मनश्री

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
3 Jun 2010 - 10:40 am

मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो.

तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात….. कधी देवाच्या विचित्र न्यायानं……तर कधी आईवडीलांच्या अथक परिश्रमानं तर कित्येकदा मनश्रीच्या कौतुकानं….!! जन्मापासूनच जगण्यासाठी झगडणार्‍या मनश्रीची कथा काळजाचा ठाव घेते.

पुस्तक हातात घेतल्यापासून हातातून अगदीच ठेववत नाही. जन्मापासून इतकी complications असूनही तिच्या आईवडीलांनी तिच्यासाठी घेतलेली मेहेनत मनश्रीनं अगदी सार्थ ठरवली. तिच्या अपंगत्वाला तिने तिच्या यशाच्या आड कधीच येऊ दिलं नाही. प्रत्येक वेळी तिचा positive attitude तिच्या यशाची वाट सुकर करत गेला. खूप अनुभवातून तावून सलाखून निघाल्यावर सोनं जसं जास्त झळाळतं…….तसंच मनश्रीचं आयुष्यही उजळून निघालं. ह्यात तिचे आई-वडील, बहिण, आजी, आजोबा ह्यांचा अखंड सहयोग आणि मेहेनत अजिबात नाकारता येणार नाही.

प्रत्येक प्रसंगात तिचा हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी वाखाणण्यालायक आहे. स्वत:च्या अपंगत्वाचा तिने कधीच बाऊ केला नाही किंवा फायदा सुद्धा घेतला नाही. राष्ट्रपतींच्या हातून “बालश्री” सारखा अत्युच्च पुरस्कार मिळवूनही तिच्यातला साधेपणा तसाच राहिला हे विशेष !!

मध्यंतरी झी टिव्ही वर “ह्याला जीवन ऐसे नाव” मधे मनश्रीवर एक खास एपिसोड झाला तेव्हा तिच्याकडे बघून तिचं, तिच्या आईवडिलांचं खरंच खूप कौतुक वाटलं !! हे पुस्तक वाचून जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो….!! निसर्गावर चक्क मात केलीये ह्या मनश्रीनं….!!

मनश्रीला तिच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!

जीवनमानसमीक्षा

प्रतिक्रिया

वेदश्री's picture

3 Jun 2010 - 11:02 am | वेदश्री

अरे वा! संग्रही असावे असेच पुस्तक दिसतेय हे. पुस्तकाची पूर्ण माहिती देऊ शकाल का? जसे की प्रकाशन, किंमत, पुण्यात कुठे मिळू शकेल वगैरे..

मनश्रीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 11:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताईनेही आधी मनश्रीची ओळख करून दिली होतीच. कितीही वेळा वाचलं तरीही स्फूर्तीदायक वाटावी अशीच आहे मनश्री!

अदिती

वेदश्री's picture

3 Jun 2010 - 11:26 am | वेदश्री

लिंक दिल्याबद्दल धन्यवाद, अदिती.