मुळ्याचा चटका
लिंबू, दही असे घालून चटकदार, हिरव्या मिरच्या घालून झणझणीत, वरून भुरभुरलेली कोथिंबीर, खोबरे आणि मुख्य म्हणजे कच्च्या (रॉ) चवीच्या भाज्या, फळे यांच्या कोशिंबिरी, वाटलेली डाळ, कोसांबरी पहिल्यापासून फार आवडतात.
या सर्व वर्णनात तंतोतंत बसणारी कैरीची डाळ तर जीव की प्राण आहे.इतर हळदी-कुंकू मागे पडले. पण कैरीची डाळ, पन्हे, पानाफुलांनी गंधित चैत्र... यासाठीच चैत्रगौर मी खूप उत्साहाने करते.
आता ऐन थंडीत कोण बरे अशा पाककृतीत परफेक्ट बसणार? गाजर? नाही, तो गोडगोड हलव्यातच बरा... तर तो मुळा! वेगवेगळ्या पदार्थांची नावे घेतली की पंचेंद्रिये सळसळायला हवीत! हलव्याचा गाजरी रंग डोळ्यांना- दोन्ही आरोग्याने आणि दृश्याने सुखावतो. हुरड्याचा गंध अस्सल आहाराचा नाकात भरतो. यात जर मुळा म्हटले की त्याचा उग्र वास, कडवट चव नाकाला नकोशी होते.
मुळ्याचा चटका या पाककृतीत मात्र ती चव बन्यापैकी बॅलन्स होते. कैरीच्या डाळीप्रमाणे यातही भिजवलेली हरभरा डाळ, मिरच्या मुख्य घटक आहेत. पण अजून पौष्टिकता वाढावी व हरभरा डाळ आवडत नसल्यास भिजवलेले हिरवे मूगही वापरले आहेत. वरून चुरचुरीत तेलाची फोडणी म्हणजेच चटका दिला की झाला मुळ्याचा चटका... लय भारी!

साहित्य
१ मोठी वाटी किसलेला मुळा (साधारण २ मुळे)
१/२ वाटी भिजवलेली हरभरा डाळ
१/४ वाटी भिजवलेले हिरवे मूग
४ हिरव्या मिरच्या
१/४ वाटी किसलेले खोबरे (ओले किंवा सुके)
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
५ लसूण पाकळ्य
एका लिंबाचा पूर्ण रस
चवीपुरते साखर व मीठ
फोडणीसाठी: जिरे, मोहरी, लाल सुकी मिरची, हळद, हिंग
कृती
१. भिजवलेली हरभरा डाळ, मूग, मिरच्या, दोन चमचे कोथिंबीर, लसूण पाकळ्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
२. वाटलेल्या डाळीला किसलेल्या मुळ्याबरोबर एकत्र करा.
३. या मिश्रणात खोबरे, कोथिंबीर एकत्र करा.
४. लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.चवीनुसार मीठ व साखर घाला.
५. तेलात जिरे, मोहरी, लाल सुकी मिरच्या, हळद, हिंग यांची फोडणी करून मुळ्याच्या डाळीला चटका द्या.
६. लहान मुले तरीही खात नसल्यास डोश्याच्या पीठात किंवा धिरड्याच्या पीठात हे मिश्रण टाकून डोसे किंवा धिरडे बनवा.
७. कच्च्या मुळ्याची जी चव आहे, ती अनुभवण्यासाठी याला अजिबात वाफवू नका.
ही रेसिपी हिवाळ्यातील पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, ज्यात मुळ्याची कडवट-उग्र चव डाळ,लिंबू आणि फोडणीतून परफेक्ट बॅलन्स होते. तोंडी लावण्यासाठी किंवा सलाडसारखी भाकरी-भाजीबरोबर उत्तम!
-भक्ती
प्रतिक्रिया
17 Dec 2025 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकृ आवडली आहे. अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2025 - 7:58 pm | विजुभाऊ
लै भारी. आज करून बघतो
18 Dec 2025 - 2:43 pm | मदनबाण
खाताना "चटका" बसतो का? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS
18 Dec 2025 - 3:01 pm | टर्मीनेटर
मुळ्याची (सुकी परतून केलेली भाजी आणि कोशिंबीर आवडत असल्याने) 'मुळ्याचा चटका' ही आवडेल ह्यात शंका नाही, फक्त मी,
ऐवजी अक्खी डाळ (मला आवडत असल्याने) घालून हे बनवून खाणार 👍
18 Dec 2025 - 4:52 pm | कंजूस
नेहमी करतो.
फक्त प्रश्न असा आहे की थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारे मुळेच चांगले असतात. एरवीचे राठ, कडवट मिळतात.
18 Dec 2025 - 8:54 pm | श्वेता२४
माझ्या आठवणी प्रमाणे मी खूप लहान असताना म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हा पदार्थ खाल्ला होता. माझी आजी करायची आणि चटका केला की मी एखादी पोळी जास्तच खायचे इतका तो आवडायचा. आजी गेल्यानंतर खायचा कधी योग आला नाही पण आता सासरी गेल्यानंतर मी हा पदार्थ आवर्जून करते व घरात सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. शक्यतो दोन आठवड्यातून एकदा तरी आम्ही हा पदार्थ करतोच करतो. अगदी माझ्या मुलाला देखील हा पदार्थ आवडतो. फक्त मी लसूण ऐवजी आले घालून हा चटका करते.
18 Dec 2025 - 11:56 pm | जुइ
मुळे घरात सगळ्यांना आवडतात, तो ही वेगळी पाकृ करुन पाहीन. धन्यवाद!