रविवार दुपार, मस्त मटण आणि रेड वाईन रिचवून तंगड्या वर करून, इंद्राच्या दरबारात रंभा, उर्वशी सारख्या कमनीय, रमणीय रमणींच्या घोळक्यात गप्पांचा फड लावून टवाळक्या करणार्या नशील्या स्वप्नात गुंग झालो होतो. तोंड उघडे पडून लाळेची एक तार गळायला लागली होती. ही लाळ रमणींच्या घोळक्यात असल्यामुळे नव्हती हा, ती माझी सवय आहे, भरपेट जेवण अंगावर आल्याची ती खूण आहे.
तर, मस्त अशा नशील्या माहोल मध्ये असतानाच अचानक ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... असले आवाज ऐकू येऊ लागले. एकदम गलका ऐकू येऊ लागला. भयंकर कुजबुजणारे आवाज प्रचंड वेगाने जवळ येऊ लागले. मी एकदम बावचळून गेलो की अचानक झाले काय? इंद्रावर हल्ला झाला की काय अशी एक शंका चाटून गेली. पण नुकतेच इंद्राकडे समझोत्याची बोलणी करण्यासाठी शत्रू 'रब'राज्याची मंत्री 'खीना 'रब्बा'नी खार' येऊन गेल्यामुळे तो धोका नव्हता. अरे, आता तर बायकांचा आवाज प्रकर्षाने जाणवू लागला. च्यायला, त्या मंत्री 'खार' वर खार खाऊन राहिलेल्या गंधर्वांच्या बायका तर नाही चळलेल्या इंद्राचा निषेध करायला आल्या? तेवढ्यात धरणीकंपाचा भास होऊन मी गदगदा हालू लागलो आणि घाबरून एकदम उठून बसलो, बघतो तर काय समोर बायको मला गदगदा हालवून जागं करत होती.
तिच्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकावा म्हणून बघितले तर तिचा चेहरा घाबरा-घुबरा झालेला. कपाळावर घामाचे थेंब जमा झालेले. मग माझी पण फाफलली, त्या 'इन्सेप्शन' सिनेमाप्रमाणे हिनेही माझ्या स्वप्नात शिरून मला रमणींच्या घोळक्यात बघितले की काय? पण नाही, 'अहो गॅलरीत चला लवकर.. ' अशी एकदम घाबरट स्वरात ही बोलली, आयुष्यात प्रथमच. प्रकरण काहीतरी वेगळेच होते. उठून गॅलरीत गेलो तर बाहेर बघून माझी बोबडीच वळली. त्या ठॅण... ठॅण आवाजाचे आणि गलक्या मागचे रहस्य एकदम उलगडले.
खाली विशाल महिलांचा अर्रर्रर्र, चुकलो.. चुकलो, महिलांचा विशाल घोळका माझ्या घराकडे येत होता. त्यांच्यामागे बरीच हट्टीकट्टी माणसेही दिसत होती. ते कुजबुजणारे आवाज आता स्पष्ट होत होते. 'आता सर्वांचे एकच दान, दारूबंदीचे पुण्य महान', 'दारूबंदी झालीच पाहिजे', 'उभी बाटली आडवी करा', 'ह्या सोक्यालाही आडवा करा' अशा भयंकर घोषणा देत महिला हातात ताटं घेऊन पळीने ते वाजवीत ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... ठॅण... असा आवाज काढीत होत्या. पुरुषांच्या हातात कापडी फलक होते 'साबरमतीचा संत गांधीजी तर राळेगणसिद्धीचा अण्णाजी'. हे सर्व बघून माझ्या अंगातले त्राणच गेले. घशाला कोरड पडली. 'अगं ए, दारं खिडक्या घट्ट लावून घे', असे बायकोला सांगेपर्यंत दोन तीन विशालकाय महिला घरात घुसल्यादेखील. बायको हॉलमध्येच होती दार लावायला गेलेली.
