दिवाळी अंक २०२५ - भालदार-चोपदार - कथा

योगी९००'s picture
योगी९०० in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 10:50 pm

"मुंबईचा दादा आला रं रं र र्...."

कोणीतरी मला बघून ओरडले. तसा मी बर्‍याच दिवसांनी माझ्या गावी जात होतो. पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी एसटी गावाला पोहोचली होती. स्टॅंडवरून घर तसे जवळच होते व हातात जास्त सामानही नव्हते. त्यामुळे बदललेले गाव बघत चालत घरी निघालो होतो. मला घराजवळ आल्याचे बघून कोणीतरी आतमध्ये वर्दी दिली होती.

मला बघून भालदार-चोपदार दोघेही एकदम पळत आले. मी "अरे हो, थांबा" म्हणेपर्यंत त्यांनी माझ्या हातातले सामान त्यांच्याकडे घेतले आणि मला घराकडे घेऊन निघाले. दारातच या दोघांपैकी कोणाच्या तरी बायकोने मला थांबवले आणि "अग, हे काय करतेस" असं म्हणेपर्यंत ओवाळले. ही भालदाराची की चोपदाराची बायको, हे माझे मलाच माहीत नव्हते. दोघांच्याही लग्नाला मी गेलो नव्हतो. आत येऊन बसलो आणि दुसर्‍याच्या बायकोने पाणी आणून दिले. घरात पाय ठेवल्यावर आजी-आजोबांच्या आठवणींनी जरा भरून आले. डोळे थोडे पाणावले. ते बघून माझे दोन्ही भाऊ मला बिलगले.

त्यातल्या एकाने विचारले," दादा, कळवायचं ना आम्हाला येणार म्हणून, स्टॅंडवर आलो असतो, शिवाचा काल फोन आला, तेव्हा कळलं की तू येणार म्हणून. पण नक्की कसे येणार ते कळलं नव्हतं." आता यावर मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. काय बोलणार होतो? त्या दोघांपैकी कोणाचाही नंबर माझ्याकडे नव्हता. त्यांचा नंबर माझ्याकडे असावा असेही मला कधीच वाटले नव्हते, निदान कालपर्यंत तरी...

थोड्या वेळाने मी माझे आवरून घेतले आणि परत बैठकीच्या खोलीत येऊन बसलो. लगेच चहा आणि पोहे हजर झाले. भालदाराने लगेच विचारले, "दादा, खाऊ नाही आणलास मुंबईचा?" मला खुदकन हसू आले. लटक्या रागाने त्यांना म्हणालो, "अरे घोड्यांनो, लहान काय आता तुम्ही? चाळिशी पार केली ना?" यावर दोघांचीही तोंडे उतरली. त्यांची नाराजी बघून लगेच माझ्या पिशवीतून माहीमच्या हलव्याचा बॉक्स काढला. लगेच दोघेही त्यावर तुटून पडले. दोघांच्याही बायका खुदूखुदू हसत होत्या. एकीने त्यांना सांगितलेसुद्धा की "जरा मुलांसाठी ठेवा." पण मी लगेच मुलांसाठी आणलेली खेळणी आणि खाऊचा दुसरा बॉक्स त्यांना दिला. "एवढं कशाला आणलं रे?" असे चोपदाराने विचारले. मी परत त्यांना रागवून म्हणालो, "तुमच्यासाठी आणलं ते चाललं काय? तुमच्या मुलांना का नको मग?" त्यावर दोघांनाही "आम्हाला सवय लागली आता हे तुझ्या हातून खायची" असे उत्तर दिले.

