जरा नेहमीची गंमत जंमत बाजुला ठेऊन रोज रात्री आकाशाकडे पहात एकंच प्रश्न पडतो ,
" आपण का जगतो ? "
प्रश्न तसा पाहिला तर साधा वाटतो आणि थोडा तसा पाहिला तर अगदी गुंतडा होतो आणि समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. कोणी म्हणतं मी भाग्यवान ,माणुस म्हणुन जन्मलो. आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे . आपण थोडं ऐश आरामात जगतो ( डीपेंड्स ).
मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. मला चांगले आईबाबा आहेत , मित्र मैत्रिणी आहेत , चांगली नोकरी मिळकत काय असेल तर सगळे आहे, स्वस्थ आहे थोडक्यात मी आहे त्या आयुष्यात सुखी आहे पण तरीही प्रश्न उरतोच की "मी का जगतोय ? " लहानपणापासुन आईबापानं वाढवलं म्हणुन जगलो . नंतर लग्न झालं की बायको , पोरं झाली की त्यांच्या मागण्या पुर्ण करायच्या. पण जर मग ह्या गोष्टी नसतील तर जगण्यात काही राम नाही असे म्हणता येईल काय?
बर्याच कोनांतुन विचार करुन पाहिल्यावरही, वेगळा विचार करुनही "मी का जगतोय ? " ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही म्हणुन काथ्याकुट .
तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ?
-( समाधानकारक उत्तरांच्या अपेक्षेत ) टारझन
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 10:34 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
म्हणुन मिपावर नव्हते...
:)
मलाही हा प्रश्न सतत पडतो.
काही उत्तर नाही मिळत..
कदाचित या काथ्याकुटातुन काहि हाताला लागेल..
टारुभाव.... धन्यु...मणातला धागा व्यक्त झाला!
का जगतो आपण...
सलमानच्या कोणत्यातरी तद्दन फालतु पिक्चरात्ला कायतरी डायलॉग आठ्वला...
हर क्यु और कायकु का जवाब नही होता!.... हे का आठवलं काय माहिती आत्ता...
असो...
धागा मस्त आहे..
मिपाकरानी शिन्शेरली प्रतिक्रिया द्याव्यात... ही मनापासुन विनंती.
26 Apr 2011 - 10:34 pm | स्वानन्द
उत्तराचा शोध सुरू आहे. कळले की सांगेन.
( हा धागा कुठल्या धाग्याचे विडंबन तर नाही ना, असा प्रश्न अजून ही मनात येतोय :) )
26 Apr 2011 - 10:36 pm | मुक्तसुनीत
डोळे चोळत चोळत "हे मी काय वाचतो आहे ?" "हे मी कुणाचे वाचतो आहे ? " "हे मीच वाचतोय ना ?" अशा स्वरूपाच्या शंकांची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करत प्रतिसाद देतो आहे.
एक उत्तर : चित्रपट "मदर इंडिया" . गाणे : "दुनिया मे हम आये हैं तो जीना ही पडेगा/ जीवन है अगर जहर तो पीनाही पडेगा" :)
26 Apr 2011 - 10:48 pm | टारझन
म्हणजे जगायचं म्हणुन जगतोय !
27 Apr 2011 - 11:03 am | llपुण्याचे पेशवेll
मला जगायचे आहे म्हणून जगतो आहे. मला मरावेसे वाटेल तेव्हा आत्महत्या करीन व चिठ्ठी लिहून ठेवेन " आयुष्यात मिळवण्यासारखे सगळे मिळवून झाले मग आता जगून उगाच वेळ का वाया घालवा "
अवांतरः मला याच जन्मात मोक्ष किंवा मुक्ती जे काय म्हणतात त्या अवस्थेला पोचायचे आहे म्हणून जगतो आहे.
27 Apr 2011 - 3:45 pm | इरसाल
मला मरावेसे वाटेल तेव्हा आत्महत्या करीन व चिठ्ठी लिहून ठेवेन "
पुपे नाय नाय तुमी असा नाय करू शकत.
27 Apr 2011 - 11:12 pm | अर्धवट
कागद व पेन पाठवून देतो आहे.
27 Apr 2011 - 11:20 pm | पंगा
वर्गणी गोळा करण्याच्या पर्यायावर विचार व्हावा.
28 Apr 2011 - 3:06 pm | llपुण्याचे पेशवेll
कागद व पेन (आणि उरलेली वर्गणी) पाठवून देणे.
28 Apr 2011 - 5:34 pm | पंगा
...विचाराधीन आहे.
- (पुणेरी) पंगा.
30 Apr 2011 - 1:04 pm | सुधीर१३७
प्र. का.टा.आ.
30 Apr 2011 - 1:06 pm | सुधीर१३७
>>>>>>>>>>>> ...विचाराधीन आहे.
.................... फक्त "वर्गणी",
.................... बाकी कागद व पेन केव्हाच पाठवून दिल्या गेले आहे. ..:wink:
...... (भट्टेरी) दंगा
27 Apr 2011 - 12:28 pm | sagarparadkar
प्रत्येकच जीवात एक प्रकारची जिवंत राहाण्यासाठीची अंतःप्रेरणा आढळून येतेच, त्यामुळेच माणूसपण जगत असणार. फरक एव्हढाच की अतिविकसित मेंदूमधून त्याबद्दल उगाचच उदात्त वगैरे विचार प्रसवतात .... :)
डॉ. मणि भौमिक ह्यांचे 'कोड नेम गॉड' हे पुस्तक वाचले तर ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही दुवे मि़ळू शकतील असं वाटतंय. थेट उत्तर मिळेलच ह्याची काहीच शाश्वती नाही कारण हा प्रश्न आद्य शंकराचार्यांना पडलेल्या 'को Sहं कथमिदं जातं' इतकाच सनातन व अनुत्तरीत आहे.
मला पण एक प्रश्न नेहेमी पडतो तो असा की जवळपास प्रत्येक जोडप्याला 'आपल्याला एक तरी मूल हवंच ' असं का वाटतं? वास्तविक सगळ्या कटकटी तिथूनच तर सुरू होतात .... :)
27 Apr 2011 - 12:52 pm | नगरीनिरंजन
संपूर्ण सहमत.
विशेषतः मानव प्राणी हा उत्क्रांतीतली चूक असल्याने असा प्रश्न पडण्याची क्षमता चुकून मिळाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मला पण एक प्रश्न नेहेमी पडतो तो असा की जवळपास प्रत्येक जोडप्याला 'आपल्याला एक तरी मूल हवंच ' असं का वाटतं? वास्तविक सगळ्या कटकटी तिथूनच तर सुरू होतात ....
टाळ्या. समाजमान्य सुखाच्या कल्पनांमध्ये मुलं असणे ही ही एक कल्पना असल्याने बहुतेकांना मुलं व्हावी असं वाटतं.
कदाचित समाजमान्य सुखाच्या कल्पनांमागे धावण्यासाठीच आपण जगतो.
26 Apr 2011 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
मी मात्र डोळे वगैरे काऽऽही चोळले नाहीत. टार्याच्या आत एक टार्या आहे आणि त्या टार्याला असले प्रश्न पडत असतील असे नेहमीच वाटत होते. असो.
प्रश्नाचे उत्तर (गंभीरपणे) : मरत नाही म्हणून.
27 Apr 2011 - 2:52 pm | प्रदीप
टारगट माणसे दिसतात/दुरून वाटतात तशी ती असतातच असे नाही!
पुढील विचारांस शुभेच्छा, टारझनराव!
27 Apr 2011 - 5:12 pm | अरुण मनोहर
टारगट आय डी मागच्या विचारशील माणसाने हा धागा काढलाय असे वाटते.
कधी कधी मुखवटे घालून घाम येतो, मग स्वच्छ हवा घ्याविशी वाटते.
बाकी प्रश्नाचे उत्तर मला वाटते ते असे-
प्रत्येक जण मरणाची वेळ अजून झाली नाही म्हणून जगतो. खरा प्रश्न तो नव्हे. तर ती वेळ होईपर्यंत तुम्ही काय तीर मारता हा असायला पाहीजे.
28 Apr 2011 - 3:09 pm | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे. पण आजवर काय तीर मारला आहे असा विचार केला की आपण का जगलो असा पुढचा प्रश्न सतावायला लागतो.
किंवा पूर्वी मारलेले तीर काही खरोखरचे लई भारी तीर नव्हते असे वाटू तेव्हा तर हा प्रश्न अजून प्रकर्षाने सतावू लागतो.
26 Apr 2011 - 10:47 pm | कवितानागेश
निदान मी स्वतः तरी का जगते हे मला नक्की माहितीये!
