आपल्या आयुष्यात आपल्याला असे काही लोकविलक्षण,इहलोकाच्या पलिकडचे, पार्थिवतेच्या पलिकडचे, निर्गुण निराकार तत्वाचा अंशतः साक्षात्कार घडविणारे, अभूतपूर्व अनुभव येतात की ते आपण आमरणान्त विसरु शकत नाही.
असे मला आलेले अनुभव मी आज तुम्हांला सांगणार आहे.
या अनुभवासाठी मी एक विशेषण वापरले आहे. "चित्तचक्षुचमत्कारी"..
पंधरा जानेवारी २०१० ही तारीख मी कधीच विसरणार नाही. तो माझ्यासाठी "सोनियाचा दिनु"होता. तेरा जानेवारीला मी,माझी मैत्रीण, आमचे काही स्नेही आणि एक अत्यंत प्रसिद्ध तज्ञ खगोल अभ्यासक, असे आम्ही सर्वजण रेल्वे स्थानकावर येऊन दाखल झालो होतो.
आम्ही सगळे चाललो होतो विवेकानंदपुरमला, कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला!!! हा सूर्यग्रहण सोहळा घडणार होता पंधरा जानेवारी २०१०ला. त्या सोहळ्याला अगदी वेळेवर पोहोचण्यासाठी आम्ही तेरा जानेवारीलाच निघालो होतो.
मजा म्हणजे आम्ही बसलो होतो तिथं काही पत्रकार आले. त्यांनी ग्रहण बघायला चाललो म्हणून आमचे फोटो काढले. आम्हांला काही प्रश्न विचारले. आम्हीही काॅलर ताठ करत उत्तरं दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच बातमी देणार होते म्हणे!
आम्ही कन्याकुमारी एक्स्प्रेस मध्ये बसलो. आरक्षण आधीच केलेलं होते. एकूण बावीस तासांचा प्रवास केला. बरोबर रोज लागणारं सामान तर होतंच, पण न विसरता घेतलेली एक वस्तू होती, ती म्हणजे सौरफिल्टर ऊर्फ ग्रहण चष्मा. हो त्या महातेजस्वी सूर्यमहोदयांकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची काय बिशाद होती आमची! तेव्हा ग्रहण चष्मा हवाच!
विवेकानंदपुरमला ग्रहण बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वरस्वामिनी आशा भोसले ग्रहण पाहण्यासाठी साक्षात् हजर झाल्या होत्या. अर्थात् त्यांच्या या भेटीबद्दल गुप्तता पाळली गेली होती. आणि त्यांच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था होती. त्यांना आम्ही पाहू सुद्धा शकलो नाही.
विवेकानंदपुरममध्ये आम्हां सर्वांना राहण्यासाठी काॅटेजेस् आरक्षित केली होती. तिथं आम्ही आमचं सामान टाकलं आणि फ्रेश झालो.
चौदा जानेवारी च्या रात्री मी अजिबात झोपू शकले नाही. उद्या सूर्यग्रहण पाहायचं याचा आनंद झाला होताच पण विलक्षण एक्साईटमेंट होती.
अखेर पंधरा जानेवारी हा दिवस उजाडला. आमच्या काॅटेजच्या बाहेर मस्तसं लाॅन होतं. कालच मकरसंक्रांत होऊन गेली होती. हवेमध्ये सुखद गारवा होता. तो चाखत आम्ही सूर्यमहाराजांच्या कोवळ्या उन्हात बसून राहिलो होतो. आजचं ग्रहण न ऊ मिनिटं अकरा सेकंदांचं होते. ओहो! म्हणजे ते अद्भुत दृश्य आम्ही मनसोक्त पाहू शकणार होतो. ग्रेट.लाईफटाईम एक्सपिरियन्स !
आम्ही सज्ज झालो. ग्रहण चष्मा डोळ्यांवर चढवला आणि मी हिरव्या रंगाच्या मऊमऊ लाॅनवर आडवी झाले. आता मी डोळ्यांत प्राण आणून फक्त आणि फक्त सूर्याकडे एकटक बघत राहणार होते. माझी पंचेंद्रियं माझ्या डोळ्यांत एकवटली होती. मला ग्रहणाचा अभ्यास करायचा नव्हता की तो इव्हेंट कव्हर करायचा नव्हता. मला जे काही अपूर्व असं घडणार होतं त्याच्या मध्यातून भान जागृत ठेवून चालायचं होतं.
