गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे. ह्या पुस्तकातला एक मुद्दा म्हणजे "भारत हे एक राष्ट्र आहे का ?" हा मुद्दा फ़ारच मनाला भिडला. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. त्यातच "प्रादेशिक अस्मितेतुन" सुरु झालेली आंदोलने हा याचा उगम होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.
१५ ऒगस्ट १९४७ साली मध्यरात्री १२ वाजता निम्मे जग झोपले असताना पंडीत नेहरुंनी "नियतीशी एक वायदा" केला होता तो म्हणजे " भारत हे अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे एक महान राष्ट्र " बनवण्याचा. त्यासाठी त्यांच्यापासुन ते आत्तापर्यंत सत्ताधार्यांनी सच्च्या मनाने प्रयत्न केले असे जरी मानले तरी आजची परिस्थीती काही तरी वेगळेच सांगते आहे. मुळात एक लहान खंडा एवढा असणारा भारत हे "एक राष्ट्र" असणे ही संकल्पनाच अदभूत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व गुजरातपासून ते ईशान्यपुर्व मिझोरम, नागालॆंड पर्यंत पसरलेला, एकंदरीत २८ सरकारमान्य भाषा व अनऑफ़ीशीयली १६०० भाषा बोलणारा, हवामानात प्रचंड विवीधता असणारा व प्रचंड सास्कॄतीक व वैचारीक विविधता असलेला भारत हे गेल्या "६० वर्षे एक राष्ट्र" म्हणून टिकून आहे हेच एक आश्चर्य मानायला हरकत नाही. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा "ह्या राष्ट्राचा डोलारा" किती काळ टिकेल ह्याबद्दल अनेकांना शंका होती व ती भारतीय जनतेने खोटी करुन दाखवली हे भारतीय "एकात्मिकेचे" यश मानायला हरकत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी जीन दिकसनने भविष्य सांगितले "भारताचे विभाजन लवकरच अनेक राज्यात होईल व भारताचे अनेक तुकडे होतील". हेंन्री किसींजर म्हणाले " सध्या भारतात राहणाया पण मनात फ़ुटीर प्रवॄत्ती ह्या देशाचे विभाजन करतील". त्यानंतर खरोखरच भारताला ह्या कसोटीला सामोरे जावे लागले. सर्वात आधी सरदार पटेलांनी "संस्थान विलीनीकरण" राबवून, १९४८ च्या रणात भारतीय सेनेने काश्मीर वाचवून व १९६२ च्या युद्धानंतर लालबहादुर शास्त्रींनी आपल्या प्राणाचे बलिदान करुन व इंदीरा गांधींनी काही कठोर निर्णय घेऊन व प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान करुन ह्या देशाला " वन नेशन" म्हणून टिकवण्यात अनमोल योगदान दिले व भारत हा " वन नेशन " च राहिला . ह्यामागचे कारण म्हणजे ही सर्व आक्रमणे ही "परकीय" होती व भारताने त्याचा मुकाबला ह्या " वन नेशन" ने केला. पण आज आपल्याला ह्या "परकीय शक्तींची" जास्त भीती राहिली नाही अथवा फ़ारफ़ार तर जास्त काळजी करायची गरज नाही कारण "हा देश" त्यासाठी समर्थ आहे. सध्या देशासमोर मुख्य प्रश्न आहे तो नविनच उभ्या राहिलेल्या "प्रादेशिक अस्मिता , जातीय अस्मिता " ह्यासारख्या गोष्टींनी घेतली व परिस्थीती चिघळायला सुरवात झाली आहे.
आता मुळापासून अभ्यास करायचा म्हणजे बाहेरच्या शक्तींशी लढून त्यांचा यथायोग्य बंदोबस्त केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला "सत्तेची पोळी भाजण्यासाठी" मुद्दे न राहिल्याने देशातील काही स्वार्थी राजकीय नेतॄत्वाने येथील काही "जातीय व धार्मीक असंतोषी" शक्तींना हाती धरुन एका नव्याच "वादाची " मुहुर्तमेढ रोवली व वेळोवेळी आपल्या "सत्तेची पोळी" भाजली. ह्या देशाची प्रमुख समस्या ही काही काळ "धार्मीक अस्मिता" ही होती. मग ती "हिंदु - मुस्लीम असो वा हिंदु - ख्रिश्चन वाद" ही असो पण ह्यामुळे ह्या देशाची एकात्मिका काही काळ धोक्यात आणली. मग हे हिंदुंचे "रामजन्मभुमी मुक्ती, रथयात्रा " आंदोलन असो वा मुस्लीमांचे "बाबरी मशीद , शहाबानो प्रकरण, समान नागरी कायदा, अल्पसंख्यक वर्गाला मिळणारे फ़ायदे असो वा शिखांचे स्वतंत्र खलिस्तान आंदोलन व त्यातुन झालेले ऒपरेशन "ब्यु स्टार" असो वा ख्रिश्चन मिशनयांची दुर्गम भागात चालणारी "धर्मांतर मोहीम" व त्याला विरोध म्हणून पडलेले काही मिशनयांचे खुन व त्यातुन निर्माण झालेली राजकीय महत्वकांक्षा असो ह्यातुन ह्या " वन नेशन" मधील जनता एकमेकांसमोर " शस्त्रे घेऊन" उभी ठाकली. ह्यामुळे भारतीय "एकात्मिकेला धोका" पोहचला. पण काहीश्या समंजस व हुशार नेतूत्वाने ह्या देशाचे तुकडे पडायची वेळ येऊ दिली नाही व ह्या सर्व घटनातुन तावून-सुलाखवून भारत राष्ट्र हे "वन नेशन" राहिले. ह्या प्रकारातील निरर्थकता लक्षात आल्यामुळे कदाचित सामन्य जनता ह्या प्रकारापासून दुर राहिल्याने आता काहिसे हे प्रश्न मिटले आहेत व त्यातुन "देश तुटण्याचा" धोका टळला आहे. आज शक्यतो सामान्य जनता अशा "धार्मीक समाजकंटकांना" आश्रय देईनाशी झाल्याने आपण समाधान मानायला हरकत नाही.
