मागील भागवरुन पुढे: भटकंती - औरंगाबाद (घृश्नेश्वर + वेरूळ/एलोरा)
...महाभारतातील एक प्रसंग दाखवला आहे. तर डाव्या बाजुला एक काल्पनीक प्राणी दिसतो.
♦♦♦♦♦
येताना वाटेत खुल्दाबाद येथील औरंगजेबाची कबर बघायला गेलो. "आम्ही नेत नाही गाडी तिकडे, तुम्हाला बघायचं आहे म्हणून नेतो." असं ड्रायवरने बजावलं.
एका मशिदीत औरंगजेबाची, त्याच्या गुरुची, आणि मुलाची अशा तिघांची कबर आहे. त्यात गुरुच्या कबरीवर शहामृगाच्या अंड्यांची माळ, लामण दिवा ठेवतात तशी लटकत ठेवली दिसते.
प्रत्येक कबरीजवळ मशिदीत काम करणाऱ्यांपैकी एक जण असतो. तो लगेच माहिती द्यायला सुरुवात करतो. बघुन मनात विचार आला हे आपल्या देवळात का नाही करत? पुजारी, रांग सोडण्यासाठी उभे केलेले रक्षक सगळ्यांचीच अरेरावी असते. असो.
माहिती सांगताना औरंगजेब किती महान आणि चांगला होता हे अगदी ठासुन सांगितलं जातं. ऐकून तर असं वाटेलं शिवाजी/संभाजीने उगीचच त्याच्या खोड्या काढल्या की काय? हा आलमगिर नमाज पडतेवेळी वापरण्यात येणाऱ्या टोप्या विणून तो आपला खर्च त्यात भागवीत असे. आपण मृत्युनंतर आपली कबर आपल्या गुरूच्या कबरी जवळ असावी आणि ती सामान्य माणसांच्या कबरिसरखी मातीची असावी अशी त्याची इच्छा होती. टोप्या विकुन त्याने जमवलेल्या १३.५० रुपयात ही कबर बांधली गेली.
औरंगजेबाच्या कबरीवर कसलेसे एक रोपटे लावले होते. मधल्या सीटवरील कुटुंब प्रमुखाने "ये पौधा काहेका? तुलसी का लग रहा हे!" त्याच्या टिपिकल मुंबय्या हिंदीमध्ये विचारलं.
"वोह मरेहुवे इन्सान को मुक्ती मिले, उन्हे जन्नत मे आसरां मिले इसलीये लगाया जाता है. बेसिल का पौधा है ! " अशी माहिती मिळाली.
"बेसिल? मतलब तुलसी ना? तुलसी का हे बोलो ना फिर."
"नही वोह बेसिल का ही है." समोरुन पाल झटकतात तस उत्तर आलं.
आता तरं कुटुंबप्रमुख पण पेटले. "अरे भाई! तुलसी को ही अंग्रेजीमे बेसिल केहते है."
समोरचा आता गार पडला होता. कुटुंबप्रमुख विजयी मुद्रेने आपला कुटुंब कबिला घेउन तेथुन बाहेर पडले. आणि पाठोपाठ आम्हीही.
परतीच्या वाटेवर देवगिरी किल्ल्याजवळ मी आणि सौ उतरलो. संध्याकाळचे ५ वाजलेले. किल्ला चढून खाली येईपर्यंत गाडीवाला थांबायला तयार नव्हता. त्याच्याशी हुज्जत घालत बसण्यापेक्षा देवगिरी बघुन होईल म्हणून आम्ही गडाच्या दिशेने निघालो.
हा किल्ला अभेद्य आहे. या किल्ल्याच्या भोवताली ३ तटबंद्या आहेत. या पैकी पहील्या तटबंदीवरुन काढलेला हया फोटोत दुर डोंगर माथ्यावर किल्लाचा थोडा भाग पहाता येईल.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर मधेच एक सुंदर शिल्प दिसते. आणि या शिल्पाचे वैशिष्ट्य असे, पुर्ण दगडी सपाट भिंतीवर मधल्या एकाच दगडावर हे केली असल्याने एकदम नजरेत भरते.
