माझे मनोगत :--- मुंबई ! करोडो लोक इथे राहतात आणि लाखो रोज पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येतात.रेल्वे ही मुंबईची धमनी समजली जाते...अव्याहतपणे चाललेल्या फेर्या,क्षमते पेक्षा किती तरी जास्त लोकांना रोज इच्छीत स्थळी पोहचवण्याची सेवा नित्य नियमाने पार पाडली जाते...
पत्ते खेळणारे लोक,भजनी मंडळ,पेन-चॉकलेट, चीनी वस्तु तसेच इतर पदार्थ विकणारे विक्रेते. शिरडी वाले साई बाबा असं भजन म्हणत हातातल्या छोट्या टिपर्या लयीत वाजवत पैसे मागणारी निरागस मुले ! काय पाहावयास मिळेत नाही या प्रवासात ?
प्रत्येक जण इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी अधीर झालेला असतो...
कोणाचा प्रवास सुरु होतो तर कुणाचा संपतो...काही सेकंदातच डब्यातुन उतरणारी व चढणारी माणसे !!! सगळच कसं अचंबीत करणारे...
मी क्लायंटकडे डेन्मार्कला असताना... एकदा गप्पा मारताना सहजच त्यांना विचारले,की तुम्हाला माझ्या देशा बद्धल काय माहित आहे ? ते म्हणाले रेल्वे अपघात ! मला फार वाईट वाटले. :( पण काय बोलणार आपल्या देशात रेल्वे अपघात आता नवलाईची गोष्ट राहिली आहे ? त्यात बॉब्म स्फोट करणार्यांसाठी अगदी सोपे लक्ष ! एका झटक्यात अनेक ठार,शिवाय मिडीया कव्हरेज प्रचंड मिळत असल्याने अतिरेक्याचे आवडते लक्ष !!!
नगरीनिरंजन यांचा जन्मठेप हा धागा वाचला आणि आत कुठेतरी घुसमटायला झालं...
मध्य आणि पश्चिम रेल्वेला ५ नव्हेंबर रोजी ६० वर्ष पूर्ण झाली... रेल्वेची आणि त्यांच्या कर्मचार्यांची सेवा सर्व मुंबईकरांसाठी एक न थांबणारी बहुमोल सेवा आहे. या सेवेला फोटो रुपी मानाचा मुजरा !
*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.
(प्रवासी)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
7 Nov 2011 - 9:46 pm | यकु
:)
व्वा! फोटो आणि त्याखाली लिहीलेल्या मनोगतासाठी.
7 Nov 2011 - 9:50 pm | अन्या दातार
फोटो अजुन चांगले काढता आले असते. मनोगत (संस्थळ नव्हे ;), धाग्यातील)उत्तम
7 Nov 2011 - 9:53 pm | विलासराव
आमचा रोजचा प्रवास होता अंबरनाथ ते भायखळा ९ वर्ष. गेले ते दिवस.
7 Nov 2011 - 9:56 pm | गणेशा
फोटो खाली लिहिलेले आवडले..
मात्र
फोटो ' कलादालन' या विभागत येण्यासारखे नक्कीच नाहित ..
7 Nov 2011 - 9:56 pm | गणेशा
फोटो खाली लिहिलेले आवडले..
मात्र
फोटो ' कलादालन' या विभागत येण्यासारखे नक्कीच नाहित ..
7 Nov 2011 - 9:58 pm | प्रकाश१११
वा ..मला घाटकोपरची आठवण आली. मस्त फोटो. अप्रतिम ..!!
आणि लिखाण पण मार्मिक.
आवडले. ..
7 Nov 2011 - 10:00 pm | पैसा
मरे आणि परे ला ६० वर्ष झाली? आम्ही मुंबईच्या लोकलने २ वर्षातून एक दिवस, तेही रात्री ११ वाजता वगैरे गेलो तर अर्धमेले होऊन येतो. तुम्हा रोज जाणार्यांच्या शौर्याचं भयंकर कौतुक वाटतं.
