गोव्याची चवथ

पैसा's picture
पैसा in विशेष
23 Sep 2012 - 3:33 pm
श्रीगणेश लेखमाला २०१२

गोव्याची चवथ

श्रावणातला पाऊस झिरमिर सुरू झाला की महाराष्ट्रातल्यासारखेच गोव्यातल्या लोकांना पण गणपतीचे वेध लागतात. इथल्या बोलीभाषेत चतुर्थी म्हणजे चवथ. गणपतीच्या सणालाच "चवथ" म्हणायची गोव्यात पद्धत आहे. गोव्यात दिवाळीचं प्रस्थ तसं कमी. म्हणजे फटाके फराळ वगैरे दिवाळीत नसतं, तर सगळं गणपतीत असतं. आम्ही गोव्यात नवीन आलो तेव्हा तर फटाके नसल्यामुळे दिवाळी सुरू आहे असं कळायचं पण नाही. दुकानात फटाके विचारले तर "फुगोटे आता खंय? चवथीकडेन मेळतले" असं ऐकायला मिळालं. तेव्हा कळलं की गोव्यात गणपती हा सगळ्यात मोठा सण. गणेश चतुर्थी आणि पंचमी दोन दिवस गोव्यात सगळ्यांना सुटी. एक दिवस गणरायाच्या आगमनाचा आणि दुसरा विसर्जनाचा. गणपतीत अगदी सगळी ऑफिसे पण दोन दिवस बंद असतात.

गोव्यात शिगमो म्हणजे होळी आणि गणपती हे लोकांचे खास आवडीचे सण. पैकी शिगमो म्हणजे होळी हा सामाजिक तर गणपती वैयक्तिक म्हणावा असा. गोव्यात सार्वजनिक गणपती अजून तसे कमी आहेत. गेल्या २५/३० वर्षातच हे प्रस्थ सुरू झालंय. महाराष्ट्रातल्या सारखे गल्लोगल्लीचे राजे अजून इथे पहायला मिळत नाहीत. आणि एकूणच काहीसं धार्मिक वातावरण असतं. सार्वजनिक गणपतींच्या समोर अजून नाटके, शास्त्रीय संगीत, आरत्यांच्या स्पर्धा असे कार्यक्रम असतात. ऑर्केस्ट्रा वगैरे तुरळक प्रमाणात असतात. पण गोव्यातल्या लोकांना एकूणच संगीतकलेची आवड जात्याच असते, त्यामुळे गणपतीत ऑर्केस्ट्रा वगैरे बडवण्यापेक्षा घुमट आरती करण्यात गोंयकाराचा जीव रमतो.

गोव्यात गणपतीपूजा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कदंबांनी बांधलेलं गणपतीचं एक भव्य देऊळ दिवाडी बेटावर सप्तकोटेश्वराबरोबर होतं त्याचा नाश पोर्तुगीजांनी केल्यानंतर तिथली मूर्ती उचलून आधी खांडेपार मग साखळी आणि शेवट खांडोळा, माशेल इथे नेण्यात आली. माशेलातील महागणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तसंच फोंड्यातील गोपाळ गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. या देवळातील मूळ दगडी मूर्ती गुराख्यांना रानात मिळाली आणि मग मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी देवळासाठी निधी उपलब्ध करून दिला. इतर गावांप्रमाणे फोंड्याला कोणत्याही देवाचं प्रमुख असं देऊळ नाही. कदाचित आदिलशाही आक्रमणाच्या काळात ही मूर्ती एखाद्या देवळातून उचलून रानात लपवली असावी. गोव्यात गणपतीची स्वतत्र अशी खूप देवळं नाहीत पण सांतेरी म्हणजे वारूळ ही स्थानिक लोकप्रिय देवता. कदाचित त्यामुळेच मातीपासून बनलेल्या गणपतीबाप्पाबद्दल लोकांना जरा जास्तच आपुलकी वाटत असावी.

