आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?
आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
१. राहुल/राखी च्या स्वयंवराला येणार्या इच्छुक वधू/वर आणि त्यांचे कुटुंबीय - सगळ्या जगाकडून हसू करून घ्यावे असे त्यांना का वाटावे? राखीचे चे मुरके, रडणे किंवा रागावणे त्यांना लोभसवाणे वाटले की काय! आणि सावंत बाईंचे लाजऱ्या भारतीय वधूचे रूप, (कलात्मक पद्धतीने अंग उघडे टाकले असले तरी) आपण खरे आहे असेच मानले ना. आता सगळ्याचे उत्तर चॅनेल साठी टीआरपी आणि भाग घेणाऱ्यांसाठी पैसे आणि प्रसिद्धी आहे असे समजून घेतले की झाले! पण खरंच ही प्रसिद्धी हवी आहे का खूप जणांना?
२. बऱ्याच वाहिन्यांवर असणारे "दादागिरी", "रोडीज" किंवा "स्प्लिटस्व्हीला" सारखे सत्याचे असत्य खेळ. एकमेकांना वाट्टेल तसे बोलावे, वाट्टेल तसे वागावे, कट कारस्थाने करावी, दुसऱ्याचे पाय ओढावेत, अशा सर्व गुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम, त्यात भाग घेणे म्हणजे परम भाग्य! निडर, शूर वगैरे स्वत:ला समजावे व प्रेक्षकांना तसे बजावून सांगावे. पण आपण बापडे प्रेक्षक.. आपल्याला ते तसे जबरदस्त न वाटता मूर्ख वाटले तरी आपल्याला विचारतो कोण? भाग घेणारे एका बाजूला तर संचलन करणारे तर विशेषच. ती कोण सोनाली म्हणे "बिच" आणि तिचे कर्तृत्व काय तर घालून पाडून बोलणे.. वर ही कुप्रसिद्धी हेच कौतुक.. अशा आपल्या व्याख्या बदलल्या कधी? बेमुर्वत आणि बेफाम बोलणे म्हणजे करमणूक असे त्यांना वाटते... पण आपल्याला?
३. आपले सिनेमा सितारे हिंदी सिनेमात काम करतात पण हिंदी बोलत नाहीत, भारतीय आहेत पण भारतीय दिसत नाहीत, यांना आवडते कॅव्हीयर आणि यांची असते चीज आणि वाइन पार्टी! यांच्या लकबी, वागण्या बोलण्याची पद्धत, काही काही म्हणून भारतीय दिसू द्यायचे नाही असा यांचा हट्ट असतो. असे का झाले आहे आपले?
४. सभ्यता हद्दपार - आजच्या सिनेमातील दृष्ये, बक्षीस सोहळे संचलन करणाऱ्यांचे बोलणे या सगळ्यातून सभ्यता निघून चालली आहे. अनेक चित्रपटात गरज नसताना टॉयलेट मधली दृष्ये, एकूणच नैसर्गिक विधी समोर ठेवून केलेले विनोद यांची गर्दी झालेली दिसते. अंग उघडे टाकण्याविषयी तर न बोललेलेच बरे. शरीराचा बराचसा भाग उघडा ठेवणारे कपडे घालताना आपण नक्की काय मिळवू पाहतो आहोत? आधुनिकता, मुक्ती की केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून केलेली तडजोड?
५. वृत्त वाहिनी- हे जरी गुणी बाळ असले तरी तेही बरेच अवगुण शिकले आहे थोड्याच वेळात.. बऱ्याच वाहिन्यांवर सर्वाधिक जोर असतो तो सिनेमा केंद्रित बातम्यांचा, मग त्यात ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते. मुलाखत घेणाऱ्याकडे विषयाचे पुरेसे ज्ञान असावे अशी अपेक्षा तर ठेवायचीच नाही. बर सिनेमाविषयी कार्यक्रम हे फक्त वर्तमानाशी निगडित, भूतकाल पूर्ण विसरून जायचा. रणबीर कपूर उगवता तारा, म्हणून ऋषी कपूर तेवढा आठवायचा, सैफचा सिनेमा आला की शर्मीला टागोर आठवायची. पण ज्यांचे आत्ताच्या जगताशी बंध नाहीत त्यांना मात्र पूर्ण विसरायचे. थोडक्यात, दर्जा पेक्षा खळबळ जास्त महत्त्वाची. आपण प्रेक्षक इतके मठ्ठ आणि फक्त वरवरच्या बातम्यांचे भुकेले आहोत का हो?
