येत्या शनिवारी गटारी अमावस्या. म्हणजेच रविवार पासुन श्रावण लागणार. माझ्या सारख्या वार न पाळणार्याला काय ३६५ दिवस गटारीच. पण त्यामुळे माझ्यासाठी गटारीचं महत्व कमी झालय अस नाही.
मी लहान असताना आमच्या घरी गटारीला खुप मजा असायची. बरेच नातेवाईक जमायचे आमच्या घरी. खाटकाकडे बरीच मोठी रांग असायची. म्हणुन बाबा पहाटेच जाउन मटण /चिकन घेउन यायचे. तोपर्यंत आम्हा चिल्ल्या पिल्यांकडे लसुण सोलणे, खोबरं किसणे अशी काम लागलेली असायची. आई दिदिची एकीकडे चहा-न्याहारीची धावपळ चालु असे. माम्या मावश्या वाटणं घाटणं आदी जेवणाच्या पुर्व तयारीला लागलेल्या असायच्या.
पुरुषमंडळींची थोडीफार आचमनं चालायची. साधारण अकरा बाराच्या सुमारास आमची स्वारी एक कापडाची धोकटी सायकलच्या हँडलला टांगुन त्यात सोड्याच्या रिकाम्या बाटल्या घेउन खडखडाट करत निघायची. आतल्या खोलीत मामा, काका, बाबांची बैठक बसायची. आम्हा पोरा टोरांची मध्ये मध्ये उकडलेली अंडी, मक्याचा चिवडा, वेफर्स, फरसाण, सुक चिकन आदी चखण्यावर हात मारण्यासाठी लुडबुड चालु असायची. बैठकीला चढत्या अंगाने रंग भरायचा. अनेक गहन विषयांवर चर्चा चालु असायची. पण राजकारण आणि क्रिकेटया दोघांना मरण नसायचं.
साधारण एक दिड च्या सुमारास होममिनिस्टर पहिली घंटा द्यायच्या. शेवटी दोन अडीच वाजता पानं मांडायला घेतली जात. नाईलाजाने पुरुषमंडळी बैठक आवरती घेत. आईच्या हातचं सुग्रास जेवण, त्या नुसत्या घमघमाटानेच भुक अधिकच चाळवली जायची. मटणाचा लालेलाल रस्सा, कोंबडीच सुकं, सोबतीला गरमा गरम भाकर्या, वाफाळता भात, कोशिंबीर. मुलांसाठी खास भेजा / कलेजी फ्राय, जिरावण म्हणुन सोलकढी किंवा चींचकढी असा जंगी बेत असायचा.
आज ८-९ वर्ष जास्त झाली अशी एकत्र गटारी साजरी करुन. आजही सगळे जमतात एकत्र पण फक्त मी त्यांच्यात नसतो. :( पण त्यादिवशी फोन वरुन सगळ्यांची गप्पा टप्पा होतात. आणि पुढल्या वर्षी नक्की येण्याच मी आश्वासन देतो.
छ्या साला उगाच नॉस्टॅल्जीक का काय म्हणतात ते झालो. तुमचाही बहुमुल्य वेळ घेतला.
आता जास्त चर्हाट न लावता मुळ विषयाकडे वळु. तर मंडळी येत्या शनिवारी गटारी अमावस्या. जे शनिवार पाळतात ते शुक्रवारीच गटारी साजरी करणार. तर त्यासाठी तयारी करता यावी म्हणुन आजच ही पाककृती देत आहे. आवडल्यास बदल म्हणुन करुन पहा.
मुर्ग अचारी :
साहित्य :
२ लहान चमचे जीरं.
२ लहान चमचे मेथी दाणे.
२ लहान चमचे राई.
२ लहान चमचे बडिशेप.
२ लहान चमचे काळीमिरी.
एक ते दिड इंच दालचीनी.
२ लाल मिरच्या. (ऑप्शनल)
२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२-३ टॉमेटो बारीक चिरलेले.
