पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचण्याच्या खोडीचे - म्हणजे ब्लर्बवरचा मजकूर, प्रकाशनवर्ष, लेखकाचे चार शब्द, अर्पणपत्रिका, आवृत्त्यांची संख्या आणि दोन लगतच्या आवृत्तींमधली वर्षं इत्यादींपासून वाचनाला सुरुवात करण्याच्या सवयीचे - काही अनपेक्षित फायदे कधी कधी पदरात पडतात. 'रायटिंग, नॉट द रायटर' हे सूत्र मान्य करूनही 'आज उदाहरणार्थ पंचविशीचा' असणार्या पांडुरंग सांगवीकराबद्दल लिहिताना नेमाडेही त्यांच्या पंचविशीत होते ही बाब किंवा 'द इडियट'च्या अर्पणपत्रिकेत दस्तायेवस्कीने आपल्या दगावलेल्या कन्येबद्दल व्यक्त केलेला मूक शोक - हे त्या त्या पुस्तकवाचनाच्या अनुभवापासून वेगळे काढता येत नाहीत.
कधी कधी मात्र पुस्तकाशी थेट संबंध नसणारी रोचक बाब नजरेसमोर येते. ओरहान पामुक ह्या नोबेल पारितोषिकविजेत्या तुर्की लेखकाचे 'माय नेम इज रेड' हे पुस्तक जेव्हा असंच अथपासून वाचायला सुरुवात केली; तेव्हा त्या पुस्तकाच्या मूळ तुर्की नावाने - Benim Adım Kırmızı - लक्ष वेधून घेतलं. किरमिजी हा मराठी शब्द तुर्की भाषेत सापडेल अशी अपेक्षाच नव्हती. अरेबिक व/वा फारसीचा हा दोन्ही भाषांवरील सामायिक प्रभाव असावा, अशी अटकळ मनाशी बांधून पुढे गेलो.
या वर्षी तुर्कस्थानात जायचा योग आला, तेव्हा असे अनेक परिचित शब्द सापडले. हवा, साहिल, हयात, एवला (evliya = अवलिया), जानम, हैसियत, तोप, सराई, कदर, जेप (जेब), शल्गम, मक्ता, शिकायत, मशहूर, जान, फतेह, मुराद, तरफ, आरजू, शहर, देहलीज, किमया (= रसायन), आईना, गुल, जमात, तर्जुमा असे कितीतरी.
'दिक्कत'चा अर्थ 'सावधान, लक्ष असू द्या'. हा अर्थ हिंदीपेक्षा मराठी दिक्कतला (बिन-दिक्कत) अधिक जवळचा. स्वयंपाकघराला समानार्थी शब्द mutfak हाही मुदपाक(खाना) म्हणून हिंदीपेक्षा मराठीत अधिक रुजलेला.
इथे मुहब्बत म्हणजे जिव्हाळा. प्रेमासाठी 'अश्क' हा शब्द रूढ आहे. (तुर्कीच्याच भाषाकुटुंबात असणार्या तुर्कमेनीस्थानची राजधानी 'अश्काबाद' अर्थात प्रेमनगर हे नाव मिरवते).
. . .
शब्दांची ही देवाण-घेवाण जरी बव्हंशी दोन्ही दिशांनी होत असली, तरी नीट निरखून पाहिलं तर त्यातही एक विशिष्ट घटनाक्रम ध्यानी येतो. जेते आपली संस्कृती जितांवर कायमच लादत आलेले आहेत. बर्याचदा प्रत्यक्ष सत्तेपेक्षाही जेत्यांच्या संस्कृतीच्या 'सॉफ्ट पॉवर' पकडीतून निसटणं अधिक अवघड असतं.
इतिहासात याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात. १०६६ मध्ये नॉर्मन आणि फ्रेंचांनी इंग्लंडवर आपलं राज्य प्रस्थापित केल्यानंतर फ्रेंच ही तिथली राजभाषा झाली. अनेक फ्रेंच शब्दांचा जुन्या इंग्लिशमध्ये शिरकाव झाला. थेट चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ही स्थिती कायम होती. पुढे वारसाहक्क आणि इतर कारणांमुळे शंभराहून अधिक वर्षं ह्या दोन देशांत लढाया चालू राहिल्या. परिणामी राष्ट्रीय अस्मितांनी पुन्हा उचल खाल्ली आणि इंग्लंडमधला फ्रेंचचा प्रभाव ओसरला. याच काळात, लॅटिन आणि फ्रेंचच्या प्रभावातून बाहेर पडून तत्कालीन लोकभाषा असणार्या मिडल इंग्लिशमध्ये 'कँटरबरी टेल्स'सारखी साहित्यकृती रचणारा चॉसर म्हणूनच इंग्रजी साहित्याचा जनक म्हणून ओळखला जातो.
बरोबर साडेचारशे वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती युरोपच्या दुसर्या टोकाला झाली. इ.स. १३६२ साली इंग्लिश संसदेने न्यायनिवाड्याचे काम फ्रेंचऐवजी इंग्रजीत होईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला (स्टॅच्युट ऑफ प्लिडिंग), तर १८१२ मध्ये नेपोलियनच्या फसलेल्या रशियन मोहीमेने फ्रेंचचा रशियन उमराव वर्गावरील प्रभाव संपुष्टात आणला. 'वॉर अँड पीस' ह्या जगड्व्याळ पुस्तकात टॉलस्टॉयने हे भाषिक बदल बारकाईने टिपले आहेत.
आजच्या घडीला अर्थातच इंग्रजीने फ्रेंचची जागा घेतली आहे. निव्वळ शब्दच नव्हे, तर इंग्रजी वाक्यरचनेतल्या लकबीही अनेक भाषांत जशाच्या तशा स्वीकारल्या जात आहेत (अँग्लिसिझम). 'माझी मदत/मदद कर' सारखी उदाहरणे मराठीतही दिसतात. अर्थात खुद्द ब्रिटिशांनाही त्यांच्या देशात रूढ होऊ लागलेले अमेरिकनिझम्स आता भेडसावू लागले आहेत, हा भाग निराळा.
. . .