प्रवेशद्वाराच्या बाजुलाच एक प्रमाणबद्ध असं हत्तीचं शिल्प दिसतं. हत्तीच्या पायातील साखळदंड, पोटावरं बांधण्यात येणारी घंटा, आणि अंगावरील इतर सजावटी सामानं दिसतं. या हत्ती शेजारी काही तोफा ठेवल्या असुन यातील एका तोफेचा एका तोफेचा व्यास पाणी भरायच्या बादली एवढा आहे. फोटोमध्ये दिसणारी तोफ ही तांब्यापासुन बनवलेली आहे.
प्रवेशद्वारातुन आंत गेल्यावर चारमिनार दृष्टीस पडतो.
पुढे गेल्यावर हा किल्ला अभेद्य का होता हे हळुहळू लक्षात येतं. किल्ल्याच्या भोवताली पाण्याचे खंदक आहेत. पुर्वी यात मगरी, आणि विषारी साप असत असे सांगतात.
हा खंदक पार करताच एका चिंचोळ्या भुयार्यासारख्या वाटेतुन आतं जावं लागतं. आत गेलं की लगेच समोर येतो तो एक मोठा दरवाजा. जर तुम्ही हा दरवाजा पार करुन आंत गेलात तर तुम्ही एका किल्ल्यावर न जाता, भुलभुलय्या मधे अलगद अडकता. ह्या किल्ल्याच्या आत दिवसाही काही दिसणार नाही असे भुयारी मार्ग आहेत. ते एका मोठ्या भुलभुलय्यासारखे मुद्दाम बांधलेले आहेत. राजाचे सैनिक या भुलभुलय्यात लपून बसत व वाट चुकलेल्या शत्रूवर भाल्याने वार करून अथवा गरम तेल ओतून ठार करीत. भुलभुलय्यात अडकलेल्या शत्रुंसाठी मुद्दामहुन चुकीचे दरवाजे उघडले जात, जेणेकरुन शत्रू मुख्य किल्ल्यापर्यंत पोहचू नये.
असा हा किल्ला रामदेवराय राजाचा मेहुणा हरपालदेव याने केलेल्या फितुरीमुळे अल्लाऊद्दिन खिलजीकडे १२९४ मध्ये गेला. देवगिरी स्वाधीन केल्यास राज्य देईन असा करार खिलजीने हरपालदेवासोबत केला. हरपालदेवाने शत्रुची साथ देत, त्यांना भुलभुलय्यातुन मुख्य किल्ल्यापर्यंत आणले.
पुढे १३२७ मध्ये महंमद बिन तुघलकाने भारताची राजधानी देवगिरीस हलवली आणि देवगिरीचे नवे नामकरण केले "दौलताबाद" आणि सोबत किल्ल्याचे नाव ही देवगिरीचा किल्ल्या ऐवजी दौलताबाद चा किल्ला असं झालं.
देवगिरीच्या पाडावाबद्द्ल अशी एक कथा सांगितली जाते की आपल्या ह्या अभ्येद्य अश्या किल्ल्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही असा गैरसमज करून रामदेवराय गाफील राहिला. शत्रूने हल्ला केलातरी बेगमी केलेल्या अन्नसाठ्यावर आपण तग धरून राहू शकतो अशा फाजील आत्मविश्वासाला तडा गेला जेव्हा ऐनवेळी त्याला समजलं की बेगमी केलेल्या धान्याच्या पोत्यामध्ये धान्य नसून मीठ आहे.
