बारामती येथे कोसळलेल्या 'व्हीटी-एसएसके' (VT-SSK) या लियरजेट ४५ बिझनेस विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रभर दुःख, आवेग आणि शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दादांविषयी व सहप्रवाशांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.
विमान रनवेवरून घसरले असेल, अपघात होता होता टळला, अशा बातम्यांची अपेक्षा होती; पण हळूहळू वास्तव स्वीकारावे लागले. मन तयार नसले तरी, जे घडू नये ते घडले. आठ आसनी विमानाच्या दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान ही घटना घडली, असे बोलले जात आहे.
अपघात कसा घडला असेल याबाबत विविध शक्यता आणि कुशंका व्यक्त होत असताना, प्रथमदर्शनी पायलटचा निर्णय चुकला असे वाटत आहे. मानवी चूक कोणाकडूनही होऊ शकते, हा काही कोणावर 'ब्लेम' करायचा विषय नाही. पण भविष्यात अशा चुका टाळता येऊ शकतात का? या विमान अपघातावेळी नेमकं काय काय घडलं? ब्लॅक बॉक्समधून काही हाती येतं का? तपशील नंतर येतीलच.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी (२८ जानेवारी) एक निवेदन जारी करून, बारामती येथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला आहे. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी ८:४४ वाजता, एटीसीला (ATC) रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) कडे सोपवण्यात आला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
एटीसीची (ATC) जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे:
२८ जानेवारी २०२६ रोजी विमान 'VI-SSK' ने सकाळी ८:१८ वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला. यानंतर विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं. या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की, सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारण ३००० मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर विमानाने 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली; मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी 'गो-अराउंड' केला. गो-अराउंडनंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता, क्रूने पुन्हा 'रनवे ११' वर अंतिम अप्रोच घेत असल्याची माहिती दिली. रनवे दिसल्यास कळवण्यास सांगितले असता, क्रूने "सध्या रनवे दिसत नाही, दिसताच कळवू," असं सांगितलं. काही सेकंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली. यानंतर सकाळी ८:४३ वाजता विमानाला 'रनवे ११' वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, क्रूकडून लँडिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पायलटला रनवे दिसला नाही, हीच अधिक शक्यता वाटत आहे. चुकीच्या ठिकाणी उतरत आहे असे वाटत असताना, विमान तंत्र भाषेत 'स्टॉल' (Stall) होणे, त्यामुळे काही फुटेजमध्ये एक पंखा वर झाल्याचे दिसते; यामुळेच हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पहिला राऊंड मारून झाल्यानंतर, दुसऱ्या वेळीही तीच परिस्थिती होती असे वाटते. त्यामुळे पुन्हा दुसराही राऊंड घेतला असता आणि 'विमान उतरवणे शक्य नाही', असा स्पष्ट स्टँड पायलटने घेतला असता आणि विमानाने घिरट्या घेऊन अन्य कोणत्या विमानतळावर विमान उतरवले असते, तर ही घटना टळली असती असे वाटून जाते. अर्थात, निर्णय प्रक्रियेत 'जर-तर'ला काही अर्थ नसतो.
विमानतळावर आधुनिक तंत्रज्ञान सोयी-सुविधांचा अभाव. पायलटवर विमान उतरवण्याचे एक आंतरिक दडपण आणि अशा असंख्य गोष्टी या घटनेमागे असू शकतील. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
डीजीसीए दुवा
प्रतिक्रिया
30 Jan 2026 - 11:58 am | गवि
आतापर्यंत जाहीर झालेला किंवा समोर आलेला घटनाक्रम तुम्ही चांगल्या रीतीने मांडून चर्चेला सुरुवात केलीत याबद्दल धन्यवाद.
प्रसंग खूपच वाईट आणि भीषण आहे.
पण राहून राहून तो टाळता आला असता असं वाटतं. फायनल अप्रोचवर स्टॉल हे एक क्लासिक आहे. या प्रकारचे असंख्य अपघात आधी घडून गेले आहेत.
30 Jan 2026 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण या विषयातील जाणकार आहात, आपला काही या विषयावर धागा दिसेना म्हणून धागा काढला. तपशीलवार लिहा.
-दिलीप बिरुटे
30 Jan 2026 - 12:05 pm | मनो
गवि यांनी सांगितलेला दुसरा अपघात वाचताना हा अत्यंत महत्त्वाचा परिच्छेद सापडला. यातील नवीन गोष्ट म्हणजे circling approach stall. बारामती अपघातात दुसऱ्यांदा विमान उतरवताना वैमानिकाचे लक्ष धावपट्टी शोधण्याकडे असावे आणि ती दिसल्यावर पटकन विमान वळवून उतरवताना म्हणजेच circling approach करताना airspeed हा कमी पडणार हे लक्षात न आल्याने विमान स्टॉल झाले आणि पुरेशी उंची नसल्याने काही सेकंदात कोसळले असे मला सध्या वाटते आहे.
दुसऱ्या २०१७ सालच्या अपघाताचा मूळ इंग्रजी लेख
https://admiralcloudberg.medium.com/how-not-to-fly-a-plane-the-2017-tete...
As for the immediate cause, pilots and controllers who witnessed the crash were largely in agreement that this was a classic case of a circling approach stall. Will Ramsey and Jeffrey Alino were hardly the first pilots to attempt a circle-to-land maneuver from too close to the runway, banking too steeply and stalling the airplane — in fact, such accidents happen relatively frequently in general aviation and small charter operations. For example, in 2021, another business jet crashed at Tahoe Truckee Airport in California, killing all 6 people on board, after stalling during maneuvers for a circling approach. In these types of accidents, pilots become fixated on the runway and attempt to maneuver toward it without ensuring that they have sufficient airspeed to accomplish a steep turn without stalling. These crashes are simple and preventable, but they continue to happen for a variety of reasons, including insufficient training, hubris, and lack of knowledge of previous accidents.
3 Feb 2026 - 5:18 pm | गवि
शेवटी जो अचानक एका बाजूला रोल झाला त्याची अनेक कारणे असतात पण मुख्य:
- अचानक एका बाजूचे इंजिन बंद होणे किंवा पॉवर लॉस.
किंवा
- रनवेशी अलाइन होताना लक्ष खूपच तिकडे वळले तर एअरस्पीडकडे काहीसे दुर्लक्ष होऊ शकते. जमिनीच्या जवळ लँडिंग अगदी आवाक्यात आले असताना एअर स्पीड तसाही कमी कमी करत आणलेला असतो. अगदी पाचेक फुटावर आल्यावर स्टॉल वॉर्निंग आली तरी तिकडे फारसे लक्ष देत नाहीत. कारण तेवढ्यात विमान टेकणारच असते. तर शंभरेक फुटांवर रनवे सेंटर लाईनशी अलाईन होण्यासाठी, विशेषतः ती नीट दिसत नसल्यास, बरेच कॉन्सेंट्रेशन लागते. त्यावेळी एअर स्पीड कमी झाला आणि स्टॉल झाला तर रिकव्हर व्हायला उंची उरलेली नसते. आणि स्टॉल झाल्यावर विमानाच्या पृष्ठभागांवर (कंट्रोल सरफेसेसवर) हवेचा प्रवाह इतका कमी होतो की आतून कंट्रोल हलवून देखील त्याचा परिणाम नगण्य होतो. (विसाविशीत इफेक्ट). त्यामुळे रोल किंवा स्पिन देखील रोखणे अत्यंत अवघड जाते.