युरोप आणि आशिया खंडांना जोडणार्या तुर्कस्थानच्या भाषेत आणि संस्कृतीत अर्थातच ही भाषिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण स्पष्टपणे दिसून येते. शिवाय तुर्की भाषेत सध्या प्रचलित असलेला शब्द मूळचा कुठल्या भाषेतला यावरूनही त्याच्या तुर्की-प्रवेश-काळाबद्दल काही आडाखे बांधता येतात. एका अर्थी, खिलाफत आणि ऑटोमन साम्राज्याच्या उदयाचे, प्रगतीचे आणि अस्ताचे प्रतिबिंब भाषेतही उमटले आहे, असं म्हणायला हरकत नसावी.
पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या 'किरमिजी' शब्दाची व्युत्पत्ती आणि प्रवास मोठा रोचक आहे. याचे मूळ संस्कृतात. एका विशिष्ट प्रकारच्या कीटकांपासून लाल रंगाची ही गहिरी छटा मिळवत असत म्हणून प्रचलित झालेल्या संस्कृत कृमि-ज (कीटकांपासून जन्मलेला/मिळवलेला)चे अरेबिकमध्ये किरमिझ (qirmiz) झाले. बहुतेक आठव्या शतकानंतर मूर आक्रमकांबरोबर हा शब्द स्पेनमध्ये पोचला (carmesí) आणि यथावकाश इंग्रजीत Crimson म्हणून स्थिरावला.
वर म्हटल्याप्रमाणे, किरमिजी शब्दाचा भारत --> अरबस्थान --> युरोप हा प्रवास तत्कालीन आर्थिक आणि राजकीय सत्तेची उतरंड यांच्यात परस्परसंबंध पाहण्यासाठी थोडी इतिहासाची उजळणी करणे योग्य ठरेल. प्रेषित मोहम्मदाच्या काळात आणि त्यानंतर ज्या वेगाने इस्लामी सत्तेचा युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशिया खंडांत विस्तार झाला तो अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत - म्हणजे मोहम्मदाच्या मृत्यूनंतर जेमतेम शंभर वर्षांच्या आत - उमय्याद खिलाफतीत स्पेनपासून सिंधपर्यंतच्या विशाल भूभागाचा समावेश होत होता. पुढे तेराव्या शतकात तातार टोळ्यांनी इस्लाम अंगीकारल्यावर रशिया आणि पूर्व युरोपाचा मोठा भाग मुस्लिम अंमलाखाली आला.
भारतात आणि चीनमध्ये लागलेले अनेक शोध अरबांमार्फतच अजूनही बव्हंशी मध्ययुगात चाचपडत असलेल्या युरोपात पोचले. कागद तयार करण्याचे तंत्र आणि लाकडी ठोकळे वापरून छपाई करण्याची पद्धत चीनमधून आणि दशमान पद्धती व आकडे भारतातून; अरबस्थानमार्गे युरोपात पोचले. (अजूनही पाश्चात्य परिभाषेत त्यांना 'अरेबिक न्यूमरल्स' हीच संज्ञा आहे) याशिवाय आफ्रिकेतून होणारा गुलामांचा व्यापार ('स्वाहिली' हा शब्द मूळ अरेबिक सवाहिल = किनार्याजवळ राहणारे लोक - वरून आला आहे. उर्दूत तोच 'साहिल' होऊन येतो), आशिया व युरोप खंडाशी होणारा मसाले, रेशीम आणि कॉफीचा व्यापारही त्यांच्याच ताब्यात होता.
परिणामी फारसी, तुर्की आणि भारतीय भाषांत अरेबिक शब्द आढळणे साहजिकच आहे. आयबेरियन द्वीपकल्पावर (स्पेन आणि पोर्तुगलचा एकत्रित भूभाग) इ.स. ७११ ते १४९२ इतकी प्रदीर्घ काळ अरबांची सत्ता असल्याने निव्वळ स्पॅनिश भाषेवरच नव्हे; तर तत्कालीन स्थापत्य, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरही मूर संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. 'किरमिजी' शब्दाचा प्रवास हे त्याचंच एक प्रतीकात्मक उदाहरण.
. . .
मंगोल टोळ्यांचे आक्रमण, अंतर्गत दुफळी, नाविक सामर्थ्याकडे केलेले दुर्लक्ष, दस्तऐवजीकरण आणि परदेशात दूतावास राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे केलेला कानाडोळा, शेजारच्या संस्कृतींकडून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची न दाखवलेली मनोवृत्ती, कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे पश्चिम युरोपाकडे वळलेल्या ग्रीक विद्वान, कलाकार आणि वैज्ञानिकांनी रचलेला रेनेसान्सचा पाया, स्पेन आणि पूर्व युरोपातील नागरिकांनी केलेले यशस्वी उठाव - या आणि इतर अनेक कारणांनी ऑटोमन आणि खिलाफत साम्राज्यांची पीछेहाट होऊ लागली. वास्को द गामाने भारताकडे यायचा शोधलेला समुद्रमार्ग; अमेरिकेच्या शोधामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे युरोपियन देशांसाठी खुले झालेले मोठे भांडार या कारणांचीही त्यात भर पडली.
सतराव्या शतकात एकापाठोपाठ अनेक पराभव स्वीकारावे लागलेल्या तुर्कांनी पुन्हा एकदा व्हिएन्नावर आक्रमणाचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याची परिणती दारूण पराभवात झाली. व्हिएन्ना राहिलेच, पण दीडशे वर्षं ताब्यात असणार्या हंगेरीवरही त्यांना पाणी सोडावे लागले. याच सुमारास इंग्लंड आणि फ्रान्स तर सोडाच, पण नेदरलँड्स आणि बेल्जियमसारख्या लहान राष्ट्रांनीही व्यापाराच्या नावाखाली आशियात आणि आफ्रिकेत आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. प्रत्यक्ष रणांगणातील पराभवापेक्षा ही आर्थिक आणि राजकीय पीछेहाट इस्लामी सत्तांच्या अस्ताचे प्रमुख कारण ठरले.
. . .
भाषेचा - पर्यायाने शब्दांचा - एखाद्या समाजाच्या प्रगती आणि अवनतीशी असलेला जवळचा संबंध या पडत्या काळातही दिसून येतो. शब्दांचा आणि नवीन कल्पनांच्या प्रवाहाची दिशा बदलून आता पश्चिमेकडून पूर्वेकडे झाली. १७८९ मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा या बदलातला एक मोठा टप्पा. त्यातून पुढे आलेल्या संकल्पनांचा 'तरूण तुर्कांच्या' चळवळीने मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. तोच वारसा पुढे नेत केमाल अतातुर्क पाशाने तुर्कस्थानला आधुनिक युगात आणण्यासाठी जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले.