त्यानंतर काळ आला तो "जातीय आधारावर मांडल्या गेलेल्या असंतोषाचा", काही नेत्यांनी "जातीय आधारावर आरक्षण" ही कल्पना मांडून व ती राबवून आज पुन्हा देशाला यादवीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळातील "मंडल आयोग" व त्यांनंतर झालेले दंगे, सध्या राबवू पहात असलेल्या "ओबीसी आरक्षणाची कल्पना" व त्यासाठी चालू असलेली लढाई व त्यातुन आज उभे राहिलेले " गुज्जर समाजाच्या हिंसक आंदोलन" व त्यासाठी त्यांनी वेठीस धरलेली सामान्य जनता ह्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा योग्य वेळी बिमोड केला नाही तर परिस्थीती चिघळायस वेळ लागणार नाही. सध्या "विमुक्त जाती व जमातींना" ऒलरेडी आरक्षण आहेच व आता "ओबीसी समाजाचा" प्रश्न जळता निखारा आहे व ह्यांच्या यशस्वी परिणांमांमुळे सध्या पुढारलेल्या मानल्या जाणार व उच्चवर्णीय वर्गाने म्हणजे ब्राम्हणांनी, मराठ्यांनी, ठाकुरांनी, पटेलांनी उद्या त्यांच्यासाठी "आरक्षणाची" मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको. आज हे सर्व चलती नाणी आहेत हे पाहून "धार्मीक आरक्षणची" मागणी पुढे आली व ते लागू झाले तर आश्चर्यचकीत होऊ नका. सध्याच्या सरकारने आणलेला "सच्चर आयोग" ही त्याचीच नांदी आहे. ह्या सर्वांचा प्रमुख दुष्परिणाम असा की देशाच्या कल्याणासाठी एकत्र झटणाया सामान्य जनतेत ह्यामुळे एक "दुही" निर्माण होत आहे, त्यांची मने दुर जात आहेत, काही ठराविक वर्गाला चुचकारले जात आहे व काहींना उपेक्षीत ठेवले जात आहे हे भावना निर्माण होत आहे. थोडक्यात आधी "एक" असणारी मने आता "दुभंगली" जात आहेत. अशी दुभंगलेली मने जेव्हा देशाच्या विकासाठी एकत्र काम करतील तेव्हा त्यातुन निर्माण झालेला परिणाम केवळ शुन्य असेल. अशी दुभंगली मने देशाचा विकास करुन त्याला प्रगतीपदावर न्हेऊन त्याला "एक महासत्ता" बनवू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात येत नाही. समजा जरी लोक समजायला लागले तरी काही "हितशत्रू" बरोबर पुन्हा वाद निर्माण करतात ...
ह्या सर्व गोष्टींमुळे देशासाठी "विवीध पातळीवर काम" करणाया सामान्य जनतेच्या मनाच्या दोलनामय परिस्थीतीचा विचार कोणी करत नाही. ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? ह्या देशात काम करणाया हजारो मुस्लीम व ख्रीस्ती डॊक्टर्स, इंजिनीयर्सना हा देश आपला वाटला नाही तर त्यांच्या काम करण्यामागे "समर्पण" किती राहिल ? मागास आरक्षणाचा लाभ घेऊन आज देशाच्या यंत्रणेत मोठ्या पदावर काम करणाया अधिकायांना बाहेरचे "आरक्षण आंदोलन व त्यावर येणाया प्रतिक्रीया" याबद्दल काय वाटत असेल ? त्या परिस्थीतीत ते आपले काम पुर्णपणे "निष्पक्षपातीपणे" करतील का वा त्यांनी करावे का ? देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेऊन अहोरात्र उभे राहणाया विवीध जाती, जमाती मधल्या सैनीकांमध्ये दुहीची भावना वाढीस लागली तर काय ? तसे पहायला गेले तर ह्यांचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होणे अपेक्षीत नाही व मान्यही नाही. पण मी मानतो की आजूबाजूला घडणाया घटनांचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या मनावर व पर्यायाने त्यांच्या "कामगिरीवर" होत असेल. अशा परिस्थीतीत आपला देश खरेच "एक वन नेशन" राहिल का ? याचा विचार आत्ताच परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधी केला पाहिजे व काही तरी कठोर उपाय योजले पाहिजेत.
