जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in काथ्याकूट
27 Feb 2011 - 8:28 pm
गाभा: 

आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते?

सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी "मराठी" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल? पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून!

सर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही? आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात? त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही?

इंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल? लहान मुलाला झोपताना "निंबोणीच्या झाडामागे" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची "कणा" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची "श्रावणमासी, हर्ष मानसी" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही?

पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.

१) मराठीचा वापर करा. पण कुठे? शक्य असेल तिथे तिथे! दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.

२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.

३) मराठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणा-या नि वर त्याचे समर्थन करणा-यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता? इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का?

४) अमराठी सहका-यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.

चला तर मग! भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया!

टीपः सदर लेख माझी जालनिशी http://arbhataanichillar.blogspot.com येथेही प्रकाशित करतो आहे. वास्तविक एकच लेख चार ठिकाणी प्रकाशित करणे योग्य नव्हे आणि तसे करणे काही संकेतस्थळांच्या नियमाविरुद्धही आहे हे मी जाणतो. परंतु या लेखाचा विषय पाहून (तो अनेकांपर्यंत पोचणे आवश्यक असल्याने) त्याला अपवाद करावा ही या संकेतस्थळाच्या चालकांना नम्र विनंती.

प्रतिक्रिया

मराठीच्या उत्कर्षासाठी जितके शक्य होतील तितके उपक्रम राबवा. शालैय शिक्षण, वर्तमानपत्रातील मराठी, कोषागारातील मराठी, रस्त्यावरची मराठी येथे मराठीचा वापर करा, आग्रह धरा आणि मुख्य म्हणजे धीर ठेवा.

शुचि's picture

27 Feb 2011 - 10:01 pm | शुचि

:(

चिरोटा's picture

28 Feb 2011 - 10:03 am | चिरोटा

आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल

विश्वास बसायला कठिण पण ईतर भाषिक सम्मेलनांमध्ये मराठीचे उदाहरण दिले जातेय्.म्हणजे महाराष्ट्रात शासकीय स्तरांवर जसा मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय तसा ईतर राज्यांमध्येही त्या त्या भाषांचा आग्रह धरला जावा अशी मागणी जोर धरत आहे.

सहज's picture

28 Feb 2011 - 10:09 am | सहज

भावना पोचल्या पण मी तरी फार निराश नाही.

शेकडो वर्षांपुर्वी काही मराठी लोक तंजावूर भागात स्थलांतरीत झाले. त्यांच्याकडे आजही एक विशिष्ट मराठी थोडीफार आहेच. ती तंजावूर मराठी ब्लॉग द्वारे जालावरदेखील आली आहे.

येथे पहा.

५० फक्त's picture

28 Feb 2011 - 10:26 am | ५० फक्त

लेख वाचायला ठिक आहे, पण प्रत्यक्ष परिस्थिती एवढी वाईट नाही. कलंत्रि यांचा प्रतिसाद अतिशय आवडला.

मी असा एक उपक्रम सुरु करत आहे, दोन तिन दिवसात इथे माहिती टाकतो आहे त्याची, आणि कलंत्री म्हणतात तसा थोडा धीर धरा.

एक_वात्रट's picture

28 Feb 2011 - 12:18 pm | एक_वात्रट

आपल्या उपक्रमाबाबत उत्सुकता आहे, त्याला माझ्या शुभेच्छा!

विसुनाना's picture

28 Feb 2011 - 11:03 am | विसुनाना

लेखातील सर्व मतांशी सहमत.
विशेषतः मुद्दा क्र. ३ शी अत्यंत सहमत.मराठीचा र्‍हास पहावत नाही.
चर्चेचा दर्जा घसरवत आहे. माफ करा. पण -
'माझ्या मोलकरणीला उकडत आहे' हे वाक्य मुंबैय्या मराठीत-
'माझ्या कामवालीला गरमी होते आहे' असे बोलले जाते.
यात कुणाला काहीही गैर वाटत नाही काय? :(
एकवेळ मराठीत बोलू नका पण 'अशा' मराठीत तर मुळीच बोलू नका.

sagarparadkar's picture

28 Feb 2011 - 7:59 pm | sagarparadkar

हेच उदाहरण बरं सापडलं आपल्याला .... अनुचित मराठी बोलीचं वर्णन करायला ... :) :) :)

बाकी मुंबईचं हिन्दी तरी कुठे फार छान आहे? उलट तिथे अशा भाषाशुद्धीचा आग्रह करणार्‍यांची टवाळीच केली जाते.... पुण्याहून आलात का म्हणून ... आणि अशी टवाळी करणार्‍यांत आपले मराठी भाषिकच जास्त पुढे दिसतात ...

