दुसरी संधी

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
10 May 2008 - 1:11 am
गाभा: 

परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही.

झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे". "दुसरी संधी' हा प्रकार नसता तर आयुष्य वैराण झाले असते , खुंटलेच असते म्हणाना !

कॉलेजच्या एका महत्त्वाच्या परीक्षेमधे नेमके असे आणि इतके गुण मिळाले की ज्यामुळे , एका महत्त्वाच्या ठिकाणाचा प्रवेश शून्य मार्कांनी हुकला. होय, १ नव्हे , तर शून्य ! त्याचे झाले असे की, वेटींग लिस्टवरच्या दुसर्‍या मुलाला माझ्याइतकेच गुण होते आणि नेमके मला काही "अवांतर" विषयामधे कमी गुण असल्याने प्रवेश त्याला मिळाला ! त्या प्रसंगी आपल्या भविष्याबद्दल आलेली डोळ्यासमोरची अंधेरी आठवते. आणि आठवते त्यानंतरचे वर्षही, जेव्हा परत खूप अभ्यास करून , त्याच परीक्षेला बसून , पूर्वीपेक्षा खूप जास्त गुण मिळवून, प्रवेश मिळवला. परीक्षा द्यायची "दुसरी संधी" नसती तर ?

अशी आणखीही उदाहरणे आहेत. जी ए कुलकर्णींनी लिहिलेल्या एका दंतकथेमधल्या साम्राज्याचे घोषवाक्य असते : "पडेन , पण पडून रहाणार नाही !"

थोडक्यात , बर्‍याचदा आयुष्य आपल्याला रस्ते , दरवाजे बंद करते. पण तेच आयुष्य दुसर्‍यांदा प्रयत्न करायलाही संधी देतेसुद्धा !

दुर्दैवी ते, की ज्याना "सेकंड चान्स" मिळत नाही. "वन स्ट्राईक अँड दे आर आउट ! गॉन फॉरेव्हर ! " आणि करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात , आणि ते काहीही न करता राहातात.

मित्रमैत्रीणींनो , तुम्हालाही आयुष्याने केव्हातरी पराभूत केले असेल, आणि "दुसरी संधी" मिळवून तुम्ही पुन्हा उठून, पुन्हा प्रयत्न करून त्यावर मात मिळवली असेल. त्याबद्दल जरूर लिहा. माझी खात्री आहे की आपल्या सर्वाना त्याबद्दल वाचायला नक्की आवडेल.

प्रतिक्रिया

वरदा's picture

10 May 2008 - 2:38 am | वरदा

खरं आहे..दुसरी संधी नसती तर मी कितीतरी गोष्टी करु शकले नसते...
५ वीत असतानाची गोष्ट मी वक्तॄत्व स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा घशाला कोरड पडली आणि काहीच बोलता आलं नाही..
मॅडमनी सांगितलं सगळ्यांचं झालं की तू परत प्रयत्न कर्....मग ठरवलं बोलायचं जे जमेल ते...
लिहून ठेवलेलं भाषण संपवून पुढे ही खूप बडबड केली..पहिलं बक्षीस मिळालं त्यानंतर मी कुठेच बोलायला घाबरले नाही..अजुनही ग्लोबल मिटींगमधे बिंधास्त जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकते...
अशा कितीतरी गोष्टी आहेत.....तुमचा मुद्दा आवडला..

भाग्यश्री's picture

10 May 2008 - 4:33 am | भाग्यश्री

छान विषय.. मला सुद्धा आयुष्यात दुसरी संधी मिळाली नसती तर काय झालं असतं देवाला ठाऊक! पण हो, नक्कीच दुसरी संधी मिळते..आणि आपण त्याचा फायदा उठवला पाहीजे...

मानस's picture

10 May 2008 - 8:05 am | मानस

एका छान विषयाला हात घातला आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि किंबहुना सर्वांनाच दुसरी संधी मिळतेच असेही नाही. मिपाकरांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल.

दुसर्‍या संधीच्या शोधात ..... दुसर्‍या संधीची आतुरतेने वाट पहाणारा

मानस

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 8:22 am | प्रभाकर पेठकर

माझ्या लहानपणी, माझी अर्धशिक्षित आई नेहमी सांगायची. आयुष्याचा प्रवास हा नदी सारखा असावा. मार्गात एखादा अडथळा आला म्हणून नदी तिथेच थांबत नाही. डोंगरा एवढ्या अडथळ्यालासुद्धा वळसा घालून पुढे पुढे जात राहते. तिचे उद्दीष्ट्य (सागराला मिळण्याचे) ती साध्य करतेच. तद्वत, सतत दुसरी संधी शोधत राहा, प्रगती करीत राहा.