'काय गं भवाने, कुठं हाय तुझा तो नव्वरा? ' अशी एका उग्र चेहेर्याच्या महिलेने विचारणा केली. तिच्या गळ्यात 'दारूबंदी महिला आघाडी, अणदूर' अशी पाटी होती. तिच्या मागोमाग आत येणर्या सर्व महिलांच्या गळ्यात अशाच शिक्रापूर, निमसोड, बुध अशा अनेक गावांच्या दारूबंदी महिला आघाडीच्या पाट्या होत्या. बायकोतर थिजूनच गेली. 'अहोssss जरा बाहेर येता काssss' असा आवाज दिला. माझी स्वतःची बायको, एवढ्या खालच्या पट्टीत बोलू शकते हा मला एकदम नव्याने शोध लागला. 'युरेका, युरेका' असे ओरडलोही असतो पण आज वेळ बरी नव्हती.
मी हळूच जीव मुठीत घेऊन बाहेर आलो. तर 'हा बघा सुकाळीचा, धरा रे ह्याला' असा आवाज आला. जरा धीर गोळा करून मी विचारले, 'काय झाले ते सांगाल की नाही, उगाच एखाद्याच्या असे घरात शिरायला ही काय.... मोग... नाही... काही नाही, लोकशाहीत असे करू शकत नाही हो'. 'ए लोकशाहीच्या, चल आता आमच्याबरबर गुमान', एक पहिलवान थाटाचा पुरुष बोलला. 'कुठे? कशाला.... काय केलेय मी?', मी. 'राळेगणसिद्धीला', पहिलवान. मला काहीच कळेना. भंजाळून मी विचारले 'अहो पण का'? 'तीकडं गेल्यावर कळलंच की', पहिलवान. 'अहो पण हे बघा तुम्ही अशी घरात घुसून दादागिरी नाही करू शकत', मी. मलाही आता राळेगणसिद्धी ऐकून जरा हायसे वाटले होते; अहिंसेच्या मार्गावर चालणार्या नेत्याचे अनुयायी होते ना ते. 'ये उचला रे ह्याला, त्यो असा ऐकणार नाही', पहिलवान. मग एकदम अजून एकदोन पहिलवानी पुरूष पुढे झाले आणि मला उचलून बाहेर घेऊन जाऊ लागले. मी बायकोला ओरडून सांगू लागलो, 'अगं ए, जरा पोलिसांना फोन कर, माझ्या भावाला पण फोन कर'. पण त्याचाही काही परिणाम त्यांच्यावर दिसेना. मग मात्र माझी फाxx. हे मला आता घेऊन जाणारच हे मला कळून चुकले. मग मी बायकोला हताश होऊन सांगितले, "मिपावर 'मदत हवीय, लवकर' असा एक काथ्याकूट टाक, आणि बघ काय होते ते. १०-१५ प्रतिसाद तर नक्कीच येतील. मग ठरव काय करायचे ते".
तोपर्यंत माझी वरात एका टेम्पोत येऊन पोहोचली होती. कोणाला काही विचारायची सोय नव्हती. सगळ्या बायका डोळे मोठे-मोठे करून माझ्याकडे पाहत होत्या तर पुरूष मुठी आवळून-आवळून. आता माझ्याकडे जे काही होईल ते पाहण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते. गाडीला दणदणा धक्के बसत होते. मी तसाच धक्के खात खात गाडीत मलूल पडून राहिलो. दुपारचे जेवण अजूनही अंगावर येत होते, ह्या सगळ्या दगदगीमुळे आणि गाडीच्या लयीमुळे माझे हळूच डोळे झाकले गेले.
