जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे प्राथमिक श्रवणातून जो अर्थ निघतो त्यातही नेहमीच्या पारंपारिक विचारांपेक्षा एक नवा आधुनिक विचार प्रकट केलाय जो निदान मला तरी अतिशय महत्वाचा वाटतो.
सुरूवातीचे ५० सेकंद केवळ वाद्यांचा आवाज आणि लताचा ओलाप ऐकू येतो. त्यानंतर गीताचे शब्द सुरू होतात.
नदीया बहती है तुमसे कहती है ...
सागरसे मुझको मिलना नही है, सागरसे मिलके मै खारी हो जाऊंगी।
या ओळींमधूनच आपल्या लक्षात येतं की गीतकार एक वेगळा नवा विचार आपल्यासमोर मांडतोय. नेहमी नदी सागरा मिळते, नायक नायिकेचे नाव सागर सरिता असणे वगैरे गोष्टी आपण चिक्कारदा ऐकल्या आहेत. इथे नदी सांगतेय की मला सागराला भेटायचंच नाहीये. त्याला भेटून माझं पाणी खारट होईल. आता हा विचार नवा जरी असला तरी चूकीचा नक्कीच नाहीये. नदीचं पाणी एकदा सागरात मिसळलं की ते खारटच होणार.
बांधलो मुझे, रोक लो मुझे; मै तुम्हारी हो जाऊंगी ।
बघा म्हणजे ही नदी म्हणतेय की मला सागराला जाऊन मिळण्यापासून थांबवा, अडवा. मी तुमच्या उपयोगी पडेन. जुनाट विचारांचे लोक धरणे बांधायला विरोध करीत त्या पार्श्वभूमीवर तर हा विचार अधिकच प्रेरणादायी वाटतो. शिवाय मला यातून जाणवलेला एक छुपा दुसरा अर्थ असा की वरवर ऐकायला जरी हे गीत नदीचे आत्मवृत्त प्रकारातील वाटत असले तरी खोलवर ते कुठेतरी एका स्त्रीचे आत्मवृत्त आहे. ती म्हणतेय की माझे घरचे माझा कल न पाहता, माझ्या मनाचा विचार न करता मला कुणाच्या तरी गळ्यात बांधतील, जे की मला पसंत नाही. त्या अगोदर माझ्या मनाचा विचार करणार्या, माझी आवडनिवड जोपासणार्या कुणीतरी मला आपली बनवा. थोडक्यात हा घरच्यांनी ठरविलेला विवाह विरुद्ध प्रेमविवाह असा सामना आहे आणि ही स्त्री आपल्या प्रियकराला साद घालतेय. तिच्या मनात जी पारंपारिक नवर्याची प्रतिमा आहे तिला तिने सागराची उपमा दिली आहे आणि तिला हव्याहव्याशा वाटणार्या प्रियकराला तिने धरणाची उपमा दिलीय.
नाव तो क्या गांव बह जाते है मेरी चाल मे ऐसी रवानी।
बांधलो मुझको बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी॥
नदीच्या प्रवाहाला असणार्या वेगाचा अंदाज आला नाही तर नौका तर डुबतेच आणि कधी काळी जर नदीने रौद्र रूप धारण केलं तर गावंच्या गावं पाण्याखाली जातात. तेव्हा या पाण्याच्या प्रवाहाला वेळीच आवर घाला असंही ही नदी सूचवितेय. पुन्हा याच शब्दांचा स्त्रीच्या संदर्भामध्ये अर्थ शोधला तर स्त्रीच्या आकर्षण प्रवाहात बुडालेला टायटॅनिक मधला प्रियकर देखील आठवेल आणि स्त्रियांना मिळविण्याकरिता पुरूषांनी केलेली युद्ध आणि त्यात बेचिराख झालेल्या राज्यांच्या कथाही आठवतील. वेळीच योग्य हाती हे तारूण्य सुपूर्त झालं नाही तर नेमकं काय होईल याचा अंदाज तिलाही नाही म्हणूनच ती म्हणतेय बहक न जाए चंचल चंचल जवानी का पानी.
मेरी आंचलमें है अमृत वह देदे जो नयी जिंदगानी।
आंगन आंगन बरसेगा कंचन, जानसे तुमको मै प्यारी हो जाऊंगी।
इथेही पुन्हा आंचलमें अमृत हा शब्द नदीच्या संदर्भात पाणी या अर्थाने तर स्त्रीच्या संदर्भात दूध ह्या अर्थाने वापरला असून दोन्हींमूळे नवजीवन मिळते. त्याचप्रमाणे नदीच्या पाण्याने शेते पिकून सोन्यासारखे धान्य प्रत्येक अंगणी बरसेल तर स्त्री घरादाराचं सोनं करून टाकेल आणि या दोघीही त्यांच्या कुटुंबियांना (नदीचं कुटुंब तर अख्खा गावच) प्राणप्रिय होतील.
