बर्याच दिवसांची सुट्टी मिळवण्यात चक्क यशस्वी झालो आणि एका आठवडाभराची सुट्टी घेऊन पुण्याला आलो. चेन्नैच्या उष्णदमट हवामानाला भयंकर वैतागलो असल्यामुळे पुण्यात आल्यावर ढगाळ आणि थंड वातावरणात एकदम दिल खुष झाला. कुठेतरी जवळच्याच शांत समुद्रकिनारी मुक्कामी जाऊन आराम करायचा बेत होता, जास्त ड्राइव्ह करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या मुरुड-जंजिरा येथे जायचा प्लान बनवला.
मागे एकदा मित्रांबरोबर मुरुड-जंजिरा, व्हाया अलिबाग, केले होते. त्यावेळी अलिबागला हॉटेल पतंग मध्ये भयंकर टेस्टी मासे खाल्ले होते, खासकरून 'तिसर्या मसाला'. तिथे बायको मुलांबरोबर एकदा हादडायला जायचे हे मागेच ठरवलेले होते. त्यामुळे ह्यावेळी अलिबागला जेवण करून मुरुड-जंजिर्याला पोहोचायचे असे ठरवून पुण्यातून सकाळी सात वाजता निघालो. खंडाळ्याला पोहोचलो तेव्हा पाऊसाची एक सर येऊन गेली होती, सगळीकडे धुके पसरून वातावरण एकदम रोमॅन्टीक झाले होते. गाडी कोपर्यात लावून फोटो काढायचा मोह टाळता आलाच नाही.
त्यानंतर पेणपासून पुढे रस्ता दुतर्फा हिरव्यागार गर्द, घनदाट झाडांनी सौंदर्यबद्ध केला होता.
अलिबागला वेळेवर पोहोचलो पण ह्यावेळी हॉटेल पतंगमध्ये एकदम भ्रमनिरास झाला. तिसर्या नव्हत्या आणि पापलेट चक्क शिळे होते. त्यामुळे तिथे काही फोटो काढले नाही. पण अलिबागवरून निघून मुरुड जंजिर्याच्या रस्त्याला लागल्यावर मुलाने कॅमेरा ताब्यात घेऊन त्याची फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.
दुपारी साधारण दोन अडीचच्या सुमारास मुरुडला गोल्डन स्वान बीच रिसॉर्टला पोहोचलो.
आता गेलो आणि हसूच आले. 'गोल्डन स्वान' हे नाव, 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' ह्या म्हणीला सार्थ करीत होते. स्वान्स ऐवजी बदके बागडत होती सगळीकडे, तीही चक्क पांढरी. :)
पण रिसॉर्ट एकदम झॅक आहे. स्वच्छ, सुंदर आणि आटोपशीर.
रुममध्ये जाऊन एक डुलकी काढली. उठल्यावर एकदम फ्रेश वाटत होते. मस्त पाऊस पडून वातावरण कुंद झाले होते. त्या वातावरणात आपोआपच फ्रेश व्हायला होत होते. मग मस्तपैकी एक कॉफी मारली आणि रिसॉर्टच्या, बीचला लागून असलेल्या, शॅक मध्ये जाऊन आरामात समुद्राचा वारा खात पाय लांब करून पडलो. तिथून दिसणारा नजारा एकदम मस्त होता, हा असा...
लांबवर एक दीपस्तंभ दिसत होता. त्याच्यावरचा दिवा चालू बंद, चालू बंद होत होता. तो चालू असताना फोटो टिपण्यासाठी मुलाने बर्याच क्लिक्स मारल्या. शेवटी तो दिवा चालू असताना तो कॅमेराबद्ध करणे त्याने जमवलेच.
त्यानंतर सूर्याचे थोडे दर्शन झाले. सूर्यास्ताची वेळही झाली होती आणि आम्ही बीचच्या सनसेट पॉइंटवरच लोळत पडलो होतो. त्यामुळे सनसेट बघायला तसेच टिपायला मिळेल अशी आशा पल्लवित झाली, पण दोनच मिनिटांत पुन्हा वातावरण ढगाळ झाले आणि सनसेट काही बघायला मिळाला नाही.
त्याआधी मुलांनी बीचवर सॅंडपेंटींगची मजा लुटली होती.
दुसर्यादिवशी सकाळी आंघोळी, ब्रेकफास्ट उरकून, चेकआऊट करून जंजिरा किल्ला पाहायला निघालो. मुरुडवरून जंजिर्यासाठी जाताना रस्त्यावरून हे गावाचे असे विलोभनिय दृश्य दिसते. ह्याच गावातून बोटीने जंजिरा किल्ल्यात जाता येते.