( तसे बाकी काही काही माणसांच्या बाबतीत मला कधी तरी प्रश्न पडतो, ' हे का जिवंत आहेत' असा)
पण मी का सांगू?
;)
26 Apr 2011 - 10:49 pm | प्रियाली
भारताला निदान आपल्या राजकारण्यांना एक बाबा हवेच होते. मिळाले वाट्टं! ;)
26 Apr 2011 - 11:41 pm | टारझन
दुसर्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक जन्म घेता येऊ शकेल :) पण आत्ता तर मला स्वतःच्या च प्रश्नाच्या उत्तराची पडलीये :)
26 Apr 2011 - 11:49 pm | प्रियाली
टार्या अरे ते रात्री तार्यांकडे बघणे सोडून दे. प्रश्नही पडायचे बंद होतील.
ऑन ए सिरिअस नोटः रात्री तार्यांकडे बघणे हा फार आनंददायी अनुभव नसावा. एकतर काळोख आणि त्यात विशाल पसरलेलं आकाश आणि लाखो प्रकाशवर्षे दूरवरचे मिणमिणते तारे आपण किती क्षुद्र आहोत त्याची जाणीव करून देतात.
26 Apr 2011 - 10:57 pm | लिखाळ
कल्पना नाही. तसे खास असे काही कारणसुद्धा दिसत नाही.
(सदर उत्तर गंभीर आहे.)
26 Apr 2011 - 11:04 pm | छोटा डॉन
जीवन म्हणजे काय तर इच्छा, आकांक्षा आणि सुख ह्यांच्या शोधासाठी व नंतर प्राप्तीसाठी अखंड चालत असलेला प्रवाह.
मग ह्याचे संदर्भ, कारणे, मुल्य व त्यांचे मुल्यमापनही त्या त्या काळानुसार बदलु शकते.
थोडक्यात ही 'कंटिन्युअस डेव्हलपमेंटची' प्रोसेस आहे, जीवन जगण्याचे कारण रोज अपडेट होत असते.
आजचेच बघा ना, आज रात्री मॅन-यु आणि शाल्के०४ ची सेमीफायनल मॅच आहे, त्यात मॅन्युचा पार बाजार उठुन त्यांचा सुफडा साफ व्हावा ही आमची 'इच्छा' आहे व त्याच 'अपेक्षे'ने आम्ही ही मॅच पाहु, समज तसे झालेच तर आम्ही 'सुखा'ने झोपी जाऊ.
उद्याचे ?
अहो उद्या बार्सिलोना वि. रियाल माद्रिद आहे, जगण्याचे सोलिड सबळ कारण आहे सध्या आमच्याकडे.
अर्थात प्रत्येकाचे हे वेगळे असते, आम्ही उगाच एक क्षुल्लक उदाहरण दिले.
- छोटा डॉन
27 Apr 2011 - 12:04 am | टारझन
:) आपण स्वतःच प्रॉब्लेम तयार करतो , स्वतःच प्रश्न तयार करतो ,, आणि त्यांचं समाधान पण स्वतःच करुन घेतो , कधीकधी समाधान होत नाही , "एवढाच" काय तो फरक :(
27 Apr 2011 - 12:11 am | छोटा डॉन
करेक्ट !
ह्यालाच 'जीवन' म्हणतात मालक ...
- छोटा डॉन
26 Apr 2011 - 11:13 pm | पंगा
विचार करण्याची पद्धत आणि जागा यांबद्दल बराच अंदाज आला.
प्रश्नाचे साधे उत्तर: इतरांचे डोके खाण्यासाठी.
26 Apr 2011 - 11:33 pm | टारझन
कुंथुन कुंथुन जोर मारले , कुंथुन कुंथुन सायकल चालवली , कुंथुन कुंथुन धावलो किंवा कुंथुन कुंथुन उड्या मारल्या , ह्या सगळ्यांची पद्धत आणि जागा ह्या एकंच आहेत काय ?
बाकी साधे उत्तर तितक्याच साधेपणे दिलंय तर सांगा , तुम्हाला निर्जन जागी सोडलं किंवा येड्यांच्या समुहात सोडलं जिथे तुम्ही इतरांचं डोकं खाऊ शकला नाहीत , तर ? तुमचे जगणे व्यर्थ होईल काय
अवांतर : आमच्या पुर्वीच्या वाटचालीमुळे धाग्याच्या हेतुबद्दल शंका येऊ शकते , पण प्रांजळपणे तसे नसल्याचे कबुल करतो. वैराग्य आलंय असंही नाही , पुलंच्या गटण्यासारखी स्थिती आहे असं ही नाही. पण एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नसल्याने गोष्ट चव्हाट्यावर आणली आहे , इतकंच .
धन्यवाद पंगा , आणि सर्व प्रतिसादक .
26 Apr 2011 - 11:49 pm | पंगा
जोर काढणे (हे तसेही कधी केल्याचे आठवत नाही), सायकल चालवणे, धावणे किंवा उड्या मारणे हे कुंथून कुंथून करण्याचा पूर्वानुभव नाही, त्यामुळे सांगू शकत नाही.
नाही बॉ. तिथेही काही मार्ग काढूच. तसेही 'प्र्याक्टिस मेक्स अ म्यान पर्फेक्ट' हे आपले ब्रीद आहे. सरावासाठी हे दोन्ही प्रसंग वाईट नाहीत.
(अवांतर:
यात 'जर-तर'चा प्रश्न येतोच कुठे?)
बाकी, प्रश्नाच्या प्रामाणिक आणि पटण्यासारख्या उत्तराच्या शोधासाठी शुभेच्छा. (हे ज्यानेत्यानेच शोधलेले बरे, असे वाटते. 'वन-साइझ-फिट्स-ऑल' उत्तर असू शकेल असे वाटत नाही.)
(हे उत्तर शोधले पाहिजेच का?)
26 Apr 2011 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिकचे सुख, अधिकचे समाधान आणि अधिकची शांती यासाठी आपण जगतो असे म्हणतात. आपण जर धार्मिक असाल तर जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती. जीवनाच्या जन्म मृत्युच्या या चक्रातून कायमची सुटका म्हणजे मोक्ष. आता हा मोक्ष मिळवायचा असेल तर काय करावे लागते त्यावर वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे मार्ग-आणि वेगवेगळे विचार आहेत. त्याबद्दलचे काही हिंदु विचार हिंदीविकीवरुन मराठी विकिवर अनुवाद करुन डकवतांना काही समजलं तर इथे डकवतो. :)
अवांतर : नेतृत्त्व या विषयावर मराठी विकिपीडियात भर घालतो आहे. कोणी मदत करत असेल तर स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Apr 2011 - 11:35 pm | आत्मशून्य
मला वाटलं होते या धाग्याचं वीडंबन आहे की काय.... http://www.misalpav.com/node/16332
26 Apr 2011 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही आठवत नव्हतं.......! दुव्याबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
27 Apr 2011 - 8:58 am | टारझन
च्यायला खरंच की .. :) आणि माझी प्रतिक्रीयाही आहे तिथे ( पहिलीच ) :)
पण मी धागा काढला तेंव्हा पुर्ण ब्लँक होतो :(
लिंक बद्दल धन्यवाद .. नानाची आठवण आली :(
27 Apr 2011 - 5:58 pm | आत्मशून्य
.
27 Apr 2011 - 5:57 pm | आत्मशून्य
असं म्हणतात की प्रश्न काय आहे हे समजून घ्यावे / शोधावे. (कारण ऊत्तरे असतील तर ती तीथच मीळतात).
आपण आपल्या प्रश्ना संदर्भात सांगीतलेली पार्श्वभूमी बघता व त्यासोबतच या आधीच आपल्याला पडलेला प्रश्न "आपण खरच जगतो का" याचा वीचार केला तर आपला संकल्पनेत काही गोंधळ ऊडाला आहे अथवा सूखाचे अजीर्ण झाले आहे हेच या प्रश्नामागील प्राथमीक कारण वाटते.
बाकी जाणकार ऊजेड टाकतीलच. पण ऊत्तरे तूमची तूम्हाला शोधावी लागतील कारण ती फक्त तूम्हालाच मीळू शकतात. जसे अंबा गोड आहे म्हणणे म्हणजे प्रत्यक्ष त्याची गोड चव चाखणे न्हवे, म्हणजेच मी जर तूम्हाला अंबा गोड असतो सांगून जशी त्याच्या प्रत्यक्ष चवीची कल्पना अथवा त्याबाबत शंकासमाधान केवळ शब्दाने करू शकणार नाही तसेच तूमच्या प्रश्नाच्या ऊत्तराचे आहे.