रेत जहां, खेत लहराएंगे जागेगी धरतीकी ममता सोयी।
प्यार तुम्हे दुंगी, बहार तुम्हे दुंगी, प्यासा रहेगा न पनघट कोई।।
आज जिथं वाळवंट आहे उद्या तिथे नदीच्या पाण्यामुळे शेते बहरतील. पुरुषांचं आयुष्य काम, धंद्या निमित्त कराव्या लागणार्या ढोरमेहनतीमुळे वैराण वाळवंटासारखंच असतं. प्रेयसीच्या रुपाने येऊन स्त्री त्याला प्रेम देते आणि त्याची ही तहान भागविते हा भाव अतिशय सुरेख पद्धतीने व्यक्त झालाय.
मेरा नामोनिशां फिर होगा कहां, मै जो समंदर में खोई।
मुझे अपनालो, गांव मे बसालो, तुम्हारीही सारी की सारी हो जाऊंगी॥
मी जर त्या खारट समुद्राला जाऊन मिसळले तर मग माझ्या गोड्या पाण्याचं अस्तित्व काय राहणार? मला इथेच आपलं बनवा. या गावातच मला थांबवा म्हणजेच धरण बांधा. माझं पाणी तुमच्याच उपयोगी पडू द्या.
पूर्वी मुलीच्या घरचे केवळ जात, धर्म, पैसा, अडका यांनी भुलून जाऊन मुलीला कुठेतरी दूरच्या शहरी विवाह करून पाठवायचे. तिथे तिचा पती बहुतेकदा तिचे मन जाणु न शकणारा, अरसिक, शुष्क मनोवृत्तीचा असायचा अशा हकीकती आपल्याला ठाऊक आहेतच. अशाच पतीला तिने खारट समुद्राची उपमा दिलीय. अशा घरात माझं अस्तित्व ते काय असणार? त्यापेक्षा गावातल्याच तिच्या अस्मितेला जपणार्या एखाद्या तरूणाने तिचा प्रियकर बनुन तिला आपलं बनवावी हिच तिची इच्छा दिसतेय.
गीतलेखनाबरोबरच लताचा आवाज आणि कानाला सुखावणारं संगीत या जमेच्या बाजू आहेत. तीन दशकांपूर्वीच्या नई इमारत या चित्रपटातील ह्या गीताला पडद्यावर साकारलंय विद्या सिन्हा, परीक्षित सहानी, अमरिश पुरी आणि इतर सहकलाकारांनी.
परंपरेने ठरवून दिलेला समुद्र हा नायक झुगारून आपल्या मनातला खरा नायक धरणच आहे असे ठासून सांगणार्या सरितेच्या या गाण्याचा आस्वाद एकदा तरी जरूर घ्यावा.
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 8:07 pm | विजुभाऊ
अरे वा. छान छान.
3 Nov 2011 - 8:21 pm | पैसा
लेखाचं नाव पाहून भीत भीत लेख उघडला. पण वाचून बरं वाटलं. अशा द्व्यर्थी रचना वाचायला आवडतील!
3 Nov 2011 - 8:28 pm | चेतन सुभाष गुगळे
<< वेगळाच अर्थ! >>
<< लेखाचं नाव पाहून भीत भीत लेख उघडला. >>
लेखाचं नाव काही ही असू द्या हो. पण लेखकाचं नाव आणि त्याचा जालीय इतिहास पाहता तुम्हाला "असली" भीती वाटायला नको होती असं मनापासून वाटतं.
<< पण वाचून बरं वाटलं. अशा द्व्यर्थी रचना वाचायला आवडतील! >>
धन्यवाद.
होय दुसरा अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. अनेक दा चांगला ही असतो. पण आपल्या डोक्यात काही समीकरणे घट्ट बसलीयेत जसे की जुळ्य़ा भावांपैकी एक चांगला तर एक वाईट (राजेंद्रकुमारचा काला और गोरा). असो.
तद्वतच द्वयर्थी गीत म्हंटले की आपल्या मनातली ही समीकरणे जागृत होतात.
3 Nov 2011 - 10:32 pm | पैसा
जास्त सिनेमे पाहिल्याचा परिणाम!