'अतातुर्कचे आधुनिक तुर्कस्थानाच्या जडणघडणीतले योगदान' हा फार मोठा विषय आहे. पण निव्वळ भाषिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुर्की भाषेची अरेबिकवर आधारित असणारी रूढ लिपी रद्दबातल करून त्याने त्याऐवजी लॅटिन लिपी आणली. भाषेतली अरेबिक आणि फारसी शब्दांची सरमिसळ कमी केली आणि ज्या संकल्पनांना तुर्कीत प्रचलित शब्दच नव्हते, त्या शब्दांसाठी फ्रेंचचा आश्रय घेतला. भारतीय भाषांप्रमाणेच तुर्की भाषेतही उच्चारानुसारी लेखन होत असल्याने फ्रेंच शब्दांची आयात करताना त्यांचे स्पेलिंग उच्चाराप्रमाणेच होईल याची दक्षता घेण्यात आली. वानगीदाखल सांगायचं तर चॅम्पियन ह्या शब्दाचा फ्रेंच उच्चार 'शॉम्पियाँ'च्या जवळ जाणारा होत असल्याने तुर्कीत त्याचे स्पेलिंग şampiyon (ş = उच्चारी 'श') असे केले गेले.
'पार्लमेंट'सारख्या शब्दांची फ्रेंचमधून तुर्की आणि अरेबिकमध्ये (अरेबिकमध्ये 'प' नसल्याने या शब्दाचा उच्चार 'बर्लमान' असा होतो) आयात हे 'किरमिजी' शब्दाच्या प्रवासाच्या विरूद्ध दिशेने झालेल्या सांस्कृतिक बदलाचे ढोबळ उदाहरण झाले.
सकृद्दर्शनी स्वतंत्र वाटणारा पण अशाच आयात केलेल्या अनुवादाच्या प्रकाराला इंग्रजीत कॅल्क (Calque) अशी संज्ञा आहे. यात शब्द परभाषेतून जसाच्या तसा न आणता; तो शब्द ज्या मूळ धातूपासून वा शब्दापासून उगम पावला आहे त्या स्रोताचाच अनुवाद केला जातो.
उदा. इंग्रजीतल्या electricity ह्या शब्दाचे मूळ 'अॅम्बरपासून बनलेला' या अर्थाच्या ग्रीक शब्दात आहे. (ग्रीकमध्ये elektron म्हणजे अॅम्बर). अरेबिकमध्ये electricity हा शब्द जसाच्या तसा न जाता अॅम्बर --> अॅम्बरपासून बनलेला अशा आडवाटेने गेला आहे (كهرباء - कॅहरबा). प्रशासन, क्रांती, राष्ट्र (देश नव्हे) अशा अनेक संकल्पनांसाठीचे प्रतिशब्द अशाच मार्गाने अरेबिक व तुर्की भाषेत आले आहेत.[१] काही शतकांपूर्वीचा अरेबिकचा स्पॅनिश आणि पर्यायाने इतर युरोपियन भाषांवर पडलेला प्रभाव लक्षात घेता, अलीकडचा हा विरोधाभास लक्षणीय आहे.
. . .
तीन खंडांत पसरलेले वैभवशाली साम्राज्य; पहिल्या महायुद्धात फाळणीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेले, 'द सिक मॅन ऑफ युरोप' म्हणून हिणवले गेलेले राष्ट्र; केमाल अतातुर्कच्या दूरदृष्टी आणि धाडसी बदलांमुळे मुस्लिम बहुसंख्य असूनही एक निधर्मी देश म्हणून केलेली वाटचाल आणि गेल्या दशकात धार्मिकदृष्ट्या उजवीकडे झुकणार्या नेतृत्वाखाली केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे आलेला आत्मविश्वास अशा तुर्कस्थानच्या निरनिराळ्या 'चक्रनेमिक्रमेण' अवस्थांचे प्रतिबिंब काही प्रमाणात तुर्की भाषेतही पडलेले दिसून येते. त्यातल्या दोन परस्परविरोधी प्रवाहांचा छोटेखानी मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
. . .
संदर्भ -
[१] व्हॉट वेन्ट राँग?: द क्लॅश बिटवीन इस्लाम अँड मॉडर्निटी इन द मिडल इस्ट - बर्नार्ड लुईस
[२] व्हाय इज द अरब वर्ल्ड सो इझिली ऑफेंडेड - वॉशिंग्टन पोस्ट
[३] लेखाचे शीर्षक मर्ढेकरांच्या 'अब्द अब्द मनी येते' ह्या कवितेतून साभार.
[४] छायाचित्रांचे प्रताधिकार लेखकास्वाधीन. (श्रेयअव्हेरः कोरा नकाशा आंतरजालावरून साभार)
प्रतिक्रिया
27 Sep 2012 - 10:47 pm | श्रावण मोडक
भाषाभगिनींच्या नात्याचे काही पदर उलगडून दाखवणारा चांगला लेख.
27 Sep 2012 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अशी भाषिक सरमिसळ रंजक आहे. नवीन भाषा शिकताना ओळखीचे वाटणारे शब्द थोड्या वेगळ्या रूपात दिसले की गंमत वाटते. खरंतर शिकताना वेळ जास्तच लागतो, पण मजाही तेवढीच येते. आपण वेगळी ओळख, संस्कृती जपण्याच्या हट्टापायी जगापासून वेगळं राहिल्यास सांस्कृतिक ठेवा(सुद्धा) किती मर्यादित राहू शकतो हे अशा प्रकारच्या लेखनातून निश्चितच समजतं. देशाटन करताना असंही शिक्षण होऊ शकतं हे सांगण्याबद्दल नंदनचे आभार.
सामान्यांच्या तुर्कस्तानाचे फोटोही आवडले. (खरंतर गोग्गोड, "डेस्कटॉपी" फोटो पाहण्यापेक्षा असे फोटोच अधिक आवडतात.)
28 Sep 2012 - 12:04 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
29 Sep 2012 - 10:19 am | प्रदीप
"आपण वेगळी ओळख, संस्कृती जपण्याच्या हट्टापायी जगापासून वेगळं राहिल्यास सांस्कृतिक ठेवा(सुद्धा) किती मर्यादित राहू शकतो " - लेखात एका विशीष्ट संस्कृतिच्या संदर्भात हे म्हटले गेले आहे, व त्या संदर्भात ते खरे आहे. पण हा सर्वसामान्य नियम आहे, असे म्हणतांना चीन व जपान ह्या, जगाशी शतकांनू शतके फटकून राहूनही स्वतःची संस्कृति, भाषा व्यवस्थित टिकवून धरणार्य देशांचा विचार व्हावा!
