दिवाळी अंक २०२५ - मुंबई राजधानी - एक राजेशाही अनुभव - भटकंती

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

मला फिरायला आवडतं आणि फिरायला कुठे जायचं म्हटलं की माझं पहिलं प्राधान्य असतं रेल्वेला. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा जवळच्या राज्यांमध्ये जायचं असेल, तर मी हमखास रेल्वेचीच निवड करतो. उत्तरेकडे दिल्ली, उत्तराखंड इथे किंवा दक्षिणेत तामिळनाडू, केरळ इथे जायचं असेल, तर मग मात्र विमानाचा आधार घ्यावा लागतो. पण आपलं पहिलं प्रेम रेल्वेच!

रेल्वे प्रवासाची आमची सुरुवात अर्थातच शयनयान वर्गाने (स्लीपर क्लासने) झाली. मला आठवतंय, २०१० साली आम्ही (आमचं व काकाचं कुटुंब) अंदमानला गेलो होतो, तेव्हा पुणे-चेन्नई प्रवासही विमानानेच करावा, असं काकाचं मत होतं. मात्र हा प्रवास आपण रेल्वेनेच करू, असा मी आग्रह धरला. काका रेल्वेने यायला तयार होईना आणि मी विमानाने. शेवटी काकाचं कुटुंब विमानाने चेन्नईला येणार आणि आम्ही रेल्वेने, अशी तडजोड झाली. मात्र तेव्हा तृतीय श्रेणी वातानुकूलित श्रेणीचा (थर्ड एसीचा) प्रवास ही एक चैन, पैशांची शुद्ध उधळपट्टी वाटत असल्यामुळे हा रेल्वे प्रवासही स्लीपर क्लासनेच करायचा, यावर मी ठाम होतो. तर 'आता रेल्वेने येतोच आहेस, तर कमीत कमी थ्री टियर एसीचं तिकीट तरी काढ' असा काकाचा आग्रह होता. शेवटी आम्ही हा प्रवास स्लीपर क्लासनेच केला.

नंतर २०११ साली मी पहिल्यांदा थर्ड एसी (थ्री टियर एसी) डब्यात शिरलो. हा प्रवास अर्थातच प्रचंड आरामदायक होता. डबा हवाबंद असल्यामुळे रुळांचा खडखडाट नाही, एसी असल्यामुळे गार वाऱ्याचा त्रास नाही की उन्हाळ्यात उकडणं नाही, झोपायला अंथरूण-पांघरूण आणि शिवाय सहप्रवासी चांगले, थोडे अधिक सुसंस्कृत. एकदा एसी प्रवासाचा अनुभव घेतलेला माणूस परत कुठला जातोय? मागच्या काही वर्षात मात्र थर्ड एसीची अवस्था स्लीपर क्लाससारखी झाली आणि (नाइलाजाने) आमची बढती थर्ड एसीमधून द्वितीय श्रेणी वातानुकूलित श्रेणीत (सेकंड - टू टियर एसीत) झाली.

असो. रेल्वेच्या बाबतीत अशी आमची प्रगती होत असतानाच एक स्वप्न मात्र आम्ही अगदी पहिल्यापासून उरात बाळगून होतो - मुंबई राजधानी या गाडीच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करायचं स्वप्न. भारतात रेल्वे अनेक असल्या, तरी काही रेल्वे विशेष आहेत, त्या आजही आपली शान, आपलं महत्त्व टिकवून आहेत. मुंबई राजधानी ही अशीच एक गाडी. भारतीय रेल्वेगाड्यांची महाराणीच म्हणा ना! या गाडीचे, खास करून तिच्या पहिल्या वर्गाच्या प्रवासाचे किस्से आम्ही अनेक वर्षं परिचितांकडून ऐकत होतो, सगळीकडे वाचत होतो आणि Youtubeवर पाहत होतो. या फेब्रुवारीत आमचं हे स्वप्न खरं करण्याचा योग आला. दिल्ली पाहायला जायचं होतं, तेव्हा मुंबई राजधानीनेच का जाऊ नये? असा विचार मनात आला आणि मग बरोबर चार महिने आधी संगणकासमोर बसून तिची तिकिटं काढून टाकली. (आता हा कालावधी दोन महिन्यांवर आला असला, तरी तेव्हा मात्र तो चार महिने होता.)

