ए० जी० आय०ची चाहूल?
-राजीव उपाध्ये
ए०आय० जगतावर आत्ताच एक मोठी बातमी येऊन आदळली आहे. टोकीयो मधील ’इंटिग्रल ए०आय०’ नावाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी पहिले सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप असे एक नवे मॉडेल बनवले आहे. यातला गमतीचा भाग म्हणजे ’सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप’ ही शब्दरचना! अत्यंत सावध पणे केलेला हा दावा ए०जी०आय० अवतरल्याचेच संकेत देतो. एखादी तंत्रप्रणाली जर मानवापेक्षा वरचढ किंवा खांद्याला खांदा लावून कार्य करू शकत असेल तर ते जाहिर करण्यासाठी आढेवेढे कशाला घ्यायचे? हा दावा खरोखरच महत्त्वाचा आहे, कारण सर्वसाधारण बुद्धीमत्तेच्या ध्येयाने कासाविस झालेल्या संशोधकांना मानव जे शिकू शकतो, ते सर्व शिकू शकेल अशा तंत्रज्ञानाचा ध्यास लागलेला होता.
आजवर विकसित झालेल्या ए०आय० मॉडेल्समध्ये (GPT, Claude, Gemini इ.) यांना आता संशोधक नॅरो ए०आय० म्हणतात, कारण ही मॉडेल्स खूप शक्तिशाली असली तरी मानवी दर्जाची सर्वसाधारण बुद्धिमत्ता अजून त्यांच्याकडे नाही. पण आपण ज्या टप्प्यात पोचलो आहोत त्या टप्प्याला ए०जी० आय०पूर्व अवस्था नक्की म्हणता येते. GPT-5 class, Gemini-2 class, Claude-4 class, Qwen ही सर्व मॉडेल्स ’तज्ज्ञ दर्जाची’ कार्यक्षमता दाखवत आहेत. त्यांची नियोजन, बहुस्तरीय कारण-मीमांसा करायची क्षमता आश्चर्यकारक आहे. पण अजुनही काही प्रमाणात विश्वासार्हता, अंतीम साध्य करण्यासाठी लागणारी सुसूत्रता यात ती थोडी मागे पडतात. त्यामुळे ए०आय० आणि ए०जी०आय० यात अंतर असले तरी ते वेगाने कमी होत आहे, हे मात्र नक्की.

ए०जी०आय० म्हणजे एक पुढचे पाऊल—एक अशी सर्वसाधारण बुद्धिमत्ता जी कोणतेही बौद्धिक कार्य करू शकेल. या सर्वसाधारण बुद्धीमत्तेच्या वि्कासातील एक महत्त्वाची अडचण म्हणजे या संकल्पनेच्या व्याख्येवर, या क्षेत्रात उतरून धडपडणार्या तज्ज्ञांचे, तसेच जोखीम स्वीकारणार्या कंपन्यांचे सध्या एकमत नाही. त्यात भरीसभर म्हणुन उंटावरून शेळ्या हाकणारे, हस्तीदंती मनोर्यातील तत्त्वचिंतक आणि वैज्ञानिक प्रगतीवर वचक ठेऊ पहाणारी वेगवेगळी धर्मपीठे त्यात काहीसे विसंवादी सूर लावायचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मला एक वेगळीच भीति वाटते. ती अशी की मानव सर्वसाधारण बुद्धीमत्तेपर्यंत पोचला तरी कदाचित अशा बौद्धिक विसंवादामुळे हे तंत्रज्ञान कमी लेखले जाईल.
ए०जी०आय० आवश्यक आहे का?
मानवी पातळीवरील सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेले ए०जी०आय० तंत्रज्ञान समाजाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य नाही, परंतु काही क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या समस्यांचे ए०जी०आय०मुळे उत्तर मिळू शकते.
महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक प्रगतीचा वेग वाढवणे ए०जी०आय० मुळे शक्य होईल - नवी गृहितके अथवा संकल्पना निर्माण करणे, प्रयोग-रचना आणि विश्लेषण हे मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित होऊ शकतात. हवामान मॉडेलिंग, ऊर्जा निर्मिती आणि वितरण, नवीन पदार्थ, नवी औषधे किंवा उपचार पद्धती, इत्यादींमध्ये क्रांतीकारी प्रगती होऊ शकेल. तसेच अनेक दशकांचे संशोधन कमी कालावधीमध्ये होऊ शकते.
आर्थिक उत्पादकता आणि लोकसंख्येमुळे निर्माण होणार्या अडचणी -उदा० वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या आणि मानवी उत्पादकतेवरील मर्यादा. आरोग्यसेवा, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, पायाभूत सुविधा-दुरुस्ती, तांत्रिक कौशल्ये या आणि इतर क्षेत्रांत मोठी मनुष्यबळाची कमतरता यापुढे ही असणार आहे.
