२२ जानेवारी २०१२
रोज सकाळी ६ वाजता सायकलींग सुरु करायच असं ठरलं होतं... पण, दुसर्याच दिवशी सहा चे साडे-सात झाले... आज हरीहरेश्वरला न जाता डोंगरातल्या मार्गाने डायरेक्ट बागमांडलेला जावून मग पुढचा प्रवास करायचा बेत होता... कालच्या प्रवासामुळे सगळं अगं दुखत होतं... सीट तर टेकवतच नव्हतं... पहिले काही कि.मी. पाय जरा दुखत होते, पण मग दुसर्या दिवसाचा पहिला चढ लागला आणि पुन्हा नव्या दमाने पेडलींग सुरु केलं... जेमतेम सात फुट रुंद रस्ता होता... दोन्ही बाजूला दाट झाडी होती... चढ बर्यापैकी स्टीप होता... पक्ष्यांची चिवचिव चालू होती... आणि वाटेवर आम्ही तीघेच होतो... वातावरणात समुद्राचा तो विशीष्ट असा सुगंध होता... अचानक मला लहानपण आठवलं... रेवदंड्यामधे सायकलवर भटकलेले दिवस आठवले... समुद्र आठवला... मुळचा मी कोकणातलाच असल्यामुळे सारा सभोवताल खुपच ओळखीचा वाटत होता... ह्या सगळ्या आठवणीत चढ कधी संपला हे कळालच नाही... पोटात काहीच नव्हतं आणि चांगलीच भुक लागली होती, मग ब्रेक घेतला आणि चिक्क्यांवर ताव मारला...
घाट माथ्यावरुन दुरवर समुद्र आणि बागमांडले जेट्टी दिसत होती... उतारावर सायकली सुसाट पळायला लागल्या आणि काही क्षणात जेट्टीवर पोहचलो... बागमांडले ते वेशवी हा प्रवास बोटीने करायचा होता... सायकली बोटीवर चढवल्या आणि पायर्या चढून बोटीच्या बाल्कनीत प्रवेश केला... बघतो तर काय! वडा-पाव आणि चहा ची सोय होती इथे... प्रत्येकी ३ वडा-पाव आणि २ चहा झाले आणि तोपर्यंत आम्ही वेशवीला पोचलो देखील...
पुन्हा सायकलवर स्वार झालो आणि केळशीची दिशा धरली... मी सर्वात पुढे होतो... रस्त्यावर कुत्र्याची चार पिल्लं एका मागे एक अशी ओळीत पळत होती... मी त्यांच्या पुढे गेलो तर ती पिल्लं माझ्या मागे पळू लागली... मग थोडा वेळ थांबलो, त्यांच्याशी खेळलो आणि पुन्हा सायकलींग...
परत चढ सुरु झाला... रस्त्याच्या दुतर्फा काजू आणि आंब्याला मोहर लागला होता... चढ जरा कमी झाला की आम्ही ५-१० मिनीटांचा तरी ब्रेक घ्यायचो... थोडं पाणी आणि एखाद चिक्की खावून पुन्हा सुटायचो...
जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला केळशीचा फाटा लागला... इथून पुढे सगळाच उतार होता... उतार संपल्यावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हातार्या जोडप्याला विचारलं की "केळशी अजून किती दूर आहे?..." तर आजी म्हणाली "माहीती नाही तर येता कशाला"... असं उत्तर आजीबाईं कडून अजीबातच अपेक्षीत नव्हतं... कदाचीत आजी आणि आज्याच वाजलं असावं, म्हणून आजी तापलेली असावी... आम्ही तीघे एक-मेकां कडे बघून हसलो आणि गप्प मुकाट्याने पुढे निघालो...
काही वेळातच केळशी लागलं... इथेच एका घरगुती खानावळीत दुपारच जेवण उरकलं... बांगडा फ्राय, कोळंबी सुक्का आणि सौंदाडे रस्सा असा मेनु होता...
