वहाणा

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
20 Dec 2007 - 10:40 am
गाभा: 

प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष.

ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा (कितीतरीव्यांदा ! ) वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.

वर उधृत केलेले वाक्य केवळ पायातल्या "वहाणां"बद्दलचे नाही हे वेगळे सांगायला नकोच. इथे "प्रवास" जो आहे तो आपल्या आयुष्याचा आहे आणि "वहाणा" आहे एक रूपक : आपल्या तत्त्वांचे , जपलेल्या मूल्यांचे , बर्‍यावाईट श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे. उराशी बाळगलेल्या भल्या-बुर्‍या , भाबड्या आणि बनेल कल्पना , आदर्शवादी आणि हिशेबी विचारांचे. ज्याचे आयुष्य प्रवासात आहे त्याला सतत आपल्या वहाणा बदलाव्या लागतात. त्याच प्रमाणे जी व्यक्ति तर्कांच्या , तत्वांच्या , सिद्धांतांच्या कसोटीवर येणार्‍या दिवसाला घासून पाहते , "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" अशी वृती ठेवते तिला आपले श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे गाठोडे बर्‍याचदा उलगडून बघावे लागते ; जुनेरी काढावी लागतात आणि नवी वसने घालून पुढील मुक्कामाला जावे लागते.

कमी अधिक फरकाने आपण सर्वानी हा प्रवास केलाय्. आपल्यापैकी अनेकांचा हा प्रवास अजून चालू असेलच - कळत नकळत.

आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो.

स्वतःबद्दल सांगणे अवघड. त्यातून जर अनेक वर्षे लढलेला विचारांचा बालेकिल्ला कधी कोलमडला असेल तर त्याबद्दल सांगणे फारच कठीण , याची मला जाणीव आहे. पण जमेल तसे आपण सगळे लिहू शकू असे मला वाटते...

माझ्यापुरते बोलायचे झाले तर काही भ्रम-निरासाचे ("व्हाणा" तुटण्याचे ) क्षण आठवतात. बर्‍यापैकी गुण मिळवून कॉलेजात आलो. एकदम इंग्रजी माध्यमामध्ये. त्यावेळी , अकरावीमधे उडालेल्या दांड्यांच्या वेळी "मायमराठी"च्या प्रेमाचा भंग झाल्याचे अजूनही लख्ख आठवते.
महाराष्ट्राचा नागरिक म्हणून शिवसेना-भाजप युतीने केलेला भ्रमनिरास अजून चांगलाच लक्षात आहे. पाच वर्षे काय हे लोक सत्तेवर आले ; सगळ्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडून गेला ..

अजून विचार करू जाता अजूनही काही आठवेल. येथील अनुभवी लोकानी थोडे सविस्तर लिहीले तर आनंद वाटेल.

प्रतिक्रिया

रम्या's picture

20 Dec 2007 - 5:12 pm | रम्या

अज्याबात काय कळलं न्हाई!

ऋषिकेश's picture

20 Dec 2007 - 7:52 pm | ऋषिकेश

वहाणा!!.. रुपकच जबरदस्त आहे!!! शेवटी जी ए. ते जी ए. :)

माझ्यापुरतं बोलायचं तर नव्या वहाणा यायचे दिवस मी जास्त लक्षात ठेवतो. जेव्हा शाळेत गेलो तेव्हा वहाण बदलली पण फारसं लक्षात नाही, पण साळा सोडल्यावर मात्र एक मायेची वहाण मागे सारून समाजाच्या प्रवाहात वाहत नेणार्‍या पाणबूड्याच्या वहाणा घातल्या की काय असा भास झाला. पुढे नोकरी नंतर आपल्या पायावर उभं राहील्याची जाणीव करून देणारी वहाण, अमेरिकेत आल्यावर स्वतंत्रततेची, तरीही संयत स्वायत्ततेची वहाण अश्या अनेक वहाणा सांगता येतील.
शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण!

फार मनस्वी मुस्त प्रकटन. अजून येऊ द्या!
-ऋषिकेश

मी ऋचा's picture

23 Jul 2010 - 5:15 pm | मी ऋचा

>>शेवटी आपलं वहाणं चालू ठेवते तीच खरी वहाण!

१ नंबर!! =D>

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2007 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आयुष्याचे रुपक "वहाणा " आवडले.

ज्ञानोपासकाला शोभेल अशाच त-हेने जीवन जगलेल्या जी. ए. च्या लेखनातला खालील उल्लेख आम्हाला फार आवडतो. ( तशा त्यांच्या काही भुमिका आवडत नाही तो भाग सोडून द्या )

" माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे..... सर्वत्र पसरलेल्या झळझळीत सूर्यप्रकाशात क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वत:चा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेतील एक गोपुर तरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिला आहे. मी येत असता माझे हात रिकामे दिसले, तरी ते नाहीत. त्यांच्या बोटांना मरव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेतांना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांच्या एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे "

अशा प्रकारच्या महाकाव्यात्मक वाक्ये वाचतांना वहाणांशिवाय आयुष्यातला प्रवास अधिक सुखकर होतो असे आमचे मत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

20 Dec 2007 - 10:29 pm | विसोबा खेचर

आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो.

