" डॉ. डी ए गुणगाडे, डी एस्सी.,
विभागप्रमुख, बायोटेक्नॉलोजी"
दरवाजावर चकाकती सोनेरी पाटी होती. जितकी पाटी नवी होती तितकाच माणुसही नवा होता. मुळात हे डीपार्ट्मेंटच नव्याने सुरु झालेल.. जगात सगळीकडे बायोटेकचे नगारे वाजु लागल्यावर आपणही काहीतरी कराव अशी कळ आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंना नको त्या ठीकाणी आली अन त्यांनी जीवशास्त्र विभागातीलच अर्धा मजला या नव्या विभागासाठी दीला. बर त्यात गम्मत अशी करुन ठेवली की या विभागाला वेगळा विभागप्रमुख नेमला. हे म्हणजे नव्या नवरीला दोन दादले देण्यासारख होतं कारण या विभागाकडे विभागप्रमुख सोडुन काहीच नव्हतं. प्रोफेसर सगळे व्हीजिटींग.. , अभ्यासक्रम ..ठरलेला नाही, लॅबचा पत्ता नाही. ऑफीस स्टाफ?... नाही. आता अशा परिस्थीतीत आमच्यासारखे नवीन नविन पदवीधर पुरेसे गांगरुन इथे आलेले.. पण पुढे आम्ही जे पाहील व अनुभवलं, त्यानंतर आयुष्यात परत कधीच गांगरलो नाही.
त्या काळातल्या आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरुंना खरच मानल पाहीजे, त्यांनी योग्य ठीकानी योग्य गोटी फीट्ट केली होती. आमच्या विभागाकडे काहीच नव्हत, पण गुनगाडे सर होते, आणि त्यामुळे जे आमच नव्हत तेही आमचच होतं.
माणुस मध्यम उंचीचा, चकचकीत जांभळ्या रंगाचा.. गोल चेहरा, आणी त्या गोलाइला अडथळा येवु नये इतक वाटोळ टक्कल.. कंपासने गोल काढल्यावर उगाच शेडींग करायची इच्छा होते, तितपतच केस गोलाच्या मागच्या बाजुला.. माळरानावरच्या चुकार बाभळीसारखा एखादा पुढच्या पठारावर उभारलेला.. पण तोही रंगाशी इमान राखनारा, चकचकीत जांभळा.. खाली डोळ्यांवर सोनेरी चष्मा.. चेहर्यावरचा भाव कायम नाकात मच्छर गेल्यासारखा. मोठ्या खुर्चीवर मागेपुढे झोके घेत कायम फिरवत रहायची लकब. रुंद खांदे ताठ मागे, अंगात नेहमी पातळसा पांढरा शर्ट, आत बनीयन कधीच घालायच नाही त्यामुळे छातीवरचे पॉइंटर कायम दुग्गोचर, मागे जवळजवळ ३५-४० विद्यार्थ्यांची नाव लिहिलेला एक मोठा बोर्ड.. त्या सगळ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट केलेली.
पण जोवर सर तोंड उघडत नाही तोवर हे चित्र पुर्ण होत नाही. सर भंडार्याचे.. शिकले नागपुरात.. भाषेत एक उपजतच गोडवा.. मला अजुन आठवतय, कोर्स चालु झाल्यावर दुसर्या- तिसर्या दिवशी आम्ही सरांना भेटायला गेलो. लेक्चर कसे अरेंज करायचे, टायमींग काय असणार, प्रॅक्टीकल काय करायचे ते डीस्कस करायच होतं.. आतुन जोर जोरात आवाज येत होते. घाबरत घाबरत आम्ही दरवाजा थोडा लोटला,
" कम्म इइन्न"
सात मुली- तिन मुल, सगळे दहा जण आत गेलो, एक कुणीतरी दांडगट क्लास फोरवाला दरवाजाच्या मागे फुसफुसत उभा होता. ए सी रुम मधल तापमान कमीत कमी ५ डीग्री वर चढलेलं..