अवघड असलं तरी, आज गुहाघर गाठायचा विचार होता... म्हणून मग जास्त वेळ आराम न कराता अंजर्लेचा रस्ता धरला... केळशी बाहेर लगेचच खाडी वरचा पुल क्रॉस केला आणि आडे गावात पोहचलो... लहानसच गाव आहे... इथलं भार्गवराम मंदिर प्रसीद्ध आहे... गावा बाहेर पडलो आणि रस्ता अगदी समुद्राला लागुनच होता... दुपारची वेळ होती... समुद्र शांत होता आणि समुद्र किनारी कोणीच नव्हतं... सायकली रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली लावल्या आणि पुळणीत पाय ठेवला... केळशीच्या समुद्र किनारी आम्ही गेलो नसल्यामुळे, आमच्यासाठी हा ट्रिप मधला पहिला समुद्र किनारा होता... समुद्र मस्त चमकत होता... वार्यामूळे दुपारची वेळ असली तरी किनार्यावर छान वाटत होतं... लहानपणी अशा बर्याच दुपार मी रेवदंड्याच्या समुद्र किनारी घालवल्या होत्या... कधी पोहत तर कधी समुद्र किनारी असलेल्या किल्ल्यात उनाडक्या करत... त्याची आठवण झाली... दुपारची वेळ खरच खुप निवांत असते... छान जेवण झालेलं असतं, लगेचच काहीही काम नसल्यामुळे डोक्याला अजीबातच त्रास नसतो... आणि अशा वेळी समुद्र किनारी असावं, जो काही निवांतपणा अनुभवायला मिळतो, त्याला तोड नाही...
(सेल्फ-टायमर लावून तीघांनी एकदम उडी मारुन फोटो काढायचा प्रयत्न असा हुकला आणि एक खुपच छान आठवण देवून गेला...)
(महीना चुकुन एक च्या ऐवजी दोन झालाय...)
पाय निघत नव्हते, पण अजून बरच अंतर कापायच होतं आणि पुढे पण अजून बरेच समुद्र किनारे अनुभवायचे असल्यामुळे पुढची वाट धरली... एखाद कि.मी. अंतर कापलं असेल आणि लगेच 'कड्यावरचा गणपती, अंजर्ले' अशी पाठी लागली... जावं की नाही असा विचार चालु होता, पण मग मागच्या वेळी दुचाकीवर आलो होतो तेव्हा सुद्धा देवळात गेलो नव्हतो... 'ह्यावेळी तरी दर्शन घेवू' असं ठरवलं... मुख्य रस्ता सोडला आणि डावी कडे डोंगरावर जाणारी अतीशय स्टीप वाट धरली... जरा वर गेल्यावर मागच्या समुद्राचा खुपच सुंदर, डोळ्यात मावणार नाही असा नजार दिसतो... साधारण १ कि.मी. चढ संपवून देवळात पोहचलो... बाप्पाची मुर्ती सुंदर आहे... दर्शन झाल्यावर देवळाबाहेरच्या दुकानात मस्त गार कोकम-सोडा प्यायलो, केळी घेतली आणि हर्णेची वाट धरली... अंजर्ले खाडीपुल क्रॉस केल्यावर चढ लागला... थोडं चढल्यावर सरळ न जाता उजवीकडे समुद्र किनार्याहून पाजपांढरी मार्गे हर्ण्याला जाणार्या रस्त्याला लागलो... इथून अंजर्ल्याच्या किनार्याचा वेड लावणारा नजारा दिसतो... तासोंतास वारा पीत हा नजारा बघत बसावसं वाटतं... इथून संध्याकाळचा सुर्यास्त तर केवळ अप्रतीम दिसेल...
खाडी आणि समुद्राचा संगम बघत थोडावेळ थांबलो... पलीकडच्या तीरावर बॉक्स-टाईप क्रिकेटची स्पर्धा चालू होती... त्याच्या काँमेन्ट्रीचा आवाज कानावर पडत होता... कोकणात अशा स्पर्धा प्रत्येक गावात चालू असतात... मजा असते, कोकणात असताना मी पण अशा स्पर्धांमधे खेळलोय...
