गोंय (गोवा) - पाटणें बीच - १

सोत्रि's picture
सोत्रि in भटकंती
20 Dec 2012 - 11:14 pm

गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!

पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स. त्यावेळी तिथूनच गोव्याचा आनंद घेणे चालू झाले होते. त्यावेळच्या भेटीत नुसते बीच बघत सुटणे झाले होते. तशीही पहिलीच ट्रीप असल्याने गोवा नेमकी काय चीज आहे ते कळायचे होते. कळंगुट, अंजुना, दोना पावला, मिरामार असे उत्तर गोव्यातले बीच एका मागोमाग एक फिरत बसलो होतो. त्यामुळे त्यावेळी गोवा बघितला पण अनुभवला नाही. त्यानंतरही बर्‍याच वेळा गोव्याला गेलो पण तेव्हाही गोवा बघितला, अनुभवला नाहीच. काही वर्षांपूर्वी काही मित्र सहकुटुंब गोव्याला गेलो होतो त्यावेळी पूर्ण वेळ कांदोळी बीचजवळ (Candolim beach) राहिलो होतो. त्यावेळी खर्‍या अर्थाने गोवा अनुभवला आणि खर्‍या अर्थाने गोवा कळला...

भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्‍या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्‍यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!

ह्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या पार्श्वमूमीवर, ह्या दिवाळीला गोव्याला जायचा प्लान करत होतो तेव्हा लक्षात आले की आतापर्यंत गोवा फक्त उत्तर गोवा आणि ओल्ड गोवा एवढाच बघितला होता. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातले, माझ्या आवडत्या गोंयचे, एक वेगळे रूप अनुभवायचे ठरवले. त्यानुसार मग अनवट बीचचा शोध चालू केला. अनवट अशासाठी की बीच जेवढा लोकप्रिय तेवढा गर्दीने भरलेला हे समीकरण इतक्या वेळच्या गोवा भेटीमुळे उलगडले होते. त्या शोधा-शोधी मध्ये मिळाला पाटणें बीच (Patnem beach). हा बीच इतका की दक्षिणेला आहे तिथून कारवार फक्त ३५-४० कि.मी. वर आहे. गोव्याच्या, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातील काणकोण (Canacona) नावाच्या तालुक्यातल्या प्रसिद्ध पाळोळें बीचजवळ (Palolem beach) असलेला हा पाटणें बीच एक नितांत सुंदर आणि अतिशय शांत बीच.

गूगलवर ह्या बीचचे फोटो बघितल्यावर, ट्रीपऍडवायझर.कॉम वर ह्या बीच जवळची हॉटेल्स शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बर्‍याच हॉटेल्सच्या जोडीने ह्या बीचबद्दल ही देशी – विदेशी लोकांची मते आणि अनुभव (Reviews) वाचायला मिळून ह्या बीचची केलेली निवड किती सार्थ आहे ह्याची खात्री पटली. शेवटी शोध पूर्ण झाल्यावर समुद्र किनार्‍यापासून २०० - २५० मीटर अंतरावर असणारे ‘सी व्ह्यू रिसॉर्ट’ राहण्यासाठी नक्की केले आणि बुकिंग करून टाकले.



आता जायचे कुठल्या मार्गाने हा प्रश्न आला. कारण ह्यापूर्वी गोव्याला जेव्हा जेव्हा जाणे झाले होते ते मुंबईवरून, पनवेल मार्गे कोंकणातून झाले होते. पुण्यावरून जायची ही पहिलीच वेळ. कोल्हापूर वरून बेळगाव मार्गे किंवा गडहिंग्लज – आजरा – आंबोली मार्गे असे दोन मार्ग होते. बरीच फोना-फोनी करून चौकशी केल्यावर कळले की बेळगाव गोवा मार्गावरचा रस्ता ठीक नाहीयेय. गडहिंग्लज – आजरा – आंबोली मध्ये काही काही पॅच खराब आहेत असेही कळले. बरेच कन्फ्युजन झाले की काय करायचे? नेमका निर्णय न झाल्याने किंवा करता न आल्याने शेवटी कोल्हापुराला पोहोचल्यावर बघू काय करायचे ते असे ठरवले.

शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुराला कूच केले. प्रत्येक टोल नाक्यावर राजसाहेबांची आठवण काढत, टोलच्या दिडक्या मोजत मोजत, कोल्हापुराला पोहोचलो. पोहोचे पर्यंत रात्र झाली होती आणि थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. रंकाळ्यापासून गगनबावड्याच्या दिशेनं साधारण ३-४ किमी वर असलेल्या राहुल डिलक्स नावाच्या एका हॉटेलात जाऊन गरमागरम तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पोटभर ओरपून थंडीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.

सकाळी लवकर उठून महालक्ष्मी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे असा बायकोचा फतवा निघाला. देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?” त्यावर त्याला, रांगेत उभे राहायचे नाही मागच्या बाजूने मुखदर्शन घेऊन निघायचे आणि आई देव म्हणून दर्शन घेईल, आपण देवळाची शिल्पकला आणि देवीचे शिल्प यांचे दर्शन घेऊ! असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले (आजच्या ह्या पिढीतील मुलांचे समाधान करता करता नाकी नऊ येतात हो!) आणि दर्शनाला निघालो. मुखदर्शन घेऊन झाल्यावर, आता कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला.

कोल्हापूर गोवा अंतर साधारण २४० किमी आहे असे गुंगाला मॅप दाखवत होता आणि कोल्हापूर बेळगाव हे अंतर ११० किमी. एक्सप्रेस हायवेने बेळगाव पर्यंतचे अंतर सव्वा तासात कापता येणार होते. त्यापुढे १३० साध्या रस्त्याने म्हणजे साधारण ३ तास असा हिशोब करून बेळगाव मार्गे जायचे ठरवले. पण आपण जेव्हा काही ठरवत असतो तेव्हा त्याच वेळेस नियतीही काहीतरी ठरवत असते आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते...

बेळगावाला जायचा एक्सप्रेस हायवे, चतुष्कोण योजनेतला एक हायवे, एकदम भन्नाट आहे. भन्नाट म्हणजे एकदम आऊट ऑफ द वर्ल्ड! आजूबाजूला दुतर्फा पसरलेली शेते, हिरवागार निसर्ग आणि त्यांच्या मधोमध पसरलेला भव्य एक्सप्रेस हायवे, बोले तो एकदम झक्कास! महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरलो आहोत ही जाणीव फक्त कन्नड भाषेतल्या पाट्या आणि मैलाचे दगड यांच्यावरूचच होत होती. प्लान केल्या प्रमाणे सव्वा तासाच्या आतच बेळगावाला पोहोचलो. बेळगावाला पोहोचलो आणि तिथून पुढे नियतीने काय ठरवले त्याची कल्पना यायला सुरुवात झाली. बेळगावातून गोव्याच्या राज्य महामार्गावर पोहोचे पर्यंत रस्ता एकदम गल्लीबोळातून जाणारा. ठीक आहे, हा गावातला रस्ता (पुणेरी माज हो, दुसरे काही नाही) आहे असे म्हणून मन शांत केले आणि मागच्या एका तासाचा भन्नाट ड्रायव्हिंगचा जोष कायम ठेवला. पुढे महामार्गावर लागल्यावर जे काही हाल झाले ते विचारु नका. कर्नाटक सरकाराने बहुतेक ठरवले असावे की कोणीही कन्नड माणसाने गोव्याला जायची हिंमत करू नये. अतिशय भंगार रस्ता. ठिकठिकाणी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशी अवस्था.

पण गंमत म्हणजे ‘गोवा आपले स्वागत करत आहे’ अशा आशयाची पाटी गोव्याच्या सरहद्दीवर दिसली आणि तिथून रस्ता एकदम चांगला, चकाचक, आपली पैसातै म्हणते तस्सा, हेमामालिनीचे गाल. पुढे फोंड्यामार्गे काणकोणला पोहोचायचे होते. फोंड्यापासून पुढे काणकोणला कसे जायचे तो रस्ता माहिती नव्हता. फोंड्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या उशीरामुळे मोबाइलच्या बॅटरीने नेमकी तेव्हाच मान टाकली आणि गूगल मॅप्स बंद झाले. मग GPS ऐवजी आपले भारतीय ‘JVS – जनता विचारपूस सिस्टिम’ उपयोगात आणून विचारत विचारत मार्गक्रमण सुरू केले. तिथे गोंयकरांचे कोंकणी उच्चार आणि माझे स्पेलिंगप्रमाणे केलेले उच्चार यांची एक जबरदस्त जुगलबंदी होऊन कोंकणी भाषेशी आणखीनं जवळीक निर्माण झाली. एका चौकात आता पुढे कसे जायचे हा प्रश्न आ वासून उभा राहिला असता एक इंग्रजी बोलणारे किरिस्ताव काका देवासारखे धावून आले आणि त्यांच्या गाडीची पाठ धरून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथून पुढे काणकोणचा रस्ता सरळ होता. संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाटणें गावात सी व्ह्यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. चेक इन चे सोपस्कार पार पाडून त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या हॉटेलात खादाडी केली, कोल्हापुराला चापलेल्या मिसळीनंतर जेवण केलेच नव्हते.

