कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ११ (तेरेखोल, रेडी, शिरोडा)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
14 Jan 2025 - 10:59 pm

आजच्या दिवसात अनेक ठिकाणे बघायची असल्याने सकाळी साडेसातलाच उठून आवरल्यावर नाश्ता रेस्ट हाऊसवर न करता बाहेरच कुठेतरी करण्याचे ठरवून साडेआठच्या सुमारास तिथून ४१ किमी अंतरावर असलेला तेरेखोल किल्ला बघायला निघालो.

वेंगुर्ल्याला एका उपहारगृहात चहा-नाश्ता करण्यासाठी एक थांबा घेऊन दहाच्या सुमारास भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या वेंगुर्ला तालुक्यातल्या, परंतु प्रशासकीयदृष्ट्या गोव्याच्या पेडणे तालुक्यातील तेरेखोल (Tiracol) गावाततल्या किल्ल्याजवळ येऊन पोचलो. गोवा आणि महाराष्ट्राला जमिनीने वेगळे करणारी तेरेखोल नदी हि भौगोलिकदृष्ट्या दोन राज्यांची नैसर्गिक सीमारेषा ठरली असली तरी १७४६ ते १९६१ पर्यंत सुमारे २१५ वर्षे हा भूप्रदेश पोर्तुगीज अंमलाखाली राहिल्याने तेरेखोल गाव हे गोव्याचे महाराष्ट्रातले एक 'एक्सक्लेव्ह' (Exclave साठी मराठी प्रतिशब्द माहिती नाही) ठरले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या अंबोली घाटातील 'कावळेसाद' ह्याठिकाणी उगम पावलेली 'तेरेखोल' नदी ज्याठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते, त्या तेरेखोल नदीमुखाजवळ (Estuary) सावंतवाडीचे राजे महाराजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात हा किल्ला बांधला होता. पुढे अठराव्या शतकात व्हाईसरॉय 'डॉम पेड्रो मिगेल डी आल्मेडा' ह्याच्या नेतृत्वाखाली १७४६ मध्ये खेम सावंतांचा आरमारी युद्धात पराभव करून पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज केल्यावर १७६४ साली किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि १७८८ साली कायदेशीररीत्या तेरेखोलचा गोव्यात समावेश केला गेला. त्यानंतर १७९४ मध्ये काही काळासाठी मराठ्यांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला होता, पण पुन्हा तो पोर्तुगीजांनी जिंकून घेतला होता.

अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या ह्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेची कल्पना येण्यासाठी खाली दोन ड्रोन इमेजेस देत आहे.


डावीकडील कोपऱ्यात वरच्या बाजूने वाहात येणारी तेरेखोल नदी, उजवीकडे अरबी समुद्र, समोर नदीमुख आणि त्यापलीकडे केरीचा समुद्रकिनारा.

जांभा दगडाचा (चिऱ्यांचा) वापर करून बांधलेला हा किल्ला आकाराने लहान असला तरी गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र बंडात सहभागी झालेल्या लष्करी सैनिकांचे आणि गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिक, आंदोलकांचे आश्रयस्थान म्हणूनही त्याचा वेळोवेळी वापर झाला असल्याने त्याला ऐतिहासिक महत्वही प्राप्त झालेले आहे.

७ मे १८३४ रोजी भारतातल्या पोर्तुगीज वसाहतीचे 'प्रीफेक्ट' (राज्याधिकारी / गव्हर्नर) म्हणून 'डॉ. बर्नाडो पेरेस दा सिल्वा' ह्यांची नेमणूक करण्यात आली. उत्तर गोव्यातल्या तिसवाडी तालुक्यातील 'नेउरा' ह्या गावात जन्मलेले 'डॉ. बर्नाडो पेरेस दा सिल्वा' हे ४५१ वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या इतिहासातले भारतीय वंशाचे पहिले आणि एकमेव प्रीफेक्ट ठरले. ('प्रीफेक्ट' हे घटनात्मक पद पोर्तुगीजांनी पूर्वीच्या 'व्हाईसरॉय' पदाला असलेले लष्कर नियंत्रणाचे अधिकार कमी करून नव्याने वापरात आणले होते. प्रीफेक्ट पदाला 'राज्याधिकारी' म्हणून प्रशासनाचे सर्वाधिकार होते पण लष्करासाठी स्वतंत्र गव्हर्नर नियुक्त केला जात असे.)

