पाचूचे बेट - ५

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in भटकंती
21 May 2012 - 4:55 pm

नुवारा एलियात गाडी थांबली आणि समोर बघतो तर

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="नुवारा एलियातील सुरेख हॉटेल" />

हे होते आमच्या मुक्कामाचे हॉटेल. आणि नाव होते
From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="द लॉग" />

हे पाहून मला इंद्रजाल कॉमिक्समधले वाम्बा विश्रामधाम आठवले. त्याचे चित्र तसे वेगळे दाखवले होते. पण वाम्बा विश्रामधामचे माझ्या मनातले चित्र मात्र असे होते.

मालकद्वयांचे प्रकाशचित्र:

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="मालकद्वयातील लोथार" />

उजवीकडच्या गृहस्थांना पाहून मला इंद्रजाल कॉमिक्समधल्या मॅंड्रेक्सचा साथीदार लोथारचीच आठवण झाली. फक्त खर्‍या लोथारची टोपी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी दाखवली होती.

हॉटेल तर मला फारच आवडले. लंकेत पण भुतेखेते, शकून वगैरे मानत असावेत.

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="दरवाजावर ठोकलेले नाल" />

आम्ही घेतलेल्या दोन्ही खोल्यांच्या दरवाजावर घोड्याचे नाल होते. आता आम्हांला आम्ही स्वतः सोडून इतर भुताखेतांची भिती आम्हाला नव्हती.

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="आमची खोली" />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="सज्जा किंवा बाल्कनी आणि टांगलेले पुरातन कंदील" />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="मार्गिका ऊर्फ पॅसेज" />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="जेवणाची खोली आणि पोरसवदा सेवक सत्ती." />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="खोलीच्या दरवाजातून दिसणारे दृश्य." />

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="तिथे रस्त्याकडेला ठिकठिकाणी अशा बुद्धमूर्ती दिसतात. आपल्याकडे रस्त्याकडेला गणपती, मारुती नाहीतर साईबाबा असतात तसे." />

३०-०४-२०११.
नुवारा एलिया मस्त गिरीस्थान आहे. सकाळी पदभ्रमणार्थ बाहेर पडलो. हवेत बर्‍यापैकी गारवा. मुंबईत असते तशी गुलाबी थंडी. पण एप्रिलच्या शेवटात. रस्त्यावरून काही स्थानिक लोक चालायला, धावायला बाहेर पडलेले दिसले. दूधवाले, पेपरवाले वगैरे इतर प्रभातचर होतेच. बहुतेक सगळे गरम कपडे घालून. मी त्यांची खाजगीत टिंगल केली. मास्तर म्हणाला अरे नेहमी कडक थंडी असणार. आज कमी असेल म्हणून आपल्याला तसे वाटते. एका उपाहारगृहात इडली डोशाची तमिळ न्याहारी करून खोलीवर परतलो आणि स्नान करून फिरायला बाहेर पडलो.

आमच्या समोरच्या सरोवरात जलविहाराची सोय होती. काही होड्यांना राजहंसाचा सुंदर, डौलदार आकार दिला होता. पण नंतर कोलंबोत एका ठिकाणी सगळ्या होड्या तश्शाच दिसल्या. त्याचे प्रकाशचित्र नंतरच्या लेखांकात पाहू.

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="नुवारा एलियातले शंभर वर्षांपूर्वीचे पोस्ट ऑफिस." />

फिरता फिरता एके ठिकाणी व्यायामशाळा लागली. या वेळी कमाल पण त्यांच्यात सामील झाला. मी व्यायामशाळेतच म्हटले तर निरीक्षणात, म्हटले तर विचारात गुंग झालो. कल्पनेचा वारू आता सुसाट सुटला होता. अर्धापाऊण तास कसा गेला कळले पण नाही. व्यायामशाळेत फलरस आणि चहाकॉफीची यंत्रे होती. मध्येच तंद्रीतून बाहेर येऊन मी एक चहा मारला आणि पुन्हा स्वप्नरंजनात मग्न झालो. काही वेळाने वाम्बा विश्रामधामवर परतलो.

दुपारी वामकुक्षीनंतर पाहातो तो काय, हवेने आगळाच रंग धारण केला होता. सगळा परिसर दाट ढगांत लपेटला गेला होता. स्वप्न की सत्य कळेना. पावसाला सुरुवात झाली आणि बर्‍यापैकी कोसळला. आज गप्पा हाणायला आणि आमची सरबराई करायला हॉटेलचे मालकद्वय होते. रात्री मध्येच जाग आली आणि आमच्यावर एक वाईट प्रसंग गुदरला. हलक्या आवाजात मालकद्वय आमच्याच हॉटेलातल्या मागच्या खोलीतल्या एका म्हातार्‍या इंग्रज जोडप्याला सांगत होते ते ऐकले. हॉटेलातले पाणीच संपून गेले होते. पावसामुळे एका सार्वजनिक टाकीत पाणी चढवायचा पंप बिघडला होता. त्यामुळे एका छोट्या क्षेत्राचा पाणीपुरवठा बंद पडला. आता आम्हाला विचारायची गरज राहिली नाही. सकाळी पाणी नक्की मिळेल अशी शुभवार्ता होती.

