मराठी भाषेत अनेक चांगली वचने आहेत.
त्या पैकी काही आपल्याला प्रगती करायला प्रोत्साहन देतात तर काही मात्र सुविचार असूनही आपल्याला संकुचित करून ठेवतात.
उदा :
१) ठेवीले अनंते तैसेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान
वर वर दिसायला हे वाक्य चांगले वाटले तरी ते परिस्थितीशी झगडून बाहेर येण्याची इच्छा मारून टाकते. आपल्या हातात काहिही नाहिय्ये. जे काही आहे ते देवाने विचारपूर्वक दिलेले आहे. त्यात बदल करायचा नाही. आणि निष्क्रीय वागायचे असाच संदेश हे वाक्य देते. त्यामुळे माझ्या लेखी हा एक भंगार सुविचार आहे.
२) लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरीबी चांगली: - हे वाक्यही वरच्या सारखेच भंगार सुविचार. लहानपणी हे वाक्य ऐकले की वाटायचे श्रीमंती आली की माणूस लुळापांगळा होतो. त्यामुळे आपल्याला श्रीमंत व्हायचे नाही हे कुठेतरी मनात ठसते
३) साधी रहाणी उच्च विचारसरणी : - या वाक्यामुळे आपण आपल्या साध्या ( दरिद्री ) रहाणीला नसलेल्या उच्च विचारसरणीच्या आड दडवतो. शंतनुराव किर्लोस्कर म्हणतात एखाद्या उत्तम विणकराने विणलेल्या वस्त्राला जर विकत घेणारा ग्राहकच नसेल तर त्या विणकराचे पोट कसे चालेल त्याची विणकाम कला बंद पडेल. पर्यायाने अर्थव्यस्थेला खीळ बसेल.
दुसरे म्हणजे जर तुमच्याकडे सधनता नसेल तर गरजा भागविण्या शिवाय इतर विचारसरणी डोक्यात येवूच शकत नाही.( भुकेलेल्याला खाण्याशिवाय दुसरा कोणताच विचार सुचत नाही )
४) शरण आलेल्या शत्रुवरही दया दाखवावी : मुहम्मद गझनवी वर दया दाखवून त्याला १५ वेळा सोडले. त्याने सोमनाथवर १६ व्या वेळेलाही हल्ला केला. जर त्याला पहिल्यावेळीच ठेवला असता तर पुढचे पंधरा हल्ले झालेच नसते.
५) केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हावे: हे वाक्य सुविचार म्हणून शाळेत नेहमी फल्यावर लिहीलेले असाय्चे. हे असले वाक्य कोणी आणि का लिहीले तेच कधी समजले नाही. वाढलेले केस असण्याचा आणि बुद्धी असण्याचा काय संबन्ध? असे प्रश्नही कधी पडले नाहीत.
विवेकानंदांचे जे काही फोटो वारंवार समोर येतात त्यात ते फेटा बांधलेलेच आहेत. त्यामुळे केस दिसण्याचा प्रश्न येत नाही.
आईनस्टाईनचे विस्कटलेले केस तसे वाढलेलेच होते की.
६) नेहमी खरे बोलावे : या सुविचाराबद्दल काय बोलू???????
तुम्हाला अशी काही वाक्ये आठवत असतील तर इथे त्यावर चर्चा होऊन जाऊ दे.
प्रतिक्रिया
8 May 2025 - 12:20 pm | सोत्रि
बस क्या विजुभाऊ,
अहो लिहा की एखादे नविन पुस्तक बिस्तक. का असल्या निरर्थक जिलब्या पाडता आहात तुम्ही पण?
- ('दोसतार'चा पंखा) सोकाजी
8 May 2025 - 12:38 pm | मूकवाचक
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे
8 May 2025 - 4:07 pm | चामुंडराय
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता घामही गळे
10 May 2025 - 9:39 am | गवि
हे मधलेच वाक्य संदर्भ सोडून वापरले गेले आहे. ते वाक्य स्वतंत्र पाहिले तर नक्कीच त्यात मूर्ख किंवा गाढवाचे प्रयत्न दिसतात.
या वाक्याचा अगदीच विपरीत अर्थाने उपयोग केला जातो.