आता एक तिसरीच शक्ती आपले डोके वर काढू पहात आहे ती म्हणजे "प्रादेशिक अस्मितेचा" पुरस्कार करणायांची. भारतासारख्या एका मोठ्या देशात अनेक लोक राहतात, त्यांची संस्कॄती भिन्न आहे, भाषा भिन्न आहे, आचारविचार भिन्न आहेत. आपल्या जमातीची वा समुहाची ओळख टिकून रहावी यासाठी त्यांनी आपापल्या "संस्कॄती व मुल्यांची" जपणूक केली तर त्यात चुकीचे काही नाही पण पुढे जाऊन याचे परिवर्तन हे "प्रादेशिक अस्मितेत" झाले व हा प्रश्न संवेदनाशील झाला. भारताच्या विवीध भागात राहणाया "बंगाल्यांची अस्मिता, आसामी अस्मिता, मराठी अस्मिता , गुजराती अस्मिता [ हो, आता ही पण महत्वाची झाली आहे, लोकांनी निवडणूकी जिंकल्या त्याच्या जोरावर ] , दक्षिणेची वेगळी अस्मिता, युपी / बिहारची स्वता:ची वेगळी अस्मिता , वरच्या इशान्य भारताच्या जनतेची प्रादेशीक अस्मिता" असे अनेक आयाम या विषयाला मिळाले. जेव्हा व्यापार, व्यवसाय , नोकरीच्या निमीत्ताने ही लोक देशातल्या विवीध भागात पसरले व काही कारणाने तेथील लोकल अस्मिता व ह्या लोकांनी आपल्या बरोबर आणलेली स्वता:ची अस्मिता यांच्या संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली व काही ठिकाणी "हिंसक आंदोलने" पहायला मिळाली. तसे पहायला गेले तर दक्षिण भारताचे पहिल्यापासून वरच्या भागात राहणाया व हिंदी बोलणाया लोकांशी पहिल्यापासून वाकडे होतेच, शक्यतो त्यांनी वरच्यांना "आपण उपरे आहोत" याची वेळोवेळी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न केला. ७० च्या दशकात मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या निमीत्तने उभारलेल्या आंदोलनातुन "मराठी अस्मितेची" नवी ओळख भारतला पटली व शिवसेनेसारख्या प्रादेशिक प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांना राजकारणात चांगले दिवस येण्यास सुरवात झाली. तामिळनाडूत तर पहिल्यापासूनच "प्रादेशिक द्रमुक व अण्णाद्रमुक" ह्यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली होती व कॊंग्रेस, भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांना इथे पाय रोवायची संधी दिली नाही. त्यानंतर "आसामी अस्मितेच्या" निमीत्ताने आसामात झालेली हिंसक आंदोलने, आसु [ ऒल आसाम स्टुडंट युनियन ] सारख्या विध्यार्थी संघटना व त्यानंतर त्याचां राजकीय अवतार "आसाम गण परिषद" यासारख्यांनी पण "प्रादेशिक अस्मिता" जोपासली. सध्याच्या काळात सगळ्यात मोठ्ठी समस्या म्हणजे व्यापार व नोकरीच्या निमीत्ताने बाहेर गेलेल्या बिहारी / युपी जनतेने आपल्या बरोबर न्हेलेली आपली संस्कॄती व अस्मिता ह्यांचा तिथल्या लोकल अस्मितेशी झालेला संघर्ष. मग हे आसामात असो, महाराष्ट्रात असो वा दक्षिणेत असो ही एक राष्ट्रीय समस्या व्हायला सुरवात झाली, त्यातच त्यांच्या "नेत्यांनी" अनावश्यक विधाने व वाद निर्माण करुन ही परिस्थीती चिघळावली व ह्याचा परिणाम म्हणजे झालेली "हिंसक आंदोलने" व यासाठी वेठीस धरली गेलेली सामान्य जनता व विस्कळीत झालेले जनजीवन.प्रारंभी "मराठी माणसाचा विकास म्हणजे गुजरात्याच्या कानफ़ाडीत मारणे नव्हे" ही भुमीका मांडणाया राज ठाकर्यांना पण काळ बदलतोय म्हणून "बिहायांच्या थोबाडीत" मारण्याची कॄती करावी लागली व ह्या आंदोलनाला "प्रादेशिक द्वेशाची" एक वेगळी किनार मिळाली.
ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....
आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???
"दी वन नेशन " म्हणजे काय नक्की ? नेशन म्हणाजे येथे राहणारे लोक, ह्या भारतात राहणारी १०० करोड जनता. ही नुसती १०० करोडाची गर्दी जमवून काही होणार नाही तर तिथे पाहिजे ह्यांच्यात "ऐक्याची भावना" , आपण एका "महाशक्ती असलेल्या समुहाचा भाग" आहोत ह्याचे समाधान देणारी भावना. अशी भावना निर्माण झाली की त्यांचे "शक्तीशाली गट" बनतात व हेच गट "हाच देश" पुढे न्हेतात. पण त्याच्यासाठी गरज आहे ती लोकांनी आधी " वन वेशन" ही संकल्पना आमलात आणण्याची ...
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत. पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?
यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!
मिपावरच्या मान्यवर व अभ्यासु जनांचे "इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता" याबद्दल काय मत आहे जाणून घ्यायला मला आवडेल ...
प्रतिक्रिया
12 Jun 2008 - 7:25 am | अनिल हटेला
लेख खरच विचार करायला लावणारा आहे!!!!
12 Jun 2008 - 7:31 am | भाग्यश्री
मला लेख खूपच आवडला..! खरं सांगते इतका विचार मी कधी केला नव्हता.. अर्थात इथे(अमेरिकेमधे) आल्यापासून मला बर्याचदा असे वाटते की, या या गोष्टी आपल्याकडे यायला पाहीजेत,सुधारणा व्हायला पाहीजे अमुक गोष्टीत... किंवा तुलना सारखीच होत असते.. बाकी कितीतरी गोष्टींमधे भारत पुढे असला ,
"गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला,
तरी,
"जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन"
हे अगदी पटते.. हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत अजुनही.. आणि ते सुटल्याखेरीज संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.. त्यासाठी काय केले पाहीजे हे मात्र मला उमगत नाही.. मला वाटते आपली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामानाने कमी रिसोर्सेस हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.. त्यासाठी पहीला उपाय केला पाहीजे.. लोकसंख्येला आळा घालणं.. चीनमधे हे प्रयत्न सरकारमार्फत चालू असतात असे वाचले होते.. चु.भु.द्या.घ्या..
असो.. छान लिहीलयंस.. मला राजकारण आणि ई. गोष्टींमधलं फार कळत नाही,तुझा लेख वाचून पहील्यांदा नीट बसून विचार केला.. विचार करावासा वाटला..आता इतरांची मते वाचायला आवडतील..
http://bhagyashreee.blogspot.com/
12 Jun 2008 - 7:49 am | विसोबा खेचर
डॉनराव,
अभ्यासपूर्ण भाष्य असलेला अतिशय सुरेख लेख!
तुझं खरंच कौतुक वाटतं!
मला विचारशील तर लोकसंख्यावाढीचा भयानक कॅन्सर सध्या भारताला गिळू पाहात आहे, त्याला प्रथम युद्धपातळीवर आळा घातला पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु जोपर्यंत हा कॅन्सर आपण थोपवू शकत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. उलट दिचसेंदिवस परिस्थिती अजूनच कठीण होईल!
तात्या.
12 Jun 2008 - 8:23 am | यशोधरा
छान लिहिलं आहेस रे डॉन. आवडलं.