हम्म! आम्हीदेखील आमच्या आयुष्यात काही वहाणा बदललेल्या आहेत! लिहूच त्यावर केव्हातरी सवडीने!

चर्चाविषयाची कल्पना आवडली! येथील लोकांनी आपापल्या बदललेल्या, तुटलेल्या, झिजलेल्या वहाणांबद्दल किंवा कोर्‍या करकरीत वहाणांबद्दलही अवश्य सांगावे!

अवांतर - आंतरजालीय क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सध्या आम्ही मनोगताची वहाण बदलून मिसळपावची वहाण घातली आहे! हादेखील एक वहाणबदलच! :)

तात्या.

धोंडोपंत's picture

22 Dec 2007 - 5:34 pm | धोंडोपंत

अप्रतिम........

आम्हांला वाटतं की जगण्यासाठी प्रत्येकाला वहाणा बदलायलाच लागतात. वहाण बदलली नाही तर जगणेच मुश्किल होईल. पण आपण वहाण बदलतोय हे समजण्याच्या जाणीवेचा अभाव अनेकात असतो, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही.

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू.

भक्तिमार्गातही वहाणा बदलण्याचे 'भाग्य' आम्हाला लाभले आहे.

"संत समजून काल मी गेलो...भेटला शेवटी दलाल मला".....

हा अनुभव आल्यामुळे आम्ही ती वहाण स्वतः होऊन बदलली.

आपला,
(मोची) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

22 Dec 2007 - 6:36 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हालाही अनेकदा इच्छा नसतांनाही वहाणा बदलायला लागल्या आहेत. व्यवसायात आजपर्यंत आम्ही दोनदा त्या बदलल्या. कदाचित आत्ता वापरतो आहोत ती ही बदलू.

खर आहे धोंडोपंत, आम्हाला ही इच्छा असताना पण अनपेक्षीत वेळी वहाण बदलावी लागली. शासनाने पाय भाजू नये इतपत पातळ वहाण दिली आहे. पण पुढच्या प्रवासासाठी ती कितपत टिकेल याबद्द्ल साशंक आहे. ईमायनाच्या टायरचा सोल मारुन घ्यावा म्हणतो.
(ईमाईनाच्या टायर असलेल्या मोचीच्या शोधात)
आमची वहाण http://bintarijagat.blogspot.com येथे आहे.
प्रकाश घाटपांडे

एखादा सन्माननीय अपवाद वगळतां बहुसंख्य समाजाने नीतीच्या व सदाचरणाच्या वहाणा उतरवल्या आहेत. सध्या मी आय डेअर हे किरण बेदीचे भाषांतरित चरित्र वाचतो आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांचे वर्तन, न्यायमूर्तींचा निर्णय. चौकशी आयोगाच्या न्यायमूर्तीचे डावपेच वगैरे वाचून मन विषण्ण होते. तरीहि सरकरी कचे-यात कधीकधी ध्यानीमनी नसतांना भले अधिकारी भेटतात. उदा. तिनईकर, खैरनार वगैरे. जी. एं. चे भाष्य कसे सार्वकालिक आहे हे नक्कीच अनुभवास येते.

क्रेमर's picture

23 Jul 2010 - 3:36 am | क्रेमर

आवडले.

-(अनवाणी (हे असे कंसात लिहिणे मजेदार आहे)) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
बाकी चालू द्या.

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 2:13 am | शिल्पा ब

चालायचच....याला जीवन ऐसे नाव का काय म्हणतात तसं..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

हर्षद आनंदी's picture

23 Jul 2010 - 2:24 am | हर्षद आनंदी

स्वतःचा आणि फक्त स्वःहीताचा विचार करत फायदा बघुन या पक्षातुन त्या पक्षात जाणार्‍यांना कावळ्यांना कुठल्या 'वहाणा' लागु होतात?
किंबहुना त्यांना वहाणांचा प्रसाद का देऊ नये? ~X( ~X( ~X( ~X(

आम्हाला बंधनात अडकायची चिड असल्याने, पाय मो़कळेच ठेवतो..
वहाणा सारख्या बदलाव्या लागल्या तरी हरकत नाही.. पण एका वेळी एकच वहाण!!
आणी जी. ए. . :O :O फार फार तर त्यांच्या वहाणेपाशी पोचता येईल.. बाकी बघु पुढच्या जन्मी.. 8} 8}

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

रेवती's picture

23 Jul 2010 - 2:30 am | रेवती

वा!!
छानच लिहिलय!

