चाफा बोलेना, चाफा चालेना

जागु's picture
जागु in कलादालन
15 Jul 2011 - 4:00 pm

चाफा बोलेना, चाफा चालेना

खर आहे चाफा कधी बोलला नाही, कधी चालला नाही पण बालपणीच्या मधुर आठवणी मात्र मनात साठवुन आहे अजुन. लहानपणी घराच्या पडविला लागुनच एक चाफ्याचे झाड होते. इतके जुने होते की एखाद्या देवळातल्या पुरातन खांबाइतके जाडे होते. आजीला त्याची फुले देवाला वाहण्यासाठी लागायची. ती खाली पडलेली किंवा काठीने काढता येतील अशी फुले घेउन देवाला वाहायची. मग तिला फुले काढून द्यायची म्हणून मी कधी कधी झाडावर चढायचे. झाडावर चढणे सोपे होते कारण झाड थोडे बैठे आणि पडविच्या पत्र्यावर आलेले होते. त्यामुळे पत्र्यावर चढून ही फुले काढता यायची. हे झाड म्हणजे पत्र्यावर चढण्याचा जिनाच होता. पत्र्यावर चढण्याच्या आकर्षणामुळे मला ही फुले काढायला खुप आवडायची.

फुले नसली काढायची तरी कधी कधी खेळ म्हणून मी ह्या झाडावर चढून पडविच्या पत्र्यावर जाउन बसायचे. त्या चाफ्याच्या पाकळ्या काठायच्या त्याचे हार बनवायचे, असे उद्योगही चालायचे. चाफ्याचे झाड ठिसुळ असते, फांदी कधीही तुटू शकते म्हणून घरचे काळजीने ओरडायचे. पण लहानपणीचा हट्ट, जिज्ञासा आणि उस्तुकतेने मला ह्या झाडावर चढायला कधी आळा घातला नाही.

काही दिवसांनी आमच्या घराच्या डागडुगीचे काम निघाले. त्यात पडविचा पत्रा काढून स्लॅप टाकायचा ठरले. मी आनंदात होते. आता पत्र्या ऐवजी स्लॅपवर चढून फुले काढता येतील, व स्लॅपवर खेळायला मिळेल. पण माझ्या बाल मनाला हे लक्षातच आले नाही कि हे झाड पत्र्यावर पुर्ण झुकल्यामुले पत्रे काढताना व स्लॅब घालताना अडथळा आणेल. दुर्देवाने ते झाड काढावे लागले व आता फक्त त्या झाडाच्या आठवणी माझ्या मनात आहेत.

चाफा बोलला नाही, चालला नाही तरी त्याचे अस्तित्व मात्र लगेच जाणवते. दुरवर डोंगरात असलेला चाफा त्याच्या रुपावरुनच ओळखता येतो. ग्रिष्मात ह्या चाफ्यावर पाने कमी असुन फुलेच ह्या झाडाचे रुप, रंग, आकार नावारुपाला आणतात. चाफ्याचा मंद सुगंधही मोहक असतो. ह्या चाफ्याच्या झाडाला क्वचित शेंगा लागतात. त्या शेंगा खाण्यासाठी साप ह्या झाडावर येतात असे म्हणतात. तसेच ह्या शेंगेतील बीचा साप चावल्यावर होणार्‍या दंशावर औषधी आहे असेही म्हणतात.

ग्रामिण भागात कृष्ण्जन्म, रामजन्माला ह्या चाफ्याला विशेष महत्व असते. चाफयाच्या फांद्या अगदी ठिसुळ असतात. पुर्वी पांढरा आणि मध्ये पिवळा असा चाफा डोंगर, रानात व इतरत्र दिसुन यायचा ज्याच्या फुलांबरुनच तो दुरवरुन ओळखला जायचा व अजुनही काही भागात दिसतो. आता ह्या चाफ्याचे विविध रंग व रुपही आले आहेत. त्यांची लागवड बागेतही केली जाते. पण ह्या झाडांचा पर्णसंभारही जास्त असतो.

लाल चाफा

हे गुलाबी चाफ्याचे झाड

ह्या चाफ्याची गगनाला भिडण्याची इच्छा पहा.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

15 Jul 2011 - 4:07 pm | स्वैर परी

खुपच मस्त जागु.. अगदी फ्रेश वाटल! :)

किसन शिंदे's picture

15 Jul 2011 - 4:21 pm | किसन शिंदे

जागु तै,

कलादालनात तुम्ही जे जे धागे टाकता, ते सगळे मला माझ्या बालपणात घेऊन जातात..

