***
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. निसर्गातील जैवविविधतेचे संरक्षण आणी संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे म्हणून सन २०१७ मध्ये राज्य शासना तर्फे पहिल्यांदा पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे.तसेच हा महिना पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा. अनेक पक्षीमित्र,स्वैच्छीक संस्था या काळात विविध,विषेश कार्यक्रम आयोजित करतात.
शहरीकरण,प्रदूषण,कोलाहल,मानवाचा हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे जैववैविध्य प्रताडीत होत आहेत.अनेक पक्षी,प्राणी,झाडे, फुले काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.अशा परिस्थितीत निसर्ग संवर्धन महत्वाचे ठरते.गेले दोन वर्ष पक्षीदर्शन करताना विविध प्रकारचे पक्षी,घरटी,प्रजनन, संगोपन,मातृत्व,पितृत्व आणी जगण्याची पद्धत याचे निरीक्षण करत आहे.पैकी घरटे बांधणे हा एक प्रमुख विषय ठरतो.
चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे…
उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग…
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग…
देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??
-संदीप खरे
केव्हढा मोठ्ठा प्रश्न???????
असो,पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून मी हा लेख सादर करत आहे.
______________________________________
आवांतर...
अखेर सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला.अनेक आठवणी उचंबळून येत होत्या. युनिफॉर्म रात्री बारा वाजेपर्यंत अंगांवर होता.फेअरवेल डिनर नंतर मित्रांनी "ही इज द जाॅली गुड फेलो,सो से ऑल ऑफ असे", गाणे गात मेसच्या बाहेर काढले. सैन्यात जेव्हा कोणी बदली,सेवानिवृत्त होऊन जातो त्याला फेअरवेल डिनर देण्याची प्रथा आहे. त्याचे गुणगान केल्यावर स्मरणिका (Memento ) देतात. नंतर खुर्चीवर बसवून अधिकारी मेसच्या बाहेर काढताना हे गाणे म्हणतात.त्या नंतर तो अधिकारी युनिट मधे जितके दिवस राहील तो पर्यंत पाहूणा मात्र रहातो व ऑफिशियल फंक्शन मधे सामील होऊ शकत नाही.
खरे पहाता, ही प्रथा एका फ्रेंच लोकगीताने सुरु झाली.हे गीत आठराव्या शतकात लिहीले व संगीतबद्ध केले आहे.मलप्लकेटचे युद्ध (The Battle of Malplaquet), डच रिपब्लिक, ग्रेट ब्रिटन, होली रोमन एम्पायर यांचे संयुक्त सैन्य आणी फ्रान्स यांच्या मधे ११ सप्टेंबर १७०९ लढले गेले. या लढाईत फ्रान्सचे सैनिक हरले तरी त्यांनी संयुक्त फौजेचे मोठे नुकसान केले. युद्ध संपले त्या रात्री हे गीत लिहीले गेले व फ्रेंच लोकांना ते फार आवडले. पुढे इतर देशात सुद्धा लोकप्रिय झाले.याचे फ्रेंच,ब्रिटिश व अमेरिकन व्हर्जन खालील प्रमाणे. प्रमोशन, विवाह, सेवानिवृत्ती आणी इतर काही चांगल्या प्रसंगी हे गीत गाण्याचा प्रघात आहे.भारतीय सैन्यात ही प्रथा ब्रिटिश सैन्यातून आली.युद्धा बद्दल अधिक माहिती साठी गुगल खंगाळावे.
French song
"Malbrough s'en va-t-en guerre"
("Marlborough Has Left for the War").
British version
For he's a jolly good fellow, for he's a jolly good fellow
For he's a jolly good fellow, and so say all of us!
American version
For he's a jolly good fellow, for he's a jolly good fellow
For he's a jolly good fellow, which nobody can deny!