खरे म्हणजे माहीमचा हलवा (मुंबईचा खाऊ) सर्वप्रथम त्यांना माझ्या आईने दिला होता. आम्ही लहान असताना एकदा दिवाळीत गावी गेलो होतो. त्या वेळी आईने हा खाऊ त्यांच्यासाठी दिला. हे दोघेही त्या वेळी अडीच-तीन वर्षांचे होते. आईने त्यांना "दादाने (म्हणजे मी) तुमच्यासाठी खाऊ आणला रे" असे सांगून भरवला होता. त्यावर ते दोघेही खूप खूश झाले होते. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा तिकडे गेलो, त्या वेळी प्रत्येक वेळी आई मला हा खाऊ विकत घ्यायला लावायची आणि त्यांना माझ्या हातून द्यायला लावायची. म्हणून प्रत्येक वेळी मी गेलो, की हा खाऊ असे समीकरण यांच्याकडे झाले होते. हा खाऊ देण्याचा प्रकार जवळजवळ सहा-सात वर्षे चालला होता. तर नंतर मला का कोणास ठाऊक, या दोघांचाही त्या वेळी राग यायला लागला. एकदा तर मी गेल्या गेल्या त्यांनी हा खाऊ मागितला, तर मी रागाने आणलेला बॉक्स जमिनीवर आदळला होता. आई मला माझ्या वागण्याबद्दल खूप ओरडली होती. त्यानंतर रागावून एकदाही मी तो खाऊ नेला नव्हता. ते दोघे साधारण १५ वर्षांचे असताना त्यांनी खाऊ मागितल्यावर "हावरटसारखे खाऊ काय मागता?" असे म्हणून त्यांना नाराज केले होते. त्यानंतर बर्‍याच दिवसांनी - म्हणजे आज त्यांच्यासाठी खाऊ नेला होता. मधल्या काळात आमचे नाते ही माहीमच्या हलव्यासारखे पातळ झाले होते.
आईचा या दोघांवर फार जीव होता. तसे भालदार-चोपदार म्हणजे माझे लांबचे चुलत भाऊ. रामाकाका हे त्यांचे वडील, म्हणजे माझ्या आजोबांच्या चुलत भावाचा एकुलता एक मुलगा. या आजोबांच्या चुलत भावाच्या आणि त्याच्या बायकोच्या अकाली निधनानंतर आजोबांनी त्यांच्या मुलाला म्हणजे रामाकाकाला सांभाळ करण्यासाठी म्हणून आपल्याकडे ठेवले आणि रामा गड्यासारखे वापरून घेतले. त्याचे शिक्षण म्हणून काही तरी जुजबी शिकवले, पण नंतर घरच्या कामासाठी आणि टीचभर असलेल्या शेतीसाठी त्याला राबवून घेतले. रामाकाकाही साधा भोळा, काका आपल्याला सांभाळत आहेत म्हणून आयुष्यभर त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहिला. एवढेच नव्हे, तर आजोबांनी आजीच्या सांगण्यावरून तिच्या नात्यातली एक थोडीफार अधू असलेली व लग्न जमत नसलेली मुलगी स्थळ म्हणून आणली, तिच्याशीही काकाने काही न बोलता लग्न केले. ती मुलगी म्हणजे आमची काकू आयुष्यभर आजीची नोकर म्हणूनच घरात राबवली गेली. त्या काकूला मी कधी स्वयंपाकघरातून बाहेर आलेले किंवा निवांत कधी बसलेले बघितले नाही. बाबांनी रामाकाकाला कधीच चांगली वागणूक दिली नाही. कधी गावाकडे आलो की रामाकाका बाबांच्या दिमतीला असायचा. आईला मात्र त्या सर्वांचा कळवळा यायचा, म्हणून दिवाळीला न चुकता काकूसाठी साडी आणायची. स्वतःच खाऊ घ्यायची आणि मला काकांच्या मुलांना द्यायला लावायची. बाबांनाही एक-दोन वेळा जबरदस्तीने रामाकाकासाठी कपडे घ्यायला लावले होते. ते मिळाल्यावर काकाच्या डोळ्यातले अश्रू थांबले नव्ह्ते. मीसुद्धा बाबांच्या वळणावरच गेलो होतो. जसा जसा मोठा होत गेलो, तसे काका-काकूंना नोकरासारखे वागवायला लागलो. एकदा तर काकाला "ए रामा, पाणी आण" असे म्हणालो होतो. आईने तिथल्या तिथे माझे मुस्काट फोडले होते. तिने मला आणखी बदडले असते, पण आजी मध्ये पडली आणि मला वाचवले. या गोष्टीमुळे रागावून मी काका आणि त्याच्या कुटुंबाला आणखीनच तुसड्यासारखे वागवायला लागलो होतो. तसेच त्यांच्या जुळ्या मुलांना - म्हणजे भालदार-चोपदारांनाही कमी लेखायला लागलो.