मग एकदम गलका ऐकू आला आणि मला दोन तीन जणांनी एकदम गाडीखाली खेचले. 'कसलं बेनं आसल रे हे, खुशाल झोपलंय की रं हेन्द्र.', गर्दीतला एक जण बडबडला. आम्ही राळेगणसिद्धीला पोहोचलो होतो. संध्याकाळचा गार वारं अंगाला झोंबायला लागलं होता. सूर्य मावळून वातावरणात एक काळोखी दाटून आली होती आणि माझ्या मनातही. मला आता एका देवळाकडे नेण्यात येत होते. देवळाभोवती माणसांचा प्रचंड जमाव होता. ती एवढी माणसे बघून माझे अवसान पुन्हा एकदा गळाले. छातीत धडधड एकदम वाढली. काहीच कळेना काय चाललंय ते. जरा पुढे आलो तर देवळापुढल्या मैदानात एक मोठा खांब रोवला होता. आणि खांबाच्या वरच्या टोकाला एक मशाल बांधली होती. मैदानभर देवळाच्या वरच्या बाजूला लावलेल्या पेट्रोमॅक्सचा पिवळसर प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशामुळे त्या जमलेल्या माणसांच्या पडलेल्या सावल्या भयाण भासत होत्या. मला त्या मैदानात नेऊन तिथल्या खांबाला बांधून टाकले.
एकजण पुढे आला आणि माझ्या खच्चून एक कानाखाली मारून सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले. म्हणाला,'आता ह्याला एक देऊन ठेवली आहे, आता अण्णांना बोलवा'. सगळी गर्दी एकदम शांत झाली. बर्याच वेळाने तो माणूस परत आला. जमावाला संबोधून बोलू लागला, "आत्ताच अण्णांना भेटून आलो. एक खच्चून दिलेली त्यांना सांगेतले. त्यावर ते म्हणाले, 'काय, एकच दिली?'". जमावाचा जोरात हशा ऐकू आला. तो माणूस पुढे म्हणाला, 'अण्णांना अचानक दिल्लीला जावे लागतेय, टीम अण्णा काहीतरी नवीनं आंदोलन प्लॅन करणार आहे. त्यामुळे त्यांची यायची इच्छा असूनही ते इथे येऊ शकत नाहीयेत. त्यांनी मलाच ह्यावेळी विचार मांडून निर्णय घेण्यास सांगितले आहे'. एवढे बोलून तो माझ्याजवळ आला एक तुच्छतादर्शक नजर मला देऊन जमावाकडे वळला आणि बोलू लागला, 'ह्या सोकाजीसारखी लोकं म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या दारूबंदीच्या महान कार्यातली खीळ आहे. अखिल समाजाचे नुकसान करणार्या दारूसारख्या घातक गोष्टींवर लिखाण करणे, तेही असल्या घातक आणि निषिद्ध गोष्टीबद्दल समाजात प्रतिष्ठा प्राप्त होईल असे माहितीपूर्ण, हा तर समाजद्रोहाचा कळसच आहे. असले समाज विघातक काम करणार्या समाजद्रोह्यांना, देवळाच्या खांबाला बांधून मारले पाहिजे, असा अण्णांचा आदेश आहे. तसे आपण पूर्वीही केले आहे. ह्या टीनपाट लेखकाला त्याच्या लेखांना मिळणार्या ४-५ प्रतिसादांमुळे तो सोकावला आहे. तर ह्या सोक्याचा योग्य तो समाचार घेऊन त्याला चांगली अद्दल घडवायची आहे. जेणे करून तो हे असले समाजविघातक लिखाण थांबवेल. तर आता मी ह्याला तुमच्या हावाली करतो'.
हे सगळे ऐकून माझी बोबडीच वळली. मला माझे तुटके फुटके झालेले रूप डोळ्यासमोर दिसू लागले....
