"बस्स्स... ठरलं. हाच ट्रेक फायनल कर..."
"हो...हो...मी सगळ्यांना ईमेल करतो आणि हरिश्चंद्रगड बघुनच ह्या वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक सुरु करायचे..."
"व्वा व्वा... इतके कन्फर्म झाले पण?. सही आहे. गडाच्या वाटेची सगळी माहिती काढ, नकाशा घे आणि गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या नामदेवला फोन करून सांग आम्ही येतोय.
(ट्रेकच्या आदल्या दिवशी)
"अरे सुदा, हा नाही रे जमणार ह्याला किमान दोन-अडीच दिवस तरी हवेत"
"...??" :( :(
"तू ऑफिसला पोच मी आणि दिप्या दुसरा प्लान करतो आणि तुला कळवतो...."
".....!!!" :-|
अगदी शेवटच्या क्षणी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा विचार बदलला आणि आम्ही निघालो ऐन मावळात वसलेल्या रोहिड्याकडे. :)
किल्ले रोहीडा (विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला). पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर भोर गावी वसलेला हा गडकोट. दुरून बघावा तर लाल-काळ्या मातीचा मोठ्ठा मुरूम ठेवल्यागत हा किल्ला दिसतो. ह्या किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. स्वराज्याच्या इतिहातलं एक रत्नजडित सोनेरी पान म्हणा हवं तर. ह्या किल्ल्यावर घडलेल्या एका प्रसंगाची थोडक्यात माहिती देतो, तेव्हा तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. सदर माहिती रणजित देसाईंच्या, पावनखिंड ह्या पुस्तकात अगदी विस्ताराने वाचता येईल.
ह्या गडावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी होती. भोरच्याजवळ असलेल्या सिंध येथील बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे थोरले बंधू फुलाजी देशपांडे, हे बांदलांकडे सरदार म्हणून कार्यरत होते. दोघेही शूरवीर आणि आपल्या धन्यासाठी काहीही करायची त्यांची सदैव तयारी असे. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील व्हा, म्हणून आमंत्रण धाडले. इकडे बांदलांच्या दरबारात राजेंच्या खलित्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. त्यांच्या मागणीबद्दल काय करावे, म्हणून कृष्णाजींनी बाजींना त्यांचे मत विचारले. बाजी उत्तरले, "राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आमचं स्पष्ट मत आहे, शिवाजी मोठा होण्याआधीच त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचे एकच उत्तर जाईल.....उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो"
छत्रपतींना बांदलांकडून नकाराचा खरमरीत खलिता पाठवला गेला. भर सदरेत खासे लोकांसमोर तो खलिता जेव्हा महाराजांसमोर वाचला गेला, तेव्हा महाराजांनी नाईलाजाने तडक रोहीड्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला. त्याच रात्री आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने किल्ल्यावर अचानक आक्रमण केले गेले आणि किल्ल्यावर एकच धावपळ सुरु झाली. बघता बघता एक एक चौकी बांदलांच्या हातून जात होत्या. आबाजींच्या पट्ट्याचा मानेवर वार होऊन, गडाचा धनी कृष्णाजी बांदल पडला आणि बांदलांचे बळ सरले. त्याचवेळी धिप्पाड देहाचे बाजी त्वेषाने पुढे आले आणि आबाजींना मैदानात उतरायला ठणकावले.