>>पण लेखकाचं नाव आणि त्याचा जालीय इतिहास पाहता तुम्हाला "असली" भीती वाटायला नको होती असं मनापासून वाटतं.
मला जालीय अभ्यास बराच वाढवायला पाहिजे आहे हे कबूल करते! त्यातून माणूस कवा बी बदलतंय बघा! (हलके घ्या!)
(आता धनाजीराव तुकाराम ज्ञानेश्वरावरनं एकदम सखूची गाणी लिहितील असं कोणाच्या स्वप्नात तरी आलं असतं का?)
3 Nov 2011 - 11:44 pm | स्मिता.
पैसाताईशी अगदी सहमत. मीसुद्धा जरा भीतभीतच धागा उघडला होता. (धागाकर्त्याचा इतिहास माहिती असूनही). कारण तेच... त्यातून माणूस कवा बी बदलतंय बघा! ;)
गाण्याचे रसग्रहण आवडले. असे आणखी येवू द्या.
4 Nov 2011 - 4:10 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
<< कारण तेच... त्यातून माणूस कवा बी बदलतंय बघा! >>
काळजी करू नका हो. माझ्याविषयी तक्रार करणार्यांचही हेच मत आहे बघा की मी बदलतच नाही. तद्वत आपल्या व्याख्येनुसार मी कदाचित माणूस नसणार बहुधा.
4 Nov 2011 - 6:26 pm | वपाडाव
चला तर, चेसुगुंना जाणीव झाली म्हणायची मग.....
4 Nov 2011 - 7:08 pm | चेतन सुभाष गुगळे
अरे वडा त्यांच्या व्याख्येनुसार रे... माझ्या नव्हे...
4 Nov 2011 - 10:09 pm | राजेश घासकडवी
माफ करा, पण त्यांचे पूर्ण सदस्यनाम वपाडाव असे आहे. सदस्यनामाचं असं भ्रष्टीकरण करणं योग्य नाही, असं तुमचंच मत होतं. स्वतःला इतरांनी जी वागणूक देऊ नये अशी जाहीर अपेक्षा करता तीच वागणूक इतरांना तितक्याच जाहीरपणे देणं हे वैचारिक अपरिपक्वतेचं लक्षण का समजू नये?
बाकी लेख तसा ठीकठीकच वाटला. द्वयर्थ हा शब्द इथे लागू होत नाही, असं माझं मत आहे.
4 Nov 2011 - 10:56 pm | चेतन सुभाष गुगळे
<< सदस्यनामाचं असं भ्रष्टीकरण करणं योग्य नाही, असं तुमचंच मत होतं. >>
ते माझं मत अजुनही आहे; त्याला ते मान्य नसावं त्यामुळे त्याने माझ्या नावाचं केलं आणि प्रत्युत्तरादाखल मी त्याच्या.
आपण हिंसा करू नये असंही माझं मत आहे, पण तरीही एखाद्याला हे माझं मत पटलं नाही आणि त्याने माझ्यावर हल्ला केला तर प्रत्युत्तरादाखल मीही हल्ला करणारच की.
अर्थात सुरूवात मी करणार नाही इतकं नक्की.
<< बाकी लेख तसा ठीकठीकच वाटला. >>
वाईट म्हंटलं असतं तरी चाललं असतं. एक वाचक म्हणून तो हक्क तुम्हाला नक्कीच आहे. या आधीच्या प्रत्येक लेखावर कित्येक महिने विचार केला होता. हा केवळ काही दिवसच विचार करून लिहीलेला लेख आहे. त्यामुळे गुणवत्तेत फरक पडणे स्वाभाविक आहे.
<< द्वयर्थ हा शब्द इथे लागू होत नाही >>
म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करा. मी लावलेला गीतातील वाक्यांचा दुसरा अर्थ मान्य नाही का? केवळ नदीचं मनोगत सांगण्याकरिता ती गात नाहीये एवढं नक्की. तिच्या मनात नक्कीच दुसरं काही तरी चाललंय हे तुम्हाला वाटत नाही का?
4 Nov 2011 - 11:37 pm | राजेश घासकडवी
मग अहिंसेच्या तत्वाची हाय मॉरल ग्राउंड शिल्लक रहात नाही. गांधीजी आणि चेतन सुभाष गुगळे यांमध्ये हा फरक आहे इतकंच. बाकी तुम्ही कसं वागावं हे मी ठरवत नाही. पण इतरांनी कसं वागावं याबाबत काही ठाम अपेक्षा ठेवून मागण्या करणाऱ्यांनी आपलं वागणं नियंत्रित ठेवावं अशी अपेक्षा असते हे दाखवून द्यायचं होतं. यापुढे या विषयावर चर्चा करणं कदाचित या लेखावर अवांतर ठरू शकेल.