7 Nov 2011 - 10:20 pm | दादा कोंडके
लोकल म्हणजे एक वेगळेच विश्व असतं खरं.
बाकी धागा वाचुन ह्या लोकल स्टंस्टची आठवण झाली.
http://youtu.be/PTnEt5qex3s
7 Nov 2011 - 10:28 pm | मदनबाण
हो असे स्टंट करणारे महाभाग आहेत...
कधी मला असे लोक दिसले तर त्यांना मी सांगीन... अरे बाबांनो तुमच्या घरी कोण तरी तुमची वाट पाहत असते,निदान त्यांचा विचार करुन तरी असा जीवाचा खेळ करु नका !
एक असलाच इडियो :--- http://www.youtube.com/watch?v=vowCXC9DUFY
कॄपया कोमल मनाच्या लोकांनी हा इडियो पाहण्याचे टाळावे. !
7 Nov 2011 - 11:00 pm | यकु
या प्रकारासाठी फार मस्त गावरान शब्द आहे..
पण इथं नको तो द्यायला..
सौजन्यः मदनबाण यांनी दिलेला तुनळीवरचा दुवा.
7 Nov 2011 - 10:33 pm | मदनबाण
अन्या आणि गणेशा तुमचं म्हणण मान्य आहे...परंतु एका हातात कॅमेरा धरुन दुसर्या हातात रेल्वेचा बार पकडुन फोटो टिपणे मला कठीण गेले. हे सर्व फोटो एका हातानेच काढले आहेत.
पुढच्या खेपेस अजुन चांगला प्रयत्न करेन.
7 Nov 2011 - 11:35 pm | पाषाणभेद
मजकूर अन फोटो आवडला.
अन नेहमीची *टीपही आवडली. असलेच फोटो मला आवडतात.
8 Nov 2011 - 12:04 am | स्मिता.
मध्य आणि पश्चिम रेल्वेला ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेले मनोगत आवडले. मला वाटतं फोटो हे केवळ लेखाच्या पूर्ततेसाठी असावेत.
भारतीय रेल्वेने केवळ मुंबईलाच नव्हे प्रत्येक सामान्य भारतीयाला अतिशय बहुमूल्य सेवा दिलेली आहे. त्यामुळे ती मानाच्या मुजर्याची नक्कीच अधिकारी आहे.
त्या लहानश्या मनोगताने मात्र मला अंतर्मुख होवून बराच वेळ विचार करायला भाग पाडले. कोणतेही स्टंट्स न करताही रेल्वे अपघात घडून घरातल्या कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्यावर मागे राहिलेल्या कुटुंबाची हालाखीची परिस्थिती जवळून माहिती असल्याने जास्त मनाला भिडले. पण अर्थातच त्याला रेल्वे नक्कीच जबाबदार नाही.
अपघात कुठेही होवू शकतो. पण ५ मिनीट वाचवण्यासाठी धावती गाडी पकडणार्यांनी, सिग्नल नसताना रूळ क्रॉस करणार्यांनी किंवा उगाच स्टंट्स करणार्यांनी फक्त एकदा आपल्या घरच्यांचा विचार करावा अशी विनंती कराविशी वाटते.
8 Nov 2011 - 12:26 am | रेवती
हम्म...
मला लोकल ट्रेन हा प्रकार कधी झेपला नाही ब्वॉ!
तू म्हणतोस ते प्रकार पहायला मिळतात आणि विसरता येत नाहीत.
आणि उगाच लोंबकळून वगैरे फोटो काढला असशील तर तुझा निषेध!
8 Nov 2011 - 12:59 am | पाषाणभेद
अरे खरेच की. वरच्या त्याच्याच प्रतिसादात त्याने म्हटले आहे की:
>>>>>"परंतु एका हातात कॅमेरा धरुन दुसर्या हातात रेल्वेचा बार पकडुन फोटो टिपणे मला कठीण गेले. हे सर्व फोटो एका हातानेच काढले आहेत."
असे असेल तर मदणाचा खरोखर निषेध करायला हवा. अरे काय हे! आम्हाला तुझे अजून बरेच फोटो, लेख वाचायचे आहेत राव!