तितक्यात राजे आपल्या धारकऱ्यांसह तिथे आले आणि त्यांनी आबाजीला मागे होण्याचा हुकुम दिला. आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी समोरासमोर ठाकले होते. ही बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट. महाराजांनी त्यांना समजावले, की गड आमच्या ताब्यात आहे. त्यावर बाजी म्हणाले, "असं तुम्ही समजता, राजे. जोवर हा बाजी उभा आहे, तोवर गड तुमच्या ताब्यात आलाय असे समजू नका." बाजींनी महाराजांना युद्धाला पुढे व्हा असे ठणकावले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. एक हातात तलवार आणि एका हातात पट्टा घेऊन ते राजासमोर उभे होते,"मी निष्ठेने माझ्या धन्याची सेवा केली आणि तो गेल्यावरसुद्धा आमच्या निष्ठेत काडीमात्र बदल होणार नाही." महाराजांनी आपली तलवार म्यान केली आणि बाजींना सांगितलं, "झालं ते विसरून जा. ही भवानी तलवार फक्त अन्यायाविरुद्ध बाहेर पडते. आम्हाला तुमच्यासारख्या अनुभवी लोकांची गरज आहे, आम्हाला योग्यवेळी सल्ला देण्यासाठी, ह्या आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, इतल्या माणसात इभ्रत मिळवण्यासाठी. आपल्या आयाबहिणींची अब्रू रक्षण करण्यासाठी, आपले देव आणि देवळं सुरक्षित राखण्यासाठी...कृष्णाजी आम्हाला सामोपचाराने मिळाले असते, तर बरं झालं असतं. आम्हाला राजेपणाची हौस नाही. ना जुलूम-जबरदस्तीची, पण बांदलांनी वैर पत्करलं" राजेंच्या ह्या उत्तराने बाजींच्या हातातला पट्टा गळून पडला आणि ते राजांच्या मिठीत बद्ध झाले. महाराजांनी बांदलांची वतनदारी कायम राहील असे सांगितले आणि त्यांच्या वतनाला काहीही धक्का लागणार नाही असे वचन दिले.
किल्लाची चढाई सोप्पी आहे. एका तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. गडाचे प्रवेशद्वार गोमुखी आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या उजवीकडे एक पाण्याचे खोल टाकं आहे. असं म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे, पण आत उतरून बघितल्यावर असं वाटलं नाही. तिसऱ्या प्रवेशद्वारावर दोन राजमुखे आहेत. तिथे एक देवनागरी शिलालेखदेखील आहे. गडावर अनेक भग्न अवशेष पडून आहेत, त्यातल्यात्यात दुर्ग संवर्धन समितीने गडावर स्वच्छतेचे बऱ्यापैकी काम केले आहे. गडावर असलेले रोहीडमल्ला मंदिर बंद होते. मंदिराची डागडुजी करून ते भक्कम बांधलेलं आहे. गडावर पाण्याच्या मुबलक टाक्या आहेत. तटबंदी ढासळलेली आहे, पण काही बुरुज ताठ मानेने उभे आहेत.
फत्ते बुरुजावरून लांब नजर टाकल्यावर एक मंदिर दिसले. दोन डोंगरांच्या बरोब्बरमध्ये हे छोटेखानी मंदिर होते. एका पायवाटेने त्या मंदिराकडे जाता येत होते. किल्ल्यावर असलेल्या नकाशाचा योग्य अंदाज न आल्याने, आम्ही त्या मंदिराला रायरेश्वर समजून तिकडे तडक निघालो. वाटेत मोदक, सागर PDY, किसन देव, श्री व सौ राज जैन आणि दूरन येणाऱ्या गणेशाला हात दाखवून त्या मंदिराकडे निघालो. पाऊस नव्हता आणि पायवाट अतिशय भुसभुशीत होती. जरा पाऊल चुकीचे पडलं, तर कपाळमोक्षच. तरी तिथे घाईघाईत पोचलो आणि नंतर समजले हे ते मंदिर नव्हे. पण त्या मंदिराच्या ओढीने आम्ही तो लांबलचक खडतर प्रवास २०-२५ मिनिटात पूर्ण केला होता. कारण आम्हाला जमल्यास किल्ले पुरंदरला सुद्धा भेट द्यायची होती.
सरतेशेवटी काही कारणास्तव ती भेट हुकली, पण ट्रेक पर्वाची अतिशय सुंदर सुरुवात झाली. वडिलांच्या आजारपणामुळे आणि हापिसच्या कटकटीतून सुटका न झाल्याने, वर्षभर काहीच ट्रेक झाले नाहीत. यावर्षी त्याची यथेच्छ भरपाई करायचे वचन देऊनच माघारी फिरलोय.
अरे हो फोटो राहिले..... :) :)
१.
२. किल्ले रोहिडा....
३. सूर्योदय..
४.
५.
६. किल्ल्याचे प्रवेशद्वार....
७.
८. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे असलेले पिण्याचे पाण्याचे टाकं.
९. तिसरे प्रवेशद्वार. इथे देवनागरी शिलालेख आहे.
१०. देवनागरी शिलालेख..
११. राजमुख....