या किल्ल्यात एक भारतमातेचे मंदिरही आहे. हे यादवांच्या काळात बांधलेल मुळ जैन मंदिर असावं. यात भारतमातेच अष्टभुजा उभी मुर्ती आहे. ह्या देवगिरी किल्ल्याच्या टोकावर १४ टन वजनी मिश्र धातूची मेंढा तोफ आहे. ड्रायवरचं न ऐकता किल्ला चढायचा निर्णय किती योग्य होता हा विचार करत आम्ही परतीची वाट धरली
क्रमशः
♦♦♦♦♦
सूची
MTDC -http://www.maharashtratourism.gov.in/MTDC/HTML/MaharashtraTourism/TouristDelight/Forts/Forts.aspx?strpage=DevagiriDaulatabadFort.html
काही संदर्भ आंतरजालावरून.
प्रतिक्रिया
20 May 2012 - 10:06 am | प्रचेतस
फोटो आणि वर्णन छान.
लेखामध्ये काही ऐतिहासिक चुका आहेत.
हरपालदेव फितुर नव्हता उलट खिलजीने त्याला हाल हाल करून ठार मारले.
त्याचे बलिदान असे व्यर्थ जाउ देउ नका.
20 May 2012 - 10:26 am | पैसा
हरपालदेवाबद्दल वल्लीशी सहमत.
बाकी फोटो सुंदरच आलेत. 'औरंगझेबाच्या कबरीवर तुळ्शीचं रोप' हा किस्सा वाचून ह.ह.पु.वा. झाली. पण मुस्लिमांच्यात मरणोत्तर मुक्ती कुठून आली? मृतात्मे कबरीत कयामतच्या दिवसाची वाट पहातात ना?
20 May 2012 - 12:12 pm | शैलेन्द्र
किल्ला गेला तो गाफील रामदेवरायामुळे.. बिचार्या हरपालदेवाने शंकरदेवरायानंतर एक प्रयत्न पुन्हा करुन पाहीला होता.. अतिशय वाईट मरण त्याच्या वाट्याला आल..
20 May 2012 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छायाचित्रे सुंदर........वाचतोय.
-दिलीप बिरुटे
20 May 2012 - 10:42 am | पियुशा
पुढे गेल्यावर हा किल्ला अभेद्य का होता हे हळुहळू लक्षात येतं. किल्ल्याच्या भोवताली पाण्याचे खंदक आहेत. पुर्वी यात मगरी, आणि विषारी साप असत असे सांगतात.
अगदी , सेम सेम मला आमच्या भुइकोट किल्ल्याची आठ्वण झाली त्यालाही असाच खंदक आहे ,बाकी फोटो अन माहीती छान :))
20 May 2012 - 12:43 pm | मुक्त विहारि
महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ला...
कितीही वेळा बघितला तरी समाधान होत नाही.
20 May 2012 - 2:22 pm | मन१
पैठण, मराठवाडा देवगिरी वगैरे
प्रेषक मन१Sun, 20/05/2012 - 14:21.
पैठण मनोबा
पैठण, मराठवाडा देवगिरी वगैरे बद्दल मला जमेल तशी फुटकळ, विस्कळित ऐकीव माहिती स्पा(मन्या फेणेच्या) रंजक धाग्यावर टंकली होती. त्यातली काही तिथल्या तिथे पब्लिकनं दुरुस्तही केलेली आहे.