धुळ उडवत येणार्या हर्णे-केळशी बसमुळे आम्ही भानावर आलो आणि पाजपांढरी गावात जाणार्या उताराला लागलो... प्रामुक्यानं कोळ्यांची वस्ती असलेलं पाजपांढरी गाव अगदी समुद्र किनार्यावरच वसलं आहे... गावात खुपच हालचाल चालू होती... घारातली मंडळी जेवणं उरकुन घराबहेरच्या ओठ्यावर बसुन गप्पा मारत होती... लहान मुलं रस्त्यावर खेळत होती... सायकलींवर आम्हाला बघताच मुलं हात पुढे करुन 'टाळी... टाळी...' करुन ओरडायची... त्यांना टाळ्या देत गावातून बाहेर पडलो... समुद्रात थोडं पाण्यात सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला... दुपारच उन्ह समुद्रात चमकत होतं त्यामुळे समोरचा देखावा कृष्ण-धवल चित्रा प्रमाणं भासत होता...
अजुन थोडे पेडल्स नंतर हर्णे गावात पोहचलो... हे गाव जवळ्पास असलेल्या किल्ल्यांमुळे बरंच नावाजलेलं आहे... सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला असे हे चारही किल्ले हर्णे गावातच आहेत... तसं छोटं पण गजबजलेलं गाव आहे... गावा बाहेर पडतच होतो की इतक्यात प्रसादच्या सायकलंच मागच चाक सपाट झालं... काय झालं हे बघितल्यावर कळालं की मागचा टायर फुटलाय आणि त्यामुळे ट्युब पण फाटलीय.. . ताम्हीणी घाटातल्या टॉर्चरमुळे टायरची वाट लागली होतीच, शेवटी टायर आज आडवा झालाच... माघारी वळलो आणि सायकल दुरुस्तीच दुकान शोधलं... त्यानं सुचवलेल्या एका दुकानात नविन टायर-ट्युब घ्यायला गेलो, तर कळालं की मालक दुकान उघडं ठेवून दापोलीला गेलेत आणि ते परत आल्या शिवाय काहीही मिळणार नाही... मग सायकल दुरुस्तीच्या दुकान मालकानं टेंपररी पंक्चर आणि गेटर काढून दिलं... दापोलीत जावून नविन टायर-ट्युब टाकायच ठरवलं... गावातच होतो म्हणून निभावलं नाहीतर चांगल्याच उचापत्या कराव्या लागल्या असत्या... 'दापोली पर्यंत नीट जावू दे रे देवा...' अशी प्रार्थना केली आणि पुन्हा सायकलींग सुरु केलं... समुद्र किनारा सोडला आणि दापोलीचा चढ लागला... खालचे गीयर टाकले आणि थोडं-थोडं सायकल पुढे सरकु लागली... चढ आला की तीघेही एका लयीत सायकल चालवायचो... थोडं पुढे-मागे, पण एक-मेकांच्या नजरेतच असायचो...चढावर सायकल चालवायची म्हणजे फिजीकल पेक्षा मेन्टल एफर्स्ट जास्त लागतात... अजुन किती चढायचयं हे न बघता, निमुटपणे एक-एक पेडल मारत रहायचं... चढ आहे म्हंटल्यावर दम हा लागणारच... 'खुप चढ आहे, आता होत नाही' असं म्हंटलं की संपल... त्याउलट 'अजून एकच पेडल' असा विचार केला की हळू-हळू का होईना, पण माथ्यापर्यंत न थांबता पोहचतो... सुर्यास्तानंतरच्या अंधुक उजेडात दापोली गाठलं... सुदैवानं हर्णे ते दापोली रस्ता एकदम चांगल्या कंडीशन मधे होता, म्हणून प्रसादची सायकल पण त्रास न देता पोहचली... सायकलच दुकान शोधलं आणि टायर-ट्युब बदलून घेतले..
