्यक्तींना हेही पटते की जातींमुळे काही व्यक्तींना नोकरी/शिक्षण/बढतीपासून वंचित राहावे लागते.

या सर्वेक्षणानंतर माझी वैयक्तिक मते मुक्त चिंतन स्वरूपात लिहायची ठरवली होती पण विस्तारभयाने इथे थांबतो. समारोपाच्या प्रतिसादात आणि या निमित्ताने होणार्‍या चर्चेत माझी मते, काही अधिकचा विदा देत जाईनच.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सदस्यांचे, 'जात' हा विषय असूनही नियमाला समंजस अपवाद करणार्‍या संपादकांचे आणि वेळोवेळी याचे विश्लेषण वेळेत करण्याबद्दल व्यनीतून प्रोत्साहन देणार्‍या मित्रांचे अनेक अभार

संदर्भः
१. http://epc2010.princeton.edu/papers/100157
२. http://www.thehindu.com/opinion/editorial/article3606836.ece
३. http://blogs.wsj.com/indiarealtime/2011/07/12/india-journal-combatting-c...
४. http://economics.ucsc.edu/news-events/downloads/caste.politics.2.22.12.pdf
५. http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-01-11/india/28137114_1_...

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

27 Dec 2012 - 5:40 pm | स्मिता.

लेख येण्याच्या १०-१५ मिनीट आधीच सर्वेक्षणाच्या निकालाची आठवण आली होती. लगेच धागा बघून बरे वाटले. १-२ दिवसात आणि तोही असा तपशीलवार विश्लेषणासह निकाल इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
एकूण सर्वेक्षण रोचक वाटले.

दादा कोंडके's picture

27 Dec 2012 - 7:55 pm | दादा कोंडके

लेख येण्याच्या १०-१५ मिनीट आधीच सर्वेक्षणाच्या निकालाची आठवण आली होती.
एकूण सर्वेक्षण रोचक वाटले.

तुम्हाला सर्वेक्षणाचा निकाल रोचक का वाटला हे जाणून घेण्यास उत्सूक आहे. तुम्हाला काही वेगळा निकाल अपेक्षित होता का? या सर्वेक्षणावर तुमची टिप्पणी वाचायला आवडेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Dec 2012 - 8:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यांना सर्वेक्षण रोचक वाटले असे त्या म्हणाल्या आहेत. सर्वेक्षणाचा निकाल रोचक वाटला असे नाही म्हणाल्या त्या अजून.

दादा कोंडके's picture

27 Dec 2012 - 9:00 pm | दादा कोंडके

त्यांना सर्वेक्षण रोचक वाटले असे त्या म्हणाल्या आहेत.

मला वाटतं त्यांना निकालच रोचक वाटतोय म्हणूनच त्या याची वाट बघत होत्या. टायपो म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि सर्वेक्षण रोचक वाटत असेल तर त्यांनी त्याच धाग्यावर हे मत व्यक्त केलं असतं.

स्मिता.'s picture

27 Dec 2012 - 9:40 pm | स्मिता.

वर विमेंनी म्हटले तसेच मला संपूर्ण सर्वेक्षण रोचक वाटले. त्यात प्रश्नांपासून निकालापर्यंतचे सगळे आले.

रोचक वाटण्याचे कारण सर्वेक्षणाचा विषय नसून त्याची एकंदर पद्धती हे आहे. सर्वेक्षण हा विषय मला नवीन असल्याने त्यासाठीचे प्रश्न निवडणे, उत्तरांच्या आधारे सामाजिक विषयांवर आकडेवारी काढणे, त्यानुसार अनुमान करणे, इ. गोष्टी रोचक वाटल्या. हे सर्वेक्षण 'तुम्ही भूत मानता का?' असे असते तरी मला रोचक वाटले असते.

दादा कोंडके's picture

27 Dec 2012 - 9:50 pm | दादा कोंडके

:)

वा. उत्तम आणि प्रांजळ विश्लेषण. धन्यवाद..

बाकी एक मात्र आहे की जोडीदार निवडताना सजातीय की विजातीय असा प्रश्न आल्यास, या कंडिशनला फारसा अर्थ नाही. कोणत्या सिनारिओमधे अशी स्थिती येईल बरे?

नॉन अरेंज्डमधे तर प्रथम व्यक्ती पाहिली जाणार आणि मग जात पाहिली तर..