एक डोळा सुजून काळा झालेला. हात मोडका होऊन गळ्यात आलेला. पाय तुटल्यामुळे वॉकर घेऊन चालणारा. समोरचे २-३ दात तुटलेला. नाकाचे हाड मोडून वाइनचा गंध कधीच न घेऊ शकणारा (हे सगळे कंसात आहे असे समजून वाचा ;) ). हे सगळे डोळ्यासमोर आले आणि डोळे बंद करून, जीव खाऊन मी बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडलो, 'वाचवा, मला वाचवा, मला मारू नका. मला माफ करा, मारू नका.' आणि काय चमत्कार, पुन्हा एकदा धरणीकंप झाला आणि मी गदगदा हालू लागलो. घाबरून डोळे उघडले तर समोर बायको. अरे असे कसे झाले, ही कशी काय इथे आली म्हणून आजूबाजूला बघतले तर माझेच घर माझीच खोली. काहीच समजेना. बायकोने पेल्यातल्या पाण्याचा हबका तोंडावर मारला. एकदम हुशार होऊन उठून बसलो. हातात पेपर होता आणि बातमी होती 'दारुड्यांना खांबाला बांधून फटके द्या'.
मग एकदम हे सर्व स्वप्न होते असे कळले आणि हायसे वाटले. नुकताच 'इन्सेप्शन' हा सिनेमा बघितल्यामुळे स्वप्नात स्वप्न असे हायटेक प्रकार माझ्या आयुष्यात घडल्यामुळे अंमळ मौजही वाटली.
असो, मित्रांनो हा धागा काथ्याकूट मध्ये टाकण्याचे कारण म्हणजे मी खरंच ह्या स्वप्नामुळे घाबरलो आहे. मला तुमचा सल्ला हवाय:
१. मी माझे खरे नाव आणि फोटो खरडवहीतून काढून टाकू का? (अण्णांचे समर्थक त्यामुळे मला सहज ओळखू शकतात)
२. मी माझे 'कॉकटेल लाऊंज' आणि 'गाथा' लिहिणे बंद करू का? (खांबाला बांधले जाऊन मार खाणे खरंच खूप भयानक असते हो)
तसेच एक विनंती, सोकाजीरावत्रोलोकेकर म्हणजे मीच (माझे खरे नाव) हे प्लीज कोणाला सांगू नका.
चेतन सुभाष गुगळे तुम्हाला ही विनंती जरा जास्तच करतो आहे.
तर मिपाकरहो प्लीज मला सल्ला देऊन मदत करा.
प्रतिक्रिया
27 Nov 2011 - 8:28 pm | गणपा
हा हा हा.. सोक्या जमतयं जमतयं. :)
27 Nov 2011 - 8:29 pm | रेवती
हे हे हे.
काळजी करू नका सोत्रि, गुगळेसाहेब तसे वाईट नाहीत.;)
27 Nov 2011 - 8:30 pm | नितिन थत्ते
अण्णांच्या पवित्र कार्याची अशी खिल्ली उडवल्याबद्दल नी....षे....ढ.
;)
बाकी, लै भारी लिखाण.
(टी टोट्लर) नितिन थत्ते
27 Nov 2011 - 8:34 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=))
27 Nov 2011 - 10:28 pm | सोत्रि
आशावाद बिपीन्दा आशावाद.
उम्मीद पे दुनिया कायम है |
- (आशावादी) सोकाजी
29 Nov 2011 - 3:26 pm | किचेन
आम्ही मदत केली असती अस वाटत तुम्हाला?
27 Nov 2011 - 8:41 pm | पैसा
असे घाबरताय काय, म्हणा "हंगामा है क्युं बरपा" =)) =))
तुम्ही पळून गोव्यात या, देऊया तुम्हाला संरक्षण! =)) =))
27 Nov 2011 - 8:48 pm | गणपा
तो गोव्यात पळुन आला तर तमाम गोवेकरांचा घसा 'कोरडाच' राहील. ;)
27 Nov 2011 - 8:52 pm | पैसा
सगळा गोवा ड्राय झाला तरी मला काय फरक पडत नाय!