"पक्क्ड शाला या भें__ला.. बांधुन टाक.. "
तिन मुलांतील सगळ्यात धडधाकट असलेल्या माझ्याकडे सरांनी रीस्पॉन्सीबीलीटी डेलीगेट केली. प्रॅक्टीकलमधे हे सगळ असेल अस मला वाटायच काही कारण नव्हतं. मी एक नजर त्या माणसाकडे टाकली, शंभरेक किलोचा ऐवज होता. कालची उतरली नाही की सकाळी थोडी घेतली होती हे कळु नये इतपतच डोळे लाल होते. माझ्यामागे उभ्या असलेल्या जमावावर मी नजर मारली. रुपारेल/ रुईयामधे टॉप फायमधे असलेल्या चार जणी त्यात होत्या, त्यांच्या तोंडावर गॉड्झीला प्रत्यक्ष पाहील्याचे भाव.. उरलेल्या दोघां मुलांतील जगदीश म्हणजे पाप्याच पीतर, दुसरा "भुसण" गुज्जुभाई.. आता असे रिसोर्सेस घेवुन मी त्याला पकडायचं? एम एस्सीची पहीली असाइन्मेंट.. मी चुळबुळत उभा राहीलो.
"भो___चा रुम शाफ नाइ करत चांगला, डर्टी ठेवतो.. दोरी घे रे, बांध याला"
पाठोपाठ अजुन चार सहा टोर्पेडो..
शेवटी त्या धटींगनाला माझी दया आली असावी, फुसफुसत तो बाहेर निघाला, जाताना सरांवर एक नजर फेकली,
"काय बघते रे हराम्खोर,.. शाल्ला मी बघुन घेतो रे तुला आन तुझ्या त्या मशाला डोशाला..
नाकातला मच्छर अजुनच आत गेलाय असे भाव चेहर्यावर आणत सरांनी शेवटची फैर झाडली.
मसाला डोसा म्हणजे आमच्या विभागाचा दुसरा दादला.. जिवशास्त्राचे विभाग्प्रमुख डॉ. नारायनन. चेहर्याने शामळु पण दरबारी राजकारण खेळण्यात माहीर.. शिवाय इतर प्राध्यापकांत ३-४ दक्षिण भारतीय, त्यांचेच साथीदार, त्यामुळे आपसुकच या सगळ्याला प्रांतीय रंग आलेला. रोज एक दोन वेळा तरी असे ठणठणाट ठरलेले होते, त्याला कारण काहीही चालायचं.. आम्ही शक्यतो या सगळ्यापासुन दुर रहायचा प्रयत्न करायचो.
हळुहळु सगळी सवय होत होती. एक एक गोष्टी मार्गी लागत होत्या. भांडुन, ओरडुन तर कधी रडुन, सर हळु हळु घडी बसवत होते. प्रयोगशाळेचे सामान गाडीतुन उतरवणे, प्रयोगशाळेची फरशी साफ करुन त्यावर रबर टाइल्स लावणे, संध्याकाळी, स्टाफ गेल्यावर जीवशास्त्र विभागाच्या कार्यालयात जावुन वरवर पडलेली स्टेशनरी घेवुन येणे इत्यादी लहानसहान काम सर आमच्याकडुन करवुन घ्यायचे. अनुपमा श्रीनिवासन, एका मोठ्या औषध कंपणीची भावी मालकीन, एकदा खालच्या कार्यालयातुन स्टॅपलर उचलुन घेवुन आली.
" आपलाच्च आहे हे, ही काय थेप्ट नाई" सरांनी शाबासकी देत उरलीसुरली अपराधीपणाची भावना दुर केली. पोर मस्त निर्लज्ज झाले.
एक दिवस शेवटी निर्वाणीचा उजाडला, लाइफ सायन्सवाले काही आम्हाला लेक्चरसाठी योग्य रुम, योग्य वेळी द्यायचे नाहीत, शिवाय सगळे प्रोफेसर व्हिजीटींग, त्यांच्याही वेळा संभाळायला लागायच्या. वैताग यायचा. असच एकदा उशीरापर्यंत चाललेल लेक्चर संपल्यावर तक्रार करायला आम्ही सरांकडे गेलो. बाहेर पाउस भरुन आलेला, जुलैअखेरच टीपीकल मुंबय्या हवामान. आम्ही थोडे जास्तच मोकळे झालो..
"खुट्टाय मशाला दोशा? है काय खाली तो?"