०१-०५-२०११.
आजूबाजूच्या सगळ्या हॉटेलातले, घरातले नळ एकाच वेळी उघडल्यामुळे वरच्या मजल्यावर पाणीच येत नव्हते. मुंबईच्या झोपडपट्टीत जसे बाहेरून पाणी भरतात तसे लोक पाणी भरत होते. कोणा स्त्रीचे नाव लक्ष्मी वगैरे होते की नाही कळले नाही. आम्ही पण त्यात सामील झालो. एक वेगळा पाणीदार अनुभव मिळाला. शुचिर्भूत होऊन हॉटेलचे बिल भरून निघालो. मालकद्वयांनी पाण्याच्या गैरसोयीबद्द्ल पुन्हा पुन्हा दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही जरा देखील नाराजी व्यक्त न केल्याबद्दल, आमच्या अमूल्य वगैरे सहकार्याबद्दल आभार मानले. आम्ही श्रीलंकेत आनंद लुटायला आलो आहोत, तो मिळतो आहे मग तक्रार कसली. छोट्यामोठ्या गोष्टी घडतातच, त्यातून मार्ग काढायचा हेच खरे. पाणीच गायब झाल्यामुळे ते आमच्या उत्साहावर पडू शकले नाही. इथून निघाल्यावर पुढचे ठिकाण होते हटन. ब्रिज ऑन रिव्हर क्वाय या चित्रपटाचे चित्रण झाले होते तो परिसर. जुना ‘ब्रिज ऑन रिव्हर क्वाय’ हा कृष्णधवल चित्रपट आठवला, त्यातले निबिड अरण्य आठवले. त्यातल्या सैनिकांसकट. चांदोबा मधल्या रंगीत चित्रातली घनदाट अरण्ये देखील आठवली. तेव्हा लहानपणी जंगल म्हणजे काहीतरी भयंकर आणि अरण्य म्हणजे त्याहून महाभयंकर असे गणित बालमनात होते. ते सारे आठवले आणि गंमत वाटली. खरेच स्वप्नरंजनामुळे, कमालीच्या वेगाने मनःपटलावरून सरकणार्‍या चित्रपटामुळे काही क्षणातच मन कसे लख्ख, सतेज, चकचकीत राहाते! इथे लेखक, दिग्दर्शक यांचा अडसर नसतो. ना स्थळकाळाचे बंधन. ना वाट पाहायचा मानसिक ताण. सारे काही आपल्याला हवे तसे हवे त्या वेगाने घडत जाते.

पुढचा रस्ता निसर्गरम्य होताच.

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="द कासल: सेंट क्लेअर" />

चहाचा मळा आणि कारखाना. इंग्रज साम्राज्याचे वैभव दाखवणारी ही पुरातन वास्तू देखील सांस्कृतिक ठेवा म्हणता येईल अशी. भव्य आकाराचा तांब्याचा बंब. हा श्रीलंकेत ठिकठिकाणी वेगवेगळ्या आकारमानात - साईझमध्ये दिसला.

From SRI LANKA 2011" width="64" height="480" alt="आणखी एक चहाचा मळा आणि कारखाना." />

कपबशीच्या आकाराच्या शिल्पातली कल्पकता डोळ्यात भरते.

हटन ठिकाण फारच नयनरम्य आहे. घनदाट जंगलाच्या किनार्‍यावर एका डोहाशेजारी बांबूच्या बेटासमोर एक उपाहारगृह आहे. हॉटेलात अतिशय सौंदर्यपूर्ण भूरचना अर्थात लॅंडस्केप डिझाइनिंग केलेली आहे. प्रचंड महाग. ६५० श्रीलंकन रुपये कॉफी आणि १२०० रु. सँडविच. बाकीचे बहुतेक सगळे पदार्थ हजारावर. ती मिलेनियम महागाई पाहून मी तर प्रकाशचित्रे घ्यायलाच विसरलो. आम्ही बाहेर येऊन वेलची केळी आणि केक्स, पेस्ट्रीज खाल्ले. त्या दुकान कम हॉटेलचा तोंडवळा होता इराण्याच्या हॉटेलसारखा आणि गल्ल्यावरचे इंग्रजी बोलणारे गोरेपान मालक थेट पारशी वाटत होते तर सेवा देणार्‍या फ्रॉक घातलेल्या मालकीणबाई ख्रिस्ती गोवेकर वाटत होत्या. अगत्याने हवे नको जोडीने विचारणारे. केकपेस्ट्रीज मस्तच निघाले. साडेतीनशे चारशे श्रीलंकन रुपयात पाच जणांचे खाणे झाले. एवढ्या पैशात बाजूच्याच बड्या हॉटेलात एक कॉफी पण मिळत नव्हती. थोडेसे पायी भटकलो. तिथे राहायला तंबू देखील मिळतात. तोही परिसर घनदाट, सदाहरित जंगलाचाच आहे.