8 Nov 2011 - 2:53 am | प्राजु
>>>>कधी मला असे लोक दिसले तर त्यांना मी सांगीन... अरे बाबांनो तुमच्या घरी कोण तरी तुमची वाट पाहत असते,निदान त्यांचा विचार करुन तरी असा जीवाचा खेळ करु नका !<<<
लोका सांगे ब्रम्हज्ञान!! स्वतः स्टंट करून फोटो काढलेसच ना! निषेध!
8 Nov 2011 - 3:18 am | पिवळा डांबिस
आयुष्यातली १० वर्षे लोकलला लटकत काढली. तो नॉस्टाल्जिया जागा केलास रे बाबा!!!
अनेक धन्यवाद!
लोकलच्या डब्यात आत जाणं हे केवळ बाबा किंवा आई बरोबर असल्यासच व्हायचं. कारण नाहीतर तेसुद्धा वर जसे मिपाकर काका-काकू बोलतायत ना तस्संच अगदी टाकून- टाकून बोलायचे!!!! ;)
इतर वेळेस मात्र आपण फूटबोर्ड पाशिंजर!!! तेही शेवटून तिसर्या डब्यातल्या दरवाजामधले!;)
बाकी रविवारी सकाळी काढलेस का रे फोटो? नाय म्हणजे तुझ्या गाड्या अगदी 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' अशा दिसतायत म्हणुन विचारलं!:)
आमच्या कर्जत डबलफास्टमधून वीकडेला काढून दाखव एकदा फोटो!!!
:)
8 Nov 2011 - 9:01 am | मदनबाण
उगाच लोंबकळून वगैरे फोटो काढला असशील तर तुझा निषेध!
लोका सांगे ब्रम्हज्ञान!! स्वतः स्टंट करून फोटो काढलेसच ना! निषेध!
रेवती आज्जी + प्राजु ताय...
मी कुठलाही स्टंट करुन किंवा लोंबकळून फोटो काढलेले नाहीत.फक्त दरवाज्याच्या जास्त जवळ राहुन काढले इतकेच ! ;)
बाकी रविवारी सकाळी काढलेस का रे फोटो? नाय म्हणजे तुझ्या गाड्या अगदी 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' अशा दिसतायत म्हणुन विचारलं!
पिडा, दुपारच्या वेळी जास्त गर्दी नसताना हे फोटो काढले आहेत. मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक इथे येई पर्यंत गर्दी जवळपास नव्हतीच, त्यात दिवाळीचा काळ असल्याने कमी लोक प्रवास करत असावेत..त्यामुळेच कुठलाही धोका न-घेता फोटो टिपले
आमच्या कर्जत डबलफास्टमधून वीकडेला काढून दाखव एकदा फोटो!!!
खी खी खी... त्यासाठी आधी त्या ट्रेन मधे चढायला मिळाले पाहिजे ना ! ;)
8 Nov 2011 - 9:41 am | पिवळा डांबिस
मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक इथे येई पर्यंत गर्दी जवळपास नव्हतीच,
धीस इज चीटींग!
मस्जिद बंदर आणि बोरीबंदर यांच्यादरम्यान तर फोटो काढणेच काय पण पोरगीही पटू शकेल!!!;)
हे काय खरं नाय हां!!!
खरं म्हणजे एखादी चांगली सोज्ज्वळ कर्जत नाहीतर कसारा लोकल बघायची. त्या लोकलमध्ये उल्हासनगर, डोंबिवली किंवा घाटकोपर असल्या नामांकित स्थानकातून प्रवेश करायचा प्रयत्न करायचा. आणि मग आपलं दरवाज्यातलं स्थान कायम राखून फोटो काढायचे!!!
ती खरी मर्दुमकी!!!!
:)
8 Nov 2011 - 9:53 am | मदनबाण
मस्जिद बंदर आणि बोरीबंदर यांच्यादरम्यान तर फोटो काढणेच काय पण पोरगीही पटू शकेल!!!