12 Jun 2008 - 9:24 am | राजे (not verified)
तुलनात्मक जगने व व्यवहारीक जगणे ह्यात खुप मोठा फरक आहे... !
"वन नेशन " एक देश ही संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीला नविन नाही.... ईतिहासामध्ये अनेकवेळा अनेक राजे महाराजांनी भारत देशाला आपल्या आधिपत्यामध्ये आणले... पण ख-या अर्थाने स्वराज्य हे १९४७ नंतर मिळाले. पहले दहा वर्ष आपण देश कसा उभा करायचा घ्यात खर्ची पडले.... पुढील दहा वर्ष लढाया व हरीतक्रांती मध्ये गेली... पुढील दहा वर्षे आपण विविध छोटे-मोठे आनंदोलन व अगलाववाद निपटवण्यात खर्ची घातली...पुढील वीस वर्षे आपण राजकीय अस्थीरते मुळे व्यर्थ घालवली.... त्याची मुख्य कारणे होती... पंजाब मधील आतंकवाद... आयोध्या प्रकरण... मुंबई ब्लास्ट.. दंगे... नेत्यांची आपसी दुश्मनी...
पण आपण खुप काही कमवले.. .. ह्या मताशी मी पुर्ण सहमत नाही आहे...
महागाईवर आपला अजून अंकुश नाही आहे... पावसावर आधारीत आपलि शेती व्यवस्था नष्ट झाली व जमीनीतील पाण्यावर पोसली जाणारी व अनेक रसायनांचा मारा झेलणारी शेती व्यवस्था आपण उभी केली.. त्याची फळे आज तुर्त दिसत नसतील ही पण येत्या काही वर्षामध्ये दिसतील... प्रचंड प्रमाणामध्ये आपण झाडे तोडली त्याचा ही त्रास पुढे (आज) होत राहील व होत आहे.... भाषीक राजनीती अजून ही आपली मुळे घट पकडून आहे.. व त्याला राजनेते रोज खतपाणी घालतच आहेत्...गरीबी रेखे खाली जवळ जवळ ४०% भारतीय समाज राहतो ह्याची खरंतर लाज वाटावयास हवी... मागे कोठेतरी वाचले होते की जवळ जवळ ७०% मुले व मुली ७वी नंतर शिक्षण सोडून देतात अथवा परिस्थीतीमुळे सोडावे लागते.... पुर्ण रस्ते अजून ही नाही आहेत.. दुरवर माहीत नाही.. पण दिल्ली जवळील (७५ कीमी च्या आसपास) अनेक गावे व कसब्बे आहेत जेथे रस्ते नाही आहेत... मग नागालॅड व मिजोरोम ... येथे काय हाल असावा ?? भारतामध्ये फक्त ७% टक्केच रस्ते चारपदरी आहेत. रेल्वे चा जो रोज गाजावाजा होत आहे त्याचे देखील आकडे काही खुपच चांगले नाही आहेत... फुगा आहे लवकर फुटेल (६०%च्यावर रेल्वे गाड्या जुन्या व र्जजर हालत मध्ये आहेत...
ही अवस्था आहे आपल्या वन नेशन ची !!
सगळेच चित्र काही भीतीदायक नाही व सगळेच काही आशावादी नाही... पण विचित्र समतोल साधण्याची कला आपण भारतीयांना जन्मापासूनच विरासत द्वारे मिळत राहतो व आपण व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत जिवन जगत जातो... एखादे पुस्तक / चित्रपट येतो व आम्हाला काही क्षण अस्वस्थ करुन जातो....
मेरा भारत महान !!!
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
12 Jun 2008 - 10:08 am | ऋचा
विचार करायला लावणारा लेख आहे.
खरं तर आधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं पाहीजे. नेहमी दुसर्याला नावं ठेवून पुढे कसं जाता येईल?
अजुनही काही ठीकाणं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मुलभूत गरजांसाठी झगसावं लागत आहे.
"गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा" असा असला,
तरीही अजुनही लोकांना अन्नाची भ्रांत आहे.
इतकं असुनही "मेरा भारत महान आहे"..
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
12 Jun 2008 - 11:52 am | विदुषक
डॉन भाए
अतिशय समयोचीत लेख !! 'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नन्तर खरोखर अस्वस्थ होते
(अविनाश धर्माधिकारीं बरोबर चर्चा करण्याचा २/३ वेळा योग आला )
माझ्या मते 'भाषावार प्रान्तरचना ही चूक भारताला महाग पडते आहे (|:
ह्या सगळ्या समस्यान्वर कही उपाय नक्की आहेत , भारताला विचरवन्त नाही तर प्रत्यक्षात क्रूती करण्यची गरज आहे .
आणी सूरवात स्वतापसून करायला पाहिजे
सरकार कहीतरी करेल ह्यावर विसम्बून रहाण्यात कोणचेच भले नाही
आपण तथाकथीत बूद्धीजीवि वर्गाने आपल्या हस्तीदन्ती मनोरया मधुन बाहेर पडायला पाहीजे
मजेदार विदुषक
12 Jun 2008 - 2:40 pm | काळा_पहाड
छोटा डॉनचे मनःपुर्वक अभिनंदन.
'अस्वस्थ दशकाची डायरी ' वाचल्या नंतर अस्वस्थ होत नसल्यास वाचणाय्राने आपल्या संवेदनशीलतेविषयी चिंता करावी अशीच ती 'डायरी' आहे. मात्र डॉनने मांडलेले विचारही त्याच्या विचारशील मनाची ग्वाही देतात.
इंडीया-दी वन नेशन याविषयी मला असे वाटते की भारतीयांना तर्कशीलता व विचारक्षमता या गोष्टींत प्रगती साधली पाहिजे. हा उपाय योजण्यास फार मोठ्या कालावधीची आवश्यकता आहे हे मान्य. पण इतर उपाय फक्त मलमपट्टीचेच काम करतात.