अगदी स्वानुभवावरूनच सांगतो आहे.

वपाडाव's picture

28 Feb 2011 - 11:29 am | वपाडाव

(मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.)

बाकी मुद्यांशी बर्याच अंशी सहमत.
पण रुळायला/आचरणात आणायला वेळ लागेल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2011 - 12:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इथे पुलंचा सल्ला आठवला जो त्यांनी न्यु जर्सी ला आपल्या भाषणात अमेरीकेत स्थाईक झालेल्या मराठी कुटुंबांना दिला होता,

"नव्या पिढीशी (योग्य) मराठीत बोलत रहा. त्यांच्या कानावर सतत मराठी पडेल याची काळजी घ्या. आणि मुख्य म्हणजे त्यांना जमेल तितकी चांगली मराठी गाणि शिकवा. गाणं चिरंतन असते."

आता हेच करण्याची गरज महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमधे निर्माण झाली आहे.

एक_वात्रट's picture

28 Feb 2011 - 12:16 pm | एक_वात्रट

गाणे चिरंतन असते! लहान मुलांना कविता शिकवणे हा मराठीची ओळख करून देण्याचा एक चांगला मार्ग आहे.

भावनांशी सहमत परंतु लेखातील काही विचारांशी असहमत.

एक_वात्रट's picture

28 Feb 2011 - 12:19 pm | एक_वात्रट

प्रतिक्रियेबद्दल सा-यांचे आभार!

अविनाशकुलकर्णी's picture

28 Feb 2011 - 1:03 pm | अविनाशकुलकर्णी

२७ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होत आहे.
या दिवसा विषयी काही माहिती मिळेल का ?
हा दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरवात झाली ?
हि कल्पना कोणाची ? ( साहित्य संस्था /महामंडळ /व्यक्ती )
मराठीत अनेक साहित्यिक असून कुसुमाग्रज उर्फ वी वा शिरवाडकर यांच्याच जन्मदिनी हा दिवस साजरा करण्यामागे कारण काय ?

असे बरेच प्रष्ण उपस्थित केले गेले आहेत.....
मूठभरांनी ठरवायचे अन बहुजनानी किति दिवस ऐकायचे असाहि एक सुर आहे...
धागा कर्त्याचे विचार ऐकायला आवडतील...

चावटमेला's picture

28 Feb 2011 - 1:15 pm | चावटमेला

लेख आवडला, पण वात्रटराव, इतके निराश व्हायचे काहीच कारण नाही, अहो शेकडो वर्षांपासून अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपली समृद्ध भाषा अशी अस्तंगत होणे नाही. मिपासारख्या संस्थळांच्या माध्यमातून मायमराठीचा झेंडा सातासमुद्रापारही दिमाखात फडकविणारे अनेक इथे आहेत. जोपर्यंत मराठीवर प्रेम करणारे तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत, तोपर्यंत काळजी इल्ले :)

धमाल मुलगा's picture

28 Feb 2011 - 9:48 pm | धमाल मुलगा

नाही हो साहेब!

वाटतंय तितकी वाईट अवस्था नाहीये मराठीची. गावागावांमध्ये अजुनही मराठीतच कौतुकं होतात, शिव्याही मराठीतच कोसळतात अगदी तुम्ही म्हणता तसं फोनचा लंबरही मराठीतच देतात.