बरं कसे आहे की हे सगळे नवीन विचार आणि आचार आणि आपले ते जुने टाकाऊ, संकुचित विचार असे म्हणायची पण सोय नाही. कारण हा आमचाही काळ आहे. फरक आहे तो दृष्टिकोनामध्ये. मला खरंच आश्चर्य वाटते, कुठे गेली आपली शिकवण.. संयम ठेव, विवेकाने वाग, खरे बोल, कशाचाही अतिरेक करू नको, जीवन जग, हव्यास सोड, सभ्यता, शुचिता, सुशीलता ह्या सगळ्या गोष्टी, जगण्याचे तंत्र जमवून देणारी भारतीय तत्वद्य्नानाची बैठक, कुठे गेली? हा हक्काचा वारसा उधळून देऊन आपण आपले हे काय करून घेतले आहे??
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 9:41 pm | प्रियाली
तुमचे शुद्धलेखन आणि लेखाची मांडणी चांगली आहे. लेखात विरामचिन्हांचा सुकाळ नसल्याने वाचता आला. मिपावर स्वागत!
इथेच आहे पण टिव्हीवर नसावी. टिव्ही बघणे बंद करा, इतर अनेक गोष्टी दिसून येतील आणि डोक्याला नसते ताप होणार नाहीत.
4 Aug 2010 - 10:34 am | मदनबाण
तुमचे शुद्धलेखन आणि लेखाची मांडणी चांगली आहे
वा... छान !!! ;)
3 Aug 2010 - 9:42 pm | गणपा
एक आगावु सल्ला : बंद करा तो टिव्ही आणि मिपा उघडुन बसा.
हां पण काही धाग्यांच्या वाटेलाही जाउ नका नाही तर कालचाच टिव्ही बरा होता म्हणायची पाळी यायची. :)
3 Aug 2010 - 9:49 pm | चतुरंग
>>>>हां पण काही धाग्यांच्या वाटेलाही जाउ नका नाही तर कालचाच टिव्ही बरा होता म्हणायची पाळी यायची.
टीवीवरच्या कित्येक फालतू 'सीरिअल किलर्स'पेक्षा आपले मिपावरचे हे धागे कितीतरी पटीने निखळ आहेत!
मी तरी एवढा कित्येक दिवसात हसलो नव्हतो! =))
3 Aug 2010 - 10:52 pm | पांथस्थ
सच बात...मै भी भोत हसा
3 Aug 2010 - 9:59 pm | शिल्पा ब
कशाला एवढा टी व्ही बघायचा तो...त्यापेक्षा मराठी संस्थळे उघडून पहा...छान छान वाचायला मिळेल..
पण गणपा म्हणतात त्याप्रमाणे जरा जपूनच नाहीतर अजून तुमचंच डोकं दुखायचं..
3 Aug 2010 - 10:00 pm | महानगरी
मला सल्ला हवा आहे असा गैर समज झालेला दिसतो आहे.. पण ते असो
3 Aug 2010 - 10:13 pm | गणपा
बर बॉ आमचा आगावु सल्ला मागे घेतो.
वा वा!! अदगी छान लिहिलयत. माझ्याच मनातले विचार मांडलेत तुम्ही.
लेखकाशी/लेखिकेशी बाडिस.
3 Aug 2010 - 10:19 pm | विनायक प्रभू
अगदी मस्त अरण्यरुदन.
3 Aug 2010 - 10:34 pm | मृत्युन्जय
ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते.
सलमानचा फ्लु आणि ऐश्वर्याची साडी असे म्हणायचे आहे का तुम्हाला? नाही म्हणजे सलमान एरवी शर्ट सुद्धा घालत नाही तो साडी नेसणे म्हणजे जरा जास्तच होते नाही का?
बाकी सलमान साडीमध्ये कसा दिसेल? जाऊदे अजुन पुढचे विचार नाही करत.
3 Aug 2010 - 11:20 pm | पांथस्थ
हहपुवा =))
4 Aug 2010 - 9:55 am | महानगरी
अशाच बातम्या होत्या, गरजूंनी शोध घ्यावा !
मुळात लेखाचा उद्देश लोकांच्या ह्या बदलत्या अभिरुचीवरच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात असा होता, पण तो अर्थातच असफल झालेला आहे.
4 Aug 2010 - 1:33 pm | मृत्युन्जय
माफ करा तुमचा उद्देश असफल व्हावा हा उद्देश नव्हता.
प्रामाणिकपणे सांगु का की तुमचा उद्देश म्हणावा तेव्हढा सफल का नाही झाला ते? तुम्ही फक्त प्रश्न मांडले. उत्तरे नाही दिलीत. हे असे आहे ते तसे का आहे आणि आपल्याला तसे होऊ नये असे वाटत असेल तर काय केले पाहिजे हे पण जर सविस्तरपणे सांगितले असतेत तर कदाचित जास्त साधकबाधक चर्चा झाली असती. अजुनही होउ शकते.