काळा पहाड
12 Jun 2008 - 3:04 pm | आनंदयात्री
विचार करायला लावणारा लेख. काही गोष्टी अश्या असावाश्या वाटतात,
12 Jun 2008 - 5:52 pm | शितल
डॉन, तु खुपच छान ज्वल॑त लिहिले आआहेस.
भारत हा आज आतुन पोखरला गेला आहे, ते ही जाती सारख्या गोष्टीनी तर त्या॑चे क॑बरडे मोडले आहे.
आणि आन॑दयात्री म्हणतो ते तर १००% बरोबर.
असेच जर केले तर भारतात पुढच्या पिढ्या॑ना जगणे शक्य आहे नाही तर भावी पिढीचे भविष्य अधा॑रमय आहे.
12 Jun 2008 - 7:57 pm | विकास
लेख आवडला. "अस्वस्थ दशकाची डायरी" काही वर्षांपूर्वी वाचले होते तसेच धर्माधिकारींना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. हे सर्वकाही आठवले.
लेख मोठा असल्याने आणि त्यातील मुद्दे तळमळीने मांडलेले असल्याने कदाचीत एकापेक्षा जास्त प्रतिसादात जसे सुचेल तसे लिहीनः
"देश आणि राष्ट्र" ह्या दोन विभिन्न संकल्पना आहेत असे वाटते. युरोपिअन (आणि नंतर अमेरिकन) पद्धतीप्रमाणे अधुनिक देश म्हणून बहुतांशी भारत जरी १९४७ ला स्वतंत्र झाला असला (काही भाग नंतर आला, उ.दा. गोवा), तरी संस्कृतिक राष्ट्र म्हणून भारत प्राचिन काळापासून एक होते आणि तसे भारतीय मनात दडलेले (सबकॉन्शस माईंड) असते - विशेष करून जर त्यात आपण पाश्चात्यांच्या नजरेतून न पहाता स्वतःच्या स्थानिक पाहीले तर. याचे कारण इतकेच की पाश्चात्य जेंव्हा आपल्याकडे पहातात (आणि तेच थोड्याफार फरकाने आपण इतर संस्कृतीकडे पहातो) तेंव्हा आपली "फ्रेम ऑफ रेफरन्स" ही आपली पद्धत / संस्कृती इत्यादी असते.
दोन प्राचीन ऐतिहासीक उदाहरण पहा: १. चाणक्य - आत्ताच्या पाकीस्तानातील भागात जन्म अथवा केरळात (कुणाचे वाचता यावर अवलंबून) पण बाहेरून या भारतवर्षावर येणार्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी राजा शोधला कुठे तर आत्ताच्या बिहार मधे.
२. आदी शंकराचार्य - हिंदू धर्मातील तत्वांना बांधून त्याप्रमाणे कायमस्वरूपी आजच्या भाषेत "थिंक टँक" (पॉवर सेंटर नाही) आणि अर्थातच तत्कालीन भाषेत मठ स्थापले - ते कुठेतर भारताच्या चार दिशांमधे त्यात स्वतःची जन्मभूमी केरळ नाहीच.
जर भारत एक राष्ट्र नव्हते तर या दोन महान विभूतींना असे करावेसे का वाटले असते? आता जरा फास्ट फॉरवर्ड करा: १८५७ चे स्वातंत्र्यसमर - दिल्लीचे तख्त हे हिंदूस्थानचा बादशहा - बहाद्दूर शहा जफर असे मान्य करायला तत्कालीन स्वातंत्र्य योद्धे का तयार झाले? कारण तो पर्यंत बहाद्दूर शहा जफर हा अनेक पिढ्यांनी भारतीय झाला होता आणि ब्रिटीश बाहेरून येऊन सत्ता गाजवत होते.
त्याही पुढे आले आणि पूर्वेतील वंगभंगा विरुद्धची चळवळ ही पश्चिमेकडील टिळकांनी चालू करण्यात योगदान दिले.
ह्या सर्व गोष्टी जर भारत "वन नेशन" नसते तर होऊ शकल्या असत्या असे वाटते का?
ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ?
या संदर्भात मला इतकेच सांगावेसे वाटेल की आज जेंव्हा हिंदू माणूस/संघटना/पक्ष काहीही जेंव्हा धर्मांध वाटू शकेल अथवा तसे ते प्रत्यक्षात असेल असे समाजात बोलतात/वागतात तेंव्हा तमाम हिंदू विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्याचा जाहीर निषेध करतात, टिका करतात - त्यातील कुठली योग्य कुठली अयोग्य हे वादाचे मुद्दे राहू शकतील पण मुद्दा इतकाच की आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींचा जाहीर निषेध करायला हिंदू विचारवंत आणि समाजमान्य व्यक्ती मागेपुढे पहात नाहीत. पण हे चित्र आपल्याला इतर धर्मांतील विचारवंत/प्रतिष्ठीत व्यक्ती स्वतःच्या धर्मातील धर्मांधते विरुद्ध बोलताना दिसतात का? सानिया मिर्झाला जर तिच्या धर्मगुरू/बंधूंवर होणारे हल्ले व्यथित करत असतील तर तेच धर्मगुरू/बंधू तिच्या विरुद्ध बोलतात तेंव्हा तिला काय वाटत असेल याचा विचार पण ती करते का हा देखील प्रश्न आहे. हिंदूमूलतत्ववादाविरुद्ध आवाज करणारी शबाना (अगदी त्यातून अप्रत्यक्षपणे लता पण सुटली नाही ) आणि तीचा नवरा जावेद अख्तर हे तीच्या नेल्सन मंडेला प्रसंगावरून जो तिच्याच धर्मगुरूंनी थयथयाट केला तेंव्हा मात्र काही बोलल्याचे ऐकले नाही. तेंव्हा अशा व्यक्तींना आपण म्हणजे "परधर्मिय" हिंदू हे उपरे नसतो तर भारतीय म्हणून आधार असतो. कारण त्यांचे नशिब म्हणून त्या भारतीय आहेत - त्यांच्या धर्माच्या धर्माधारीत देशवासीय नाहीत...थोडक्यात आपण लिहीले आहे तितका हा प्रश्न सरळ नाही त्याला विविध छटा आहेत.