कोणी ही ज्याने या प्रश्नाचे ऊत्तर मीळवले आहे तो आपल्या प्रश्नाचे शंका समाधान केवळ शब्दात करू शकणार नाही. जी गोश्ट शब्द नाही ती शब्दाने अनूभवाला येणार नाही. म्हणूनच असे समजा की तूमच्या प्रश्नाचे १००% योग्य ऊत्तर जरी मी तूम्हाला नक्की देऊ शकलो(जस्स फोsssर अर्ग्युवम्येंट शेक वन्ली) तरी ते मी दीलय म्हणून आपण ते घेऊ शकता काय (प्रत्यक्ष अनूभूतीने)?
उत्तराबाबत तर्काच्या मनोर्यांना शब्दांच्या माळानी सजवून एकदम योग्य ऊत्तर मीळालेय/दीलेय असा भ्रम कोणाही व्यक्तीबाबत (आस्तीक नास्तीक फरक पडत नाय) नीर्माण करण फारच सोपं आहे.
म्हणून जो तूमच्या प्रश्नाचे १००% सत्य ऊत्तर केवळ शब्द व तर्काने करून देइल तो एक तर सर्वात मोठा थापाड्या समजावा, म्हणजे तो जे काही बोलला ते त्याने नक्कीच अनूभवले नाही.
अथवा तूम्ही त्याला संमोहीत झालेले आहात ज्याचा त्या व्यक्तीने खरं ऊत्तर मीळवला असल्याशी काहीही संबध नाही म्हणजे तो खरं बोलत असेलही अथवा नसेलही तूमचे शंका समाधान हा एक भ्रमच राहील व त्याचे परीणाम अनावश्यक वेळ व इतर गोश्टी खर्च होण्यात होतील, ऊत्तर मीळण्यात न्हवे .
30 Apr 2011 - 1:11 pm | सुधीर१३७
नाना गेला, आणि टारा सुरू झाला................ :wink:
26 Apr 2011 - 11:43 pm | धनंजय
"का" या प्रश्नार्थक शब्दाने सुरू होणार्या प्रश्नाच्या समाधानकारक उत्तराची धाटणी कशी असते? याबद्दल एखादे उदाहरण देऊ शकाल काय?
म्हणजे :
आपण का क्ष-क्रिया-करतो?
अशा प्रकारच्या कुठल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले असल्यास त्याचे उदाहरण द्यावे. मग त्या धाटणीने वरील प्रश्नाबद्दल विचार करता येईल.
"का" हा प्रश्नशब्द असलेले प्रश्न खोलात गेल्यास गुंतडा करतात, असा माझा अनुभव आहे. कित्येकदा गुंतडा होण्यामागचा दोष विषयातील मुद्द्यांमध्ये नसतो. किंबहुना "का" शब्दाच्या मोघम आणि संदिग्ध वापरामुळे असतो.
वरील वाक्य काहीतरी महत्त्वाचा निर्देश देते. पणपुढल्या परस्परविरोधी निर्देशांपैकी कुठला निर्देश मिळतो, ते समजत नाही :
(अ) तुम्हाला समाधानकारक वाटेल ते उत्तर झुरळांना आणि मनुष्यांना दोघांना लागू असले पाहिजे अशी अट आहे का?
(आ) की अगदी उलट अशी अट आहे, की झुरळांना उत्तर लागू असता कामा नये, पण मनुष्यांना लागू असले पाहिजे, तरच उत्तर समाधानकारक असेल?
27 Apr 2011 - 12:09 am | रामदास
रोज रात्री आकाशाकडे पहात (आणि )कुंथुन कुंथुन विचार करुन ... ही दोन वाक्ये जोडली आणि चित्र डोळ्यासमोर उभे राहून आणि बाबांना प्रेरणा कशी मिळाली याचा उलगडा झाला.
मी जगतोय असे विधान मी करत नाही.कुणीतरी मला जगवतंय हे खरे आहे.
वडीलांच्या सेवेसी पाळावे पुत्रासी
तैसे त्वा प्रतिपाळावे आम्हासी
अशी काहीतरी ओळ गुरुचरीत्रात वाचलेली आठवते.
काही असो जगण्याची हौस काही संपत नाही.
आयुष्य हवंहवंसच वाटत राहतं.
विंदांच्या एका कवितेचा दाखला देतो आहे .
पुन्हा वाटते तसेच इवले
बाळ होऊनी कुशीत यावे
अन पदराच्या अभयाखाली
डोळ्यांनी हे पंख मिटावे
आणि आजच दासू वैद्यांच्या कविताही पुन्हा एकदा वाचल्या
त्यांची आयुष्य ही कविता देतो आहे .
कमी तापवलं तर
नासण्याची भिती.
जास्त तापवलं तर
आलेल्या दाट सायीमुळे
गुदमर होतो आयुष्याचा.
विस्तवावर ठेवलंच तर
राखेशिवाय काय सापडेल?
या त्रैराशीकाच्या गोंधळात
गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने
छडी खाण्यासाठी
डोळे मिटून हात पुढे करावा ,
तसा मी उभा आहे .
पाच फूट सहा इंचाच्या बाकड्यावर .
हे संदर्भ जर चुकीचे असतील त्याला मी जबाबदार नाहीच . कारण या कवितांचा हॅगओव्हरच तसा असतो.
27 Apr 2011 - 1:07 am | चतुरंग
दासू वैद्यांची कविता भारीच!
-रंगा
27 Apr 2011 - 9:05 am | टारझन
___/\___
"कुंथुन कुंथुन" ह्या शब्दप्रयोगामुळे जो नाट्याविष्कार झालाय तो मला आत्ता उमगलाय :) आणि मी पोट धरुन हसतोय .. :)
27 Apr 2011 - 1:16 am | आनंदयात्री
पुन्हा वाटते तसेच इवले
बाळ होऊनी कुशीत यावे
अन पदराच्या अभयाखाली
डोळ्यांनी हे पंख मिटावे
अप्रतिम कडवे !! "अन पदराच्या अभयाखाली ... डोळ्यांनी हे पंख मिटावे" वाह वा !!! वाचुनच इतके निर्धास्त वाटले की बास्स .. यु मेड माय डे सर. थँक यु :)
27 Apr 2011 - 12:34 am | निनाद मुक्काम प...
इतर प्राण्याचा मेंदू विकसित नसल्याने त्यांना असे प्रश्न पडत नाहीत .त्यांना जगायचे असेल तर ते दुसर्याला मारून जगतात ,
( संधर्भ - जीव शास्त्रातील अन्न साखळी ) आपला मेंदू नक्की कधी ते माहीत नाही पण अचानक विकसित झाला .व पाहता पाहता आपण मानवाने ही पृथ्वी पादाक्रांत केली .
आज आपण नवीन शोध स्वतःचे जीवनमान सुधारायला लावतो ( हायच शोधांमुळे आधुनिक जीवनशैलीने आपले जीवन ताणताणाव व समस्येने पोखरले आहे )
आपण प्रगती करतो त्यामागची प्रेरणा नक्की आपल्याला कोण देतो .? आपल्याकडून होणार्या गोष्टी कोणी आपल्याकडून करून घेतो का ?
उदा आपला प्रयोगशाळेत आपण उंदरांच्या अनेक पिढ्या ( गीनिपिक ) जन्माला घालतो .त्यांच्या द्र्ष्टीने ते त्यांचे आयुष्य जगात असतात .
पण आपण त्यांच्यावर अनेक प्रयोग करतो कारण त्यांच्यावर होणारे बदल व परिणाम पाहून आपण औषध व अनेक गोष्टी बनवतो .त्या उंदरांना ह्यांची काहीही कल्पना नसते की आज अचानक आपल्यात काय खायला मिळाले .अचानक आपल्यात रोगाची साथ का आली .
मला नेहमी असे वाटते .माणूस कोणाचे तरी गीनिपिक नसेन कश्यावरून ?
काही प्रगत परग्रहावरील जीवांनी आपला मेंदू पृथ्वीवरील इतर जीवांपेक्षा काहीच्या काही जास्त प्रमाणात विकसित केला नसेन कश्यावरून ?
थोडक्यात आपण जगतो का आपल्याला जगवले जाते .?
( जगण्याची व त्यासाठी काहीही करण्याची दुर्दम्य आशा आपल्यात कोण निर्माण करतो )
'' कुणा न कळले त्रिखंडात ल्या ,हात विणकराचे ''
27 Apr 2011 - 12:50 am | चतुरंग
शेवटी एकदाचा हा प्रश्न पडला तर! दोनाचे चार हात झाले की आपोआप उत्तर मिळेल! ;)
शीरियस उत्तर -
माणूस म्हणून जगण्याचं सार्थक व्हावं ह्याच हेतूने जगतोय. प्रत्येक क्षणात प्रचंड आनंद आहे, क्षणस्थ होता येईल तर तो आनंद उपभोगता येईल असे वाटते. कालची काळजी आणि उद्याची चिंता नसावी अशा दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न सुरु आहे! हा प्रवासच एक आनंद आहे. कुठे पोचण्याची, मुक्कामाला जाण्याची गरज वाटत नाही असा दिवस येईल अशी खात्री आहे!
