माहुली किल्याच्या विविध आठवणी आणि अनुभव लिहायचे म्हटले तर एक वेगळ पुस्तकच होईल. किती वेळा आणि कसा कसा गेलो असेन, कधी एकटाच, कधी कुण्या सवंगड्या बरोबर तर कधी ४०-५० जणांच्या टोळ्क्या बरोबर, कधी आषाढ घनातून बरसणा-या सहस्त्राधारा अंगावर झेलत, तर कधी ग्रीष्माच्या उन्हातले चटके खात, कधी कुडकुडणा-या थंडीतून चांदण्या रात्री पायाखालची वाट तुडवत, कधी पहाटेची पहिली कसारा लोकल पकडून, कधी बाईक वरून सुसाटत तर कधी कारमधून डुलत डुलत. इतके वेळा आणि इतके वर्ष माहुलीला भेट द्यायचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग गिरीभ्रमण (नि.गी.) या आमच्या संस्थेतर्फे गेली काही वर्षे माहुली किल्ल्यावर नियमित गडसेवा केली जात असे. त्यामध्ये गडाची साफसफाई, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, गुहांची झाड-लोट आणि ईतर डागडुजी अशी काम आम्ही करीत असू. त्यामध्ये गडावर निव्वळ पिकनिकला येणा-या लोकांकडून फेकल्या जाणा-या प्लास्टिकच्या आणि ईतर (???) बाटल्या, जमा करणे हि एक डोकेदुखी होतीच. दोन-तीन गोणी भरून प्लास्टिकच्या आणि ईतर बाटल्या खाली आणल्यावर लोकांना आमचा नक्की व्यवसाय काय अशी शंका येत असे. असो. हल्ली मात्र वेळेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अभावी गडसेवा बंद झालेली आहे. तरीही वर्षातून एकदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न चुकता आम्ही माहुलीला जमतो, त्याच मुख्य कारण म्हणजे संस्थेतील आमचा मित्र कै. विवेक वेरुळकर याचे ३१ मे, १९९७ रोजी माहुली गडावर कल्याण दरवाजा मार्गे येताना झालेले अपघाती निधन.
माहुलीची समुद्र सपाटी पासूनची उंची अंदाजे २८०० फुट, तसं पाहायला गेल तर माहुली म्हणजे ठाणे जिल्ह्यातील everest. हा किल्ला भंडारगड, पळसगड आणि माहुली या तीन किल्ल्यात विभागला गेला आहे. महाराजांनी पुरंदरच्या तहात या एकाच किल्ल्याचे तीन वेगवेगळे किल्ले दाखवून स्वराज्यातील काही किल्ले वाचविले. त्यामुळे युद्धात जरी महाराज हरले तरी तहात जिंकून गेले.
माहुलीचा थोडक्यात इतिहास पाहायचा झाला तर स्वराज्यात माहुली आला १६५८ मध्ये ८ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा नवा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या असे पर्यंत मोगलांना हा किल्ला जिंकता आला नाही, पण त्यांच्या वधानंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. त्यानंतर प्रयत्न करूनही मराठ्यांना हा किल्ला १७३५ पर्यंत जिंकता आला नाही. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्यामुळे भेदनीतीचा वापर करुन गड ताब्यात घेतला.पुढे दुसर्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला.
शनिवारी सकाळी मी, सुजित, गिरीश, निलेश आणि भूषण निलेशच्या santro गाडीतून निघालो. गाडी gas वर चालणारी होती आणि नुकतीच पेट्रोलची भयावह भाववाढ झाली असल्याने gas च्या गाडीचे फायदे आणि तोटे यावर आमची चर्चा जोरात चालली होती. अहो ३०० रुपयाच्या gas मध्ये २५० कि.मी. म्हणजे धमालच नाही का? सकाळी ६ ला ठाण्याहून निघालो ते वासिंद आणि आसनगाव यामधील पिवळी गावाजवळील वांद्रे गावात साधारण ७.४५ ला पोहोचलो अंतर ५५ कि.मी.