छ्या... हा विचार मी आधीच करायला पाहिजे होता ! ;)
ती खरी मर्दुमकी!!!!
जोक्स अपार्ट,,, अश्या प्रकारची मर्दुमकी करणार्याचा कोळसा होताना पण पहायला मिळते ! असे इडियो तू-नळीवर आहेत. ते इथे दिले तर लोक शॉक लागुन पडतील ! आज्जी आणि ताई मंडळी तर मग ट्रान्स मधेच जातील ! ;)
8 Nov 2011 - 10:24 am | अमोल केळकर
फार छान
यानिमित्याने आम्हाला आमचीच एक रचना आठवली
अमोल केळकर
8 Nov 2011 - 10:32 am | ५० फक्त
भारी रे फोटो, फोटोची जाग कळाल्यावर एखाद्या फोटोत माझा मागच्या दिवाळीत पडलेला फोन सापडतो का पाहात होतो.
बाकी रेल्वे बद्दल मनात कायमच आदराचे स्थान आहे.
8 Nov 2011 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाणा. फोटो ठीक ठीक आहेत ’वाह उस्ताद वाह ’ अशी दाद देण्याइतके फोटो जब्रा वाटत नाही.
नुसते फोटो नाही तर फोटोतून कथा आली पाहिजे. ऐसे फोटो कुछ सोचनेको मजबूर करनेवाले चाहीहे.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)
ठाणा-घनसोली,एरोली मार्गावर गर्दी त्या मानाने कमी असते असे वाटते.
आम्ही कधी-मधी तुमच्या शहरात येणा-या लोकांना तो लोकलचा कलकलाट सहनच होत नाही.
-दिलीप बिरुटे
(गाववाला)
8 Nov 2011 - 10:48 am | मदनबाण
बाणा. फोटो ठीक ठीक आहेत ’वाह उस्ताद वाह ’ अशी दाद देण्याइतके फोटो जब्रा वाटत नाही.
नुसते फोटो नाही तर फोटोतून कथा आली पाहिजे. ऐसे फोटो कुछ सोचनेको मजबूर करनेवाले चाहीहे.
अगदी मान्य आहे. भापो. :)
8 Nov 2011 - 10:49 am | गवि
मस्त रे.. मीही केलाय अनेक वर्षं हा प्रवास, ठाणे-करी रोड..
करी रोड स्टेशनला खास उतरुन कधीतरी त्या रेल्वे स्टॉलवरची नानकटाई खा रे. एक काजू लावलेली..
तिथल्या चहासोबत ती नानकटाई.. अरे अशी कुठेच मिळाली नाही शोधूनही..
बाकी मध्यरेल्वेच्या प्रवासाचं काय सांगायचं.. रोज म.रे. त्याला कोण रडे.. !
8 Nov 2011 - 11:01 am | सुहास झेले
परे बेस्ट... मुंबईची सर्वात आवडती धमनी ;)
बाणा, ह्याहून कैक पटीने चांगले फोटो काढू शकतोस रे तू. एकदा सकाळच्या पारी विरार-चर्चगेट प्रवास करून बघ. विविधांगी चेहरे बंदिस्त करता येतील तुला... :) :)
8 Nov 2011 - 1:45 pm | प्रभाकर पेठकर
रेल्वेच्या ह्या छायाचित्रांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. ७० ते ८१ ह्या कालखंडात दहिसर ते चर्चगेट आणि दहिसर ते अंधेरी आणि कांजूरमार्ग ते दादर ते दहिसर असा विविध मार्गांवर प्रवास केला.