बाकी नंतर जसे सुचेल तसे....
धन्यवाद.
12 Jun 2008 - 8:10 pm | मुक्तसुनीत
मूळ लेख आणि विकासराव यांची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी आवडल्या.
मूळ लेखामधली "भारलेपणाची" , ओतप्रोत भरून लिहील्याच्या भावनेची जाणीव अगदी ठळकपणे जाणवते. धर्माधिकारी यानी जो झंझावाती दौरा केला; त्यात जे जे पाहिले नि नोंद केले त्या सगळ्या उर्जेने "डॉन" याना भारून टाकले आहे यात शंका नाही. आपल्या स्फुटामधे त्यानी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. विकासरावांनी म्हण्टल्याप्रमाणे , यातील अनेक गोष्टींचा सुटेपणाने परामर्श घेणे योग्य. या दृष्टीने , खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता आणि या सार्यांचे जटिल मुद्दे एका लेखातून आणि काही फुटकळ प्रतिक्रियातून कवेत घेणे अशक्यप्राय आहे. या गोष्टींकडे एकत्र पाहू गेल्यास माझ्यासारख्याचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त.
धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल. (विकासराव , वाचताय ना ? :-) )
12 Jun 2008 - 9:14 pm | छोटा डॉन
मी जेव्हा लेख लिहयला घेतला तेव्हा तो फक्त "वन नेशन" ह्यावर लिहायचा माझ्या मनात होते व त्याच्या अनुषंगाने फक्त "प्रादेशिक अस्मिता" हा प्रश्न हाताळायचा होता. पण लिहण्याच्या व विचाराच्या प्रवाहात असे लक्षात आले की फक्त "प्रादेशिक नव्हे तर धार्मीक आणि जातीय" अस्मितांचा पण "वन नेशन" बनवण्यात मोठा रोल आहे, तेव्हा ओघाने हे मुद्दे पण शक्य तितक्या "कमी शब्दात" लिहले.
पण आपले म्हणणे बरोबर आहे, "वन नेशन, प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता व धार्मीक अस्मिता ह्या बाबी वेगवेगळ्या चर्चेला घेता येतील. मी त्या दॄष्टीने अभ्यास व तयारी सुरु करतो म्हणजे आपल्याला चर्चेला सोपे जाईल...
बाकी अनेक बाबी मला फिल्टर कराव्या लागल्या की ज्यांचा समावेश हा "पर्सनल व्यक्तींशी व काही संवेदनाशील मुद्द्यांशी" होता. आता पुढच्या लेखनात "त्या बाबी" याव्या की नको याबद्दल मार्गदर्शन हवे ...
काही मुद्दे सध्या "वादग्रस्त" असल्याने "अनावश्यक" वादंग नको म्हणून मी टाळले, आता पुढील लेखात काय करु ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Jun 2008 - 9:43 pm | विकास
खुद्द डॉन यानी आपल्या लिखाणाचे परीशीलन करून एकेका मुद्द्याकडे पुन्हा वळून थोडे आणखी विस्ताराने लिहावे ; म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होण्याचा त्यांचा मूळ हेतू साध्य होईल.
हा योग्य सल्ला आहे.
धर्माधिकारी यांच्या "डायरी" नंतरच्या प्रवासाबद्दल , त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलच्या प्रयत्नांबद्द्ल , त्याना आतापावेतो आलेल्या यशापयशाबद्दल ऐकायला आवडेल.
या संबंधी आत्ता जास्त लिहीता आले नाही तरी थोडे लिहीतो.:
टिळकांना बलोपासना अतिशय महत्वाची वाटायची. कॉलेजात असताना एक मुलगा कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेताना दिसल्यावर ते ओरडले, असले कसले शरीर सांभाळायचे? त्या ऐवजी व्यायाम करून शरीर संपदना कर. आज विचार करा जर व्यायाम न करता केवळ आर्टीफिशल हरमोन्स घेउन कोणी तगडे होयचे ठरवले तर तसे होऊ शकेल का? उत्तर आहे नाही... त्याचा कदाचीत थोडाफार कॅटॅलीस्ट सारखा उपयोग होऊ शकेल पण ते उत्तर नाही...
तसेच काहीसे हे समाजपुरूषाबद्दल आहे असे म्हणूया ना. म्हणजे असे की बाहेरील विचारवंत हे कॅटॅलिस्ट होउ शकतील पण आतून होणारा बदल हा त्या समाजपुरूषातील हालचालींनी / व्यायामानेच होणार. मगासच्या प्रतिसादात मी सानीया आणि शबाना वर लिहीले. ते लिहीताना निव्वळ निरीक्षण होते, त्यांच्या विरुद्ध आकस नव्हता/नाही. पण जर मुसलमानसमाज हा जर बदलायचा असेल, अधुनीक होणे महत्वाचे असेल तर त्यासाठीचे बदल हे आतून घडणे महत्वाचे नाही का? विचार करा, जर राजा राम मोहन रॉय, आगरकर, म. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावरकर आदी हिंदू पुढार्यांनी हिंदू धर्मावर कोरडे ओढले नसते तर आज आपण ही फार वेगळे झाले असतो का?
जे धर्माधारीत समाजाचे तेच राष्ट्राधारीत समाजाचे म्हणजे या संदर्भात भारताचे. प्रश्न अनेक आहेत आणि ते समांतर पद्धतीने सोडवण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण पूर्णवेळ देऊ शकणार नाही पण स्वतःचे कर्तव्य समजून जे काही चांगले करता येईल ते करायला पाहीजे त्यात हातभार लागणे महत्वाचे वाटते. पण त्यासाठी स्वतःला दिशा मिळणे आणि स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे हे महत्वाचे आणि बर्याचदा सुरवातीला अवघड ठरू शकते.
