वडोदरा,पावगढ-चंपानेर-४

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
19 Oct 2024 - 8:31 pm

vp
-
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१
वडोदरा,पावगढ-चंपानेर-२
वडोदरा,पावगढ-चंपानेर-3
-
-
काल दिवसभर झालेल्या पायपीटीने अशी काही गाढ झोप लागली जसे काही आम्हीं घोडे विकून आलो आहोत.

मी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून व पक्षीदर्शनात दंगलो.आकाश निरभ्र आणी निळेशार होते. दिग्गज कवींच्या निळ्या रंगावरील कवीता मराठी आठवू लागल्या.

असे नाना गुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्यनवे गडे तुझे माझे डोळे
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा

कांलिदीच्या पात्रा प्रमाणे विस्तीर्ण नाही पण कठीण अशा खडकांच्या भिंतीतून मार्ग काढत निरंतर समुद्राकडे वहात जाणाऱ्या बडोद्याच्या विश्वामित्री नदीपात्रात मला वेगळाच निळा दिसला. त्याच्यावरून उडणारे पांढरे बगळे, काळ्या मानेच्या पांढऱ्या शुभ्र शराटी व मोरपंखी, तपकीरी रंगाचे खंड्या( किंग फिशर) उडताना खालच्या वरच्या निळाईत एक वेगळा रंग भरत होते. शेजारीच असलेल्या वटवृक्षावर तांबट कुटुंब बागडत होते तर समोरच्या उंच होर्डिंग्ज वर गुलाबी मैनांची (Rosy Sterling) शाळा भरली होती.

तांबडा,लालभडक सुर्याचा गोळा,बहूमंजीला, नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सांगाड्यातून बाहेर पडत होता.उगवती शेंदरी व मावळती प्रकाशमान झाली.नारायण सुर्वे, बहिणाबाई सुधीर मोघे आणी अनेक दिग्गज कवी,कवयित्रींनी उगवत्या सुर्याचे कौतूक केले आहे.यांच्या पैकी सुधीर मोघ्यांची कवीता मला फारच आवडते. कल्पना बघा किती सुंदर आहे...

रानं जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या...

जबरदस्त वातावरण,भटकंतीचे पैसे वसूल झाले. पाचव्या मजल्यावर फायर एक्झिट, म्हणजे एक प्रकारे मचाण, सर्व शहर एका नजरेतून आकळता येत होते. इथे बसून बडोद्या मधील सकाळ अनुभवणे, अद्भुतच.आता तांबडा भडक सौम्य मार्तंड हळूहळू धवल रंग धारण करत आपले खरे उग्र रूप प्रगट करत होता.आपणही निघायला हवे नाहीतर उशीर होईल असा विचार करून मी खोली कडे मोर्चा वळवला.सर्व जण तयारच होते,मस्त पैकी नाष्टा करून खालीआलो.बघतो तर काय आमचा कुबेरदास आमच्या स्वागतासाठी तयारच होता.आज मी त्याच्याच भाषेत अभिवादन केले,"जय कुबेर", त्याने हलके स्मितहास्य करत गाडी सुरू केली.

गाडी कालच्याच रस्त्यावर धावत होती.आज गप्पात मात्र औपचारिक पणा नव्हता.अमरिश भाई ने त्याचे कुटुंब गुजरातमधे स्थलांतरित कसे झाले! मुलगा कसे छान पौरोहित्य करतो व मुलगी हुशार,महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत असल्याचे कौतुक,अभिमान असे मिश्र भावनिक वर्णन केले. काही जगावेगळे नाही, पण शेवटी तो पण बापच ना! सर्व सामान्य गृहस्थाश्रमी, गृहस्वामीनीचे गोडवे अनिवार्य. मी त्याच्या शेजारीच बसलो होतो. पाठीमागे बसलेल्या सहप्रवासिनीच्या चेहर्‍यावरचे भाव कसे दिसत असतील याचा अंदाज मला पुढे बसून येत होता. "बघा!!!!".

विषय आजच्या पर्यटन स्थळावर घसरला. आजचे पर्यटन निळकंठ धाम, स्वामीनारायण मंदिर होते.अमरिशभाईने प्राथमिक माहिती पुरवली.बडोद्यापासून ६१ कि.मी.अंतर, नर्मदा काठ,गाव पोएचा स्थित नीलकंठधाम मंदिर आहे. याला स्वामीनारायण मंदिर म्हणून ही ओळखले जाते.
निसर्गरम्य,आध्यात्मिक, सांस्कृतिक परिसर बघण्यास साधारण तीन तास पुरेसे आहेत. येथे भोजन व्यवस्था फारच उत्तम आहे अजीबात चुकवू नका असेही बजावले.बाकी काहीच डोक्यात नसल्याने व वधवाना लेक,डभोई पक्षीदर्शन हा मेन्यू एक विरूद्ध तीन अशा मताने खोडून काढला.दोन अडीच वाजेपर्यंत परत येवू,दुपारी थोडा आराम करू आणी संध्याकाळ शाॅपिंग असा बेत ठरला.

