नाटकामागचं नाटक - १

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
8 Sep 2012 - 9:43 pm

इतरत्र एका चर्चेत नाटकाचा उल्लेख आला, आणि एक प्रतीसाद लिहायला घेतला, लिहितालिहिता वेगळा लेखच तयार होईल असं वाटलं म्हणून इथे लिहितोय

कळतं मला आपलं थोडंसं नाटकातलं.. पाहिली आहेत थोडी नाटकं.. कधी अडीअडचणीच्या प्रसंगी थोबाड रंगवून उभाही राहिलेला आहे विंगेत, तिथून धडपडत स्टेजवर, आणि तिथून परत धडपडत विंगेत...

पण नाटकाची एक धगधगती बाजू मात्र अगदी व्यवस्थीत, अगदी चटके बसतील इतक्या जवळून पाहिली.. ती म्हणजे त्या आयताकार स्टेजबाहेर, आणि दिव्यापाठीमागे अंधारात एक मोठं नाटक चालतं ते.

स्पर्धेच्या तारखेवर डोळे ठेवून असणे अथवा स्वता:च्याच ग्रूपच्या नाटयमहोत्सवाची तारीख ठरवणे, ती ठरल्यावर नेहेमीचे खंदे भिडू गोळा करणे,
प्रत्येकाचं मत घेऊन, नाटकाचा मूड, ढोबळ कास्टींग, वगैरेचा अंदाज घेउन साताठ संहीता गोळा करणे,
मित्राच्या रिकाम्या फ्लॅट्वर अथवा एखाद्या वाड्यातल्या एखाद्या खोलीत रात्रभर सगळे जमून सगळ्या संहितांच सँपल वाचन करणे. प्रत्येक संहीतेमधल्या मजबूत अथवा कमकूवत जागा यावर चर्चा करून दोनतीन संहीता फायनल करणे,
साधारण लूज कास्टींग इथेच होते, काहि भुमीका क्लेम केल्या जातात काही गळ्यात मारल्या जातात, बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते.
संहीता निवडली की त्याचा दिग्दर्शक ठरवणे, एकदोन हुकूमी दिग्दर्शक असतातच, त्यातला एक फायनल केला की त्याला संहीता आवडत नाही, मग ती बदलावी लागते, (इथे मल्टीपल लूप टू 'संहीता ठरवणे' स्टेप). मग त्याला कास्टींग आवडत नाही, ते थोडंसं बदलावं लागतं,

या सगळ्यामधे कुणाचं लफडं कुणाशी चालू आहे, कुणाचं कुणाशी पटत नाही, मागच्या वेळेला कुणी टांग मारली होती, कोण माजला आहे, कोण त्या ह्यांचा खास आहे, वगैरे सगळं लक्षात ठीवावं लागतं,

या सगळ्या गदारोळातून एकदाची संहीता आणि कास्टींग फायनल होतं. आणि त्याचदिवशी असं लक्षात येतं की प्रयोगाला खूपच कमी दिवस राहिलेले आहेत, मग इतकं अवघड स्क्रिप्ट निवडल्याबद्दल मला दोष देण्यात येतो, मग आता तालमी तरी व्यवस्थीत करा असं मलाच सांगण्यात येतं.

मग तालमीसाठी जागेचा शोध...

एखाद्याची रिकामी खोली, एखादा रिकामा फ्लॅट, एखाद्याच्या घराचा मोठा हॉल, एखादा पडका वाडा, गुळाचं गोडावून, खाजगी मालकीचं मंदीर यापैकी एक तालमीला मिळवावं लागतं, त्या जागा मालकाच्या नाकदुर्‍या काढल्यावर एकदाचा तालमीचा नारळ फुटतो..

मग तालीम सुरू होते, त्या नाटकात जर दोनपेक्षा अधीक पात्रे असतील, एखादा ड्यान्स वगैरे असेल तर जागामालक अचानक त्याच्या म्हातारीला आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करतो, मग पुन्हा मल्टीपल 'लूप टू जागा शोधणे'

प्रयोगाची तारीख जवळ येतच असते, जागेचा प्रश्न कसातरी सुटतो, मग तालीम वेग पकडते...