30 Jan 2026 - 1:15 pm | कंजूस
वैमानिकाचा आत्मविश्वास नडला आणि चूक लक्षात आल्यावर "oh s**t" उद्गार बाहेर पडले ते रेकॉर्ड झाले. अन्यथा "संकटात आहे"चा संदेश त्याने पाठवलाच असता.
-----------------------------
{तिकडे कोलकात्याहून आलेली एक राजकीय टिप्पणी* लक्षात घेऊन } शरद पवार बोलले की यावर राजकारण नको, अपघातच होता.
#* - अजितदादा पवार एनडिए सोडून परत मविआकडे वळत आहेत म्हणून .....
30 Jan 2026 - 1:34 pm | हणमंतअण्णा शंकर...
>> वैमानिकाचा आत्मविश्वास नडला <<
हा आत्मविश्वास नसून प्रेशर असावे असा माझा अंदाज आहे. अजित पवार यांच्या स्वभावाकडे पाहता ही रिस्क घ्यायला त्यांनी लावली असावी का? हे देवालाच ठाऊक.
परंतु अशा स्ट्रिप न दिसण्याची रिस्क असताना देखील केवळ अंदाज घेऊन लँडिंग करणे प्रचंड धाडसाचे म्हणावे लागेल.
30 Jan 2026 - 2:27 pm | कंजूस
लॅंडिगचे दोन तीन प्रयत्न वैमानिक करू शकतो... पण आपण हे करून टाकू...https://youtu.be/O9-k8TV1K3c?si=kwLhWgSbnBT5FpVo
31 Jan 2026 - 7:57 am | प्रचेतस
ज्येष्ठ विमानतज्ज्ञ आणि माजी वैमानिक गवि ह्यांच्या तपशीलवार प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
1 Feb 2026 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बारामती २८ जानेवारी २०२६ रोजी या अपघातग्रस्त विमानाच्या वेगाबद्दल बोलल्या जात आहे. लँडींगच्या वेळी जास्त वेग असल्याचे समोर येत आहे. जमीनीपासून ५०० फूट अंतरावर असतांना विमानाचा वेग १८३ नॉट्स होता जो योग्य मर्यादेपेक्षा ( १०६ ते १३५ ) खूप जास्त होता, असे नोंदवल्या गेले आहे. अपघाताचे हेही एक कारण असावे काय ?
-दिलीप बिरुटे
1 Feb 2026 - 3:20 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
मला वाटतं की वैमानिक द्वितीय भूगमनाचा प्रयत्न रहित ( second landing attempt cancel ) करीत असावा. पण विदा हाती नसल्याने ही केवळ अंधारातली अटकळ आहे.
प्रत्यक्ष विदाबद्दल कोणतेही प्रसारमाध्यम बोलतांना दिसंत नाही. चालायचंच. फ्लाईटअवेअर वर विदा उपलब्ध नाही : https://uk.flightaware.com/live/flight/VTSSK
कोणी जाणकार इथे उड्डाणविदा वा त्याचा दुवा प्रकाशित करेल काय?
आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2026 - 5:31 pm | गवि
आता सर्व होऊन गेल्यावर इथे बसून जजमेंट देणे चूक (मी माझे म्हणतोय) पण तरीही एक विचार येतो की एकदा रनवे नॉट इन साईट असे घडले, विशेषत: लो व्हिजीबिलिटी आणि ILS नसणे याचे कॉम्बिनेशन. त्यात एअर ट्रॅफिक कंट्रोल हा स्थानिक फ्लाइंग स्कूल खेरीज अन्य कोणताही उपलब्ध नसणे... या सर्व परिस्थितीत एकही extra प्रयत्न करणे टाळायला सर्वच ट्रेनिंगमध्ये शिकवले पाहिजे. धाडस हा इथे गुण नाही ठरत.
2 Feb 2026 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली
विमान अपघातावेळी 'धुकं नव्हतं तर तिथं धोका' होता, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय; आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली शंका
https://marathi.abplive.com/news/politics/ncp-mla-amol-mitkari-expressed...
3 Feb 2026 - 3:39 pm | कांदा लिंबू
प्रा डॉ,
गविंना मी विनंती केली होती; तुम्ही धागा काढला हे चांगले केलेत. सध्या उपलब्ध असलेली माहिती चांगली शब्दांकित केलीत.
(दुर्दैवाने!) उत्सुकतेने धागा वाचतो आहे पण माझ्याकडून काही भर घालण्याची क्षमता नाही. केवळ पोच पावती देऊ शकतो.
गवि,
सावकाश दिलेत तरी चालतील, पण तुमच्या माहितीपूर्ण विश्लेषक प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहे.
3 Feb 2026 - 5:08 pm | गवि
या धाग्यावर योग्य विवेचन आणि चर्चा सुरू आहे. अजून काही विशिष्ट फॅक्ट्स समोर आल्या की लिहिण्याचा प्रयत्न करेन.
या अपघातातील सर्व बिंदू हे एका आधी घडून गेलेल्या लियरजेट विमानाच्याच अपघाताशी विलक्षण साम्य दाखवणारे आहेत. फायनल लेगमध्ये स्टॉल होणे हा खूपदा घडणारा अपघात आहे.
त्या विशिष्ट अपघाताबद्दल वर मनो यांनी माहिती दिली आहे.
3 Feb 2026 - 3:41 pm | कांदा लिंबू
मटण करी खाऊन हाडके टाकणाऱ्या भुजबळांकडे विमान अपघाताच्या या गंभीर धाग्यावर तरी दुर्लक्ष केलेलेच बरे.
3 Feb 2026 - 4:36 pm | अमरेंद्र बाहुबली
नका लगेच जळजळ व्यक्त करू. (अजुनतरी) तुमच्या आवडत्या लोकांवर कुणीही आरोप केलेले नाहीत!
3 Feb 2026 - 5:25 pm | गवि
अपघाताच्या जागी पब्लिक, म्हणजे सामान्य नागरिक पहिल्या दिवसापासून हिंडताना फिरताना अनेक व्हिडिओ आणि रील्समध्ये दिसत आहेत. अनेक कागद उडून इकडे तिकडे गेलेले आणि लोकांनी हाताळलेले दिसले. विमानाचे असंख्य छोटेमोठे भाग त्या एरियात विखुरले होते. त्यातली एखादी जळालेली वायर, एखादा झिजलेला स्क्रू किंवा अनेक इतर भाग हे अपघाताचे कारण शोधताना अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतात. एरवी अशा जागी सुरुवातीपासूनच सक्त बॅरिकेड्स लावली जातात किंवा अन्य उपायांनी ती जागा सुरक्षित ठेवली जाते. इथे तसं दिसलं नाही. किती लोकांनी आठवण म्हणून किंवा सहज म्हणून तिथले काय काय गोळा केले असेल ते सांगता येत नाही. अनेक व्हिडिओजमध्ये पार्टसचे आणि इतर अवशेषांचे क्लोज अप्स दिसत होते. मृतदेह इत्यादींच्या बाबत तर असंवेदनशीलतेचा कळस दिसला अनेकदा.
3 Feb 2026 - 5:41 pm | अमरेंद्र बाहुबली
Sanjay Raut on Ajit Pawar Death: अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात अपघात झाला; संजय राऊतांच्या शंकेने राजकारणात खळबळ
https://marathi.abplive.com/news/politics/sanjay-raut-suspicion-over-aji...
3 Feb 2026 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली
ममता बॅनर्जी, अमोल मिटकरी, त्यानंतर संजय राऊत ह्यांनी ह्या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. मागील ५ वर्षात ३ विमान अपघातात अनुक्रमे बिपीन रावत, विजय रुपाणी आणी अजित पवार ह्यांचे अपघाती निधन झाले आहे.