रेवती

राजेश घासकडवी's picture

23 Jul 2010 - 4:03 am | राजेश घासकडवी

आयुष्यभर शोधून वहाणा सापडत नाहीत, मिळतात त्या तात्पुरत्या, लगेच झिजून जातात... ही खूप रोमॅंटिक कल्पना आहे. नियतीने ज्याला खाण्याआधी उंदरासारखं खेळवलेलं असावं अशा कोणाची ही जीवनदृष्टी मला वाटते. जीएंची सर्वच पात्रं बहुधा तशीच असतात. असाधारण म्हणूनच अविस्मरणीय.

सर्व साधारण माणूस फारतर चपलेला नवीन अंगठा लावतो, मजबूत सोल लावून घेतो... अगदी सर्व भाग हळुहळू बदलले तरी काहीतरी एक 'तीच चप्पल'पण राहातं, थोडं उत्क्रांत होत जातं इतकंच. काही नवीन खोल्या, बदललेलं कुंपण, बागेतली बदलणारी झाडं, नवीन आणलेली उपकरणं, अधूनमधून काढलेले रंग यातूनही एक 'घरपण' टिकून राहावं तसं.

सन्जोप राव's picture

23 Jul 2010 - 5:27 am | सन्जोप राव

एक स्वच्छंदी, काहीसे स्वैर आयुष्य जगताना पायातल्या किती वहाणा बदलल्या याचा ताळमेळ लावणे अशक्य आहे. जे जे ज्या ज्या क्षणी वाटले, ते करुन मोकळा झालो. त्यावर विचार नंतर केला (आणि पस्तावलोही!). आयुष्यात अनेक नोकर्‍या केल्या आणि सोडल्या. काही वेळा नोकर्‍यांवरुन काढून टाकले गेले. हजारो उलाढाली केल्या. तत्वे संभाळली, त्यांना मुरड घातली, आणि त्यावर खंतावलोही. हृदये गुंतवली आणि मोडून घेतली.मते बनवली आणि बदलली. स्वतःच्या मस्तीत जगलो. शेवटी काय, 'काय लुटुनि नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले!'
सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

शुचि's picture

23 Jul 2010 - 6:57 am | शुचि

आईनी दिलेल्या वहाणा एकदाच फक्त एकदाच बदलल्या. खूप त्रास झाला. पण नसत्या बदलल्या तर जास्त त्रास झाला असता.

बाकी वहाणा कधीच बदलाव्या लागल्या नाहीत. "शेल्टर्ड" आयुष्य गेलं. गिव्हन अ चॉईस - मनस्वी आणि तरीही रेखीव आयुष्य आवडेल. माझ्या नातवंडांना कुशीत घेऊन अभिमानाने सांगता येईल असं पॅशन आणि प्रेमाचा झरा असलेलं, स्वाभिमानी आणि एक स्वतःचं व्यक्तीमत्व असलेलं. पण तशा आयुष्याकरता - यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दुसर्‍यांच्याच वहाणा नेहमी सुन्दर वाटल्या.
भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही.

नावातकायआहे's picture

23 Jul 2010 - 11:29 am | नावातकायआहे

उशिरा का व्हयना व्हाणा बदलल्या म्हनुन आमि बदलल्लो
नाय तर काय खर न्हवत...
आता हायेत त्याच व्हाणा डाग्डुजि करत का व्हयना कडे परयन्त वापरायच्या

सहज's picture

23 Jul 2010 - 3:04 pm | सहज

लेख अतिशय आवडला.

बरेचदा संयम, तारतम्य याचा आख्ख्या गावात स्टॉक कमी आहे असे का वाटते? जर उत्तर माहीत असली तरी त्याचा रिझल्ट का दिसत नाही?

मग वस्ती पासुन दुर आलो आहे व इथे आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम घडवुन आणणारे घटक अतिशय कमी आहेत म्हणून इथेच टाका तंबू..

छोड आये हम वो गलीया....

स्वाती फडणीस's picture

23 Jul 2010 - 5:22 pm | स्वाती फडणीस

:)

आमोद शिंदे's picture

23 Jul 2010 - 6:17 pm | आमोद शिंदे

फारच सुंदर छोटेखानी स्फुट म्हणावं असा लेख. बर्‍याच जणांना अंतर्मुख करुन विचार करायला लावले त्यातच ह्या लेखाचे यश आहे. तुमच्याकडून असेच आणखी लेख वाचायला मिळोत.
शुभेच्छा!