सकाळी बरोब्बर दहा पस्तीसला चंद्राच्या छायेचा सूर्याला स्पर्श झाला. चंद्राची छाया हळुहळू सूर्याला व्यापत होती. मी एकटक पाहात होते. जणुकाही मी सूर्याला आणि चंद्राला नव्यानेच, पहिल्यांदाच पाहात होते.
आज, आत्ता ते वेगळेच दिसत होते. बरोब्बर साडेअकरा वाजता चंद्रानं सूर्यावर आपली पूर्ण सावली पसरवली. आणि कंकणाकृती सूर्यग्रहण घडलं.
डायमंड रिंग
कंकणाकृती ग्रहण
ते तब्बल नऊ मिनिटं अकरा सेकंद होतं. ही आम्हांला मिळालेली अधिकृत आणि सत्य माहिती हो !
कारण घड्याळात बघून मिनिटं मोजण्याइतकी मला सवडही नव्हती आणि मी तितकी भानावरही नव्हते. मी सूर्याशी एकरुप झाले होते. माझं भान हरपलं होतं.
हृदय निमाले,तन्मय झाले,
आले लोचनातून
नीर कितीकदा
ऐकत असता
दिडदा, दिडदा..
अशी माझी अवस्था झाली होती.
साडे अकरा वाजता पूर्णत्वाला गेलेलं सूर्यग्रहण हळुहळू सुटत गेलं. साडेबारा वाजता ते पूर्णपणे सुटलं. सूर्य आणि चंद्र मुक्त झाले. नेहमीसारखे झाले.
सूर्यग्रहणं अमावास्येला होतात. यांत पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र येतो. आणि चंद्रग्रहणं नेहमी पौर्णिमेला होतात. इतकं सर्वांनाच माहिती असतं. यांत सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. इतकं सर्वांनाच माहिती असतं.
मला सोबतच्या तज्ञांनी अशी माहिती दिली की, सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा त्याचवेळी प्रतिपदेची इवलीशी चंद्रकोर सूर्याच्या जवळच उगवताना दिसते. मला ते दृश्य पाहण्याची, अनुभवण्याची अनावर इच्छा झाली. मी आणि माझा मैत्रीण ताबडतोब रिक्षा करून समुद्र किनाऱ्यावर गेलो. पण आम्हांला काही ती चंद्रकोर दिसली नाही. ती फारच कमी अवधीसाठी दिसते आणि सूर्याच्या तेजामध्ये ती अगदी क्षीण अशी दिसते असं कळलं. त्या तज्ञांनी सांगितलं की त्यांनी मावळत्या सूर्याच्या जवळ अशी चंद्रकोर त्यांनी ऐंशी साली झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी पाहिली आहे.
चंद्रकोर
अमावास्या शब्दाची फोड अशी आहे की अमा=जवळ,सह, बरोबर. आणि वास्या शब्दांत मूळ धातू वस् आहे. म्हणजे ज्या तिथीला सूर्य आणि चंद्र सह,जवळ, बरोबर असतात ती तिथी म्हणजे अमावास्या.
मी ती चंद्राची कोर पाहू शकले नाही. पण मी जे पाहिलं होतं ते भान हरपवणारं, अविस्मरणीय होतं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं होतं.
आणखी एक असाच लोकविलक्षण अनुभव आहे तो खग्रास सूर्यग्रहणाचा. चोवीस ऑक्टोबर १९९५ ला हे ग्रहण झालं. ते आम्ही राजस्थानमध्ये नीम का थाना या गावी जाऊन पाहिलं. मराठी विज्ञान परिषदेनं एक निवेदन जाहीर केलं होतं. त्यामध्ये ग्रहण पाहायला येऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन केले होते. आम्ही म्हणजे आमच्या कुटुंबियांनी आमची नावं नोंदवली. आम्ही रेल्वेने मुंबईला गेलो. मुंबईहून विज्ञान परिषदेनं बसची व्यवस्था केली होती. त्या बसने आम्ही जयपूर येथे गेलो.आणि तिथून नीम का थाना या गावी जाऊन पोहोचलो. तिथं एका मोकळ्या माळरानावर उभे राहून आम्ही सगळे खग्रास सूर्यग्रहण बघणार होतो.