3 Feb 2026 - 7:05 pm | गामा पैलवान
लोकहो,
एक विनंती आहे. बारामतीतल्या गोजुबावीत 'आयुष्मान आरोग्य मंदिर' नेमकं कुठे आहे ते कोणी गूगल नकाशावर दाखवेल काय? सदर अपघाताशी संबंधित दृश्ये या इमारतीच्या समोरून टिपलेली आहेत. या दृश्यांत वरील अक्षरे स्पष्ट दिसतात.
आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2026 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्यमान आरोग्य मंदिर नेमकं कुठंय ते खाली प्रतिसादात दाखवले आहे बघा
फूटेजपासून सहाशेफूटावर काळजीपूर्वक पाहिलं तर, रनवे स्पष्ट दिसतोय.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2026 - 8:39 pm | गणेशा
माझं बारामती मधील घर airport पासून ५ ते ७ km पण लांब नाही, आणि माझे गाव तेथून १२ km वर आहे.
मी हे खात्रीशीर सांगू शकतो, बारामती एअरपोर्ट हे खडकाळ - माळराना वर आहे, आणि धुक्याचा आमच्या येथे काही संबंध या दिवसांत तरी नसतो.. सकाळी ७ ला तर स्पष्ट दिसते सर्व..आणि तिथे बोललो असता, घरच्यांचे म्हणणे आहे सकाळी स्पष्ट वातावरण होते.
ती जी CCTV वाली इमारत दिसते ती PHC (सरकारी दवाखाना) आहे असे मला वाटते आहे..
जे झाले त्या बद्दल वाईट वाटते आहे.. पण याचा पट उलगडने अवघड आहे...
3 Feb 2026 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
------वैमानिकांना सांगण्यात आलं की, सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारण ३००० मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.
VFR flight Requiremnets नुसार दुश्यमानता साधारणत पाचहजारच्या मिटरच्या खाली असल्यास अशा विमानतळावर उतरवता येत नाही किंवा परवानगी नसते अशा वेळी दृश्यमानता तीन हजार मिटर असताना पायलटची चूक झाली आहे, असे एक्सपर्टचे मत आहे.
दुसरी गोष्ट अशी की, 'शंका असल्यास गो-अराउंड करा' असे विमानवाहतुकीचे ब्रीदवाक्य आहे. बहुतेक एअरलाईन्समध्ये असे अलिखित धोरण असते की, जर दोन वेळा प्रयत्न करूनही विमान उतरवता आले नाही, तर तिसऱ्या प्रयत्नाऐवजी विमान दुसऱ्या जवळच्या विमानतळावर वळवले जाते. ( वैमानिकाने ठरवायचं आहे, असे म्हणू ) तरीही, विमान उतरवताना जेव्हा चूकीचं होतंय असे लक्षात आल्यावर विमान लीफ्ट करण्याच्या प्रयत्ना स्टॉल झाला.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2026 - 10:08 pm | गवि
बारामती हा शंभर टक्के पूर्णवेळ VFR विमानतळच आहे.
अगदी. हेच करायला हवे होते. पण त्यांना नेमके काय वाटले आणि आत काय घडत होते ते सांगणे कठीण. लँड झालेच पाहिजे असे प्रेशर किंवा ताण पायलट्सनी कधीच घेऊ नये. पण मनुष्य स्वभाव म्हणून तसे अनेकदा घडू शकते. दोन प्रयत्न करून देखील उतरता न आल्यास जणू काहीतरी पराभव अशी स्टुडन्ट पायलटची मानसिकता असते. पण १५००० तास उड्डाण झालेल्या व्यक्तीची ? शंकाच आहे.
4 Feb 2026 - 10:22 am | कंजूस
१. समजा घातपात असता तर वैमानिकाला काही विचित्र गोष्टी घडताना दिसल्या असत्या आणि त्याने मदतीचा संदेश दिलाच असता.
२. पहिल्या वेळी तो धावपट्टी संपता संपता ठेकल्याने तो बेत रहीत केला.
३. दुसऱ्या वेळी तिरपा ( non aligned) खूपच खाली आला आणि त्याच्या लक्षात आल्याने "ओ शिट" असे उद्गार काढले. जेव्हा माणूस स्वतः चुकतो तेव्हा असे पटकन बोलले जाते. आता विमान वर घेता येणार नाही हे इतक्या अनुभवी वैमानिकाला माहीतच असते.
४. शिवाय दादांना लवकर उतरवण्याची घाई त्याच्या डोक्यात होतीच. अगोदरच पायलट बदलण्यात उशीर झालेला होता हे त्याला माहीतच होते.
या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे ही घटना.
बाकी या अगोदरचे राजकारण घडत होते त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यात उडी घेऊन अगाथा क्रिस्तीच्या रहस्यकथेसारखी बतावणी चालवली आहे.
4 Feb 2026 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली
पायलात ओह शिट बोलला/ बोलली असे कुठे नमूद करण्यात आले आहे? ब्लैक बॉक्स रेकॉर्ड्स अजून बाहेर आलेले नाहीत.
4 Feb 2026 - 11:40 am | गवि
तेवढेच दोन शब्द कोण्या अधिकारी किंवा प्रवक्त्याने जाहीर केले होते प्रेसकडे.
4 Feb 2026 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॉकपिटमधील सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द "Oh Shit" होते, असे म्हणतात.
शेवटच्या क्षणी काहीतरी अत्यंत अचानक आणि धोकादायक घडले आहे म्हणून उत्स्फूर्त निघालेला तो शब्द असावा पण हा शब्द उच्चारला गेला याला सध्यातरी काही आधार दिसत नाही.
-दिलीप बिरुटे
4 Feb 2026 - 1:09 pm | अमरेंद्र बाहुबली
हेच म्हणतो! काहीही आधार नसलेल्या अनेक
गोष्टी पुढे केल्या जाताहेत!
4 Feb 2026 - 7:54 pm | कंजूस
28/29 जानेवारीच्या कित्येक बातम्या पाहा. मी आता पुन्हा तपासले हीच बातमी आहे. Cockpit voice recorder मधले शेवटचे शब्द कॅप्टन जान्हवी पाठकचेच आहेत ओ शिट ओ शिट. ब्लैक बॉक्स रेकॉर्ड्स बद्दल नाही. मला वाटतं विमानतळावरचा पर्यवेक्षक किंवा जो कोणी वैमानिकांशी बोलतो ते सगळे रेकॉर्डिंग लगेच उपलब्ध असते.
ब्लैक बॉक्स हा विमानाच्या विविध साहित्या देतो. उंची, वेग, आणि बरंच काही . हे सर्व विमान कंपनीला हवे असते. कशामुळे अपघात झाला हे समजण्यासाठी.
मी कुठून बातम्या पेरणार?
4 Feb 2026 - 12:32 pm | गणेशा
कंजूस काका,
माझे असे म्हणणे नाही कि हा घातपात च आहे, परंतु तुमचे मत - विश्लेषण चुकीच्या base वर वाटते आहे...
१.
समजा घातपात असता, तर वैमानिकालाच घातपातात सामील करून असे का करायला लावले नसेल? घातपातात माणुस सामील असू शकतो, राजीव गांधी च्या वेळेस पण ती व्यक्तीच मरायला तयार होती ना.. भले संदर्भ वेगळे होते..
ओ शीट हे को पायलट शांभवी बोलली, ती नसेल घातपाता मध्ये, main पायलट ने असे केल्याने, तिने मरताना असे उद्गार काढले असतील.
४.
हे आपल्याच मनाचे आडाखे आहेत.