27 Nov 2011 - 8:54 pm | कपिलमुनी
(सौ. सो. का. यांची क्षमा मागून)
आज पेपर मधेबतमी वाचली तेव्हापसुन घोर लागल होता जीवाला !
तरी मि यांना सांगत असते जी काय प्यायची तरी घरी बसुन चुप चाप प्या..पण नाही ना , मिरवायची हौस दांडगी...
आधि इकडे तिकडे मित्रांना सांगायचे..आता ते मिपाला जॉइन केल्यापासुन शिकवणीच सुरु केलि आहे जणू . आधी वाटले होते, हे आमचच ध्यान असा ..तिथे तर ह्यांचा कट्टाच जमला ...
ते अणि त्यांचे मि पा कर....
,कानोकानी खबर गेली ..आणि आले कि लोक घरी ( खर्र सांगयचा तर हे ज्यांना प्यायला बोलावत नाहीत ना, तेच जास्त जण होते)..
आता धरुन नेला आहे काय होइल देव जाणे ...
27 Nov 2011 - 9:14 pm | श्रावण मोडक
हाहाहा... हे कधी तरी वास्तवात घडणार आहेच. ;) तुझ्या नादाला लागलेल्या मिपावरच्या मेंब्रांच्या बायका हा प्लान करताहेत, अशी खबर आहे. ;)
27 Nov 2011 - 11:44 pm | सोत्रि
सौ. श्रावण मोडक ह्यांना माझा नमस्कार सांगा. माझ्या बायकोने त्यांना हळदी-कुंकवाला बोलावले आहे हेही आवर्जुन सांगा, ओटी भरणार आहे म्हणावे.
- (धूर्त) सोकाजी
28 Nov 2011 - 3:50 pm | श्रावण मोडक
रॉंग नंबर. मी सुखी आहे. हे इतरांच्या बायकांविषयी बोलतोय मी.
29 Nov 2011 - 11:51 am | सोत्रि
अर्रर्र, चुकलो. :(
नशिबवान आहात :)
- (मोडकांच्या सुखाचा हेवा वाटणारा) सोकाजी
27 Nov 2011 - 9:37 pm | आत्मशून्य
__/\__
27 Nov 2011 - 9:53 pm | प्रचेतस
_/\__/\__/\_
27 Nov 2011 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास. :)
-दिलीप बिरुटे
27 Nov 2011 - 10:09 pm | किसन शिंदे
खतरनाकच!!
उभी बाटली आडवी करा', 'ह्या सोक्यालाही आडवा करा'
=)) =))
27 Nov 2011 - 10:20 pm | आशु जोग
एकच सांगू इच्छितो
त्रिलोकेकर यांना त्यांनी दारु पिण्यातील भ्रष्टाचार घालवण्यासाठी प्रयत्न केला आहे
सो हे अण्णांचेच कार्य पुढे नेणे आहे, भ्रष्टाचार निर्मुलन.
दुसरी गोष्ट 'दुकाना दुकानामधे वाइन दिसली पाहीजे' असे साहेबांचे स्वप्न आहे
तुमच्या कार्याला दोघांचे आशीर्वाद असायला हरकत नाही.
28 Nov 2011 - 12:05 am | दादा कोंडके
बाकी लेख खुसखुशीतच! :)
27 Nov 2011 - 11:25 pm | आनंदी गोपाळ
उर्फ चेतन सुभाष गुगळे हे यांचे खरे नांव आहे का हो सोकाजी?
28 Nov 2011 - 9:54 am | प्यारे१
अहो नुसतं नावच खरं नाही काही... आक्खा माणूसच खरा आणि एकदम सच्चा आहे.