फुले नसली काढायची तरी कधी कधी खेळ म्हणून मी ह्या झाडावर चढून पडविच्या पत्र्यावर जाउन बसायचे. त्या चाफ्याच्या पाकळ्या काठायच्या त्याचे हार बनवायचे, असे उद्योगही चालायचे.

अगदी अगदी,
आमच्या घरासमोरही एक झाड होते, डोंगर का पाणी खेळताना त्या झाडांच्या फांद्याचा उपयोग आम्ही डोंगर करण्यासाठी करत असु आणी सरतेशेवटी त्यात जो जिंके त्याला मोठया मानाने त्याच चाफ्याच्या फुलांची अंगठी देण्यात येई, मग दोन बोटांच्या चिमटीत ती अंगठी पकडून तो भिडू खुप भाव मारत असे. चाफ्याच्या प्रत्येक पाकळीवर मधोमध छिद्र करुन त्या देठातुन मुडपून घेतल्या कि त्याची सुंदरशी अंगठी तयार होत असे.

मस्त कलंदर's picture

15 Jul 2011 - 5:45 pm | मस्त कलंदर

लहानपणीच काय, मोठेपणी अजूनही चाफ्याचं फूल दिसलं की पहिल्यांदा त्याची अंगठीच बनवावीशी वाटते. आता हा लेख वाचतानाही पहिल्यांदा हाताच्या चार बोटांत पकडून ठेवलेल्या चार अंगठ्या घातलेला(माझाच) हात आठवला.

पल्लवी's picture

15 Jul 2011 - 4:39 pm | पल्लवी

:)

प्राजु's picture

15 Jul 2011 - 7:11 pm | प्राजु

अप्रतिम!! :)
तुझ्या लिखाणात इतकं वैविध्य आहे ना! सुंदर!

योगप्रभू's picture

15 Jul 2011 - 7:34 pm | योगप्रभू

फोटो आणि लेखन मस्त!

शालेय जीवनात आम्हाला शरदिनी डहाणूकर यांचा 'चाफा' हा धडा होता. इतका समरसून वाचला होता. आज त्याची आठवण आली.

पांढरा चाफा म्हणजे देवचाफा किंवा खुरचाफा. याची फुले शंकराला वाहतात. सोनचाफ्यासारखा मादक वास नसला तरी या चाफ्याचा मंद सात्विक सुवास मनात रुंजी घालतो. पांढर्‍या चाफ्याला इंग्रजीत 'फ्रँजीपॅनी' म्हणतात.

याचे झाड ठिसूळ असतेच, पण सगळ्यात वाईट म्हणजे याच्या पानाच्या देठातून येणारा पांढरा. चिकट चीकही त्रासदायक असतो. फुले काढायला झाडावर चढणार्‍याने कधीही शेंड्याकडे बघत चढू नये. कधी वरच्या बाजूने चीक डोळ्यात पडेल सांगता येत नाही. चाफ्याच्या झाडावरुन पडण्याचे आणि डोळ्यात चीक जाण्याचे भीषण प्रकार डोळ्यासमोर घडल्याने आम्ही या झाडाला घाबरुनच असायचो. त्यामुळे सूर-पारंब्या खेळताना चाफा आणि जांभळाचे झाड वगळण्याची घरातून ताकीद असे.

पण याची फुले काढणे अगदी सोपे. झाड गदागदा हलवले, की टपटपा फुले पडत.

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2011 - 7:40 pm | स्वाती दिनेश

चाफ्याच्या फुलांबरोबर खूप मागे घेऊन गेला तुझा लेख जागु,
स्वाती

वसईचे किल्लेदार's picture

16 Jul 2011 - 12:49 am | वसईचे किल्लेदार

खुपच छान आणी माहितीपूर्ण लेख.

ह्या चाफ्याच्या झाडाला क्वचित शेंगा लागतात. त्या शेंगा खाण्यासाठी साप ह्या झाडावर येतात असे म्हणतात. तसेच ह्या शेंगेतील बीचा साप चावल्यावर होणार्‍या दंशावर औषधी आहे असेही म्हणतात.

चाफ्याची शेंग दुधात उकळऊन-सुकवुन ठेवतात. सर्पदंश तसेच पोटदुखीवर जालिम ऊपाय!

कच्ची कैरी's picture

18 Jul 2011 - 5:51 pm | कच्ची कैरी

मस्त ग जागु !! तुझ प्रत्येक लिखान मला आवडत मग ते पाककृती असो किंवा कलादालन असु दे !