फोंडा येथील गोपाळ गणपती मंदिर

gopalganapati

श्रावणात गावातल्या कारागिराकडे पाट दिला की गणपती करून द्यायची जबाबदारी त्याची. प्रत्येक गोंयकार कुठेही रहात असला तरी गणपतीसाठी गावातल्या घरी जमा होतो. अशा वेळी घरात २५/३० पर्यंत माणसं सहजच असतात. गणपतीच्या आठ एक दिवस आधी कोणीतरी उत्साही पोरं गावच्या घरी जाऊन साफसफाई करून येतात. चतुर्थीच्या २/३ दिवस आधी फराळाचे पदार्थ करायची लगबग स्वयंपाकघरात सुरू होते. त्यात "नेवर्‍यो" म्हणजे सुक्या खोबर्‍याचे सारण घातलेल्या करंज्या महत्त्वाच्या. या नेवर्‍यांना इतकं महत्त्वाचं स्थान आहे की ख्रिसमसच्या सणाला ख्रिश्चन लोक पण त्या शुभ म्हणून करतात. चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीबाप्पा घरी येऊन विराजमान झाले की अर्धा जीव भांड्यात पडतो. मग माटोळीची तयारी सुरू होते. माटोळी म्हणजे गणपतीच्या समोर उंचावर बांबू किंवा सुपारीच्या खोडाची एक चौकट बांधलेली असते. तिला ताजी आणि उपलब्ध असतील ती फळे भाज्या बांधल्या जातात. त्यात भोपळे, शहाळी, सुपार्‍या, काकड्या, अंबाडे, कवंडळासारखी आकर्षक दिसणारी फळं असं सगळं स्थानिक शेतीत आणि रानात तयार झाललं असतं.

माटोळीच्या सामानाचा बाजार

matoli

मातीच्या बनवलेल्या गणपतीला सजावट अशी अस्सल निसर्गातून वेचून आणलेली असते यात काय नवल! हल्ली माटोळी बांधण्याच्या स्पर्धा गोवा सरकारतर्फे भरवल्या जातात. नुकतेच एका बहाद्दराने रानावनात फिरून एकूण ३५० प्रकारच्या वनस्पती गोळा करून माटोळी बांधली आणि स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले! या माटोळीतल्या बहुतेक फळे, भाज्या, आणि वनस्पती औषधी गुणधर्माच्या असतात नाहीतर रोजच्या वापरात येणार्‍या. पण विषरी वनस्पती माटोळीमधे कटाक्षाने टाळल्या जातात आणि जाणकार लोक ४-५ तास पायी फिरूनसुद्धा रानातून जास्तीच्या वनस्पती माटोळीसाठी गोळा करतात. आंब्याचे टाळे किंवा इतर माटोळीच्या वस्तू जमिनीवर पडून खराब होणार नाहीत याची खास काळजी घेतली जाते.

या माटोळीचं सुधारित रूप म्हणजे सावंतवाडीकडे मिळणारी लाकडी फळं. तीही कुणाकुणाच्या गणपतीसमोर मांडून ठेवलेली असतात. कोणाला मूलबाळ नसेल तर ती लोकं गणपतीला नवस बोलतात, बाप्पा मला पोर दे, पुढच्या चवथीला तुझ्या माटोळीत पोराला बांधीन. मग समजा त्याच्या घरात पाळणा हललाच तर पुढच्या वर्षी खरंच माटोळीला झोळी बांधून त्यात त्या बाळाला थोडा वेळ ठेवलं जातं.