अर्थात भालदार-चोपदार ही त्यांची खरी नावे नव्हती. दोघे जुळे भाऊ, माझ्यापेक्षा साधारण १४ वर्षांनी लहान होते. त्यांची नावे सोहन आणि मोहन. पण एका प्रसंगामुळे त्यांना सगळे 'भालदार-चोपदार' म्हणायला लागले. लहानपणी आम्ही मुलांनी गणपतीसाठी गावी गेल्यावर एक नाटुकले रचले होते. गावातल्या लोकांसमोर ते सादर करायचे होते. त्यात माझा राजाचा रोल होता. सोहन-मोहन खूपच लहान होते. पण त्यांचाही हट्ट चालू होता की त्यांनाही नाटकात घ्या म्हणून. त्यांची रडारड चालू होती. त्यामुळे आम्हा मुलांपैकीच कोणीतरी त्यांना राजाच्या बाजूचे सेवक म्हणून भालदार-चोपदार असा रोल द्या, असे सांगितले. खरे म्हणजे भालदार-चोपदार यांचे नक्की काम काय असते, ते आम्हा मुलांनाही माहीत नव्हते. पण या दोघांनी राजाचे सेवक म्हणून राजाबरोबर राहायचे, असे त्यांना सांगितले. त्यामुळे हे दोघेही काहीतरी काम मिळाले म्हणून खूश झाले आणि यांची रडारड थांबली, म्हणून आम्ही खूश झालो. प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी या दोघांनी खूप टाळ्या घेतल्या व हशे वसूल केले. लहानपणी दिसायला एकदम गोड होते आणि त्यात त्यांना वेषभूषा केली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष यांच्याकडेच होते. प्रत्येक प्रसंगात राजाच्या म्हणजे माझ्या बाजूला उभे राहिले.
राजकन्येला राक्षसाच्या तावडीतून सोडवण्याचा एक प्रसंग होता आणि तेथेही हे दोघे माझ्या बाजूला मख्खासारखे उभे. मध्येच मी जखमी होऊन पडतो, तरी हे तिथेच मला वारा घालत उभे. मी जखमी होऊन विव्हळण्याची अ‍ॅक्टिंग करत त्यांना 'अरे आत जा, आत जा' असे सांगत होतो, पण हे दोघे भूमिकेत खूप घुसले होते आणि हलायचे नाव घेत नव्हते. शेवटी राक्षस झालेला अ‍ॅक्टर त्यांच्यावर ओरडला आणि "तुम्हाला खाऊन टाकतो" म्हणाला, तेव्हा ते आत पळाले. पण नंतरच्या प्रसंगात जसे मी राक्षसाला मारून राजकन्येची भेट घेऊ लागतो, तसे परत हे स्टेजवर आले आणि माझ्या बाजूला उभे राहिले. सर्वांची हसून पुरेवाट झाली होती. त्यानंतर गावभर यांचे नाव भालदार-चोपदार म्हणून पसरले होते. हे दोघे मोठे झाले, तरी हे नाव त्यांना चिकटले होते आणि त्यांनाही त्याचे काहीच वाटत नव्हते.

जसा मी मोठा होत गेलो, तसे माझे गावी येणे कमी झाले आणि या दोघांबरोबर संबंधही कमी होत गेले. पण या दोघांना मोठा दादा म्हणून माझ्याविषयी खूप आदर होता. माझ्या लग्नात हे दोघेही आले होते. पण रामाकाकाची मुले म्हणून त्यांना त्याप्रमाणेच वागणूक दिली गेली. लग्नाच्या दोन दिवस आधीपासून हे दोघे घरी राबले. मी तर नवरदेव असल्याने वेगळ्याच धुंदीत होतो. माझी बरीच कामे यांच्यावर टाकली. अक्षरशः मी राजासारखे वागलो आणि ही दोघे सेवकासारखे राबले. पण यांच्या लग्नात मी गेलो नाही. माझ्या बायकोनेही यांच्याशी किंवा माझ्या गावातल्या लोकांशी संबंध ठेवले नाही आणि जे काही गावातले दोन-चार मित्र होते, त्यांच्याशी मला संबंध ठेवू दिले नाही.

शेवटचे या आधी गेलो, ते आजोबांना गाडी घेतली ती दाखवायला. साधी मारुती अल्टो गाडी घेतली, तरी मर्सिडीझ घेतल्यासारखा भाव मारत गेलो होतो. त्या वेळीसुद्धा गाडीचा दरवाजा जोरात लावला, म्हणून या दोघांपैकी एकावर डाफरलो होतो. नंतर काका-काकू गेल्यावर भेटायला सोडा, पण पत्र-फोन काहीही केला नाही. तशी मला गरजच वाटली नाही.