अरेंज्डमधे उतरंडीवरच्या आपल्या "वरच्या" आणि "खालच्या" फारतर एकेक सूक्ष्म फरक पातळीतलीच "विजातीय" स्थळे माहीत होण्याची शक्यता सध्याच्या सिस्टीममधे जास्त. ३०% लोकांचं असं म्हणणं आहे का, की सजातीय जोडीदार न पाहता किंवा आवर्जून अन्य जातीच्या विवाहमंडळात / वेबसाईटवर जाऊनच सर्च मारु?

सजातीयही पाहू, विजातीयही पाहू.. पण "प्राधान्य" विजातीयला.. हा विचारप्रवाह विस्कळित वाटतो आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Dec 2012 - 6:23 pm | प्रकाश घाटपांडे

सजातीयही पाहू, विजातीयही पाहू.. पण "प्राधान्य" विजातीयला.. हा विचारप्रवाह विस्कळित वाटतो आहे.

पुरोगामी चळवळींमधे एक वर्ग असाही आहे कि आपण जात मानीत नाही या गोष्टीचा आपल्या जीवनात प्रतिबिंबीत करणारा एक घटक म्हणून प्राधान्या ने म्हणा किंवा सजातीय नकोच असा आग्रह धरणारे लोक अल्प का होईना आहेत.

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 10:18 am | ऋषिकेश

सहमत आहे. मात्र असा वर्ग माझ्या अपेक्षेपेक्षा इथल्या सर्वेक्षणापुरता तरी अधिक निघाला.

बाकी, प्राधान्य म्हणजे समजा एखाद्या मुलीला दोन इतर अपेक्षित गुण असलेले मुलगे सांगून आले आहेत. अश्यावेळी जर इतर 'क्रायटेरिया'वरून फरक करता येत नसेल तर जातीवरून विचार करता विजातीय जोडिदाराला प्राधान्य दिले जाईल **(मला वैयक्तीकरित्या असे प्राधान्य एका अर्थी हे ही जात मानण्याचे / जातीवरून निर्णय घेण्याचे दुसरे टोक वाटते)**

बाळ सप्रे's picture

31 Dec 2012 - 2:16 pm | बाळ सप्रे

**(मला वैयक्तीकरित्या असे प्राधान्य एका अर्थी हे ही जात मानण्याचे / जातीवरून निर्णय घेण्याचे दुसरे टोक वाटते)**

अगदी असच वाटत.. म्हणूनच सर्वेक्षणाच्या धाग्यात हे प्रश्न योग्य वाटले नाहीत असे म्हटले होते..

रामदास's picture

27 Dec 2012 - 9:50 pm | रामदास

सर्वेक्षण करून त्याचा निकाल तयार करणार्‍या ऋषिकेश यांना सादर प्रणाम.

आनंदी गोपाळ's picture

27 Dec 2012 - 11:44 pm | आनंदी गोपाळ

http://www.misalpav.com/comment/444415#comment-444415 इथे आम्ही बरोबर बोल्लो होतो का?

१. रोटी व्यवहारात आजचा कोणताच शहरवासी जातपात पाळत नाही.

रोटी व्यवहारात जात तुलनेने कमी बघतात असे म्हणणे योग्य ठरावे. मात्र रोटी व्यवहारात अजूनही धर्माचा पगडा अधिक प्रमाणात दिसतो.

२. बेटी व्यवहारात तथाकथित उच्चशिक्षित व स्वतःस जातपात न पाळणारे लोकही कच खातात. विषेशतः धर्माच्या बाबतीत.

शिक्षणाच्या बाबतील सांगता येणार नाही कारण प्रतिसादकांचे शिक्षण विचारले नव्हते.
मात्र स्वत: जात मानणार्‍यांबाबत पुढील निरिक्षण काही प्रमाणात उपयुक्त ठरावे:

स्वतः सजातीय विवाह करूनही आंतरजातीय विवाहास अनुकूल असणार्‍यांचे प्रमाण एकूण संख्येच्या ६२% आहे, शिवाय स्वतः आंतरजातीय विवाह करून अपत्यांसही हरकत नसणारे एकूण संख्येच्या २४% आहेत. मात्र अशाही व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः जाती बाहेर लग्न केले आहे मात्र अपत्यांनी तसे करू नये असे वाटते आणि स्वतः सजातीय लग्न करून अपत्यांनीही तेच करावे असे वाटणारेही ९% व्यक्ती आहेत.

३. तरुणाईला शष्प फरक पडत नसतो. त्यांना वाट्टेल ते करून मोकळे होतात.