"हो सर, नारायनन सर अजुन बसलेत"
" मी भगते, तुम्ही थांबा इते"
सर खाली गेले, आता हे खाली जावुन काय करणार ते आम्हांला माहीत होत. प्रश्न फक्त इतकाच होता की सरांकडे इंग्लीश शिव्यांचे भंडार "ष्टुपीड" व "बिच" इतपतच मर्यादीत होते. याच दोन शिव्या ते स्त्री पुरुष न बघता दोघांनाही बहाल करत. मराठी शिव्या नारायणनला कळल्या नसत्या.
"मै जांवु क्या निचे?" भुसण्भाई .
"ट्रांन्सलेट करणेको?"
लाजुन भुसणभाई गप्प बसला..
पाचच मिनटात सर वर आले.. जांभळ्या रंगात लालसर छटा मिसळलेली.
"ए, इकडे ये"
मी पुढे झालो..
"काल्ल तु लाक आणलेश ना, लॅब्शाठी? एक मोठा घेवुन ये त्यातला."
मी काल लॅबला लावायला आणलेल्या कुलपातल एक मोठ कुलुप घेवुन आलो.
"ग्लोव्हज आण"
मला कळेना नक्कि काय चाललय. सरांनी हातात ग्लोव्हज घातले, साबन लावुन कुलुप धुतल.
"चल्ला खाली"
आमच्या तिसर्या मजल्यावरुन आम्ही खाली उतरायला लागलो. मनात उत्कंठा आणी उत्सुक भिती.
"है का रे तो आत?" पहिल्या मजल्यावर नारायणन सरांच्या कॅबीनबाहेर हातातले ग्लोव्हज सावरत सरांनी विचारलं,
"हो सर" आतमधे नारायणन सर फोनवर काहीतरी बोलत होते.. बहुदा नुकत्याच घडलेल्या चकमकीचे रिपोर्टींग चालले असावे.
सरांनी आसपास कानोसा घेतला, साडेसात वाजले होते, पावसाळी दीवस, सगळ्या बिल्डींगमधे कोणीच नव्हतं, हळुच सरांनी बाहेरच दार ओढल, कडी घातली, कुलुप लावल..
चेहर्यावरचा भाव नाकातला मच्छर बराच बाहेर आल्यासारखा..
"चल्ल आता"
पटपट पायर्या उतरत आमची सगळी फौज खाली आली, सरांनी सराईतपणे हातातले ग्लोव्हज काढले, खिशात टाकले. कुलपाच्या तिन्ही चाव्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यात फेकल्या.
"अरे शाल्ला"
सर परत मागे वळाले, बिल्डींग्मधे गेले आणी दोन मिनीटात परत आले..
"फोनच्चा वायर काढायच्चा रावुन गेला होता" चेहर्यावर नाकातला मच्छर मेल्याचा भाव..
आत जावुन सरांनी सगळ्या बिल्डींगचे फोन कनेक्शन उपटुन टाकले होते. ९७-९८ साली मोबाइल पसरले नव्हते, नाहीतर सरांनी त्याचाही जवळचा टॉवर उखडुन काढला असता.
"सर काही झाल तर?" आम्ही अजुन पुरेसे तयार नव्हतो झालो.
"कै नै होत, बहुत वेला केलाय मी अशा, तो शरल होते बघ आता"
दुसर्या दिवशी डीपार्ट्मेंट्मधे दबके वातावरण. सरांच नाव घ्यायची हिम्म्त कोणी करेणा.
"मला काय माहीत शाला, ते शगल्यांशी भांडते.. माणशाने थोडा शमजुन राय्ला पाइजे ना.. शाला कोणीतरी शिपाईने केला लाक त्याला, बशला रातभर आतमधे"
दुसर्या दिवशी सर कुणा एका प्राध्यापकाला सांगत होते..
"त्याच्या केबीनमधे बाथरुमपण नाय नारे, कुठे केला अशेल मग, बारीश केवढा होता रात्री"
सरांचा निरागस प्रश्न, काळजीने भरलेला..
नारायणन सर चार सहा दिवस फिरकलेच नाही.. आम्हाला वर्ग मिळायला परत कधीच अडचण झाली नाही.
सगळ्या क्लास थ्री/फोर स्टाफने आपल्या निष्टा एका रात्रीत बदलुन गुणगाडे सरांना अर्पण केल्या. जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक, सरांना सोडाच, आम्हालाही घाबरायला लागले. नव्या बायकोचा दुसरा दादला एका रात्रीच्या परफोर्मन्सने दोन बायकांचा दादला झाला.