गावातच एका घराजवळ गाडी पार्क केली आणि वाट दाखवायला कोणी मामा मिळतोय का याची चौकशी करायला सुरुवात केली. तसे मी आणि सुजित २-३ वर्षापूर्वी एकदा कल्याण दरवाजाच्या वाटेने उतरलो होतो पण सुरवातीलाच चुकामुक व्हायला नको, बाळू नावाचा माणूस गडावर घेऊन जातो अशी माहिती होती चौकशी अंती कळले गावात ४-५ बाळू आहेत शेवटी एक बाळू आमच्या बरोबर यायला तयार झाला.
८ वाजण्याच्या सुमारास वांद्रे गावातून निघालो त्यावेळी माहुलीला ढगांचा वेढा पडला होता.
माहुलीच्या मुख्य रांगेला खेटूनच असलेल्या नवरा, भटोबा, नवरी, करवली आणि वजीरचे सुळके ढगांचा पडदा आड होताच मधूनच दर्शन देत होते, त्यातील नवरीचे दर्शन काही निट होत न्हवते ढगांचा पदर घट्ट ओढून बसलेली आणि बाजूलाच नवरा असल्यामुळे लाजत असावी एखादवेळेस. असो.
मधूनच ढगांचा पट दूर व्हायचा आणि कोवळी सूर्यकिरणे आमच्या दिशेने चालून यायची.
साधारण तासभराची पायपीट आणि चढ पार करून आम्ही मुख्य सोंडेला लागलो जी आम्हाला थेट कल्याण दरवाज्यापर्यंत घेऊन जाणार होती. हि सोंड कधीच संपणार नाही असे वाटायला लागले कारण तासभर चढून आलो तरी माहुली तेव्हढाच उंच वाटत होता.
सुर्यनारायण जसजसे वरती यायला लागले तसे ढगांनी त्यांचा पसारा आटोपता घेतला आणि अचानक कमालीचा उकाडा जाणवायला लागला. ह्या सोंडेवरून मात्र नवरा, भटोबा, नवरी, करवली चे सुळके छान दिसत होते. कॅमेरात येणारा लाईट कमी करून लगेच क्लीकून टाकले.
नवरा, भटोबा, नवरी, करवली चे सुळके
आणखी तासभराच्या चालीनंतर मुख्य सोंड संपली आणि आम्ही डोंगराला भिडलो. येथून पुढची वाट डोंगराच्या कडेकडेने, काही ठिकाणी अगदी अरुंद, घसा-याची आणि ख-या अर्थाने वाट लावणारी होती.
साधारण १५-२० मिनिटाच्या या वाटेनंतर traverse संपला आणि आम्ही कल्याण दरवाजाच्या खालच्या rock ला लागलो. आमचा पथदर्शक बाळू इथूनच परत जायच्या गोष्टी करू लागला. "म्या कधी गेलो नाय बा इथून पुढ, आम्ही इथ पर्यंतच आनतो लोकांस्नी पुढ तेच जातात कस-बस, वरती लय देंजर हाये वाट मी जातु" अस काही बाही बोलायला लागला. पण मी आणि सुजित या वाटेने आधी उतरलो असल्याने वरची वाट आम्हाला चांगलीच माहित होती. शेवटी आम्ही सर्वानीच बाळूला धीर दिला आणि आमच्या बरोबर वरती यायला तो कसाबसा तयार झाला.