माटोळी

matoli

आता ठिकठिकाणचे कलाकार थर्मोकोलची मखरं वगैरे तयार करतात पण काही जणांकडे पिढ्यान पिढ्यांची लाकडी आणि आरसे लावलेली मखरे वर्षभर माळ्यावर जपून ठेवलेली असतात. ती साफसूफ करून गणपतीची सजावट केली जाते. गोंयकार मनाने अतिशय भाविक आणि परंपरा जपणारा. त्यामुळे अशा पिढ्यान पिढ्याच्या वस्तू अनेक कुटुंबात जपून ठेवल्या जातात. परंपरा जपण्याचा सोस इतका की काही घरात कागदाच्या गणपतीची पूजा केली जाते. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत मातीच्या मूर्ती आणायला बंदी होती, गावातून तरी लोक लपून छपून आणतच असत पण पणजीसारख्या शहरातून त्यानी यावर उपाय काढला तो म्हणजे घरातल्या गणपतीच्या तसबिरीची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा करायची, मग उत्तर पूजा झाली की विसर्जन पाण्यात न करता पाणी प्रोक्षण करून परत ती तसबीर नेहमीच्या जागी लावून टाकायची. पोर्तुगीजांची धाड आलीच तर अशी तसबीर उचलून परत जागेवर ठेवणं सोपं हे महत्त्वाचं कारण यामागे असावंच. पण आता पोर्तुगीज जाऊन ५० वर्षे उलटली तरी या काही घरांतून ही प्रथा अजूनही तशीच चालू आहे.

गणपतीबरोबर गौरीही असतातच. तृतीयेला गौरी महादेवाची पूजा असते. गौरीचा मुखवटा म्हणजे कागदावरचं चित्रच असतं. तेरडा, चिडक्याची गौर असते आणि नारळाचा महादेव. गणपतीसमोर पुरुष मंडळी फुगडी घालतात तर गौरीसमोर बायका मुली. चतुर्थीला भटजी मंडळींना भयंकर मागणी. प्रत्येक थोडंफार संस्कृत येणारा भट, मग तो लहान मुलगा असला तरी चालेल, गावोगावच्या घरोघरच्या गणपतीची पूजा करतो आणि प्राणप्रतिष्ठा करतो. एरवी तो इन्कम टॅक्स ऑफिसर का असेना! गणपती बसवणे हे गावचं काम समजून केलं जातं. गणपतीला नेवर्‍यो, पातोळ्या, तांदुळाची खीर, मणगणे असे गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. या दिवसात कांदा लसूण वर्ज्य. काही गोंयकार सोवळ्या ओवळ्याबदल इतके काटेकोर असतात की एरवी घरात मासे आणले जातात त्यावेळी वापरायची भांडीकुंडी वेगळी असतात. आणि गणपतीत वापरायची वेगळी. सगळ्या भांड्यांचा वेगळा एक संच अगदी विळी, कोयतीपर्यंत एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवला जातो आणि गणपतीत शिवराक रांधप करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अगदी रवा, साखर, तांदूळ, तेल सगळं सामान वेगळंच काढून ठेवलं जातं!

नैवेद्य झाला की मग आरती. गोव्यातली घुमट आरती फार प्रसिद्ध आहे. मातीच्या मडक्याला एका बाजूने चामडे लावून घुमट वाद्य तयार केलं जातं. घुमट, मृदुंग, पेटी टाळ सगळं साहित्य घेऊन सगळी मंडळी शेजार्‍यापाजार्‍यांकडे जाऊन आरत्या करतात. मग कितीही घरात जाऊन आरत्या त्याच त्याच म्हणाव्या लागल्या तरीही कोणीही कंटाळत नाही. संध्याकाळी परत वेगळ्या आरत्या. अशा घुमट आरत्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात आणि त्या ऐकायला लाबलांबून लोक येतात.

घुमट

ghumat

दुसर्‍या दिवशी लगेच विसर्जन. पोर्तुगीजांच्या काळातच बाटवाबाटवीच्या भीतीने गणपती दीड दिवस ठेवायची पद्धत सुरू झाली असावी. शिवाय गणपती घरात असताना मासे खायचे नाहीत हे एक मोठंच पथ्य पाळावं लागतं. दीड दिवसाचा गणपती म्हणजे काय! भटजीबुवा उत्तरपूजेच्या अक्षता देऊन गेले की मग लोक सवडीने रात्री उशीरा पर्यंत वाजत गाजत गणपतीबाप्पाला मिरवत विसर्जनासाठी नेतात. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी आवश्यकच! आमच्या घराच्या शेजारून एक रस्ता तळ्याकडे जातो. रात्री ३-४ वाजेपर्यंत विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असतात. सगळे घरोघरचे गणपतीच! सार्वजनिक गणपती मात्र गौरीविसर्जनाच्या दिवशीच पोचवतात. आता बरेच लोक काही काही कारणाने गणपतीला बोलून घेतात की अमकं झालं की मी तुला ५ दिवस/७ दिवस/११ दिवस अगदी २१ दिवसांपर्यंत ठेवीन! मग पुढच्या वर्षी एकदा ५ दिवस ठेवलेला गणपती परत कमी दिवस ठेवता येत नाही म्हणे, मग त्या घरात ५ दिवसांचा गणपती सुरू होतो. माशेलला महागणपतीचं स्थान आहे तिथले कलाकार दर वर्षी नारळाचा, भाज्यांचा, फुलांचा असे वेगवेगळे गणेश तयार करतात. तिथला गणपती लोकांना पहायला मिळावा म्हणून २१ दिवसपर्यंत ठेवतात!