शनिवार, १५ फेब्रुवारी

सकाळी सव्वासातची डेक्कन क्वीन पकडून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या डेक्कन क्वीनलाही एक मोठा इतिहास आहे आणि तिचाही एक मोठा चाहतावर्ग आहे. किंबहुना, विजेवर धावणारी पहिली लांब पल्ल्याची गाडी, डायनिंग कार जोडली जाणारी पहिली गाडी असे काही विक्रमही तिच्या नावावर आहेत. काही वर्षांच्या खंडानंतर आताशा डेक्कन क्वीनला डायनिंग कारचा डबा पुन्हा एकदा जोडला जात आहे.

आम्ही अर्थातच याचा आनंद घेतला. किंचित थंडी, समोर गरम गरम आम्लेट-पाव, वाफळता चहा आणि खिडकीतून दिसणारं सुंदर असं खंडाळा घाटाचं दृश्य! साला और क्या चाहिये जिंदगीमे?

डेक्कन क्वीन डायनिंग कार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून आम्ही गेलो मुंबई सेंट्रल येथे राहणाऱ्या बहिणीकडे. तिथे थोडा वेळ घालवून, जेवण करून आम्ही अक्षरशः चालत समोरच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहोचलो. गेलो तर आमची गाडी फलाटावर उभीच होती. गाडीचं प्रथमदर्शन अगदी सुखावणारं होत<. (एक सूचना - या स्थानकावरून अगदी ह्याच वेळेला दिल्लीला जाणारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस सुटते, तेव्हा गाडीचा क्रमांक तपासूनच आपल्या गाडीत बसावं.)

प्रथमदर्शन

गाडीसमोर थोडं फोटोसेशन

डब्यात चालण्यासाठीची मोकळी जागा

गाडीत स्थानापन्न झाल्यावर

दिल्लीपर्यंतचं चौदाशे किलोमीटरचं अंतर ही गाडी अवघ्या साडेपंधरा तासात कापते. आणि वेगासाठी जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढीच ही गाडी प्रसिद्ध आहे तिच्या खान-पान सेवेसाठी. गाडीत बसल्यानंतर काही वेळातच आम्हाला या गोष्टीचा अनुभव आला. आमचं स्वागत झालं वर्तमानपत्र, गुलाब आणि पाण्याची एक बाटली देऊन. त्यानंतर थोड्या वेळाने आलं जेवणाआधीचं हलकं खाणं. सॅंडविच, समोसा, खारवलेले पिस्ते आणि पतीसा (सोनपापडीसारखा एक गोड पदार्थ).

साधारण साडेसात वाजता वाढलं गेलं रात्रीचं जेवण. पहिल्या वर्गाच्या डब्याची खास बात म्हणजे इथे जेवण चिनी मातीच्या भांड्यांमध्ये वाढलं जातं. टेबल वगैरे मांडून, अगदी साग्रसंगीत!

पहिल्यांदा आलं टोमॅटो सूप. हे भलतंच चविष्ट होतं. इतकं, की मी ते पुन्हा मागवलं!

नंतर आलं जेवण. यात रोटी, डाळ, भात, दही आणि मिक्स भाजी असे पदार्थ होते. शाकाहारींसाठी पनीरची भाजी, तर मांसाहारींसाठी चिकन करी असा पर्याय होता.

चिकन करी व रोटी

डाळ आणि दही

शाकाहारी जेवण

पदार्थ स्टीलच्या भांड्यांमधून समोर आणले जात होते आणि ते हवे तितके घेण्याचा पर्याय आपल्याकडे होता. शेवटी स्वीट डिश म्हणून रसगुल्ला होता.

जेवण थोडं जास्तच झालं. त्यानंतर आम्ही झोपायची तयारी केली.

