नोट : सांदण दरी वर २ लेख लिहिलेले आहेच, परंतु स्वताची सर्व भटकंती लिहिलेली असावी म्हणुन हा थ्रेड.
वल्ली ला वाढदिवसाची एक भेट. २-३ त्याने काडलेले फोटो येथे अधिक केलेले आहे.
सांदण दरी.. वसुंधरेची खोल हाक
सांदण दरी... वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट.. पावलागणिक वसुंधराच आपल्याशी काही गूज सांगू पाहत आहे असेच वाटत राहते. वाटेत लागणाऱ्या रतनवाडी- अमृतेश्वराच्या मंदिरापासून फक्त ७ किमी पुढे सांम्रद या आदिवासी वस्तिवजा गावाशेजारी निसर्गाच्या कुशीत दडलेली ही वसुंधरेची गोड हाक.
वाटेतील अमृतेश्वराच्या स्पर्शाने पवित्र झालेले प्रवराचे बॅक वॉटर आणि अलंग-मदन-कुलंग आणि कळसुबाई या सह्याद्रीच्या रौद्र रांगेचे रुप मोहीनी घालतेच..
अमृतेश्वर मंदिर (रतनगड भटकंती वृत्तांत मध्ये सविस्तर देइनच)
प्रवराचे बॅक वॉटर आनी अलंग-मदन-कुलंग
रुषिकेश
पुढे झाडाच्या आडोशाला मस्त गाड्या पार्क करून आम्ही गावाच्या जवळून चालू लागलो. कौलारू घरे आणि निरागस माणसे मनाला एकदम भिडत होती. मन नकळत काळाला छेद देऊन आपल्याच गावाच्या.. गावातल्या माणसांच्या पाऊलखुणा येथे शोधत होते. त्याच बरोबर मागे दिसणारा रतनगड आणि त्याचा खुंटा जो की मागच्याच आठवड्यात दिलेली भेट.. आठवणी सांगू पाहत होता
रतनगड
पठाराच्या पुढून झाडांच्या गर्तेतून आम्ही एका घळी शेजारी आलो. हो हेच सांदन दरीचे मुख होते. तेथून पुढे आम्ही जमिनीच्या पातळी खाली प्रवास करणार होतो.. प्रथमतःच जमिनीच्या खोल घळीत उतरतानाचा आनंद गगनात मावत नव्हता.
घळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे. थंड निर्मळ पाणी पिवून आम्ही सुरुवातीचा कातळटप्पा पार करून पुढे दरीत प्रवेश केला.
थंडगार आल्हाद कातळांमधून चालताना खुपच प्रसन्न वाटते. कोठे कोठे दरी १०-१५ फुट रुंद आणि तितक्याच मोठ्या दगडांनी भरलेली तर कधी कधी फक्त २-३ फुट रुंद होत गेलेली. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश ही पोहचत नव्हता.
थोडेसे असेच पुढे गेलो की २ पाणीसाठे आपला मार्ग आडवून टाकतात. पावसाळा आणि हिवाळ्यात या पाणीसाठ्यांपलिकडे जाणे अवघडच. उन्हाळ्यामुळे बरेचसे पाणी कमी झालेले होते. तरीही बर्फापेक्षाही सुखद थंड असा त्यांचा स्पर्श आपल्याला आपुलकीने पुढे बोलवत होता. साधरणता ६ फुट खोल आणि १५-२० फुट लांब पसरलेला पहिला पाणीसाठा आम्ही एकमेकांच्या मदतीने पार केला. नितळ थंड आणि तळाचे खडक ही स्पष्ट दिसणारे पाणी म्हंटल्यावर मी १०-१५ मिनिटात मस्त डुंबून घेतले. वसुंधरेच्या काळजाचा हा प्रेमाचा ओलावा खुपच प्रसन्न करत होता. एकमेकांच्या सानिध्याने आमी पुढे निघालो.. उंच उंच कातळ आणि वळणवळणाची वाट.
--
थंड गार कातळातून पुढे चालताना कधी आम्ही पलीकडे टोकापाशी आलो कळलेच नाही, येथून पुढे समोरचा कोकणकडा प्रेक्षणीय दिसत होता. दरीच्या समोर ३५०० -४००० फुट सरळ तुटलेले कडे अतिशय आदबशीर वाटत होते. या अवघड वाटेने पुढे करोली घाटात जाता येते. परंतु अशी अवघड वाट मनात साठवून आम्ही मागे फिरलो.. मागे येताना ही जाताना जो अनुभव घेतला तोच पुन्हा पुन्हा घेतला. सरळ १५-२० फुट असणाऱ्या दगडावर पुढून चढणे म्हणजे खरेच खुप मस्त होते. गिर्यारोहन कधी केले नाही.. पण हा छोटासा अनुभव खुप छान वाटत होता. पुन्हा पाण्याच्या साठ्यात मनसोक्त दुंबून घेतले..
माघारी आल्यानंतर नितळ झऱ्याशेजारी मस्त इडल्या खाउन आम्ही पुन्हा वरून जमीनीवरून दरीच्या कडेने चालू लागलो. आपण नक्की किती खोलवरून चालत होतो आणि वरील जमीनीच्या अनुभवाची एक उत्कंठा मनात होतीच. पुन्हा वरील नटलेले सौंदर्य मनात घर करून जात होतेच. वरून काढलेले दरीचे फोटो तर मनात धस्स करून जात होते
. मागे फिरून पुन्हा जागेवर येताना नेहमीप्रमाणे आम्ही चुकलो आणि सुमारे २-३ किलोमिटर लांब प्रवराच्या बॅक वॉटर जवळ बाहेर आलो. आणि पुन्हा ते सर्व दृष्य चालत मनात साठवत आम्ही गाड्यांजवळ आलो. पुन्हा येथे येण्याचे मनोमन ठरवून आम्ही मार्गस्थ झालो.
