लेयनार्डो द विन्ची ह्या गुढ व्यक्तिमत्वाबद्दल जितके लिहावे तितके थोडे. त्याची अनेक चित्र पॅरीसच्या लुव्र म्युझियममधे तसेच इतरही युरोपमधिल म्युझियममधे आहेत. असेच एक म्युझियम म्युनिकमधे आहे- Alte Pinakothek. त्यात लेयनार्डो द विन्चीने काढलेले मुळ चित्र "The Madonna of the carnation" (1478–1480) संग्रहीत आहे.
त्याच्या ह्या चित्राबद्दल त्या चित्राचा आराखडा, रंग, इतर साहित्य व त्याची विचारधारणा ते चित्र काढतांना कशी बदलत गेली ह्याचा नुकताच त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला होता व एक खास कक्ष निर्माण करुन अभ्यासक व प्रेक्षक/चाहत्यांना ती माहिती खुली केली होती.
खालील लेख मी त्याभेटीवेळेस लिहून घेतलेल्या माहितीवर अवलंबून आहे. त्यांनी सगळी माहिती जर्मनमधे लिहिली होती; त्यामुळे तेथील प्रक्षकांना व स्वयंसेवकांना विचारुन-विचारुन हे माहितीचे तुकडे गोळा केले होते; ते एकसंध करण्याचा बराच प्रयत्न केला आहे. तरीही सगळे न लिहिता लेयनार्डो द विन्चीने ते चित्र ज्या रंगांनी काढले, ते रंग त्याने कसे बनवले होते, वगैरे महिती मला जास्त आवडली व तीच येथे देत आहे. मिपाकरांना ती आवडेल असे नक्कीच वाटते.
लेयनार्डोने रंगांचा (म्हणजे रंग तयार करण्याच्या प्रक्रियेचा) खूप प्रचंड अभ्यास व प्रयोग केले होते; त्याची हस्तलिखीते ह्याचा पुरावा आहेत. चित्रातील बारकाव्यांसाठी त्यातील वस्तू व व्यक्ति ह्यावर प्रकाशाचा परिणाम योग्यतऱ्हेने साधण्यासाठी त्याने गडद रंगापासून- फिकट रंगछटा तयार करण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली असे. वरील चित्रातील वस्त्रे, व्हर्जिन मेरीचे केस, फूलदाणी ह्यातील रंगछटा पाहिल्यातर वरील गोष्टीची खातरजमा करता येते. त्याने अक्षरशः भिंग घेऊन अतिशय बारीक ब्रशने त्या चित्रातील हे प्रकाश-छायेचे खेळ साकारले आहेत. त्यामुळे हे चित्र पाहतांना त्रिमीतीचा भास होतो.
त्याकाळी रंग बनवितांना धातू (सोने वगैरे), रंगीत खनिजं अतिशय बारीक भूकटी करुन त्यात वेगवेगळ्या वनस्पतींच्या बियांपासून काढलेली तेलं टाकून प्रयोग केले जायचे हे सर्वश्रुत आहेच. अगदी अंड्याच्या योकचाही वापर केला जाई. हे करतांना ते रंग योग्य छटा-संगतीचे, न ओघळणारे, चटकन सुकणारे, ब्रशने पसरवण्यायोग्य, वाळल्यानंतर भेगा न जाणारे, नंतर रंगाची छटा न बदलणारा व रंगांतील खनिजांच्या बारीक कणांना चिकटवून ठेवणारा असे गुणधर्म कसे मिळतील ह्याची चित्रकारांना चिंता असे. अर्थातच प्रत्येक चित्रकार त्याकाळी रंग बनविण्यात वाकबगार असे. पण ह्या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम नक्की कसा असेल ह्याची प्रचिती त्यांना घेण्यास कित्येक दिवस लागत. पांढरा व निळा रंग पिवळसर पडणे हा ही त्याकाळचा एक मोठा त्रासदायक प्रश्न असे. त्यामुळे अनेक सुरुवातीची चित्र, लेयनार्डो व त्याचे इतर समकालिन चित्रकार ह्यांची, पाहिली असता त्यातील कला व रंगकाम हे कसे टप्प्याटप्प्याने प्रगत होत गेले- त्यांचीच समज कशी वाढत गेली हे स्पष्ट पाहता येते.
खनिजांच्या बारीक कणांना चिकटवून ठेवण्यासाठी लिन्सीड, वालनट तेल १५ व्या शतकात वापरायला सुरुवात झाली. रंगछटा येण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जात. स्माल्ट (a coloring agent made of blue glass produced by fusing silica, potassium carbonate, and cobalt oxide, used in powdered form to add color to vitreous materials.), गर्द निळे असे अझुराईट नावाचे तांब्याचे खनिज असे पदार्थ अनेक भानगडी करुन मिळवले जात. इतर रंगांसाठी तांबडे, लाल, पिवळे, तपकिरी, हिरवे अशी स्फटीकं जमीनीतून शोधून ते वापरले जात. काही अनैसर्गिक रंग-खनिज उत्पादन करुन मिळवली जात असे लेड-पांढरा, लेड-टीन पिवळा, काळा. एका रुबिया नामक वनस्पतीच्या मुळांपासून तांबडा रंग मिळवत असत. [एका गडद तपकिरी रंगाबाबत त्याचा संबंध इजित्पीशियन ममीज पर्यंत जातो असे काहीसे तो मला सांगत होता पण मला ते नीटसे कळले नाही.]