तुम्ही आणि वरच्या रेवत मॅड-म (बार्क्यांच्या आज्जीबाई, साथिया तूने क्या किया) एकदा साहेबांबरोबर कट्टा तरी करुन बघा की राव.... ;)
27 Nov 2011 - 11:34 pm | यकु
असं काही झालं असतं तर सोका फॅन क्लब, मु.पो. मिपाच्या खंद्या अनुयायांनी मु.पो. राळेगणच्या वेशीवर आत्मक्लेश करुन घेतले असते!!
28 Nov 2011 - 11:54 am | अर्धवट
याचं खरं नाव सोकावादी काँग्रेस असं आहे हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छीतो.
28 Nov 2011 - 5:30 pm | दादा कोंडके
लेख छानच.
पण ऑन अ सिरिअस नोट, वर्षानुवर्षे राजकारण कोळुन प्यायलेले राजकारणी सुद्धा नको तेंव्हा नको ते बोलून जातात, त्यात "बडे-बडे शहरोमे" असो किंवा अगदी साखरेच्या दरवाढीसंदर्भात आपल्या साहेबांची विधानं असोत. अण्णांच्या बाबतीत तेव्हडी सूट द्यायला हरकत नाही. सगळं तोलून मापून विचारवंती बोलणं त्याना जमत नसेलही. आपण शहरी सोशल ड्रिंकर्स त्यांनी केलेल्या विधानाला हसत असू पण त्यांनी गावाकडे दारुपायी उध्वस्त होणारे संसार बघितले असतील. आणि त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार विरोधी चळवळ स्टंट ठरत नाही. असो.
27 Nov 2011 - 11:51 pm | मोहनराव
_/\__/\__/\_
पण तुम्ही तुमचे लिखाण सोडु नका साहेब!! .... चा घोट गळ्याखाली जाणार नाही मग..
28 Nov 2011 - 6:13 am | सुहास झेले
हा हा हा हा .... जबरा !!
हा तर षटकार _/\_ _/\_ _/\_
28 Nov 2011 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्ह्हा ह्ह्हहा :bigsmile: _/\__/\__/\_ मद्याचार्य आपणास शाष-टांग नमन.... तुमची दिक्षा थोडी त्यांच्या शिष्यगणांना द्या,,, राळ्याचे अनेक गण सिद्धी प्राप्त झाल्यासारखे हिमालयात निघुन जातील ;-)
28 Nov 2011 - 9:21 am | नगरीनिरंजन
गमतीदार लेख!
"खांब, मार आणि मी" हे शीर्षक वाचूनच थोडा अंदाज आला होता (सोकाजींची प्रतिमा आहेच तशी पावरफुल्ल).
"खंबा मार(तो) मी" असं लिहिणार्यावर "गांधीवादाने टुन झालेल्या" आण्णांमुळे अशी वेळ यावी ना?
28 Nov 2011 - 10:29 am | ५० फक्त
वाचुन धन्य झालो, एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असावी तर ती अशी, मार खाल्ला तरी त्यासाठीच, सोकाजी तु पार ते कोण भक्त प्रल्हाद का काय म्हणतात त्यांच्या माळेतला आहेस.
एकदम मस्त लिखाण.
28 Nov 2011 - 11:24 am | छोटा डॉन
जबर्या रे सोक्या, एक लंबर लेख.
च्यामारी आता जरा जपुन रहा, उगाच तुझ्या खवमध्ये 'आत्मक्लेष' सुरु करायचे मिपावरचे अण्णावादी लोक्स.
बाकी काही काही वाक्ये खरोखर दाद देण्यासारखी आहेत. 'मदत हवी' हे खांबाला बांधुन ठोकले आहे त्याचा जबाब नाही, एक नंबरच :)
अवांतर :
आता ह्याचा 'उत्तरार्थ' येऊद्यात ;)
- छोटा डॉन
28 Nov 2011 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार
सोत्रेला आपल्या गावात नेऊन राळेगणसिद्धीवाले स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतील असे वाटत नाही. हा मनुक्ष २ तास जरी राळेगणात राहीला, तर ह्यावेळी रामलीलावरती व्यासपीठाच्या मागे बाटल्यांचा खच नक्की.