मुळात हे वाक्य एका कडव्यात इतर काही उदाहरणांच्या सोबत एक उदाहरण म्हणून वापरले आहे. एकूण आशय असा की एकवेळ अमुक होईल, तमुक होईल, हेही होईल, तेही कदाचित होईल.. पण ती विशिष्ट गोष्ट होणे शक्य नाही..
चुभूदेघे.
10 May 2025 - 9:45 am | गवि
तुम्ही हे वाक्य संदर्भ सोडून मधलेच काढले आहे असे म्हणणे नसून ते तसेच रूढ झाले आहे आणि मीही तसेच वापरत असे. मग नंतर कोणीतरी ही रोचक बाब मला सांगितली.
10 May 2025 - 9:52 am | गवि
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे.
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनहि वितळे.
सश्याचे ही लाभे विपिनि फिरता शिंग ही जरी.
परंतू मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी.
वृत्तानुसार काही दीर्घ ह्रस्व वगैरे बदलायचे असेल तर पुन्हा चुभूदेघे.
11 May 2025 - 7:50 pm | स्वधर्म
https://lahanpan.blogspot.com/2008/07/blog-post.html
धनंजय देव यांची पोष्ट
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||
जी.ए. कुलकर्णी यांच्या "माणसे: अरभाट आणि चिल्लर" ह्या आत्मवृत्तात ह्या रचनेबद्दल हा वेगळा उतारा वाचनात आला आणि प्रकर्षानी आठवण झाली ..
एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..." रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; 'उद्योगाच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरी'... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर माहितीचा कागद असतो, त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही यापूर्वी दोनदा लिहिले देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : "प्रयत्ने वाळूचे कण-" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानलेल्या माणसाची (एखाद्या वेळी) तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे." ...
मनोगतावरून साभार ..
15 May 2025 - 5:28 pm | अकिलिज
जगातील मुख्य तेलसाठे वाळू प्रदेशातच आहेत. अगदी कॄष्णा गोदावरी आणि नॉर्वेचे ही पाहिलेत तरीही.
तेव्हा वाळूचा आणि तेलाचा जवळचा संबंध आहे. रगडायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळले की बस्स.
8 May 2025 - 3:28 pm | सौंदाळा
खाऊन खग्रास हागून सत्यानाश
8 May 2025 - 3:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"आम्ही खाउन पिउन सुखी" हे वाक्य अनेकदा मध्यम वर्गीय घरांमध्ये ऐकायला यायचे. खाउन पिउन सुखी म्हणजे आमच्याकडे जास्त पैसा नाही हे सुचवायचे असायचे.
8 May 2025 - 4:24 pm | अनन्त्_यात्री
प्रश्न विचारलात "
8 May 2025 - 7:53 pm | चित्रगुप्त
माझ्या ७३ वर्षांच्या अनुभवातून जाणवलेले आहे, की खालील तीन वाक्ये अतिशय मौल्यवान आहेत. मात्र त्यांचा अर्थ उथळपणे न घेता, विविध अनुभवातून शिकत जाऊन चिंतन- मनन करत रहाण्याने वय वाढेल तसा हळूहळू उलगडत जातो.
१) ठेवीले अनंते तैसेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान
२) लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरीबी चांगली
३) साधी रहाणी उच्च विचारसरणी
याविषयी स्वानुभवाचे बोल लिहू शकतो, पण सध्या प्रवासात असल्याने तूर्तास एवढेच.
मला भंगार वाटणारी वाक्ये इथे दिल्यास अनेकांच्या श्रद्धेला तडा वगैरे जाईल, त्यामुळे त्याविषयी मौन बाळगणेच बरे.
9 May 2025 - 11:06 am | विजुभाऊ
१) ठेवीले अनंते तैसेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान
२) लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरीबी चांगली
३) साधी रहाणी उच्च विचारसरणी
वरील तीनही वाक्ये पण मनात निष्क्रीयता पेरतात.
१) जे मिळाले आहे त्यात समाधान माना तुमचे जीवन चांगले करण्यासाठी प्रयत्नच करू नका. असाच अर्थ होतो या वाक्याचा.