१२.
१३.
१४. फत्ते बुरुज...
१५.
१६. तीन जोड टाक्या...
१७.
१८. मंदिराकडे ताठ मानेने उभा असलेला फत्ते बुरुज ...
१९. हेच ते मंदिर...
२०. आम्ही सगळे फत्ते बुरुजावर .... (फोटो साभार धुंडीराज)
२१. परतीच्या वाटेला... (फोटो साभार धुंडीराज)
- सुझे !!! :)
प्रतिक्रिया
25 Jun 2012 - 1:54 pm | कवटी
फोटो आणि वर्णन छानच!
अवांतर : रणजीत देसाईंनी तो प्रसंग फारच फिल्मी रंगवलाय.
25 Jun 2012 - 1:56 pm | पैसा
सुहास, बरेच दिवसांनी लिहिलंस, पण लेख वाचून आणि फोटो बघून डोळ्याचं पारणं फिटलं!
25 Jun 2012 - 2:06 pm | प्रचेतस
मस्त रे सुझे.
पण किल्ल्याचं वर्णन अगदी थोडक्यात आटपलंस. त्या प्रवेशद्वारावरच्या दुसर्या बाजूला फारसीमधला पण एक शिलालेख आहे. तीन जोडी टाकी म्हणजे किल्ला प्राचीन असल्याचा पुरावाच. चंदन वंदन, वैराटगड, केंजळगड ह्याप्रमाणेच हा किल्लाही भोजराजा शिलाहारांनीच बांधलेला आहे.
बाकी इतिहासातल्या कहाणीच्या उल्लेखाबद्दल- कृष्णाजी बांदल हे रोहिड्याचे किल्लेदार असावेत. पुणे प्रांताची जहागिरी शहाजी राजांकडे होती. (तर किल्ल्यांची सुभेदारी शिरवळाच्या अमिनाकडे होती-चूभूदेघे).
रणजीत देसाईंच्या 'पावनखिंड' मधले वर्णन कल्पित जास्त वाटतंय.
25 Jun 2012 - 2:09 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. किल्ल्याचे वर्णन तसेच फोटोपण थोडक्यात आटोपलेत. बाकी रोहिडा भोरमध्येच आहे ही माहिती नवीन कळाली.
25 Jun 2012 - 2:21 pm | सुहास झेले
अरे हो... जमवू पुढच्यावेळी. असं वाटतं होतं खूप लिहावं, पण :) :)
आणि बरोब्बर तिथे दोन शिलालेख आहेत, पण मला ह्या शिलालेखाचे विशेष आकर्षण वाटले....
बाकी कृष्णाजी बांदल हे वतनदार होते असं वाचनात आले होते, बाकी जास्त माहिती शोधतो आणि पुस्तकाचे म्हणशील तर ते अति कल्पित वाटणे साहजिक आहे. विश्वास पाटीलदेखील त्यास अपवाद नाहीत.
:) :)
25 Jun 2012 - 2:09 pm | स्पा
वाह अप्रतिम वृतांत आणि फोटो
शेवटचे २ तर खल्लास
25 Jun 2012 - 2:39 pm | पिंगू
सर्वच छान आहे. पण मला काही जाता आले नाही.. कारण कुणी सांगितलच नाही.. :(
25 Jun 2012 - 3:10 pm | सुहास झेले
पिंगूशेठ, तुम्ही सगळे विसापूरला जाणार कळलं होतं. मला वाटलं मोदक, किसन सोबत तुही असशील. असो, भेटू लवकरचं :) :)
26 Jun 2012 - 1:36 am | मोदक
सुझे.. पिंग्या पुड्या सोडतोय.
मी फोन केल्यावर म्हणाला होता अलीबागला आलोय.
"अलीबागचा" परिणाम अजूनपर्यंत राहिला असावा. :-D
25 Jun 2012 - 2:51 pm | गोंधळी
छान.
25 Jun 2012 - 2:51 pm | उदय के'सागर
मागच्याच वर्षी ह्या गडाला भेट दिली होती काहि जिवलग मित्रांसोबत छान आठवणी जाग्या केल्यात तुम्ही (कारण हे मित्र अता परदेशात आहेत :( ).
बादवे ... मी असंही ऐकलं आहे कि खरं तर हा शिवाजीमहाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे? हे खरंय का?