अशा अनेक कष्टदायक प्रक्रियेतून जेव्हा हे रंग तयार झाले त्याच मुळे आजही ती चित्रे तशीच ठाशिव दिसतात. आपल्याकडील अजिंठा लेण्यातील चित्रांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. त्यांनीही नैसर्गिक स्रोतांपासून रंग मिळवून काढलेली चित्रे हे वरील उदाहरणाच्याही खूप वर्षे आधीचे. लेयनार्डो द विन्ची हा खूपच अलिकडच्या काळातला व त्यामुळे त्याच्या हस्तलिखितांतून वरील माहिती मिळते तशी अजिंठ्यातील चित्राबद्दल मिळत नाही; त्याचा अंदाज बांधता येतो.
मुझियमवाल्यांनी एक्स-रे सारख्या साधनांनी वरील चित्र तपासून त्यात इतरही बरेच संशोधन केले आहे अ वर म्हणाल्याप्रमाणे, पेन्स्लिलीने काढलेला आराखडा व नंतरचे चित्र, काही खाडाखोड, बदललेले रंगकाम हे सगळे त्याची वेगवेगळी फोटोरुपे घेऊन त्या कक्षात मांडली होती त्यामुळे एका चित्राचा वेगळ्याच नजरेने अभ्यास करता आला.
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 9:58 pm | मदनबाण
छान लेख...
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
29 Aug 2009 - 10:28 pm | अनामिक
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. धन्यवाद!
-अनामिक
29 Aug 2009 - 10:55 pm | चित्रा
लेख आवडला. लेखामागचे प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहेत.
धन्यवाद.
30 Aug 2009 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते
लेख वाचून असेच वाटले. लेख उत्कृष्टच आणि त्यामागची मेहनतही वाखाणण्याजोगी.
बिपिन कार्यकर्ते
29 Aug 2009 - 11:10 pm | अजय भागवत
आता आठवले, त्यांनी जी खनिजं वापरली जायची त्याचे काही तुकडे नमुन्यादाखल तेथे ठेवल्याने ती माहिती मनात घर करुन राहिली.
30 Aug 2009 - 12:09 pm | पाषाणभेद
छान लेख. एकुणच जुन्या काळी कलेत किती कष्ट होते ते समजते.
या लेखाव्दारे मला एक दुराव्याचा प्रश्न पडला, आज आपण फोटो काढणे ही एक कला म्हणतो. आपल्या मिपावरही अनेक जण कला म्हणून आपले फोटो दाखवतात. खरेच फोटोग्राफी ही कला आहे का? मला तर फोटो काढणे म्हणजे काहीतरी तांत्रीक बाब वाटते.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 1:08 pm | अजय भागवत
"या लेखाव्दारे मला एक दुराव्याचा प्रश्न पडला, आज आपण फोटो काढणे ही एक कला म्हणतो. आपल्या मिपावरही अनेक जण कला म्हणून आपले फोटो दाखवतात. खरेच फोटोग्राफी ही कला आहे का? मला तर फोटो काढणे म्हणजे काहीतरी तांत्रीक बाब वाटते."
ह्यातील प्रश्न खूप मार्मिक आहे. लेखाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. आत्ता इतकेच म्हणता येईल की, तांत्रिक बाबी माहिती असणे हे "नो-हाऊ" असेल तर कला ही "नो-व्हाय्/व्हेन" अशा "विस्ड्म" वर जाते.
एखाद्या क्षणाचा धवल-शामल फोटो अधिक सुंदर कलात्मक दिसेल की सप्तरंगात, हे ठववण्याच्या क्षमतेला कला म्हणता येईल का?
30 Aug 2009 - 1:41 pm | पाषाणभेद
मी या प्रश्नाला दुराव्याचा आहे असे म्हटले होते. तरीही आपल्या उत्तराने गोंधळ अधीकच वाढला. आपला अधीकार बघता आपण म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र लेख येवू द्यात.
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगाबद्दलची माहिती दिल्याबद्दल धन्यू... चित्रातील रंगांचा विचार आला तेव्हा अजिंठ्यांच्या चित्रांची आठवण झाली. लेखाबद्दल धन्यवाद...!
-दिलीप बिरुटे
30 Aug 2009 - 1:37 pm | सहज
आवडला.
अजुन येउ दे.
30 Aug 2009 - 3:54 pm | अजय भागवत
सिन्नरजवळ गारगोटी नावाचे एक संग्रहालय आहे - http://www.superbminerals.com/gargoti-museum-page16.asp
तेथे अनेक प्रकारची स्फटीकं पहावयास मिळतात. त्यावरुन अंदाज येऊ शकेल की, रंग बनवण्यासाठी ह्या खनिजांचा वापर कसा व का केला गेला.
30 Aug 2009 - 5:23 pm | पाषाणभेद
हे खाजगी कमर्शीयल संग्राहालय (??) आहे. तिकीट रू १०० च्या वर आहे.
त्या पेक्षा आपली सह्याद्रीची रांग डोळे उघडून बघा. अनेक चांगल्या मानवी स्वभावाचे तसेच खडकातील मिनरल सापडतील.
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 4:04 pm | दत्ता काळे
माहितीपूर्ण लेख आवडला.