रूममध्ये सामान ठेवून झाल्या झाल्या लगेच बीचकडे धाव घेतली. पाटणें समुद्रकिनार्‍याचे हे विलोभनीय दृश्य नजरेला पडले आणि 6-7 तासांच्या भयाण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.

चपला बूट काढून थंड होत चाललेल्या पांढर्‍या शुभ्र वाळूमध्ये अनवाणी पायाने चालण्यातला आनंद घेत, समुद्राचा खारा वारा नाकात भरून घेत, समुद्राच्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत, जवळ जवळ निर्मनुष्य असलेल्या किनार्‍यावर रपेट मारत मारत काळोख पडू दिला. मग थंड वार्‍याला कवेत घेऊन, एका शॅक समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून पोटाला एका थंडगार बियरचे अर्ध्य देऊन, “लाडक्या गोंया, मी आलो आहे! इथून पुढच्या तीन रात्री तुझ्या सोबत असणार आहे”, असे हितगुज मी गोव्याबरोबर करत अजून एका बियरचा फडशा पाडला आणि जड पोटाने रिसॉर्टवर जायला निघालो.

(क्रमशः)

सुरुवातीची काही छायाचित्रे आंतरजालाहून साभार

गोवाकाणकोण

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

20 Dec 2012 - 11:27 pm | इष्टुर फाकडा

सोत्री, दुखर्या नसेवर बियर ठेवलीत कि हो. पालोलेम बीच आपला सगळ्यात आवडता !
फक्त निर्मनुष्य निसर्ग सौंदर्याची मजा घ्यायची असेल तर मात्र मी कोकणात जाणे पसंत करेन. गोव्यात जीवाचा गोवा करायलाच जावे असे आमचे पष्ट मत आहे.
(अर्थात, फ्यामिली बरोबर जाताना तुमचावाला पर्याय भन्नाट आहेच हे वे सां न ल)
पुभाप्र

रेवती's picture

21 Dec 2012 - 12:07 am | रेवती

वाचतिये.

भारी वर्णन.. आणखी येवूंद्यात...

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Dec 2012 - 8:43 am | घाशीराम कोतवाल १.२

वाचतोय आहे येउ द्या..

हा सोत्री लै चतुरस्त्र मनुक्ष हाय. तंत्रज्ञान, मद्य, चावडीवरल्या गप्पा, भटकंती अशा सर्वच विषयांवर प्रभावीपणे लिहू शकतो.

ह भ प's picture

21 Dec 2012 - 9:48 am | ह भ प

हॉटेलाच्या वेबाच्या पत्त्याचा दुवा देऊन आमची दुवा घेतलात सोत्रि..
बाकी तुमच्या कळफलकातून मिपावर जेजे उतरते ते फक्त भन्नाटच असते..
वल्लीशेठ सोबत अत्यंत सहमत..

स्पंदना's picture

21 Dec 2012 - 10:17 am | स्पंदना

आमी नाय जा! पैसाताईच्या गोव्याक चांगल म्हनता अन आमच्या करनाटक सरकारला वाईट? नाई बोलणार.

अर्धवटराव's picture

21 Dec 2012 - 10:44 am | अर्धवटराव

सोत्री.. बस्स नाम हि काफी है.

अर्धवटराव

सूड's picture

21 Dec 2012 - 11:32 am | सूड

सुंदर!! पुभाप्र !!

