समुद्र किनाऱ्यावर लिहावीत अक्षरे
काही अर्थपूर्ण ... काही निरर्थक .....
मग सगळेच पुसून टाकावेत .....
वेचावेत खडे एक एक आयुष्यातले
आणि दिशाहीन भिरकावून द्यावेत ....
समुद्रालाच विचारावी मग किंमत
अक्षरांची,आठवणींच्या खड्यांची ...
घट्ट मुठीत धरून ठेवलेल्या ओल्या रेतीची....
त्यातून ठिबकणारे पाणी ......थेंब थेंब
तसेच हजारो विचार तुझ्या अस्तित्वाचे .....थेंब थेंब
ती रेती मग लाटांमध्ये सोडून द्यावी
जणू स्वतालाच पाण्यामध्ये सोडावे ....
पायाखालची रेती वाहून जावी लाटांबरोबर
आणि आपण मात्र क्षणभरात सावरावे ....
पाहावा फक्त तो विरघळणारा लाल रंग ......
दिवस मावळून सूर्य निघेल मग
परतीच्या प्रवासाला समुद्राबरोबर...
बुडणाऱ्या सूर्याचे सांत्वन न करता
मग आपणही निघावे काही तर्कांबरोबर ...
मनात परत तीच हुरहूर घेऊन....
स्वताशीच ताटातूट झालेले आपण ......
पायाला चिकटलेले वाळूचे कण जसे झटकू शकत नाही .......
तसेच ...सगळीकडे तुझ्या अस्तित्वाची जाणीव असताना
मी स्वताला 'नास्तिक' म्हणून शकत नाही !!!!
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 4:35 pm | पियुशा
मस्त !
आवड्ली आहे कविता :)
9 Jan 2012 - 4:46 pm | गवि
आहा.. क्या बात है... फार सुंदर..
9 Jan 2012 - 5:01 pm | पैसा
छान जमलीय कविता.
9 Jan 2012 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
@-.सगळीकडे तुझ्या अस्तित्वाची जाणीव असताना
मी स्वताला 'नास्तिक' म्हणून शकत नाही !!!!>>>>>>>>खरंआहे...
9 Jan 2012 - 6:06 pm | प्रचेतस
मिपावर खरडाव्यात काही कविता
काही अर्थपूर्ण....काही निरर्थक
पण तशाच ठेवाव्यात त्या,
जुळवावेत शब्द इथून तिथून
आणि जोडावेत इकडं तिकडं,
वाचकांच्याच प्रतिसादाच्या अपेक्षेत,
मग वाट बघत राहावी,
कधी आपला धागा वर येईल याची,
प्रतिसाद किती जास्त मिळतील त्याची
मग ते शब्द बोर्डावर तसेच सोडावेत,
धागा बराच खाली जायची वाट बघत,
मग देऊन आपलाच एक प्रतिसाद धन्यवादाचा,
धागा वर येण्याची अपेक्षा करत
स्वतःशीच प्रतारणा करणारे आपण,
कविता करायचे सोडू शकत नाही,
तसेच इतरही कवि दिसत असताना,
मी स्वतःला कवि म्हणू शकत नाही.
9 Jan 2012 - 6:09 pm | पैसा
=))
आता नीलकांतला सांगायलाच पाहिजे, 'विडंबन' नाही तर 'वल्ली सहित्य' म्हणून एक वेगळा विभाग तयार करायला हवा.
9 Jan 2012 - 6:14 pm | प्रास
__/\o_
दण्डवत् प्रणाम!
9 Jan 2012 - 6:48 pm | अत्रुप्त आत्मा
वल्लीदा..! ठ्ठार जा-ह-लो...!
राम..राम...राम..राम... पाणी आणा रे कुणीतरी.. ;-)
9 Jan 2012 - 7:04 pm | अन्नू
म्हण्जे प्यायला की अंघोळीला म्हणाय्यचं?
9 Jan 2012 - 8:46 pm | प्रचेतस
नाही नाही, नविन लेखकांच्या उत्साहावर ओतायला म्हणायचं.
9 Jan 2012 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
म्हण्जे प्यायला की अंघोळीला म्हणाय्यचं? >>>
<<< ज्याची त्याची गरज... ;-)
10 Jan 2012 - 2:44 pm | मी-सौरभ
आत्म्याला पाणी लागणार की रक्त???
आत्म्याला गंगाजल निषिद्ध असते ना?
9 Jan 2012 - 11:47 pm | सूड
भन्नाट !!
10 Jan 2012 - 8:09 pm | ५० फक्त
मुळ काव्य सुन्नाट अन विडंबन भन्नाट,
वल्लीला आता विडंवल्ली म्हणावं, एक पोकळी भरुन निघते आहे मिपावरची.
11 Jan 2012 - 12:20 pm | मूकवाचक
भन्नाट!
9 Jan 2012 - 8:54 pm | बिपिन कार्यकर्ते
फारच सुंदर!
11 Jan 2012 - 12:18 pm | मूकवाचक
असेच म्हणतो.
9 Jan 2012 - 9:41 pm | Nile
कविता भरकटलेली वाटते. पहिल्या कडव्यात कवी स्मरणरंजनाबद्दल बोलताना दिसतो. दुसर्या कडव्यातील पहिल्या दोन ओळी, दुसर्या दोन ओळी असंबंद्ध वाटतात तर पाचवी ओळ ओढून ताणून बसवायचा प्रयत्न अयशस्वी झाल्या सारखा वाटतो. पुढेही ओढून ताणून निष्कर्ष आणि कडव्यांचा, प्रसंगवर्णनाचा संबंध जोडलेला आहे असे वाटते.
प्रतिसाद कठोर वाटल्यास क्षमस्व.
10 Jan 2012 - 9:17 pm | गणेशा
अप्रतिम
11 Jan 2012 - 1:19 pm | वाहीदा
अप्रतिम अर्थपूर्ण कविता !
शेवटची ओळ खुप काही सांगून गेली ... सगळ्याच् कडव्यांचा एकमेकांशी संबंध सांगत ..
सुरेख ! सुंदर !
~ वाहीदा
12 Jan 2012 - 10:11 am | प्रभाकर पेठकर
स्वताशीच ताटातूट झालेले आपण ......
पायाला चिकटलेले वाळूचे कण जसे झटकू शकत नाही .......
तसेच ...सगळीकडे तुझ्या अस्तित्वाची जाणीव असताना
मी स्वताला 'नास्तिक' म्हणून शकत नाही !!!!
शेवटची ही चारोळी तेवढी चांगली वाटली.
असा परिणाम प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत साधता आला असता तर आख्खी 'कविता'ही आवडली असती.
12 Jan 2012 - 12:34 pm | प्रीत-मोहर
खुप छान कविता .. आवडली :)