कढीपत्याची पाने.
२-३ हिरव्या मिरच्या + लिंबाचा रस.
२ चमचे दही
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे आलं-लसुण पेस्ट.
तेल, मीठ, लाल तिखट चवी नुसार.
अर्धा ते पाउण किलो चिकन.
कृती :
राई + जीर + बडीशेप + काळीमिरी + दालचीनी + मेथी दाणे कोरडे भाजुन घ्यावे. थंड झाल्यावर थोडे वाटुन भरकट पुड करुन घ्यावी.
चिकन स्वच्छ धुवुन त्यातलं पाणी पुर्ण पणे काढुन टाकाव. (पेपेर नॅपकिनने पाणी टिपुन घेतलं तर उत्तम.) त्यात वरिल वाटलेली पुड, दही, मीठ, आणि हळद लावुन एकत्र कराव. आणि किमान अर्धातास तरी मुरत ठेवाव.
एका कढईत अर्धा डाव तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात आल लसणाच वाटण टाकुन चांगल परताव. तेल सुटल्यावर त्यात प्रत्येकी १/२ चमचा मेथी दाणे, बडिशेप, जीर घालुन परताव.
१/२ चमचा हळद आणि २ चमचे लाल तिखट टाकुन सतत परत रहाव. परत तेल सुटु लागल की त्यात बारीक चिरलेला टॉमेटो टाकुन चांगल एकत्र कराव.
टॉमेटो पुर्ण गळुन गेल्यावर आणि बाजुने तेल सुटु लागल की मग त्यात मुरवलेल चिकन टाकुन चांगल ढवळुन घ्याव. वरुन झाकण ठेवुन मध्यम आचेवर शिजवत ठेवाव. १५ मिनिटांनी झाकण काढुन मंद आचेवर आतल पाणी आटे पर्यंत शिजवावं.
वरुन १-२ चमचे तेलात मोहरी कढीपत्ता आणि लिंबाच्या रसात बुडवलेल्या मिरच्या टाकुन फोडणी करावी. ही फोडणी तयार चिकन वर टाकावी.
समस्त जालीय स्नेह्यांना हॅप्पी गटारीच्या शुभेच्छा. ;)
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 7:23 pm | चतुरंग
तू मला पुन्हा चिकन सुरु करायला लावणार बहुदा! ;)
-(मुर्ग विचारी) रंगा
24 Jul 2011 - 7:29 pm | श्रावण मोडक
मुर्ग बिच्चारी!
24 Jul 2011 - 8:10 pm | रामदास
खाणारा म्हणतो बिच्चारी
24 Jul 2011 - 8:12 pm | रामदास
फोटोवरून मोयतो का काय म्हण्तात त्या दिव्य द्रव्याची आठवण झाली.
24 Jul 2011 - 9:03 pm | यकु
यातलं चिकन सोडून सगळं आवडलं :)
मुर्ग.. मुर्गा ही नावं फार भुरळ घालणारी आहेत..
मी चिकन खात नसुनही मुंबईला एका इराण्याच्या हॉटेलात मुर्ग पटियाला या नावाला भुलून मी ते मागवलं.. आणि नुसती ग्रेव्ही खाऊन त्यातला मुर्गा तसाच ठेवला.
वेटर माझ्याकडे अतिव दयेने पाहात होता.
25 Jul 2011 - 12:08 am | विश्वनाथ मेहेंदळे
याला आमच्या कडे "चिंगुळ चाटला आणि बामन बाटला" असे म्हणतात.
म्हणजे एकदा एका ब्राह्मणाला चिंगुळ (मत्स्याहाराचा एक प्रकार) कसा लागतो याची उत्सुकता होती. त्याने कुतूहल म्हणून तो फक्त चाटून पाहिला. आता मासा चाटल्यामुळे तो ब्राह्मण बाटला आणि चव कळली नाही ती नाहीच :-)
अवांतर :- ग्रामीण भागातील बहुजन वर्ग ब्राह्मणांना बामन म्हणतात. तो शब्द अपमानजनक नाही. त्यामुळे त्यावर वाद होऊ नये ही ईच्छा.