प्रीत-मोहर's picture

21 Dec 2012 - 11:42 am | प्रीत-मोहर

पाह्यलेस ना सोत्रि .. तुला सुद्धा अनुभव आलाच ना ? आमच्या गोव्यातले रस्ते म्हणजे रस्ते :)
आम्च्या गोव्यात सगळेच कशें ब्येश्ट!!! किदें म्हणता ज्योताय?

पैसा's picture

21 Dec 2012 - 7:30 pm | पैसा

सामकें!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2012 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा

:-)

प्यारे१'s picture

21 Dec 2012 - 5:02 pm | प्यारे१

ब्येष्ट सोत्रि सेठ...!

जबरा फटु, पेश्शल व ण्र न

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 5:36 pm | किसन शिंदे

अजुनपर्यंत एकदाही गेलो नसल्याने फक्त फोटोंवर समाधान मानतोय. स्साला आमचा गोवाला जायचा मुहूर्त कधी लागतोय कोण जाणे? :( आणि ह्या पैसातै पण बोलवत नाहीत तिकडे. ;)

वर्णन कडक!!

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

पैसा's picture

21 Dec 2012 - 7:34 pm | पैसा

मी मुळात रत्नागिरीकर आणि तू ठाण्याला बोलाव, म्हणजे शिक्का पक्काच होईल. नंतर जमलंच तर गोव्याला बोलावायचं बघू! :D

बाकी सोत्रिचा लेख म्हणजे चीज बडी है मस्त मस्त! फक्त गोव्यात आल्यावर त्याचा मोबाईल आणि ल्यापटॉप दोन्ही एकदम कसे बंद पडले याचं मला भयंकर कुतुहल आहे!! :D

दिपक.कुवेत's picture

23 Dec 2012 - 1:57 pm | दिपक.कुवेत

क्रमशः लवकर संपवा आणि लेखाची सांगता एक जबरदस्त कॉकटेलने करा त्या शिवाय काय गोव्याची झींग चढायची नाय!

कुटुंबवत्सल आणि कायकाय आहेस!

च्यायला, तरीच वाटलं तुझे माझ्या लेखानवर इतके मनसोक्त प्रतिसाद कसे येतात.

भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्‍या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्‍यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!

काय लिहलयस व्वा!

आणि हे

देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?

एकदम सही!

सोत्रि's picture

24 Dec 2012 - 12:37 pm | सोत्रि

धन्यवाद संजय!

गोवा आवडण्याचे मनातले भाव शब्दात उतरवाता आले आणी ते तुम्हालाही भावले ह्याचा आनंद आहे. गोंया आहेच तसा! :)

- (गोवाप्रेमी) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

24 Dec 2012 - 1:40 pm | संजय क्षीरसागर

टू टियर फर्स्टक्लासन दोन्ही वेळच रिझर्वेशन करून पहाटे गोव्याला उतरायच (साला, तो रेल्वेचा डबा जणू तुम्हाला रात्री कुशीत घेऊन जोजवतो). भर पहाटे स्टेशनवर हॉटेलची पिक-अप सर्विस तुमच्या नांवाचा बोर्ड घेऊन स्वागताला उभी असते. मागच्या वेळी बायकोला घेऊन हॉलिडे इनला गेलो होतो. गेल्यागेल्या सामान रूमवर टाकून स्ट्रेट समुद्रावर अनंत भटकायला जायच. कुठल्या तरी शॅकमधे दोन्-तीन कप चहा घ्यायचा. आल्यावर पूलमधे उतरून मनसोक्त पोहायच. मग ब्रेकफस्ट आणि नंतर प्ले एरियामधे जाऊन टेबलटेनीस. मग टब बाथ. नंतर अफलातून जेवण. ते झालं की निवांत झोप. संध्याकाळी मनसोक्त आतिषबाजी करून रंग आकाशी झाला की लाउंझमधल्या सिंथेसायजरवाल्या बरोबर समुद्रावरनं सरळ येणार्‍या वार्‍याच्या उन्मादात गाणी म्हणायची. मग भोजनानं काया तृप्ती झाली की समुद्रावर चक्कर. नंतर त्या प्रशस्त रूमच्या निरव शांततेत देह आरपार न्यायचे. मग सावकाश उठून रूममधल्या कॉफीमेकरनं तीन कप कॉफी करून दोघात घ्यायची. आणि सरते शेवटी हॉटेलनं समुद्रकिनार्‍यावर टाकलेल्या कोझी सोफ्यात, रात्री एक-दिडच्या सुमारास, त्या दिलकश चांदण्यात, समुद्राच्या साक्षीनं एकमेकात विरघळून जायचं.(त्यांची राउंड द क्लॉक, सराउंड सिक्युरिटी असते).. जन्नत!