ह्या विस्कळित पण माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या प्रतिसादांसाठी खालील लिंका पाहू शकता:-
http://www.misalpav.com/node/17716#comment-308562
http://www.misalpav.com/node/15586#comment-261324
http://www.misalpav.com/node/15723#comment-264564
http://www.misalpav.com/node/15500#comment-260205
http://www.misalpav.com/node/15500#comment-260212
http://www.misalpav.com/node/15586#comment-261324
http://mr.upakram.org/node/3300#comment-57281
मि मराठीवर एक जबरदस्त मालिका सादर झाली होती, अत्यंत महत्वाचा अस्सल दस्तावेज म्हणून ज्यास मानले जाउ शकते अशा "महिकावतीची बखर" ह्या बद्दल. त्यामध्येही देवगिरी वगैरेचा बराच उल्लेख आहे. खरोखर उपयुक्त, बिनचूक म्हणता यावी अशी ही माहिती. ती पुढील ठिकाणी पहायला मिळेलः-
http://mimarathi.net/~mimarath/node/6292/
http://mimarathi.net/~mimarath/node/6334
तिकडची भटकंती करतच आहात तर दौलताबाद्,वेरूळ, अजिंठा ही "स्टार " टुरिस्ट स्पॉट पहालच. पण त्यामानाने कमी प्रवाशांची ये-जा असणार्या, कमी माहितीच्या ठिकाणीही जरा जाउन या:-
शूल भंजन(की शूली भंजन) टेकडीवरील छोटेसे दत्तमंदिर :- शांत्,निवांत, ठिकाण. खुल्ताबादच्या थोडेसेच अलिकडे एक फाटा जातो. तिथून पाचेक किलोमीटर आत, पायवाट आहे. दोन्हीकडे झाडे आहेत. हे ठिकाण एकनाथांचे योगाभ्यासाचे, समाधीचे ठिकाण मानले जाते. इथून ते आपले गुरु, देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी ह्यांचे दर्शन घेउ शकत म्हणतात.
पैठणच्या जवळच असणारे नेवासा:- संत ज्ञानेश्वरांचे वास्तव्य असणारे गाव.(बहुतेक ज्ञानेश्वरी इथेच लिहिली, नक्की ठाउक नाही.)
बीड जिल्ह्यात आंबेजोगाई :- आद्य मराठी कवी पंडित मुकुंदराज ह्यांचे जन्मस्थान, वास्तव्य. ह्याबद्दल स्पाचा एक धागाही आहे.
औरंगाबाद
नर्सी नामदेव,जांब समर्थ ही अनुक्रमे नामदेव व रामदासांची जन्मगावेही मराठवाड्यातच आहेत.
बीडला कनकालेशराचे प्राचीन मंदिर व आडवळणाच्या शांत्,प्रसन्न कपिलधारला अवश्य भेट द्या.
ह्याबद्दल बहस्कर केंडे ह्याम्चा एक धागा आहे मिपावरच.
--मनोबा
दाता इतना दिजे ।जामे कुटुम समाय |
मै भी भूखा न रहू । साधू न भूखा जाय ||
20 May 2012 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर!
21 May 2012 - 1:28 pm | नाना चेंगट
छान !!
>>>>हा आलमगिर नमाज पडतेवेळी वापरण्यात येणाऱ्या टोप्या विणून तो आपला खर्च त्यात भागवीत असे. आपण मृत्युनंतर आपली कबर आपल्या गुरूच्या कबरी जवळ असावी आणि ती सामान्य माणसांच्या कबरिसरखी मातीची असावी अशी त्याची इच्छा होती. टोप्या विकुन त्याने जमवलेल्या १३.५० रुपयात ही कबर बांधली गेली.
खीक.
मुस्लिम अनुनयातून आलेले भंपक सत्य.
आपल्या सरदारांजवळची असलेली संपत्ती लुटण्याचा त्याचा तो राजरोस मार्ग होता.
टोपीचा लिलाव करायचा ज्याची बोली अधिक त्याला टोपी. :)
बोली लावली नाही तर खिचक्याव. ;)
बाकी त्याची इच्छा होती की कबर साधी असावी की तो मेल्यावर पटकन दिल्लीला पळून जाण्याची घाई झाल्यावर कशी बशी त्याची कबर बनवून पळून दिल्लीला गेल्यावर धाप थांबल्यावर उरलेल्यांनी ठोकलेली लोणकढी थाप याचा खुलासा (खरा) इतिहासकार करेलच. असो.
मात्र हे नक्की की भारतावर ज्या सुलतान आणि बादशहांनी राज्य केले त्यात सर्वात कुटील आणि राज्यावर सर्वात जास्त पकड असलेला आलमगीर तितकाच नशीबवान पण होता.
21 May 2012 - 3:47 pm | जातीवंत भटका
फोटो सुंदर आले आहेत...