'एक प्रवास लोकलचा' म्हंटल्यावर मुंबई लोकलचा गर्दीच्या वेळेतला प्रवास अपेक्षित होता. आपल्या क्षमतेपेक्षा दसपट प्रवासी वाहून नेणार्या, अनेक मुंग्यांनी मेलेल्या अळीला घेऊन जाताना दिसावे तशा दिसणार्या गाड्या, दोन स्थानका दरम्यान थांबलेल्या गाडीतील प्रवासी प्राणवायू न मिळाल्याने काळे-निळे पडायची वेळ आली तरी लालचा हिरवा न होणारा सिग्नल, डब्यातील घामट गर्दी, संध्याकाळच्या कचेर्या सुटल्यावर बोरिबंदर, चर्चगेट, दादर इत्यादी तट्ट फुगलेल्या स्थानकांवरील गर्दी, रेल्वे स्टॉलवरील वाफाळणारा चहा, 'लेडीज' डब्यासमोरील सुगंधीत आणि सुळसुळीत कपड्यातील गर्दी निरखणारी पुरूषगर्दी, धुवांधार पावसाळ्यातील ओलीचिंब गर्दी, आणि एवढ्या गर्दीतही 'हे स्थानक माझ्या वडिलोपार्जित मिळकतीतून वारसाहक्काने माझ्या मालकिचे झाले आहे' अशा अविर्भावात पहुडलेले एखादे मरतुकडे कुत्रे इत्यादी छायाचित्रे पाहावयास मिळाली असती तर लोकलच्या प्रवासाचे एक सामुदायिक चित्र पूर्ण झाले असते.
असो. तरीपण प्रयत्न स्तुत्य आहे. हल्ली रजेवर भारतात जाणे झाले तरी रेल्वेने प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे सर्व छायाचित्रे पाहून मन उचंबळून आले. अभिनंदन.
9 Nov 2011 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'एक प्रवास लोकलचा म्हटल्यावर' पासून ते 'एक सामुदायिक चित्र पूर्ण झाले असते' इथपर्यंत पेठकर साहेबांच्या शब्दा-शब्दाशी सहमत आहे.
मलाच मुंबईत आल्यावर मोबाईलने अशी चित्र खेचावे लागतील. :)
-दिलीप बिरुटे
8 Nov 2011 - 2:10 pm | नितिन थत्ते
फोटो मस्त.....
मरे परे ला ६० वर्षे झाली?
म्हणजे जी आय पी चे मरे असे आणि बी बी सी आय चे परे असे नामांतर होऊन ६० वर्षे झाली का?
8 Nov 2011 - 2:15 pm | मदनबाण
म्हणजे जी आय पी चे मरे असे आणि बी बी सी आय चे परे असे नामांतर होऊन ६० वर्षे झाली का?
अधिक माहिती साठी इथे टिचकी मारा :--- http://goo.gl/JchFc
9 Nov 2011 - 3:15 pm | जागु
फोटो आणि लेखन दोन्ही आवडले.
9 Nov 2011 - 6:38 pm | निनाद मुक्काम प...
फोटो पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
रेल्वेच्या तिन्ही मार्गावरून कॉलेज च्या दिवसात मुक्त संचार असायचा. हार्बर मध्ये चेंबूर ते गोवंडी कसेबसे पार केले म्हणजे त्यावेळी रुळाचा लगत झोपड्या इतक्या जवळ होत्या की कूर्म गतीने जाण्यार्या रेल्वेतून झोपड्यांच्या आतील दृश्य सहज दिसे होत्या पण हीच हार्बर गोवंडी ते वाशी त्या खाडीच्या पुलावरून भरदाव सुटायची मग राजेशाही महालात प्रवेश घेतोय अश्या थाटात वाशीत प्रवेश घ्यायची.
खाजगी कंपनी रेल्वे स्टेशन काय चकाचक बांधू शकतील ह्याचे उदाहरण म्हणजे वाशी व पुढील स्टेशने आहेत. तेव्हा तेथे अनेक खाजगी अल्बम व सिनेमांच्या प्रसंग व गाण्याचे चित्रण होत ते पाहण्यासाठी चकाट्या पिटायला जाणे हा एक आनंद सोहळा असायचा. कुर्ला खर्या अर्थाने मध्यवर्ती स्टेशन होते. मात्र माझ्यामते रेल्वेचे सर्वात जास्त अपघाती मृत्यू सुद्धा तिथेच होतात. स्टेशन व रुळावर मृतदेहांचे लगदे कितीतरी वेळा पडलेले पहिले आहेत .ते मग स्ट्रेचर वर ठेवून कितीतरी वेळ प्लेट फॉर्म वर ठेवत. ते पाहून मनातील भीती मात्र कायम ची मेली
( हॉलीवूड रक्त रंजित सिनेमे पाहण्याचे नैतिक बळ मिळाले) होळीच्या दिवसात दरवाजावर उभे राहणे म्हणजे ........