"पुनरागमनाय च" म्हणून बाप्पाला निरोप दिला की पाटावर वाळूची मूठ ठेवून कोणाबरोबर तरी पाट घरी धाडून दिला जातो आणि खिशात ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढत गोंयकार मासळीबाजाराची वाट धरतो!

(काही प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार आणि व्हिडिओ युट्युब वरून साभार)

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

23 Sep 2012 - 3:55 pm | अन्या दातार

मस्त ओळख करुन दिलीत.

मस्त लिहिलं आहेस ज्योतीताई :) माटोळीचा फोटो टाकायचास जमलं तर.

>>पाटावर वाळूची मूठ ठेवून कोणाबरोबर तरी पाट घरी धाडून दिला जातो आणि खिशात ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढत गोंयकार मासळीबाजाराची वाट धरतो! >> अच्च गोयंकार म्हळ्यार असोंच! देवावर त्याचं मनापासून प्रेम, मग त्याच्या पहिल्या अवतारावर तरी कसं कमी प्रेम करणार! गोयंकाराच्या घरांत ह्या ना त्या रुपात देव सतत घरी नांदतोच! ;)

स्पंदना's picture

23 Sep 2012 - 4:21 pm | स्पंदना

भजनांचे व्हिडीओ पाहुन गावी भजन व्हायची त्याची आठवण आली. पण काही म्हण हं, आमची भजन फारच सुरेल असतात. आता गावी गेले की जमल तर शुट करेन.
फार छान ओळख करुन दिली गणेशोस्तवाची. एकदम घराघरात पुजेनिमित्त्य घडणार सार काही समोर आल.

जयंत कुलकर्णी's picture

23 Sep 2012 - 4:32 pm | जयंत कुलकर्णी

मी होळीला कोकणात/गोव्यात
बर्‍याचदा गेलोय....गणपतीला एकदा जायला पाहिजे हे आता ठरवलं आहे.....

नंदन's picture

23 Sep 2012 - 4:37 pm | नंदन

लेख आवडला. घुमट आरती, माटोळ्यांची ती चौकोनी फ्रेम आणि त्यावर केलेली सजावट, खास काळ्या वाटाण्याची उसळ-आंबोळ्या-पालेभाजी असा बेत असा सगळा माहौल लेख वाचून मनात ताजा झाला.

मांद्र्यातल्या एका घरगुती माटोळीचा हा एक फोटो -

माटोळी

राही's picture

23 Sep 2012 - 7:06 pm | राही

माटोळीचा फोटो खासच आहे. माटोळी हे प्रकरण महराष्ट्रात पश्चिम किनारा सोडून फारसे कुठे दिसत नाही. गणपतीच्या सुमारास मुंबईच्या बाजारात कवंडाळं, कोवळ्या सुपार्‍या,कांगलं,पपनसं,नागकांडी(नागलखडी,इंधई,कळलावी) वगैरे फळांफुलांपाशी सर्व कोंकणी लोकांची गर्दी दिसते. माटोळी/माटवी म्हणजे मूळ मंडपी अर्थात लहान मंडप/मांडवी असावे. जुन्या मुंबईमध्ये मांडवी नावाचा भाग आहे, तिथेही एकोणीसाव्या शतकापर्यंत एक मांडव उमरखाडीच्या किनार्‍यावर उभारलेला असे. खाडीतून होड्यांमधून किनार्‍यावर उतरणार्‍या प्रवाश्यांसाठी केलेली ती सोय असे. ह्या मांडवीवरून आसपासच्या भागाचे नाव मांडवी पडले.