बहुतेक सगळी पात्रे ही दिवसाढवळ्या कुठेतरी कॉलेज, मामाचं किराणामालाचं दुकान, बापाचं चहाचं हॉटेल, मेडीकलचं दुकान, सराफी पेढी, कॉम्पुटरदुरुस्तीचा व्यवसाय वगैरे व्यवधानात व्यस्त असल्यामूळे तालमी नेहेमीच रात्री कराव्या लागतात.. एखादं नाटक असेल तर ठीक आहे पण नाट्यमहोत्सवात तीन नाटके करताना रात्री नऊला तालीम सुरू करून सकाळी सहाला संपवावी लागते..

नाटक आता जरा बाळसं धरू लागतं..

तेवढ्यात कुणालातरी आठवण येते, की आपण लेखकाची परवानगी नावाचा सोपस्कार अद्याप केलेलाच नाही, मग लेखकाचा फोननंबर आणी करंट पत्ता याची शोधाशोध.. तो काही मिळत नाही, मग पुस्तकातल्याच पत्त्यावर एक पत्र आणि एकशेएक रुपये मानधनाचा चेक पाठवला जातो..

तालमीत कोण कमी पडतोय, कोण जड होतोय, कोण झोपतोय, कोण कचकचीत,कोण ऐनवेळी पो घालणार यावर रोज रणकंदन आणि उखाळ्यापाखाळ्या. (या प्रसंगी मात्र माझ्या थोड्याशा हुकूमशाही स्वभावाचा आणि माजुर्डेपणाचा फायदा खूप व्हायचा..)

मग कपडेपट, साउंड, आणि नेपथ्य...

नाटकातल्या मुलींचे कपडे जमवणं आणी नाटकात काम करायला मुली जमवणं यात जास्त अवघड काय हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहिये..

साउंडवाला जो निवडलेला असतो त्याला सगळ्या प्रसंगात बॅकग्राउंडला सनईच वाजवायची हुक्की येते, सनई नसेल तर बॅगपायपर.. मग कुणाचातरी कॉप्युटर पकडायचा, साउंड एडीटींग सॉफ्ट्वेअर दोन दिवसात मीच शिकायचं आणि सगळे ट्रॅक परत एडीट करायचे..

आता नेपथ्य,
दिग्दर्शक सोडून सगळ्यांच मत असतं की नेपथ्य एकदम साधं करायचं यावेळेला, पण दिग्दर्शक अडून बसतो.. त्याचं म्हणणं पडतं की नेपथ्य जबरा नसेल तर पहिला अंक पालथा पडेल आणि दुसरा अंक उठणारच नाही. नेपथ्य करायचं ठरतं... काय करता.. जमतील तेवढ्या टूव्हीलर घेऊन जत्रा हार्डवेअर च्या दुकानात... (गावाकडे नेपथ्य भाड्यानं मिळत नाही भाऊ, स्वत: खपून बनवावं लागतं..)

मग प्लायवूड, लाकूड, खिळे वगैरे खरेदी, ते घेऊन ओळखीच्या सुताराकडे.. हा एकटाच माणूस असा असतो की जो प्रोफेशनल असूनही त्याला नाटकाच्या कुठल्याही कामात मनापासून विन्ट्रेष्ट असतो.. तो मनापासून आठ बाय तीन चे फ्लॅट बनवून देतो..

ते फ्लॅट घेउन जत्रा पुन्हा कुणाच्यातरी बागेत अथवा गोडावून मधे.. अहो नुसते फ्लॅट तयार करून चालत नाहीत, ते रंगवावे लागतात.. रात्री सगळी पुर्वतयारी होते, डिस्टेंपरचे डबे, ब्रश, दारे खिडक्या रंगवायला एक त्यातल्यात्यात बरा चित्रकार जमवले जातात.. रात्री अकरा वाजता डिस्टेंपरचा डबा फुटतो आणि लक्षात येतं की थिनर आणायचा राहिला.. मग एखाद्या हार्डवेरवाल्या मगनलाल मालपाणीच्या पोराला फितवून, दुकान उघडून थिनर आणायचा..

सगळे फ्लॅट जमीनीवर आडवे टाकून कंबर मोडेपर्यंत पहिला हात मारायचा, रात्रभर पाठीचा आणि कंबरेचा भुकना पडतो.. मग दुसर्‍यादिवशी रंग वाळू द्यायचा, मग रात्री परत दुसरा हात... एवढं सगळं करून नाटकाचे फ्लॅट नावाची लपलपणारी वस्तू तयार होते..

