हॉट एअर बलून फेस्टीवल

मराठे's picture
मराठे in कलादालन
28 Jun 2010 - 7:11 am

पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की इथे सर्वाना भटकायचे वेध लागतात. अर्थात तेही ठीकच आहे म्हणा कारण उन्हाळ्याच्या ह्याच तीन चार महिन्यात मनसोक्त भटकायला मिळतं. मग आहेच थंडीत बाहेर पांढरा एकसुरी रंग बघत दिवस रात्र घालवणं.

इथे एप्रिल महिन्यांपासूनच छोट्या छोट्या गावांच्या जत्रा सुरु होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यापैकीच 'हॉवेल' हे एक छोटंसं गाव. त्यांच्या 'हॉट एअर बलून फेस्टीवल' बद्धल बरंच ऐकलं होतं पण घराच्या अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरावर असूनही जाणं मात्र झालं नव्हतं. मागच्याच विकांताला नायगारादर्शन करून आलेलो त्यामुळे पाकिट तसं अशक्तच होतं म्ह्णून मग ह्या विकांतचा प्रोग्रॅम म्हणून हॉवेल ला जाण्याचं निश्चित केलं.

शुक्रवारी काही मित्रांबरोबर 'काव्य-शास्त्र-विनोद' करण्यासाठी भेटलो होतो ;-) तेव्हा बोलुन गेलो. मग सगळ्यांनीच इंट्रेस्ट दाखवला.. आणि फटाफट प्रोग्रॅम बनला. आगोदर "सक्काळी लवक्कर ७ ला निघुया. त्यांचं डाउनटाउन फिरुया" म्हणणारे लोक हळूहळू ('का-शा-वि' बराच वेळ चालू राहिल्यामुळे उशीर होत होता.. पण घरी जाण्याची इच्छापण नव्हती त्यामुळे) "दुपारी जेवण झाल्यावर निघू आरामात.. नाहीतरी बलून फेस्टीवल संध्याकाळी सहाला आहे" म्हणायला लागले. मग कोण कोण एकत्र येणार वगैरे ठरलं. आणि मंडळी आपापल्या घरी परतली.

त्यांच्यापैकी किती जणं खरोखर उगवणार आहेत ह्याबद्धल मला जरा शंका होतीच त्यामुळे आम्ही (म्हणजे मी, ही आणि चिरंजीव) आमच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणेच दोन वाजता घरातून निघालो. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही तिथे पोहोचेतोवर बरचसं मित्रमंडळ (आणी त्यांच्या मंडळी) तिथे त्याच दरम्यान पोचलं. (धडा: पुन्हा कधी कुठे एका ठरावि़क ठिकाणी भेटायचं असेल तर आदल्या दिवशी 'का-शा-वि' आणि भेटायची वेळ "न" ठरवणे)

असो... मी लांबण जरा जास्तच लावलंय. तर आता थेट फोटोंकडे जातो.

हवाई-उड्या (स्काय्-डायविंग) व राष्ट्रगीताने प्रोग्रॅमची सुरुवात झकास झाली..

(इथे विडियो चढवायचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. दिसत नसेल तर माझ्यावर चढू नका)

नंतर मग फुगेवाले (!) त्यांच्या तयारीला लागले. बहुतेक जणं हवशे-गवशे त्यांच्या कुटुंब्-कबिल्यासह आलेले होते. 'हवशे-गवशे' म्हटलं खरं पणं त्याची तयारी आणि कसब वाखाणण्यासारखं होतं.

आधी वार्‍याची दिशा व वेग समजाउन घेण्यासाठी १६ इन्चाचा एक साधा फुगा हवेत सोडतात व त्यांच्याकडच्या यंत्रांनी त्याचा वेग मोजतात. जर वारा जास्त असता तर मग प्रोग्रॅम कदाचीत रद्द केला असता.

सगळं आलबेल झालं आणि पहील्या फुग्यानी जमीन सोडली..

हे पुढचे काही फोटो म्हणजे माझी फोटोग्राफिची खाज भागवून घेण्याचे धंदे आहेत. अर्थात इथल्या दिग्गजांपुढे मी म्हणजे 'सुर्व्याने काजव्यापुढे चमकन्यासारखे हाये.'

एकापाठोपाठ एक असे जवळजवळ तीस पस्तीस फुगे वर जात राहीले.

एक अचानक आलेल्या वार्‍यामुळे एका झाडाच्या फांदीतच अडकत होता.. पण मोठ्या शितफीनं त्याच्या मालकिणीनं सोडवून नेला..

ह्या फुग्यांना सांभाळायचं म्हणजे खायचं काम नाही.. चांगलाच घामट्या निघत होता..... (आम्ही आरामात भेळेचे तोबरे भरत भरत पंख्याने हवा खात होतो)

निरभ्र आकाशाची निळाई वगैरे वगैरे... छे कविता वगैरे आपला प्रांतच नाही.