"का?" या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळेल असे वाटत नाही. हे बरेचसे लहान मुलांच्या प्रश्नसाखळीसारखे असते. एकाचे उत्तर दिले की "पण तसे का?" त्याचे उत्तर दिले की मग पुन्हा तसे का? .....
तेव्हा अशा प्रश्नमालिकेपेक्षा. जे जीवन आपल्याला मिळाले आहे, कोणत्या का कारणाने असेना, त्याचा पुरेपूर उपयोग करावा, आनंदात जगावे, क्षणस्थ व्हायचा प्रयत्न करावा.
-रंगानंद
27 Apr 2011 - 9:15 am | टारझन
:( हो ना ..
हे आपण करतोच हो .. इतर वेळी कधी काही हा प्रश्न सतावत नाही . तो एक रिकामी वेळ साधुन येतो आणि डोकं खातो :)
27 Apr 2011 - 7:13 am | रेवती
हम्म्म........
27 Apr 2011 - 7:28 am | पिवळा डांबिस
कारण मला माझ्या जगण्यातून अतीव आनंद मिळतो!
खाली माझी स्वाक्षरी आहे त्यातून अंदाज येईलच!!!;)
-पिडांकाका
27 Apr 2011 - 9:34 am | टारझन
तुम्ही तुमच्या जगण्यातुन आनंद "घेत" असावेत असे वाटते :(
खालच्या प्राणवायुच्या कमेंट साठी सुपरलाईक :)
27 Apr 2011 - 7:33 am | शुचि
शंकर-पार्वतीच्या सारीपाटावरच्या सोंगट्यांना कुठून कळणार खेळ का अन किती वेळ चालू रहाणार?
27 Apr 2011 - 8:01 am | अविनाशकुलकर्णी
भारतात अनेक लोक फुकट प्राण वायु मिळतात म्हणुन जगत आहे..त्यांच्या जिवनाचे उद्धिष्ट अस्तित्व एव्हढेच आहे..
आम्हि पण त्या पैकि एक आहोत...सरकारने प्राण वायु वर कर आकारु नये..नाहि तर आमच्या सारखे अनेक प्राण वायु अभावि धारा तिर्थि पडतिल
27 Apr 2011 - 8:02 am | अविनाशकुलकर्णी
भारतात अनेक लोक फुकट प्राण वायु मिळतात म्हणुन जगत आहे..त्यांच्या जिवनाचे उद्धिष्ट अस्तित्व एव्हढेच आहे..
आम्हि पण त्या पैकि एक आहोत...सरकारने प्राण वायु वर कर आकारु नये..नाहि तर आमच्या सारखे अनेक प्राण वायु अभावि धारा तिर्थि पडतिल
27 Apr 2011 - 10:57 am | नरेशकुमार
जगायला नायट्रोजन पन लागतो. आनि H2O पन लागते. आनि ऑक्सिजन विसरुन कसे चालेल. ते सुध्धा पाहीजेच ना !
27 Apr 2011 - 8:10 am | अविनाशकुलकर्णी
.
27 Apr 2011 - 8:16 am | पिवळा डांबिस
प्राणवायू संपला वाटतं!!!!!
:)
(ह. घ्या अविनाशराव!!)
27 Apr 2011 - 8:48 am | नितिन थत्ते
>>आपण का जगतो?
अजून मेलो नाही म्हणून.
27 Apr 2011 - 9:10 am | तिमा
लहानपणी सगळ्याच नवीन गोष्टींचे कुतुहल असते म्हणून जगतो.
तरुणवयात आणखी बर्याच गोष्टी आकर्षक वाटू लागतात, त्या मिळवण्यासाठी धडपडत पण एंजॉय करत जगतो.
मध्यम वयात जो संसाराचा पसारा मांडून ठेवलेला असतो त्याची जबाबदारी असते म्हणून जगतो.
आणि उतारवयात त्याआधीचा काळ खूप सुखांत गेला असेल तर त्याच्या आठवणींवर जगतो. दु;खात गेला असेल तर आता तरी चांगले दिवस येतील या आशेवर जगतो.
शिवाय मेल्यानंतर नक्की काय आहे हे माहित नसल्यामुळे एक अनामिक भीति असते म्हणूनही जगतो.
वैयक्तिकः मला मात्र मेल्यानंतर काय आहे ते जाणून घेण्याची अतीव उत्कंठा आहे पण आत्महत्या हा भ्याडपणा आहे शिवाय तसे केल्यास घरच्यांना निष्कारण त्रास होईल म्हणून जगतोय.
27 Apr 2011 - 9:28 am | ऋषिकेश
जिनेवालो को जिने का बहाना चाहिये! असे जगण्याचे सांगण्यासारखे बहाणे हजारो आहेत पण त्यातलं कारण एकही नाही..
बहुदा मला जगायला आवडतं म्हणून जगतो.. जगण्याची आसक्ती संपली की असं जिवंत दिसणारं माणूस आणि प्रेत यात काय फरक?
तेव्हा मरताना, मरणं ही आतापर्यंत न अनुभवलेला प्रवास असावा म्हणून आता जगतोय.. मनापासून जगून घेतोय!
27 Apr 2011 - 9:27 am | किसन शिंदे
टारझन राव,
एकदा योगिनी एकादशीला आळंदीत या आणि तिथून सुरुवात करून पायीच वारी करा पंढरपूर पर्यंत.....
वारीतल्या कोणत्याही वारकरयाला हा प्रश्न विचारा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल.:)
बोला पुंडलिक वरदा....हरी विठ्ठल...
27 Apr 2011 - 9:38 am | मराठमोळा
माझे मत..
आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येतात पण "का?" या प्रश्नाचे उत्तर बर्याचदा मिळतच नाही. हे जग आहे, असं आहे, तसं आहे मी काय कसा कुठे कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण मी का आहे या प्रश्नाचे उत्तर नाही. हे जगसुद्धा का आहे याचे उत्तर नाही. का हा सगळा प्रपंच निर्माण झाला याला देखील उत्तर नाही.
या "का?" वाल्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करु नये, वेड लागू शकते. ;)
थोडं अध्यात्मिक वाटेल पण सर्वजण एका कधीही न संपणार्या आनंदाच्या शोधात जगत असतात, जो मरेपर्यंत मिळत नाही. :)
तसं पाहिलं तर मनुष्य आणि ईतर प्राणी काही वेगळं करत नाहीत. खाणे, झोपणे, प्रजनन आणि स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण या गोष्टींच्या अवती भवतीच माणसाचे सुख-दु:ख आणि आयुष्य फिरत असते. फरक हाच की माणसं जास्त विचार करतात, निसर्गाला आव्हान देत फिरतात, ईतर प्राणी हे करत नाहीत, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगतात, वागतात.
ज्या दिवशी "मी का जगतो?" किंवा "मी का आहे?" या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्या दिवशी जगण्याची ईच्छा संपेल कदाचित. :)
27 Apr 2011 - 9:38 am | विसोबा खेचर
ऐका माझं गटणे, चहा घ्याच थोडासा..! ;)
तात्या.
27 Apr 2011 - 10:15 am | टारझन
:) गटणे किती लक्की होता , त्याला भाईकाकांचं डोकं खायचं भाग्य मिळालं होतं :)
बाकी थोडासा कशाला दोन च्या द्या :)
27 Apr 2011 - 10:12 am | योगी९००
रात्रीच्या तारका (आकाशातल्या) पहाताना थोडे सिंहावलोकन केलेस तर तुझ्या आयुष्याच्या जमाखर्चाचा ताळेबंद स्थिरस्थावर होईल. तुझ्या मनो़ज्ञ मानसिकतेला "आपण का जगतो" याची महदोत्कट प्रचिती मिळून तुझ्या आत्म्याला अनुभूती मिळेल.
(कुंथून कुंथून शिंहावलोकन केलेस तर तुला " आपण का *गतो" हे पण कळेल..)
27 Apr 2011 - 10:13 am | ज्ञानेश...
आपण जगतो ते दुसर्यांसाठी.
कुणाला अपत्य हवे असतो म्हणून आपण जन्मतो. कुणालातरी भाऊ मिळावा, मित्र मिळावा, प्रियकर, शेजारी, बॉस, कर्मचारी इ. इ. मिळावेत म्हणून आपण जगतो. थोडक्यात इतरांच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आपण जगतो. आणि आपल्यासाठी ते !
(बाकी हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर गद्यापेक्षा पद्यात देणे सोपे पडेल.)