राज्याधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर लिस्बन, पोर्तुगाल येथून १० जानेवारी १८३५ रोजी गोव्याला परतलेल्या डॉ. पेरेस ह्यांनी १४ जानेवारी १८३५ रोजी आपला पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच आठवड्यात भ्रष्टाचाराने बरबटलेली प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून न्याय आणि अर्थ विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून त्यांच्याजागी नवीन लोकांच्या नियुक्त्या, नवीन नगर परिषदेची स्थापना, कोमुनिदादांना (सामुदाईक जमीनीचे मालकी हक्क असलेले मूल निवासी) राज्याला द्यावा लागणारा त्यांच्या उत्पन्नाच्या एक षष्ठांश कर बंद करणे, सत्तेत सहभागी असलेल्यांकडून स्थानिकांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालणे असे अनेक गोव्यातल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले होते.

पहिल्यांदाच आपल्यातला एक मनुष्य राज्याधिकारी पदावर बसून धडाधड लोकहिताची कामे करत असल्यामुळे गोव्याची स्थानिक जनता खूष असली तरी त्याकाळी लष्करावर वर्चस्व असलेले पोर्तुगीज आणि मेस्टीकोज (युरोपियन + अमेरिकन मुल निवासी अशा संकरीत वंशाचे लोकं) मात्र डॉ. पेरेस ह्यांची नियुक्ती आणि त्यांच्या स्थानिकांना झुकते माप देणाऱ्या कार्यपद्धतीमुळे नाखूष होते. ह्या लोकांनी पेरेस ह्यांच्याविरुद्ध कट-कारस्थान करून १ फेब्रुवारी १८३५ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांच्या जागी पूर्वीचे व्हाईसरॉय 'मॅन्युएल डी पोर्तुगाल ई कॅस्ट्रो' यांची राज्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. १४ जानेवारी ते १ फेब्रुवारी १८३५ असे केवळ १७ दिवस राज्याधिकारी पदावर राहिलेल्या डॉ. पेरेस ह्यांना गोव्यातून हद्दपार करून त्यांची रवानगी मुंबईला झाल्यानंतर ते पुन्हा कधीच गोव्यात परतू शकले नाहीत.

डॉ. पेरेस ह्यांची कपटाने उचलबांगडी केल्यामुळे पोर्तुगीज लष्करात असलेल्या पेरेस समर्थक स्थानिक सशस्त्र सैनिकांच्या गटाने हा तेरेखोल किल्ला ताब्यात घेऊन राज्याधिकारीपदी पेरेस ह्यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी करत बंडाचे निशाण फडकावले, परंतु लष्कराच्या गव्हार्नरने ही मागणी फेटाळून लावत हे बंड चिरडून टाकण्याचे आदेश दिल्यावर पोर्तुगीज सैन्याने हल्ला करून जवळपास सर्व बंडखोरांना ठार मारून किल्ला परत आपल्या नियंत्रणाखाली आणला होता.

ह्या घटनेला एकशे एकोणीस वर्षे उलटल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट १९५४ रोजी १४ सत्याग्रहींच्या समूहाचे नेतृत्व करणाऱ्या 'आल्फ्रेड अल्फान्सो' ह्यांनी एक दिवसासाठी तेरेखोल किल्ला ताब्यात घेऊन त्यावर तिरंगा फडकावला होता, परंतु दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण करून अटक केलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना पणजीतल्या पोलीस कोठडीत कोठडीत डांबले. ह्या गुन्ह्यासाठी आल्फ्रेड अल्फान्सो ह्यांच्यावर खटला चालवून TMT ने (ट्रायब्युनल मिलिटरी टेरिटोरियल) त्यांना आठ वर्षे सश्रम कारावास आणि तीन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आणि १९५५ सालच्या मार्च महिन्यात 'अग्वाद' तुरुंगात त्यांची रवानगी केली होती. परंतु शिक्षा पूर्ण भोगण्यापूर्वीच १९५९ च्या मे महिन्यात त्यांची सुटका करण्यात आली होती.

आल्फ्रेड अल्फान्सो ह्यांच्या सत्याग्रहाच्या बरोबर एक वर्षानंतर १५ ऑगस्ट १९५५ रोजी ह्या ठिकाणी १२७ सत्याग्रहींनी केलेल्या सत्याग्रहात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या पनवेलचे 'हिरवे गुरुजी (तुळशीराम बाळकृष्ण हिरवे)' आणि रेवदंड्याचे 'शेषनाथ वाडेकर' हे देखील सहभागी झाले होते. तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यासाठी निघालेल्या ह्या निशस्त्र सत्याग्रहींना पोर्तुगीज सैनिकांनी माघारी फिरण्याचे दिलेले आदेश धुडकावून लावत पुढे कूच करणाऱ्या ह्या गोवा मुक्ती संग्रामाच्या कार्यकर्त्यांवर पोर्तुगीजांनी अमानुषपणे केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी शहिद झाले, आणि गुरुजींच्या हाती असलेला तिरंगा आपल्या हाती घेऊन तो किल्ल्यावर फडकावण्यासाठी प्रयत्नशील असलेले शेषनाथ वाडेकर गंभीर जखमी झाले होते. हिरवे गुरुजींचा मृतदेह मिळवण्यात बाकीच्या सत्याग्रहींना यश आले परंतु जखमी वडेकरांना पोर्तुगीज सैनिकांनी फरफटत किल्ल्यात नेऊन केलेल्या शारीरिक अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या तीस वर्षीय शहीद शेषनाथ वाडेकरांचा मृतदेह मात्र अन्य सत्याग्रही परत आणू शकले नाहीत.