२) गरीबीचे उद्दात्तीकरण कशासाठी करायचे?
३) साधी रहाणी ठीक आहे पण उच्च विचारसरणी म्हणजे नक्की काय?
जर सगळ्या भारतातल्या लोकानी साधे रहायचे असे ठरवले तर अनर्थ होईल. टाटानी निर्माण केलेल्या गाड्या कोण वापरणार? कोण खरेदी करणार?
तसे झाले तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे आणि त्यातल्या कामगारांचे काय?
साधे घर असेल तर चालेल पण आपल्याला ए सी शिवाय जगता येईल का? कामा साठी योग्य हवामान असेल तर नीट काम करता येते हा मुम्बै मधे राहून घेतलेला अनुभव आहे.
आता राहिले उच्च विचारसरणी चे.
कोणाची विचारसरणी उच्च मानायची भारताला ऑटोमोबाईळ क्षेत्रात मानाने उभे करणारे रतन टाटा . कोट्यावधी भारतीयाना रोजगार देणारे / सधन बनवणारे धिरुभाई अम्बाणी की मग लाखो कामगाराना संप करून कायमचे रस्त्यावर आणणारे दत्ता सामंत ( त्यांच्या उद्देशाबद्दल किंतू नाही. पण परिणाम तोच झाला ) तरुणाईला स्वप्ने दाखवीन काम करण्यासाठी प्रोत्साहीत करणारा इलॉन मस्क की मग त्याच तरुणाईला रिकामटेकडे ठेवून त्यांचा फायदा घेणारा गल्लीतील नगरसेवक ?
9 May 2025 - 1:01 pm | सोत्रि
मन optimistic आहे कि pessimistic त्यावर निष्क्रीयता अवलंबून आहे.
- (ऑप्टीमिस्टीक) सोकाजी
8 May 2025 - 9:33 pm | Bhakti
*मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..
स्वर्ग हा सापेक्ष असतो.त्यासाठी कशाला मारायचं, मेल्यावर स्वर्गात करायचं काय?
*भांडा पण नांदा..
सिरियसली?काय अडलय? भांडत राहून नांदायला..
9 May 2025 - 10:00 am | कॉमी
मी "पादा पण नांदा" असे ऐकले आहे.
12 May 2025 - 6:32 am | nutanm
पादा पण नान्दा ही मूळ म्हण आहे पण थोडी असभ्य
शब्द असलयाने फारशी आपण वापरत नाही. चारचौघात.
8 May 2025 - 9:49 pm | धर्मराजमुटके
मजबूरी का नाम महात्मा गांधी.
मी याला विरोध करुन नेहमी "मजबूती का नाम महात्मा गांधी' म्हणतो.
8 May 2025 - 10:55 pm | सौन्दर्य
"असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" - कोणताही हरी खाटल्यावर देत नाही. मेहनत ही करावीच लागते.
9 May 2025 - 11:38 am | चंद्रसूर्यकुमार
टिपीकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांमध्ये सांगितले जाणारे वाक्य- 'दहावीचे एक वर्ष अभ्यास कर मग आयुष्यभर आरामच आहे' जे कोणी सगळ्यात पहिल्यांदा बोलले असेल त्या माणसाला किंवा त्याच्या आत्म्याला स्वर्गात असेल तर तिथून खेचून आणून कायमचे नरकात पाठवावे असे अनेकदा वाटते :) :)
9 May 2025 - 2:03 pm | विजुभाऊ
आणखी एक वाक्य
जे आपल्याला सतत खाली ओढते
चार लोक काय म्हणतील? ( सबसे बडा रोग... क्या कहेंगे लोग )
9 May 2025 - 4:11 pm | युयुत्सु
त्याला/तिला जमतं तर तुला जमायला काय हरकत आहे?
प्रत्येक व्यक्ती, तिच्या क्षमता वेगळ्या आहेत या सार्वत्रिक सत्याला चुना...