एक सोपा कातळटप्पा पार केला आणि कल्याण दरवाजाच्या तुटलेल्या पाय-यांनी आम्हाला प्रथम दर्शन दिलं.
rock patch
कल्याण दरवाजाच्या तुटलेल्या पाय-या
हि वाट वापरात नसल्यामुळे पाय-यावर भरपूर प्रमाणात असलेली मुरमाड माती आणि वाळलेले गवत यामुळे जरा जपूनच जाव लागत. पाय-यांवरून वर आलो तर समोर एक छोटा कातळटप्पा आणि चिमणी आमच्या स्वागताला तयार होतेच. पण चिमणीतील जागा अपुरी असल्याने सर्वाना एकाचवेळी तिथे पोहोचणे शक्य नव्हते. शेवटी एक-मेका साहाय्य करू या तत्वाने आम्ही कातळटप्पा पार केला. आता चिमणीची वेळ आली.
छोटा कातळटप्पा
या चिमणीच्या पुढे एक लहान भोक आहे या भोकातून आपण वरती आलो कि कल्याण दरवाजाचा मुख्य कातळ जिथे रोप आवश्यक आहे तो लागतो. सुजितने प्रथम चिमणी पार केली, नंतर बाळू मग आमच्या सामानाची वाहतूक आणि मग आम्ही असे क्रमाने चालले होते.
लहान भोकातून वरती येणारी वाट
वझीर
ह्या भोकातून वरती आलो आणि जरा विश्रांतीसाठी थांबलो, कारण आता ११ वाजत आले होते, उन्हामुळे काहिली होत होती ती वेगळीच, गडावर पोहोचायला आणखी पाऊन-एक तास नक्कीच लागणार होता कारण अजून २ कातळटप्पे बाकी होते आणि त्यापैकी एकाला रोप आवश्यक होता. त्यामुळे रोप आणि इतर साहित्याची जुळवाजुळव होईपर्यंत आम्हालाही उसंत मिळाली हे सांगणे नकोच.
कातळटप्पा
सगळी सिध्दता झाली आणि आम्ही आगेकूच केले. सुजित अर्थातच पुढे गेला आणि त्यांनीच दोन वर्षांपूर्वी मारलेल्या बोल्टला अन्कर केले. मग काय एकदा रोप लागला कि आम्हीही शूरवीर होतोच कि मागून. ह्या सगळ्या गोष्टीत आणखी अर्धा तास गेला आणि साधारण १२च्या सुमारास आम्ही सगळे मुख्य कातळटप्प्याच्या वरती आलो. येथून खिंडीचे आणि खोलात गेलेल्या गावाचे दृश्य छान दिसत होते.
या पाय-याच्या वर आलो आणि पुन्हा रोप गुंडाळी करून घेण्यासाठी थांबलो, कारण इथून पुढच्या कातळटप्पा सोपा होता म्हणजे रोपची गरज नव्हती तर बांबूच्या शिडीचा उपयोग करून घ्यायचा होता.
हा छोटा कातळटप्पा पार करून कल्याण दरवाजाच्या वरती असलेल्या गुहेत येईपर्यंत १२.३० होऊन गेले. थोडावेळ विश्रांती घेतली, चिवडा, लाडू ई. पारंपारिक खाण्याबरोबरच आंब्याचा आस्वाद घेतला.
गुहेतील पक्वान्न
तास दीड तास विश्रांती घेऊन, कै. विवेक वेरुळकर या आमच्या मित्रास मूक श्रद्धांजली दिली आणि भंडारगडाच्या बाजूलाच असलेल्या खिंडीतून (काही लोक वांद्रे खिंड असेही म्हणतात) उतरायला सुरुवात केली. साधारण २ वाजत आले होते. भंडारगडचा एक सोप्या श्रेणीचा कातळटप्पा लीलया पार करत आम्ही वांद्रे खिंडीपाशी आलो.
सोप्या श्रेणीचा कातळटप्पा
ह्या वाटेने देखील मी आणि सुजित आधी एकदा चढून आलो असल्याने वाट आमच्या परिचयाची होती, अर्थात बाळू होताच बरोबर. सुरवातीला तासभर मोठमोठ्या दगड धोंड्यातून उतरून उतरून पायांची चांगलीच काशी झाली.