मन१'s picture

23 Sep 2012 - 4:55 pm | मन१

वाचनखूण बनली अजून एक.
साला, कधी कोकणात आणि गोव्यात निवांत जाणं झालं नाही.(नाही म्हणायला तीन-चार दिवसापुरत्या ट्रिपा मारुन झाल्यात. पण मोथा मुक्काम असा नाहिच., ) जाणं झालं नाहिच. पण साहित्यात इतकी सगळी वर्णनं आहेत ना त्याची, अगदि श्री ज जोशींच्या कादंबर्‍यांपासून ते पेशवेकालीन संदर्भापर्यंत, ते अगदि पु लं च्या बोलण्यातही ते येणारच.
वरून पुन्हा जालावर त्याबद्दल भरभरुन बोलणारे आहेत्च.
एक गोयन मिपाकर हडळ चक्क हापिसात शेजारीण होती आमची. तिच्याही अखंड बडबडीतून गोव्याचं असं काही चित्र उभं राहिलय की बस रे बस.
जन्मात तिकडे कधी न जाताही त्या जागेबद्दल भरभरुन बोलावसं वाटतय ;)
.
आता बिलियनरी झाल्यावर स्वित्झर्लंडला गेलो नाही प्रायव्हेट विमानानं तरी चालेल, पण अस्सल गोवेकर स्थानिक लोकांच्या सोबत काही काळ तरी मुक्काम करयाचाय बुवा आपल्याला सणासुदीला. आणि झालच तर काही दिवस रत्नाग्रित पावसलासुद्धा.
असो. वाचनखूण साठवली आहे.

मन१'s picture

23 Sep 2012 - 4:55 pm | मन१

वाचनखूण साठवा हे बटनच दिसतच नाहिये.

किसन शिंदे's picture

23 Sep 2012 - 5:08 pm | किसन शिंदे

गोव्यातला गणपती उत्सव भाविकतेने आणि अतिशय सुंदरतेने उलगडून दाखवलाय.

फारच अनोखी माहिती आणि लेख. ज्योतीताई.
गोवे इतके जवळ असूनही तिथल्या या परंपरा माहिती नव्हत्या.
>>>गोव्यात शिगमो म्हणजे होळी>>> इथे 'शिमगो' असे म्हणायचे आहे काय ?
बाकी गणपतीसमोर पुरुषही फुगड्या खेळतात हे वाचून मजा आली.
आणि आरती बसून ? ते भजन आहे की काय ?

राही's picture

23 Sep 2012 - 6:50 pm | राही

मूळ शिमगा पण गोवा कारवार, सिंधुदुर्ग येथे तो शिग्मोच. इतकेच नव्हे तर फाल्गुन महिन्यालाच शिग्मो किंवा शिग्मो म्हैनो म्हटले जाते.

मीनल's picture

23 Sep 2012 - 5:33 pm | मीनल

गोव्यातील उत्सवाचा वृंतात आवडला. आमच्या कोकणातल्या घराचा गणपती , माटवी वगैरे फोटो टाकायचे आहेत. पण इथे प्रतिसादात सोय नाही.

सूड's picture

23 Sep 2012 - 5:40 pm | सूड

छान लिहीलंय

गोव्यातील गणपतींच्या वेळी असलेले हे निराळे प्रकार नवीन वाचायला मिळाले. सार्वजनिक गणपतींचे फार प्रस्थ नाही म्हणून खरे सांगायचे तर बरेच वाटले. नाहीतर कोणी घरात, फोनवर बोललेलं ऐकू येत नाही इतकी गाणी बजावणी असतात. त्यापेक्षा भक्तिभावाने केलेल्या आरत्या कितीतरी श्रवणीय.