काळोख पडला होता... दापोलीतच मुक्काम करता आला असता, पण नाही, निदान लाडघर पर्यंत तरी जावू असं ठरलं... लाडघरच्या रस्त्याला लागलो आणि एकदम सगळीकडे सामसुम जाणवायला लागली... अरुंद रस्ता आणि रहदारी पण नव्हती... लाडघर अजून ७ कि.मी दूर होतं... साधारण एखाद कि.मी. अंतर कापल्यावर रस्ता अजूनच अरुंद झाला, आधीच काळोख आणि त्यात झाडी त्यामुळे काहीच दिसत नव्हतं... आता काळोखात न धडपडता जाणं शक्यच नव्हतं आणि आमच्या कडे एकच विजेरी होती... मग एक युक्ती केली... यशदीपच्या हेलमेटला मागे एक एलईडी आहे आणि तो ब्लिंक मोड मधे ठेवता येतो; तो सेट केला आणि जवळ असलेली विजेरी घेवून तो सगळ्यात पुढे झाला... मी आणि प्रसाद त्या एलईडीच्या रेफरन्सने यशदीपला फॉलो करत होतो... तरी देखील एकदम चढ किंवा उतार आला की चांगलीच लागत होती... बर्याचदा अनपेक्षीतपणे खड्ड्यातुन गेल्यामुळे जोरात हादरे बसत होते... किर्र् काळोखात दूरवर एखाद्या घराचे दिवे दिसले की जरा हुश्श् व्हायचं आणि मग परत आमची आंधळी कोशींबीर सुरु व्हायची... अजून किती पुढे जायचय हे सुद्धा कळत नव्हतं... लाडघर मागे ठाकून पुढे नको जायला म्हणून आता जो कोणी रस्त्यावर दिसेल त्याला लाडघर बद्दल विचारायचं ठरवलं... साधारण अर्धा तास असेच पुढे गेल्यावर एका जागी दोन आजीबाई दिसल्या; त्यांनी मग आम्हाला हा रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने आत जायला सांगीतले... धडपडलो तर लागलं असतंच, पण सायकल सुद्धा खराब व्हायची शक्याता होती... उगाच पंक्चर वगेरे झाली तर नसता व्याप व्हायचा म्हणून मग शेवटी आंधळी कोशींबीरचा खेळ थांबवला आणि चालायला लागलो... थोडावेळ चालल्यावर, माघुन येणारी एक दुचाकी हळू झाली आणि 'कोण तुम्ही? कुठून आलात? कुठे चाललात?' असे अनेक प्रश्न झाले... आम्ही पुण्याहून सायकलवर आलोय हे कळल्यावर तो थांबलाच... आम्ही मुक्कामाची जागा शोधतोय हे कळाल्यावर तो आम्हाला त्याच्या घरगुती हॉटेलात घेवून गेला आणि आमच्या मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंघोळी उरकल्या आणि समुद्र किनारी एक चक्कर मारुन आलो... गार वारा, लाटांचा आवाज आणि चंद्र प्रकाशात चमकणारा समुद्र बघून, काळोखात केलेल्या सायकलींगच चीज झाल्या सारखं वाटलं... जोरात भुक लागली होती आणि ताटं पण सजली होती... फ्राय केलेला मांद, कोळंबी सुक्का आणि मांदेली रस्सा असा मेनु होता... नारळा-सुपारीच्या वाडीत माडाखाली बसुन मस्त पैक्की मनसोक्त जेवलो... थोड्या गप्पा झाल्या... गुहाघरच्या ऐवजी लाडघरला मुक्काम करावा लागला, पण एकंदरीत आजचा दिवस खुप आठवणी देवून गेला... अंथरुणात आडवे झालो तेव्हा आजच्या प्रवासाबद्दल समाधान आणि उद्याच्या प्रवासाबद्दल उत्सुक्ता होती...
आजचा प्रवासः श्रीवर्धन - बागमांडले - वेशवी - केळशी - आडे - अंजर्ले - पाजपांढरी - हर्णे - दापोली - लाडघर.
आज कापलेलं अंतरः निदान ७० कि.मी.
विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.in/
नोटः वेळ मिळेल तसं लिहीतोय आणि त्यात माझा लिखाणाचा स्पीड पण कमी आहे, त्यामुळे पुढचा लेख टाकण्यास उशीर होवू शकतो.
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 7:32 pm | अन्या दातार
ज्जे बात! :)
एक शंका: तुम्ही राखीव ट्युब घेतली नव्हती का बरोबर? कारण इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हणल्यावर पंक्चर किट, ट्युब, वैद्यकिय सामान (First aid Kit) असणे अत्यावश्यक वाटते.