आता 'श्येरात' राहून नसत्या खुळचट कल्पना जोपासून मराठीपासून काहीजणांनी फारकत घेतली म्हणून काय सगळंच तसं झालं का? ह्यॅ:! सोडा वो...सोडून सोडा की वो! :)

शिवाय, हल्ली जी जागरुकता निर्माण झाली आहे त्यामुळं बरेचजणं समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडताना दिसतात. 'इथं राहून धंदा करतो तो आमच्याच जीवावर ना? मग आमची भाषा समजून घे' असं ठणकावून सांगणारी डोकी कमी नाहीत..हल्ली बरेच तयार झाले आहेत.

साधी गम्मत सांगतो, बँकांचे, मोबाईल कंपन्यांचे, विमा कंपन्यांचे येणारे फोनही आजकाल हिंदीत/इंग्रजीत चालू झाले तर त्यांना ठणकवणारे बरेच दिसायला लागले आहेत. :)

अहो, मराठी अगतिक झाली वगैरे गेल्या कित्येक साहित्य संमेलनांमध्ये चर्चेल येत राहिलंय...अजुनतरी मराठी टिकून आहे. काही धाड भरत नाही. चिंताच सोडा वो. :)

शिवाय, दोन पिढ्या मराठीसाठी लढणारे असे खंदे वीर जोवर आहेत तोवर मराठीसाठी गळे काढायची गरजच न यावी असं माझं आपलं मत बुवा. :)

यनावाला's picture

28 Feb 2011 - 10:17 pm | यनावाला

श्री.एक_वात्रट यांनी माडलेल्या विचारांशी मी सहमत आहे.त्यांची या विषयासंबंधीची कळकळ मनःपूर्वक आहे हे लेख वाचतानाच प्रतीत होते.कांही सदस्यांच्या मते मराठी भाषेची परिस्थिती ए._वा. यांनी वर्णन केले आहे तेवढी दयनीय नसेल.त्याविषयी मतभेद असू शकतील पण मराठीच्या संवर्धनासाठी त्यांनी जे चार उपाय सुचवले आहेत त्यांविषयीं दुमत नसावे.आपल्यातील प्रत्येकाने त्या उपायांतील शक्य होईल तितके जाणीवपूर्वक आणि निष्ठेने करावे.न विसरता करावे.त्याने थोडा का असेना सुपरिणाम हो ऊ शकेल.
..
पण माझ्या मते खरा कळीचा बिंदू(मुद्दा) आहे मराठी माध्यमाच्या शाळा. कारण पुढच्या पिढ्याच मराठी टिकवू शकतात. या संदर्भात मात्र पुष्कळ विलंब झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे वाटते.मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा नाहीतच.इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण ग्रामीण भागा पर्यंत पोहोचले आहे.पालकांची मानसिकता बदलणे बिकट वाटते. इथे आशेचा किरण दिसतच नाही.
तरी सुद्धा आपल्या हातून होईल ते प्रत्येक मराठी माणसाने करायलाच हवे.

कलंत्री's picture

1 Mar 2011 - 8:10 pm | कलंत्री

शाळेच्या बाबतीतला आपला मुद्दा अगदी योग्य आहे, पण मला असे ठामपणाने वाटते कि कधीतरी हे दिवस पण पालटतील.

आशावादी( कलंत्री)

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 2:54 am | बेसनलाडू

मराठीची आजची स्थिती लेखात म्हटल्याप्रमाणे अगदीच कामातून गेल्यागत झालेली नसली तरी काळजीयुक्त आणि जर भयावह नक्कीच आहे. लेखात सांगितलेले मराठीच्या संवर्धनाचे आणि प्रसाराचे मार्ग सोपे आणि स्तुत्य आहेत. मराठी बोलत, वाचत, ऐकत नि ऐकवत राहणे पण त्याच वेळी दुर्लभ मराठी शब्दांच्या वापराच्या अट्टाहासातून, बिगरमराठी शब्दांना सामावून न घेऊन वगैरे तिची लवचिकता कमी होऊ न देणे महत्त्वाचे आहे.
(मराठी)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

1 Mar 2011 - 10:23 am | विजुभाऊ

सर्वात अगोदर हिंदीची चाटणे बंद करा. आपण चार जण मराठी असाल आणि एखादा हिंदी भाषीक असेल तर आवर्जून मराठीतच बोला. हिंदी वाल्याला मराठीची आपोआप सवय होईल

चिरोटा's picture

1 Mar 2011 - 10:49 am | चिरोटा

पण एक मराठी असेल आणि ४ तेलुगु असतील तर त्या चौघांनी तेलुगुत बोलले तर चालेल का? की तेव्हा त्यांना हिंदीद्वेष्टे म्हणायचे?