या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे, घातपाताची शक्यता असू शकते आणि त्यात पायलट समाविष्ट असू शकतो असे का निघू नये?
असो, माझे वयक्तिक मत असे नाहीये, मी फक्त तुमचे angle खुप एकांगी आहे हे दर्शवीत होतो.. आणि ते चुकीचे आहेत.
4 Feb 2026 - 8:11 pm | कंजूस
माझे ते पायरी पायरीने वैयक्तिक तर्क आहेत.
एखाद्या जुन्या वैमानिकाला असे काम करायला लावण्यासाठी - १) त्याला खूप मोठे आमिष दाखवायला लागले असेल तर तो हे काम करेल,
२) जर शांभवी फाटक असे शब्द उच्चारते म्हणजे तिथे कॉकपिटमध्ये कुणी अतिरेकी घुसून त्या मुख्य वैमानिकाला असे करायला भाग पडत नसून कॅप्टनच्याकडून ताबा गेला, चुकला असणार. जर घातपाती माणूस असता तर ती किंचाळली असती.
या सगळ्या शक्यता आपल्या डोळ्यासमोर आणून कल्पना करून पाहा कोण कसा वागेल ते.
३) समजा एखादा बॉम ठेवला असेल आणि तो उडवण्यासाठी लँडींग गिअरला किंवा प्रक्रियेला जोडला असेल तर पहिल्या प्रयत्नातच अपघात झाला असता.
४) समजा बॉम स्फोटाने ( एक किंवा दोन) अपघात झाला तर अपघातस्थळी मिळालेल्या वस्तू या एका ठराविक बिंदू पासून दूरवर उडालेल्या सापडतील. जड आणि हलक्या वस्तू त्या प्रमाणात दूरवर सापडतील. इंधन टाकीतील इंधनाच्या धडाक्याने उडालेल्या वस्तू तशा गतीने आणि अंतराने सापडतील.
4 Feb 2026 - 8:19 pm | कंजूस
अशा विमान फेऱ्यांचे वेळापत्रक नसते. विआइपी व्यक्तिंकडून १)विमान मागवले जाणे २) ती मागणी घेऊन वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना कंपनी सूचित करते, ३) मुख्य विमानतळावर उड्डाणाची वेळेची परवानगी घेणे, ४) ती न पाळल्यास परत नवीन वेळ घेणे ही माहिती मिळाल्यास किती उशीर झाला तपासता येईल . दादा फार लवकर उठतात आणि ते तयार असणार. सकाळी सातपासून बारामतीच्या आसपास सभा घेण्याचे ठरले असणार. पण सगळी तयारी होऊन विमान उतरायला साडे आठ झाले होते. म्हणजे किती चुळबुळ झाली असेल याची कल्पना येते.
4 Feb 2026 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण घातपात म्हणूनही या घटनेकडे पाहू शकतो पण तशा क्रमवार घटनांची साखळी जोड़ता आली पाहिजे. आपण सर्व हौशी लोक आहोत. ( एक्सपर्ट अपवाद ) आपण जमेल तसे अर्थ लावू शकतो त्यात काही वाद नाही.
विमान वाहतूक मंत्री यांच्याकडे घटनेचा तपशील येईल विमान स्टॉल लॉस झाले, स्पिन झाले. पायलटच्या नियंत्रणाबाहेर विमान गेले ही मानवीय आणि तांत्रिक अशी दोघांची चुक घडून अपघात घडला असा रिपोर्ट येईल आणि आणखी एक प्रकरण इतिहास जमा होईल.
आपण सामान्य लोकांनी जमेल तसे तर्क करीत राहिले पाहिजे. आपल्या समाधानासाठी अशा गोष्टी आवश्यक असतात तेव्हा बोलते राहा.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2026 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून एक, विमान सरळ धावपट्टीवर (च) उतरत होते असे वाटत आहे. सीसीटीव्ही फूटेजवरुन पाहिलं तर रनवे दिसत आहे. ( सीसीटीव्ही फूटेजवरुनचा अंदाज) काही तरी झालंय आणि विमान फ्लिप होतंय विमान डाव्या बाजूच्या खड्ड्यात कोसळले. जर, स्टॉल झाले नसते तर, सरळ विमान धावपट्टीवरच उतरले असते. आयुष्यमान आरोग्य मंदीरापासून जो सीसीटीव्हीचा व्हीडीयो दिसतो त्यावरुन विमान धावपट्टीवरच उतरतेय असे दिसते. पण अचानक असे काय घडले डाव्या बाजूला घेण्याचे कारण काय ? काय घडले ?
ह्या अँगलकडे बहुदा कोणाचे लक्ष गेलेले दिसत नाही.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2026 - 9:55 pm | अमरेंद्र बाहुबली
बरोबर! मलाही असेच वाटले, विमान सरळ उतरत होते पण अचानक डाव्या बाजूला वळवल्या गेल्यासारखे वाटते. पण आपल्याला
ह्यातल काही कळत नाही म्हणून काय बोलायचे असे वाटले.
अगदी सरळ येत होत विमान. बाकी हा आरोग्य मंदिराचा सीसीटीव्ही शॉट खूप महत्वाचा आहे. ह्यातच कळत आहे की विमान लैंडिंग आधीच तिरके झाले आहे, हा व्हिडिओ
नसता तर कदाचित धावपट्टीवरूनच घसरलं अस रेटल्या गेल असत!
3 Feb 2026 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमान बरोबर उतरत होते 8.44 पर्यंत नॉर्मल आणि पुढील चवथ्या सेकंदाला वळून जमीनीवर धमाका.
विमान सरळ उतरले असते तर धावपट्टीवर चवथ्या सेकंदाने उतरलेच असते, घसडले असते ?
आपले हे फक्त अंदाज.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2026 - 10:12 pm | गवि
https://misalpav.com/comment/1202571#comment-1202571
3 Feb 2026 - 10:02 pm | गवि
हेतुपूर्वक घेतल्यासारखे वाटत नाही. असा रोल किंवा स्पिन हा स्टॉलनंतर होतोच अनेकदा. कंट्रोल रहात नाही. इथे अन्यत्र लिहिले आहे याच धाग्यावर. स्टॉल झाला की त्या कमी एअर स्पीडमध्ये पंख, रडर (शेपटीवरचा उभा कंट्रोल सरफेस), एलिरॉन, हॉरिझन्टल स्टेबिलायझर या सर्वांवर हवेचा प्रवाह इतका कमी होतो की आतून कंट्रोल कॉलम किंवा रडर पेडल दाबून देखील त्याचा परिणाम होत नाही.
4 Feb 2026 - 1:34 am | गामा पैलवान
खुलाशाबद्दल आभार, प्राडॉ! आता काही तुकडे व्यवस्थित जुळंवता येताहेत.
-आ.न.,
-गा.पै.
3 Feb 2026 - 10:10 pm | गवि
जे काही फोटो येत आहेत त्यावरून रनवे सेंटर लाईन अत्यंत फिकुटलेली दिसते. तिला नव्याने पेंट करायला हवे असे वाटते. तिथे फ्लाईंग क्लब आहे. विद्यार्थी रोज सतत उड्डाण आणि लँडिंग करत असतात.
3 Feb 2026 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वैमानिकाचा इतिहास ( दुवा ) ओव्हर कॉन्फीडन्स. आता विमान उतरवायचं हे प्रेशर ? आपण विमान उतरवलं नाही तर, आपल्या अनुभवाची नाचक्की त्यामुळे जे होईन ते होईन...?