सूर्यग्रहण पाहण्यासाठी मी अगदी आतुर झाले होते. ऑक्टोबर महिना असूनही सकाळ सुखद होती. आकाश निरभ्र होतं. मी खग्रास सूर्यग्रहण पहिल्यांदाच बघणार होते. मी डोळ्यांवर ग्रहण चष्मा चढवला होताच. आता मी सुरक्षितपणे, स्थिरपणे अगदी सूर्याच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहात होते. अखेर प्रतीक्षा संपली. चंद्रानं सूर्याला स्पर्श केला. तो हळूहळू सूर्यावर स्वतःची सावली पसरवत होता. आसपास काळोख वाढत चाललेला जाणवत होता. आणि..... आणि ती डायमंड रिंग आम्हांला दिसली. इतका तेजःपुंज खडा असलेली अंगठी सूर्य कुणाच्या बोटात घालेल बरं? माझ्या? मला खुद्कन हसू फुटलं. काही क्षणातच ती हिऱ्याची अंगठी दिसेनाशी झाली आणि सूर्य पूर्णपणे झाकला गेला.
खग्रास सूर्यग्रहण.
सूर्याभोवतीचं प्रभामंडल दिसायला लागलं. त्याची आभा प्रकाशमान झाली.
माझ्यावर त्या सूर्यानं जादू केली. मी भानावर नव्हते. कुणीच भानावर नव्हतं. काळा सूर्य!! कल्पना तरी करतो का कधी आपण? पण तो होता! आमच्या अगदी सम्मोर होता. जणुकाही चंद्र म्हणत होता,"सूर्य आजोबा मी तुमचं तेज झाकोळून टाकू शकतो बरं का!"
हळुहळू सूर्य चंद्राच्या छायेतून बाहेर यायला लागला. मला जाणवलं कंकणाकृती सूर्यग्रहण नक्कीच खूप खूप सुंदर दिसतं. पण खग्रास सूर्यग्रहण आपल्याला किंचित् भयभीत करत आश्चर्यात पाडतं.
सूर्य पूर्णपणे मुक्त झाला. ग्रहण सुटलं आणि तो पूर्वी पेक्षा जास्त तेजानं तळपायला लागला ,कारण दिवस थोडा अधिक वर आला होता ना!
मला आकाश आवडतंच, निरभ्रही आणि ढगाळही. मला ते जास्त आवडतं चांदण्यांनी भरलेल्या रात्री. पण मला त्याहूनही कितीतरी पटीने जास्त आवडतात, उगवता सूर्य आणि पौर्णिमेचा चंद्र!ते दोघं माझे आहेत. हं! मी त्यांच्या प्रेमात आहे.
खग्रास सूर्यग्रहण पाहून परत येताना मला मी वाचलेली माहिती आठवत होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेल्या "ओरायन" ह्या ग्रंथात पुढच्या पाचशे वर्षांत घडणाऱ्या सर्व खग्रास सूर्यग्रहणांची माहिती नमूद केलेली आहे. ही माहिती अचूक असून खगोलशास्त्राचे अभ्यासक ती संदर्भासाठी वापरतात. नासा मध्ये ही आगामी सूर्यग्रहणांची माहिती अर्थातच् उपलब्ध आहे.
आता आणखी एकच अविस्मरणीय अनुभव सांगते. मी आणि माझ्या मित्रमैत्रिणी आपापल्या कुटुंबियांसह आत्ताच्या संभाजीनगर जवळ असलेल्या म्हैसमाळ नावाच्या एका हिल स्टेशनला सहलीला गेलो होतो. तिथं पोहोचेपर्यंत संध्याकाळ व्हायला आली. आम्ही तिथली एक काॅटेज आधीच बुक केली होती. सगळ्यांनी तिथं सामान टाकलं आणि फ्रेश व्हायला निघून गेले. त्यानंतर आमच्यातलीच काही हौशी मंडळी तिथेच स्वयंपाक करणार होती. चिकन करी आणि मटण बिर्याणी , राईस वगैरे. मला मात्र त्यात स्वारस्य नव्हतं. माझ्या मनात आलं गर्दी नाही, पर्यटकांची वर्दळ नाही. कसलाही गोंधळ, गोंगाट नाही. मस्त भटकून येऊया. मी आत जाऊन मी बाहेर फिरायला जाणार असल्याची माहिती दिली आणि चटकन् बाहेर पडले. चटकन् अशासाठी की मला माझ्याबरोबर कुणीही यायला नको होतं. मला एकटीला तिथली नीरवता, तिथली हवा, संध्याकाळच्या धूसर,गूढ प्रकाशात दिसणारा निसर्ग,तिथला सुखद गारवा निवांतपणे, विना व्यत्यय एकट्याने अनुभवायचा होता.