धर्माधिकारींनी अस्वस्थ दशकातून स्वतःची सुटका करताना आयएएस अधिकारीपदातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर वादविवाद होऊ शकतील पण तो त्यांचा स्वतःचा स्वतःसाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. लोकसभेसाठी उभे रहाणे वगैरे झाल्यावर त्यातून हवा तो "राम" दिसत नसताना त्यांच्या लक्षात आले की अनेक समस्यांचे मूळ हे सरकार ज्या पद्धतीने चालते त्यात आहे. मग ते जर बदलायचे असतील तर पुढच्या पिढीतील सरकारी अधिकारी वेगळे असायला हवेत. त्यासाठी चाणक्यचा वारसा आठवून नवीन विचारी पिढी उभी केली गेली पाहीजे. म्हणून मग त्यांनी चाणक्य मंडळ स्थापले त्यातून स्पृहणीय आकड्याने (आत्ता आठवत नाही पण नंतर सांगू शकेन) आज अनेक जण एमपीएससी आणि आयएएस मधे जात आहेत. त्याच बरोबर लोकशिक्षणाचे कार्यपण जोरात चालले आहे.
थोडक्यात आतुन बदल घडवत आहेत. असे अनेक जण अनेक संस्था आहेत. एखादा मुद्दा मन लावून हातात घेतात आणि त्यावर काम करतात. यात सर्व धर्माचे आहेत, सर्व विचारसरणीचे आहेत. जो पर्यंत असे काम करत असताना स्पर्धात्मक होते पण द्वेषमुलक होत नाही तो पर्यंत ठिक असते. पण जर एकमेकांचा (धर्म/विचारसरणीमुळे) द्वेष चालू केला तर तो त्या कार्याच्या नाशाला आणि समाजपुरूषाच्या जडणघडणीला मारक ठरतो.
या संदर्भात एक आठवण सांगतो: भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ती सांगितली होती - ६० च्या दशकात भारतीय तत्वज्ञानाच्या/संस्कॄतीच्या दृष्टीकोनातून (आयात केलेल्या विचाराने नाही) कामगारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भामस स्थापण्याचे ठरवले. तेंव्हा कम्युनिस्टांचा जोर मोठा होता. प्राथमिक बैठकीत त्यांनी हजर असलेल्या सदस्यांना प्रश्न विचारला की ,"तुमच्यातील किती जणांना कम्यूनिस्टांना उपटून काढायचे आहे?" त्यावर काही जणांनी ताबडतोब हात वर केला. त्यांना उद्देशून दत्तोपंत म्हणाले की ,"मग तुम्ही इतरत्र जा. ही संस्था फक्त सकारात्मक काम करायला काढली आहे. इतरांचा द्वेष करायला अथवा इरीशिरीने नाही. राहता राहीला कम्यूनिझमचा प्रश्न... ती विचारसरणी पुढच्या ३० वर्षात जगातून निघून जाणार आहे त्यांना घालवण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करू नका". ती भामस नंतर नावारूपाला आली, कम्युनिस्ट चायना आणि कॅपीटॅलीस्ट अमेरिकन सरकारने दत्तोपंतांना बोलावले होते वगैरे... पण मूळ मुद्दा इतकाच की काही तरी काम तयार करून मन लावून करणे, तसे जमत नसेल (सर्वांना शक्यच नाही आणि गरज पण नाही) तर निदान अशा कामात काहीतरी मदत करणे - ह्याने गोष्टी हळू हळू बदलतात.
टिळकांना स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची खात्री होती, तसे ते म्हणायचे देखील. तरी देखील भारतीय राजकारण आणि ब्रिटीशांच्या विरुद्धचा लढा तयार करण्यात योगदान दिले. तेंव्हा ही कामे घाईने करायची नसतात, ताबडतोब फळ मिळेल या अपेक्षेने करायची नसतात तर सातत्याने करायची असतात. दत्तोपंतांना कोणी स्वाक्षरी आणि संदेश देयला सांगीतले की ते जे लिहीत तो या सर्व शब्दबंबाळ लिहीण्याचा मतितार्थ आहे. ते फक्त स्वाक्षरीबरोबर लिहायचे, "patience pays".
12 Jun 2008 - 11:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोटा डॉन, एक राष्ट्र संकल्पनेच्या निमित्ताने केलेला अस्वस्थ डायरीचा उहापोह आवडला.
लेख वाचल्यानंतर असंख्य प्रश्नांनी अस्वस्थ केले, अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची अनेक उत्तरे, अशी घालमेल मनात झाली.
मुळ लेखांबरोबर अनेक प्रतिसादही आवडले. राष्ट्रीयत्व , धार्मिकता , प्रादेशिकता हे आणि इतर अनेक प्रश्नांचा वेध घेणे कठीन वाटते. अजूनही लेखातील काही मुद्यांवर विवेचन करता आले असते असे वाटले, असो, मुळ लेखांबरोबर विकासरावांचे प्रतिसादही आवडले.
डॉन भाय, विचार करायला लावणारे असेच लेखन येऊ दे !!!
13 Jun 2008 - 12:25 am | स्वाती राजेश
विचार करून लिहेलेला लेख....
विचार करायला लावणारा लेख....
मस्त प्रतिक्रीया...
13 Jun 2008 - 7:44 am | सहज
लेख आवडला.
वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे मुळ लेखातील सर्व मुद्यांचा एकत्रीत विचार करण्याऐवजी "शांत डोक्याने" एकेका मुद्द्यावर ही चर्चा सुरु रहावी असे वाटते.
13 Jun 2008 - 9:39 am | भडकमकर मास्तर
छोटा डॉन यांचा मूळ लेख उत्तम,
त्यावरच्या विकास यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या...
....
खूप मोठा विषय आहे , त्यामुळे एकदम काय लिहावे , कुठून सुरुवात करावी सुचत नाहीये....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Jun 2008 - 10:51 am | hsodaye
लेख आवडला,
मुद्दयावर चर्चा चागलि गोष्ट आहे, पण देशामधे या वाइट गोष्टिना आपणच खत देतो. या सर्व गोस्टि घालवण्यासाठि आपण आयुष्यात काय केले हे चचेपेक्श्या जास्त मह्त्वाचे. दुसर्याकडे बोट दाखवताना तिन बोटे आपल्याकडे असतात हे देशबाधवाना कळ्णे ज्ररुरि आहे.