27 Sep 2012 - 11:01 pm | रेवती
या लेखातलं काय काय जास्त आवडलं असं सांगता येणार नाही. सगळच आवडलं पण भाषेतील साधर्म्य शोधणं हे सगळ्यांना आवडतं. एकंदरीतच तुझे लेख वाचणं म्हणजे मेजवानी.
27 Sep 2012 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते
अत्यंत आवडत्या विषयावरचा लेख अतिशय आवडला आहे. धन्यवाद शेठ!
28 Sep 2012 - 12:00 am | विकास
>>>दोन परस्परविरोधी प्रवाहांचा छोटेखानी मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न.<<<
एकदम मस्त आणि माहितीपूर्ण!
>>>मंगोल टोळ्यांचे आक्रमण, अंतर्गत दुफळी, नाविक सामर्थ्याकडे केलेले दुर्लक्ष, दस्तऐवजीकरण आणि परदेशात दूतावास राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे केलेला कानाडोळा, शेजारच्या संस्कृतींकडून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची न दाखवलेली मनोवृत्ती, <<<
हे वाचताना मला आधी वाटले की तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांबाबत लिहीत तर नाही आहे ना हा! :-) ( आणि त्यावरून सावरकरांचा सात बंद्यावरील कोरडे ओढणारा लेख आठवला)
28 Sep 2012 - 12:16 am | गणपा
छान झालाय लेख नंदन.
28 Sep 2012 - 12:40 am | मन१
इतक्या सविस्तरपणे एखादी गोष्ट मांडायची, ती वाचताना सोपीही ठेवायची, आणि त्यातले मूल्य तर ढळू द्यायचे नाही हे कर्मकठीण आहे.
असे जमलेच कसे हे पाहून थक्क व्हायला होते आहे.
अवांतरः-
>>>मंगोल टोळ्यांचे आक्रमण, अंतर्गत दुफळी, नाविक सामर्थ्याकडे केलेले दुर्लक्ष, दस्तऐवजीकरण आणि परदेशात दूतावास राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे केलेला कानाडोळा, शेजारच्या संस्कृतींकडून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची न दाखवलेली मनोवृत्ती, <<<
ह्याबद्दल विकासरावांशी सहमत ;)
मलाही अगदि तस्सच वाटलं.
28 Sep 2012 - 1:55 am | पिवळा डांबिस
रोचक विषयावरचा सुरेख लेख.
आणि तो सोपा ठेवल्याबद्दल तुम्हाला किरमिजी साफा आणि हुर्मुजी घोडा अर्पण!!!
:)
28 Sep 2012 - 1:57 am | धनंजय
तुर्कस्तान मोहिमेतील मिळकत मित्रांमध्ये अशीच लुटायची!
लेख आवडला.
29 Sep 2012 - 10:21 am | प्रदीप
अगदी, अगदी!
अत्यंत माहितीपूर्ण लेख; आवडला.
28 Sep 2012 - 2:09 am | पुष्करिणी
अतिशय आवडला लेख.
28 Sep 2012 - 7:02 pm | चित्रा
लेख अतिशय आवडला, असेच.
नवीन ठिकाणी जाताना अशी दृष्टी घेऊन जाणारे विरळाच.
28 Sep 2012 - 2:18 am | बॅटमॅन
किर्मिजी, मुदपाक, स्वाहिली वगैरे शब्दांचा इतिहास लै आवडला. किर्मिजी थोडा माहिती होता, पण मुदपाक आणि स्वाहिली लैच भारी. तुर्कीपेक्षा अर्थात अरब एक्स्पान्शनला या शब्दांच्या प्रसाराचे श्रेय जाते. लेखात म्हटल्याप्रमाणेच तुर्कस्तानावर तुर्कांची सत्ता होती चेंगीजोत्तर काळापासून, पण तुर्कीमध्ये इतकी अरब भेसळ झाली की मूळ मंगोल भाग कितपत राहिला असावा शंकाच आहे.
नकाशा अन फोटोजमुळे लेखाला एक वेगळी क्लॅरिटी आली आहे. आशिया व युरोप यांच्या तौलनिक उदाहरणांनी विषय समजावयास खूप मदत होते.
हा लेख अगदी माबोवरील चिनूक्स पद्धतीचा वाटला. दंडवत स्वीकारा _/\_
पण हुर्मुजी शब्दाचा अर्थ तो काही सांगितला नाहीत :)
रच्याकने:
१. हा लेख अगदी माबोवरील चिनूक्स पद्धतीचा वाटला. दंडवत स्वीकारा _/\_
२. पण हुर्मुजी शब्दाचा अर्थ तो काही सांगितला नाहीत :)
28 Sep 2012 - 2:19 am | बॅटमॅन
अरब भेसळ अॅज इन अर्स्टव्हाईल जेत्यांची अवशिष्ट सॉफ्ट पॉवर.
28 Sep 2012 - 4:09 am | बहुगुणी
प्रत्येक वाक्य चवी-चवीने वाचावं इतका सुंदर लेख, धन्यवाद!
इतके चांगले लेख येताहेत, की 'श्री गणेश लेखमाला' ही कायमस्वरूपी feature करावी असा संपादकांना आग्रह करायचा मोह होतो आहे. (दुसर्या रुपात का होईना, 'पाहूणे संपादकीय' परत आले असं वाटलं!)
{कदाचित अवांतर वाटेल, पण 'soft power' चा उल्लेख आणि त्या दुव्यावरचं विश्लेषण [ability to attract and co-opt rather than coerce ...using force or money as a means of persuasion] वाचून आजच वाचलेलं एक वृत्त आठवलं; एका अनोळखी शीख तरूणीचा दुसर्या एका परदेशी तरूणाने तिच्या नकळत फोटो काढून तिच्यावर अविचारीपणे केलेल्या सार्वजनिक टिप्पणीनंतर तिने न चिडता त्याला संयमाने जे उत्तर दिलं, त्याचा परिपाक म्हणून त्या तरूणाने तिची आणि शीख समाजाची जाहीर क्षमा मागितली. [Balpreet: I'm sorry for being a closed minded individual. You are a much better person than I am.