27 Apr 2011 - 10:17 am | ५० फक्त
माझी स्वाक्षरी पुरेशी आहे निदान माझ्यापुरत्या उत्तराला.
अवांतर - काल राजधानी मध्ये जेवंण मस्त होतं, भजी, पन्हं, गाजर हलवा, दाळ ढोकळी अगदी छान छान.
27 Apr 2011 - 3:53 pm | इरसाल
पूर्वीसारखा चार्म नाय रहायला राव राजधानीत
27 Apr 2011 - 10:17 am | गवि
सर्व उत्तरांसाठी उन्नती मासिकाच्या एका जुन्या विजयादशमी अंकात आलेला श्री. चौखुरेगुरुजी यांचा "जीवनोन्नतीचे सहा सोपान" हा लेख तुम्ही वाचाच टारुभाऊ..
(कुठला अंक विचारू नका.)
- सखाराम गविटणे.
27 Apr 2011 - 10:27 am | स्पंदना
रामदास काका अन ज्ञानेश, बरच समर्पक सांगुन गेले.
एव्हढा धागा पुरेसा आहे जगण्याच बळ देण्यासाठी. हा आता जास्तच प्रश्न सतावत असेल तर जरा चार दिवस सद्वर्तन करुन बघायच.
तस पण, मी माझ्या पुरत "का? आणि किती?" सोडुन" कस "जगलो? याला जास्त महत्व देते. माझ्या पुरता एक आरसा मी माझ्या मनी बाळगते, जोवर मी; त्या आरशात, माझी स्वतःची नजर न चुकवीता पाहु शकते, तोवर "खरी"मी!
27 Apr 2011 - 10:56 am | टारझन
जगण्याची इच्छाशक्ती मेलेली नाहीये हो :) मनात कोणतं पाप केल्याचं शल्य ही नाही .
फक्त प्रश्नाचं उत्तर हवंय :) ह्यात डिप्रेशन नाहीये :)
27 Apr 2011 - 11:03 am | स्पंदना
मी तस म्हणत ही नाही. माझ म्हणन एव्हढच की मला जेंव्हा एकंदर 'जगण्या' बद्दल प्रश्न पडतो तो ,' का?' ऐवजी 'कस ?' असा पडतो.
मी तुमचा मुद्दा चुकिचा नाही डेपिक्ट केला, नाही तो बदलाय्चा प्रयत्न!
आठवण आली 'असा मी असामी ' मधल्या प्रवचनाच्या सीनची. तु कोण? मी कोण?
27 Apr 2011 - 10:53 am | नरेशकुमार
खुप औघड आहे. मला कळ्लेल नाहीये अजुन पर्यन्त. ह्या पोस्ट वरुन काहीतरी कळेल असे वाटत आहे.
रोज काम करायच, घरी यायचे. एक पिच्चर बघायचा, बायकोल घेउन बाहेर जायच. शनिवात रैवार लांब कुठेतरि फिरायला जायच. कधिकधि मिपावर यायच, एवधच काय ते येत. पन जगायच कशाला ते अजुन समजल नाही.
27 Apr 2011 - 11:30 am | ५० फक्त
@ नकु, हे जे काय करता म्हणुन लिहिलंय ना ते करणं सोडुन द्या २-३ महिने, लगेच कळेल का जगायचं ते.
27 Apr 2011 - 11:37 am | मिसळलेला काव्यप्रेमी
ही संदीपदाची रचना आठवून गेली.
ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता त्यांना ही रचना सापडून गेली....
27 Apr 2011 - 12:05 pm | प्यारे१
कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
ज्याला जेव्हा जिथे सोयीचे
जगात नसते कुणी कुणाचे
- साळसूद.
( आत्मनस्तु कामाय सर्वंप्रियं भवति)
एखाद्या खेळामध्ये उतरलो की तो पूर्ण करुनच बाहेर येता येते. काहीसे तसेच जीवनचक्र आहे. ' मिळालेले' जीवन जगणे हा एक खेळच.( मिळालेलेच. कारण त्याला चॉईस नसतो. चॉईस असता तर प्रत्येकाने जास्तीत जास्त चांगले रुप, धन, ऐश्वर्य, शारिरीक ताकद, आरोग्य इ.इ. घेण्याचा प्रयत्न आधीच केला नसता का? खरेतर ते आपल्याच पूर्वकर्मांमुळे 'मिळवलेले' असते पण त्यावर कुढण्यापेक्षा पुढचा विचार करणे अधिक श्रेयस्कर)
आणि एखाद्या कैद्याला शिक्षा पूर्ण होण्याआधी पळून गेला तर शिक्षा जशी जास्त होते तसे आत्महत्या करणार्याला ही पुन्हा यावेच लागते आणि नवीन शिक्षा (नवीन मिळणारा जन्म) सव्याज भोगावी लागते.
त्यामुळे मिळालेले जीवन जगणे आणि जगताना पुढची कर्मबीजे कमीत कमी निर्माण करणारं ठरावं हा जगण्याचं मुख्य हेतू असला पाहिजे. असावा.
तीन 'डू' ज ( विधी) आणि तीन 'डोन्ट' स (निषेध) लक्षात ठेवावे.
'डू' ज - सत्य, आईवडिलांच्या आज्ञापालन आणि संत महंतांचे ऐकणे आणि आचरणे ( 'खर्या' संतांचे क्रायटेरिया वेगळे आहेत. ते सुद्धा पारखूनच घ्यावे लागतात अर्थात आपली सुद्धा पात्रता लागते.)
'डोन्ट' स - परस्त्री, परधन, परनिंदा/ परपीडा. या तिन्ही गोष्टी टाळाव्यात. बहुतांश भांडणं, वाद, खून, युद्धे यांचे मूळ हेच आहे.
मानवी जीवन ही एक देणगी आहे. तिचा पुरेपूर वापर केला गेला तरच मनुष्य म्हणवता येईल नाहीतर,
आहार निद्रा भय मैथुनंच... या श्लोकात सांगितल्या प्रमाणे आपणही पशुत्वाकडे वाटचाल करतो आहोतच.
27 Apr 2011 - 12:09 pm | प्यारे१
प्रकाटाआ
27 Apr 2011 - 12:26 pm | सुहास..
रिकाम्या वेळेत पडतात असे प्रश्न !!
असो ..का जगतो यापेक्षा कसा जगतो याला महत्त्व असल्याने असा प्रश्न पडला नाही आणि कोणी विचारला तर सदैव दुर्लक्ष केले आहे ...आज ही करतो आहे ..
धन्यवाद्स !!
27 Apr 2011 - 12:29 pm | भारीबंडू
अरे जरा गुगल वर शोधून पहा कि ...
आम्ही तर बाबा खाण्यासाठी जगतो
27 Apr 2011 - 12:39 pm | मी ऋचा
मला वाटतं आपण स्वतःला जरा जास्तंच सिरीयसली घेत सुटतो. आपण जन्माला येतो ते काही आपली ईच्छा म्हणून नाही आणि मरतो तेही काही आप्ली ईच्छा म्हणून नाही (जनरली). तेव्हा हा प्रश्णच माझ्यामते निरर्थक आहे उगाच वरील दोन अनैच्छिक क्रियांच्या मधल्या फावल्या वेळेतला टाईमपास..
27 Apr 2011 - 12:51 pm | योगप्रभू
काल एक सुंदर पुस्तक माझ्या संग्रहात समाविष्ट झालंय. मी भान हरपून ते वाचतोय आणि आनंदलहरींनी सुखावतोय.
त्या पुस्तकाचे नाव आहे. 'जगावे का आणि कशासाठी?' लेखक : डॉ. वि. रा. करंदीकर, स्नेहल प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती २००९. पृष्ठे १९६, किंमत १७५ रुपये.
या पुस्तकाच्या समारोपात म्हटले आहे, की
(या ओळी उद्धॄत करताना प्रकाशकांची परवानगी घेतली आहे.)
28 Apr 2011 - 12:30 am | सुधीर
हमम् ! पुस्तकाबद्धल धन्यवाद!!
27 Apr 2011 - 1:14 pm | विनायक प्रभू
स्वत: चे प्रश्न स्वत: सोडवतो अशी सही वाचल्याचे स्मरते.
27 Apr 2011 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार
आपण तर बॉ टार्या कसे मिरे वाटतो ते बघायला आंतरजालावर जगत आहोत.
27 Apr 2011 - 3:01 pm | स्मिता.
विषय बघून तो टार्याने काढला आहे यावर आधी विश्वासच बसला नाही. पण त्याने बर्याच वेळा सांगितलं की खरोखरच त्याला असं प्रश्न पडलाय आणि मी विचार करायला सुरुवात केली.