शेवटी 2 तासाच्या चालीनंतर जरा सपाटीवर आलो, पण आता उन्ह मी म्हणायला लागल होत. तसेच उन्हाचे चटके खात एकदाचे वांद्रे गावात पोहोचलो.
सपाटीहून दिसणारी मागील माहुली रांग
सपाटीवरून वांद्रे गावाकडे जाताना
वांद्रे गावातील श्री. बाळू मामा यांचे घर
गावात पोहोचताच बाळू ने त्याच्याघरी चहा घेण्याचा आग्रह केला, गरमा गरम वाफाळलेला कोरा चहा पिऊन तरतरी आली हे सांगणे नकोच.
वाफाळलेला कोरा चहा
बाळू मामाच्या घरातूनच संस्थेतील काही मित्रांना फोन केले ते देखील त्याच रात्री आसनगावहून गड चढून येणार होते. फोन वरूनच त्यांना आमच्या खुशालीची माहिती दिली आणि बाळू मामाचा निरोप घेऊन निघालो.
कै. विवेक वेरुळकर
कै. विवेक वेरुळकर यांच्या अपघाती निधनाची जागा.
बज्जु गुरुजी
प्रतिक्रिया
17 Jun 2012 - 11:55 pm | चित्रगुप्त
अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन. अभिनंदन.
गडसेवा बंद झाल्याचे वाचून वाइट वाटले.
एका किल्ल्याचे चित्रणः
http://www.misalpav.com/node/21954
18 Jun 2012 - 12:19 am | सुहास झेले
एकदम थरारक अनुभव... फोटो बघताना अंगावर काटा आला !!!
18 Jun 2012 - 2:30 am | मुक्त विहारि
आवडले....
18 Jun 2012 - 2:41 am | गणपा
थरारक चढाईला झकास फोटोंची जोड मिळाल्याने लेख जमुन आलाय.
बाकी काही फोटो पाहुनच छाती दडपली.
18 Jun 2012 - 2:50 am | बॅटमॅन
>>बाकी काही फोटो पाहुनच छाती दडपली.
सेम. अशा अडचणीत असतानादेखील फोटो घेण्याइतके थंड डोके ठेवणे म्हणजे खत्राच आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार _/\_
20 Jun 2012 - 1:30 pm | हरिप्रिया_
+१
खरच अश्या ठिकाणी फोटो घेणे म्हणजे अतिअवघड काम...
फोटोसफर एकदम नादखुळा..
20 Jun 2012 - 1:32 pm | हरिप्रिया_
डू प्र का टा आ
18 Jun 2012 - 6:53 am | सहज
_/\_
18 Jun 2012 - 8:34 am | ५० फक्त
धन्यवाद, अशा ठिकाणी जाणं होईल याची आता खात्री नाही, तुमच्या मुळं किमान फोटो सफर तरी झाली,
श्री. विवेक वेरुळकरांना श्रद्धांजली.
इथल्या आणि सगळ्याच डोंगर द-यात फिरणा-या भटक्यांना नम्र विनंती,
अशी साहसं, धाडसं नेहमीच्या जगण्याला एक वेगळं रुप देण्यासाठी आवश्यक असतील, पण त्यापेक्षाही तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त हवे असता, एखादा इंच, एखादाच हिसका किंवा एखादाच चुकलेला अंदाज, तुमचं एकट्याचं नाहीतर ब-याच जणांचं न भरता येणारं नुकसान करुन जातो, त्यामुळं अशी धाडसं करण्याचं टाळाच, तुमच्या आत्मविश्वासाबद्दल, शक्तीबद्दल, अनुभवाबद्दल शंका नाही, पण वेळ सांगुन येत नाही.
18 Jun 2012 - 9:56 am | अमृत
अर्थातच हा ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न पण तरी ५० रावांशी सहमतच.
