दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
3 Jun 2025 - 8:37 am

प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय.

दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले

गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे "
प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं "
गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती .......

हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार . मग प्रवीण तरुण झाला, मग एक दिवस पाऊस पडला, मग त्याच्या मनात एक ललित लेख पाझरु लागला, त्याची लेखणी झरु लागली अन तिने प्रसवलं हे महावाक्य

"कणीस घरी गॅसच्या चुलीवर भाजणं ही अगदी खास शहरी मध्यमवर्गीय तडजोड आहे. पण कणसाची टचटचीत दुधाळ सुरवट चव पावसाच्या आहे-नाही वाटेवर जवळच्या बागेच्या, तळ्याच्या, समुद्राच्या साक्षीनेच ! डोंगरमाथा नि पावसाचा वळण रस्ता असेल तर भाग्यच ! पण पावसाला अस चवदार करणं ही ज्याची त्याची खवय्या कसोटी. पुढे हे पदार्ध आपण खाउ; पण चवीचा आतला चवदार गाभा चाखायचा असेल तर पाऊसच हवा."

तर अशा रीतीने दवणे यांनी टचटचीत शब्दाला एक नवा आयाम दिला एक नवी अभिरुचीसंपन्न सात्विक जोड दिली. तरी काही नतद्र्ष्ट वाचक कणसाचा फ्रॉइडीयन संबध जोडतीलच तर अशांकडे आपण दुर्लक्ष करुन पुढे जाऊ या

दवणेंच्या ललित लेखांची शिर्षके पण् किती सुंदर !!!! सात काळजाच्या आत जपुन ठेवावी अशी !!!!!!!!!!!!!! उदाहरणार्थ हे वरील वाक्य ज्या लेखातील आहे त्याचे नाव शिर्षक बघा " पंचसंवेदनांचा साक्षात्कार " !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

दवणेंच्या ओळींना ओळी कसल्या मुर्तिमंत सौंदर्याची खाण जणु एकेक ओळ !!!!! तर या ओळींना माझ्या मते एक उद्गार चिन्ह पुरेसं नाही शेकडो उद्गारचिन्हे जरी दवणेंच्या श्रीखंडीय चॉकलेटी मखमली शैलीतील ओळींना लावली तरी ते अपुर्णच आहे!!!
उदा. याच लेखातील या ओळी बघा आणि खरं खरं सांगा एक उद्गारचिन्ह पुरेसे आहे का ? या ओळींमागच्या भावाने जे आनंदाने कोलमडुन जाणं आहे ते व्यक्त करायला !!!

तर ओळ अशी आहे.

आता हे आषाढरंगी उसळते थेंब श्रावणपंखी फुलपाखरु झाले आहेत. थेंबात आभाळ धारण करणार्‍या या सुखाला झेलण्याचा हा क्षण ! नुसता क्षण नाही ; सणच ! "प्रत्येक क्षण चिंब जगुन घ्या " सांगत नश्वर आयुष्याला अक्षर करणारा ! सत, चित, आनंदाच मुर्तिमंत रुप होणारा !

आहे की नाही एकेका शब्दाची ताकद ! स्त्रवतोय की नाही डोपामाइन शब्दागणिक !!!! ओळीगणिक !!! स्त्रवलाच पाहीजे !!!!
हल्ली मला दवणे हे नुसतं नाव वाचलं तरीही मेंदुतुन डोपामाइन स्त्रवु लागतो...............!!!!!!!!!!!!!!!
कारण यानंतर आता येणार असते सुंदर शब्दांची कधीही न संपणारी मेजवानी !!

दवणेंच्या बालपणीच्या काही नोंदी आहेत त्यातील एक अशी की दवणे हे बालपणी जेव्हा "आनंद मेळ्या" त जात असतं. तेव्हा त्यांच्या बरोबरीचे सवंगडी सिंहाचे हिंस्त्र रींगमास्टरांचे खेळ बघत असतं, बंदुकी घेऊन समोरचे फुगे फोडणे, वेगवान झोक्यांचा थरार अनुभवणे किंवा मौत का कुआ इत्यादीतील मोटरसायकलींचा जीवघेणा थरार इत्यादी खेळतं असे. मात्र बालदवणेना या गोष्टीत कधीच रस नव्हता. आणि आला नाही ते केवळ दोनच खेळणे विकत घेण्यास जात असतं, त्यात एक म्हणजे कॅलिडीस्कोप ज्यात काचेचे तुकडे असतं आणि ते फिरवुन त्यातुन बघितले की त्याच काचेच्या तुकड्यांचे विविध आकार डिझाइन्स बनत असत. दुसरं खेळणं म्हणजे पाण्याचे रंगीत बुडबुडे बनवुन फुंकुन फुंकुन उडवणे. त्यांना त्याच त्याच काचेच्या तुकड्याने किती शेकडो डिझाइन्स बनवता येतात तसेच त्याच त्याच "जीवना" चे किती असंख्य आकाराचे रंगीबेरेंगी बुडबुडे बनवता येतात उडवता येतात याचे अप्रुप वाटत असे. मोठेपणी कोण होणार या प्रश्नाला बालदवणे म्हणत मी बुडबुडे वाला होणार बुडबुडे उडवणार. तसेच दवणेंना बालपणापासुन मातीची/लाकडाची खेळणी कधीच आवडली नाहीत. त्यांना नेहमी प्लास्टीकची खेळणी आवडत असतं.