घरी आलो,युनिफॉर्म काढून खुंटीवर टांगला बरोबरच सरकारी पदामुळे चिकटलेला मद, मोह,मत्सर लाल अलवणात बांधून माळ्यावर टाकून दिला.नागरी जीवनात पदार्पण करण्या साठी सज्ज झालो. बाहेर पडल्यावर कळाले,इथे दिवसरात्र संगर चालू आहे.कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळेल याची शाश्वती नाही.सेवारत असताना मायबाप सरकारने एक आशियाना दिला होता तो परत द्यावा लागला.निवृतीनंतर कुठे रहायचे ठरले व त्यानुसार एक घरटे खरेदी केले.हळूहळू नागरी जीवनात स्थिरस्थावर झालो,जबाबदाऱ्या संपल्या आणी विसाव्याचे दिवस सुरू झाले. वाचन,व्यायाम,संगीत,भटकंती बरोबरच पक्षी निरिक्षणाचा छंद लागला. निरीक्षणातून त्यांचे आचार, विचार,राहाण्याच्या पद्धती व संवेदना कळू लागल्या,नकळत तुलनात्मक अभ्यास सुरू झाला.
पक्षी हे ग्रहावरील सर्वात कल्पक प्राणी आहेत. केवळ चोच आणि नखे वापरून आपली घरटी बांधतात. बहिणाबाईंच्या कवितेने सुगरणीला प्रसिद्धी मिळवून दिली. तीला सर्व जग उत्कृष्ट इंजिनिअर मानते.याचा अर्थ असा नव्हे की इतर पक्षी कमी आहेत.प्रत्येकाची कला आणी कलाकारी वेगळी.ती पहाताना अपसुकच तोंडात बोट जाते.प्रत्येक घरट्यांचे वेगळेपण निरीक्षणातून नजरेत भरले.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???
-बहिणाबाई.
***
माणसाची घरटी जशी वेगळी कुणाचे झोपदे,कुणाचा बंगला... तसेच पक्षांचे. दबंग शिकारी पक्षांची घरटी ओबड धोबड,खुल्या आकाशात, कुठल्याच प्रकारची कलाकारी नाही फक्त अंडी,छोटी पिल्ले खाली पडू नये म्हणून उंच झाडावर फांदीच्या बेचक्यात कंटाळवाण्या पद्धतीने रचलेल्या वाकड्या तिकड्या काड्या. स्वताच शिकारी असल्याने इतर पक्षांची वाईट नजरेने बघण्याची हिम्मत नसते.घार,शिक्रा,कोतवाल,कावळे हे पक्षी बिनधास्त असतात. हे निसर्गातले दादा,भाई, गुंड.जवळच्याच शेतात स्थलांतरीत ग्रे हेराॅन पक्षांची घरटी स्थानिक घारींनी नष्ट केली. गेली सात आठ वर्षांपासून येणारे पाहुणे पक्षी गेले दोन तीन वर्षात आलेच नाहीत.
***
कावळा
***
शिक्रा
***
कोतवाल
***
सुगरण,खंड्या,माळमुनिया,बुलबुल,नाचण, स्वर्गीय नर्तक,शिंपी,सुर्यपक्षी या सारख्या छोट्या पक्षांना, शिकारी पक्षी,चतुष्पाद, सर्प, सरडे, सरपटणारे किटक यांची भीती असते.छोटे पक्षी घरटे बांधताना सुरक्षेवर जास्त लक्ष देतात.
सुगरण(Weaver bird) आपले घरटे विहीरीत, काटेरी झाडांवर बनवते. सुर्यपक्षी (Sunbird) आपले घरटे बटव्याच्या आकाराचे झाडांवर किंवा झुडपात टांगून ठेवते.
बा. पु. भा...........
प्रतिक्रिया
7 Nov 2024 - 2:31 am | कंजूस
सुरेख घरटी आणि लेख.
कवी कल्पना आणि वास्तव वेगळे असते. पक्षी घरट्याकडे परततात ही कल्पना. पण ते घरट्यात फक्त अंडी पिल्लांच्या वेळीच असतात. नंतर मात्र एखादा आसरा शोधतात. तिकडे सर्व एकाच प्रकारचे पक्षी दाटीवाटीने बसतात.