25 Jul 2011 - 2:12 pm | यकु
हॅ हॅ हॅ
वाद नाय घालत हो आपण :)
24 Jul 2011 - 9:40 pm | स्मिता.
दिल खुश हो गया!!
गणपा, तुमच्या पाकृ वाचून (की बघूनच?) मन आणि डोळे तृप्त होतात. वा वा!!
24 Jul 2011 - 9:52 pm | श्रीयुत संतोष जोशी
एकदम झक्कास गणपाशेठ
24 Jul 2011 - 9:57 pm | बिपिन कार्यकर्ते
आला साला आचारी! नस्ता ताप!
24 Jul 2011 - 10:00 pm | स्पा
यम्मी :)
24 Jul 2011 - 10:52 pm | प्रियाली
घरात सर्व साहित्य आहे, मुर्गा सोडून. :( नाहीतर आजच केलं असतं.
बायदवे, लोणच्यासारखा रंग यायला हवा असं वाटलं.
24 Jul 2011 - 11:46 pm | सानिकास्वप्निल
पाकृ व फोटो बेस्टच :)
24 Jul 2011 - 11:54 pm | कौशी
एकदम छान रेसिपी..
करून बघणार...
25 Jul 2011 - 12:29 am | विजुभाऊ
वा वा झक्कास.
गणपा आता तुला किडनॅप करायचा बेत नक्की ठरलाय.
25 Jul 2011 - 10:42 am | इरसाल
बरोबर................येत्या शनिवारच्या आत कीडन्याप करावा म्हणतो मी म्हणजे आपण ?
किती जीव घ्यावा म्हणतो मी माणसाने .........
28 Jul 2011 - 8:06 am | स्पंदना
गणपा भाउचा साइझ माहिती आहे का?
नाही म्हणजे किडनॅप करायला पोत किती मोठ्ठ आणु ते सांगा. तुम्ही मी अन विजुभाउ होउन जाउ दे!!
25 Jul 2011 - 1:31 am | chipatakhdumdum
राई, जिरं, बडीशेप, काळीमिरी, दालचिनी आणि मेथी दाणे.. यांची quantity is so small that just hw can i grind it,
such tiny mixers are not available. मी एकटाच असतो, आणि मला हा problem नेहमीच येतो. पाककृती कळतात आणि जमतात सुद्धा, पण वाटप करायच की अडचण, प्लीज उपाय सांगा..
25 Jul 2011 - 1:52 am | अभिज्ञ
क ड क पाकृ.
.../\...
अभिज्ञ.
25 Jul 2011 - 2:13 am | नंदन
मस्त पाकृ, गणपाभौ. आधीचं बैठकीचं वर्णनही हुबेहूब!
25 Jul 2011 - 9:19 am | सहज
बैठकीचं वर्णन आवडले.
मुर्ग अचारी पण छानच!
बटाटे, सुरण, रताळे, अरवी (का अर्बी?)आणि अजुन कुठले कंद घालून शाकाहारी अवतार देखील मस्त होईल.
25 Jul 2011 - 7:36 am | ५० फक्त
खुप छान बैठकीचं वर्णन, शाकाहारी असल्यानं पाक्रु वर प्रतिसाद देण्याचा अधिकार नाही, पण ते लिंबाचा रस आणि मिरच्यांचा फोटो मला आधी कॉकटेलचा फोटो वाट्ला आणि विचार करत होतो मिरच्या घातलेले कॉकटेल कसं लागेल.
@ सोकाजी / नाटक्या, खरंच असं असतं का हो तिखट / झणझणीत वैग्रे कॉकटेल.?
25 Jul 2011 - 7:40 am | पंगा
का नाही?
'अधिकार नाही' म्हणता, तो नैतिक किंवा कसा?