28 Feb 2012 - 7:37 pm | मोदक
वाचूनच दम लागतोय... तुम्ही तर सायकलवर प्रवास केलात.. धन्य आहात.. :-)
28 Feb 2012 - 7:54 pm | गणेशा
जबरदस्त इच्छाशक्ती माणसाला अशक्यतेचे वलय फेकुन द्यायला लावते .
लिहित रहा... वाचत आहे...
28 Feb 2012 - 8:49 pm | उदय के'सागर
व्वा!!!! .... तुमचा खुप खुप हेवा वाटतो...
/*
नोटः वेळ मिळेल तसं लिहीतोय आणि त्यात माझा लिखाणाचा स्पीड पण कमी आहे, त्यामुळे पुढचा लेख टाकण्यास उशीर होवू शकतो.
*/
ऐ नाइ-नाइ ... असं नाहि चालणार यार.... प्लीज लवकर लवकर टाक पुढचे भाग... खरंच खुप उत्सुक आहे पुढचे भाग वाचण्यासाठी....
खुप खुप धन्यवाद हा प्रवास-अनुभव इथे शेअर केल्याबद्दल .... :)
28 Feb 2012 - 8:52 pm | गणपा
मस्त रे..
फोटो आणि प्रवास वर्णन नेहमी प्रमाणेच ब्येष्ट.
बाकी ते दगडावर भिंतिंवर नावं कोरुन घाण करण्यांपेक्षा तुझी वाळुत लिहिण्याची कल्पना आवडली. :)
28 Feb 2012 - 10:51 pm | प्रचेतस
पुन्हा एकदा दमदार वर्णन.
हेवा वाटतोय रे तुझा विमुक्ता.
28 Feb 2012 - 10:52 pm | रेवती
छान चाललाय प्रवास.
वाचतिये.
28 Feb 2012 - 11:55 pm | पाषाणभेद
वाचतोय. मस्तच आहे. पहिल्या भागातल्या विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट पाहतो आहे. गरजूंची गरज भागेल.
अन हो, किबोर्डाची पुर्णविराम देणारी कळ दुरूस्त करून घे बाबा. नाही म्हणजे तू एकदाच टायपत असशील रे, पण त्यातील स्प्रिंग खराब झाली असेल तर दोनदा पुन्हा उमटत असेल, नाही?
:-)
29 Feb 2012 - 1:10 am | आबा
हेवा वाटतो तुमचा !
29 Feb 2012 - 1:30 am | शिल्पा ब
तुमच्या अॅडव्हेंचरसाठी मनापासुन शुभेच्छा. सायकलवर इतक्या लांबचा प्रवास सोपी गोष्ट नाही.
29 Feb 2012 - 2:39 am | निशदे
सॉलिड आहात बरं का तुम्ही..........
आम्हाला घरातून रस्त्यासमोरच्या मॉलमधे ब्रेड आणायचा सुद्धा कंटाळा........
येऊ द्यात अजून. लेखन आणि छायाचित्रांचा उत्तम मेळ घालत आहात तुम्ही......
29 Feb 2012 - 3:33 am | वपाडाव
मस्त !!!
29 Feb 2012 - 7:02 am | धन्या
झकास रे !!!
एव्हढं सगळं करायला वेळ मिळतो, ते करायची आतून इच्छा होते आणि चिकाटीने पुर्ण करतासुद्धा. भाग्यवान आहात. :)
29 Feb 2012 - 7:22 am | नंदन
तुम्हां सर्वांच्या उत्साहाला आणि चिकाटीला सलाम!
29 Feb 2012 - 7:46 am | ५० फक्त
जबरदस्त, ही खरोखरीची भटकंती वाटते, फोटो पण झकास आहे, तिघांचा एकत्र उडी मारण्याच फोटो तर अतिशय जबरा आलाय.
29 Feb 2012 - 8:25 am | पिंगू
जबरा चिकट आहात रे तुम्ही लोक्स.. मला कधी असा अॅडवेंचर करता येईल का?
- पिंगू
29 Feb 2012 - 8:54 am | जयंत कुलकर्णी
Yes ! That is something.