Sikhs: I'm sorry for insulting your culture and way of life....I've read more about the Sikh faith and it was actually really interesting. It makes a whole lot of sense to work on having a legacy and not worrying about what you look like. I made that post for stupid internet points and I was ignorant.]
त्या बलप्रीत या तरूणीच्या संयमित प्रतिक्रियेचं कौतुक करतांना त्या धाग्यावर मोठ्या संख्येने आलेल्या प्रतिक्रियांमधून शीख चालीरीतींबद्दल काहीही माहीत नसलेल्या अनेक प्रतिसादकांनी 'आम्हाला शीख समाजाविषयी आता आदर वाटतो' हे नमूद केलं आहे. Ability to reason with dignity, rather than using force as a means of persuasion हेही सॉफ्ट पॉवरचंच उदाहरण आहे असं मी म्हणेन.}
28 Sep 2012 - 8:19 am | मन१
इतका संयत प्रतिसाद, तोही स्वतःच्या दिसण्याबद्दल थेट गेलेल्या गोष्टीला.
आपण तर फ्यान झालो त्या पोरीचे.
सर्वांनी अवश्य वाचावा असा तो दुवा.
बहुगुणी अशा अजून कुथ कुठ्लया बहुगुणी गोष्टी तुमच्या पोतडित असतील तर येउ द्यात.
28 Sep 2012 - 4:10 pm | सहज
नेहमी प्रमाणे बहुगुणी यांचा माहितीपूर्ण वाचनीय प्रतिसाद .
29 Sep 2012 - 10:30 am | प्रदीप
आवडला.
28 Sep 2012 - 4:12 pm | चतुरंग
प्रतिसाद सुंदर. सॉफ्टपॉवरचे चपखल उदाहरण आवडले.
28 Sep 2012 - 6:14 am | यशोधरा
नंदन, सुरेख लिहिलंस. आवडलं.
28 Sep 2012 - 6:22 am | प्रचेतस
फॅन्टास्टिक लिहिलंय.
28 Sep 2012 - 6:49 am | चतुरंग
ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ देत देत भाषांमधल्या देवाणघेवाणी बद्दल इतक्या ओघवत्या रसाळ भाषेतले आणि तरिही सहजसुंदर सोपे लेखन वाचताना कमालीचा खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारा मधाळ बकलावा खाल्ल्यासारखं वाटलं! :)
मी मध्यंतरी तुर्की एअरलाईन्सने प्रवास केला त्यावेळी 'तुर्क हवा योल्लारी' हे त्या एअरलाईनचे नाव वाचनात आले. त्यावेळीच 'हवा' हा शब्द वाचून मस्त वाटलं होतं. मग आतातुर्क एअरपोर्टवर उतरल्यावर जिथे मिळेल तिथे असे माहितीचे शब्द शोधण्याचा खेळ चालवला होता त्याची आठवण आली.
खुद के साथ बातां : हा नंदन जर ऑफिसच्या कामाकरता तुर्कस्थानात गेला असेल तर त्याच्या म्यानिजराला वारंवार नंदनला वेगवेगळ्या देशात पाठवण्याची सुबुद्धी गणराय देईल का? म्हणजे मग अधूनमधून तरी 'नंदनीय' लिखाण वाचायला मिळेल! :)
28 Sep 2012 - 8:01 am | नगरीनिरंजन
सुंदर लेख!
बहासा (भाषा) मलेशियामध्येही असे अनेक संस्कृतोद्भव शब्द दिसतात पण असं लिहायला आम्हाला जमणार नाही.
28 Sep 2012 - 8:14 am | चौकटराजा
सदर धाग्यात केलेला प्रयत्न डों मीना सुधाकर प्रभू यांच्या तुर्कनामा या पुस्तकातही केला आहे.मराठी भाषेत कितीतरी शब्द पोर्तुगीज, गुजराथी कन्नड, अरबी फारसी ई भाषातून आलेले आहेत. प्रवाडी भाषाच प्रसरते व टिकते. मराठी भाषेची घडण जे लक्षात घेतील त्याना " मी मराठी" जा दुराभिमान रहाणार नाही. फक्त अभिमानच राहील.
28 Sep 2012 - 8:26 am | पैसा
वाहवा! वाहवा! आणि केवळ वाहवा!
28 Sep 2012 - 9:02 am | इरसाल
आवडले.
28 Sep 2012 - 9:47 am | प्रभाकर पेठकर
हवा, मैदान, फत्ते(ह), मुश्किल, मदबख (मुदपाकखाना), इमारत, दुकान, मालक, शजर इ.इ. अनेक उर्दू-मराठी शब्द अरेबिक भाषेत सापडतात. ह्यातले कित्येक शब्द मोघलांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचले असावेत.
लेख अतिशय वाचनिय झाला आहे. अभिनंदन.
28 Sep 2012 - 10:31 am | चौकटराजा
साधारणपणे भाषेचा विकास होताना शेजारील प्रदेशातील भाषा व त्या त्या वेळच्या प्रशासकाची भाषा यांचा प्रभाव असतोच. मोगलांमुळे मराठीवर तो प्रभाव आहेत हे निसंशय ! गैरहजर, जबाबदार, हरकत असे कितीतरी शब्द सर्र्रास आपण आपले म्हणून अहमानाने मिरवतो. आहेत का ते आपले ? कदाचित याच वाक्यातील सर्रास ह शब्द ही परकीय असेल कारण सर हा पूर्वप्रत्यय परकीय आहे.
28 Sep 2012 - 9:49 am | अन्या दातार
झकास हो नंदनशेठ. इतक्या चांगल्या लेखाला वाचनखूण म्हणून साठवायची सोय नाही म्हणून हळहळलो होतो; पण लक्षात आले की नंदनच्या किती लेखांना वाखू म्हणून साठवून ठेवू? अन मग जरा हळहळ कमी झाली :)
28 Sep 2012 - 9:54 am | स्पा
नंदन सेठ..
__/\__ घ्यावा
तुमच्या निरीक्षण शक्तीला सलाम :)
उत्तम लेख
28 Sep 2012 - 10:48 am | निखिल देशपांडे
नंदोबा...
या वेळेस दिवाळी गणपतीतच..
उत्तम लेख आहे.. साला कुठे जाउन काय लक्षात ठेवशील याचा भरवसा नाही.
28 Sep 2012 - 11:36 am | ५० फक्त
उत्तम लेख, धन्यवाद नंदन शेट.