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Mar 2011 - 4:04 pm | llपुण्याचे पेशवेll

तेव्हा इंग्लिशमधे बोलायचे. किंवा ते लोक न सांगताही तसंच करतात.
असो.
बाकी, विजुभाऊंशी सहमत आहे.

छोटा डॉन's picture

1 Mar 2011 - 4:27 pm | छोटा डॉन

जर समुहाची भाषा कॉमन आणि मुख्य म्हणजे कुणाचीही मातृभाषा नसेल तर 'इंग्रजी' हा उत्तम पर्याय असु शकतो.
आपल्या इथे 'हिंदी' लोकांची संख्या जास्त आहे हा त्याच्या 'गुण' नव्हे हे लक्षात ठेवले तरी उत्तम.

बाकी 'हिंदी' ला तसा विरोध असायचे कारण नाही मात्र उगाच ती 'एकमेव' राष्ट्रभाषा असल्याचा जो अनाठायी प्रचार आणि आग्रह चालु आहे ते पाहुन आपणही त्याला आग्रहानेच 'विरोध' करावा असे वाटते.

बाकी ज्या ठिकाणी जात तिथली 'स्थानिक भाषा' थोडी तरी शिकायली हवी असे म्हणतो, हे दक्षिणेतही लागु आहे आणि तितकेच ते महाराष्ट्रात असावे. समजा उत्तरेत ( स्पेसिफिकली मध्य / उत्तर प्रदेश अथवा कोणतेही हिंदी भाषिक राज्य ) असेल तर तेथे हिंदी बोलण्यास हरकत नसावे.
मात्र महाराष्ट्रात, तमिळनाडु आणि बंगालमध्ये हा 'हिंदी'चा आग्रह का ?
पर्याय 'इंग्रजी' असु शकतो.

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 5:15 pm | धमाल मुलगा

मात्र उगाच ती 'एकमेव' राष्ट्रभाषा असल्याचा जो अनाठायी प्रचार आणि आग्रह चालु आहे ते पाहुन आपणही त्याला आग्रहानेच 'विरोध' करावा असे वाटते.

अगदी सहमत.
जे कोणी असं राष्ट्रभाषा वगैरे बोंबलला तर त्याला "official language act" चा पुरावा मागावा. विषय संपतो.

छोटा डॉन's picture

1 Mar 2011 - 5:26 pm | छोटा डॉन

ज्या काही सेवा पुरवणार्‍या संस्था ( उदा : बँका, मोबाईल कंपन्या, मल्टिचेन हॉटेल्स ( मॅक्डी, पिझ्झा हट, कॉफी डे ), इन्श्युरन्स कंपन्या आणि इतर ) आहेत तिथे 'आवर्जुन' मराठीमध्ये सेवा मागावी.
तशी मिळत नसेल तर शांतपणे आपला इथल्या स्थानिक राज्यभाषेत बोलण्याचा हक्क सांगुन त्यांची 'मराठी येत नसल्याची' कारणे अमान्य करुन सेवा नाकारावी.
आपली जागा न सोडता ह्याचा पाठपुरावा केला की झकत मराठीचा वापर अशा ठिकाणी दिसतो, अन्यथा सध्या उपरोक्त ठिकाणी 'मराठी बोलणे म्हणजे लाजिरवाणे आहे' अशी परिस्थिती दिसत आहे.

जे सेवापुरवठादार त्याला नकार देत असतील तर त्याला स्थानिक भाषा व्यवहारात वापरण्याचे महत्व आणि ते टाळल्यास होणारे संभाव्य दुष्परिणाम ह्यासंबंधी थोडक्यात 'नम्रपणे' सांगावे.
बहुतेकजण वठणीवर येतात असा अनुभव आहे.