9 May 2025 - 8:02 pm | स्वधर्म
बुध्दिच्या कमेर्यात विचारांचे रीळ घालून प्रयत्नाचे बटन दाबले असता यशाचा फोटो निघतो. :-)
9 May 2025 - 8:19 pm | वामन देशमुख
हॅ हॅ हॅ
मागच्या शतकामध्ये जेव्हा शाळेमध्ये होतो त्या काळात हे असले सुविचार खूप यायचे.
म्हणजे बाजारातले एखाद्या नवीन प्रॉडक्ट, किंवा एखादी नवीन कल्पना किंवा विज्ञानातील नवीन शोध असं काहीतरी घेऊन त्याचा रूपकात्मक उपयोग करून शेवटी आम्हाला ज्ञान वाजवायचे.
मला वाटतं सातवी आठवीपर्यंत आम्ही हे असं काहीतरी ऐकून अगदी दिपून जायचो. नववीला गेल्यावर फारच कॅज्युअल वाटू लागलं. दहावीला मात्र, "चिल्ल् मार' हे आत्मभान आले!
9 May 2025 - 9:30 pm | कानडाऊ योगेशु
केस वाढवुन देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवुन विवेकानंद व्हा!
हे वाक्य ही शालेय वयात फळ्यावर सुविचार म्हणुन लिहिलेले पाहिले व वाचले आहे.
तेव्हा असे वाटायचे कि देवानंद होणे म्हणजे फारच सोपा मार्ग असणार पण नंतर नंतर कळले देवानंद होणे ही अवघड आहे.
9 May 2025 - 11:26 pm | सुक्या
ह्या ह्या ह्या !!
आमच्या विद्यालयाच्या हेडमास्तरांचे हे आवडते वाक्य होते. त्यांच्या ह्या उदात्त वाक्यामुळे ई १० वी पर्यंत आम्हा सगळ्यांना केस बारीक करुन शाळेत यावे लागे. जरा कुठे कुणी केस कापायला उशिर केला नी ते सरांनी पाहिले की हातात केस आले तर केस नाहीतर मुलाचे कान धरुन खांब हलवावा तसे त्याला हलवत आनी हा डायलॉग मारत. त्यांचा वाढलेल्या केसांवर राग होता की देवानंद वर हे कधीच कळले नाही ..
10 May 2025 - 9:24 am | वामन देशमुख
तुमचे हेडमास्तर टकले असतील हो, दुसरं काय कारण असणार!
हॅ हॅ हॅ
12 May 2025 - 6:36 am | nutanm
छान!
10 May 2025 - 9:45 am | युयुत्सु
Ha ha ha ha ha
13 May 2025 - 2:55 pm | विजुभाऊ
हा हा हा.
लैच ईनोदी आणि निरुपयोगी वाक्य आहे हे.
असेच आणखीक एक निरुपयोगी वाक्य ( इंग्रजीत याला प्लाटीत्यूड म्हणतात )
"सर्व गणेशभक्तांचे स्वागत असो"
हे वाक्य खास करून पुण्यात वाचायला मिळते
10 May 2025 - 4:00 am | कर्नलतपस्वी
जबाबदारी उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते.
10 May 2025 - 4:19 am | nutanm
सौनदाळा----खाऊन खग्रास हागून सत्यानाश ऐवजी आपलयाला असे म्हणायचे असावे, ््््ख ऊन सुग्रास हागून सत्यानाश.. कारण आपण सुग्रास अन्नच खातो आपलया आई मावशी मामी काकू आजी याचया हातचे व नावे ठेवली खाऊन की असे म्हणत असावेत.
10 May 2025 - 10:46 am | युयुत्सु
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता... या वचनाच्या संदर्भाविषयी गवि यांनी केलेला खुलासा अतिशय योग्य आहे. याशिवाय हे विधान अतिशय शोषणाला उत्तेजन देणारे आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
वाळूचे कण रगडण्याने क्रॉनिक स्ट्रेस निर्माण होऊन वाढलेल्या कॉर्टीसॉल पातळीने तब्येतीचे भयानक नुकसान होते. ते नुकसान कोणत्याही "वाळुच्या तेलाच्या" मालीशने भरून येत नाही. बर्याचदा रगडणे संपुष्टात येते तेव्हा जगण्याचा आनंद घ्यायची क्षमता पण संपलेली असते. तेव्हा वाळू रगडण्याचे काम तारतम्याने करणे केव्हाही चांगले...