गुंतागुंतीच्या प्रणालींचे अधिक कार्यक्षम नियमन, उदा० वीजनिर्मिती केंद्रे, पुरवठा साखळी, आपत्ती व्यवस्थापन, महामारी मॉडेलिंग या मध्ये अजुनही काही आह्वाने अशी आहेत की ज्यासाठी वेगळ्या आणि प्रभावी ए० आय० प्रणालींची गरज आहे. त्यामुळे नियत्रंणाखालील विश्वासार्ह ए०जी०आय०ची गरज नक्कीच आहे. आज ना उद्या पूर्ण क्षमतेने ए० जी० आय० अवतरणार, हे धरूनच अनेकांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. त्यात विचारवंतांबरोबर व्हॅटिकनसारखी धर्मपीठे सक्रिय झाली आहेत.
धर्मपीठांचे दृष्टिकोन: व्हॅटिकनची भूमिका
व्हॅटिकनने ए०आय० वर एक जाहिरनामा जाने० २०२५ मध्ये प्रसृत करून पुढाकार आणि ठाम भूमिका घेतली आहे. इतर धर्मपीठे यात अजून पुरेशा तयारीने उतरली आहेत, असे सध्या तरी दिसत नाहीत. व्हॅटिकनच्या दृष्टीकोनातून ए०आय० आणि मानवी बुद्धिमत्तेतील मूलभूत भेद, आणि त्यांचे नैतिक आणि मानवतावादी परिणाम या जाहिरनाम्यात तपशीलात चर्चिले आहेत.
व्हॅटिकनच्या मते, मानवी बुद्धिमत्ता केवळ डेटावरील प्रक्रिया नाही — ती आध्यात्मिक, भावनिक, नीतिमूल्ये आणि संबंधांवर आधारित आहे. ए०आय० हे मानवी बुद्धिमत्तेचे साधन आहे, परंतु ते मानवी आत्म्याच्या पूर्णतेचे किंवा नीतिमूल्यांचे प्रत्यक्ष प्रारूप असू शकत नाही (म्हणून ए०जी०आय० चा दावा सुद्धा अत्यंत मर्यादित आहे). पण माझे वैयक्तिक मत असे की आत्म्यासारख्या वादग्रस्त आणि अवैज्ञानिक संकल्पनेचा आधार घेऊन एखाद्या संकल्पनेची यथार्थता, योग्यायोग्यता तपासणं मला तरी पटत नाही. कोणत्याही आधिभौतिक, दैवतवादी अथवा धार्मिक चष्म्यातून ए०आय०कडे बघणे विज्ञानावर अन्यायकरणारे आहे.
व्हॅटिकनचा मुख्य आग्रह असा आहे की ए०आय० हे मानवासाठी वापरले पाहिजे, त्याच्याऐवजी किंवा त्यांच्या जागी नाही. मानवी निर्णय, नीतिमूल्य आणि जबाबदारी यंत्रावर सोडू नये, यावर व्हॅटिकनचा प्रमुख भर आहे. पण हे लक्षात घ्यायला हवे की मानवी बुद्धी जेव्हा अनेक कारणांनी कुंठीत होते तेव्हा योग्य प्रकारे हाताळण्याने ए०आय० अतिशय उत्तम पर्याय सुचवतो किंवा दिग्दर्शन करतो.
Integral AI चा धाडसी दावा
वर उल्लेख केलेल्या Integral ए०आय० (जपानमधील टोकियो-स्थित कंपनी) ने अलीकडेच असा दावा केला आहे, की त्यांनी जगातील “ए०जी०आय०-capable” म्हणजे सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप (ए०जी०आय० सक्षम) मॉडेल तयार केले आहे. ही कंपनी एका गुगल मधील माजी तंत्रज्ञाने स्थापन केली आहे. Integral ए०आय० म्हणते की त्यांच्या प्रणालीमध्ये खरी सर्वसाधारण शिकण्याची क्षमता आहे. त्यानी सर्वसाधारण बुद्धीमत्तेचे निकष व्याख्येच्या स्वरूपात सांगितले. ते असे स्वयंप्रेरणेने कौशल्य शिकायची क्षमता, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रावीन्य़, आणि उर्जेच्या वापरातील कार्यक्षमता. या निकषांवर आधारित कोणत्याही सर्वसाधारण बुद्धीमत्तेचे वस्तूनिष्ठ मोजमाप करता येते.
थोडक्यात आणि वेगळ्या शब्दात, सर्वसाधारण बुद्धीमत्ता (ए०जी०आय० - Artificial General Intelligence) म्हणजे अशी कृत्रिम बुद्धिमत्ता की जी:
मानवी मेंदूप्रमाणे विविध प्रकारची कामे समजू आणि शिकू शकते,
मानवी हस्तक्षेपाशिवाय नवीन कौशल्ये शिकू शकते, कारण-मीमांसा करू शकते किंवा नियोजन करू शकते
नवीन समस्या सोडवू शकते, फार काय ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात मानवाच्या बरोबर किंवा एक पाऊल पुढे असेल,तसेच मानवाच्या मदतीशिवाय सतत सुधारत जाऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उर्जेचा वापर अत्यंत प्रभावीपणे (मानवापेक्षा कमी किंवा गेलाबाजार मानवा इतकाच) करेल.