मुक्तसुनीत's picture

10 May 2008 - 9:25 am | मुक्तसुनीत

अशा व्यक्तिला अर्धशिक्षित म्हणणे चुकीचे आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे सर्व 'अर्धशिक्षित' तुमच्याआमच्यासारख्या पूर्णशिक्षितांच्या गुरुंचे गुरु ठरतात !

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 9:36 am | प्रभाकर पेठकर

अर्धशिक्षित हा शब्दप्रयोग शालेय शिक्षणा संदर्भात आहे.

बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे जीवनाचे सार कोळून प्यायलेले 'उच्चशिक्षित' म्हणावे लागतील.

प्रकाश घाटपांडे's picture

10 May 2008 - 8:48 am | प्रकाश घाटपांडे

दोन खानदानी नबाब स्टेशन वर आगगाडीत चढताना 'पहिले आप' 'पहिले आप' करत दोघांचीही गाडी सुटुने जाते.
प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत's picture

10 May 2008 - 8:49 am | मुक्तसुनीत

"सेकंड चान्स्"चा व्यत्यास ! :)

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 9:17 am | प्रभाकर पेठकर

'तो' त्यांचा पहिला चान्स असतो.
दुसरी गाडी येते (सेकंड चान्स) तेंव्हा ते पहिले आप - पहिले आप करीत बसत नाहीत. पटकन उडी मारून गाडी पकडतात.

पिवळा डांबिस's picture

10 May 2008 - 9:18 am | पिवळा डांबिस

जाको राखे साईंयां, मार सके ना कोय!!!

कधीकधी सेकन्ड चान्स इज बेटर द्यान फर्स्ट चान्स!!

-पिवळा डांबिस

मुक्तसुनीत's picture

10 May 2008 - 9:19 am | मुक्तसुनीत

डांबिसखानचा प्रतिसाद त्याच्यासारखाच : दुर्दम्य आणि दे धडक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2008 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला दुसरी संधीच अधिक मिळते. पहिल्या संधीला ब-याचदा मी पात्रच नसतो.
निसर्गाने याबाबतीत आमच्यावर जरा अन्यायच केला आहे. आमच्यापेक्षा पहिली संधी मिळवणा-याच्या बाबतीत देवाने त्यांना भरपूर 'दानं'
टाकली आणि मग शिल्लक आम्हाला दिली. :)

विकास's picture

10 May 2008 - 6:07 pm | विकास

विषय एकदम आवडला...

पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही. त्यात आपण म्हणता तसे लिहायचे ठरवले तर आत्मचरीत्रच होईल की काय अशी भिती वाटते :-)

आपण म्हणता तसे प्रवेशासंदर्भात माझे ही झाले होते जरी "शून्य" गुणांनी झाले नसले तरी किरकोळ फरकाने. त्यावेळेस तो प्रकार खूप मोठा, वयाला अनुकूल अस्वस्थ करणारा होता. आज लक्षातपण नाही....

बाकी अमेरिकेत राहून काही अनुभवातून आणि बरेच पाहून या संदर्भात लक्षात आलेले म्हणजे:

winner never quites and quitter never wins (ह्याचा अर्थ रडीचा डाव करायचा असा नाही, पण जिद्दिने प्रयत्न करायचे इतकाच

when going gets tough, tough gets going . असे अनेक खर्‍या अर्थी भारतात पण विविध क्षेत्रातील आदर्श दिसतील - लता, आशा, भिमसेन, धिरूबाई, इंदीरा गांधी, अटलजी (८४ साली त्यांना सारे देश मे एक भिकारी अटलबिहारी अटलबिहारी असे म्हणले गेले होते), - हे पटकन डोक्यात आले...

करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात

या संदर्भात मात्र गदीमांच्या ओळी आठवतात :

सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून घेई रानी, आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी

आनंदयात्री's picture

12 May 2008 - 11:38 am | आनंदयात्री

पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही.