उपास's picture

23 Jul 2010 - 6:32 pm | उपास

मुसु साहेब मुक्तक आवडले..
वहाणा.. मी का बरं घातल्या त्या? केव्हापासून?
असा तर अनवाणीच फिरायचो.. पण मग मार्गातले काटे कुटे, घाण, धूळ, चिखल बघून मन विषण्ण व्हायचं.. सगळ्या मार्गातलं हे असं सगळं धुवून साफ करण शक्य तर नाही मग आपल्यापुरता उपाय काय तर ज्या पायांना हे लागतं आणि माझ्यापर्यंत पोहोचत त्या पायांपासून हे सगळं रस्त्यातलं वाईट लांब ठेवायचं. माझ्या पायांचा रस्त्याशी कायम संपर्क म्हणून रस्ता साफ करण्यापेक्षा पायांना वाहाणात सुरक्षित ठेवायचं. कधी कधी हिरवळीवर उतरून पायी चालायचा मोह झाला की मग द्यायच्या (तात्पुरत्या) वाहाणा भिरकावून.. :)
पण मग झालं काय हळू हळू की वाहाणांचीच सवय लागली, इतकी की त्याशिवाय रस्त्यावर फिरता येईना.. पायही कमालीचे नाजूक बनले.. एक वेळ उघड्या माळरानावर काट्याकुट्यात अनवाणी धावत होतो ह्यावरचा विश्वास उडाला.. आणि आयुष्य कमालीच भौतिकवादी बनून निसर्गापासून लांब गेल्याची जाणीव झाली.. वाहाणांचे जसे फायदे झाले तसे हे तोटेही..
पण हो, एक नक्की.. वाहाणा बदलल्या, बदलायलाच हव्या होत्या.. पाऊल जस मोठं होऊ लागलं तसं वाहाण त्रास द्यायला लागली.. पायाखालची क्षितिजं विस्तारली आणि वाहाण्या रुंदावल्याच..
आणि आता.. वाहाणा माझी साथ सोडत नाही आणि मी त्यांची सोडणार नाही हे कळून चुकलय.

उपास मार आणि उपासमार

चतुरंग's picture

23 Jul 2010 - 10:13 pm | चतुरंग

वहाणा बदलतात. बदलाव्या लागतात. कधी स्वेच्छेने कधी मजबूरीने.
कधी बदलल्याचे सुख असते कधी दु:ख. आपल्याला आवडलेली वहाण घालता येईलच दरवेळी असेही नाही, काही जोडे घेताना तडजोडी असतातच.
आत्तापर्यंतच्या प्रवासात काही राहून गेले जे पुन्हा कधी मिळण्याची आशा नाही त्याचे दु:ख जरुर आहे पण खंत नाही कारण खंतावण्याचा स्वभाव नाही.
आता मुलगा मोठा होताना त्याच्या पायाला आपली वहाण आली की मग सगळे संदर्भ बदलणार आहेत हे समजते. जास्त जोमाने आपल्याला त्याच्याबरोबर धावावे लागणार हे ही लक्षात येते. मग मी अधिक चांगल्या आणि मजबूत वहाणा कुठच्या हे शोधायच्या मागे लागतो!

(जस्ट डू इट!)चतुरंग

विनायक प्रभू's picture

23 Jul 2010 - 10:31 pm | विनायक प्रभू

जस्ट डू इट

मुक्तसुनीत's picture

24 Jul 2010 - 10:29 am | मुक्तसुनीत

कुणाच्यातरी व्रात्यपणामुळे हा धागा वरती आला खरा. पण सर्वांचे प्रतिसाद मला आवडले. काही लोकांनी दोन ओळीत आपली कैफियत सूचित केली आहे. सन्जोपरवांचा प्रतिसाद म्हणजे अलिकडच्या काळात त्यांनी लिहिलेले उत्तम लिखाण वाटले (अशा गोष्टी नेहमी इतक्या लहान का असतात. ) "यु हॅव्ह टू लिव्ह लाइफ ऑन योअर टर्म्स. जे मी जगले नाही." किंवा "भरीत भर म्हणुन मग खालीच बघून चालायची सवय लागली. त्यामुळे चाललोय कुठं ते कधी कळलंच नाही." यासारख्या एखाद दुसर्‍या ओळीत त्यात्या प्रतिसादकर्त्यांनी मनातल्या अगदी तळात दडलेले सत्यकथन केल्यासारखे वाटले.

"क्षण एक पुरे" च्या चालीवर म्हणावेसे वाटते : या अशा मोजक्या प्रतिसादांकरता शेकडो वैयक्तिक मानापमान नि सुंदोपसुंदीचे धागे माफ करावे.

सन्जोप राव's picture

24 Jul 2010 - 7:42 pm | सन्जोप राव

हा जर व्रात्यपणा असला तर तो स्वागतार्ह आहे. असले लिखाण वरचेवर वर येत राहिले पाहिजे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है