-दिलीप बिरुटे
4 Feb 2026 - 7:01 pm | धर्मराजमुटके
घटनेबद्दल कितीही तांत्रिक उहापोह केला तरी त्याने शंकासुरांचे समाधान होत नाही. एका शंकेचं उत्तर द्यावं तर त्यातून पुढचा प्रश्न हजर.
अशा शंकासुरांना त्यांच्या घरातले कसे झेलतात (शुद्ध मराठीत त्यांच्याशी कसे अॅडजस्ट करतात गॉड क्नोस).
4 Feb 2026 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
काही शंकासुर आमदार खासदार मुख्यमंत्री देखील आहेत! प्रश्न पडले तरलोकांनी प्रश्नच विचारायचे नाहीत का?
4 Feb 2026 - 9:10 pm | धर्मराजमुटके
नक्कीच विचारा. पण त्यातुन तुम्हाला हवे तसेच उत्तर मिळाले नाही तर मोकळ्या मनाने कबूल करुन पुढे जाणार काय ? कारण शंकासुरांचे समाधान कोणीही करु शकत नाही. आता काही जणांच्या शंका जेन्युइन असतील आणि काहींना नुसतेच भाजपा - काँग्रेस खेळायचे असते आणी काहींना घरच्यांचा देखील विश्वास नसेल. त्याला काही इलाज नाही.
4 Feb 2026 - 8:25 pm | कंजूस
शंका सुरांना बदल करण्यासाठी फारसे पर्याय नसणारच. समजा तुम्ही बस स्टॉपवर उभे आहोत. आपल्याला जिकडे जायचे आहे तिकडे जाणाऱ्या तीन चार बसेस पैकी एखादी बस येते. तुम्ही हालचाल केली नाही आणि विचार करत उभे राहिलात तर बस लगेच निघून जाते. काही क्षणांतच निर्णय घ्यावा लागतो.
4 Feb 2026 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंजूस काका, कोणतेच प्रश्न विचारायचे नाहीत असा हा काळ आहे, आपल्याला सगळं कळलं आहे, इतरांना यातलं काही कळत नाही. सगळं बरोबर आहे असे म्हणणारे समजणारे जागोजागी सापड़तील अशा वेळी आपण प्रश्न उभे करणा-यांच्या बाजूने उभे राहू..
-दिलीप बिरुटे
5 Feb 2026 - 3:24 am | कंजूस
तर्काला उत्तर तर्कानेच द्यावे लागते. वेगळाच तर्क लढवणाऱ्याकडे याबाबतचे ज्ञान आहे का नाही हा प्रश्न नसून तो तर्क लागू आहे का एवढेच महत्त्वाचे.
# सहा जण होते असं प्रथम कळलं किंवा कोणत्यातरी बातमीत होतं मग अपघातानंतर सहावे शव का सापडले नाही हा प्रश्न योग्यच. ......
--- शव काही गायब होणार नाही मग काय झाले असेल? ज्यांची नावं नोंदली असतील त्यातली एक व्यक्ती विमानात चढलीच नसेल. आता काय झालं आहे की संबंधितांना माहीत असणारच पण अपघात झाला, प्रकरण चौकशीत गेल्यावर कर्मचाऱ्यांना पत्रकारांना माहिती देण्यापासून परावृत्त केले जाते. ते आता सांगणार नाहीत. योग्य वेळी तुम्हाला विचारल्यावरच सांगा हा आदेश असेल.
7 Feb 2026 - 7:03 pm | कंजूस
निरलसपणे राजकारण करणारा नेता होता तो.
8 Feb 2026 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राथमिक चौकशी अहवाल नुकताच सादर करण्यात आला विमान लँडींगच्या वेळी वैमानिकास धावपट्टीचा अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडला असे अहवालात नमुद करण्यात आले. प्राथमिक निरीक्षणानुसार विमान उतरण्याच्या क्षणी त्याच्या नियंत्रण प्रणालीमधे किंवा इंजीनमधे गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा ज्यामुळे वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले विमान लँडींगचा अँगल चुकला असा महत्वाचा निष्कर्ष या अहवालात म्हटले आहे, अशी ती बातमी होती.
जालावर काही दुवा माहिती सापडली नाही. सहा तारखेच्या सामना वृत्तपत्रात ही बातमी वाचली. शिकणारी पोरं अशा विमानतळावर कितीतरी घिरट्या घालतात आणि धावपट्टीचा अंदाज घेवून विमान व्यवस्थीत धावपट्टीवर उतरवतात. अनुभवी वैमानिकाला विमान उतरवता आलं नाही, याची कमाल वाटली. विमानाचं प्रशिक्षण घेणारं विमान काल योगायोगानं बारामतीच्या गोजुबावी परिसरात फ्लाइट रडावर दिसलं. त्याच्याही पाच-सहा चकरा झाल्या आणि माझ्या पोटात गोळाच आला. शिकणारे विद्यार्थी असे रात्रीच्या वेळी प्रशिक्षण घेतात आणि विमान धावपट्टीवर विमान व्यवस्थित उतरवतात. किमान सहा-सात चकरा मारत होतं. आणि रात्री आठवाजता त्याच विमानतळावर किंवा अन्यत्र व्यवस्थित उतरलेले असावे कारण त्यानंतर ते दिसले नाही.
-दिलीप बिरुटे
8 Feb 2026 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
10 Feb 2026 - 5:16 pm | कंजूस
रोहित पवार या घटनेची कारण मिमांसा सादर करत आहेत चार वाजल्यापासून. एबिपी माझावर आहे . नंतर यूट्यूबवर विडिओ येईलच.
खूप मुद्दे सांगत आहेत, दीड तास झाला.
10 Feb 2026 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा व्हिडिओ बराच मोठा आहे—जवळपास एक तास अकरा मिनिटांचे सादरीकरण आणि विश्लेषण यात आहे. यामुळे मनात अनेक शंका निर्माण होतात, त्यामुळे प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर विचार व्हायला हवा. आता याचा तपास नेमका कसा होईल, हे सांगता येत नाही; पण 'अपघात की घातपात?' या वादात हा घातपातच होता, असा त्यांचा दावा आहे.
यातील प्रत्येक धागा सविस्तरपणे उलगडून पाहावा लागेल. आमदार रोहित पवार यांनी ही केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेली मांडणी नसून, त्यांनी अतिशय चांगला डेटा जमा करून तो पद्धतशीरपणे मांडला आहे असे वाटते. आगामी काळात यावर निश्चितपणे चर्चा होत राहील. आपणही या व्हिडिओतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत राहूया.
-दिलीप बिरुटे
11 Feb 2026 - 9:38 am | कपिलमुनी
जर दादांचे विमानाने जायचे अचानक ठरले असेल तर प्लॅन करून घातपात कसा करता येईल ?
काही बाबतीत दुर्लक्ष किंवा गलथानपणा म्हणता येईल.
पण घातपात वाटत नाही
11 Feb 2026 - 6:44 pm | धर्मराजमुटके
पणजोबा म्हणतो की हा अपघातच होता. यात कोणी शंका कुशंका काढू नका.
पणतू म्हणतो की अपघात की घातपात ?
एकंदरीत पणजोबा आणि पणतू ची युती भारीच आहे.
शंकासुरा ना लज्जा ना भयं !