द्वयर्थी या शब्दाला 'वरवर सामान्य पण लैंगिक सूचक रूपकं वापरणारं' असा प्रचलित अर्थ आहे. म्हणून तो इथे चुकीचा ठरतो. तुम्ही ज्या पद्धतीने तो शब्द वापरला आहे त्या जागी इतर अनेक शब्दप्रयोग आहेत. 'या गाण्यातलं नदी हे रूपक' किंवा 'व्यंजनेचा या गाण्यातला वापर' वगैरे वगैरे काहीतरी लिहिता आलं असतं.
तुमचे कुठचे लेख अनेक दिवस कष्ट करून लिहिलेले आहेत ते सांगा, म्हणजे मला तुम्ही कष्ट जास्त घेतल्याने लेख अधिक चांगला होतो का याविषयीचा फीडबॅक देता येईल.
4 Nov 2011 - 11:55 pm | चेतन सुभाष गुगळे
<< पण इतरांनी कसं वागावं याबाबत काही ठाम अपेक्षा ठेवून मागण्या करणाऱ्यांनी आपलं वागणं नियंत्रित ठेवावं अशी अपेक्षा असते हे दाखवून द्यायचं होतं. यापुढे या विषयावर चर्चा करणं कदाचित या लेखावर अवांतर ठरू शकेल. >>
होय. त्यामुळेच जास्त चर्चा करीत नाही, अन्यथा ती पार उठवळ मोर्च्याच्या धाग्यापर्यंत जाऊन थडकेल.
<< द्वयर्थी या शब्दाला 'वरवर सामान्य पण लैंगिक सूचक रूपकं वापरणारं' असा प्रचलित अर्थ आहे. म्हणून तो इथे चुकीचा ठरतो. >>
द्वयर्थी म्हणजे दोन अर्थांनी इतकी साधी सोपी सरळ फोड करून सांगता येईल. त्यामुळे हा शब्दप्रयोग चूकीचा ठरत नाही.
<< तुम्ही ज्या पद्धतीने तो शब्द वापरला आहे त्या जागी इतर अनेक शब्दप्रयोग आहेत. 'या गाण्यातलं नदी हे रूपक' किंवा 'व्यंजनेचा या गाण्यातला वापर' वगैरे वगैरे काहीतरी लिहिता आलं असतं. >>
म्हणजे गीतात दोन अर्थ असल्याचं तुम्ही मान्य करताय तर. मग केवळ दुसरा (आणि अर्थातच पहिलाही) अर्थ वाईट नाही म्हणून तुम्हाला द्वयर्थी हा शब्द खटकतोय. हा तुमच्या मनात वर्षानुवर्षं घट्ट बसलेल्या समीकरणांचा परिणाम आहे. तीच तर मला बदलायचीयेत.
<< तुमचे कुठचे लेख अनेक दिवस कष्ट करून लिहिलेले आहेत ते सांगा >>
http://www.misalpav.com/node/18561
http://www.misalpav.com/node/19597
http://www.misalpav.com/node/19506
http://www.misalpav.com/node/19283
http://www.misalpav.com/node/19142
http://www.misalpav.com/node/18717
<< म्हणजे मला तुम्ही कष्ट जास्त घेतल्याने लेख अधिक चांगला होतो का याविषयीचा फीडबॅक देता येईल. >>
चेंडू तुमच्या न्यायालयात टाकलेत.
5 Nov 2011 - 11:07 am | विकाल
चेंडू तुमच्या न्यायालयात टाकलेत.........
हे वाक्य ...ball is in your court.. या वाकप्रचाराच translation काय ओ?
5 Nov 2011 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार
माझ्या डोळ्यासमोर एकदम हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्ट समोरासमोर भरवलेली आहेत, हायकोर्टाच्या बाजूला नदाल आणि सुप्रिम कोर्टाचा बाजूला फेडरर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत असे दृष्य आले.
बाकी 'काळ्या मातीत मातीत तिफन चालते..' हे गाणे द्विअर्थी असल्याचे आमचे एक मित्र आम्हाला एकदा सांगत होते. त्या गाण्याबद्दल देखील श्री. गुगळे ह्यांनी विस्ताराने प्रकाश टाकावा अशी विनंती.