आम्ही साधारण बाराच्या सुमारास तिथे पोहोचलो. गावाच्या एंट्रीला 10 रुपयांची पावती फाडली. पुढे आलो तर पार्किंगसाठी एक माणूस जागा दाखवून पार्किंगसाठी मदत करू लागला. गाडीतून उतरल्यावर, प्रायव्हेट बोटी जातील किल्ल्यात लवकर जा जेटीवर, संध्याकाळी 5:30 वाजता शेवटची बोट असते वगैरे माहिती देउ लागला. मी ह्या आदरातिथ्याने भारून जायच्या आतच त्याने 20 रुपये मागितले, पार्किंगचे. गुपचुप काढून दिले आणि जेटीच्या दिशेने निघालो. थोडे पुढे आलो तर एक काका म्हणाले, "अरे, आता पुढे जाऊ नका! 12-2 नमाजसाठी बोटी बंद असतात". मागे वळून पाहिले तर तो पार्किंगचे पैसे घेतलेला गायब झाला होता. आता काय? चला चुकून एखादी बोट निघतेय का ते बघूयात म्हणून तसेच पुढं निघालो. परत 2-3 जणांनी, "अरे, बोटी 2 वाजेपर्यंत बंद आहेत" असे ऐकवून मूर्ख बनल्याच्या जखमेवर मीठ चोळले. पुढे गेल्यावर एका ऍन्गलवरून किल्ल्याचे, जंजिर्याचे, दर्शन होत होते. तिथेच फोटो काढून परत फिरलो. 2 तास नुसतेच तिथे थांबणे शक्य नव्हते, पुण्याला रात्र व्हायच्या आत पोहोचायचे होते.
तिथून पुढे रोहा मार्गे पालीच्या गणपतीला, बल्लाळेश्वराला, जायला निघालो. हाच तो बल्लाळेश्वराचा डोंगर. तिथे देवळात आणि परिसरात फोटो काढायला बंदी होती. ही बंदी का असते हे कोडे काही केल्या माझ्याच्याने अजून उलगडलेले नाही.
त्याआधी, मध्ये, रोह्यात जेवायला थांबलो होतो. तिथली एकंदरीत हॉटेले बघितल्यावर कुठे जेवायचे असा यक्ष प्रश्न पडला होता. जी काही हॉटेले लोकांनी सांगीतली ती काही जेवण्यासारखी नव्हती आणि तसेही मला त्या हॉटेलांमध्ये जाऊन पंजाबी मेनू खायची अजिबात इच्छा होइनां. मग गाडी लावली एका कोपर्यात आणि मी जरा ST स्टॅन्डवर गेलो आणि लोकांशी गप्पा मारून जेवण्याची चौकशी करायला सुरु झालो. त्यातून कळले की त्या ST स्टॅन्डच्या वरच्या मजल्यावर एक खानावळ आहे आणि तिथे मालवणी जेवण मिळते. तसेच ते हॉटेल स्वच्छ आहे ही मोलाची माहितीही कळली. आणि खरोखरीच ते हॉटेल एकदम झक्कास होते. एकदम टेस्टी, तिखट आणि चमचमीत.
पापलेट थाळी
कोळंबी थाळी
व्हेज थाळी
एकंदरीत दोन दिवस, धकाधकीच्या रहाटगाडग्यापासून लांब, एकदम झक्कास गेले!
प्रतिक्रिया
20 Aug 2012 - 1:10 am | कुंदन
मस्त रे सोकाजीराव.
फोटो आवडले.
20 Aug 2012 - 9:11 am | किसन शिंदे
सोकाजीराव, फोटो एकदम भारीच!
अरे!! हा बल्लाळेश्वराचा डोगंर आहे??
आम्ही तर यालाच सुधागड समजून फसलो.
आणि तुम्हाला बंदी कशी काय केली बल्लाळेश्वराच्या परिसरात फोटो काढायला?
हे काय आम्ही काढले कि फोटो बल्लाळेश्वराच्या मंदिरात.
मी, विमे आणि विलासराव!

20 Aug 2012 - 9:27 am | मदनबाण
छान... :)
20 Aug 2012 - 9:53 am | सुहास झेले
तो बल्लाळेश्वराचा डोगंर नाही... सरसगड आहे :)
बाकी आटोपशीर दौरा झालेला दिसतोय :) :)
20 Aug 2012 - 9:55 am | स्पा
तो बल्लाळेश्वराचा डोगंर नाही... सरसगड आहे
ह्येच बोलतो
20 Aug 2012 - 10:00 am | सुहास झेले
आम्ही केलेला सरसगड....
१.
२.
३.
20 Aug 2012 - 10:05 am | मन१
मस्त आणि चविष्ट
20 Aug 2012 - 10:05 am | मन१
मस्त आणि चविष्ट
20 Aug 2012 - 10:57 am | प्रचेतस
छानच.
बाकी ऐन पावसाळ्यातही अगदी कोरडं दिसतय.
20 Aug 2012 - 11:03 am | बॅटमॅन
मस्त हो सोत्रि! किसन आणि सुहास यांचे फटूदेखील भारी :)
20 Aug 2012 - 11:20 am | अत्रुप्त आत्मा
सोकूअण्णा की जय हो........... आज का दिन मंगलमय हो.. :)
20 Aug 2012 - 11:30 am | पैसा
http://www.misalpav.com/node/21654 इथला अनुभव पाहता तुम्ही थोडक्यात बचावलात म्हणायचे!
