'किशोर‘स्वरातील ‘साहेबा‘चे गाणे

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
2 Sep 2025 - 9:17 am

हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील
साला मैं तो साहब बन गया. . .

या गाण्याने गतवर्षी आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

आधी गाण्याचे तपशील पाहू :

चित्रपट : सगीना
गीतकार : Lyricist: मजरूह सुलतानपुरी
संगीतकार : सचिनदेव बर्मन
गायक : किशोरकुमार, पंकज मित्र

गाण्यातील मुख्य स्वर किशोरकुमारचा असला तरी हे दोन पुरुषांचे द्वन्द्वगीत आहे. किशोरने आवाज दिलाय दिलीपकुमारला तर पंकजने दिलाय ओमप्रकाशला. किशोरने अन्य समकालीन चित्रपट नायकांसाठी अनेक गाणी गायलेली आहेत. परंतु दिलीपकुमारसाठी किशोरचे पार्श्वगायन अत्यल्प आहे; प्रस्तुत गाण्याखेरीज दिलीपसाठी किशोरची स्त्री गायकांबरोबरची अशी जेमतेम एक दोन द्वन्द्वगीते आहेत.

हे गाणे मी शालेय जीवनापासून ऐकतो आहे. तेव्हा विविध भारतीवर तर ते आठवड्यातून एक दोनदा हमखास लागायचे. 1970-80 च्या दशकात तर कॉलेज तरुणांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय होते. विशेषतः तरुणांच्या ओल्या पार्ट्यांमध्ये एकदा का मंडळी ‘हवेत’ गेली की मग त्यातला एखादा छोटामोठा गायक अगदी नाच करत हे गाणे हमखास म्हणायचा. किंबहुना दोन तीन पेग चढलेल्या अवस्थेतच हे गाणे खऱ्या अर्थाने एन्जॉय करता येते असे तरुणांना वाटे !

या गाण्याची पार्श्वभूमी समजण्यासाठी संबंधित चित्रपटाचा थोडक्यात परिचय करून देतो.
मुळात ‘सगिना महातो’ हा 1970चा बंगाली चित्रपट. तपन सिन्हा या तेव्हाच्या आघाडीच्या दिग्दर्शकांनी दिलीपकुमार आणि सायरा बानू यांना मुख्य भूमिकांमध्ये घेऊन केलेला.

१९४२ च्या वातावरणातील हा चित्रपट घडतो आसामात. अनाथ असलेला सगिना रेल्वेमजूर आहे. त्याला दारूचे व्यसन. अन्यायाविरुद्ध उसळणारा व गोऱ्या साहेबाला अजिबात न भिणारा हा इसम. या मजुरांची संघटना करायचे कम्युनिस्ट पक्ष ठरवतो. त्यासाठी सगिनाला हाताशी धरले जाते. नेते त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवतात. अखेर तो कामगार नेता होतो.

तशातच एका मजूर बाईवर तिथला मॅनेजर बलात्कार करतो. मजूर खवळतात व संपावर जातात. वाटाघाटींसाठी गोरा साहेब येतो. चर्चेदरम्यान एक मजूर कल्याण अधिकारी नेमण्याची अट मान्य होते. अर्थातच ही माळ सगिनाच्या गळ्यात पडते. तो ही जबाबदारी स्वीकारण्यास नाखूष असतो कारण मुळात तो अंगठाबहाद्दर. हे असलं काही लचांड नको असे तो सांगून पाहतो. पण कोणी त्याचे ऐकत नाही. शेवटी त्याला अधिकारी बनवले जाते. त्याचे काम सांभाळण्यासाठी पक्षाची एक निष्ठावंत सेक्रेटरी बाई दिमतीला असते. तो अधिकारी झाला तरी पूर्वीप्रमाणे मजुरांच्यातच वावरतो. त्यांना मेजवानी देतो. हे पाहून पुढारी त्याचा बुद्धिभेद करतात व त्याने मजुरांपासून अंतर ठेवून रुबाबात राहिले पाहिजे असे सांगतात.