रूळा लगत झोपडपट्या हटवणे अपरिहार्य ठरल्याने मग त्या लोकांकडून लोकल वर दगडे मारण्यार्या
प्रमाण वाढले. काल विक्रोळी येथे एका महिलेचा डोळा फुटून निकामी झाल्याची सचित्र बातमी सामन्यामध्ये वाचली.
एकदा असाच दगड विरार ते बोरीवली दरम्यान दरवाजावर आदळला. माझा मित्र नी मी बालंबाल बचावलो.
पण रेल्वे प्रवासाच्या खरी मजा चर्चगेट ते माटुंगा पर्यत येते. दक्षिण मुंबई चे धावते दर्शन होते.
तिकीट नसतांना पकडले जाणे मग कुर्ला इस्ट व वेस्ट च्या पोलीस कोर्टर मधील मित्र बरोबर असल्याने मग हातापाया पडून फुकटात सुटणे असे अनेक किस्से आहेत.
सगळ्यात धमाल किस्सा म्हणजे एकदा मित्राकडे अंधेरीला १० जण चाललो होतो. तेव्हा तो सोडल्यास आमच्या कोणाकडेही तिकीट नव्हते. वरती पुलावर कावळा पाहून आम्ही धास्तावलो .पण आम्ही एक आयडिया केली. मित्राने पाकिटातून
पास काढून बेगेत टाकला. व एकटा वर पुलावर जाऊन त्या कावळ्याच्य बाजूने मुद्दाम त्यांची नजर चुकवून पळू लागला .कावळा मात्र शिकार पकडण्याठी त्यांच्या पाठी धावला. ह्याचा फायदा घेऊन आम्ही सर्व सटकलो . तिथे टीसीने मित्राची गंचाडी धरली. तेव्हा मित्राने पास आहे पण मी घाईत आहे असे सांगून पहिले पाकीट काढले मग त्यात तिकीट नाही म्हणून एक क्षण संभ्रमित भाव मनात आणून मग आठवल्यासारखे करून बेग मधून पास काढून दाखवला . व हॉस्पिटल मध्ये जायला उशीर होतोस हे सांगून सटकला पण त्याच्याआधी . आमच्यासारखे अनेक नग सटकले होते
8 Apr 2015 - 12:20 pm | एक एकटा एकटाच
मस्त
8 Apr 2015 - 1:02 pm | एक एकटा एकटाच
मस्त फ़ोटो आहेत
8 Apr 2015 - 2:07 pm | गुनि
photograph mast aahe .... maza aata parayant sarve life mumbai madhe gala aahe . train is life line of mumbai.
Khup gardi aste .... ghamcha vas ..... bombabomb....kadhi kadhi maramari .... pan aapulki vatat
8 Apr 2015 - 2:08 pm | कविता१९७८
फोटो मस्त, मनोगत आवडलं, रेल्वे प्रवास जितका सुकर तितकाच धोक्याचाही, आपण योग्य ती काळजी घ्यायलाच हवी जी आपण बर्याचदा घाईत असल्याने मुळे विसरतो किंवा टाळतो पण त्याने आपलेच नुकसान होणार असते.
8 Apr 2015 - 2:09 pm | गुनि
could some one help me , how to type in marathi .
8 Apr 2015 - 2:17 pm | मदनबाण
नविन प्रतिसाद देणार्या मंडळींना धन्यवाद !
@गुनि
मराठी लिहण्यासाठी मदत इथे मिळेल :- टंकलेखन करण्याची पद्धत
हे कठीण वाटत असल्यास इथेही मदत मिळेल :- http://www.google.com/intl/mr/inputtools/try/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
8 Apr 2015 - 2:43 pm | गुनि
@ मदनबान धन्यवाद.