20 Aug 2012 - 12:05 pm | सोत्रि
इतका अनुभव वाईट नव्ह्ता माझा. उलट माझे पार्किंगला घेतलेले २० रुपये परत मिळाले मला.
आणि बोटींबद्दल म्हणाल तर एक चक्क ऑफिस होते किनार्याजवळ. पण ते बंद असल्याने बुकिंग कधी होते ते माहिती नाही.
पण मुरुड मधल्या रिसॉर्ट मध्ये मिळालेल्या माहितीनुसार बोटी नियमीत चालू असत, शुक्रवारच्या नमाजचा (१२-२) अपवाद सोडून .
- ( भटक्या ) सोकाजी
20 Aug 2012 - 11:35 am | चिंतामणी
आणि लिखाणसुद्धा.
पण आटोपशीर करण्यात नेहमिची खुमारी "मिसींग" आहे असे सखेद म्हणतो.
>>सगळीकडे धुके पसरून वातावरण एकदम रोमॅन्टीक झाले होते. गाडी कोपर्यात लावून
हे वाक्य इथे तुटले आहे आणि पुढचे वाचल्यावर दाणकन जमिनीवर आलो. ;)
20 Aug 2012 - 11:37 am | गवि
मस्त..
धमाल केलीस फ्यामिलीसोबत.. उत्तम...
मुरुडला पाटील खानावळ हे ठिकाण चुकवलंस असं दिसतं.
वाटेत काशिद बीचला थांबायला हवं होतंस. पुढच्या वेळी याच रस्त्यावर काशिद गावी प्रकृती रिसॉर्टमधी मुक्काम टाका एक दिवस. ८००० ऑल इन्क्लुझिव कदाचित जास्त वाटतील पण एकबार जाओगे तो याद करोगे.. बाकी काही बोलत नाही. या ठिकाणी जाच इतकं बोलून थांबतो..
रोह्याची टिपही उत्तम दिलीस.. धन्यु..
20 Aug 2012 - 11:46 am | सोत्रि
नाही, नाही... रात्रीचे जेवण पाटील खाणावळीतच घेतले. रात्री पाउस होता म्हणून कॅमेरा नव्हता बरोबर.
काशिदच्या प्रकृती रिसॉर्टच्या माहितीबद्दल धन्यवाद्द
- (भटक्या) सोकाजी
20 Aug 2012 - 5:38 pm | सुधीर
फोटो आवडले. खास करून समोरून येणार्या एस. टी.चा. (आणि त्या खालचा) खूप वर्षापूर्वी रायगड सर करून झाल्यावर गेलो होतो मुरुड जंजिर्याला, त्यावेळेस रस्ते इतके छान नव्हते आणि समुद्रकिनाराही खूप काळपट वाटत होता.
22 Aug 2012 - 7:14 pm | गणेशा
मस्त..
पण शेवटचेच २-३ फोटो दिसत आहेत बारटक्के मेस चे.
बाकीचे फोटो दिसले नाहित त्यामुळे निराशा झाली.
22 Aug 2012 - 8:01 pm | गणपा
आयला ही मिपाकर मंडळी जातात भटकायला हरकत नाही. जाउन आल्यावर तिथले नयनरम्य फोटु टाकतात तेही एकवेळ मान्य. पण तिथे केलेली 'चंगळ' दाखवून आमची पोटे का दुखवतात कळत नाही. तेवढ्यासाठी सोक्याचा निषेढ.
23 Aug 2012 - 11:25 am | विजुभाऊ
गणपा............. चांगला वचपा काढ तु केलेल्या डिशेस दाखवून त्या सर्वाना झक्क जळव.
तिसर्या / बांगडे /सोडे /पापलेट किंवा टायगर प्रॉन्स असली एखादी फर्मास डिश टाकच
23 Aug 2012 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार
फटू आणि वर्णन भारीच.
किनार्यावरती शहाळ्यात टाकून काय काय ढोसले त्याचे वर्णन नसल्याने अंमळ निराशा झाली.
खंडाळ्याला जात असताना तुम्ही वाटेत सुलभगड का केला नाहीत ? त्याच्या दर्शना शिवाय सहल अपूर्णच !
हा आम्ही केलेला सुलभगडचा ट्रॅक :-

गडावरील काही बांधकामाचा प्लॅन देखील जुन्या बखरीत बघता आला :-

ट्रेकचे मिपावरती लाइव्ह रिपोर्टिंग करताना :-

23 Aug 2012 - 9:25 pm | सोत्रि
लेका,
शेवटचा फोटो काय पण नामी शोधला आहेस :-)
एक लार्ज भेटल्यावर त्याबद्दल.
बाकी सुलभगडावर जाणे राहिले यार :-(
पुढच्या वेळी नक्की
-(मर्कटलीला आवडणारा) सोकाजी