श्री स्वामीनारायण मंदिर पुण्यात सुद्धा आहे पण कधी गेलो नसल्याने कसे असेल या बद्दल काहीच कल्पना नव्हती.गाडी पळत होती, बरोबर सर्वाचेच तोंड पण चालू होते.अमरिश भाईने गाडी बाजुला घेतली.भाजी खरेदी करत आम्हांला अहमदाबादी बोरं घेण्याचा आग्रह करू लागला.चांगली ताजी होती पण भाव मात्र पुण्याचेच होतो. पोऐचा पोहचण्यास थोडा वेळ होता.

श्री स्वामीनारायण संप्रदायाचा इतिहास अंतरजालावरून....

श्री स्वामीनारायण हा एक संप्रदाय आहे. भगवान श्री स्वामीनारायण यांचा जन्म १७८१ मधे उत्तर प्रदेश मधील आयोध्या जवळ छपैया गावात झाला.गुरू स्वामी रामानंद यानी १८०० मधे उद्धव संप्रदायाची दीक्षा दिली. सहजानंद हे नाव दिले.मृत्युसमयी १८०२ मधे संप्रदायाचे नेतृत्व स्वामी सहजानंद याच्यावर सोपवले. संप्रदायाचे जवळपास विस लाख अनुयायी आहेत.असो, गुगलवर सविस्तर असल्याने इथे टंकाळत नाही.

मुख्य रस्ता सोडून गाडी आत मधे वळाली. एकदम वातावरणात बदल दिसून आला. सुंदर चकाचक रोड,नजर जाईल तिथपर्यंत हिरवाई. रस्त्यालगत सुशोभित, एकसारखी कापलेली झाडे, सुशोभीकरण उच्च दर्जाचे व तेव्हढाच उच्च दर्जाचा रखरखाव.
vp1-----vp16
-
अमरिशभाई ने गाडी पार्क केली."तुम्ही फिरून घ्या,झाले की गाडी जवळ या",असे म्हणून स्वारी गायब झाली.अतिशय विस्तीर्ण पटांगण. पार्किंगची उत्तम व्यवस्था.डाव्या बाजूस चाळवजा भक्तनिवास, शेजारी पिलखान्यात देवाचे हत्ती झुलत होते. समोर नेत्रदीपक,भव्य दिव्य मंदिर. १०५ एकर प्रांगणात,इ.स. २०१३ मधे बांधलेले मंदिर ,एक तप उन पाऊस झेलून सुद्धा आज २०२४ मधे नवे कोरे वाटत होते. यावरून रखरखाव किती उत्तम ठेवला आहे याची कल्पना येते.
vp2-----vp12
-
अकरा हत्ती पैकी नऊ प्रतीमांवर सुवर्ण अंबारीत तुतारी वादक,दोन हत्तींवर,दोन्ही बाजूस हाती वैजयंती माळा घेतलेले गरूड व मध्यभागी अतिभव्य सुबक,सुमनोहर,शंख, पद्म धारीत,आशिर्वचन मुद्रेत पद्मासनात बसलेली भगवान विष्णूंची मुर्ती, पारंपारिक पोषाख परिधान केलेले माहूत असे अप्रतिम प्रतिमांचे भव्यदिव्य प्रवेशद्वार.
-
vp3------vp4
-
vp5-----vp6
-
vp7-----vp8
-
vp9-----vp10
-
मंदिराची वास्तुकला,उद्याने,भव्य अतिसुंदर देवांच्या मूर्ती आणी चहूबाजूला चाळीस लाख लिटर नर्मदेच्या पाण्याने भरलेले आरसपानी नीलकंठ सरोवर बघून भक्तांचे मन गदगद झाल्याशिवाय रहात नाही.श्री स्वामीनारायण, घनश्यामजी,नीलकंठ राधाकृष्ण,शेषशायी विष्णू,फर्णीन्द्र,शिवलिंग,गणेश, मारूती मंदिरा समवेत 32 छोटी मोठी मंदिरे आहेत.लाईट शो मधे मंदिर बघणे अलौकिक,अद्भुत अनुभव आहे. अर्थात आम्हीं नाही बघीतला. एक गोष्ट मला फारच आवडली ते म्हणजे प्रकाश चित्रे घेण्यास प्रतिबंध नव्हता. भगवान आणी भक्त या मधे कुठलाही अडसर नव्हता. खुले प्रांगण,दरवाजा रहीत छोटी मंदिरे, कुठेही लांबलचक रांगा नव्हत्या.डोळेभरून दर्शनास अडकाठी नव्हती. भरपुर प्रकाश चित्रे घेतली. भक्तांची भरपूर गर्दी होती.परिसर एव्हढा मोठा माणसांची गर्दी म्हणजे "उंट के मुहंमे जिरा". कमालीची स्वच्छता,सतत सेवक स्वच्छता करण्यात मग्न.परिसरात वावरणारे प्राणी पक्षी सुद्धा मल निस:रणा करता दुर जात असावेत. इथे भरपूर सुर्यपक्षी बागडताना दिसले.