मुक्ती's picture

25 Dec 2012 - 7:36 pm | मुक्ती

समुद्रकिनार्‍यावर टाकलेल्या कोझी सोफ्यात, रात्री एक-दिडच्या सुमारास, त्या दिलकश चांदण्यात, समुद्राच्या साक्षीनं एकमेकात विरघळून जायचं.

सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याबद्दल पोलीसदादा धरतील नाय काय? ते वायलं, सेक्युरिटीला फुकट करमणूक कशापायी? आणि त्या तुमच्याबरोबरच्या माऊलीचं काय हो?

संजय क्षीरसागर's picture

25 Dec 2012 - 10:19 pm | संजय क्षीरसागर

सिक्युरिटी दूर असते आणि प्रणयाची मजा एकतर्फी नसते, मावशी

रणजित चितळे's picture

24 Dec 2012 - 2:06 pm | रणजित चितळे

मला गोव्याची ती वेगवेगळी नाव भारी आवडतात. ह्या लेखावरून मागे एकदा गोव्याचा इतिहास (पोर्तूगीजांचा छळ) वाचलेला आठवला

मनराव's picture

24 Dec 2012 - 6:45 pm | मनराव

लै भारी.........वाचतोय....
(गोवा एकदाच अनुभवलेला) मनराव..

पाषाणभेद's picture

24 Dec 2012 - 10:17 pm | पाषाणभेद

मजा केलीस भावा.

हिरवळ's picture

26 Dec 2012 - 1:03 am | हिरवळ

फारच छान लेख. हेवा वाटला तुमचा. आयुष्य हे असेच भरभरुन जगावे... मी अनेकदा गोव्याला गेले आहे, पण प्रत्येक वेळी शान्तदुर्गा आणि मंगेशी देवळां व्यतिरीक्त काहिच पाहिले नाही. ते आमचे कुलदॅवत असल्याने तिथे आई बाबा न चुकता नेत. बघुया आता कधी गोवा खर्‍या अर्थाने पाहण्याचा योग येतो ते....

मित्रहो's picture

19 Dec 2021 - 10:38 am | मित्रहो

पाटणे बीच चे मस्त वर्णन. नुकताच काणकोण आणि पाळोळे(Palolem) बीचला जाऊन आलो. अजूनही हा परिसर तितकाच सुंदर आहे.

Bhakti's picture

19 Dec 2021 - 5:15 pm | Bhakti

मस्त!

जेम्स वांड's picture

23 Dec 2021 - 9:25 am | जेम्स वांड

किमान नॉर्थ गोवा तरी. हल्लीच एका कामानिमित्त आठवडाभर गोव्याला राहून आलो, नोव्हेंबर महिन्यात, वारेमाप लुटालूट सुरू होती नॉर्थ गोवा, चद्दरपलटू वाटावी असली हॉटेलं दिवसाला अडीच हजार भावाने सुरू होती. बाघा बीचवर एका शॅकला टेकलो, तिथं गोव्याला लाजवेल असं बिअर १५० ला एक, इतर ड्रिंक अन कॉकटेल असली का आमच्या सीईओनं पण दहावेळा खिसा चाचपून पहावा.

खायला म्हणलं लोकल काहीतरी मागवावे, चिल्ड बिअर सोबत चिकन कॅफ्रियल मागवलं तर ते आठ तुकडे चिकन असणारं दिव्य कॅफ्रियल रुपये ११०० फक्तला बोडक्यावर बसलं, त्याला म्हणलं स्पेशल काय तर म्हणे शिजवताना ओल्डमोंक टाकली आहे, म्हणलं ओल्ड मोंक खंबा पण ५४०ला आहे अन तू त्यातही चमचाभर टाकलं असशील, परत चव म्हणावी तर चिली चिकनपेक्षा काहीही वेगळं लागलं नाही चवीला, फक्त रंगाने हिरवं, थोबाडीत मारल्यागत बिल चुकतं करून बाहेर पडलो च्यामारी तिथून.