28 Sep 2012 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
नंदनशेठ बर्याच दिवसांनी वाचनखुणेत साठवावे असे काही हाताला लागले.
'किरमिजी' शब्दाची व्युत्पत्ती आणि प्रवास तर अतिशय सुरेख रेखाटला आहे.
नंदनशेठ पुन्हा लिहिते झाला ह्याचा आनंद मात्र सगळ्यात जास्ती आहे हे वे.सां. न. ल.
1 Oct 2012 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. असेच मध्यंतरी सोहा हा शब्द शोधताना झाले होते. सोहा या शब्दाचा अरेबिक भाषेतील अर्थ सूर्य उगवताना दिसणारा तांबडा रंग जो असतो त्या सोहा असे म्हणतात असे गूगल्यावरून समजले. परंतु त्याची व्युत्पत्ती बरीच रंजक सांगितली होती. ती संस्कृतातील षोणकः म्हणजे रक्तवर्णी अशा अर्थाच्या शब्दापासून आहे असे म्हटले होते. झटकन किरमिजी वाचल्यावर सोहा देखील आठवून गेले.
28 Sep 2012 - 2:29 pm | सहज
लेख उत्तम झाला आहे. भाषा, इतिहास, संस्कृती, संशोधन, विचार असे वैचारिक लेखात असावे असे सर्व घटक फर्मास. उत्तम लेखाची ही टेंप्लेट आहे.
ह्या लेखकाचे वाचन, त्यावर केलेला विचार, चिंतन, त्यामुळेच नेमकें "दृश्य" टिपण्याची नजर सगळे अनुकरणीय!
असे लेखन/विचार त्या त्या भाषेला समृद्ध करत असतात बाकी जगभरचा समाज/मनुष्य हा इथुन तिथुन सारखाच!
नंदन धन्यवाद!
1 Oct 2012 - 11:25 am | रमताराम
सहजरावांशी सहज सहमत होतोय.
28 Sep 2012 - 2:57 pm | मेघवेडा
सुरेख लेख नंदन. शीर्षकही समर्पक! तुर्की भाषेतही इतके शब्द माहितीचे असतील असं वाटलं नव्हतं. असाच जगभर फिरत राहा आणि निरनिराळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, रूढी वगैरेंवर भरपूर लिहित राहा! :)
बाकी, हे भाषिक देवाणघेवाणीचे प्रकार अत्यंत रोचक आहेत. ग्रीक भाषेत तर केवढेतरी शब्द आपल्या ओळखीचे सापडतात. त्यावरही काही लिही. :) मागे मायबोली वर अर्निका यांनी या धर्तीवर एक लेख लिहिला होता. लिंक मिळाली की देतो. त्यात ग्रीक भाषेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ला अनुक्रमे प्रोतेती, द्वोती, त्रीति, आणि तेतार्ती असे शब्द आहेत हे लिहिल्याचं आठवतं.
28 Sep 2012 - 4:58 pm | सुबक ठेंगणी
भाषा आणि भूगोलैतिहासाचा छान मेळ घातला आहेस रे... _/\_
"प्रेमासाठी 'अश्क' हा शब्द रूढ आहे""
ए पण उर्दु (जिच्यावर तुर्की भाषेचा प्रभाव आहे) भाषेत अश्क म्हणजे अश्रु नां?
28 Sep 2012 - 11:45 pm | नंदन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :). 'अश्क' आणि 'इश्क'चा प्रश्न मलाही पडला होता.
उर्दूतला 'अश्क' हा फारसीतून आलेला दिसतो - http://en.wikipedia.org/wiki/Ashk ('आसू' हाच अर्थ)
तर 'इश्क' हा अरेबिकमधून - http://en.wikipedia.org/wiki/Ishq (ह्याच इश्कचा तुर्कीमध्ये 'अश्क' होतो). ह्या इश्काचे वेगवेगळे प्रकार वाचणं आणि भाषेप्रमाणे बदलती अर्थछटा पाहणं, रोचक आहे.
बाकी आसू आणि प्रेम ह्यांना इतके साधर्म्य असणारे शब्द असणं हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल :)
. . .
हा अश्क - इश्क चा गोंधळ कमी म्हणून की काय, पण 'अश्क' हे एका पार्थियन (ईशान्य इराण) राजाचे नावही होते. अश्काबादची व्युत्पत्ती 'प्रेमाचे शहर' अशी प्रचलित असली, तरी ते नाव ह्या राजाच्या नावावरून आलं असावं, असं भाषातज्ञांचं म्हणणं आहे.
29 Sep 2012 - 10:34 am | प्रदीप
"आसू आणि प्रेम ह्यांना इतके साधर्म्य असणारे शब्द असणं हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल"
म्हणूनच तर म्हटले आहे:
http://www.youtube.com/watch?v=r1t3029zmic
1 Oct 2012 - 7:39 am | राही
उर्दूत दवबिंदूंनाही अश्क म्हणतात ना? सर्वसामान्य हिंदीतला दवासाठी असलेला 'ओस' हा शब्द त्यावरूनच आला असावा का?
1 Oct 2012 - 8:42 am | नंदन
हिंदी ओस संस्कृत 'अवश्याय'वरून आला असं दिसतंय (१, २)
'दव' या अर्थाने उर्दूत अश्क वापरला जातो का किंवा त्याच्या व्युत्पत्तीबद्दल काही कल्पना नाही. मी 'आईना-ए-गज़ल' आणि एक-दोन ऑनलाईन उर्दू शब्दकोश शोधून पाहिले, पण तसा संदर्भ सापडला नाही.
1 Oct 2012 - 8:48 am | नंदन
पहिल्या दुव्याचा कोड काही कारणाने नीट दिसत नसल्याने, दुवा पुन्हा देतो -
http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+%E0%A4...
दुसर्या दुव्यात 'ओस'चा वाक्यात उपयोग असा दिला आहे -
os paṛnā or paṛ-jānā (-par), lit. 'Dew to fall (upon)'; to be blighted, to lose bloom, lustre or splendour, to be dimmed, to languish, droop, fade; to be less in demand, to fall in value:
मराठीतले 'ओस पडणे' हा वाक्प्रचार इथूनच आला असावा का?