त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्या प्रतिकृतीची (मॉडेलची) ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत - मानवी मेंदूप्रमाणे संरचना (आर्किटेक्चर) - मानवी नवबाह्यक म्हणजे मेंदूच्या सर्वात बाहेरील थरातील दुमडलेली, राखाडी (ग्रे मॅटर) बनलेली गुंतागुंतीची रचना. मानवी मेंदूच्या मोठ्या भागाचा यात समावेश असून तो उच्चस्तरीय मानसिक कार्यांसाठी जबाबदार असतो.
नवबाह्यक आपल्या पाच ज्ञानेंद्रियांद्वारे (डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा) येणाऱ्या सर्व माहितीचे विश्लेषण, एकत्रीकरण करतो. ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण हे पण नवबाह्यकाचे कार्य आहे. या शिवाय इतर अनेक उच्च संज्ञानात्मक कार्ये नवबाह्यकाकडून पार पाडली जातात.
Integral ए०आय० चे मॉडेल मानवी मेंदूच्या नवबाह्यकावर (निओकॉर्टेक्स) आधारित आहे आणि त्यामुळे त्या प्रतिकृतीमध्ये अधिक लवचिकपणे शिकण्याची क्षमता आहे. या शिवाय नॅरो ए०आय० ची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न Integral ए०आय० ने केला आहे. त्यांच्या मते सध्याच्या जनरेटिव्ह ए०आय० ची मोठी मर्यादा म्हणजे ते "मर्यादित कार्यांमध्ये" जास्त चांगले असतात.
सांगायचे तात्पर्य, Integral ए०आय० ने विकसित केलेली यंत्रमानव प्रणाली स्वतः नवीन कौशल्ये शिकू शकते. तसेच अगदी कमी विदावर(डेटा) मानवी हस्तक्षेपाशिवाय शिकू शकते, तसेच मार्गदर्शन न घेताही अपरिचित परिस्थितीमध्ये नवीन कौशल्ये विकसित करते, डिजिटल आणि भौतिक (रोबोटिक) क्षेत्रात बहुविध कामे पार पाडण्यास सक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.
हा दावा अजून स्वतंत्र संशोधक किंवा व्यापक ए०आय० संशोधक-समुदायाने, प्रयोगशाळांनी तपासून प्रमाणित केलेला नाही. अनेक तज्ञांच्या मते ए०जी०आय० म्हणजे खूप उच्च स्तराची, सतत शिकणारी आणि अनेक क्षेत्रांमध्ये मानवासमान क्षमता असलेली प्रणाली—जी अद्याप कोणत्याही कंपनीने सिद्ध केलेली नाही.
पुढचा टप्पा
Integral ए०आय० चा दावा हा धाडसी आहे, परंतु तो प्रत्यक्ष साध्य झाला आहे, असे अद्याप मानले गेलेले नसले तरी मानवाचा भविष्यकाळ अतिशय रञ्जक असणार आहे, हे मात्र नक्की. कारण कृत्रिम परम-बुद्धीमत्तेचे (सुपर इंटेलिजन्स) स्वप्न हा त्या पुढचा टप्पा असणार आहे...
संदर्भ
https://interestingengineering.com/ai-robotics/worlds-first-agi-model
https://www.youtube.com/watch?v=L8J3OSQfcT4
https://www.vatican.va/roman_curia/congregations/cfaith/documents/rc_ddf...
https://www.youtube.com/watch?v=RVqNUUYd9UA
प्रतिक्रिया
15 Dec 2025 - 7:05 pm | कानडाऊ योगेशु
रोचक म्हणण्यापेक्षा हे सर्व भयावह होईल असे वाटते आहे. एवीतेवी सर्व कामे यंत्राद्वारेच केली जात होती आतापर्यंत, एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय? (मुन्नाभाई/सर्किट च्या भाषेत अगर हम हल चलायेंगे तर बैल क्या करेगा?)
उत्तरोत्तर मनुष्य आपली विचार करण्याचीच शक्ती गमावुन बसेल असे वाटते.
16 Dec 2025 - 9:08 am | युयुत्सु
मला वाटते ए०जी०आय० इतकी गंभीर समस्या बनेल असे वाटत नाही.
एक ते काय विचार करण्याचेच काम मनुष्य करु शकत होता आता तिथेही यंत्राची घुसखोरी झाली तरी मनुष्याला करण्यासाठी असे राहणार तरी काय?
आज मनुष्य जे करू शकत नाही किंवा मानवी प्रतिष्ठेला जिथे धक्का पोचतो अशा ठिकाणी यंत्रमानव निश्चितपणे उपयोगी आहे. तसेच मानवी बुद्धीमत्तेच्या आवाक्यात न येणार्या क्षेत्रांमध्ये ए०जी०आय० ची मोठी मदत होईल.
16 Dec 2025 - 1:02 pm | निनाद
कृत्रिम वाटतो आहे.... तसा आहे का?