क्रमश:

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Sep 2012 - 9:57 pm | पैसा

नाटकाच्या सूत्रधाराच्या कळा मस्त शब्दात पकडल्या आहेस. ते क्रमशः जास्त दिवस टांगून ठेवू नको बरं!

बहुगुणी's picture

8 Sep 2012 - 10:35 pm | बहुगुणी

लवकर येउ द्यात पुढचा (पुढचे) भाग.

मस्त!
पुढच्या भागाची वाट पाहण्याएवढं मस्त.

आमचा अन नाटकाचा "पाहणे" सोडुन दुसरा संबंध नाही त्यामुळे नविन माहीती मिळतेय. आवडेश.

एका नाटकाच्या ब्याकस्टेजला काम केलेय त्रेतायुगात कधीकाळी , तस्मात थो ऽ डासा परिचित आहे या सर्वांशी -अर्थात क्रिएटिव्ह साईड सोडून. पण सूत्रधाररूपी नारायणाची धावपळ लै मस्त रंगवली आहे. और नक्कीच आंदो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Sep 2012 - 12:56 am | विश्वनाथ मेहेंदळे

आवडले... पु भा प्र.

भडकमकर मास्तर's picture

9 Sep 2012 - 1:14 am | भडकमकर मास्तर

अहहा.... वाचतोय...
संगेीत मानापमनाचे प्रयोग अ जून डीट्टेलवार येउद्यात... मजा येइल...

प्रचेतस's picture

9 Sep 2012 - 9:12 am | प्रचेतस

मस्त रे अर्धवटा.
येऊ देत पुढचे भाग पटापटा.

मन१'s picture

9 Sep 2012 - 11:23 am | मन१

बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते. अत्युच्च ओळ. मर्फिज् लॉ च.
.
काही जण ग्रुपमध्ये नवीन असतील तर ते त्यांचं काही (त्यांना ) धाडसी वाटणार्‍या सीनला नाही नाही म्हणणं, त्यात काही पर्याय आहे का असं सतत विचारत्/शोधत राहणं हे गंमतीशीर वाटतं.
.
दोन -तीन अंकी बसवत असाल तर run through च्या वेळेस, आधी एक एक अंक/प्रवेश सुटा सुटा करत असाल तर प्रथमच अथ पासून इतिपर्यंत करत असल्यास गडबडून जाणे. थेट दोन्-तीन पाने खाउन पुढेच उडी मारणे असेही किस्से असतात. स्त्री कलाकरांचे येण्याजाण्याचे टायमिंग सांभाळणे, स्त्री कलाकाराच्या घरी नाट्यकलेची काही पार्शभूमी नसेल तर त्यासाठी त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करणे हे एक अग्निदिव्य.
.
ग्रुपमध्ये कित्येकदा एखादा अ‍ॅडिशनसम्राट असतो.तो आयत्यावेळी स्वतःला लक्ष्मीकांत बेर्डे समजत वाटेल तसे अ‍ॅडिशन सुचवीत जातो, तालमीत करतो, तेव्हा त्याला दिग्दर्शक, इतर ग्रुप समजून तरे घेउ शकतो, तिथे दुरुस्तीस वाव असतो. पण काहीजण भूमिकेत इतके शिरतात की ऐनवेळेस खुद्द प्रयोगात अ‍ॅडिशन सुरु ! आणि समोरचा ती पेलण्याइतका ताकदीचा नसेल तर स्वतःच्याच प्रयोगास हिटविकेट.
.
एक अवांतर शंका :- अंकुश चित्रपटातील नना पाटेकर- सुहास पळशीकर ह्या बेरोजगार तरुणांप्रमाणे दाढ्या वाढवत नि शिगारेटी फुकणारेच चांगले कलाकार बनतात की चांगले कलाकार बनल्यावर ते असे बनतात?
.
हल्ली कुठे तसे होत नाही, पण फार मागे ग्रामीण भागात संहितेची गरज म्हणून कधीच कुणी स्वत्;ची मिशी कापून देण्यास तयार होत नसे. अगदि स्त्रीचे काम करणारे पुरुष कलाकारही.
.
कित्येकजण आपापलं वैयक्तिक सादरीकरण उत्कृष्ट करतात, पण इतरांचे संवाद सुरु असतानाही बाकीचे त्याच नाटकाचा भाग असतात, हे समजावून सांगताना नाकी नौ येतात. तिपिकल केस; - जेव्हा एखाद्या प्रमुख पात्राचे स्वगत, किम्वा इतर कुठलेही लांबलचक संवाद सुरु असतील, तेव्हा इतरांनी काय करायचं? हे प्रत्येकास दरवेळी सम्जावून सांगणं आनि ते त्यांनी तसच पाळणं कर्मकठीण आहे.
.
तालमीच्या काळात भूक मुख्यत्वे भागते ती वडापाव, चहा-बिस्किटे वगैरेवर. कारण सगळे उपद्व्याप सांभाळून तालमी करायच्या तर घरी जाण्यस पुरेसा वेळ नसतोच.