5 Nov 2011 - 10:14 pm | आशु जोग
परा यांचा प्रतिसाद वाचून खूप हसलो
>> बाकी 'काळ्या मातीत मातीत तिफन चालते..' हे गाणे द्विअर्थी असल्याचे आमचे एक मित्र आम्हाला एकदा सांगत होते. त्या गाण्याबद्दल देखील श्री. गुगळे ह्यांनी विस्ताराने प्रकाश टाकावा अशी विनंती.
याबाबत चेतन यांच्यापेक्षा तुम्हीच अधिक चांगले लिहू शकाल असे वाटते.
पण इथे नको
त्यासाठी घुसळपाव लवकरच येणार आहे
तिथल्या कोर्टाचे नियम जरा शिथील असतील
6 Nov 2011 - 10:36 am | चेतन सुभाष गुगळे
<< याबाबत चेतन यांच्यापेक्षा तुम्हीच अधिक चांगले लिहू शकाल असे वाटते. >>
धन्यवाद आशू,
तुमचं मत अगदी योग्य आहे. दोन्ही अर्थ चांगले असतील तर आणि तरच मी त्यावर लिहीणार. अर्थातच इथे सूचविलेल्या गीताबाबत तशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे हे काम करायला इथले इतर अनेक जण समर्थ आहेत.
घुसळपाव शब्द आवडला. अर्थात तो डोमेन आधीच बुक झाला असल्यास भेसळपाव हाही अजुन एक पर्यायी शब्द सूचवितो.
5 Nov 2011 - 11:58 am | सुहास झेले
:D :D :D
5 Nov 2011 - 6:10 pm | राजेश घासकडवी
या सहा लेखांपैकी साडेचार आधीच वाचलेले होते. उरलेले पुन्हा नेटाने वाचून काढले. त्यावरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. एकंदरीतच तुमचे तीनचार लेख एकाचवेळी डोळ्याखालून घातल्यावर जाणवलं, की तुमच्याकडे एकाचवेळी शाळकरी निबंधाप्रमाणे लिहिण्याची व त्यात अति बडबड करणाऱ्या काही म्हाताऱ्यांप्रमाणे पाल्हाळ लावण्याची क्षमता आहे. पण त्यापलिकडचे मुद्दे असे...
१. अधिक कष्ट घेऊन लिहिलेल्या लेखांची लांबी सर्वसाधारणपणे वरील लेखापेक्षा बरीच जास्त आहे.
२. अधिक कष्ट घेऊन लिहिलेल्या लेखांमध्ये विषयाशी संबंधित नसलेल्या गोष्टींचं वर्णनही बरंच जास्त आहे. (अपवाद आदित्य. त्यात निव्वळ कथेचा सारांश आहे) बहुतेक ठिकाणी या वर्णनांचा लेखाला फायदा होत नाही.
३. त्यामानाने हा कमी कष्ट घेऊन लिहिलेला लेख मुद्द्याला धरून आहे. नदीला धरण घातल्याप्रमाणे मर्यादित आहे. लेख ठीक ठीक असला तरी त्याचा मोजकेपणाबद्दल वाचक आभारी होऊ शकतो.
थोडक्यात, तुम्ही कमी कष्ट घेऊन लेखन केलंत तर ते अधिक वाचनीय होतं असा माझा अनुभव आहे.
अवांतर - कोर्ट हा शब्द द्वयर्थी वापरलेला पाहून गंमत वाटली.
5 Nov 2011 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार
इथे चेंडू हा शब्द देखील द्वयर्थी वापरलेला आहे हे गुर्जींच्या नम्रपणे लक्षात आणून देउ इच्छीतो.
6 Nov 2011 - 10:31 am | चेतन सुभाष गुगळे
<< की तुमच्याकडे एकाचवेळी शाळकरी निबंधाप्रमाणे लिहिण्याची व त्यात अति बडबड करणाऱ्या काही म्हाताऱ्यांप्रमाणे पाल्हाळ लावण्याची क्षमता आहे. >>
मागे एकदा एका धाग्यावर प्रतिक्रिया देताना आपण असं प्रतिपादन केलं होतंत की एक महिलानामदर्शक आयडी देखील आपलाच डुप्लिकेट आयडी आहे. आता आपली वरील विधाने वाचताना त्या महिलेने आपला आयडी हॅक केल्यासारखे वाटले आणि माझे डोळे पाणावले. सबब, आता यापुढे आपल्यासोबत चर्चा व्यर्थ.