25 Jun 2012 - 3:07 pm | सुहास झेले
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा.... :)
25 Jun 2012 - 10:31 pm | अत्रुप्त आत्मा
दर्जेदार.... :-)
शेवटचे २ फोटो...अगदी मस्तच
25 Jun 2012 - 11:23 pm | ५० फक्त
लई भारी फोटो धन्यवाद.
26 Jun 2012 - 10:52 am | जातीवंत भटका
सुरूवात झाली तर !
प्रचि क्र. १२ मधल्या बुरूजावर रात्र काढली होती रे आम्ही... धम्माल आली होती..
26 Jun 2012 - 11:14 am | दिपक
फोटो आणि वर्णन जबराट. गडामागची माहितीही कळाली. मस्तच आलेत फोटो..
जियो सुझे.!! :-)
26 Jun 2012 - 12:34 pm | मोदक
विसापूर ला जायचे आहे असा ठाण्याहून आदेश मिळाल्यानंतर तयारी सुरू केली, नेहमीचाच संगीत भाव खाणे सोहळा व्यवस्थीत पार पडला, आणि "का येणार नाही" याची नवीनच मजेशीर कारणे समजली. :-D
पिंगू तर अलीबागला असल्यामुळे आमच्या बरोबर येणार नव्हता पण मुंबईच्या ग्रूपने सांगीतले नाही म्हणून आला नाही. हेच उदाहरण पुरेसे ठरावे. ;-)
शेवटी हो नाही करत सागरPDY, श्री व सौ दशानन, मा. किसन शिंदे, गणेशा व एक भावी मिपाकर (याचा ID Approve झाला नाहीये) असे सात जण सकाळी ६:३० वाजता निघालो.
झकास वातावरण होते.. सडा शिंपल्यासारखा पाऊस हजेरी लावत होता, भोर पर्यंतचा प्रवास खूप वेगाने करून नाष्ट्याला गाड्या थांबवल्या. वडापाव, पोहे आणि एक मिसळ यांवर ताव मारला गेला.
किल्ल्याच्या तळातल्या गावात पोहोचलो तर अचानक गणेशा ला माहिती लागली की किल्ल्याला कुलूप आहे व किल्ली पुढच्या गावात मिळेल. सगळे लैच वैतागलो. किल्ल्याला कुलूप..??
गणेशाला चहा "चढला" असावा असे अनुमान काढून आम्ही त्यांची वाट न बघता जर्कीन, हेल्मेट वगैरे ब्यागेत कोंबले व चालायला सुरू करणार तोच गणेशा उगवला.
मग आम्हाला काहीतरी पटवून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न केला गेला... पण कुणीच न ऐकल्याने हिरमुसला बिचारा! :-D
पुढचा पाऊण तास गड चढण्यात गेला.. हशा, किस्से, गप्पा आणि "वजन वाढले आहे रे, आता दर वीकेंडला ट्रेक", "पूर्वी इतका स्टॅमिना राहिला नाही" अशी नेहमीची वाक्ये दोघा तिघांकडून आली :-)
मी आणि सागर पुढे निघालो , गडावर सुझे व कस्तुरी ची भेट झाली.
गडावर गप्पा, हशा, गडाचे शिवकालीन स्वरूप, पावनखिंड मधला उल्लेख वगैरे ने धमाल आली.
अधून मधून येणारा पाऊस, ढग, ऊन वगैरे न्याहाळण्यात वेगळाच आनंद मिळत होता...
थोड्यावेळाने गड उतरून एका साध्याश्याच हाटीलात गरमागरम जेवण केले व पुण्याच्या दिशेने गाड्या वळवल्या.
या दिवसाची "एक चांगला दिवस" अशी नोंद झाली.
रोहीडा हाच मागच्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक केला होता.. यावेळीही योग जुळून आला. :-)
26 Jun 2012 - 1:38 pm | प्रचेतस
ह्याच बुरुजाचा अस्मादिकांनी काढलेला एक फोटू.
26 Jun 2012 - 1:57 pm | गणेशा
मस्त फोटो .. असे बरेच फोटो प्रोत्साहन घेवून मी काढले आहेत ..
बाकी पिकासाचे फोटो दिसतात रे ..