मंदिराच्या डाव्या बाजुलाच भोजनाची प्रशस्त व्यवस्था होती. माफक किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध होते.कढ़ी खिचड़ी,आइसक्रीम,पाणी पुरी,वडापाव इतर भोजन पदार्थ,चहा,काॅफी, ताक,इतर पेय पदार्थ उपलब्ध होते.किंमती जरी माफक होत्या तरी गुणवत्ता मात्र चोख होती.

मंदिराच्या मागे नर्मदा मैय्याचे विस्तीर्ण पात्र आणी काठालगतची हिरवाई,नेत्र सुखावत होते.पाण्याची मात्रा कमी होती पण निळेशार पाणी नजर बांधून ठेवत होते.नदी पलीकडच्या किनाऱ्यावर कुबेर मंदिर आहे.ते सुद्धा खुपच सुंदर आहे. कुबेर मंदिर बघण्यासाठी प्रथम जीपने नंतर नावेतून नदीपात्र पार करावे लागते.केवट चप्पू घेऊनतयार असतात. केवळ पंधरा मिनिटात किनाऱ्यावरील कुबेर मंदिरात जाता येते.२५० रुपये तिकीट आहे. मंदिरात प्रकाशचित्रण करण्यास प्रतिबंध आहे. गाव "करनाली", दिवाळीतील अमावास्येला इथे खुप मोठी यात्रा असते.
-
vp13-----vp14

असे म्हणतात भावाने लंके मधून हाकलून दिल्यावर कुबेर नर्मदातीरावर तपस्ये करता बसला. खडतर शिवाराधने नंतर भगवान शिव प्रसन्न झाले.लंकेचे राज्य परत मिळवून देण्यास असमर्थ होते म्हणून त्यांनी कुबेरास देवतांच्या धनलक्ष्मीची जबाबदारी दिली,स्वता शिवलिंग रुपाने वास करून राहीले.मैय्याच्या पैलतीरा वरून नीलकंठ धाम मंदीर फार सुंदर दिसते. रजेन्द्रा मेहेन्दळे यानी त्यन्च्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा या लेखात या मन्दीरा बद्दल लिहीले आहे.

आदल्याच दिवशी मिपाकर मेहेंदळे भाऊंचा फोन आला होता.नर्मदा नदीतील शेंदरी रंगाचा छोटा दगड मिळाल्यास घेवून या अशी विनंती केली. जास्त विचारपूस केल्यावर कळाले त्याला गणपती स्वरूप मानतात. देवघरातील शिव पंचायतन याच्यांशिवाय अधूरे आहे. परंतू तोपर्यंत आम्ही गरूडेश्वर सोडले होते आणी पुन्हा नर्मदा मैय्याचे दर्शन होईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने क्षमा मागितली होती.

मेहदळें भौं ची भक्ती आणी अटळ विश्वासा मुळेच नीलकंठ धाम किनाऱ्यावर छोटा तांदळा (गणपती सदृश्य खडा) ,न ध्यानी न मनी अशा उन्मनी अवस्थेत सापडला. कायप्पावर चित्र पाठवले.राजेंद्र भौनी पुष्टी केली.भटकंती संपल्यावर श्रीकृष्ण मधे मिसळपाव आणी खरवस अशी मजुरी घेऊन त्यांचे इष्ट त्यांना सुपूर्द केले.मलाही खुप आनंद झाला. ( एकदा वाटले, मोह झाला,खडा अतिशय देखणा, आपणच ठेवून घ्यावा....)भक्तगण, नर्मदेतल्या प्रत्येक दगडाला शिवस्वरूप मानतात (नर्मदा का हर कंकर है शंकर शंकर).
-
vp15------vp 116
छोटा तांदळा (गणपती सदृश्य खडा)

ज्या की रही भावना जैसी.....
प्रभू मुरत तिन देखी तैसी.