एक हॉलोवीन स्पेशल फुगा :) ह्या लोकांना चेटकिणीचं फार कौतिक... आमच्या कोकणात या म्हणावं पारापारावर मुंजे सापडतील.

काही काही फुगे 'स्पॉन्सर' केलेले होते..

हा हा म्हणता दोन तास उलटून गेले.. तरी अजुन उड्डाण चालूच होतं.

तर अशा प्रकारे आणखी एक विकांत चांगल्या कामी आला. चविष्ट भेळ, मित्र-मैत्रिणींची सोबत आणी मस्त संध्याकाळ.. आणखी काय हवं?

छायाचित्रण

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Jun 2010 - 7:17 am | सहज

मस्त!!

पुढच्यावेळी उड्डाण होउन जाउ दे.

आंबोळी's picture

28 Jun 2010 - 2:29 pm | आंबोळी

सह(ज)मत.

आंबोळी

गणपा's picture

28 Jun 2010 - 2:39 pm | गणपा

असच म्हणतो.
पुढच्या वेळेस आकाशातुन काढलेले फोटो येउंदेत.
:)

निखिल देशपांडे's picture

28 Jun 2010 - 5:51 pm | निखिल देशपांडे

>>>पुढच्या वेळेस आकाशातुन काढलेले फोटो येउंदेत.
+१
असेच म्हणतो

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रभो's picture

28 Jun 2010 - 7:09 pm | प्रभो

सहमत

मस्तानी's picture

28 Jun 2010 - 8:12 am | मस्तानी

रंगीबेरंगी ( आणि अवाढव्य ) फुगे आवडले ... अशा फुग्यात बसून खाली जमिनीवरची मजा बघायला पण आवडेल कधीतरी :)

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2010 - 2:35 pm | राजेश घासकडवी

केवढे हे फुगे! मस्त फोटो...

ह्या लोकांना चेटकिणीचं फार कौतिक... आमच्या कोकणात या म्हणावं पारापारावर मुंजे सापडतील.

कोकणात दिसलेल्या भुतांवर एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे...;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 2:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> कोकणात दिसलेल्या भुतांवर एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे... <<
आंजावरच्या भुतावळीला कमी लेखू नका गुर्जी!

मराठे, फोटो लै भारी... मज्जा आली बघायला.

अदिती

प्रियाली's picture

28 Jun 2010 - 7:52 pm | प्रियाली

फोटो मस्त आहेत. मजा आली पाहण्यास.

कोकणात दिसलेल्या भुतांवर एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे...

उत्सुक आहे.

स्मिता.'s picture

24 Jul 2011 - 9:52 pm | स्मिता.

फुग्यांचे फोटो मस्त आहेत. मज्जा येत असेल असं काहितरी करायला.

कोकणात दिसलेल्या भुतांवर एक लेख लिहिण्याचा मनसुबा आहे...
उत्सुकतेने वाट बघते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2010 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठे, फोटो मस्तच आले आहेत.

-दिलीप बिरुटे

पुष्करिणी's picture

28 Jun 2010 - 8:16 pm | पुष्करिणी

मस्त आलेत फोटो

पुष्करिणी

लॉरी टांगटूंगकर's picture

29 Jun 2010 - 1:40 am | लॉरी टांगटूंगकर

अवांतर: भेळ कशी होती???आणि जत्रे मध्ये बगाड असते का???

मराठे's picture

29 Jun 2010 - 6:21 pm | मराठे

भेळ झकास होती. पण त्याची पाकृ पुन्हा केव्हा तरी :)
'बगाड' म्हणजे काय?

जागु's picture

29 Jun 2010 - 9:47 pm | जागु

झक्कास.

दीप्स's picture

22 Jul 2011 - 2:08 pm | दीप्स

फोटो मस्तच आहेत आवडले. रंगीबेरणी आणि एवढे अवाढव्य आहते हे फुगे काय मज्ज्या येत असेलना त्या फुग्यामध्ये बसायला. खुप माज्या केली असेलना तुम्ही ? करा करा मज्ज्या करा आणि असेच फोटो टाकत राहा

आत्मशून्य's picture

24 Jul 2011 - 1:46 pm | आत्मशून्य

हे अस्लं काही पाहिलं ना की इनोची खरोखर गरज लागते, चायला हडपसरह ग्लाय्डींग सेंटर सोडलं तर इथं साहसी क्रिडा प्रकार इल्ला.. :(

प्रचेतस's picture

24 Jul 2011 - 2:00 pm | प्रचेतस

भोरजवळ आहे रे एक साहसी क्रीडाकेंद्र.

http://www.adventureplus.in

कधी जायचे बोल.

मदनबाण's picture

24 Jul 2011 - 9:35 pm | मदनबाण

मस्त.... :)