प्रतिसादकांची वये विचारली नव्हती. मात्र तरूणाईच काय अश्या वैअक्तिक निर्णयात कोणालाही शष्प फरक पडू नये, पण प्रत्यक्षात तो पडतो म्हणून तर जातीआधारीत वर्गीकरण अजूनही समाजमान्य आहे.

४. लोकांना कितीही समजावून सांगितले, की बाबाहो, २५ तारखे आधी 'चर्चा' करू नकाऽऽऽ तरीही ते करणारच!

:)No Comments ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Dec 2012 - 9:10 am | श्री गावसेना प्रमुख

ह्याने काय होनार मिपा चा टी आर पी वाढणार आहे काय?
प्रगतीशील किंवा आधुनीक, धर्म किंवा जात निरपे़क्ष आहोत किंवा तसे भासवण्यासाठी छे:आजही धर्माचा किंवा जातीचा पगडा भारतीय जनमाणसांवर पक्का आहे,

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 10:07 am | ऋषिकेश

ह्याने काय होणार? या प्रश्नाच्या उत्तरानेही काय होणार म्हणा? ;)
फक्त इतकेचे की कोणतेही टीआरपी वाढवणे, स्वत:ची कोणतीही सापेक्षता/निरपेक्षता दाखवणे/भासवणे वगैरे हेतू नव्हते.

नेत्रेश's picture

31 Dec 2012 - 1:34 pm | नेत्रेश

उत्तम प्रयत्न, तरीही अपुर्ण वाटतो.
विजातीय रोटी-बेटी व्यवहार हे बहुतांशी समान सामाजीक स्तर असलेल्या जातींमध्ये होताना दीसतात. संपुर्ण वेगळ्या सामाजीक स्तरांतील जातींनध्ये त्या प्रमाणात रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर जेवढे आंतर जातीय विवाह कोकणस्थ, देशस्थ, गौड व सारस्वतांमध्ये होतात व त्या समाजार स्विकारले जातात, तेवढे बम्हण आणी महार/मांग/भंगी/ईत्यादी मध्ये होत नाहीत, व तेवढ्या प्रमाणात त्या-त्या समा़जात स्विकारलेही जात नाहीत. म्हणुन आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहारांचा विदा अपुर्ण/फसवा वाटतो.
तसेच आंतरजातीय विवाहार उत्सुक्/तयार असणार्‍या उमेदवारांनाही आपला जोडीदार आपल्याच सामाजीक स्तरांतील जातीतला अपेक्षीत असावा.टोकाचे अंतर असलेल्या सामाजीक स्तरांतील जातीतला जोडीदार फारसा स्विकारला जाणार नाही.

आभ्यार. प्रयत्न अपुरा आहे हे लेखात लिहिले आहेच.
मुळात सँपल बेस बहुसमावेशक नाहि.

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:23 pm | बॅटमॅन

यावरून वाटतेय की सामाजिक/आर्थिक स्तराचे परिमाण त्या प्रश्नांत लावले असते तर मग कास्टिझम ऐवजी क्लासिझम किती पॉप्युलर आहे ह्याचा रोचक विदा मिळाला असता. आणि तो अजून कट्टर असला असता असे मला तरी वाट्टेय.

ऋषिकेश's picture

31 Dec 2012 - 2:26 pm | ऋषिकेश

ठराविअक कास्ट ही ठराविक क्लासमधील असते असा समज किती पॉप्युलर आहे हेही समजले असते ;)

बॅटमॅन's picture

31 Dec 2012 - 2:34 pm | बॅटमॅन

इन्डीड :)

अल्पसंख्य धर्मातील व्यक्तींना बहुसंख्यांपेक्षा येणार्‍या कॉलेचे प्रमाण ६६% ने कमी होते

यात काहीही आश्चर्य नाही. माझ्या कंपनीत (आयटी) असणारे मुसलमान दुपारच्या वेळेत मिटिंग रूम मध्ये जावून ग्रुप करून नमाज पढतात. माझी कंपनी तशी कर्मचाऱ्यांच्या हिताबद्दल जागरूक असल्याने परवानगी दिली जाते. पण ते फारच विचित्र वाटते. मी एक जण तोकड्या पॅन्ट, दाढी वाढवून व स्कल कॅप घालून येताना पाहीला. तर एक मुलगी पायघोळ काळा ड्रेस (हिजाब?) घालून येताना पाहीली. माझ्या आधीच्या कंपनी मधला एक जण दररोज नमाज पढायला दुपारी गायब व्हायचा ते दीड-दोन तास गायब आणि मग प्रोजेक्ट मॅनेजर त्याच्या नावाने शंख करायचा. धर्म ही एक खाजगी गोष्ट आहे हेच काही जणांना मान्य नसते. कोण ही असली थेरे चालवून घेईल?