गणेशा's picture

19 Jul 2011 - 8:16 pm | गणेशा

छान ..
पांढरी फुले माझी सर्वात आवडती फुले आहेत..
त्यांच्याकडे पाहुनच मन प्रसन्न होते .
अश्याच फुलापैकी चाफा हे माझे एक आवडते फुल आहे.
थ्रेड आवडला..
आणि जाता जाता विस्मर्णात जात असलेले कवी 'बी', यांची आठवण पण झाली

चित्रगुप्त's picture

21 Jul 2011 - 11:42 am | चित्रगुप्त

अतिशय सुन्दर लेख व फोटो. बालपणीच्या आठवणी हा प्रत्येकाने जपण्याचा एक अमूल्य खजीनाच असतो...

अश्या आठवणी केवड्याच्या बद्दल आहेत का कुणाच्या? माझी खूप इच्छा असून मला केवड्याचे बन कसे असते, आजवर कधीच बघायला मिळालेले नाही....

जागु ताई
मी जम्मूला एका बागेत गेलो होतो. बागेत सर्वत्र सोनचाफ्याची झाडे बहरली होती. सुगंधाने वातावरण इतके भारलेले होते की अक्षरशः स्वर्गात फिरल्याचा फील येत होता.

मदनबाण's picture

21 Jul 2011 - 6:46 pm | मदनबाण

मस्त... :)

स्वैर परी, मस्त कलंदर, किसन, पल्लवी, प्राजू , स्वाती, कच्ची कैरी, गणेशा, मदनबाण धन्यवाद.

योगप्रभु त्या चिकाबद्दल लिहायच राहील. आता त्यात अपडेट करु का ? तसेच तुम्ही दिलेली माहीती म्हणजे देवचाफ्याला खुरचाफा म्हणतात हे ही तुमची परवानगी असेल तर अपडेट करते.

किल्लेदार धन्स औषधाची माहीती दिल्याबद्दल.

चित्रगुप्त सागरकिनारी गेले की फोटो काढुन आणते केवड्याच्या बनाचा.

विजुभाऊ नुसते कल्पनेनेच मला स्वर्गात जाऊन आल्यासारखे वाटले.

योगप्रभू's picture

13 Aug 2011 - 3:55 pm | योगप्रभू

जागुताई,
दिलेल्या माहितीतील कोणताही तपशील आनंदाने वापर.

पिवळा चाफा सोनचाफा आणि पांढरा चाफा देवचाफा (खुरचाफा). आणखी एक हिरवा चाफाही असतो. त्यालाच कवठी चाफा म्हणतात का? (चू. भू. दे. घे.)

पांढर्‍या चाफ्याचा चीक डोळ्यात गेल्यास पाण्याने निघत नाही. माझ्या मित्राच्या डोळ्यातला चीक वाड्यातील आजींनी मध घालून काढला होता. बापरे! डोळ्यात मध घालणे वगैरे किती उपयुक्त हे माहित नाही. डॉक्टरांकडे नेणे सगळ्यात उत्तम.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Aug 2011 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे

शेराचा चीक डोळ्यात गेल्या डोळा जातो अस लोक सांगायचे. गावाकड असताना यकदा कैकाड्याच्या मान्साच्य डोळ्यात शेराचा चीक गेला तो साठे दाक्तर क आल्ता. दाक्तरनी त्याच्या डोळ्या लगीच मध घातला आन त्याचा डोळा वाचला.

चिंतामणी's picture

13 Aug 2011 - 11:32 pm | चिंतामणी

पिवळा चाफा सोनचाफा आणि पांढरा चाफा देवचाफा (खुरचाफा). आणखी एक हिरवा चाफाही असतो. त्यालाच कवठी चाफा म्हणतात का?

बरोबर आहे हे.

या लेखात सोनचाफा आणि हिरवा चाफा आला असता तर अजून छान वाटले असते.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2011 - 3:58 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!

चिंतामणी, योगप्रभु नाही नाही हिरवा चाफा आणि कवठी चाफा दोन्ही वेगळे. मी इथे हिरव्याचाफ्याची पण माहीती दिली होती.
http://www.misalpav.com/node/18362
कवटी चाफ्याचा फोटोही देते.

योगप्रभु धन्यवाद.

चिंतामणी's picture

14 Aug 2011 - 12:25 am | चिंतामणी

कवठी चाफ्याबद्द्लसुद्धा सापडले मिपावरच.

माझ्या बागेतील फुले.