मी शांतपणे, रमतगमत चालले होते. जरासं दूरवर एका टेकडीच्या उतारावर एक मोठा दगड होता. वाटलं त्या दगडावर बसून आसपासच्या धिम्या गतीने झिरपणाऱ्या काळोखाची मजा घ्यावी. मी त्या दगडावर बसले. मी आता मस्तपैकी एकटीच होते. सगळी नाती, गणगोत, सगळे सगेसोयरे, मित्रपरिवार, सगळ्या जबाबदाऱ्या यांच्या पार गेले होते मी! फक्त एक माणूस! निसर्गाचाच एक अभिन्न भाग!
माझी नजर खाली वसलेल्या सुबक, टुमदार गावाकडं गेली. गाव लहानसं होतं. तिथं देखणी घरं होती. घराघरांतून लावलेले चिमणुले दिवे मंदपणे लुकलुकत होते. अहा! किती रम्य, मनोहारी दिसत होतं ते गाव. आणि या सर्वांत प्रसन्न दिसत होता तो तिथला लहानसा तलाव. बेहतरीन चित्रमय गाव होतं. ते एखाद्या चित्रकाराने रेखाटलेलं चित्रच वाटलं मला ते!
आणि... आणि अचानक त्या तलावाच्या आतून पिवळ्या हळदी, रंगाचा भलामोठा पौर्णिमेचा गोल, वाटोळा हसरा, गोड, सुरेखसा चंद्र सळळळकन् वर आला. मी मज हरपून बसले ग बाई! त्या चंद्राला पाहून मला खूप आनंद झाला. मन प्रसन्न करणारा, अद्भुत आनंद!मी काय याआधी पौर्णिमेचा चंद्र पाहिला नव्हता का? कितीदा तरी पाहिला होता. पण मला त्या दिवशी तो एकमेवाद्वितीय वाटला! "यासम हा" वाटला. मला तो माझा माणूस वाटला. माझा जिवलग. मला तो खरोखरीचा माझा लाडका मामा वाटला. कुणीही काय फक्त एखाद्या माणसाच्याच प्रेमात पडावं का?मी त्या दिवशीच्या त्या माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या पूर्णचंद्राच्या प्रेमात आहे. अजूनही! इतक्या वर्षांनंतरही!!
(पूर्ण चंद्र फोटो आंतरजालावरून)
दीर्घ लेखन वाचल्याबद्दल धन्यवाद...
प्रतिक्रिया
8 Aug 2025 - 12:02 pm | कर्नलतपस्वी
खग्रास सूर्यग्रहणाचा. चोवीस ऑक्टोबर १९९५ ला हे ग्रहण झालं. ते आम्ही
ही घटना घडली तेव्हां मी अलवर, राजस्थान मधे कार्यरत होतो. संपुर्ण घटना मी व बायको,मुलींनी घरातून बघीतली. अद्भुत अनुभव होता आजही सर्व जसेच्या तसे लक्षात आहे.
दुसरी घटना, सध्या मी जिथे रहातो ते घर पहिल्या मजल्यावर आहे. कोजागरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब माझ्या बेडरूमच्या पलंगाजवळ बरोबर ब्रह्ममुहुर्तावर पडते. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली तेव्हाः सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत. तेव्हांपासून न चुकता कोजागीरीला दुधाची वाटी त्या ठिकाणी ठेवतो.
तिसरी घटना, सूर्योदय आणी सुर्यास्त सुद्धा अप्रतिम दिसतो. जरूर बघा.लेख अवडला हे वेगळे सांगायला नको.प्रची अगदी तसेच आहेत जसे मी बघीतले.
https://youtu.be/UnH6jJgTLKo?si=lEw9M6dWu-yUq175
8 Aug 2025 - 1:00 pm | अभ्या..
सौं ना म्हणलो बघ आपल्या घरात दोन चंद्र दिसत आहेत.