ऋषिकेश's picture

1 Jan 2013 - 9:08 am | ऋषिकेश

माझी कंपनी तशी कर्मचाऱ्यांच्या हिताबद्दल जागरूक असल्याने परवानगी दिली जाते.

माझ्या अंदाजाप्रमाणे असे (धार्मिक गोष्टींच्या आड न येणे) कायद्याने बंधनकारक आहे, नाहितर कंपन्यांनी याला सुट दिली असती की नाहि शंका आहे.

धर्म ही एक खाजगी गोष्ट आहे हेच काही जणांना मान्य नसते

याच्याशी अगदी सहमत आहे. कित्येक जण दर शुक्रवारी दुपारी नमाज पढायला जातात ते दोन तासांनी उगवतात, दुसरे माझ्या माहितीतल्या काहि व्यक्ती अंगारकी, एकादशी वगैरेला निर्जळी उपवास करतात आणि दिवसभर दमलो रे बाबा, दमले गं बाई करत कामे करत नाहित. गणेशोत्सवात घरी गणपती आहे सांगून सकाळी स्वाईप करतात आणि घरी पळतात ते रात्री पुन्हा स्वाईप-आउट करायला येतात ;) दर गुरूवारी इस्कॉनला जायचे आहे म्हणून लवकर पळणारे काही आहेतच. तर नवरात्रीत नाईट शिफ्टला सरळ नकार देणारे कित्येक भेटतील.

थोडक्यात काय धर्म ही खाजगी बाब आहे हे अनेकांना कळत नाहि हेच खरे!

काळा पहाड's picture

2 Jan 2013 - 5:08 am | काळा पहाड

माझ्या अंदाजाप्रमाणे असे (धार्मिक गोष्टींच्या आड न येणे) कायद्याने बंधनकारक आहे, नाहितर कंपन्यांनी याला सुट दिली असती की नाहि शंका आहे.

मिटींग रूम मधे जाऊन नमाज पढण्याला आक्षेप घेणे हे "धार्मिक गोष्टींच्या आड येणे" या प्रकारात येत नाही. नाही तर महाआरती आणि ग्रेगरीयन चॅन्ट्स ऑफीस मध्ये करायच्या म्हटल्या तरी करता येतात. तर मग काम कधी करणार? आधीच भारतीय लोक ऑफीस मध्ये फारच टाइम पास करतात (मिपा वरचे हे प्रतिसाद ऑफीस व्यतिरिक्त वेळेत लिहिले आहेत याची नोंद घ्यावी). तो फेसबुक वर तासन तास घालवणे नावाचा प्रकार तर मुर्ख पणाचा आहे. असो. धार्मिक गोष्टी गेल्या तेल लावत. तुमचा धर्म, तुमची भाषा, तुमची वेषभूषा, तुमचे विचार घरी ठेवा आणि ऑफीसला या हे या प्रकारच्या लोकांना कळायला हवं. मिटींग मध्ये मराठी, हिंदी वा तामिळ मध्ये बोलू नये हे ही या लोकांना कुणीतरी सांगायला हवं. ९ तास म्हणजे ९ तास काम करायचं असतं हे ही लोकांना सांगायला हवं. तुम्ही म्हणता तसा कायदा आहे की नाही हे मला माहिती नाही, पण तसा असेल तर तो "always efficient" मल्टीनॅशनल कंपन्यांना लावू नये हे या फालतू सरकारला कळायला हवं.

अंगारकी, एकादशी, गणपती, इस्कॉन इ. इ.

हाच नियम यांना पण लागू करायला हवा. सार्वजनिक गणपती नावाचा हास्यस्पद प्रकार तर बंदच करायला हवा. त्यात फक्त असेच लोक सहभागी होतात ज्यांना १. काम नसतं किंवा २. परंपरे बद्दल उगीचच अभिमान असतो. तुम्ही म्हणताय तसं स्वाईप च प्रकरण खरच असेल तर प्रोजेक्ट मॅनेजर कशाला झक (पक्षी: मासे) मारायला ठेवलाय का?