आता मूळ संरचनेत काही बदल करून हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित केलेल्या तेरेखोल किल्ल्याच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूला हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर ह्यांच्या गोवा मुक्ती चळवळीतील बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी उभारलेले एक छोटेसे स्मारक आपल्या दृष्टीस पडते.

किल्ल्याच्या आवारात प्रवेश केल्यावर लागणारा जमिनीच्या बाजूकडील पहिला (किल्ल्याच्याा डाव्या बाजूचा) बुरुज

वरच्या फोटोत किल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूस 'टेराझो' रेस्टोरंट आणि खालच्या फोटोत उजव्या बाजूस रेस्टोरंटचे सर्व्हिस काउंटर

तळमजल्यावरच्या ह्या उापहारगृहाजवळून जाताना त्याच्या मागच्या बाजूला निसर्गाचे असे काही विलोभनीय दर्शन घडते की किल्यात जायच्या आधी नकळतपणे आपली पावले त्या दिशेला वळतात...

समोर डावीकडून वाहत येणाऱ्या तेरेखोल नदीचा उजवीकडल्या अरबी समुद्राशी झालेला संगम (नदीमुख) आणि त्यापलीकडे दिसणारा 'केरी बीच' (Querim Beach)

किल्ल्यात प्रवेश करताना आपल्या स्वागतासाठी समोरच ठेवण्यात आलेला देखणा ऐतिहासिक लाकडी 'पेटारा' पाहून आत आल्यावर समोर सतराव्या शतकात पोर्तुगीज स्थापत्यशैलीत बांधलेले चर्च (जे सहसा बंदच असते) आणि त्याच्या डाव्या बाजूला सप्ताहातल्या सात वारांवरून नावे दिलेले 'फ्रायडे' आणि 'संडे' हे दोन सूईट्स आणि 'मंडे', 'ट्यूसडे', 'वेनस्डे', 'थर्सडे' आणि 'सॅटरडे' अशा पाच रूम्सचा समावेश असलेल्या हेरिटेज हॉटेलची लांबलचक कौलारू इमारत दृष्टीस पडते.

चर्च आणि उजव्या बाजूच्या तटाच्या भिंती मधल्या अरुंद मार्गावरून सरळ चालत गेल्यावर पूर्वीच्या काळी तटबंदीवर तोफा चढवण्यासाठी असलेल्या चढावाच्या मार्गीकेवरून आपण बसायला छान बाकडी वगैरे ठेवलेल्या किल्ल्याच्या जमिनीकडील उजव्या बाजूच्या दुसऱ्या बुरुजावर येऊन पोचतो. त्या बुरुजावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळून झाल्यावर तटबंदीवरून चालत चालत किल्ल्याच्या आवारात प्रवेश करतानाच्या बाजूच्या बुरुजावरून किल्ल्याबाहेरची आणि आतल्या भागाची दृश्ये पहात पहात आपण समुद्राकडच्या बाजूला असलेल्या तीनपैकी एका बुरुजावरच्या मदिरालयात दाखल होतो, त्या बुरुजावरूनही छान दृश्ये बघायला मिळतात.



एकूण पाच पैकी जमिनीकडील दोन्ही आणि समुद्राकडच्या बाजूला असलेल्या तीनपैकी हा एक बुरुज पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध असून उरलेले दोन बुरुज हेरीटेज हॉटेलसाठी वापरात आहेत त्यामुळे किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा न मारता इथून परत मधल्या बुरुजापर्यंत येऊन चर्चच्या समोरच्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून आपण खाली येऊन किल्ल्याबाहेर पडतो.