तरूण झाल्यावर दवणेंचा सर्वात आवडता चित्रपट अर्थातच " कागज के फुल" हा होता. तरूण वयातच त्यांना भांडवलवादाने प्रभावित करुन सोडलं होतं. लॉ ऑफ डीमांड अ‍ॅन्ड सप्लाय हा कलाक्षेत्रातही उत्कृष्ठपणे काम करतो ही त्यांची ठाम धारणा बनली. साहित्यीकांनी आपली एफिशिएन्सी वाढवली पाहीजे हा त्यांचा तरुण असल्यापासुनचा आग्रह होता. एकेका लेखासाठी एकेका कादंबरीवर अनेक वर्षे जगणारे लेखक त्यांना पॅरासाइट्स वाटतं असतं. artificial intelligence चे ते खंदे पुरर्स्कृते आहेत. माझे प्रकाशक मला जितका चांगला prompt देतात तितकी माझी निर्मिती अधिकच बहरते /झरते असे त्यांचे विनम्र मत आहे. त्यांना cotton चे भरड कापड कधीच आवडले नाही त्यांना नेहमी Synthetic कापडाचे पॉलीस्टर वगैरेचे शर्ट पसंत आहेत.

दवणेंची शैली श्रीखंडीय आहे की चॉकलेटीय आहे की मखमलीय आहे की सर्वांचे एक अदभुत असे एक जालिम मिश्रण आहे याविषयी समीक्षकांत वाद आहेत. पण माझ्यामते ती उकडमोदकीय शैली आहे !!!! बाहेरुन जरी थोडी सपक बिनचवीची भासली तरी जसे आपण उकडीचा मोदक तोंडात टाकल्यानंतर आतील गोड मालाचा गोडवा जसा हळुहळु आपल्या जिभेचा ताबा घेऊ लागतो तशी दवणे यांची शैली आहे असे माझे एक सामान्य वाचक म्हणुन मत आहे.
दवणे यांचे ६७.५ टक्के तरुण वाचक pre diabetic आणि ९७.७ टक्के जुने वाचक confirmed diabetics आहेत अशी माहीती नुकत्याच एका पी एच डी च्या "दवणेंच्या ललित लेखाचे मराठी माणसांच्या आरोग्यावर झालेले परीणाम आणि उपाय योजना " हे शिर्षक असलेल्या प्रबंधातुन बाहेर आली.
प्रबंधात विवीध उपाय जे सुचविले आहेत त्यात नामदेव ढसाळ उतारा म्हणुन घ्या असे सुचविण्यात आलेले आहे असे कळाले. तर एका ढसाळांच्या वाचकांच्या ढासळलेल्या आरोग्यविषयक प्रबंधात थोडा प्रविण दवणेंच्या ललिताचा काढा घेत चला असे सुचविल्याचे ऐकिवात आहे. तर ते एक असो.

पण म्हणुन कोणी असे समजत असेल की प्रवीण दवणे सुबोध आहेत शाळकरी आहेत तर असे अजिबात नाही. त्यांच्या लेखनात एक मति गुंग करणारी गुढता नेहमीच आढळून येते.
त्यांनी फारच subtle आणि गुढ असे ललित लेखन केलेले आहे हा एक नमुना बघा यातील साटल्य बघा.

" चाळीतल्या , वाड्यातल्या दहा बाय बाराच्या अपुर्‍या जागेत , अधुर्‍या स्वप्नांना आकाश देणारी दिवाळी आमच्या पिढीनं पाहीली. एका फुलबाजीला स्पर्श करुन प्रत्येक शेजार्‍याची फुलबाजी झडतांना, आपली मिटत जाताना समोरच्या हातातली फुलबाजी बरसते, तेव्हा आनंदाची रुजवात होताना विस्तारणार्‍या मनात दिवाळी जाणवली. हाडं गोठवणार्‍या थंडीत अंगणातल्याच चौथर्‍यावर घंघाळ आणुन सर्वसाक्षी झालेली ती अभ्यंगस्नानं ! आधी थंडीनं आणि मग उष्ण पाण्यानं केलेलं "ओय ओय " अनाराचं झाड बहरताना विरुन जाई. दोन दिवस आधीपासुन घमघमणार्‍या भाजणीच्या वासाला आता चेहरा आलेला असे आणि सारणाच्या पिठीनं कानवल्याची चंद्रकोर होऊन रसवंतीत प्रवेश केलेला असे !