11 May 2025 - 1:10 pm | कानडाऊ योगेशु
माझ्यामते ही म्हण किंवा वाक्र्पचार आखाती देशात तेलाच्या खाणी सापडण्याच्या पूर्वीपासुन असावी.
तसे असेल तर हे वाक्या त्या दृष्टीन प्रॉफेटीक वाटते.
14 May 2025 - 6:49 pm | शशिकांत ओक
सत्य मेव जयते
14 May 2025 - 8:43 pm | हारुन शेख
मुहम्मद गझनवीला १५ वेळेस दया दाखवून सोडले याचा संस्कृत, अरबी, फार्शी समकालीन साधनांतील एकही विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा नाही. असल्यास द्यावा.
सावरकरांनी ऐतिहासिक सत्यांचा सोयीस्करपणे केलेला विपर्यास आहे तो.
बाकी चालू द्या !
14 May 2025 - 9:13 pm | प्रचेतस
नसेल कुणी दया दाखवली ब्वा, पण १७ वेळा आक्रमणे केली, पण सोमनाथ, मथुरा, थानेश्वर, कनौज, आणि इतर कित्येक ठिकाणची मंदिरे फोडली, मूर्ती उद्धस्त केल्या, हिंदूंच्या कत्तली केल्या हे तर खरे आहे ना?
हवे असल्यास समकालीन साधने बघा-
"तारीख-ए-यामिनी" – अल-उतबी (हा स्वतः महमूदाचा दरबारी इतिहासकार होता.
किताब उल हिंद - अल बेरुनी (हाही महमुदाच्या दरबारात होता) याने केलेले उल्लेख.
तारीख-ए-फिरिश्ता" – मुहम्मद कासिम फिरिश्ता (हा दख्खनी सुलतानांचा दरबारी इतिहासमार होता. त्याने साहजिकच हे उल्लेख तारीख ए यामिनी आणि इतर फारसी साधनांवरून घेतलेत हे उघड आहे.
कल्हण कृत राजतरंगिणी
कृष्णमिश्र कृत प्रबोधचंद्रोदया
आपल्या प्रतिसादावरून असे वाटते की गझनीचा महमूद कुणी साधुसंत होता आणि हिंदू राज्यकर्त्यांना ग्लोरिफाय करण्यासाठी सावरकरांनी सत्याचा विपर्यास केला. मात्र यात आपण सोयीस्कररित्या महमूदाने केलेली कृष्णकृत्ये जाणूनबुजून विसरत आहात असे दिसते.
14 May 2025 - 11:30 pm | हारुन शेख
मी काय लिहिले आहे ते परत एकदा वाचा. मग हेत्वारोप करा.
15 May 2025 - 10:48 am | वामन देशमुख
सावरकरांनी काय लिहिले आहे ते परत एकदा वाचा....
15 May 2025 - 6:24 pm | विजुभाऊ
महंमद गझनवी इतक्या वेळा लुटालूट करण्यासाठी भारतात सोमनाथ इतक्या आतपर्यंत १७ वेळा येतो. काय परत जातो काय. तेही अगदी सहजपणे. अणि त्याला दरम्यानच्या भागातला कोणीही राजा प्रतिकार करत नाही हेच जरा विचित्र वाटते.
याबद्दल आपण चर्चा वेगळ्या धाग्यावर करुया.
मूळ धाग्याचा उद्देश भरकटतोय.
26 May 2025 - 9:43 am | विवेकपटाईत
जाति मधे विभागलेला समाजात प्रतिकार करण्याची शक्ति राहत नाही. राजा दाहिरला इतर राजांनी मदत केली नाही. नंतर सर्व नष्ट झाले. आज बंगाल मध्ये कश्मीर सारखी परिस्थिति आहे. अनेक राजनीतिक दल स्वत:च्या तत्कालिक फायद्यासाठी जेहादी मनोवृतीला खत पाणी घालतात. परिणाम पराजय घर दार सोडून पलायन किंवा मृत्यू. पुढील 50 वर्षाचे भारतातील अधिकान्श भागात हेच सत्य दिसणार.