पण सेकंड चान्स हा अविभाज्य घटक आयुष्याचा हे खरेच, या लेखाने "सेकंड चान्स" ने आपल्याला काय काय दिले याचा अंदाज आला, यापुढचे सेकंड चान्स जरा जास्त सिरिअसली घेतले जातील :)

'चिमणरावाचे चर्‍हाट' ह्या पुस्तकात चिमणराव जसे म्हणतात "काड्यापेटीतली पहिली काडी ओढली ती विझली, दुसरी ओढली तीही विझली म्हणून मग तिसरी न ओढता एकदम चौथी ओढली!" ;)
त्याचप्रमाणे कित्येक वेळा मी पहिली संधी हीच दुसरी आहे असे समजून घेतली! :)

असो विनोदाचा भाग सोडला तर एक-दोनंच नव्हे तर आयुष्य हे संधींनी पुरेपूर भरलेलं असतं असं माझं मत. गतानुगतिकतेमुळे आपण कित्येकवेळा संधी समोर दिसत असूनही नाकारतो आणि नाकर्ते होतो त्यावेळी आपल्यातल्या कल्पकतेचा एक अंश मारुन टाकत असतो. तथाकथित उच्चशिक्षिततेमुळे आपण चाकोरीत फिरायला शिकतो की काय असे मला बर्‍याचवेळा वाटून जाते.
महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच वेळी मला गणितासारख्या हातखंडा विषयानेच दणका दिला त्यावेळी धाबे दणाणले आणि संधी गेल्याची भावना मनात येऊन गेली पण नंतर त्याच विषयाचा जोरदार अभ्यास करुन मी विद्यापीठात त्या विषयातले सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालो आणि दुसर्‍या संधीचं महत्त्व मनात ठसलं.
मी स्वतःचा सुरु केलेला धंदा अनेक प्रयत्न करुनही बंद करावा लागला त्यावेळी असेच वाटून गेले की 'आता पुढे काय'? पण जरा वेगळ्याच क्षेत्रातली एक संधी पुढे आली आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यानेच एक छानदार वळण घेतले ते आजतागायत!

अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"
आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!"

चतुरंग

१००००००० % सहमत.
२० मार्च , २००८ ची संध्याकाळ. एक तातडीचे काम दिले माझ्या व्यवस्थापकाने.
प्रचंड अडचणी आल्या एका साध्या सोप्या कामात. याच क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांशी संपर्क साधला , पण कोणाकडेच त्या कामाला उपयोगी पडतील अशी प्रणाली मिळाली नाही.
अख्खी रात्र कार्यालयात काढावी लागली. च्यायला आपले डोकेच सरकले.
म्हटले , काही तरी नवीन उपाय शोधायला पाहीजे. २-३ दिवस विचार करण्यात , जालावर माहिती शोधण्यात गेले.
४थ्या दिवशी सकाळी उत्तर सापडले.
१००-१५० ओळींच्या प्रणालीला , १० ओळींची सोपी पर्यायी प्रणाली तयार झाली.

"संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"....... हा विश्वास अधिकच दृढ झाला.

प्राजु's picture

15 May 2008 - 4:32 pm | प्राजु

अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"
आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!"

आवडलं...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

10 May 2008 - 6:24 pm | शितल

चतुर॑गजी,
तुमची प्रतिक्रिया खुप छान आहे.
जे होते ते चा॑गल्यासाठीच होते, हे मी जेव्हा जेव्हा पहिल्या स॑धीला हुकले त्या त्या वेळी मनात ठासले.
दुसरे ही पर्याय खुप छान असतात हे मला पटले. :)

कलंत्री's picture

10 May 2008 - 6:41 pm | कलंत्री

माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 6:48 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

भावनिक विश्वात तुमचे म्हणणे १०० टक्के मान्य व्हावे. पण व्यावहारिक जगात संधी शोधाव्या लागतात, त्यांचे सोने करावे लागते.

विजुभाऊ's picture

10 May 2008 - 6:45 pm | विजुभाऊ

पडेन , पण पडून रहाणार नाही !"

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 4:42 pm | विसोबा खेचर

आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! :)

आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही!

एक मात्र खरं, की जी काही मिळायची आहे/मिळणार आहे ती वेळोवारी मिळावी, नाहीतर तिची वाट पाहता पाहता आयुष्याचा संधीकाल जवळ यायचा! :)

बाकी मुक्तराव, चर्चाविषय मस्त आहे. ही संधी तुम्ही बरी घेतलीत! :)

आपला,
(संधीसाधू) तात्या.

विकास's picture

15 May 2008 - 3:10 pm | विकास

>>>आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही!