प्रतिक्रिया
6 Aug 2011 - 6:52 pm | अभिजीत राजवाडे
जबरदस्त स्थळ आहे हे. अलंग ला जायचेच होते पण आता अजुन एक स्थळ मिळाले. पोहायचा फोटो नाबाद आहे. हॉलिवुड पेक्षा भारी लोकेशन आहे.
लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करेन.
पुन्हा एकदा खुप खुप आभार.
6 Aug 2011 - 6:59 pm | शैलेन्द्र
लै मस्त... कधी गेलेलात? पावसाळ्यातलं तर वाटत नाही?
6 Aug 2011 - 7:15 pm | मर्द मराठा
छान स्थळ आहे ... आणि छान वर्णन.
न्याहारी करताना पाहून आमचे जूने दिवस आठवले... धन्यवाद....
6 Aug 2011 - 7:45 pm | इरसाल
मस्तच रे .
कधी गेले होते तुम्ही लोक.
7 Aug 2011 - 12:09 pm | जयंत कुलकर्णी
सुंदर !
१९७२ साली केलेल्या रतनगडच्या ( इगतपूरी ते जून्नर) ट्रेकची आठवण फार तिव्रतेने झाली. त्या वेळी महाराष्ट्रातील ट्रेकिंगचे पितामह डॉ. बापूकाका आणि मिनू मेहता यांच्या बरोबर हा ट्रेक मी केला होता.
सह्याद्रीला तोड नाही !
7 Aug 2011 - 1:00 pm | कच्ची कैरी
व्वा गणेशा !तुम्ही इकडेही ?पण फोटो आणि वर्णन दोघही अगदी छान!!
7 Aug 2011 - 1:17 pm | धन्या
सहीच ट्रेक आहे हा राव... फोटोही मस्त आहेत...
7 Aug 2011 - 5:13 pm | प्रचेतस
सही रे गणेशा,
अचानक हा ट्रेकचा वृत्तांत टाकून अंमळ नॉस्टेल्जिक केल्या आहेस.
पाण्यातले तुझे मनसोक्त डुंबणे, कमरेइतक्या पाण्यातून पुढे एक पाउल टाकताच पुढे खोल खड्डा असल्याने झपकन गळ्यापर्यंत पाण्यात बुडणे, ५० फक्त यांचे आकाशाचा फोटो घेण्यासाठी कातळावरच उताणे झोपणे.
सांदणचा अनुभव थरारकच एकूण वाटचाल बर्यापैकी सोपी असूनही.
त्यात सांदण घळ बघून परत वरच्या पठारावर येउन ती वरील बाजूने पाहणे अत्यावश्यकच. सभोवती सह्याद्रीचे तुटलेले कडे, रतनगड, खुट्टा, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई या तालेवारांची साथ अविस्मरणीय.
त्याच भटकंतीत सांदण दरीच्या टोकाला कड्यामध्येच अश्मीभूत झालेल्या एका झाडाच्या वेलीचे अवशेष दिसले (फॉसिल्स). त्याचा हा फोटो.
7 Aug 2011 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा
जतन केलाय...यक नंबर आहे.
7 Aug 2011 - 2:19 pm | सुहास झेले
ज ह ब ह र !!!!
7 Aug 2011 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा
काय लोकेशन आहे राव ....मानलं...थोडीशी रामू च्या जंगलची आठवण झाली...
7 Aug 2011 - 6:06 pm | स्वाती दिनेश
फोटो मस्तच आहेत, ट्रेकही छान झालेला दिसतो आहे.
स्वाती
7 Aug 2011 - 6:14 pm | विनायक प्रभू
धम्याच्या डोक्यावर हॅट ठेवली अगदी विंडीयन इंडीयाना जोन्स दिसला असता.
लोकेशन्स एकदम भारी.
7 Aug 2011 - 7:37 pm | बिपिन कार्यकर्ते
खूपच आवडले.
8 Aug 2011 - 10:30 am | किसन शिंदे
मस्त गणेशा, लय जबरदस्त..!
8 Aug 2011 - 4:33 pm | स्पा
लय भारी दोस्तांनो... असेच ट्रेक करत राहा, आणि आम्हाला बोलवत राहा :)
10 Aug 2011 - 8:35 am | ५० फक्त
मस्त रे गणेशा, अशाच काही भटकंती असतील ना त्यापण टाक लवकर लवकर, टायम थोडाच राह्यलाय आता.
10 Aug 2011 - 1:29 pm | गणेशा
आहेत आणि कायम टाकत राहिनच [:)]
उलट जास्त भटकंती होतील
10 Aug 2011 - 4:06 pm | गवि
झकास...
11 Aug 2011 - 11:06 am | विलासराव
आम्हाला सांगीतले असते तर काय बिघडले असते ?
का मुद्दामच नाय सांगीतले?
ते काहीही असो.......जबरदस्त सफर झालेली दिसतेय.
16 Aug 2011 - 6:07 pm | जातीवंत भटका
मस्त रे ... अफलतून जागा आहे ही.
याच दरीत २००० च्या डिसेंबरमधे शेकोटी पेटवून काढलेली रात्र आठवली.... धन्यवाद !!
--
जातीवंत भटका...
20 Aug 2011 - 1:59 pm | दीप्स
छान स्पॉट निवडलात. सुंदर फोटो आणि सुंदर विशेषण युक्त लिखाण. पुढील ट्रेक साठी शुभेच्छा.
21 Aug 2011 - 7:26 pm | पैसा
वर्णन आणि फोटो झक्कास! आताच फिरून घे!