29 Feb 2012 - 10:41 am | sneharani
मस्त फोटो अन् वर्णन सुध्दा!!
उत्साह वाखणण्यासारखा! येऊ दे पुढचा भाग!!
:)
29 Feb 2012 - 12:10 pm | साबु
---जबरदस्त इच्छाशक्ती माणसाला अशक्यतेचे वलय फेकुन द्यायला लावते .
एकदम भारी....
29 Feb 2012 - 1:19 pm | स्वातीविशु
फोटो अन वर्णन खुप छान.
पुढिल प्रवासास आणि लेखनास अनेक शुभेच्छा.:)
29 Feb 2012 - 3:21 pm | गवि
उत्कृष्ट अन दमदार प्रवास अन वर्णन. तुमच्या फिटनेसची दाद देतो.
वाचतोय. आमच्या कोंकणावर पुढचे भाग लवकर येउंदेत.
या फोटोतल्या तुम्ही ज्या बोटीने गेलात त्या फेरीबोटीत सीझनमधे फणसाचं आईसक्रीम मिळतं. तुम्हाला मिळालं नाही असं दिसतंय.. अन्यथा त्याचा रसभरित उल्लेख केल्याशिवाय पुढे जाऊ शकला नसतात. :)
29 Feb 2012 - 6:07 pm | मेघवेडा
+ १. खाडी पार करा लवकर! :)
29 Feb 2012 - 7:47 pm | प्रीत-मोहर
+२ आणि गोव्यावर सुद्धा भरबुर लिहा हो !!!
29 Feb 2012 - 5:12 pm | चिमी
एकदम सही सफर अन प्रवास वर्णन देखील छान लिहिल आहे तुम्ही.
29 Feb 2012 - 6:05 pm | मी-सौरभ
पु.भा.प्र.
29 Feb 2012 - 6:59 pm | वेताळ
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..........
29 Feb 2012 - 7:31 pm | यशोधरा
काय मस्त लिहितो आहेस विमुक्ता! पुढचे भाग पण तब्येतीत येऊदेत. :)
त्या ताटाचा फोटो खल्लास! कोलमीचे सुके सरयलेशें दिसता फोटो काढूच्या पैलीच!! :P :D
1 Mar 2012 - 8:53 am | विमुक्त
मित्रांनो,
सायकलवर भटकंतीला जाण्यापुर्वी काय तयारी केली होती? सायकली कोणत्या होत्या? ह्या वर एक लेख टाकणार आहे मी... बस्स थोडा वेळ द्या...
विमुक्त
1 Mar 2012 - 12:25 pm | सुहास..
लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !!
अवांतर : फोटोत जरा स्लिम झाल्यासारखा वाटतो आहेस , की कॅमेर्याची कमाल ;)
1 Mar 2012 - 11:48 pm | मी-सौरभ
त्याने हाणल्ये तेवढी सायकल हाणली तर मी / वल्ली / ५० सुद्धा बारीक दिसायला लागू. :)
2 Mar 2012 - 8:39 pm | मोदक
>>>> मी / वल्ली / ५०
या चढत्या क्रमाने तुलना केलीतर एखादा सुमो पैलवान किंवा खली सुद्धा स्पाच्या कॉम्पीटीशन ला उतरेल. ;-)
1 Mar 2012 - 12:48 pm | चिगो
लगे रहो.. पुभाप्र.
1 Mar 2012 - 11:43 pm | पैसा
अगदी आरामात लिही! नो प्रॉब्लेम! कोकणातल्या घाटांनी तुमची स्पीड बरीच कमी केली असणार!
2 Mar 2012 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे
त्या भुभार्ड्या पिल्लांच्या गार गार नाकाच्या स्पर्शाने थकवा एकदम दूर झाला असेल नाही? असाच उर्जास्त्रोत कायम लाभो!
2 Mar 2012 - 11:22 am | मी_ओंकार
बर्याच दिवसांनी आलास पण लेख असा लिहिलायस की बाकी दिवसांची कसर भरून काढलीस. आणि यशोदीप ला भेटून आनंद झाला.
- ओंकार.