आहे की नाही गुढ ! कळले का काही ? सर्वात गुढरम्य ओळ अनाराचं झाड बहरताना विरुन जाई. ही आहे
कुणी बघितलं असेल बालदवणेंना तशा अवस्थेत ? आणि अनाराच झाड ? आणि ते बहरताना विरुन जाण !
याचं मानसशास्त्राच्या अंगाने विश्लेषण होणं गरजेचं आहे
वाह वाह वाह !! शंकर रामाणींच्या गुढ कवितेला लाजवणारं !!!! मतकरींच्या गुढ कथेला "चकवा" देणारं !!!!!!! सासणेंच "लाल फुलांच झाडं" विसरवणारं हे दवणेंचं अनाराचं झाड !!!!!!

मला नेहमी एक वाटतं प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी. जसे गालिब ने प्रवास केला बनारस वगैरेचा तर त्यातुन चराग ए दैर वगैरे सारखी रचना निर्माण झाली. अर्थात थोर प्रतिभेला त्याची गरज नाही पण अनुकुल भुमी प्रतिभेला बहर आणते इतकेच म्हणायचे आहे. जसे बालकवी मला नेहमी वाटते रेव्हरंडांनी त्यांना काश्मिर ला पाठवले असते तर ! विचार करा अजुन किती सुंदर कविता आम्हास लाभल्या असत्या. तर दवणें विषयी सुद्धा मला एक फॅन्टसी आहे. दवणे यांचे असणे दवणे यांचे लिहीणे एक आनंदगाणे च जणु आहे. दवणेंचे लेखन हा एक सकारात्मकतेचा मांगल्याचा एक अखंड कोसळणारा नायगारा आहे. ज्याने दु:खाचे वेदनेचे सर्व आवाज कापरासारखे विरुन जातात. तर दवणे यांच्या सकारात्मक विचारांची मोठी गरज आज गाझा आणि युक्रेन ला आहे. गाझामधील भुयारं, युक्रेन मधले ढीगारे या पार्श्वभुमीवर दवणेंचे लेखन उठुन दिसेल. तेथे ही एक सकारात्मकतेची सुनामी येइल. मांगल्य नांदेल दवणेंचे असणे इतके महत्वाचे आहे. दवणेंच्या नुसत्या असण्याने खुप काही होऊ शकते.

तर सध्या बाहेर पाऊसपुर्व वातावरण झालयं मी मस्तपैकी कॉफी पितोय (चाणाक्ष वाचकांनी ओळखलचं असेल मी मस्तपैकी कॉफी गटाचा सदस्य आहे ) दवणेंनी यावरही भयानक सुंदर लिहीलयं.

मेघाळलेल्या निळाईत जेव्हा कृष्णमेघांचे भोवरे फिरु लागतात ; बरसायचं तर आहे ; पण ते पहीलं पाऊल टाकण्याचा तो "क्षण"! अगदी अश्वाने लाल मातीत धुरळा उडवीत धावण्यापुर्वी , निमिषभराचा विराम घ्यावा, तशी ती मन निस्तब्ध करणारी स्तब्धता!!!

अजुन एका ठिकाणी दवणे लिहीता

अशा कोर्‍या क्षणांची कोरी वही म्हणजे आयुष्य होतांना प्रेमाचं एक शिशीररुपही उभं ठाकतं. संपुर्ण पर्ण झडलेल्या तरुडहाळीवर बर्फफुलांनीच रेंगाळाव तस आयुष्यं

आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!!
बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!!

पारंपरिक पाककृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "

दवणे की गटणे ?? ;)

प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.

प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते.
वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते.
गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

Bhakti's picture

4 Jun 2025 - 2:40 pm | Bhakti

खुप रडवलं हो..
.
.
;) ;)

अभिरुप's picture

4 Jun 2025 - 6:54 pm | अभिरुप

प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त's picture

9 Jun 2025 - 7:41 am | चित्रगुप्त

लई मंजे लईच भारी हो.
'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे.
आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल.
(इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून)

आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!!
बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!!

ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

कपिलमुनी's picture

9 Jun 2025 - 10:29 am | कपिलमुनी

लेख आवडला !
दवणे अमर रहे

कर्नलतपस्वी's picture

9 Jun 2025 - 10:51 am | कर्नलतपस्वी

ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच

इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र".

शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले.

आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची.

लेख आवडला. धन्यवाद.

आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.