13 Feb 2026 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांच्या विमान अपघाताचा नवा सीसीटीव्ही परवा आमदार रोहीत पवारांनी आपल्या स्लाइड शो प्रेझेंटेशन मधे दाखवला होता. यूट्यूबवरील त्याची लिंक त्यात असे दिसते की विमानतळ परिसरात सकाळच्या वेळी दाट धुके दिसत आहे, रनवे दिसत असेल की नसेल माहिती नाही. वैमानिकाचा बेजवाबदरपणा की तांत्रिक माहितीच्या विश्लेषण अभावी हा अपघात झाला ? की घातपात आमदार रोहीत पवारांनी काही प्रश्न विचारले आहेत, समाधानकारक उत्तरे मिळाली पाहिजेत यात वाद नाही.
आमदार रोहीत पवारांचे प्रश्न नीटपणे ऐकून मांडायचे तर फार वेळ लागेल.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2026 - 10:40 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
संपूर्ण चित्रफीत पाहिली. रोहित पवारांचं सादरभाष्य ( = प्रेझेंटेशन ) अगदी मुद्देसूद व नेमकं आहे. उगीच फापटपसारा नाही. त्याच्या सारांशाची वेळ १:०३:५० ( १ तास ३ मिनिटे व ५० सेकंद ) आहे. सारांश दीडदोन मिनिटांत संपतो. सारांशाची सुरुवात इथे आहे : https://youtu.be/euLHm-Ay67M?t=3830
सारांश चालू असतांना दाखवलेल्या घातपाताच्या शक्यतेमागील कारणे येणेप्रमाणे :

आ.न.,
-गा.पै.
14 Feb 2026 - 8:26 am | कंजूस
आता फळ्यावर विश्लेषण मांडण्याची प्रथा सुरू झाली आहे.
17 Feb 2026 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्लॅक बॉक्स जळाला आहे, असे बोलल्या जात आहे. शेवटचा सज्जड पुरावा असा ठरवून संपवला ? उत्तर येणे बाकी आहे.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2026 - 11:12 pm | अमरेंद्र बाहुबली
आता तर माझा पक्का विश्वास बसला आहे हा घातपात होता ह्यावर!
17 Feb 2026 - 11:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या शेपटीमध्ये असतो,त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी विमानाचं शेपूट जळत नाही.
अजितदादांचं विमान अपघात छायाचित्रे पाहता शेपटी ही पूर्णपणे जळाली नाही. त्यामुळं ब्लॅक बॉक्स जळाला कसा अशी शंका येते.
विमानाचा पुढचा भाग जमिनीवर आदळल्यास सर्वात जास्त नुकसान तिथे होते. त्या तुलनेत शेपटीचा भाग सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते. शेपटीपर्यन्त झळ बसून ब्लॅक बॉक्स काळा निळा झाला असेल असंही समजू.
आपली शंका रास्त असली तरी, AAIB ने स्पष्ट केले आहे की, दोन्ही रेकॉर्डर्सना (FDR आणि CVR) आगीची झळ बसली आहे. मात्र, त्यातील FDR (Flight Data Recorder) मधील डेटा यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. याचा अर्थ तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. फक्त CVR (Cockpit Voice Recorder) च्या डेटा रिकव्हरीसाठी परदेशी तज्ञांची मदत घेतली जात आहे. आता परदेशी मदत घेतली जात आहे असे म्हटले म्हणजे काहीतरी काळंबेळं नक्की आहे असे वाटतेच.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2026 - 5:10 am | गवि
एक शंका येते.
CVR जर उष्णतेमुळे डॅमेज झाला आहे आणि तो रिकवर करायला परदेशी मदत लागणार आहे, तर आगोदर जे वैमानिकाचे शेवटचे शब्द म्हणून जाहीर केले गेले ते कुठून कळले? यावर कोणी सोपे उत्तर देईल की एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या टॉवरमध्ये येणाऱ्या संभाषणात ते आले. पण एअर ट्रॅफिक (कंट्रोल टॉवर म्हणजे तिथले फ्लाईंग क्लबचे रेडिओ) कडे आवाज येण्यासाठी पायलटला तो खास बटण दाबून, बोलून बटण सोडावे लागते. PTT (press to talk). कॉकपिटमधली लाईव्ह बोलणी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेडिओत प्रक्षेपित होत नसतात. ती CVR मधेच रेकॉर्ड होतात. आता असे म्हणणे असेल तर ठीक की पायलट्सनी मे डे कॉल देण्याऐवजी किंवा देऊन झाल्यावर, असे भयंकर लँडिंग होता होता त्यातून वेळ काढून आवर्जून ptt बटण दाबून "ओह *ट" असे शेवटचे शब्द एअर ट्रॅफिक कंट्रोलला ऐकवले आणि बटण पुन्हा सोडले ...
18 Feb 2026 - 5:17 am | कंजूस
विचित्र गोष्टी बाहेर येत आहेत.
18 Feb 2026 - 5:19 am | कंजूस
खरा ब्लॅक बॉक्स काढून तिथे खोटा नकली बॉक्स लावलेला होता काय?
18 Feb 2026 - 7:18 am | गवि
ब्लॅक बॉक्स उष्णतेमुळे डॅमेज होणं अशक्य नसतं. पण खूप दुर्मिळ. ३४००G म्हणजे अतिशय उच्च गुरूत्वीय बलाखाली टिकण्यासाठी आणि १००० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान एक तासापर्यंत सहन करण्यासाठी ते टेस्ट केलेले असतात. या ठिकाणी विमान हजारो फुटांवरून खाली आलेले नाही त्यामुळे इम्पॅक्ट डॅमेज असणे शक्य दिसत नाही. तापमान मुख्य फ्युजलाज (मेन बॉडी) मधे स्फोट आणि मंत्राच्या ज्वालांमधे खूप उच्च झालेल असू शकतं पण शेपटी तुलनेत काहीशी दूर नेहमीच दिसत आली आहे सर्व व्हिडिओजमधे. तिथपर्यंत उच्च तापमानाच्या झळा पोचल्या असतील असं सांगणं इथून कठीण आहे. शेपटीचा भाग तुलनेत खूप कमी जळालेला वाटला. अर्थात समोर दृश्य नसताना फोटो आणि बातम्यांतील व्हिडिओ बघून हे अंदाज.
18 Feb 2026 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या दोन्ही रेकॉर्डरचे आगीमुळे नुकसान झाले आहे. दीर्घ काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्याने रेकॉर्डरचे नुकसान झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. '
''प्रचंड उष्णतेमुळे आणि दीर्घकाळ आगीच्या संपर्कात राहिल्याने ब्लॅक बॉक्सला हानी पोहोचली आहे."- एएआयबी'
दोन शक्यता १. तापमान ११०० अंशांच्या वर गेले असेल, तर उष्णतारोधक कवच वितळून आतील सर्किट्सना हानी पोहोचू शकते.
२. ब्लॅक बॉक्सचे बाह्य कवच अपघाताच्या आघाताने (Impact) तुटले किंवा त्याला तडा गेला, तर आग थेट आतमध्ये शिरून मेमरी चिप जाळू शकते.
आता प्रश्न पडतो खरंच इतकी भयंकर उष्णता होती ? आणि खरंच शेपटीकडील भाग इतका जळाला असेल ? मी एक्सपर्ट नाही. माझं उत्तर ना आहे.
-दिलीप बिरुटे
18 Feb 2026 - 10:23 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
तुमच्या शंका अगदी रास्त आहेत. ज्या बेफिकीरीने हे प्रकरण हाताळलं गेलंय त्यावरनं काळंबेरं नाकी दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
18 Feb 2026 - 10:42 pm | गामा पैलवान
ते 'काळंबेरं नक्की' असं लिहायचं होतं.
-गा.पै.