28 Nov 2011 - 11:41 am | भीमाईचा पिपळ्या.
हाहाहा एक लंबर
बायदवे ते देवळाच्या खांबाला नाही. तर देवळासमोरील विजेच्या खांबाला बांधून अण्णा पेताडांचा 'कार्यक्रम' करत असत. :D
28 Nov 2011 - 12:08 pm | ऋषिकेश
हा हा हा!!! मस्त लिहिलंय!
आणि हो दोन्ही प्रश्नांची उत्तरे 'नको' अशी आहेत ;)
28 Nov 2011 - 12:56 pm | नंदन
लेख आवडला. खंबा ते खांब हा प्रवास खंबीरपणे पार पडण्याचे धैर्य आपणास मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना :)
28 Nov 2011 - 1:03 pm | मन१
आणि त्यातही
२. मी माझे 'कॉकटेल लाऊंज' आणि 'गाथा' लिहिणे बंद करू का? (खांबाला बांधले जाऊन मार खाणे खरंच खूप भयानक असते हो)
म्हणजे फक्त "लिहिणे" बंद करायचाच विचार केलात. "पिणे" बंद करायचा नाही.
धन्य हो तुमची भक्ती.----/\----
28 Nov 2011 - 2:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
सोकाजीराव,
एकदम पहिल्या धारेचा कडक माल होता. जबरदस्त मजा आली वाचताना.
28 Nov 2011 - 2:31 pm | चिगो
एकदम जबराट लिवलंय, राव.. बाकी "प्या आणि एन्जॉय करा".. चढल्यावर एखाद्याने चढवली तरी फारशी जाणवत नाही, म्हणतात.. (स्वानुभव नाही.. नाहीतर हाणतील मलाच ;-))
28 Nov 2011 - 4:23 pm | विनायक प्रभू
एकदम हाल कट लेख.
28 Nov 2011 - 4:46 pm | पाषाणभेद
जबरा लेखन. मजा आली.
28 Nov 2011 - 6:48 pm | स्वाती२
:)
30 Nov 2011 - 10:09 am | सविता००१
:)
30 Nov 2011 - 4:26 pm | बिजुरीया
ह्हा ह्ह्हा ह्ह्हहा :)
1 Dec 2011 - 10:20 pm | सूर्यपुत्र
मी पहिल्यांदा "खंबा मार" असेच वाचले....
जाऊ द्या हो, अश्या खांबांना कसे फाट्यावर मारायचे, हे एखाद्या श्वानराजांना विचारा.... ;)
-सूर्यपुत्र.
2 Dec 2011 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सोकाजी, मार मजेशीर आहे, तुला मिळाला म्हणून आवडला. ;-)
2 Dec 2011 - 10:17 am | सोत्रि
हायला, हे बरे आहे.
मला हलकट-हलकट म्हणायचे आणि स्वतः दुसर्याला (पक्षी: मला) मिळलेला मार बघून आनंदाच्या उकळ्या फुटेपर्यंत खुष व्हायचे, असला हलकटपणा करायचा.
ह्याला मराठी भाषेत 'Hypocrisy' म्हणतात हो ;)
- (१.५_७ हलकट) सोकाजी
28 Mar 2013 - 7:28 am | सोत्रि
माझ्या दारुवरच्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांच्या एकम्दरीत रोखावरून न राहवून माझाच हा धागा वर काढतो आहे.
-(दारूडा) सोकाजी
28 Mar 2013 - 7:31 am | श्रीरंग_जोशी
हा लेख तेव्हा इतकेवेळा वाचला होता की, शाळेत शिकलेल्या पाठाप्रमाणे वाक्यांसकट लक्षात आहे :-).
28 Mar 2013 - 7:34 am | स्पंदना
काय म्हणतात ते "आलिया भोगासी, असावे सादर"