प्रदीप's picture

23 Sep 2012 - 6:15 pm | प्रदीप

ऐतिहासिक संदर्भ देत, गोव्यातील समाजजीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या ह्या उत्सवाविषयी तपशिलवार माहिती देणारा समयोचित लेख आवडला. घुमट आरती ऐकली/ पाहिली नव्हती, पण अनेकदा मंगेशी, शांतादुर्गा येथील संधाकाळच्या सनईवादनाचा आस्वाद घेतलेला आहे. त्याची आठवण झाली. तसेच एकदा आषाढी एकादशीच्या दिवशी पार्से येथील श्रीभगवतीच्या मंदिरात सुरू असलेले चक्री भजन आठवले.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2012 - 6:37 pm | प्रभाकर पेठकर

गोव्याच्या गणेशोत्सवाचे समग्र सांस्कृतिक शब्दचित्र अत्तिशय भावलं. कमीत कमी शब्दांत संपूर्ण आशय सामावून उत्सवाचे उत्साही वातावरण मनांत तयार झालं. अभिनंदन.

'घुमट' हे जुने वाद्य अगदी मातीचे नाही पण धातूचे पाहिले, वाजविले आहे. सहलींच्या अनेक गाण्यांना ह्या सुटसुटीत आणि सुरेल वाद्याने अनेकदा साथ दिली आहे. त्या स्मृतीआड गेलेल्या गोड वाद्याला पुन्हा आठवणींमधून बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद.

गोवन फिशकरी एवढेच गोव्याच्या ह्या मुख्य सणाचे महत्व मनावर ठसले गेले आहे.

सुरेख लिहील आहेस ग
आवडेश

गणपा's picture

23 Sep 2012 - 7:44 pm | गणपा

वाह ! छान.
नवीनच महिती मिळाली.

मी-सौरभ's picture

24 Sep 2012 - 7:01 pm | मी-सौरभ

बाप्पाशी सहमत

प्रास's picture

23 Sep 2012 - 7:56 pm | प्रास

पैसातै, गोव्याच्या गणपत्युत्सवाची आधी माहिती नसलेली माहिती छान दिलीयेस गं!
चल, गोवा तुझ्याबरोबरीनेच बघायला येतो.... तयारीत रहा :-)

धनंजय's picture

23 Sep 2012 - 8:10 pm | धनंजय

छान आठवणी जाग्या झाल्या. खूपखूप धन्यवाद.

नितांतसुंदर शैलीतला लेख फार आवडला. नेवर्‍यो, माटोळी असल्या खास कोकणी शब्दांचा लहेजा काही औरच.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Sep 2012 - 10:28 pm | बिपिन कार्यकर्ते

छे! जौद्या!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2012 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-roll-smiley-emoticon.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2012 - 7:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर लेख. बोली भाषेतला ' चौथ " आमच्याकडेही होतं. फोंड्याचं गणपती मंदिरही आवडलं. मूर्तीच्या उचला उचलीच्या गोष्टीवरुन विठ्ठलाच्या उचला उचलीची आठवण झाली. घुमट आरतीतील ''युगे अठ्ठा........वीसा........विठो ...बा'' आवडेश. बोले तो लेख खूपच आवडला.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

24 Sep 2012 - 9:25 am | यशोधरा

मस्त आहे माटोळीचा फोटो!

खूप खूप मस्त. तपशीलवार.. मुद्देसूद आणि इंटरेस्टिंग...

गोव्याची वार्षिक ट्रिप पेंडिंग आहेच.. येतोच आहे.

लीलाधर's picture

24 Sep 2012 - 11:15 am | लीलाधर

लेख आवडला गेला आहे, मस्तच वर्णन आणि लिखाणशैलीही १ नंबर आवडेश :)

sagarpdy's picture

24 Sep 2012 - 11:21 am | sagarpdy

छान!

दर वर्षी पुण्याला गणपती पाहायला जातो. पण मला अलीकडे पुण्याचा गणेश उत्सव आवडेनासा झाला आहे . आता एकदा गोव्याचा उत्सव पाहायला हवा - असे वाटण्यास भाग पडणारा आपला हा सुंदर लेख.
विशेषत: घुमट आरती ऐकायलाच हवी.