रविवार, १६ फेब्रुवारी

रात्री साडेतीन वाजता जाग आली, तर गाडी कुठल्या तरी स्थानकावर उभी होती. (कोटा?)

झोप अगदी छान झाली. पहाटे साडेसहा वाजता चहा आला. बाहेर हवा अगदी थंड होती. अशा थंड हवेत गरम गरम चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच! आणि तो चहा कुणी आपल्या पलंगावर, आयता आणून देत असेल, तर मग ती मजा काही औरच!

चहाबरोबर बिस्कीटंसुद्धा!

चहा छान होता, इतका की तोही आम्ही पुन्हा एकदा मागवला. नंतर आला नाश्ता. हाही जेवणाइतकाच भरभक्कम होता. कटलेट, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स, उकडलेल्या भाज्या, दही आणि केळी.

एवढ्यात सव्वाआठ वाजले आणि गाडीतून उतरण्याची वेळ झाली. आपल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच गाडी स्थानकावर दाखल होत होती. आम्हाला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला छोटीशी बक्षिसी दिली आणि आम्ही गाडीतून बाहेर पडलो. प्रवास भलताच आरामदायक झाला होता. असं वाटत होतं की खास आपल्यासाठी सोडलेल्या एखाद्या रेल्वेगाडीतून आपण प्रवास केला आहे.. ना सहप्रवाशांचा त्रास, ना फेरीवाल्यांची कटकट. या गाडीच्या प्रवासाविषयी जेवढं वाचलं, ऐकलं ते कमीच असा वाटणारा हा प्रवास होता!

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर

रेल्वे स्थानकावर बाहेर पडून आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. दिल्लीपर्यंतचा प्रवास जेवढा आनंददायक होता, तेवढंच या शहरातलं आमचं चार दिवसांचं वास्तव्यही. त्याबद्दल पुन्हा नंतर कधीतरी!

काही छायाचित्रं - श्रेयस दुधाने (https://www.instagram.com/shreyasdudhane)

प्रतिक्रिया

सुखदायक प्रवास झाला की सहलीचा आनंद वाढतोच.

श्वेता२४'s picture

21 Oct 2025 - 8:45 am | श्वेता२४

राजधानी रेल्वेप्रवासाचा साग्रसंगीत वृत्तांत आवडला....

श्वेता व्यास's picture

1 Nov 2025 - 1:48 pm | श्वेता व्यास

+१ होय

गोरगावलेकर's picture

21 Oct 2025 - 11:31 am | गोरगावलेकर

भटकंतीत लांबचा प्रवास असेल आणि तो आरामदायी झाला तर कंटाळा, थकवा अजिबात येत नाही. साहजिकच प्रवसानंतरचा दिवस वाया न जाता पर्यटन लगेच सुरू करता येते.
आपला लेख वाचून मला आमच्या गेल्या वर्षीच्या गोवा सहलीतील विस्टाडोम रेल्वे डब्यातून केलेला प्रवास आठवला

आम्ही प्रवासात खिडकीतून फोटो खूप काढतो त्यामुळे एसी डब्यातून जाणे टाळतो. विस्टाडोमपेक्षाही वन्दे भारतचा कल्याण - नाशिक प्रवास आवडला( नाश्ता सोडून). इतर बरेच प्रवासी त्या गाडीने शिर्डीला नेहमी जात असावेत. त्यांना प्रवासाचे अप्रुप वाटलेले दिसले नाही आणि त्यांनी घरून डबे आणले होते.

गुल्लू दादा's picture

5 Nov 2025 - 2:33 pm | गुल्लू दादा

आवडले.

फारएन्ड's picture

10 Nov 2025 - 3:10 am | फारएन्ड

मस्त लेख! मी पण या गाडीने गेलो आहे. मस्त अनुभव असतो. साडेतीन वाजताचे ते स्टेशन कोटाच असावे.

बाय द वे, आता मध्य रेल्वेचीही एक राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आहे काही वर्षांपूर्वी. ती कल्याण-भुसावळ वगैरे मार्गाने जाते.

Bhakti's picture

10 Nov 2025 - 12:21 pm | Bhakti

खुपच छान!