<< या सहा लेखांपैकी साडेचार आधीच वाचलेले होते. उरलेले पुन्हा नेटाने वाचून काढले. >>
आपल्या कष्टांबद्दल धन्यवाद. आपण यापुढे माझे लेख वाचण्याचे व प्रतिसाद देण्याचे कष्ट न घेतल्यास उत्तम, कारण निदान मी तरी त्यांस पुन्हा प्रतिवाद करण्याचे कष्ट घेऊ इच्छित नाही.
9 Nov 2011 - 3:36 pm | कपिलमुनी
"चेंडू तुमच्या न्यायालयात टाकलेत"
मुळ इंग्रजी वाक् प्रचाराचा अर्थ वेगळा आहे
8 Nov 2011 - 1:40 am | आनंदी गोपाळ
मंग तुमचा भाव कसा अस्तो? गोरा और गोरा का?
-गोरामोरा झालेला
आनंदी गोपाळ
9 Nov 2011 - 1:55 pm | चेतन सुभाष गुगळे
<< मंग तुमचा भाव कसा अस्तो? गोरा और गोरा का? >>
जुळ्यांमध्ये फरक नसतोच असं मी म्हणत नाहीये. फक्त तो दरेक वेळी अतिशय टोकाचाच असेल असं माननंही चूकीचंच नाही का?
उदाहरणार्थ :- जुळ्या बहिणी आहेत, दोघींनाही वाद्य वाजवायची आवड आहे. पैकी जी सितार वाजविते ती सीता आणि गिटार वाजविते ती गीता (आणि या दोघींची आई बहुदा संगीता) इतका किरकोळ फरक हे हिंदी चित्रपटवाले कधीच दाखवित नाहीत त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये फरक असलाच तर तो एकदम टोकाचा ही आपली मानसिकता झालीये.
अर्थांबाबत हीच (म्हणजे टोकाचा फरक असण्याबाबतची) सिक मानसिकता बदलायला हवी.
9 Nov 2011 - 2:44 pm | वपाडाव
दादा कोंडके काय वाजवतात ?
त्यांच्या आइचे नाव काय?
भाउ कोंडके काय वाजवतात?
- (ब्यांड वाजवायच्या तयारीत असलेला) वप्या
3 Nov 2011 - 8:23 pm | रेवती
मला हा लक्ष ठेवण्याचा धागा वाटला होता.;)
3 Nov 2011 - 11:26 pm | आशु जोग
छान हा वेगळा विचार वाटला
आत्तापर्यंतचे प्रतिसादही चांगले आहेत.
आता काकूंची प्रतीक्षा !
4 Nov 2011 - 7:11 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
<< आत्तापर्यंतचे प्रतिसादही चांगले आहेत.
आता काकूंची प्रतीक्षा ! >>
त्यांचाही आला तर चांगलाच प्रतिसाद येणार अशी आशा बाळगतो.
4 Nov 2011 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार
काय लिवलय.. काय लिवलय.....
एकदम जबर्यादस्त !
'शिल्पा ब' ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
4 Nov 2011 - 8:14 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
शिल्पाजींच्या प्रतिक्रियेच्या तुम्हाला देखील उत्सुकता आहे तर...
4 Nov 2011 - 11:43 pm | आशु जोग
>>शिल्पाजींच्या प्रतिक्रियेच्या तुम्हाला देखील उत्सुकता आहे तर...
हो तर
कुणी हवे ना तीट लावणारे
4 Nov 2011 - 11:49 pm | चेतन सुभाष गुगळे
<< हो तर
कुणी हवे ना तीट लावणारे >>
आज ते काम आपले आणखी एक सन्माननीय सदस्य करत आहेत. वर पाहा.
4 Nov 2011 - 5:44 pm | दत्ता काळे
छान लिहीलंय. एकदम सफर मधल्या " नदीया चले चले ....... तुझको चलना होगा" गाण्याची आठवण येऊन गेली. पण त्या गाण्याचा अर्थ कदाचित तुमच्या ह्या गाण्याच्या विरुध्द असावा.
4 Nov 2011 - 8:15 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
होय त्या गीताचा अर्थ बराच भिन्न आहे.
5 Nov 2011 - 11:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला गाणं आवडलं. '' नदीया बहती है तुमसे कहती है ...सागरसे मुझको मिलना नही है, सागरसे मिलके मै खारी हो जाऊंगी'' गीतकाराने काय सुंदर रचना केली आहे. मला खूप आवडलं गाण ऐकायला.