26 Jun 2012 - 3:03 pm | sagarpdy
गणेशाने या ट्रेकमध्ये विशेष धमाल आणल्याबद्दल विशेष आभार!
26 Jun 2012 - 1:12 pm | गणेशा
वृत्तांत आवडला ... उपवृत्तांत पण.
फोटो मात्र दिसत नसल्याने निराशा झाली.
अहो रायरेश्वर येव्हद्या नजिक नाहि .. पण निदान भेटुन जायचे की सगळ्यास्नी.
असो पुढील भटकंतीला रिमझीम शुभेच्छा
अवांतर :
(मिपा ने मात्र फोटो आता डायरेक्ट डाऊनलोड करण्याची सेवा दिली तर फार छान होईल असे वाटत आहे, त्यात पिकासा वर आता फोटो अपलोड होत नाहि हे किस्ना ने सआंगितल्यावर राहिल्या सायल्या फोटो दिसण्याच्या आशा पण मावळायला लागल्या)
26 Jun 2012 - 1:14 pm | प्रचेतस
नेहमीचेच आहे.
गणेशाज्वर! दुसरे काय?
26 Jun 2012 - 5:13 pm | सुहास झेले
अरे गणेशा गल्लत झाली खरी, पण त्या मंदिराच्या वाटेचा प्रवास इतका थ्रिलिंग आहे की काय सांगू....रायरेश्वर आणि केंजळगड ह्या १०-१५ दिवसात ठरवू.
मित्राने पावसात काढलेला फोटो देतो इथे. त्यात तो लाल ठिपका आहे तेच हे मंदिर....
26 Jun 2012 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा
आहाहाहा... सुहासराव पारणं फिटलं बघा...डोळ्याचं... काय क्लास फोटो हाय राव.
26 Jun 2012 - 5:55 pm | बॅटमॅन
अरा ऽ ऽ बा ऽ ऽ प!!!!!! लैच भारी!!!! बैदवे सोंड वैग्रे यालाच म्हणतात कै?
26 Jun 2012 - 6:31 pm | sagarpdy
रायरेश्वर आणि केंजळगड ठरवाच! आधी एकदा गेलो होतो, सुन्दर ट्रेक आहे! परत एक भेट द्यायला आवडेल. (पण झाडी खुप वाढ्ण्याची वाट नका बघु, किडे चाऊन चाऊन हैराण करतात)
26 Jun 2012 - 3:21 pm | चित्रगुप्त
सर्व काही आवडले.
26 Jun 2012 - 6:53 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच फोटो... वर्णन अजून चालले असते :)
ह्या ट्रेकने आमच्या ५ वर्षांपुर्वीच्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या... आम्हीही जूनमध्येच हा ट्रेक केला होता आणी पहील्या पावसाचा अनुभव ह्याच ट्रेकमध्ये घेतला होता...आम्ही रोहीडा - आंबवणे - रायरेश्वर - केंजळगड असा २ दिवसांचा ट्रेक केला होता... रोहीड्या वरून आंबवण्याच्या दिशेच्या बुरुजाखालून उतरणार्या वाटेने नाझरे- आंबवण्यात उतरलो होतो. तिथले प्राचिन नागेश्वर मंदिर आणी भोरचे पंत सचिव शंकराजी नारायण यांची समाधी बघून रायरेश्वरच्या मंदीरात राहीलो होतो..
आम्ही गेलो तेव्हा रोहीड्याच्या रोहीडमल्ल देऊळाचे काम चालू होते..
पुढील ट्रेकला शुभेच्छा....
28 Jun 2012 - 2:46 pm | खुशि
रोहिडा ,खुपच सुन्दर फोटो आणि वर्णनही.
28 Jun 2012 - 8:44 pm | सुहास..
लई वेळा आवडेश ...
गणॅशा , मोदक ...ईतर फोटोच्या लिंका पाठवा जरा व्यनीत
28 Jun 2012 - 9:04 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि वर्णन आवडले, ट्रेक मस्तच झालेला असणार !
स्वाती
28 Jun 2012 - 9:17 pm | जाई.
+१
असेच म्हणते
28 Jun 2012 - 9:29 pm | निनाद मुक्काम प...
आटोपशीर आणि नेटके लेखन ,सुबक फोटो
वाचायला मजा आली.