अनामिक भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
धनगड ला जाण्याचा प्लॅन रहित झाला, आणि किल्ले पुरंदर ला जाण्याचा योग आला.
मित्र उरुळी कांचन ला गेला असल्याने.. भटकंतीत झालेला हा बदल खरेच उत्साहवर्धक होता...
किल्ले पुरंदर ओळखला जातो बलाढ्य कर्तुत्वानी रणांगणात उभ्या ठाकणार्या शुर वीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थान असल्याने..
पुरंदर ओळखला जातो मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्यमय इतिहासाने.
अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी,
मध्येच वाहे क-हा, पुरंदर शिवशाहीचा तुरा
तर असा हा किल्ले पुरंदर पाहण्यासाठी सकाळी ६ ला उठुन मी हडपसर गाठले.. मित्र तो पर्यंत तेथे आलाच होतो.. सकाळच्या मस्त गार वातावरणात आमची गाडी दिवेघाटाकडे वळाली.. सुंदर वळणावरुन मस्तानी तलाव पाहुन, आम्ही जाधववाडी जवळ आलो.. आणि ठरलेल्या टाईम पेक्षा लवकर आल्याने प्रथम आम्ही जाधवगड ( वयक्तीक मालकी घेवुन ५ स्टार हॉटेलमध्ये रुपांतरीत झालेला गड) पाहण्यासाठी निघालो..
जाधवगड (लढ..झगड.. आगे बढ):
"आई" संग्राहलय पाहुन आम्ही सासवड ला आलो. मोहिनी मध्ये मिसळ खाऊन ( मुद्दाम उल्लेख केला, कारणं पहिल्या मिपा भटकंतीच्या वेळी हर्षद, आत्मशुन्य बरोबर येथेच गेलो होतो) आम्ही नारायणपुर च्या दिशेला गाडी घेतली..
दूरुनच विशाल असा पुरंदर मनात भरत होता..
पुरंदर म्हणजे इंद्र, पुराणामध्ये या डोंगराचे नाव " इंद्रनील" पर्वत होते".
या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
जन्मस्थळ :
दिल्ली दरवाजा
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.
'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,
'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.'
मुरारबाजी देशपांडे :
पुरंदर वरुन दिसणारा (आणि पुरंदर माचीला लागुन असलेला) वज्रगड आणि पद्मावती तळे
अती पुर्वेला असलेला खंदकडा आणि माझा मित्र योगेश फडतरे यांचे काही फोटो
अवशेष
वेगळेच भासणारे हे एक पाण्याचे टाके/बारव
केदारेश्वर मंदिरा मागील माळ आणि कोकण्या बुरुज:
केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कर्हेपठार हा सर्व परिसर दिसतो.
केदारेश्वर मंदिरा जवळ काही मुलांची हौशी फोटोग्राफी चालु होती, त्यांचा एक फोटो
परतीच्या वाटेवर
पुन्हा पावसाळ्यात या गडावर येवून पुरंदर माची ही चढुन सर करण्याच्या इराद्याने आम्ही माघारी फिरलो..
इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार आणि पुरंदर च्या तहाने सर्वस्व झोकुन देवुन पुन्हा त्याच दिमाखात शिवशाहीचा तुरा बनुन उभा असलेल्या या पुरंदरास सलाम ...
- शब्दमेघ... एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
प्रतिक्रिया
2 Feb 2012 - 4:25 pm | स्पा
वाव
लयच भारी....
झकास फोटू आलेत
2 Feb 2012 - 4:35 pm | पैसा
मस्त फोटो आणि वर्णन!
मुरारबाजीच्या पराक्रमाचं वर्णन वाचून अंगावर काटा आला.काय अफाट धाडस! या पराक्रमाचं आणि पुरंदर-वज्रगडच्या लढाईचं बाबासाहेब पुरंदर्यांनी केलेलं वर्णनही जसंच्या तसं आठवलं. छान! आजच्या दिवसातला मिपावर आठवण आलेला हा तिसरा किल्ला. पण कितीही वाचलं पाहिलं तरी समाधान होत नाही!
2 Feb 2012 - 4:35 pm | प्यारे१
मस्त रे गणेशा.......
2 Feb 2012 - 4:58 pm | वपाडाव
संदर वर्णन अन फटू....
चालु द्या...
2 Feb 2012 - 5:03 pm | ५० फक्त
छान सुंदर आणि आटोपशीर वर्णन..
अवांतर - केरळ लवकर संपवलंत ? हुकुमावरुन की काय ?
2 Feb 2012 - 5:08 pm | इरसाल
हळुवार मनाच्या कवीची कणखर किल्ल्याची सफर भावली.
2 Feb 2012 - 5:10 pm | इरसाल
डआकाटा (डबल आल्ता काढून टाकला )
2 Feb 2012 - 5:41 pm | अन्या दातार
सर्व मिपाकरांनी त्यांच्या सफरीतून किल्ल्यांच्या माहितीचा संग्रह बनवावा असे मनात येत आहे.
मस्तच रे गणेशा. :)
2 Feb 2012 - 6:11 pm | सुहास झेले
मस्त फटू गणेशा !!
2 Feb 2012 - 7:05 pm | प्रास
यंव रे यंव! मस्त ओळख करून दिली आहेस पुरंदरची आणि फोटोही मस्त!
आवडलं लिखाण. :-)
आपण हे किल्ले अजून पाहिले नाहीत याची आज शरम वाटली..... :-(
2 Feb 2012 - 7:09 pm | मी-सौरभ
सहमत
2 Feb 2012 - 10:28 pm | जाई.
सुंदर वर्णन आणि फोटो
2 Feb 2012 - 10:53 pm | प्रचेतस
मस्त वर्णन आणि फोटो रे गणेशा.
पुरंदराचे केदारेश्वर शिखर महाबळेश्वरापेक्षाही काकणभर उंचच आहे. भर उन्हाळ्यातही तिथे मस्त गारवा वाटतो. भोवती कायम भर्राट वारा.
वज्रगडावर का नाही गेलास रे. तिथेही २ दरवाजे, पाण्याची बरीच टाकी आहेत. आणि माथ्यावर उभ्या कातळांचा मस्त समूह आहे.
3 Feb 2012 - 9:00 am | अत्रुप्त आत्मा
वा वा गणेशा ....छान माहिती व फोटो... हां पण तुझा तो दरवाज्यातला फोटो आणी तो दरवाजाही अगदी शोभुन दिसतोय हां..... येकदम मेड फॉर इच अदर :-)
3 Feb 2012 - 2:02 pm | गवि
पुरंदर गड अत्यंत थरारक..
बाकी तो जाधवगड रहायला फार फार महाग आहे. वीसतीस हजाराला रूम्स आहेत.
त्याचा आतला पिवळा रंग आणि रिनोव्हेशन पाहून गोव्या/वेंगुर्ल्यानजीक तेरेखोल किल्ल्यावर असेच खाजगी हॉटेल झाले आहे त्याच्या आतल्या रंगाची आणि डेकोरेशनची आठवण झाली..
3 Feb 2012 - 2:09 pm | गणेशा
जाधवगड महाग आहे...
परंतु रुम्स रेट :
७००० रुपये प्रांगण
८००० डिलक्स
असे करत करत टॉप चे
१६००० रुपये असा रेट आहे..
3 Feb 2012 - 2:23 pm | यकु
मस्त गणेशराव!
मुरारबाजीचा परिच्छेद, सगळेच फोटो भारी.
और आने दो.