पण आज गरज पडली होती मला गावी यायची. सरकारी नोकरी करून हेडक्लार्क म्हणून रिटायर झालो होतो. मिळणार्‍या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरचा खर्च भागत नव्हता. मुलाचे शिक्षण चालूच होते आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जातून अजून बाहेर पडलो नव्हतो. पुढे काय करायचे, हा प्रश्न आ वासून उभा होता. बायकोने सांगितल्याप्रमाणे गावातले घर आणि जो काय जमिनीचा तुकडा होता, त्यात हिस्सा मागायला आलो होतो. आजोबांनी जाण्याआधी हे घर आणि जमीन या दोघांच्या नावाने करून टाकली होती. कदाचित शेवटच्या काही वर्षांत सख्ख्या मुलाने किंवा नातवाने आपली काळजी घेतली नाही, पण यांनी घेतली याचे बक्षीस किंवा कायम यांना वाईट वागणूक दिली याचे सल कुठेतरी आजोबांना बोचले असावे, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असावा. आता या दोघांच्या संमतीशिवाय मला काहीच मिळणार नव्हते.

हे सगळे विचार रामाकाकाच्या हार घातलेल्या फोटोकडे पाहात असताना झरझर येऊन गेले. माझे लक्ष तिकडे लागलेले पाहून भालदार मला म्हणाला, "जाऊ दे रे दादा, तुला जमलं नसेल बाबा गेले त्या वेळी भेटायला यायला, एवढं वाईट वाटून घेऊ नको." आता माझी मलाच लाज वाटायला लागली आणि थोडा गहिवरलो. ते पाहून दोघाही भावांनी मला सावरले आणि खूर्चीवर बसवले. एक मला वारा घालू लागला आणि दुसरे माझे पाय चेपू लागला. "हे रे काय करताय?" असे विचारताच पाय दाबणार्‍या चोपदाराने, "दादा, आम्ही भालदार-चोपदारच" असा उद्गार काढला. "अरे, पण.." असे म्हणून मी त्याच्या डोळ्यात पाहिले, तर माझ्याविषयीचा अतीव आदर त्याच्या डोळ्यातून ओसंडून वाहात होता. आई मला त्यांच्यासाठी का खाऊ घ्यायला लावायची, ते आज मला कळले.

राजाला वारा घालणारा भालदार आज जिल्हाधिकारी होता आणि राजाचे पाय चेपणारा चोपदार एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर होता. आणि त्यांचे आदरातिथ्य घेणारा राजा यांच्याकडे जमीन-जुमल्याचा हक्क कसा मागायचा, त्याचा विचार करत होता.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

21 Oct 2025 - 7:04 pm | खटपट्या

अप्रतिम कथा

सुबोध खरे's picture

21 Oct 2025 - 7:40 pm | सुबोध खरे

सुंदर कथा!

कंजूस's picture

21 Oct 2025 - 8:13 pm | कंजूस

खरंय.

उगाच असल्या चांगल्या कथेचं बोन्साय ( =शशक)करायची पद्धत पडली आहे. ती पाळली नाही ते बरं झालं. पोहोचली.

सुखी's picture

21 Oct 2025 - 11:21 pm | सुखी

छान

श्वेता२४'s picture

23 Oct 2025 - 10:38 am | श्वेता२४

आवडली...

सुक्या's picture

23 Oct 2025 - 9:18 pm | सुक्या

कथा आवडली !!

कथानक उत्तम झाले आहे आणि ते सांगायची, लिहिण्याची पद्धतही खूपच आवडली.

स्वधर्म's picture

24 Oct 2025 - 2:41 pm | स्वधर्म

मला उगीचच वाटलं कथेचं नांव 'बोच' असावं असं. कथा अगदी आवडली.
सहसा अन्याय करणार्‍याला जाणीव होत नाही, पण इथे ती झाली.

योगी९००'s picture

26 Oct 2025 - 12:17 pm | योगी९००

कथेचे नाव "बोच" ही चालले असते. हा सल्ला आवडला.

अभ्या..'s picture

24 Oct 2025 - 3:22 pm | अभ्या..

आहा.
अप्रतिम कथा. अप्रतिम लेखन,
जोडून ठेवणारे आणि तोडून टाकणारे सगळ्यांच्या मनाचे खेळ कमीत कमी शब्दात उतरवलेत.
सुंदर. शुभेच्छा अधिक लेखनासाठी.