यशोधरा's picture

1 Jan 2013 - 9:35 am | यशोधरा

अंगारकी, एकादशी वगैरेला निर्जळी उपवास करतात आणि दिवसभर दमलो रे बाबा, दमले गं बाई करत कामे करत नाहित. गणेशोत्सवात घरी गणपती आहे सांगून सकाळी स्वाईप करतात आणि घरी पळतात ते रात्री पुन्हा स्वाईप-आउट करायला येतात दर गुरूवारी इस्कॉनला जायचे आहे म्हणून लवकर पळणारे काही आहेतच. तर नवरात्रीत नाईट शिफ्टला सरळ नकार देणारे कित्येक भेटतील.

ही इतकी मस्त कंपनी कोणती आहे? नाव व्य नि केलं तरी चालेल, तिथेच नोकरीसाठी अर्ज पाठवावा म्हणते कारण आमच्या कंपनीत सुट्ट्याच नाय देत हो कोणतेही सण असले तरी, आणि स्वाईप करुन कामही करावं लागतं. नमाज पढता येऊ शकतो, त्यासाठी खास खोल्या उपलब्ध करुन दिलेल्या आहेत प्रत्येक मजल्यावर. ते असूदेत म्हणा.

काळा पहाड's picture

2 Jan 2013 - 5:20 am | काळा पहाड

अजून थोडे दिवस फक्त. US चे budget deficit (फेब २०१३), debt ceiling (मार्च २०१३) आणि फ्रेंच व इटालियन economy च्या बेल आउट चा प्रॉब्लेम आला की ही सगळी मेंढरं घरी जातील. मग तिथे नमाज पढू देत, नाही तर टाळ कुटू देत.

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 8:58 am | ऋषिकेश

अजून थोडे दिवस फक्त. US चे budget deficit (फेब २०१३), debt ceiling (मार्च २०१३) आणि फ्रेंच व इटालियन economy च्या बेल आउट चा प्रॉब्लेम आला की ही सगळी मेंढरं घरी जातील.

विशफुल थिंकिंग? ;)

काळा पहाड's picture

2 Jan 2013 - 12:20 pm | काळा पहाड

मी एक रिआलिस्ट (याला मराठीत काय म्हणतात बुवा?) आहे. आणि मला पाट्या टाकणार्‍यां बद्दल कमालीचा अनादर आहे.

काप, सहमतच आहे. माझे म्हणणे इतकेच आहे की जर नियम लावायचे तर ते सगळ्यांना नि:पक्षपतीपणे लावा. जर नमाजाला प्रत्येक मजल्यावर जागा मिळणार असेल आणि अगदी क्रिटीकल इश्श्यू सुरु असतानाही नमाज नाही पढला तर आकाश कोसळणार असेल आणि ते जर (बोटचेप्या प्रोजेक्ट मॅनेजरला) मान्य असेल, तर उद्या आरती न म्हटल्याने भूकंप येईल असं कोणी म्हटल्यास जर आक्षेप घेतला जाणार असेल तर तो काय म्हणून?

आजवर ३-४ मोठ्या कंपन्यांमधून मी कामे केली आहेत तिथे मी कुठेही नवरात्र, गणपती वा कोणत्याही तत्सम सणांना घाऊक रीत्या अशा सुट्ट्या मिळाल्याचे पाहिलेले नाही, किंवा वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे स्वाईप करुन निघून जाऊ शकतात हेही पाहिलेले नाही, ते तसेही शक्य नाही, कारण प्रोजेक्ट मॅनेजरने जरी दुर्लक्ष केले, किंवा त्याला बोलायची हिंमत नसेल, तरीही ते सिनिअर मॅनेजमेंटच्या लक्षात येईल आणि कारवाई होईल.

ऋ ह्यांची पोस्ट मला पटलेली नाही आणि उगाच स्वतःच्या धाग्याच्या समर्थनार्थ लिहायचे म्हणून लिहिलेली आहे हे माझे वैयक्तिक मत. असो.

काळा पहाड's picture

2 Jan 2013 - 12:18 pm | काळा पहाड

सहमत. आणि म्हणूनच मी मुसलमानांचे नाव घेतले. लार्जेस्ट मायनॉरिटी तेच तर आहेत. आणि त्यांच्या ह्या 'उद्द्योगी' विचारांमुळे मुसलमानांना नोकरी मिळण्यात अवघड जात असणार हे नक्की. हा फक्त एखाद्या व्यक्तीचा धर्मांध असण्याचा प्रश्न नाही. त्यात प्रॅक्टीकल आस्पेट्स पण असू शकतात हेच मला सांगायचं होतं. नोकरी देताना याचा पण विचार केला जात असणार आणि त्यात काहिही जातिवाचक नाही.