अमृत
18 Jun 2012 - 8:42 am | किसन शिंदे
जबरदस्त आहे माहुली किल्ला!
वर गंपा शेठने म्हटल्याप्रमाणे काही फोटो पाहून खरचंच छाती दडपते.
18 Jun 2012 - 8:43 am | चौकटराजा
अनंत तुमची ध्येयासक्ती अनंत ती जिगिषा ...
याना सुरक्षा देरे बापा, ऐकतोस ना ईशा ?
18 Jun 2012 - 8:59 am | अर्धवट
च्यायला..
तंतरली आहे असे नोंदवतो
18 Jun 2012 - 9:00 am | प्रचेतस
जबरदस्त फोटो आणि वर्णन.
माहुली करायचा आहे कधीपासून. आता तुमच्याबरोबरच यावे म्हणतो.
18 Jun 2012 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा
बाबो... कसला खतरनाक चढणीचा ट्रेक हाय हा...!
त्या दगडवाटा पाहुन आमची पर्वा चंदेरी उतरताना जाहलेली करुण अवस्था अठवली ...
18 Jun 2012 - 9:32 am | प्रचेतस
तो दुसरा अनुभव ना? :P
18 Jun 2012 - 9:39 am | अत्रुप्त आत्मा
18 Jun 2012 - 9:40 am | प्रचेतस
दोघांमधला फरक सांगा ना?
18 Jun 2012 - 9:48 am | अत्रुप्त आत्मा
@दोघांमधला फरक सांगा ना? >>> अवांतर होतय... बास आता...नायतर
वल्ली--आत्मा
18 Jun 2012 - 9:50 am | प्रचेतस
:)
18 Jun 2012 - 4:28 pm | बॅटमॅन
अनुभवी बुवा ;)
18 Jun 2012 - 9:58 am | अमृत
पण फोटो पाहून भिती वाटली.
अमृत
18 Jun 2012 - 11:34 am | प्यारे१
आम्ही जाणार नाही....!
आपल्या साहसाला सा. न.
18 Jun 2012 - 11:39 am | श्रीरंग_जोशी
मानले बुवा तुंम्हाला. छायाचित्रे पण जबरीच!
18 Jun 2012 - 2:00 pm | गोंधळी
मावळ्यांना माझा सलाम.
18 Jun 2012 - 3:24 pm | मि.इंडिया
फोटो पाहूनच फाटली आहे. आमच्याच्याने जाणे जमणार नाही. फोटोसफरीबद्दल धन्स...
प्रदीप
18 Jun 2012 - 3:44 pm | गणेशा
अप्रतिम प्रवास, फोटो आणि वर्णन.
आवडले सर्व.
18 Jun 2012 - 4:30 pm | बज्जु
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
या वाटेने जायची ईच्छा असल्यास वांद्रे गावातील श्री. बाळु रेरा यांना खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
श्री. बाळु रेरा - वांद्रे गाव - ०८८०६२२३१६१
बज्जु गुरुजी
18 Jun 2012 - 7:21 pm | मेघवेडा
वंदनीयच.
__/\__
18 Jun 2012 - 11:00 pm | पैसा
फोटो, वर्णन सगळं बघायला/वाचायला फार छान वाटतंय, पण काय ते जीव सांभाळून करा रे बाबांनो!
20 Jun 2012 - 3:44 pm | खुशि
उदन्ड आशीर्वाद रे मुलानो.
नाशिक-कल्याण मार्गावरुन जाताना बघत असलेले नवरा-नवरी फोटोत प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळाले.मित्राला श्रद्धान्जली देण्यासाठी दरवर्षी जाता,खरे मित्रप्रेम.साम्भाळुन रहा.
20 Jun 2012 - 4:26 pm | जातीवंत भटका
सह्याद्रीच्या रांगड्या रुपाचं मोहक दर्शन !
9 Sep 2021 - 10:49 am | इरसाल कार्टं
हि वाट खरेच कठीण आहे