काही दिवसात त्याला या कोंडलेल्या आयुष्याचा कंटाळा येतो. तो पुन्हा मजुरी करायची असे म्हणतो. पण पुढारी त्याला परावृत्त करतात आणि डोके लढवून पक्षकार्याच्या अभ्यासासाठी कलकत्त्याला पाठवतात. तिथे त्याला रुक्ष गोष्टींमध्ये अडकवून त्याच्यातला रांगडा आत्मविश्वास खच्ची करतात. नंतर तो इथेही घुसमटतो. तिरीमिरीत आसामला पुन्हा परततो. तिथल्या टेकड्यांमध्ये तो पोचतोय तोच तिथले मजूर त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. त्याचा तिरस्कार करतात. सगिना चक्रावतो. हे असे कसे झाले हे त्याला जरा उशिराच समजते. मजुरांपासून त्याला तोडण्याची पुढाऱ्यांची ही कुटिल नीती असते. त्यातूनच ते सगिनाची राजकीय शिकार साधतात.

खरं तर या कथेची तर्कशुद्ध शोकांतिका झाली असती, परंतु प्रेक्षक शरणतेपायी यापुढे चित्रपटाला खास फिल्मी कलाटणी देऊन त्याची सुखांतिका केली आहे. हा चित्रपट निव्वळ कम्युनिस्टविरोधी नाही. तो तमाम स्वार्थी निष्ठुर राजकीय यंत्रणांच्याविरुद्ध आहे. त्यात लालबावटा संस्कृतीचे विदारक चित्रण केले आहे.

बंगालीत या चित्रपटाने जोरदार यश मिळवल्यानंतर 1974 मध्ये ‘सगीना’ या नावाने त्याची हिंदी आवृत्ती काढण्यात आली. यातही मूळ बंगालीतील नायक नायिकेची जोडी ( दिलीप- सायरा) कायम ठेवण्यात आली. तो हिंदीत फारसा चालला नाही परंतु त्यातले ‘साला मै तो. . . गाणे मात्र जबरदस्त हिट झाले. आता त्याने पन्नाशी पार केलेली असली तरीही आजही ते किशोरच्या आवाजाप्रमाणेच चिरतरुण आहे. म्हणून त्याची ही सुरेल आठवण.
आपल्यापैकी बहुतेकांनी ते ऐकले असेलच. ऐकले नसल्यास ते इथे (https://www.youtube.com/watch?v=oxUKIrF2PS0) ऐकून गाता गाता त्यावर थिरकता येईल !
**********************************************

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

5 Sep 2025 - 10:57 pm | सौन्दर्य

हिंदी चित्रपट सृष्टीने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी शेकडो गाणी दिली आहेत. 'बार बार दिन ये आये ' हे असेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे गाणे. पूर्वी २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट ह्या दिवशी 'मेरे देश की धरती' लागले नाही असा दिवस विरळा. त्या शिवाय लग्न, प्रेम, प्रेमभंग, रक्षाबंधन, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, दसरा, ईद, जन्म, मरण इत्यादी प्रत्येक प्रसंगाला अनुरूप गाणी आहेतच.
विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील.

कुमार१'s picture

6 Sep 2025 - 7:15 am | कुमार१

विषय/प्रसंग सांगा - गाणी हजर होतील

.
अगदी बरोबर !
त्यातली अनेक आवडतात.

श्वेता व्यास's picture

10 Sep 2025 - 6:33 pm | श्वेता व्यास

गाणे माहिती होते, पण कोणत्या चित्रपटातील याबद्दल काही कल्पना नव्हती, कथा आवडली चित्रपटाची!

आलो आलो's picture

10 Sep 2025 - 11:43 pm | आलो आलो

अगदि अगदि …३र्या पेग नम्तर तर्र हेच गाने आठवते म्हाँजे ठल्लक शब्द नाही आले ओठांबाहेर तरी षारिरिक आव (मनीचा भाव) तर्र नक्कीच अस्साच असतो .

कुमार१'s picture

11 Sep 2025 - 11:09 am | कुमार१

😍