बर्याच मिपाकरांनी समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पण खरंच हा विषय साखळी सारखा आहे, एका प्रश्नाच्या उत्तरात दुसरा प्रश्न असलेला!
टार्या, गंभिरपणे विचार करून एवढंच पुढे आलं की किमान आपण जन्म आपल्या मर्जीने घेतलेला नाही तर आपल्या आई-वडिलांनी काहितरी अपेक्षेने आपल्याला जन्माला घातले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपण जगत असतानाच दरम्यान आपल्या अपेक्षा निर्माण होतात आणि आपण या सामूहिक अपेक्षापूर्तीसाठी जगतो असं वाटतं.
ज्या अपेक्षेने आई-वडील अपत्याला जन्म देतात त्याच अपेक्षेने ते अपत्य मोठे होऊन स्वतःच्या अपत्याला जन्म देते. कारण मध्यंतरीच्या काळात या समाजाचे, त्याच्या अपेक्षांचे संस्कार त्या अपत्यावर झालेले असतात.
त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेवटी माणूस हा एक सजीव प्राणी आहे आणि इतर प्राण्यांमधे जे 'बेसिक इंस्टिंक्ट' आहे तेच माणसात आहे. त्यामुळे आपण जगत राहतो.
सर्वसामान्य माणसाला पाहिलं तर तो आई-वडिल, भाऊ-बहीण, नवरा, बयको, मुलं, नातवंडं यांच्यासाठी जगत असतो, असं आपण म्हणतो. पण रस्त्यावरचा एखादा भणंग भिकारी, ज्याच्या मागे-पुढे कोणी नाही, ज्याला घर-दार नाही, अंगावर धड कपडे नाही की पोटाला २ घास नाही, जगत असतोच ना? त्याला कोणी समोर येऊन गोळी घातली तर मरणाची भीती वाटतेच ना?
इतर प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू प्रगत आहे म्हणून त्याने आपल्याभोवती संसाराचं जाळं करून घेतलंय आणि ते त्याला जगायला भाग पाडतं हे खरं असलं तरी प्रत्येक सजीव जगण्याच्या नैसर्गीक प्रेरणेमुळे जगत राहतो.
-------------------------------------------------------------
अवांतरः- परवाच गप्पा मारताना विषय निघाला की मुलं हवीतच कशाला? असेही आता कोणती मुलं म्हातार्या आईवडिलांजवळ राहतात आणि त्यांची सेवा करतात? बहुतेक लोक म्हणतात मुलं होईपर्यंत सगळं चांगलं होतं. मुलं झाल्यावर जबाबदार्या वाढल्या, ताण वाढले, इ.... आजकाल मानवात पुनरूत्पादन हा 'बेसिक इंस्टिंक्ट' राहीलेला वाटत नाही.
पण जास्त चर्चेनंतर असं लक्षात आलं की आपण तरूण असेपर्यंत आपले आई वडील बहुदा हयात असतात. लहानपणापासून आपले सुख-दु:ख त्यांच्यासोबत आपण वाटत असतो. पण आपल्या उतार वयात आपले आई वडील हयात असण्याची शक्यता फार कमी असते. तेव्हा आपले सुख-दु:ख वाटून घ्यायला आपल्या रक्ताच्या नात्याचे लोक पक्षी मुलं सोबत हवेत, नाहीतर आपण या जगात पार एकटे पडू या सुप्त प्रेरणेतून (स्वार्थ म्हणायला हवं की नको माहिती नाही) जोडपी अपत्य जन्माला घालतात.
अर्थात आमच्या गप्पांत सुशिक्षीत (संतती नियमन करणारी) जोडपीच गृहीत होती. कारण मुलं झाली म्हणून आहेत असाही समाज आहेच.
27 Apr 2011 - 4:48 pm | विटेकर
त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेवटी माणूस हा एक सजीव प्राणी आहे आणि इतर प्राण्यांमधे जे 'बेसिक इंस्टिंक्ट' आहे तेच माणसात आहे. त्यामुळे आपण जगत राहतो.
आहार निद्रा भय मैथुनं च | सामान्यमेत्म पशुभिर्नराण म |
धर्मोहितेषां अधिको विशेषा: धर्मेण हिना: पशु: भिसमानः ||
(संस्कृत शुद्ध लेखन चू. भू. द्या. घ्या.)
Eating , sleep , fear and sexual instict are common to both human beings & animals . It is Dharma which seperates teh two because without Dharma the human being is same as the animal
27 Apr 2011 - 4:33 pm | विटेकर
बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट।
येथें वर्तावें चोखट। नीतिन्याये॥
शत वरूषें वय नेमिले।त्यांत बालपण नेणतां गेलें।
तारुण्य अवघे वेचलें । विषयांकडे ॥
वृद्धपणीं नाना रोग । भोगणे लागें कर्मभोग ।
आतां भगवंताचा योग । कोण बळें॥
लोक मरोंमरो जाती। वडिलें गेली हे प्रचिती ।
जाणत जाणत निश्चिती । काय मानिलें ॥
अन्न गृहांसी लागला । आणि सावकास निजेला।
तो कैसा म्हणांवा भला । आत्महत्यारा ॥
तरी आतां ऐसें न करावें।बहुत विवेके वर्तांवे ।
इह लोक परत्र साधावें । दोहींकडे ॥
परमार्थ जन्माचे सार्थक । परमार्थ संसारी तारक ।
परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकांसी ॥
परमार्थ तो राज्यधारी । परमार्थं नाही तो भिकारी।
या पर्मार्थाची सरी। कोणास द्यावी॥
अनंत जन्मीचे पुण्य जोडे । तरी च परमार्थ घडे।
मुख्य परमार्थ आतुडे। अनुभवासी॥
जेणें परमार्थ वोळखिला। तेणें जन्म सार्थक केला।
येर तो पापी जन्मला।कुलक्शयाकारणें॥
भल्याने परमार्थी भरावें । शरीर सार्थक करावें।
पूर्वजांसी उद्धरावें। हरिभक्ती करुनी॥
धन्य धन्य हा नरदेहो।येथील अपूर्वता पाहो।
जो जो कीजे परमार्थालाहो। तो तो पावें सिद्धितें॥
या नरदेहाचेनि लागवेगे । येक लागले भक्तिसंगे।
येकी परम वीतरागें । गिरिकंदरे सेविली ॥
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटलें ॥
या नरदेहाचेनि संमंधे । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥
पशुदेही नाहीं गती। ऐसें सर्वत्र बोलती।
म्हणौन नरदेहीं च प्राप्ती । परलोकाची॥
तत्वग्यानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी ।
षट दर्शनी तापसी । नरदेहींच जालें॥
म्हणौन नरदेह श्रेष्ठ । नाना देहां मध्ये वरिष्ठ ।
जयाचेनी चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥
जय जय रघुवीर समर्थ !
27 Apr 2011 - 5:04 pm | sagarparadkar
मी चुकून "नरदेह सांपडे चावट।" असेच वाचले :)
बाय द वे हे 'अवचट' कोण? :) :) :)
अवांतरः टारूभाऊंनी एक भलतंच लचांड लावून दिलंय सर्वांच्या डोक्याला .... मधेच कुठे एकदम वाट भरकटला कोणास ठाऊक
30 Apr 2011 - 1:47 pm | सुधीर१३७
असतील हो कोणी तरी तुमच्यासारखे खवचट .. कशाला उगा नस्त्या उठाठेवी.... :wink:
(sagarparadkar, ह.घ्या.)
...
अवांतरः टारूभाऊंनी एक भलतंच लचांड लावून दिलंय सर्वांच्या डोक्याला .... मधेच कुठे एकदम वाट भरकटला कोणास ठाऊक
.... नाही हो, टारुभाउचे नेहमी भरकटणारे तारु आता जरा नीट चालायला लागलय... :)
27 Apr 2011 - 5:11 pm | प्रकाश घाटपांडे
मरत नाई तव्हर मानुस जगतोय तस आमी बी जगतोय. जव्हा कव्हा मरनार तव्हा जगन संपलेल असनार!
आन आस हाय कि मरन हाय म्हनुन जगन्याला किंमत हाय! नाय त कोन ईचारतो जगन्याला?
27 Apr 2011 - 6:07 pm | पंगा
'आपण का जगतो' हा प्रश्न सोडून देऊन 'च्यायचे हे बाकीचे का जगून राहिलेत' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात लक्ष घालावे.
मूळ प्रश्न सोडून दिल्याने सुटणार नाही, परंतु उपप्रश्नाने त्याची दाहकता (असल्यास) कमी होण्याची शक्यता आहे, एवढेच.