महाराष्ट्रातून वेंगुर्ला - रेडी करत रस्तामार्गे आणि गोव्यातल्या केरी (Querim) येथून फेरी बोटीनतुन जलमार्गे पोचण्याचे पर्याय असलेल्या ह्या किल्ल्यातल्या फोर स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये मुक्काम करून एक किंवा दोन दिवसांत तळकोकणातली काही प्रेक्षणीय स्थळे आणि एखाद दिवस फेरीबोटीने केरीला जाऊन तिथून उत्तर गोव्यातली काही स्थळे पाहून परतणे सहज शक्य असल्याने एकदा असाही प्रकार करून पाहावा हा विचार मनात घोळवत साडेदहाच्या सुमारास तेरेखोल किल्ल्यातून बाहेर पडलो आणि तिथून सात किमी अंतरावर असलेल्या रेडीच्या 'सिद्धेश्वर' मंदिराकडे जायला निघालो.

रस्त्यात कन्याळे, रेडी इथे महाराष्ट्राची हद्द सुरु होण्यापूर्वी दिसलेल्या एका वाईनशॉपमधून सहलीतल्या उर्वरित दिवसांची 'सोय' म्हणून दोन कोकोनट फेणीच्या बाटल्यांची खरेदी झाल्यावर अकरा वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात पोचलो.

टेकडीवरून खाली उतरणाऱ्या रस्त्यावरून दिसलेले सिद्धेश्वर मंदिर


मंदिराच्या डावीकडे दिसणारे रेडी बंदर

मंदिराच्या उजवीकडे दिसणारा सफेद वाळूचा किनारा

सिद्धेश्वर मंदिर परिसराचा ३६० अंशातला एक छोटासा व्हिडीओ ▼


आजच्या भटकंतीच्या कार्यक्रमात वेंगुर्ल्याची 'डच वखार' (Dutch Factory) ह्या ऐतिहासिक वास्तूची अचानक भर पडली असल्याने वेळ पुरवण्यासाठी आधी पाहून झालेल्या रेडीच्या गणपती मंदिराकडे न जाता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यावर आम्ही तिथून साडेसात किमी अंतरावरच्या शिरोडा बीचवर जायला निघालो.

पंधरा-वीस मिनिटांत शिरोडा बीचवर पोचल्यावर प्रतिव्यक्ती दहा कि वीस रुपये प्रतिव्यक्ती 'पर्यटक शुल्काच्या' पावत्या फाडून आम्ही शिरोडा समुद्रकिनाऱ्यावरच्या विशाल सुरुच्या बनात दाखल झालो.

शिरोडा बीचचा एक छोटासा व्हिडीओ ▼


अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा शिरोडा बीचवरुन पाय निघत नव्हता पण ऊन मी म्हणत असल्याने सुरुच्या बनातल्या सावलीतुन थोडावेळ समुद्राकडे पहात बसायचे ठरवले. समुद्र किनाऱ्यावरच्या बऱ्याचश्या टपऱ्या/दुकाने त्यावेळी बंद होती पण एक नारळपाणीवाला आणि एक चहा-नाश्त्याचे दुकान चालवणाऱ्या मावशी तेवढ्या हजर होत्या. चव बघण्यासाठी आधी थोडं भीत भीत त्या मावशींना एक 'मॅगी' बनवायला सांगितली पण त्यांनी बनवून दिलेली मॅगी इतकी आवडली कि एकाच्या जागी तीन फस्त करून झाल्या. मग चहापान झाल्यावर तिथून साडे सोळा किमी अंतरावर असलेल्या 'सागरेश्वर बीच' (उभा दांडा, वेंगुर्ला) वर जायला निघालो...

क्रमश:

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

15 Jan 2025 - 8:06 am | गोरगावलेकर

माहितीपूर्ण लेख व सुंदर फोटो. हा सर्व भाग पाहून झाला असल्याने जास्तच भावला.

अथांग आकाश's picture

15 Jan 2025 - 10:28 am | अथांग आकाश

माहितीपूर्ण लेख आवडला! फोटो १ नंबर!!
पुभाप्र!!!

सौंदाळा's picture

15 Jan 2025 - 10:33 am | सौंदाळा

सुंदर भाग.
रेडी गणपती मंदिर आणि यशवंतगड किल्ला पाहिला का?
आरवली समुद्र किनारा आणि वेतोबा मंदिर पण तुम्हाला रस्त्यावर दिसले असेल. पुढच्या भागाची वाट बघत आहे.

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2025 - 11:39 am | कर्नलतपस्वी

एवढेच म्हणेन.

संजयने जर कोकण/ गोवा सहली आयोजित केल्या (वर कॉमेन्ट्री फुकट) तर धडाधड बुकींग होईल.

( वडाळा येथून विनोद तावडे यांच्या कोकण प्रतिष्ठान यात्रा कंपनीच्या सहली यशस्वी होत होत्या. चार पाच दिवस आणि एसी बस. आता कंपनी तीच आहे पण मालक बदलले आहेत असं कळतं.)

मुक्त विहारि's picture

15 Jan 2025 - 8:33 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...