22 Feb 2026 - 3:11 pm | कंजूस
तांत्रिक चुका आणि घोटाळे काय झाले असतील ते सुटतील उकलतीलच पण राजकीय परीक्षणच पुढे रेटलं जातंय तेसुद्धा अगदी भोंगळपणे.
https://youtu.be/1i-mOM9mo5s?si=jdn1goWsT0GSPijq
फसलेल्या विलीनीकरणाची खदखद म्हणावी का?
26 Feb 2026 - 4:35 pm | लिओ
इथे विमान अपघाताबद्द्ल वाचत आहे.
एक विचारायचे आहे.
२०२१ मध्ये कोझिकोडे येथे एक एअर इंडिया एक्सप्रेस च्या विमानाचा अपघात झाला होता. या उड्डाणाचे सारथ्य दिपक साठे नावाचे पायलट करत होते. दिपक साठे भारतीय हवाई दलातुन निव्रुत्त झालेले अनुभवी पायलट होते. त्यांचे भारतीय हवाई दलात एक उत्तम रेकॉर्ड होते. या अपघातातील तपास अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला . जे खरोखर धक्कादायक होते
जाणकारांनी अधिक माहिति द्यावी
1 Mar 2026 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेल्या भीषण अपघातप्रकरणी विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) याबाबतचा प्राथमिक अहवाल आज प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये विमानतळावरील कमी दृश्यमानता आणि सुरक्षिततेतील त्रुटींवर बोट ठेवण्यात आले.
वैमानिकाने ऑपरेटर्सचा न ऐकता विमान उतरवण्याबाबतचा निर्णय घेतला अशा निष्कर्षाकड़े हे प्रकरण जायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
1 Mar 2026 - 10:22 am | कंजूस
दुसऱ्या खेपेलाही विमान उतरवताना धावपट्टीच्या रेषेत नव्हतेच. [[ आणि वैमानिकाला ते समोर येणारे झाड दिसल्यावर त्यातून वाचवायला तिरके करण्याचा प्रयत्न वाया गेला असेल, त्या झाडाकडे वेगाने जाणारे विमान पाहून कोपायलट पाठकच्या तोंडून आलेले शब्द मायक्रोफोन चालू असल्याने ग्राउंड ओपरेटरला ऐकू आले असतील ते त्याने इतरांना सांगितले असेल. पण अपघातामुळे नंतर त्याबद्दल बोलण्याचे टाळले असेल. फक्त त्याच्या डिपार्टमेंटच्या चौकशी टेबलावर तो ते सांगू शकतो. "मला धावपट्टी दिसते आहे" हे वैमानिकाने ओपरेटरला सांगतानाच ते ऐकले असेल. अर्थात हा पुरावा किंवा रेकॉर्ड म्हणून घेतही नसतील.]] कंसातील तर्क माझा.
झाडाला आपटून विमान पेटले असेल तर त्याच्या( जळलेल्या झाडाच्या) काही पुसट खाणाखुणा कदाचित सापडल्या असतील. आग मोठी होती मान्य पण झाडाचे जमिनीतले मूळ शाबूत असेल.
1 Mar 2026 - 11:07 am | अमरेंद्र बाहुबली
कोपायलट पाठकच्या तोंडून आलेले शब्द मायक्रोफोन चालू असल्याने ग्राउंड ओपरेटरला ऐकू आले असतील ते त्याने इतरांना सांगितले असेल.ह्याचा काही विदा? कारण ही बातमी पेरलेली वाटते आहे. ओह शिट असे को पायलट बोलली असे कुठेही बातमीत वाचले नाही.
1 Mar 2026 - 1:44 pm | कंजूस
हे मी त्या दिवशीच्या पेपरातल्या अपडेट्समध्येच वाचले.
4 Mar 2026 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल दुव्यावर आहे, सविस्तर वाचून कोणीतरी विश्लेषण करावे.
-दिलीप बिरुटे
( व्यग्र )
4 Mar 2026 - 11:34 am | अमरेंद्र बाहुबली
ते अहमदाबाद घटनेचा संपूर्ण रिपोर्ट कधी येणार आहे? असे काय खोदकाम चालले आहे ब्लॅकबॉक्स मध्ये? की आहे तो डेटा लपवत आहेत? भाजप सरकार असल्याने सरकारी संस्थानावर विश्वास राहिलेला नाही, सगळ्या ईडी सारख्याच भाजपसाठी काम करतात असे वाटतेय, निदान इंग्लंडचे नागरिक मेले असल्याने इंग्लंडने तरी लक्ष घालून सत्य बाहेर काढण्यासाठी भारत सरकारवर दबाव टाकायला हवा.
4 Mar 2026 - 4:16 pm | कंजूस
थांबा, रोहीत पवारांचे आणखी बरेच विडिओ येणार आहेत. आज एक नवीन आला. विमान झाडावर आपटलं नाहीच. पेट्रोलच्या कॅन नव्हताच.
4 Mar 2026 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व रीपोर्ट काळजीपूर्वक वाचला. हा अहवाल निव्वळ म्हणजे बनवाबनवीच आहे. कोणी तरी कोणाला तरी वाचवत आहे, इतकं नक्की. आता ते काय त्याची चौकशी झाली पाहिजे. तपशीलवार नंतर सर्व क्रमवार टाकतो. सध्या सर्वात महत्वाचा भाग.
ढिगारा आणि आघाताची माहिती (Wreckage and Impact Information)
( अहवालातून )
आपण सर्वांनी पाहिलं आहे की, विमान डाव्या बाजूला कलले आहे, उजव्या नव्हे. आणि ते कुठंही झाडाला धडकलेले दिसत नाही. सरळ सरळ जमीनीवर आपटले आहे. दुसरी गोष्ट ब्लॅक बॉक्स यंव जळाला आणि त्यंव जळाला. एकून दिलेल्या माहितीवरुन सर्व संवाद त्यातून उलगडला आहे, तरीही ब्लॅक बॉक्समधे आता कोणता संवाद राहिला आहे, जो कंपनीला पाठवून त्याचा पूर्ण उलगडा होणार आहे ? विमान नक्की कोण उडवत होतं ?
दया कुछ तो गडबड है. अहवालाचा सविस्तर एकेक मुद्दा पुढील प्रतिसादात घेऊच.......!
-दिलीप बिरुटे
4 Mar 2026 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राथमिक अहवालानंतर आमदार रोहित पवार यांची तपशीलवार माहिती व्हीडीयो. ( तुनळीवरुन साभार )
-दिलीप बिरुटे
4 Mar 2026 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली
रोहित पवारांचे प्रश्न अगदी रास्त आहेत! काहीतरी लपवाछपवी/ बनवाबनवी चालू आहे हे दिसतय, अजित दादांचा घातपातच झाला असावा असे वाटते!
7 Mar 2026 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिला गो अराउंड कन्फूज असल्यामुळे रनवेवर उतरु शकला नाही, दुस-या वेळी डावं-उजवं करीत होते रनवे दुस-यावेळीही दिसला नाही. विमान इतक्या खाली आलं की त्याला पुन्हा वर घेण्याच्या काही स्कोप नव्हता. आपण कुठं जायचं असलं की मॅप सेट करतो आणि त्या मार्गाने आपण चालतो. विमानातही अशीच सीस्टीम असते त्या अँगलने विमान उतरते. इथे ही सेटींगही चुकलेली. पायलटला तर अंदाजच आला नाही, अति आत्मविश्वासामुळे चूक होत गेली. विमान चालवणा-या पायलटचा अभ्यास झालेला होता तो पायलट आला नाही, ऐन वेळी दुसरा पायलट बीना प्लॅनचा अनुभवाच्या जोरावर आला. दृश्यमानता कमी होती. अजिबात रनवे दिसला नाही, विमान उतरवण्याची गरज नव्हती. विमान कंपनी हे अगोदर सर्व तपासून घेते मार्ग, दृश्यमानता आणि तरच विमानाला परवानगी देते. सगळा भोंगळ कारभार या अपघातामागे स्पष्ट दिसतो.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2026 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमान कंपनीचाही तितकाच बेजवाबदार.....