(हे नैतिक अधिकार आहेत/नाहीत वगैरे कोणी ठरवायचे, कसे, आणि काय म्हणून?)
27 Jul 2011 - 9:19 am | सोत्रि
असतं की झणझणीत कॉकटेल.
कॉकटेल लाउंज मधे 'देसी धमाका' ह्या कॅटेगरीमधे येणार आहेत ही झणझणीत कॉकटेल्स.
- (तिखटबाज्) सोकाजी
11 Dec 2011 - 8:27 pm | आनंदी गोपाळ
तिखटच असते..
घेणार काय थोडी?
13 Dec 2011 - 4:49 pm | चिगो
मी एका रेस्तराँत "स्कल ब्रेकर" नावाचं कॉकटेल घेतलम होतं.. च्यायला, दोन चार घोटाच्या वर प्यायला होईना, इतकं तिखट होतं ते.. नाईलाजास्तव टाकलं तसंच, आणि गुमान बिअर घेतली... :-(
बाकी गणपाशेठची पाकृ, जबराच..
25 Jul 2011 - 8:01 am | चित्रा
रेसिपी, फोटो गणपांच्या नेहमीच्या पद्धतीत म्हणजे भारी.
आपल्याकडच्या बर्याचशा पाककृतींमध्ये कांद्यात टोमॅटो घालणे इतके का आवश्यक असते, त्याचे कोणाला काही कारण माहिती आहे का?
माझ्या मते - किंचित आंबट/गोडपणासाठी किंवा, ग्रेवी वाढवण्यासाठी करतात का काय?
25 Jul 2011 - 8:11 am | पंगा
हेच कारण असावे, अशी शंका आहे.
25 Jul 2011 - 8:13 am | सहज
शिवाय टोमॅटो मधील रासायनीक द्रव्यांनी मीट टेंडरायझेशन(प्रतिशब्द??) होत असावे म्हणुन पाश्चात्यांनी वापरले ते आपण बघुन बघुन शिकलो असणार. टोमॅटो हे मुळ निवासी / स्थानीक नाही ना? म्हणजे टोमॅटॉची पितृभू द. अमेरीका ना?
25 Jul 2011 - 8:24 am | चतुरंग
हा दक्षिण अमेरिकन.
स्पॅनिश कॉलनीजच्या माध्यमातून सगळीकडे पसरला.
नुसत्या कांद्याच्या ग्रेवीचा तिखट/ऊग्रपणा टोमॅटोच्या आंबटगोड रसाने जरा निवळतो. शिवाय टोमॅटोच्या रसाने ग्रेवी सरबरीत व्हायला मदत होते. टोमॅटोत मोठ्या प्रमाणात लायकोपेन हे अँटी ऑक्सिडंट असते त्याचाही शरीरावर चांगला परिणाम होतो.
-टामाटूप्रेमी रंगा
25 Jul 2011 - 8:31 am | पंगा
हो पण त्याकरिता इतरही पर्याय असावेत. (लिंबाचा रस किंवा तत्सम काही चालणार नाही का? किंवा दही?) शिवाय टोमॅटोचा सढळ वापर सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानात टेंडराइज़ न झालेलेच मांस खात असावेत, हे मानायला थोडे अवघड जाते.
हम्म असे दिसते खरे. पण मग मराठीत टोमॅटोकरिता (आता सामान्य वापरात फारसा नसलेला) 'बेलवांगे' आणि (विदर्भाकडील बाजूस बहुधा अजूनही प्रचलित असलेला) 'भेदरे' असे दोन शब्द आढळतात, त्यांचा उगम काय असावा, हे कळत नाही.
27 Jul 2011 - 8:57 am | चित्रा
हेच अगदी. लिंबाचा रसही चालावा.
पण उत्तर भारतीय पदार्थांमध्ये ग्रेवीत न चुकता टोमॅटो/रस घालतात असे दिसते.
बाकी चतुरंग यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे.