- ( अनुभवी ) छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 6:53 pm | धमाल मुलगा

ह्यावर आपली एक चर्चा झाली होती आणि तुम्ही एका 'आयसीआयसीआय बँकेच्या' ग्राहकाकडे असलेलं बँकेचं माफीपत्र, जे 'महाराष्ट्रातल्या, पुणे शहरामध्ये असलेल्या शाखेत मराठी जाणणारा एकही कर्मचारी नाही त्यामुळे आलेल्या मराठी ग्राहकाची मराठीतून समस्यापुर्तीची मागणी पुर्ण करु शकत नसल्याचा उल्लेख करणारं आहे, ते इथे स्कॅन करुन सर्वांना दाखवण्याबद्दल बोलला होता त्याची आठवण झाली. :)

फक्त इथे ? असे काही असेल तर त्याच्या प्रती मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालय, वृत्तपत्रे, सर्व संबंधित अधिकारी, तसेच रिझर्व्ह बँक यांना पाठवल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या आईचीआईचीआई आठवली पाहिजे. त्याशिवाय हा मस्तवालपणा कमी होणार नाही.

ज्यांना हा प्रतिसाद वाचून "काय हे ! मराठी अस्मिता वाढली, आता सर्व जग संकटात !! हिटलरशाही कडे वाटचाल" असे डोहाळे लागतील त्यांनी जवळच्या केंद्रात जाऊन इलाज करावा !

पैसा's picture

1 Mar 2011 - 1:09 pm | पैसा

जोपर्यंत, मूल लहान असताना, तुम्ही त्याच्याशी मराठीतच बोलता, आणि ते मूल मोठं होताना, आणि एक प्रौढ व्यक्ति म्हणून विचार करताना मराठीतच विचार करतं; जोपर्यंत आई बाळाला झोपवताना मराठी अंगाई म्हणते, आणि झोपेतून अर्धवट जाग आल्यावर तुम्ही मराठीत बोलता, तोपर्यंत मराठीच्या अस्तित्वाला काही धोका नाही!

आता चांगली मराठी आपल्या मुलांपर्यंत कशी पोचवायची ते मात्र प्रत्येकाने विचारपूर्वक ठरवाव लागेल!

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 9:44 pm | नगरीनिरंजन

सहमत आहे. पण माझा एक मराठी मित्र आपल्या मुलीला झोपवताना "नथिंग कॅन चेंज माय लव्ह फॉर यू" हे गाणं म्हणताना ऐकून माझे डोळे पाणावले होते त्याची आठवण झाली.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 9:52 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
काय डोकंय त्या मित्राचं! व्वा!! :D

बाकी, "नथिंग'ज गॉना चेंज माय लव्ह फॉर यू" हे झोपवायला? आराराअरा.... ह्या गाण्यासोबत आम्हाला बॉलरुम ड्यान्सच्या आठवणींनी जीवाचं फुलपाखरु झाल्यागत होतं (ह्म्म...गेले..गेले ते दिन गेले... असो! ;) ) आणि ह्ये गाणं झोपवायला? झोपवायला? च्याम्मायला! :D

विंग्रजी गाण्यांत लव्ह आणी यु दिसलं रे दिसलं/ऐकलं रे ऐकलं की आम्हाला फक्त आणी फक्त यकच गाणं आठवतं ते म्हंजे,
"मार्क अँथनीकरांच- आय नीड यु , आय लव्ह यु"
कसे?

झोपवायला? च्याम्मायला!

ह्या गाण्यांचा उपयोग विरुद्ध क्रियेसाठी होतो, असं म्हणायचंय का तुला? ;-)

चांगली चर्चा आहे. मराठीबाबत येवढ्या लोकांना आस्था आहे हे वाचून बरं वाटलं.
पण जोपर्यंत मराठी शालेय शिक्षणाची आणि सरकारी व न्यायालयीन कारभाराची भाषा बनत नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येणं शक्य नाही. शालेय शिक्षणाविषयी बोंबच आहे. मराठी माध्यमांच्या शाळा दक्षीण मुंबईत जवळ जवळ संपल्यातच जमा आहेत. प्राथमिक शिक्षणात मराठी न शिकलेले पुढे राज्य व्यवहारात मराठीचा आग्रह धरणे कठीणच.
मराठी वरून राजकारण करणार्‍यांनी आपल्या मुलांना मराठीत शिकवले नाहीच आता नातवांना तरी शिकवावे. अर्धवट उबवलेली अंडी काय सर्वसामान्य लोकांनी उबवायची?
दुकानांच्या पाट्या बदलून मराठीला चांगले दिवस येणार नाहीत. किवा मराठी भाषा दिवसांचे भव्य सोहळे साजरे करूनही