जे लिहिले आहे ते सगळे बरोबर आहे. पण त्याच्यावरचा उपाय दुर्दैवाने आपल्याला महिती नाही. गणपाने लिहिले आहे टीवी बंद करा म्हणुन. खरे सांगायचे तर तेच आपल्या हातात आहे. कारण समाज बदलण्याची ताकद मिडीयामध्ये असते. पण मिडीया बदलण्याची ताकद समाजात असते असे नाही वाटत. खालच्या दर्जाची करमणुक तुम्हाला आम्हाला आवडत नसेलही कदाचित. पण ती आवडत असणारा मोठा वर्ग आज अस्तित्वात असणार नक्की. त्यामूळेच अश्या बातम्या येतात, असे चित्रपट येतात. नाईलाज आहे.
अकबर - बिरबलाची एक गोष्ट आहे एकदा अकबर बिरवल आणि अकबराची एक बेगम (अकबरच तो अनेक बेगमा असणारच त्याच्या. ही त्यातली एक) एकत्र बसले असताना बेगमेला वारा सरतो. अकबराला यामुळे बायकोची एकदम घ्रुणा वाटते आणी तो तिला मृत्युदंड फर्मावतो. बिरबल ते ऐकुन व्यथित होतो. तो अकबराला म्हणतो खाविंद शिक्षा योग्या दिलीत आता अंमलबजावणी देखील योग्य व्यक्तीच्या हातुन झाली पाहिजे. तर असे करा की मृत्युदंड अश्या कुठल्यातरी व्यक्तिच्या हातुन द्या ज्याला कधीच वारा सरलेला नाही. हे ऐकुन बादशहा खजील होतो आणि मृत्युदंड रद्द करतो.
आपण सगळे वारा सरलेले आहोत. संयम , विवेक, सत्यशीलपणा, सभ्यता, शुचिता, सुशीलता य सगळ्या गोष्टी आयुष्यात कधी ना कधी तरी प्रत्येकाने सोडलेल्या असतात. ज्याला आपण "चीप पब्लिसिटी" म्हणतो अश्या बातम्या आपणही कधीतरी ऐकलेल्या असतात. चीज आणि वाईन पार्ट्यांचे सुप्त आकर्षण आपल्यालाही असते. अंगप्रदर्शन कधी ना कधीतरी आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावरती आपणही चवीने बघतो. ऐश्वर्याची १२ लाखाची साडी आणि सलमानची बॉडी (माफ करा पण किमान सलमानच्या साडीत तरी मला काहीही ईंटरेस्ट नाही. तसा तो ऐश्वर्याच्या साडीतही नाही) सगळ्यानाच थोडाफार ईंटरेस्ट असतो. शेवटी सिनेमा काय कि मिडीया काय समाजाचा आरसा असतात. जे सगळ्याना आवडते ते दाखवतात ते.
आभिरुची ही जशी उच्चा असते तशीच ती मध्यम आणि नीच पण असु शकते आणि मला तरी मनापासुन असे वाटते की प्रत्येक मणसामध्ये ३ही प्रकरच्या अभिरुची असत्तात. कधी कुठली उफाळुन येइल त्यावर सर्व अवलंबुन आहे.
थोडक्यात मॅजोरिटी समाजाला जे आवडते तेच सगळ्यांसमोर येणार. पटत नसेल तर टीवी बंद करणे हा एकमात्र उपाय आहे
4 Aug 2010 - 2:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण तुला सलमानच्या बॉडीत थोडाफार का होईना इंटरेस्ट आहे??
4 Aug 2010 - 2:14 pm | मृत्युन्जय
अग म्हणजे तशी बॉडी कमावण्यात. एरवी आम्हाला ऐश्वर्याच्या आणि कॅटरीनाच्या बॉडीत जास्त ईंटरेस्ट आहे. :)
4 Aug 2010 - 2:55 am | Dhananjay Borgaonkar
टी.व्ही बरोबर रीमोट आला असेलच. वापरा की मग.
4 Aug 2010 - 11:18 am | लिखाळ
अंशतः सहमत आहे. लोकांना आवडते असे सांगुन टिव्हि मालिकांमध्ये जे दाखवतात ते मला आवडत नाही. त्या वरुन मी टिव्हि वाल्यांच्या टार्गेट ग्राहकांत बसत नाही इतकेच मला वाटते.
'घर घर की कहाने' छाप मालीकांमध्ये जे दाखतात ते अभावानेच कुठल्या घरात घडत असावे. असो..
मागणी तसा पुरवठा हे बाजारी तत्व आहे आणि त्या प्रमाणे बाजारपेठ घडते हे मला तितकेसे पटत नाही. लोकांसनोर पर्याय नसल्याने आहे त्यात निवड करुन लोक करमणुक करुन घेत असतात असे वाटते.