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2012 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर

-आपल्याला संवाद नसताना, आपल्या शेजारी लटकणार्‍या ह्या दोन हातांचे काय करावे ही सर्वात मोठी समस्या असते.

-प्रॉम्प्टरने आपण अ‍ॅक्टर नसून प्रॉम्प्टर आहोत हेच विसरणं.

-प्रकाशयोजना आणि ध्वनीयोजना सांभाळणार्‍यांनी आपले काम विसरून नाटकात समरस होऊन पाहात राहणं.

- पडदा पाडणार्‍या व्यक्तीस प्रत्येक अंकातील शेवटचे वाक्य माहित असणं आणि त्याने त्या त्या वेळी तिथे पडदा पाडायला उपस्थित असणं अत्यंत गरजेचं.

- रंगभूषा करणार्‍या कलाकाराने नाटकाच्या सुरुवातीच्या आधी कमीतकमी दोन तास प्रयोगाच्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Sep 2012 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतोय...

लवकर टंका पुढचा भाग.

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Sep 2012 - 1:57 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच रे अर्धवटा...

कधी काळी युनिवर्सिटीच्या वार्षीक संम्मेलनाच्या वेळेस हीच सर्व धावपळ मनापासून केली होती त्यामुळे तुझ्या भावना जशाच्या तश्या पोचल्या....छ्या... फ्लॅट, संहीता, अ‍ॅडीशन्स, चक्री तालीम, रंगीत तालीम अगदी नॉस्टल्जीकच झालो....

ज्या वाक्याला तालीमीच्या वेळेस हमखास लाफ्टर येईल असे वाटायचे ते संवाद प्रेक्षकांनी मख्खपणे ऐकावे आणी ज्याला कधीही कल्पना पण केली नसेल अश्या संवादांना लाफ्टर मिळून प्रेक्षकांनी ते संवाद टाळ्या आणी शिट्ट्यांनी डोक्यावर घ्यावेत असेच घडायचे बरेच वेळा... :)

आता लवकरच पुढचा भाग टाक...

चाफा's picture

9 Sep 2012 - 4:09 pm | चाफा

अ‍ॅड्या प्रचंड आवडलं :) आणि आता स्पर्धा तोंडावर आलेल्या असताना टायमिंग मस्तच जमलंय :)
वाट पहातोय रे ...........

जयनीत's picture

9 Sep 2012 - 8:23 pm | जयनीत

मला त्या सगळ्यात कधीही रस वाटला नाही,
पण तुमचे अनुभव वाचायला मस्त वाटत आहे.
पुढचा भाग लवकर येउ द्या.

स्पंदना's picture

10 Sep 2012 - 8:36 am | स्पंदना

येस्स!

सेमच म्हणते . येउद्या पुढचा भाग.

वसईचे किल्लेदार's picture

9 Sep 2012 - 11:35 pm | वसईचे किल्लेदार

आमच्या गावाला दरवर्षि नाटक असते राव ... पण प्रॉम्प्टर शिवाय कलाकार विंगेतुन बाहेर यायचि हिम्मत न्हाय करित!

(प्रॉम्प्टरचा आणि तुमच्या लेखाचाबि फ्याण)

एस's picture

10 Sep 2012 - 6:15 pm | एस

नाटकाच्या सूत्रधारासच नव्हे तर इतरही बर्‍याच प्रसंगांच्या आयोजनाच्या वेळी असा अनुभव हमखास येतो. पुभाप्र.