तीन नाहीयेत का?
का इंदुलेखाचे वरदान आहे?
.
हलकेच घ्या फौजीसाहेब. ;)
8 Aug 2025 - 1:06 pm | गवि
हे राम.. आवरा.. :-)) :-))
अरे काय रे हे अभ्या... ?
:-))
8 Aug 2025 - 1:26 pm | हणमंतअण्णा शंकर...
फ्लॅट कॅपचे ग्रहण लागले असेल.
(फौजी कर्नल लोकं रिटायर झाल्यावर असलीच hat वापरत्यात बहुतेक)
8 Aug 2025 - 1:30 pm | अभ्या..
आम्ही त्याला आल्बर्ट पिंटो टोपी म्हणायचो.
नुसती टोपी बघितलीय पण संस्पेडर्स आणि त्यावर तसली टोपी वापरणारा इसम सार्वजनिक जीवनात अद्याप भेटायचाय.
8 Aug 2025 - 4:34 pm | कर्नलतपस्वी
दोन पौर्णीमेचे एक प्रतीपदेचा.
बाकी चालू द्या.
8 Aug 2025 - 1:14 pm | श्वेता व्यास
"चित्तचक्षुचमत्कारी" अतिशय योग्य शब्द वापरलात या अनुभवांसाठी.
बाकी इकडे पुण्यात कधी अविस्मरणीय ग्रहणे पाहिल्याचं आठवत नाही, नेहमी ढगाळ आकाशच असते ग्रहणावेळी.
8 Aug 2025 - 5:08 pm | स्वधर्म
ग्रहण खूपदा बघितलंय पण ते अनुभव तुंम्ही तुमच्या शैलीने इतके सुंदर केलेत, की मी आत्तापर्यंत ग्रहण पाहिलंच नाही, असं वाटलं.
आणखी लिहा.
8 Aug 2025 - 5:09 pm | अभ्या..
सहमत.
आजी लिहितात छानच.
8 Aug 2025 - 5:10 pm | कर्नलतपस्वी
सेन्स ऑफ ह्युमर आवडला.
बिरबल,तेनालीराम नंतर आपलाच नंबर लागतो.
सस्पेंडर्स साहेबांबरोबरच गेले.
8 Aug 2025 - 7:35 pm | कंजूस
लेख आवडला.
मीसुद्धा तिकडे कन्याकुमारीला सूर्यग्रहण बघायलाच गेलो होतो. विवेकानंद स्मारकासाठी होडीची रांग असते त्यात उभा राहून ग्रहण पाहिले. प्रेझंट बांधायला जो एक चकचकीत चंदेरी कागद वापरतात त्याच्या तीन घड्या करून एक फिल्टर बनवला होता. त्यातून छान दिसतो सूर्य. त्या वेळी आकाशात अभ्रे होती त्यामुळे फायदाच झाला. ( असा स्वस्त फिल्टर फक्त दोन चार सेकंदच वापरावा. सतत सूर्याकडे बघू नये.)
ठाण्याच्या एका सहल आयोजकांने या सहलीचे ( कन्याकुमारी एक्स्प्रेसने अडीच दिवसांचा प्रवास करून जाणे येणे आणि कन्याकुमारीत दोन दिवस ) भाडे चार हजार सांगितले होते. मग मी स्वतंत्र पुणे त्रिशूर ते कन्याकुमारी पाच दिवस राहून खाऊन चार हजारांत जमवलं होतं. अगदी पंधरा दिवस अगोदर गरीब रथ गाडीची तिकिटेही मिळाली होती.
दुसरे दिवशीचे पेपर विकत घेतले. चांगले फोटो त्यात होते. ते जपून ठेवले.
अशा काही विशेष घटनांचे वर्णन डायरीत लिहून फोटोही चिकटवण्याचे उद्योग पूर्वीची पिढी करत असे. डिजिटल माध्यमाने या छंदाकडे दुर्लक्ष होत आहे.
21 Aug 2025 - 2:16 pm | नचिकेत जवखेडकर
फोटो आणि वर्णन खूपच छान. खंडग्रास सूर्यग्रहण १-२ वेळेला बघितले आहे पण खग्रास बघायचा योग काही अजून आला नाहीये. प्रचंड इच्छा आहे बघायची.