योगी९००'s picture

26 Oct 2025 - 12:15 pm | योगी९००

सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लिहीण्याचा हुरूप वाढला आहे. धन्यवाद...

सस्नेह's picture

27 Oct 2025 - 8:47 pm | सस्नेह

आणि प्रांजळ लेखन आवडले.

राघवेंद्र's picture

28 Oct 2025 - 6:58 pm | राघवेंद्र

कथा आवडली

सोत्रि's picture

29 Oct 2025 - 11:36 am | सोत्रि

स्वीट अ‍ॅन्ड सिम्पल!

- (कथा आवडलेला) सोकाजी

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Nov 2025 - 7:46 am | बिपीन सुरेश सांगळे

कथा आवडली

सिरुसेरि's picture

6 Nov 2025 - 6:21 pm | सिरुसेरि

छान कथा . कथेच्या शेवटी कथा नायका समोर मोठाच पेच प्रसंग उभा राहिला आहे .

काजुकतली's picture

7 Nov 2025 - 7:48 am | काजुकतली

खुप हृदयस्पर्शी कथा आहे. खुप आवडली.

छान कथा. वाचून गळा दाटून आला. ऊपकाराची फेड अपकाराने म्हणतात ते असे. वर हिस्सा मागायला आलेत.

फारएन्ड's picture

10 Nov 2025 - 2:58 am | फारएन्ड

फार छान लिहीली आहे! आवडली.

सौन्दर्य's picture

14 Nov 2025 - 12:22 am | सौन्दर्य

कथा अतिशय छान जमली आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अगदी असेच नाही तर अशासारखे प्रसंग उभे राहतात. आमची आजी नेहेमी म्हणायची 'राजाला देखील प्रजेची गरज असते, प्रजेशिवाय राजा हा राजा होऊच शकत नाही.' जीवनात कोणाला कोणाची व कधी गरज लागेल हे सांगता येत नाही, म्हणून शक्यतो सर्वांशी चांगुलपणानेच वागावे.

कथेमार्फत तुम्ही हा एक अतिशय चांगला संदेश पोहोचवला, खूप खूप आभार.

योगी९००'s picture

20 Nov 2025 - 11:27 am | योगी९००

धन्यवाद...
आमची आजी नेहेमी म्हणायची 'राजाला देखील प्रजेची गरज असते, प्रजेशिवाय राजा हा राजा होऊच शकत नाही.' जीवनात कोणाला कोणाची व कधी गरज लागेल हे सांगता येत नाही, म्हणून शक्यतो सर्वांशी चांगुलपणानेच वागावे.
अगदी थोड्याश्या यशाने माज करणारे लोकं पाहीली की हे असे सांगावेसे वाटते. शक्यतो नम्र रहावे हेच खरे.

गुल्लू दादा's picture

18 Nov 2025 - 2:37 pm | गुल्लू दादा

कथा आवडली आहे. शेवट मस्तच. धन्यवाद.

गामा पैलवान's picture

19 Nov 2025 - 2:34 am | गामा पैलवान

योगी९००,

शेवटपर्यंत समजंत नाही पुढे काय होणारे. शेवटास कथेची लक्षणं एकदम विपरीत होतात. म्हणून हिला विलक्षण म्हणतोय.

या कथेवरून जेफरी आर्चरची आठवण झाली. त्याचा कथासंग्रह ए क्विव्हर फुल ऑफ अॅरोज यांत अशाच कथा आहेत. शेवटच्या परिच्छेदांत सगळा प्लॉट उलटापालटा होतो.

आ.न.,
-गा.पै.

योगी९००'s picture

20 Nov 2025 - 11:28 am | योगी९००

गा.पै. धन्यवाद..!!

मलाही अश्या कथा वाचायला आवडतात. त्यामुळेच ही कथा लिहायला सुचली असावी.

तुम्ही लिहीलेत ते पुस्तक वाचले नाही पण आता मिळवून वाचतो. हे पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.

योगी९००'s picture

20 Nov 2025 - 11:30 am | योगी९००

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. सर्वांचे आभार...!!

श्वेता व्यास's picture

3 Dec 2025 - 3:25 pm | श्वेता व्यास

कथा आवडली.