बाकी, द्वयर्थी या शब्दाचा अर्थ राघा यांनी याच धाग्यात जो प्रचलित अर्थ सांगितला आहे तो अर्थ पटण्यासारखाच आहे. त्यामुळे द्वयर्थी रचनेचे रसग्रहण आहे, हे काही मान्य करता येणार नाही. एखादी कविता वाचल्यानंतर वाचकाच्या मनात जे विविध अर्थ आणि भाव उमटतात तसाच भाव आपण वरील गीतरचनेच्या निमित्ताने आपल्या लेखनातून व्यक्त केला आहे. तेही वाचतांना मला बरं वाटलं आहे.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 12:05 pm | चेतन सुभाष गुगळे
<< गीतकाराने काय सुंदर रचना केली आहे. मला खूप आवडलं गाण ऐकायला. >>
होय. मलाही पहिल्या श्रवणातच गीताने झपाटून टाकले आणि ह्या गीताचा श्रवणानंद आपल्याबरोबरच इतरांनाही मिळावा असे वाटून हा धागा काढला गेला.
<< बाकी, द्वयर्थी या शब्दाचा अर्थ राघा यांनी याच धाग्यात जो प्रचलित अर्थ सांगितला आहे तो अर्थ पटण्यासारखाच आहे. त्यामुळे द्वयर्थी रचनेचे रसग्रहण आहे, हे काही मान्य करता येणार नाही. >>
द्वयर्थी ह्या शब्दाची व्याकरण दृष्ट्या फोड केल्यास द्वय + अर्थी अशी होईल. त्यात द्वय म्हणजे दोन आणि अर्थी म्हणजे अर्थाने असे अभिप्रेत आहे. दुसरा अर्थ राजेश घासकडवी यांनी म्हंटल्याप्रमाणेच असायला हवा असे काहीही नाही.
http://translation.sensagent.com/ambiguous/en-hi/ इथे द्वयर्थी या शब्दाचा अर्थ ambiguous असा दिला आहे. इतरही अनेक मराठी इंग्रजी शब्दकोशांमध्ये ambiguous हाच अर्थ दिला आहे.
http://www.meaningfulmeaning.com/hindi/amphibological/ इथे तसेच गुगल भाषांतर इथे ही द्वयर्थी शब्दाचा अर्थ Amphibological असा दिला आहे.
http://72.78.249.125/esakal/20101219/5410359678314158332.htm या लेखातही लेखकाने "म्हणून आपल्याला प्रतीत होणारे हे जग द्वयर्थी (Dualistic) असते; परंतु ते मूलत: एकच आहे. " असे जे वाक्य लिहीले आहे त्यात द्वयर्थी हा शब्द वापरताना केवळ दोन अर्थ या अर्थानेच वापरला आहे.
http://www.sureshbhat.in/node/1120#comment-5047 या लेखावरच्या प्रतिक्रियेत देखील प्रतिसादकाने "द्वयर्थी शेर झाला. हे देवा, तू ही भूमी निर्माण करून इथे होत असलेल्या गोंधळाची नुसती मजा बघत बसतोस हे काही बरोबर नाही. आणि दुसरा अर्थः देवा, मला का उगाच पापी समजून शिक्षा देतोस? मी तर फक्त गोंधळ उडवून दिला होता अन त्याची मजा बघत होतो. " या वाक्यांमध्ये द्वयर्थी हा शब्द केवळ दोन अर्थ या अर्थानेच वापरला आहे.
http://www.mimarathi.net/node/1466#comment-38707 इथेही द्वयर्थी शब्दरचनेची छान उदाहरणे आहेत.
मी वर दिलेल्या दाखल्यांमध्ये राजेश घासकडवी यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने द्वयर्थी हा शब्द वापरला गेलेला नाहीये ह्याची कृपया नोंद घ्यावी. आपण प्रा. डॉ. असल्याने आपण व्यक्त केलेल्या मताला गांभीर्याने घेतले जाऊन त्यावर इतके दाखले देऊन विस्तृत स्पष्टीकरण केले गेले आहे.
<< एखादी कविता वाचल्यानंतर वाचकाच्या मनात जे विविध अर्थ आणि भाव उमटतात तसाच भाव आपण वरील गीतरचनेच्या निमित्ताने आपल्या लेखनातून व्यक्त केला आहे. तेही वाचतांना मला बरं वाटलं आहे. >>
धन्यवाद.
6 Nov 2011 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी वर दिलेल्या दाखल्यांमध्ये राजेश घासकडवी यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने द्वयर्थी हा शब्द वापरला गेलेला नाहीये ह्याची कृपया नोंद घ्यावी.