पण ही तर फक्त सुरवात होती..
(क्रमश)
प्रतिक्रिया
18 Jun 2011 - 11:26 am | प्रचेतस
मजा आली वाचून.
सर अगदी डोळ्यांसमोर उभे राहिले.
पुढचे भाग येउ देत आता पटकन.
18 Jun 2011 - 11:41 am | विजुभाऊ
लय भारी. अस्ला मास्तर जीवनाचे धडे देत असतो
18 Jun 2011 - 11:43 am | नगरीनिरंजन
शैली फार आवडली. भंडार्याकडच्या भाषेची लय कशी असते ते माहिती नसल्याने व्यक्तिचित्र पूर्ण डोळ्यासमोर उभे राहण्यात अडचण आली पण तो माझाच दोष.
>> नव्या बायकोचा दुसरा दादला एका रात्रीच्या परफोर्मन्सने दोन बायकांचा दादला झाला.
हे आणि अशी आणखी काही वाक्यं म्हणजे फुलबाज्याच!
18 Jun 2011 - 12:55 pm | शैलेन्द्र
खरंतर या भाषेत बोलणारा मी पाहीलेला हा पहिलाच माणुस.. "स" ला "श" करायचे, आहे ला "है" नाही ला "नै".. मधलेच शब्द खायचे.. शिवाय वरुन नागपुरी हींदीची भेसळ व इंग्लीश बोलण्याच्या इच्छेचा तडका.. विदर्भातली भाषा बोलणारे अनेक भेटले पण सरांसारखा कुणी नाही. त्यांची भाषा त्यांच्या तोंडी वापरण्याचा मोह मी टाळु शकलो नाही.
18 Jun 2011 - 11:46 am | अन्या दातार
>>चकचकीत जांभळ्या रंगाचा
हे वर्णन काय झेपले नाय राव! :(
18 Jun 2011 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनशैली छान आहे. वाचतोय.
-दिलीप बिरुटे
18 Jun 2011 - 12:20 pm | मृत्युन्जय
चांगले जमले आहे. पण भाषा उगाचच पारश्याची असल्यासारखी वाटर राहिली. ननि म्हणतात त्याप्रमाणे भंडार्याकडची भाषा माहिती नसल्यामुळे असे घडले असावे.
18 Jun 2011 - 1:25 pm | कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो.!
व्यक्तिचित्र फक्कड जमुन आले आहे.
18 Jun 2011 - 12:22 pm | किसन शिंदे
ज..ब..रा!
लय आवडले हे गुणगाडे सर, लय शाल्लीट माणूस!
18 Jun 2011 - 12:44 pm | अनुराग
छान लेखन, आवडले!!
18 Jun 2011 - 1:47 pm | स्वाती दिनेश
सुरुवात झकास, पुढे वाचण्यास उत्सुक.
स्वाती
18 Jun 2011 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा
वाचताना फार मजा येतीये...अता थांबु नका
18 Jun 2011 - 3:39 pm | स्वाती२
मस्त सुरुवात!
18 Jun 2011 - 4:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे
तुमचे सर फारच वल्ली होते म्हणायचे...
18 Jun 2011 - 5:14 pm | गोगोल
>> फोनच्चा वायर काढायच्चा रावुन गेला होता
बदला घ्यायचा तर असा घ्यावा :)
येउ देत अजून. मस्त लिहिताय.
18 Jun 2011 - 5:54 pm | धन्या
मानलं तुमच्या सरांना !!!
- धनाजीराव वाकडे
18 Jun 2011 - 8:42 pm | पैसा
भाषाशैलीही आवडली.
18 Jun 2011 - 8:42 pm | ५० फक्त
मस्त रे एकदम मस्त लिखाण, येउ द्या सरांचे प्रताप.
18 Jun 2011 - 9:14 pm | प्रभो
भारी!! येऊ दे पुढचा भाग पटकन!!
18 Jun 2011 - 11:38 pm | गणपा
वाचतोय.....
पुभाप्र.
20 Jun 2011 - 11:29 am | शैलेन्द्र
सगळ्यांना धन्यवाद..