From SRI LANKA 2011" width="640" height="480" alt="कसे काय आहे जंगल?" />

रस्त्यावर ठिकठिकाणी बोटिंगची सोय करणारी कार्यालये आणि दरसूची लावलेली होती. जोडीला घनदाट जंगलातून वळणे घेणार्‍या नदीतून जाणार्‍या होड्यांची भलीमोठ्ठी आकर्षक चित्रे लावली होती. होडीतून करायची साधी भटकंती, गोल होड्यातून दुर्बिणीसह पक्षीनिरीक्षण, खळाळत्या प्रवाहातले साहसी व्हाईट वॉटर राफ्टिंग वगैरे सचित्र पर्याय उपलब्ध होते. दर फारसे महाग नव्हते. काय करावे याचा खल सुरू होता. प्रथम राहाण्याची सोय करू, नंतर होडीतल्या भटकंतीचा विचार करू असे ठरले.

इथे हॉटेले कमी पण निसर्गाच्या निकट सान्निध्यातली हट्स, कॉटेजेस, तंबू वगैरे मात्र भरपूर. कॉटेजेस, तंबू वगैरे फारसे महाग नव्हते. पण भरपूर उकडत होते. मच्छर आणि जळवांचा उपद्रव असणारच. त्यांच्या मदतीला माशा, नाकतोडे वगैरे इतर असंख्य कीटक असतातच अशी कमालने माहिती दिली. संध्याकाळपर्यंत कोलंबोला सहज पोहोचता येईल असे कमाल म्हणाला. आरामाला चटावलेल्या चार शहरी प्राण्यांनी शेवटी सरळ कोलंबो गाठायचे ठरले. जलविहार देखील निकालात निघाला. अरे तुम्ही मग ब्राझीलच्या रेन फॉरेस्टमधे कसे काय भटकणार अशी आमची तिघांची जाड्याने थोडीफार टिंगल केली. पण त्यात तसा दम नव्हता. अखेर तोही सुखासीनतेला चटावलेलाच प्राणी.

क्रमशः

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

21 May 2012 - 5:09 pm | सुधीर कांदळकर

पाचूचे बेट - ४ - http://misalpav.com/node/21372

पाचूचे बेट - ३ - http://misalpav.com/node/21367

पाचूचे बेट - २ - http://misalpav.com/node/20964

पाचूचे बेट १ - http://misalpav.com/node/20963

पैसा's picture

21 May 2012 - 8:14 pm | पैसा

हाही भाग छान. फोटो सगळेच आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2012 - 10:20 pm | अत्रुप्त आत्मा

छान आहे सफर आणी फोटो... :-)

मुक्त विहारि's picture

22 May 2012 - 10:28 pm | मुक्त विहारि

मस्त प्रवासवर्णन.

सुधीर कांदळकर's picture

23 May 2012 - 7:35 am | सुधीर कांदळकर

भटकंतीनिमित्त तसेच कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे जालावर चढवायला वेळ झाला. चालायचेच.

जागु's picture

23 May 2012 - 10:32 am | जागु

छान फोटो आणि वर्णनही.

सुधीर कांदळकर's picture

24 May 2012 - 7:14 am | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

५० फक्त's picture

30 May 2012 - 7:00 am | ५० फक्त

छान लिहिताय, मोजकं अन खरं वाटेल असं.

ते मोठे मोठे बंब लावण्यामागं काय कारण असावं कळालं का ?

रघु सावंत's picture

31 May 2012 - 5:19 pm | रघु सावंत

फोटो सगळेच आवडले.
घर फार आवडले माझा विचार आहे असे घर बांधण्याचा.

सुधीर कांदळकर's picture

1 Jun 2012 - 9:56 am | सुधीर कांदळकर

@ ५० फक्त: बंबांचे प्रयोजन?
@ रघू सावंत : कोणते घर आवडले?

हा भागही मस्त. तुमची लिहायची शैली एकदम मस्त आहे.