आपल्या विधानांत "संधी" शब्दाचे अनेक वचन आल्याने वरील वाक्ये वाचताना वेगळाच अर्थ वाटल्याने अंमळ गोंधळलो :-))

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 4:16 pm | विसोबा खेचर

हा हा हा! :))

आपला,
तात्या शांताराम.
(टी. शांताराम)

राजे's picture

11 May 2008 - 11:19 pm | राजे (not verified)

"लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस"

लाईफ - जिवन !
मागील वर्षीच मी व माझी नवीन बुलेट.

एक आठवडाच झाला होता बुलेट घेऊन... माझे मित्र मला शिव्या देत होते .. लेका तू चार हाडाचा सापळा... व ही भली मोठी बुलेट... जोडी जमत नाही लेका ! पण मीच त्याना समजावले की दणकट आहे म्हणून घेतली आहे !

बुलेट घेतली म्हणून रात्री रुमवर पार्टी चालू होती मी जरा अती जास्तच घेतली व एका मित्रा बरोबर भांडलो... नशे नशे मध्येच माझेच घर... रुम सोडून मी सरळ बाहेर आलो व बुलेट चालू केली... फक्त इतकेच आठवते...

दुसरा दिवस ... >> रविवार सकाळ सकाळी सगळे मित्र जमा !
काय झाले रे ... सकाळ सकाळी माझ्या कडे कसे ? मेहता अंकल नी सरळ न काही विचारता कानाखाली जाळ काढला व म्हणाले " आदमी है या जानवर ! रात को कहा गया था ? "
मी जरा चरकलोच... च्यायला... विक्या बरोबर भांडलो व बुलेट चालू केली ... पण पुढे काय ? डोके काही चालेना व काही आठवेना ! सगळ्याची रात्र मला शोधण्यात गेली होती... व शेवटी पोलिसांना कळवणे बाकी होते.

मेहता अंकल म्हणाले " जरा निचे जा. बुलेट देख अपनी "
मी पळतच गेलो व जे पाहीले ते जन्म भर न विसरण्यासारखे !
हेड लाईट गायब.... पुढील रीम ला बेंड... मागील रीमचे तुकडे तुकडे .... एक बाजूचा गाडीचा रंग उडालेला... सायलेंन्सर गायब....
काहीच कळेना ! काय झाले होते मी गेलो कुठे होतो.. बुलेट बरोबर झाले काय.... आलो कसा परत... बुलेट वरुनच परत आलो तर ही बुलेट चाललीच कशी.... मागचे चाकाची रीम तर तुटलेली होती.. बर मला कुठे ही जरा ही खरचटले देखील नव्हते... मग हा हाल बुलेटचा झालाच कसा !

सर्विस सेंटर च्या कारागीराने सांगितले " साब, आपने पता नहीं कैसे गाडी चलायी है.. पर एक बात है.. शुक्र करो भगवान का ! यह बुलेट थी !"

त्याच वेळी मी कानला खडा लावला दारु व गाडी ..."नो वे"
त्याच वेळी पाठीमागून मेहता अंकल म्हणाले " तुम्हे दुसरा चान्स मिला है बेटा "

खरोखर दुसरा चान्स !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मुक्तसुनीत's picture

12 May 2008 - 2:41 am | मुक्तसुनीत

राज साहेब यांच्या सारख्यांच्या बाबतीत "दुसरा चान्स" सारख्या गोष्टींचे स्वरूप फुटकळ ठरते. त्यांच्या आयुष्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात लिहीलेली गाथा आम्हा सर्वांनी वाचलेली आहे. आमच्यासारख्यांची जी नळाची धार ती त्यांच्या बाबतीत धबधबा आहे ! आणि नदीचा प्रवाह बदलत रहावा तसे त्यांच्याबाबतीत झाले आहे. कसला फुटकळ दुसरा चान्स बोलताय राव , इथे रोजचा दिवस एक नवा प्रयोग आहे आणि रोज एका नव्या प्रदेशाची मुशाफिरी आहे :)

भडकमकर मास्तर's picture

12 May 2008 - 11:08 am | भडकमकर मास्तर

ते वाहतूक नियम ८८ चे कलम १८५ पुन्हा आठवले...( ते आकडे असेच काहीसे होते...चू.भू माफ करा)

अरुण मनोहर's picture

15 May 2008 - 6:59 am | अरुण मनोहर

राजकारणी नेत्यांना तर मतदार दुसराच काय पण तिसरा चवथा, पाचवा कितीतरी चान्स देतात. ते काय दिवे लावतात ते दिसतेच आहे. आता मतदार असहाय म्हणायचे की नेते निगरगट्ट?