15 Jun 2008 - 7:20 pm | आजानुकर्ण
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे.
अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील.
आपला,
(परखड) आजानुकर्ण
15 Jun 2008 - 9:20 pm | विकास
अस्वस्थ दशकाची डायरी हे भंपक पुस्तक आहे. त्यातला 'भिरी भिरी भ्रमंती' हा एकमेव चांगला लेख सोडला तर संपूर्ण पुस्तक हे एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून झापडबंद विचारसरणीवर आधारित केलेले लेखन आहे. आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायचे अशी धोरणे वापरून बारतीय जंता पक्षाची तळी उचलणे व त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे हे एक काम या पुस्तकाने चांगले केले आहे.
अरुण शौरी हे 'सव्यसाची', 'दूरदृष्टीचे' व 'निष्पक्ष' पत्रकार आहेत अशी असंख्य विनोदी वाक्ये या पुस्तकात सापडतील.
ते झाले तुमचे विचार थोडक्यात "तुम्हाला तसे" वाटते... इतरांना तसे वाटत असेलच अशातला भाग नाही आणि आपण तसा हट्ट करत नसावात अशी आशा करतो.
बाकी छोटा डॉन चा मूळ लेख हा ते पुस्तक वाचल्यावर जे काही "भारतात आजच्या काळात जे चालते आहे" त्या बद्दल वाटत गेले त्या संदर्भातील होता. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले.
आज भारतात धार्मिक, जातीय आणि प्रादेशीक अस्मितेचा जो गैरवापर होतो त्याबद्दलचा उहापोह करणारा तो लेख होता - पुस्तक परीक्षण नव्हते हे जे कोणी नेहमी पुस्तके वाचते त्यांना सहज समजू शकेल... पण त्या बद्दल काही बोलावेसे न वाटणे आणि चष्मे वापरत तिरस्काराची भाषा लिहीणे हे आपल्यासारख्या वाचका कडून होताना पाहून खेद वाटला...
व्यक्ती तितक्या प्रकृती असणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे पण प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?
15 Jun 2008 - 9:51 pm | मुक्तसुनीत
मला 'कर्ण यांना सुचवावेसे वाटते की , त्यांनी आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही लिहावे , थोडे दाखले द्यावेत.
धर्माधिकारी यानी नव्वदीच्या दशकामधे भाजप चे तिकीट मिळवण्याकरता प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे. परंतु पुस्तक १९८७ च्या आधीचे/त्या सुमाराचे आहे. मला आता नेमके संदर्भ आठवत नाही , पण पुस्तकात त्यानी आपल्या स्वत:च्या राजकीय प्रवासाचे - उथळ उपहासाकडून समजून घेण्याच्या भूमिकेकडे जाण्याचे - जे वर्णन केले ते मला त्या काळात हृदयस्पर्शी वाटले होते इतके आठवते. पुस्तक एकांगी असू शकते , पूर्वग्रहदूषितसुद्धा. पण "भंपक" म्हणून त्याची वासलात लावायच्या आधी थोडी मीमांसा आवश्यक आहे.
अजानुकर्ण एक अभ्यस्त, जबाबदार सदस्य आहेत. त्यांची अनेक पोस्ट्स् माहितीपूर्ण असतात. मतेमतांतरे कितीही झाली एरवी त्यांचे लिखाण भरपूर दाखले-पुरावे-मुद्दे-मीमांसा यांनी परिपूर्ण असतात. या खेपेला सुद्धा त्यानी तसे करावे.
17 Jun 2008 - 11:17 am | छोटा डॉन
"आजानुकर्णसाहेब" आपल्यासारख्या हुशार व अभ्यासू माणसाने २ ओळीत पुस्तक हे एकांगी व भंकस आहे हे म्हणणे हे आपल्या इमेजनुसार नाही ...
आपण डितेलमध्ये लिहा आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते ...
बाय द वे, मी काही "पुस्तकाचे परिक्षण" वगैरे लिहलेले नाही, अशा पुस्तकांचे परिक्षण लिहणारे आम्ही कोण ???
असो. आपले अभ्यासपुर्ण व संदर्भ स्पष्ट करणारे विवेचन वाचायला आवडेल ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
16 Jun 2008 - 8:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकृतीची जागा जर (जातीय, पक्षीय, इत्यादी) विकृतीने घेतली तर आपल्यासर्वांनाच काळजीचे कारण आहे असे वाटत नाही का?
सहमत आहे. 'बुद्धीवाद्यांनी विचारकलहास घाबरु नये, वाटेल त्याच्यावर मते व्यक्त करावीत. पण हे भंकप आहे, म्हणुन थांबू नये असे वाटते. त्याच्यातला भंपकपणा आपण दाखवावा वाचायला आवडेल. जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक प्रश्नात भारतीय माणूस गुरफटून गेला आहे. त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, किमान प्रयत्न तरी लेखाच्या निमित्ताने झाला पाहिजे असे वाटते.
अवांतर : शेषराव मो-यांचे 'विचारकलह' चाळत होतो. त्यात' कुरुंदकरांनी राजकारण हे धर्माच्या जुनाट चौकटीतून चालते असे म्हटल्यावर त्यांचे विवेचन कोणाला तरी सेक्युलर म्हणुन दाखवायचे होते का ? त्याचा परखड समाचार पळशीकर, शेषराव मोरे घेतात. ते विवेचन वाचण्यासारखे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Jun 2008 - 9:05 am | झंप्या
आमचा डॉन्या असली वैचारीक पुस्तके वगैरे वाचतो हाच धक्का आहे. तसेही लेखापेक्षा काही प्रतिसादच जास्त आवडले ह्या बाकिच्यांच्या म्हणण्याशी सहमत आहोत. :)
26 Jul 2012 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवरती हा लेख वर आणणे गरजेचे होते.
26 Jul 2012 - 9:22 pm | कवितानागेश
गुड.