आत्ता आपण खुलासा केल्यावर नोंद घेतली आहे. विषय संपला. राजेश घासकडवींनी प्रचलित जो अर्थ सांगितला आहे, तोच मला पटणारा आहे. आता आपल्याला सर्वांना सर्वांच्याच गोष्टी मान्यच असल्या पाहिजे असं कोणी म्हणतं का ? नाही. तेव्हा आपल्या मताचा आदर आहेच. द्वयर्थी शब्दाचा अर्थ ज्याला दोन अर्थ आहेत असा घेतला जातो.
एक सभ्यपणाचा आणि दुसरा चावट अशा अर्थाने अशी जी रचना असते बहुतेक वेळी अशा रचनेलाच द्वयर्थी असे म्हटल्या जाते. अशा वेळी आपण जो लेखनात उल्लेख केला आहे तो श्लेष अलंकार साधला जात असतो. असो.
आपण प्रा. डॉ. असल्याने आपण व्यक्त केलेल्या मताला गांभीर्याने घेतले जाऊन त्यावर इतके दाखले देऊन विस्तृत स्पष्टीकरण केले गेले आहे.
आपण माझ्याबद्द्ल जो आदर व्यक्त केला आणि आपण असलेल्या आदराबद्द्ल विषयाच्या अंगाने जे विस्तृत स्पष्टीकरण केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 11:46 am | वेताळ
मला वाटते तुम्ही वर गाण्याचे रसग्रहण केले आहे. वरचे गाणे व्दयर्थी नाही आहे. व्दयर्थी गाण्यांसाठी दादा कोंडकेंची चित्रपट गीते तुम्ही एकावीत असे वाटते.
6 Nov 2011 - 11:56 am | चेतन सुभाष गुगळे
प्रा. डॉ. यांना दिलेले स्पष्टीकरण आपणही वाचा. खरे तर दादा कोंडकेंच्या गीतांमुळेच लोकांच्या डोक्यात द्वयर्थी शब्दाबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली आहे. आपल्या मनातली ही समीकरणेच बदलायला हवीत.
6 Nov 2011 - 12:09 pm | वेताळ
पण मराठीत व्दयर्थी बोलणे म्हणजे एकाद्या वाक्याचा दुसरा अर्थ शृंगारिक पणे घेणे ह्याला म्हणतात असे मला वाटते.
6 Nov 2011 - 12:10 pm | वेताळ
पण मराठीत व्दयर्थी बोलणे म्हणजे एकाद्या वाक्याचा दुसरा अर्थ शृंगारिक पणे घेणे ह्याला म्हणतात असे मला वाटते.
6 Nov 2011 - 1:53 pm | आशु जोग
द्वयर्थी = द्वि + अर्थी
इ + अ = य
उ + अ = व
आपण उच्चारून पहा, कळेल
असो
द्वयर्थी म्हणजे भाषेतील श्लेष अलंकार हे ध्यानात घ्यावे
एक सहज उदाहरण म्हणून एक कोडे खाली देत आहे
करकमळी जन्मली, सूर्यकमळी वाढली
पतीविना सती गेली, अशी नार कोणती !!
असे एक कोडे आहे. जरा नीट अर्थ लावला तर उत्तर ध्यानात येते.
8 Nov 2011 - 10:13 am | वपाडाव
सीता ???
9 Nov 2011 - 1:53 pm | अन्या दातार
साशंकतेने धागा उघडला, आणि अपेक्षेप्रमाणे अपेक्षाभंग झाला. बाकी वरची चर्चा बघून एवढेच म्हणावे वाटते की आपली मते पटवून देणे आणि लादणे यात फरक आहे
17 Nov 2011 - 10:35 pm | आशु जोग
सीता नव्हे गोवरी
18 Nov 2011 - 10:57 pm | शैलेन्द्र
:)
26 Apr 2024 - 3:55 am | रामचंद्र
वर आशू जोग यांनी म्हटल्याप्रमाणे द्व्यर्थीपेक्षा श्लेष म्हणणेच योग्य ठरेल.
26 Apr 2024 - 12:42 pm | चौथा कोनाडा
हे गाणं ऐकलं .. सुंदर आहे ... आपण केलेल्या रसग्रहणामुळं गाण्याचा अधिक अस्वाद घेता आला. धन्यू.
व्दयर्थी आणि श्लेष ही चर्चा आवडती !
26 Apr 2024 - 3:48 pm | सिद्धार्थ ४
गुगळे साहेब जेंव्हा मिपा वर होते ते किती सुंदर दिवस होते. गुगळे साहेबानी मिपा सन्यास घातला आणी गेले ते रम्य दिवस आणि उरले ते त्यंचे लेख.