27 Apr 2011 - 7:03 pm | निनाद मुक्काम प...
अनेक तत्वज्ञ असे म्हणतात की ''खाणे ,पिणे ,निद्रा ,मैथुन ह्या क्रिया करण्यासाठी मानवाने जगणे म्हणजे जनावरासारखे जगणे ''
( थोडक्यात माणूस म्हणून जीवन सार्थकी लावण्यासाठी .........)
त्यांचा आदर राखून मला असे विचारावेसे वाटते की निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या जगण्यासाठी त्यांचा कोणता न कोणता अवयव विकसित केला आहे .
वाघ किंवा सिंह ह्यांचे नखे व सुळे विकसित तर वटवाघूळ अंधारात पाहू शकते किंवा अशी अनेक अनेक उदाहरणे .आहेत .
मानवाला निसर्गाने विकसित मेंदू दिला आहे .( म्हणून मानवाने स्वतः इतर प्राण्यापेक्षा विकसित समजावे का ?)
गाय ही देवता मानायची व तिच्या पाडसाच्या वाट्याचे दुध स्वतः प्यायचे. तिच्या नवर्याला देव न मानता राबवायचे. व एक दिवस पोळा साजरा करायचा. किंवा जगातील सर्वोत्तम शिकारी जमात असलेल्या कुत्र्याला पाळीव बनवायचे. किंवा ह्या वसुंधरेचा उपभोग घेतांना इतर वन्यजीवांना प्राणी संग्रालयात ठेवायचे. जणू काही मुक्त जगण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे .
पुष्कळ वेळा'' अरे जनावरासारखा का वागतो''. असे विधान करून जनावरे वागतात ते नीच प्रतीच व आपण मानव असल्याने आपले जीवन उच्च प्रतीचे असा दुजाभाव का ?
आपणच निर्माण केलेली मुल्ये व आदर्श जपायची . रूढी ,परंपरा आपणच जपायची व त्यासाठी भले कोणत्याही ठरला जावे लागले तरी बेहत्तर. .निसर्गातील आदी शक्तीस विविध नावाने संबोधीत करायचे .व त्यावर काही समूह एकट्याचा मालकी हक्क सांगून आपापसात राडा घालायचा .देव ,खुदा , असे विविध नावाने ह्या निसर्गातील शक्तीला संबोधिले. की मग त्यांच्या नावावर मानव अनेक गोष्टी आपल्या समूहावर लादतो. .व सोवळ्यात मला कुणी शिवेल ही भीती बाळगत देवपूजा करतो. ह्यात भक्ती पेक्षा भीती अधिक असते .असे हे भक्ती कम भीतीयुक्त जीवन काय कामाचे .( आपल्या खाण्यात लसूण आहे का अभक्ष ) आहे हे हॉटेलात जाऊन वेटर ला विचारणारे पहिले की वाटते ''अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म ''जे समोर आहे ते खा की गुपचूप .)
नीती मूल्यांच्या संकल्पना ह्या स्थळ व कालपरत्वे बदलतात .हे सत्य माहीत असून देखील .आमच्याच कल्पना खर्या असे मानून इतरांना कमी लेखायचे .
मला एक कळत नाही ,मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे ( होमो सेपियन ) त्याला निसर्गाने ही धरती आंदण दिली नाही आहे .तेव्हा
एखादा माणूस हा इतर प्राण्यासारखे खाणे पिणे व इतर गोष्टींसाठी जगला तर त्यात काय वावगे आहे .?
आज अनेक वर्ष डायनासोर हे ह्या धरणीचे सम्राट होते .माझ्या मते निसर्गाने दिलेल्या शक्तीच्या आधारावर ते आपले एक युग निर्माण करू शकले .पण त्यांना सुद्धा आपला बाडबिस्तरा येथून गुंडाळायला लागला .
आज माणूस खर्या अर्थाने आपले स्वामित्व ह्या धरतीवर आपल्या विकसित मेंदूच्या जोरावर १५ ते २० हजार वर आधी निर्माण केले .( ५ हजार पुढे मागे असतील )
करोडो वर्षाच्या ह्या धरतीवर मुळात होमो सेपियन हे काही लाख वर्षाआधी आले .मग कशाला उगाच प्रगत असल्याची शेखी मिरवायची .
आज इतर ताऱ्यांचे काही प्रकाश वर्ष हे अंतर मानवासाठी त्यांच्या प्रगतीची मर्यादा स्पष्ट करतात .तेव्हा उगाच मोठा आव न आणता आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगावे असे मला वाटते ..आयुष्य जगण्याचे विविध उद्दिष्टे असणारी
काही प्रातिनिधिक उदाहरणे
प्रकाश आमटे ( आदिवासी लोकांच्या कल्याणसाठी ,समाज सेवेसाठी )
बिल गेट व मुकेश अंबानी ( ह्यांना पैसा खर्च करण्यापेक्षा कमवण्यात जास्त रस असतो .)
विजय माल्या ( ह्यांना कमवण्यात व योग्य ठिकाणी गमावण्यात जास्त रस असतो )
तमाम भारतीय राजकारणी ( ह्यांना पैशापेक्षा सत्ता व तिचे अमर्याधीत अधिकार उपभोग्यात जास्त रस असतो )
अनेक आजी माजी महात्मे व बुवा ( ह्यांना व्यक्ती पूजा करून घेण्यात व स्वतःचे विचार ,आचार ,मानसिकता लोकांच्या गळी उतरवण्यात जास्त रस असतो .)
लता ,आशा .सचिन ( हे आपल्या छंदाचे व आवडीचे रुपांतर आपल्या व्यवसायात करतात त्यामुळे कर्म वादास जागून हे आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असतात .)
सावरकर ,भगतसिंग ( ह्यांचे जीवन उद्देश म्हणजे जो माय भूमीसाठी जगणे व मरणे)
अत्रे , चार्ली ,भाई ( हसवणे हा ह्यांचा धंदा व हसवण्यातून समाजातील व्यंगांवर नेमेके बोट ठेवून समाजप्रबोधन करणे हा जोड धंदा )
थोडक्यात काय तर प्रत्येक माणसाचे जगण्याचे उद्देश वेगवेगळे असतात .
आमचा एक मित्र ह्या साठी जगतो .
तर मी स्वतः जगतो ते आयुष्याच्या शेवटी आपल्या पोरांना सांगायला की '' हमने दुनिया देखी हे ''
भटकंती करणे त्यामागील उद्देश जगभरातील खाद्य ,पेय संस्कृती ,.
जगातील विविध भागातील प्रदेश ,निसर्ग , तेथील माणसे त्यांची संस्कृती, .त्यांची मानसिकता जवळून पहाणे ..अर्थात रमेश मंत्री करतात तसा मनाजोगता प्रवास करावा . हे माझे जगण्याचे सबळ कारण आहे .
28 Apr 2011 - 1:57 am | सुधीर
माझा मते, मी का जगतोय? ह्याच कालखंडात, ह्याच भौगोलिक परिस्थितीत (टाइम & स्पेस) का जगतोय? वा अशा इतर अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणं, चित्त स्थिरावणं, कर्माची जाणीव होणं, सुख-दु:खातलं अंतर कमी होणं आणि मोक्षाचा मार्ग कळणं ह्या सगळ्यांची एक साखळी असावी. आयुष्य हा प्रवास (ट्रेक?) मानला, तर प्रवासात ह्या पहिल्या टप्प्याच्या मुक्कामा पर्यंत पोहोचणं प्रथम गरजेचं आहे. भक्तीयोग, कर्मयोग, नि:स्वार्थी प्रेम (वा इतर मार्ग) आपल्याला ह्या टप्प्यापर्यंत घेऊन येतात (बहुदा अतीव दु:ख, निराशा ह्या नंतरच). पुढचा मार्ग/टप्पा नक्कीच सोपा नसावा. पण मार्ग कळणं हेही नसे थोडकं!
28 Apr 2011 - 2:05 am | सांजसखी
माझ्या मते जीवन जगणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यासोबत वाहणारा काळ व्यतीत करत जाणे.... बाकी सारा येणा-या जाणा-या श्वासांचा कचरा... जो घेणं वा सोडणं आपल्या हातात नाहीये..
28 Apr 2011 - 10:56 am | kamalakant samant
मला असे वाटते की,
आपण केवळ आन॑द मिळविण्यासाठी जगतो.
लहानपणचे म्हणजे जेव्हा काही कळत नसते,ते॑व्हाचे जाउद्यात,पण
कळायला लागल्यावर आपल्या बहुता॑शी क्रुती या आन॑द मिळविण्यासाठीच असतात असे वाटते.
मग ती कुठलिही गोष्ट असो.अगदी सिगारेट जरी ओढली तरी ती काहितरी आन॑द
मिळविण्यासाठीच ओढतो.