25 Jul 2011 - 1:03 pm | गणपा
बरोबर ओळखलंत चित्राताई.
सहज मामा म्हणतात ते ही खरच आहे. टेंडराइझर म्हणुन याचा उपयोग होतो.
दही सुद्धा उत्तम टेंडराइझर आहे. म्हणुन शक्यतो मटण/चिकन मध्ये मुरवण्यासाठी दह्याचा उपयोग करतात.
रंगाकाकाने ही चांगली माहिती पुरवली आहेच. ;)
(पळा तेज्यायला काका, मामा येतायत काठी घेउन आता) ;)
25 Jul 2011 - 8:21 am | निनाद
मस्तच! पाणी सुटलेय तोंडाला...
फोटो देण्याची रीत फारच आवडली आहे.
25 Jul 2011 - 10:47 am | स्वाती दिनेश
पाकृ मस्तच रे.. आणि आधीचे वर्णनही..
स्वाती
25 Jul 2011 - 11:07 am | सुमो
"मटणाचा लालेलाल रस्सा, कोंबडीच सुकं, सोबतीला गरमा गरम भाकर्या, वाफाळता भात, कोशिंबीर. मुलांसाठी खास भेजा / कलेजी फ्राय, जिरावण म्हणुन सोलकढी किंवा चींचकढी असा जंगी बेत असायचा."
खल्लास....
पाकृ सुरेखच.
'ऑपरेशन किडनॅप गणपा' ला सहर्ष सक्रिय जाहीर पाठिंबा. :)
25 Jul 2011 - 1:10 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त....
पण आमच्या कांदे नवमी...
भजी..घारगे ईत्यादी पदार्थ...
आता सारे चालते....
25 Jul 2011 - 1:19 pm | गवि
खवळले तोंड..
लाळेचे उधाण आले..
मस्त रेसिपी रे..
25 Jul 2011 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार
का ?
25 Jul 2011 - 2:54 pm | विवेक मोडक
हा का? कुणाला उद्देशुन आहे??
25 Jul 2011 - 6:17 pm | कच्चा पापड पक्क...
मुर्ग अचारी लज्जतदार
25 Jul 2011 - 6:38 pm | मराठे
पाककृतीची आदर्श पोस्ट आहे.
नुसतेच ढीगभर फोटो नाहीत, नुसतंच साहित्य आणि कृतीची लिस्ट नाही.
सगळे मसाले अगदी प्रमाणात... लगे रहो गणपासेठ !
25 Jul 2011 - 7:09 pm | प्रभो
ह्म्म!!!
25 Jul 2011 - 8:11 pm | कच्ची कैरी
तेरे ये मस्त मस्त रेसेपी बनाने वाले हाथ हम बाकी मिपाकर को दे दे ठाकुर ;)
28 Jul 2011 - 8:10 am | स्पंदना
किती दिवस झाले भेजा (खरोखरचा , नावचा नव्हे) खाउन.
अचारी बघुन मी बिचारी झालेय.
11 Dec 2011 - 4:03 pm | फोलपट
बघितल्या बघितल्या करायला घेतले. पण टोमॅटो होता एकच. मग वापरली टोमॅटोचि प्युरी. रूप, चव, प्रमाण सगळेच 'शब्दांच्या पलिकड्ले'. एकदम झकास पाकृ. वाचनखूण साठवली.
28 Aug 2012 - 11:28 am | सुर
मी काल ही पाकक्रुती वाचली. आणी कालच करुन बघितली.. निव्वळ भंन्नाट.. अप्रतीम..
माझ्या लेकीने तर नुसतं चिकनच खाल्ल म्हणाली, भात नको.. चिकनच हव.. पण मी त्यात बडीशेप घातली नव्हती तरी काही विशेष फरक पडला किंवा वाटला नाही. जरा वेगळ सगळ्यांना आवडल, नेहमी च खुप खोबरं घातलेलं पेक्षा वेगळ..