दक्षिण मुंबईत मराठी शाळा चालू शकतीलच कश्या?तिथे मराठी लोकसंख्या नगण्य आहे. ती वाढण्याची शक्यता नाही कारण तिथले जागांचे भाव मराठी लोकांना परवडण्यासारखे नाहीत..आधी मराठी लोकांनी कफ परेड्,चर्च गेट,मलबार हिल,ग्रांट रोड,वांदरे ते अंधेरी (सर्व पूर्व-पश्चिम) किंबहुना मुळुंद ठाण्यापर्यंत घर घेण्याइतपत पैसा कमवावा,इतरांच्या नाकावर टिच्चून तिथे घर घ्यावे. नंतर सरकारनेच (हो. सरकारच. दुसरे कोण?) तिथे मराठी शाळा उघडाव्यात आणि एक फर्मान काढावे की जर या पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांत पाठवले नाही तर त्यांचा पासपोर्ट जप्त होईल. तरीही पालकांनी जुमानले नाही तर पोलिसांचे एक स्वतंत्र दल निर्माण करून या लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांना पुलीसवॅनमधे बसवून सुखेनैव मराठी शाळांत नेऊन सोडावे/आणावे.

दर्क्षीन मुंबय म्हनजे फक्त फोर्ट नाय. भायखला-मुंबई सेंटर पासूण कुलाब्य पर्यंत(आता पार्ला आनी घाटकोपर पर्यंत) दक्षीन मुबई आहे. इथे मराटी मानसांची संख्या नगन्य नाय. श्रीमंतांकडे काम करनारे सगळे मराटीच हायत पन त्यांची पोरंबी इग्रजी शालेत जातात.
शालेच्या इस्कूल बस ऐवजी पोलिस वॅनची सोय केली तरी मराटी मानसांची पोरां आता मराटी शालेत जानार नायत.
आता तर मराटी भाषेच्या आनी मराटी मानसांच्या न्याय्य हक्कासाटी लडनारा तरून पोरांचा बाळ शेणापती पन इंग्रजी माद्यमातच शिकलेला हाय.

जय हिंद ! जय महाराष्ट !

प्रकाटाआ.

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 7:49 pm | इन्द्र्राज पवार

"...मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. ...."

~ लेखातील अनेक मुद्द्याशी सहमती दर्शविताना वरील दोन बाबतीत मला वेगळे अनुभव आले आहेत. मुंबई-पुणेच काय पण राज्यातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आज भरलेल्या दिसत आहेत. शासनाच्या अनेक धोरणावर टीका करता येते (तो तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे मानणारेही भरपूर आहेतच...) पण गेल्या काही वर्षात राज्याच्या ग्रामीण भागात 'सर्व शिक्षण अभियान' तसेच 'मिड डे फूड' या सारख्या धोरणांची चांगली फळे दिसू लागली आहेत....हे मान्य करावे. आज दहावी आणि बारावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मराठी माध्यमाच्या परीक्षार्थींची विशाल संख्या पाहता, "मराठी शाळा ओस पडत आहेत...' हे विधान धार्ष्ट्याचे वाटते.

२. मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे..
कुणाचे? विद्यार्थ्यांचे म्हणत असाल तर, मग त्याला जबाबदार त्याचे पालकच आहेत ना? का समजू नये पालकांनी तीही आपली एक निकडीची जबाबदारी आहे? किती पालक मासिक खर्चामध्ये 'पुस्तक खरेदी' चा समावेश करतात? आठवड्याला मल्टीप्लेक्स व्हिजिटसाठी ५०० रुपये खर्च करणारी हजारो महाराष्ट्रप्रेमी मंडळी इथे आहेत, पण 'मराठी दिन' वा 'कुसुमाग्रज' यांच्या आठवणीप्रित्यर्थ किती मराठी प्रेमींनी "पुस्तक खरेदी' केली आहे? या प्रश्नाची स्वतःच प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत...मग पुस्तकांचे वाचन घटत "का" घटत आहे याचे उत्तर सापडेल.