-दिलीप बिरुटे
8 Mar 2026 - 6:04 am | कंजूस
बदललेला पायलटही अगदी पहिलटकरीण नव्हताच. खूप तासांचे उड्डाण केलेला. विमान कंपनी आणखी काय करणार? सर्वांचेच कमनशीब.
रोहीतचे अपघात विश्लेषण....
#पायलटनेच घातपात करवला..
#कुणीतरी हा अपघात घडवण्यासाठी याच पायलटला पाठवले...
#विमान कंपनीचे विमानाच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही....
आता रोहीत पवार गेले दिल्लीला जो कोणी हा प्रश्न राज्यसभेत विचारेल असं वाटतंय त्यांना भेटतोय. हा महिना गाठीभेटींचा आहे.( या अगोदर सुप्रिया सुळे विविध नेत्यांना भेटून आल्या. आदरणीय शरद पवारांना पसंतीची मतं द्या विनंती करायला.)
8 Mar 2026 - 8:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर अत्याधुनिक 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम' (ILS) चा अभाव असू शकतो, ज्यामुळे लँडिंग अधिक आव्हानात्मक बनते. 'अप्रोच चार्ट' (Approach Chart) प्रमाणे ठरवून दिलेल्या मार्गावरून आणि योग्य कोनातून (Glide Slope) न येता, विमानाने चुकीचा मार्ग पकडला. चुकीच्या अँगलने आणि चुकीच्या मार्गाने खाली आल्यामुळे ऐन वेळी विमान नियंत्रित करणे वैमानिकांना शक्य झाले नाही.
२. खराब हवामान ही एक 'परिस्थिती' आहे, ते अपघाताचे 'मुख्य कारण' असू शकत नाही. अपघाताचे खरे कारण 'खराब हवामान असतानाही लँडिंग करण्याचा वैमानिकांचा निर्णय' हे आहे. मात्र, अहवालात हवामानावर जास्त भर देऊन, वैमानिकांचा चुकीचा निर्णय आणि कंपनीच्या 'गो-अराउंड' नंतरच्या SOP (Standard Operating Procedure) उल्लंघनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले.
३. चुकीची रनवे दिशा : लँडिंगच्या वेळी विमानाची दिशा आणि रनवेची दिशा तंतोतंत जुळणे आवश्यक असते. 'नेव्हिगेशन सिस्टीम'मध्ये चुकीची दिशा सेट केल्यामुळे विमान रनवेच्या मध्यभागी न येता बाजूला भरकटले ते कसे ?
४. विमान उतरवताना जेव्हा खराब हवामानामुळे धावपट्टी दिसत नाही, तेव्हा विमान पुन्हा हवेत झेपवण्याच्या प्रक्रियेला 'गो-अराउंड' किंवा 'मिस्ड अप्रोच' (Missed Approach) म्हणतात. पहिल्या प्रयत्नात वैमानिकांना रनवे दिसला नाही म्हणून त्यांनी योग्यरित्या गो-अराउंड केले. मात्र, सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक दुसऱ्या प्रयत्नात झाली. हवामान आणि दृश्यमानता सुधारलेली नसतानाही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान जवळच्या मोठ्या विमानतळावर (उदा. पुणे किंवा मुंबई) वळवण्याऐवजी, त्याच खराब हवामानात पुन्हा लँडिंगचा अट्टाहास करणे हे उड्डाण नियमांचे (SOPs) घोर उल्लंघन होते.
५. कंपनीने अपघातग्रस्त विमानाचे इंजिन प्रत्यक्षात ८,००० तासांहून अधिक काळ वापरले होते. मात्र, कागदोपत्री त्याची नोंद अशी केली गेली की इंजिनची क्षमता अजून ३,००० तास बाकी आहे. सुटे भाग आणि इंजिनची सुरक्षितता मर्यादा संपलेली असतानाही केवळ पैशांच्या बचतीसाठी विमानाचा वापर सुरूच ठेवण्यात आला.
६. अपघाताच्या दिवशी बारामती विमानतळावरील दृश्यमानता (Visibility) ५ किलोमीटर या किमान मानकापेक्षा खूप कमी होती. असे असतानाही कंपनीच्या वैमानिकांनी विमानाला लँडिंगचा प्रयत्न का करू दिला आणि विमान सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुणे किंवा मुंबईला का वळवले नाही, ही अत्यंत मोठी चूक मानली जात आहे. तसेच, मुंबई-बारामती या छोट्या प्रवासासाठी विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन (अतिरिक्त इंधन टाक्या) भरलेले होते.
७. विमानाचा 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर' (CVR) आणि 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' (FDR) म्हणजेच ब्लॅक बॉक्स आगीमुळे खराब झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात या ब्लॅक बॉक्सच्या फोटोंवर उष्णतेमुळे किंवा आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या (Thermal damage) कोणत्याही खुणा नाहीत. याचा अर्थ महत्त्वाची तांत्रिक माहिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याचा मोठा संशय आहे.
८. AAIB च्या प्राथमिक अहवालात विमानाने 'उजवीकडे' (Right) कल घेतल्याचे नमूद केले आहे. मात्र, रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून हे सिद्ध केले की, विमानाने स्पष्टपणे 'डावीकडे' (Left) कल घेतला होता. तपासातील ही अत्यंत प्राथमिक आणि मोठी चूक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
९. कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी या प्रकरणाची माहिती गोळा करणाऱ्या टीमला धमकावले आणि आपले वरपर्यंत राजकीय संबंध असल्याचे सांगून तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
या सर्व बाबींवरून हे स्पष्ट होते की व्हीएसआर कंपनीने केवळ या एका दुर्घटनेत नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीतच प्रवाशांच्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून अत्यंत बेजबाबदार आणि बेपर्वा वर्तन केले आहे.
बाकी, राज्यसभेच्या निवडणूकीतील उमेदवाराच्या बाबतीत ती महाराष्ट्रात बिनविरोध होत आहे, बाकी, राजकारण्यांचा जो फायदा असेल तो असेल होईल न होईल पण एका महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या प्रवासात इतकी हलगर्जी कशी होऊ शकते. हा विमान कंपनीचा बेजवाबदारपणा आहे.
8 Mar 2026 - 3:07 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
तुमच्या या संदेशाशी शंभर टक्के सहमत आहे. हा घातपातच दिसतो आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 Mar 2026 - 3:32 pm | कंजूस
ब्लॅक बॉक्समधून मिळालेली संभाषणाची माहिती इतकी चक्रावून टाकणारी आणि काहींना/ कुणाला गुंतवणारी असेल की ती न सांगितलेलीच बरी असाही प्रकार असेल. त्यामुळे तो ओडिओ रेकॉर्डच खराब झाला हे सांगणंच योग्य वाटत असेल.
झालं गेलं संपलं असा प्रकार आणि गप्प बसणे.
10 Mar 2026 - 8:31 pm | एकुलता एक डॉन
कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी या प्रकरणाची माहिती गोळा करणाऱ्या टीमला धमकावले
ह्याचा अर्थ सक्रुत दर्शनी विमान कम्पनी ची चुक आहे
कारण राजकिय घातपात असता तर त्यानी सरंळ आपल्या मालकाला निस्तरायला लावला असता