1 Oct 2012 - 3:05 pm | राही
नसावा. व्युत्पत्तिकोश आत्ता हाताशी नाही. तरीही अव+सृ (खाली येणे,उतरती कळा लागणे,अवकळा येणेआता नाही.)पासून ओसरणे,ओस,ओसाड वगैरे शब्द आले असावेत. ओस,ओसाड चा अर्थ निर्जन,उजाड,रिकामे असा शब्दरत्नाकरात दिला आहे. पण मला त्यात आणखी एक सूक्ष्म अर्थविस्तार जाणवतो. आपण ओस हा शब्द पडणे या साहाय्यक क्रियापदाबरोबर वापरतो. म्हणजे पूर्वी तिथे वैभव होते, भरभराट होती, आता मात्र ते लयास जाऊन निर्जन,उजाड झाले आहे. अवसारमधला व हा वशाड,वशाडी या रूपात बोलीभाषांमधून दिसतो. ओसरणे,ओह(हो)रणे,ओहोटणे,ओहोटी हे सर्व शब्द या अर्थाने तपासता येतील. याच अनुषंगाने ओहोळ आणि निर्झर या दोन शब्दांच्या अर्थातला सूक्ष्म फरकही जाणवून जातो. ओहोळ म्हणजे (पर्वता)वरून खाली येणारा खळाळता प्रवाह, तर निर्झर म्हणजे कुठूनतरी बाहेर पडलेला शांत झरणारा प्रवाह.
शब्दरत्नाकरात पावसाचे तुषार या अर्थाचा ओसाडा हा शब्द सापडला, ज्याचे थोडेफार अर्थध्वनिसाधर्म्य ओथांबा या कोंकणी शब्दाशी आणि ओस या हिंदी शब्दाशी दिसते. असो.
लेख आवडला.
28 Sep 2012 - 5:44 pm | नाना चेंगट
लेख आवडला.
आभारी आहे.
28 Sep 2012 - 8:35 pm | तर्री
केवळ सुंदर !!!
28 Sep 2012 - 8:36 pm | शिल्पा ब
माहीतीपुर्ण लेख.
28 Sep 2012 - 11:47 pm | नंदन
प्रतिक्रियालेखक आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार.
29 Sep 2012 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा नंदनशेठ.
'' दिक्कत, मोहब्बत, '' या शब्दांना वाचल्यानंतर अरे, हा तर आपल्या भाषाशास्त्राचा विषय आहे, याची जाणीव झाली. आणि लेखानं जी पकड घेतली की फीर पुछो मत. शब्दाची सरमिसळ तशी जगभरच असावी. शब्द, भाषा, मानवी जीवनाच्या प्रवासाबरोबर आपलाही प्रवास चालू ठेवते याची जाणीव लेखाने दिली. उत्तमोत्तम संदर्भ.शब्दांकडे पाहण्याची दृष्टी. शब्दांच्या परंपरेचा शोध घेण्याची जिज्ञासा. आणि असं बहुत कुछ. नंदनं यांनी नेहमी लिहितं राहीलं पाहिजे. और क्या कहु.
-दिलीप बिरुटे
29 Sep 2012 - 10:34 am | राजेश घासकडवी
शब्दांचा प्रवास आणि त्यांना वाहून नेणारा राजकीय सत्तेचा प्रवाह यांचा आढावा आवडला. भाषेची व्यंजनं (शब्द) राजकीय सामर्थ्याने स्वर बदलतात हा मर्ढेकरांना अनपेक्षित असलेला अर्थ या लेखाला शीर्षक म्हणून चपखल बसतो.
मात्र 'जेत्यांची भाषा आणि संस्कृती यांचा जीतांवरचा परिणाम' हा फारच मोठा आवाका असलेला विषय. लेखमाला होण्याचा जीव असताना एकच लेख आल्यामुळे या प्रवाहांच्या भोवऱ्यात थोडं गरगरल्यासारखं झालं. इतिहास हा माझा आधीच कच्चा विषय. त्यात तुर्कस्थानसारख्या देशाविषयी 'कॉन्स्टॅंटिनोपल तुर्कांच्या हाती पडले' किंवा 'तरुण तुर्क' वगैरे वाक्य-शब्दप्रयोगापलिकडे फार माहिती नाही. एकेकाळी या देशाचं प्रचंड साम्राज्य असताना नव्या जमान्यात विस्तार न होता ते विलीन झालं याबाबत माहिती चांगली आली आहे. पण अजून आवडेल. तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून ती आली तर तो कंटाळवाणा घटनांचा इतिहास न रहाता प्रवाहांचा मागोवा होईल ही खात्री आहे.
29 Sep 2012 - 10:56 am | हरिप्रिया_
रंजक आणि माहितीपूर्ण लेख.
खूप खूप आवडला.
29 Sep 2012 - 2:04 pm | सुहास..
सुप्पर लाईक्ड ...रजनीलाईक्ड
29 Sep 2012 - 7:03 pm | मिहिर
मस्त लेख! खूप आवडला.
30 Sep 2012 - 9:41 am | सुधीर
माहितीपूर्ण लेख आवडला.
1 Oct 2012 - 4:59 am | सुनील
लेखाचे निम्मे यश त्याच्या शीर्षकात असते.
दोन भाषांमधीत देवाण-घेवाणीत सॉफ्ट पॉवरचे असलेले स्थान हलकेच अधोरेखीत करणार्या शीर्षकामुळे लेखाची खुमारी अधिकच वाढली आहे, हे निश्चित!
किरमिजी-crimson चे मूळ कृमि-ज मध्ये आहे, हे वाचून, लेख थोडासा "पुनाओ़की" वळणावर जातोय की काय, असे वाटत होते!!!
अर्थात त्याचवेळेस. shampoo चे मूळ चंपीत आहे, हेदेखिल अंधूकसे आठवून गेले!
सत्तेचे केंद्र बदलताच शब्दांचे प्रवाह कसे बदलतात, हे रोचकपणे दाखवणारा लेख आवडला, हेवेसांनल!
नंदनशेठना असेच देशोदेशी फिरण्याची संधी मिळो आणि मुख्य म्हणजे ते लिहिते होवोत, हीच ईच्छा!
3 Oct 2012 - 11:47 am | विसुनाना
माहितीपूर्ण तरीही कंटाळवाणा न होणारा लेख. एखाद्या विशिष्ट-भाषिक लोकसमूहाचा भौगोलीक विस्तार आणि राजकीय/सामाजिक प्रभाव यांचा त्या भाषेतील शब्दांचा इतर भाषांमध्ये प्रसार होण्याशी असलेला संबंध स्पष्ट करून दाखवणारा हा लेख आवडला.