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 2:35 pm | Kavita Mahajan

लेख आवडला. छायाचित्रांसह आल्याने मजा आली.

चित्रा's picture

24 Sep 2012 - 6:14 pm | चित्रा

लेख फार आवडला. आरत्या तर फारच छान.

माटोळी हा इथल्या 'रीथ' सारखाच प्रकार असावा असे वाटते.
http://en.wikipedia.org/wiki/Wreath

आवडेश. बाकी कोकणपट्टी अन गोवा हे भाग साहित्यात जरा जास्तच अजरामर झाल्याने तिकडे नीटच राहण्याची आधी झालेली इच्छा या लेखामुळे पुनरेकवार बळावली. तसा रत्नांग्रीस राहिलो आहे सुट्टीत निवांतपणे, पण खेड्यातील कोकण कै नै मिळालं अनुभवायला कधी. पाहू कधी योग येतो ते. खैर इन्शाल्ला!

अरेच्च्यामारी प्रतिसादाला बूच मारले नसतादेखील संपादन का बरे करता यीना??

मदनबाण's picture

24 Sep 2012 - 7:38 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

आवडलं. आम्ही मुंबैकर असल्याने बहीरं होण्याइतक्या आवाजातली थिल्लर गाणी, भकाभका लायटींग, डोळ्यावर येणारी आरास वगैरे गोष्टी पाहण्यातच दिवस गेले.
कधी जमलंच तर गोव्यात जरुर जाईन.

अवांतर : वाचनखुण साठवाचं बटण गायबलंय.

आता पुढच्या वर्षी गणपतीसाठी तुझ्या घरी नक्की असेन. मला पुण्यात काय आणि मुंबईत काय, तेच ते गणेशोत्सव थिल्लर रुप बघून वीट आला आहे.

अभ्या..'s picture

24 Sep 2012 - 10:43 pm | अभ्या..

नेवर्‍ये माटोळी हे काही माहितीच नव्हते.
छान माहिती. धन्यवाद पैसाताई.

एस's picture

24 Sep 2012 - 11:47 pm | एस

बाकी मासळीच्या आठवणीनं जीव कासावीस झाला आहे. पण आमच्याकडे नवरात्र उलटल्याशिवाय परवानगी नाही... माका गोयंकार का नसां केलां (क्रुपया चुका काढू नये) :) ;)

आयडिया! गोव्याचीच मुलगी बघावी...!!! :P

अस्सल गोवेकरीनीने कल्चर चा घेतलेला वेध आवडला !

जय - गणेश's picture

25 Sep 2012 - 12:54 pm | जय - गणेश

-- माहिती बद्दल धन्यवाद !!

बाकी फोटो पण छान आहेत

नगरीनिरंजन's picture

25 Sep 2012 - 12:58 pm | नगरीनिरंजन

सुंदर लेख!

मेघवेडा's picture

25 Sep 2012 - 4:44 pm | मेघवेडा
मेघवेडा's picture

25 Sep 2012 - 5:39 pm | मेघवेडा

मस्त लिहिलंय ज्योताय!

घुमट आरती हे प्रकरण भारीच असतंय. :)

सगळं जपून ठेवण्याबाबत जे लिहिलंयस ते तर अगदी अगदी सो टका खरी वात. पुढील फोटोतली ही सजावट करण्यास वापरलेलं सामान वीसेक वर्षं जुनं आहे, सगळं व्यवस्थित जपून ठेवलेलं.

अगदी हा थर्माकोलचा उंदीरही दहा वर्षांहून अधिक काळ जपलेला आहे!

सौंदाळा's picture

14 Sep 2015 - 12:12 pm | सौंदाळा

मस्त लिहिले आहे.
गोव्यात / कोकणात गणेशोत्सवाला उपस्थित राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्हा शहरवासीयांसाठी मोठेच भाग्य.
तीन दिवसांवर आलेल्या गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हा सुंदर लेख वर काढत आहे.