पुस्तके वाचणारी वाचतातच.,...प्रसंगी खरेदी करूनही आपल्या परीने/क्षमतेने मराठी भाषेची जपणूक आपल्या घरी पुस्तकाच्या माध्यमातून कायम ठेवतात. प्रतिवर्षी तब्बल सुमारे ४२ कोटी रुपयांची उलाढाल मराठी पुस्तकांच्या बाजारपेठेत होत असते (यात क्रमिक पुस्तकांचा समावेश नाही). शिवाय हे आकडे साहित्य संमेलनाच्या अधिकृत पुस्तिकेतील असल्याने त्यात तथ्यांशही आहेच आहे. मग इतक्या प्रचंड रकमेंची पुस्तके वाचकवर्गासाठीच असणार हे उघड असल्याने 'वाचन घटत' आहे असे म्हणू नये.

३. फक्त एक मुद्दा आहे....तो म्हणजे 'मराठी' विषयाचे प्रेम विद्यार्थ्यांत वाढीस लागावे म्हणून तिची सरकारी जोखडातून मुक्तता करणे गरजेचे आहे. शालेय पुस्तकातील जडजंबाल भाषा वाचताना हे सतत जाणवते की, अशी वाक्यरचना वाचून कोणता विद्यार्थी धाडसाने म्हणेल की मी कायम मराठी भाषा हा विषय अभ्यासक्रमात निवडणार?

कालच इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिला 'मराठी' चा पेपर होता.....त्याची प्रश्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्यातील खालील प्रश्नाची रचना पाहा.

(ख) खालीलपैकी कोणतेही चार शब्द शब्दसिद्धीच्या उपसर्गघटित, प्रत्ययघटित व अभ्यस्त यापैके कोणत्या प्रकारात येतात ते लिहा.

इतकी क्लिष्टता ठेवल्यामुळेच ना विद्यार्थी ना पालक मराठी भाषेकडे 'सवंगडी' समजून पाहात नाही.

तरीही 'मराठी भाषे'च्या भविष्याविषयी 'अंधार' वाटण्यासारखी बिकट परिस्थिती नाही.

इन्द्रा

कलंत्री's picture

3 Mar 2011 - 10:27 pm | कलंत्री

इन्र्दा, आपल्या लेखाचे आणि प्रत्येक विचाराबद्दल धन्यवाद.

कुसुमाग्रजांची एक कविता आठवली, तुम्ही फक्त लढ म्हणा.

शेवटी कोणतीही लढाई ही विषम असणारच. दोन जनावरातील युध्दात आकारापेक्षा त्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची असते हे कसे विसरुन चालेल बरे?

इन्द्र्राज पवार's picture

4 Mar 2011 - 12:07 pm | इन्द्र्राज पवार

"....इच्छाशक्ती महत्त्वाची .....!"

~ हे सार फार महत्वाचे सांगितले तुम्ही श्री.कलंत्री.
साधी टाळी वाजवायची तर मनी प्रथम इच्छाशक्ती जागी होणे गरजेचे असते, अन् इथे तर संस्कृती जपण्याचा प्रश्न, ज्याची सुरुवात घरातूनच व्हावी असे प्रत्येक मराठी माणसाला वाटणे गरजेचे आहे.

सुमारे शंभर वर्षापूर्वी गंगाधर मोगरे नावाच्या कवीनी 'आर्या' तून मराठी ग्रंथकाराच एक प्रार्थना केली होती, त्यातील या सुरुवातीच्या ओळी पाहा :

"म्हणतात जे 'मराठी भाषा होणार ही असे नष्ट;
मिळणार काय करुनी व्यर्थ हिला वांचवावया कष्ट ?

त्यांना हेच पुसा की, 'मरणोन्मुख होय आपली माय,
म्हणुनी औषध कांही पुत्रीं देऊं नये तिला काय ?"

~~ विशेष म्हणजे कवि ज्या "औषधा"बद्दल लिहितात ते औषध आपल्याकडेच आहे.

इन्द्रा