आम्हाला जे भासते,दिसते त्यापासून इ॑द्रिया॑द्वारा आन॑द घेण्याचा प्रयत्न करत असतो.आणि
त्यापासून आन॑द घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच जगत असतो.अर्थातच त्यातील द्रुष्य गोष्टि॑च्या
नियमानुसार त्याबरोबर आन॑द व दु:ख दोन्ही येणार्.पण स्वभावत: माणसाला आन॑द हवा असल्याने
पुन्हा तशाच दुसरया गोष्टि॑कडे तो वळतो व आन॑द मिळविण्याचा प्रयत्न करतो.
थोडक्यात आन॑ददायी(क्षणिक का होइना) असले पाहिजे म्हणून तर आपण जगतो.
28 Apr 2011 - 5:02 pm | शरभ
टार्झनराव,
तुम्हि age of empires खेळला आहत का ? नसाल तर एक्दा खेळुन बघा..... त्यामधे आपण माणस तयार करतो आणि त्याना काहि काम देतो....साधरण मरेपयण्त ते ती करत राह्तात.... for a moment, विचार करा कि तुम्हि त्यात्ले आहात...मग स्वताला विचारा का जगताय ? उत्तर मिळालेल असेल कदाचित.....
29 Apr 2011 - 10:19 am | विटेकर
पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.
त्याचंच हे उत्तर -
१० जुलै १९५७,
प्रिय चंदू
रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम
प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्याला
बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर
लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक
दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले
आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून
गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का?
वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही
लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले.
आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या
सहाय्याने विचार करणार आहे.
तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या
लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण
आहेस? कुठून आला आहेस?
पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा
प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं
उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला
आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या
पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान
प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो.
तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर
त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं
तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि
अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.
पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा
अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण
निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
तू तुझ्या पत्रात अखिल जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस.
बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच
तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती
सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही.
आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं
कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही?
तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी
आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण
करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी
होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली
नाही.
तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही.
सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य
बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय
तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन
पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे!
तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज
सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा
अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य
लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे
विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री
आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं
असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत
असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा
मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी
बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं?
चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या
प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता
येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं
काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं
आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे
काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच
ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं.
कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ
आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो.
जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते.
आणि मग जीवनाला अर्थ येतो.
हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी
सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं
मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते
देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते
करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे.
तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी
म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता
दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही
घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी
वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस.
वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा.
वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो.
क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही
ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.
तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की –
डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि
माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय?
त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या
कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत
असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत
हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात
ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत
असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती
स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.
तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही
साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.
My dear boy, whose deaths are justifiable?
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील
अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या
आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि
हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं
जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं
सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण
की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत
नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.
तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
भाई
29 Apr 2011 - 10:46 am | llपुण्याचे पेशवेll
छान पत्र आहे. आधी वाचलेलं होतं. पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. धन्यवाद. पुण्यात वसेकर नावाचे एक गृहस्थ ह्याच पत्राचा आधार घेऊन "मी आणि पुलंचा चष्मा" अशा नावाचा एक कार्यक्रम सादर करतात. त्यात हे पत्र सगळ्यात पहील्यांदा ऐकलं होतं.
29 Apr 2011 - 10:53 am | किसन शिंदे
पुलंच हे पत्र आधी एकदा वाचलं होतं...परत एकदा वाचलं.
वाचल्यानंतर हे सर्वात जास्त लक्षात राहतं..
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा
मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी
बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं?
चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या
प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता
येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं
काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं
आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे.
ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं
जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
29 Apr 2011 - 1:13 pm | यशोधरा
खूप सुरेख पत्र. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
30 Apr 2011 - 9:32 am | रामदास
सहमत.
29 Apr 2011 - 11:52 am | विजुभाऊ
मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही.
कायम कायम चूर्णाचा संग्रह आणी वापर कर . सवय बंद होईल
दिलसे उत्तर :- टार्या कधीतरी पुलंच्या अपूर्वाइतील काही ओळी वाच
" गड्या तू वंशाचा दिवा नसून दुवा आहेस........"
त्या उतार्यात त्यानी संस्कार म्हणजे काय या बद्दल मार्मीक टीप्पणी दिली आहे.
पुलंचेच " एक नापास आजोबा" वाच इतरांचे ठाऊक नाही. लोक जगावे कसे या बद्दल बोलतात. पुलनी जगावे कशासाठी या बद्दल गूज लिहीलय
त्यांचे विचार या इथे वाच
http://www.puladeshpande.net/jskj.php
29 Apr 2011 - 10:16 pm | पंगा
हे कुठे मिळते हो आजकाल?
याची वरिजनल कापी (दरवर्षीच्या प्रथेस अनुसरून) कुठल्याश्या सालच्या 'कालनिर्णय'च्या जानेवारीच्या पानामागे (ज्योतिर्भास्कर साळगांवकरांच्या राशिभविष्या(च्या कॉलमा)स खेटून) वाचल्याचे आठवते.
हल्ली त्याची स्वतंत्र कापी मिळू लागली आहे काय?
29 Apr 2011 - 10:39 pm | सुधीर१३७
| पुलंचेच " एक नापास आजोबा" वाच
हे कुठे मिळते हो आजकाल?>>>>>>>>>>>
>>>>>> मिळते ना विजुभाऊंकडे.................. :wink:
30 Apr 2011 - 9:42 am | रामदास
सहमत.
29 Apr 2011 - 3:05 pm | डावखुरा
१)आयुष्यात मला भावलेल एक गुज सांगतो......
"उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण घ्या.
पोटपाण्याचा उद्योग जिद्दीन करा.
पण त्या बरोबरच....
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ
ह्यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा.
पोटपाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील;
पण कलेशी जड़लेली मैत्री तुम्हाला
तुम्ही का जगायच? हे सांगुन जाईल......!"
- पु. ल.
२)रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
३)मी कोण?
मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा
29 Apr 2011 - 10:34 pm | बन्या बापु
अस्तित्वाच्या अंधारातुन प्रकाशाकडे जाण्याची वाट मिळत नाही म्हणुन जगतो आहे..
मरणाचे भय नाही, पण जीवनासक्ति संपत नाही म्हणुन जगतो आहे..
एक दिवस हा वाहता प्रवाह ( नाला म्हणणे योग्य ठरेल ) अनंतात विलिन होईल कदाचित.. तोवर वहात रहायचं म्हणुन जगतो आहे..
30 Apr 2011 - 9:47 am | रामदास
अभिनंदन.
30 Apr 2011 - 12:34 pm | राही
मानवजात ही निसर्गाचाच एक भाग आहे. 'मी','आपण' अशी वर्तुळे शब्दांभोवती आखली की आपण आसमंतापासून वेगळे पडतो.वैश्विक निसर्ग कसा आहे,तो स्थितीशील म्हणजे स्टेटस को' राखणारा आहे का किंवा स्टेडी स्टेट मधे असतो का अथवा एवर एक्स्पांडिंग असतो,यावर मतमतांतरे आहेत. पृथ्वीपुरते पाहू गेल्यास प्रॉपगेशन्,वंशवृद्धी-वंशसातत्य हेच चरसृष्टीचे कार्य आणि कारण दिसते. स्थूलमानाने आपल्यासारखीच एक प्रतिकृती निर्माण करणे आणि त्यात सूक्ष्म रूपात हळूहळू (जरूरीनुसार) बदल घडवणे हा निसर्गाचा स्थायीभाव दिसतो. मानव हाही निसर्गाचा भाग असल्यामुळे त्याचेही इतिकर्तव्य तेच आहे. केवळ इतर प्राण्यांपेक्षा (थोडीशी) वेगळी बुद्धी (तीही निसर्गाकडूनच) मिळाली म्हणजे आपण कोणी खास,विशेष आहोत,आपले स्पेशिअल दायित्व आहे असे नव्हे.
30 Apr 2011 - 2:02 pm | सुधीर१३७
जन्माला येणे हातात नव्हते, जन्माला आलो आहे, मरण येत नाही, आत्महत्येचा प्रयत्न करणे (महापाप) गुन्हा (भा.दं.वि. कलम ३०९) आहे, सबब जीवन चालले आहे, जगतो आहे, झालं; पण या जगण्यात काय राम नाय बॉ...... :(
त्यात या नको त्या प्रश्नांची भर कशाला घाला, आधीच काय कमी ताप आहेत काय डोक्याला .... :wink:
अवांतर : टारझन नाबाद १०६..... :)
5 May 2011 - 12:15 pm | ब्रिटिश टिंग्या
अंमळ थंड गोळी घ्या!