असे आणखी लेख लिहावेत.
3 Oct 2012 - 7:23 pm | स्वाती दिनेश
नंदन, सुरेख लेख.. खूप आवडला.
स्वाती
3 Oct 2012 - 9:10 pm | धनंजय
विषयानुरूप शब्द बदलण्यापूर्वीचे मूळ उद्धरण "आणि सामर्थ्य स्वराचे" असे आहे काय?
कानाला काहीतरी बोचते आहे, पण संदर्भ बघायला मर्ढेकरांचा कवितासंग्रह हाताशी नाही :-(
4 Oct 2012 - 8:39 am | धनंजय
संदर्भ बघितला... आणि उद्धरण न-बदललेले आहे.
----
कधी लागेल गा नख
तुझें माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला
----
(कोणास ठाऊक का, मी या ओळी "भंगु दे कठिन्य माझें"च्या चालीत म्हणत होतो, आणि त्यामुळे नीट म्हणता येत नव्हती. गलतीसे मिष्टेक हो गया...)
3 Oct 2012 - 9:28 pm | मितान
सुरेख !
लेख आवडला ! :) चांगलं काहीतरी वाचल्याचं समाधान मिळालं :) धन्यवाद !
3 Oct 2012 - 11:29 pm | प्रास
नमस्कार नंदनशेठ!
लई दिवसांनी लेखक म्हणून तुमचं नाव दिसल्यावर लगोलग लिखाण वाचलं आणि त्या वाचनाचं सार्थक झालं. लेख अतिशय सुरेख उतरलाय आणि वाचताना कुठेही क्लिष्टता वाटली नाही हे जरूर नमूद करतो.
इतिहास, भूगोल आणि भाषा यांच्या माध्यमातून आलेली ही माहिती सुयोग्य छायाचित्रांमधून व्यवस्थित पोहोचली मात्र याच संदर्भातील "अशी वाढते भाषा" स्वरूपातली अधिक अनुषंगिक माहिती वाचायला निश्चित आवडेल.
माहितीपूर्ण लिखाणाबद्दल आभार!
7 Oct 2012 - 12:35 am | अभ्या..
या किरमिजी शब्दाचा संबंध मी लहान असताना अलेक्झांडर ग्रीन च्या क्रिमसन सेल्स चे मराठी रूपांतर किरमिजी शिडे वाचले होते. त्यावेळी तो कुठलातरी वेगळाच रंग, कधी न बघितलेला असा असावा, असे वाटायचे. नंतर कळले या कादंबरीवरच एक चित्रपट पण आहे पण त्याचे नाव स्कार्लेट सेल्स आहे. आता स्कार्लेट म्हणजेच क्रिम्सन का?
लेख सुंदरच आहे. खूप धन्यवाद.
13 Oct 2016 - 8:02 pm | यशोधरा
एक चांगला लेख पुन्हा एकदा वर काढते.
14 Oct 2016 - 1:08 pm | एस
मनःपूर्वक धन्यवाद!
14 Oct 2016 - 12:57 pm | सिरुसेरि
किरमिजी गोंडा नावाचे पुस्तक पुर्वी वाचले होते ते आठवले . रशिअन राज्यक्रांतीच्या काळातील एका शुर गुप्तहेराची ती साहसकथा होती . किरमिजी गोंडा हे त्या गुप्तहेराचे टोपणनाव असते .
14 Oct 2016 - 11:58 pm | गामा पैलवान
नंदन,
तुमचा लेख म्हणजे ज्ञानरंजनाची मेजवानीच (हा अरबी की फारसी शब्द?). ओघवती शैली आहे. किरमिजी ते criimson या प्रवासावरून मिहीर --> मीर --> muir हा शब्द आठवला. तसेच दुर्ग --> बुर्ज --> बुरूज --> बर्ग --> berg आणि पुरी --> bury = borough हे आठवले.
कुलतारक --> कोल तार (हिब्रू) --> culture हा ही एक रंजक प्रवास आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 Oct 2016 - 12:37 pm | बोका-ए-आझम
यशोताईंचे आभार हा लेख वर काढल्याबद्दल.
16 Oct 2016 - 10:17 am | chitraa
छान
16 Oct 2016 - 2:29 pm | मारवा
कवी ग्रेसच्या एका कवितेची ओळ आहेना ती
किरमिजी वळणाचा धुंद पाऊस येतो
पुढे साजण नाही ..... अस काहीतरी आहे आठवतय का कुणाला कृपया द्याव्या त्या ओळी.
बाकी पहीली ओळ नक्की अशीच. आणि याच " किरमिजी" शब्दामुळे ही ओळ लक्षात राहीलेली होती अर्थ माहीत नव्हता
नुसत्या शब्दाने धुंद झालेलो...
अप्रतिम सुंदर लेख नंदनजी अनेक धन्यवाद
आणि यशोधराजींना डबल धन्यवाद धागा वर आणण्यासाठी.
बर्याचदा प्रत्यक्ष सत्तेपेक्षाही जेत्यांच्या संस्कृतीच्या 'सॉफ्ट पॉवर' पकडीतून निसटणं अधिक अवघड असतं.
या विधानातील सत्याशी पुर्णपणे सहमत आहेच. मात्र याच्याच अगदी उलट उदाहरणही घडु शकत.
याच सर्वात तेजस्वी उदाहरण म्हणजे रोमनांनी ग्रीकांवर जरी विजय मिळवला तरी म्हणजे ग्रीक जित असले तरी नेमक उलट मार्गाने रोमनांनी ग्रीकांची फिलॉसॉफी पोएट्री इ. अनेक बाबींना आत्मसात केलं. काही ग्रीक गुलाम तर रोमन मालकांच्या मुलांना भाषा तत्वज्ञान शिकवत असत. कित्येक युद्धात पराक्रम गाजवणारे व प्रत्यक्ष ग्रीकांना हरवणारे रोमन जनरल्स अॅट द सेम टाइम उत्साहाने ग्रीक फिलॉसॉफी चा अभ्यास करत असत.
स्टोरी ऑफ सिव्हीलाएझेशन च्या ३ र्या खंडात विल ड्युरांट याची अनेक सुंदर उदाहरणे हरलेल्या ग्रीकांकडुन जिंकलेल्या रोमनांकडे वाहणारी उलटी गंगा ची उदाहरणे फार सुंदर देतो.
एकंदरीत मजाच आहे.