कायप्पावरील संभाषण.

[02/03, 5:36 pm] Rajendra Mehendale Mipa:Kaka maze ek kam ahe- मला नर्मदेचा लाल खडा गणपती म्हणुन हवा आहे. कृपया आणाल का?

[02/03, 5:53 pm] Rajendra Mehendale Mipa:सकाळी किवां काल म्हणले असते तर गरूडेश्वरला बघीतला असता. आता माहीत नाही कुठे मिळेल.

[02/03, 5:56 pm] Rajendra Mehendale Mipa:नाही….बघा विचारून /किवा नदी पाशी गेलात तर लक्षात असुदे.

[03/03, 5:35 pm] Rajendra Mehendale Mipa: अरे वा- मिळाला का बाप्पा?
[03/03, 5:35 pm] Rajendra Mehendale Mipa: खूप खूप धन्यवाद

मंदिर बघून झाले होते,नर्मदा तीरावर लांबून का होईना कुबेर भंडारीचे (कृपा आहे) दर्शन घडले. राजेंद्र भौं चे इप्सित साध्य करण्यात साधन बनण्यास मिळाले.सकाळी भरपूर नाष्टा झाल्यामुळे फारशी भुक नव्हती. प्रसाद म्हणून थोडे भोजन घेतले व गाडी जवळ आलो.

आता कुठे?

हॉटेलवर ....चला

"मी आठ तास आणी तीनशे कि.मी.चे पैसे घेणार आहे, ते पुर्ण झाल्या शिवाय हाॅटेल वर सोडणार नाही".

आम्हांला आणखीन कुठे जायचे हे माहीत नाही.

आहो,ठरलेले पैसे देतो, किंवा कमी पैसे घ्या...

कुबेरदास दोन्ही करता तयार नव्हता. म्हणाला मी तुम्हांला काही ठिकाणे दाखवतो. तुम्हांला नक्कीच आवडतील. चला म्हणत गाडी गियर मधे टाकली.

दोन तीन वेगवेगळी मंदिरे दाखवली. मंदिरा सारखी मंदिरे,कंटाळलो होतो. इलाज नव्हता.
बघता बघता गाडी घनदाट जंगलात घुसली. मोबाईलची रेंज सुद्धा गायब झाली.मन साशंक झाले.जंगल घनदाट होत चालले.अचानक रस्त्याचा शेवट आला. एका झाडाखाली पारंपारिक गुजराथी वेषात काही लोक बिडी पीत बसले होते.भाईने गुजराथीत विचारले, नानी मोटी पनौती मंदिर कुठे आहे.(નાની મોતી પનૌટી મંદિર ક્યાં આવેલું છે?). त्यांनी गुजराथीत उत्तर दिले.

जीवात जीव आला. मंदिरा बद्दल विचारतो आहे....

कोपर्‍यात गंजलेल्या फलकावर નાની મોતી પનૌટી असे शब्द दिसले. गाडी वळवून सांगीतलेला मार्ग पकडला.

एक चहाची टपरी आणी सुकलेल्या झेंडूच्या माळा, तेलाच्या छोट्या बाटल्या,काळ्या फडक्यांचे बंडल, नारळ, साखर फुटाणे व इतर पुजा साहित्य ठेवलेले दुसरे टपरीवजा दुकान. एखाद हातगाडी आणी दोन चार भिक्षेकरी. सिमेंटचे महाद्वार,वर जाणाऱ्या पायर्‍यां,समोर वस्तीवजा मंदिरांचा समुह.असा सगळा देखावा. राजपिप्पला जिल्ह्य़ातील एक छोटेसे गाव,नर्मदेच्या दक्षिण तटावर, उंच टेकडीवर कुंभेश्वर महादेव,काळभैरव आणी पनौती मंदिर.वास्तू बघून खुप जुने वाटत होते साधारण तीन,चारशे वर्षा पूर्वीचे असावे. आजुबाजूची इतर मंदिरे नंतर बनलेली किवा जिर्णोद्धार केलेली असावीत. इथले पुजारी सोमण वंशीय असून त्यांची नववी,(९) पिढी सध्या इथे नांदत आहे.यावरून अंदाज आला. परिक्रमा वासी मंदिराच्या आवारात आराम करताना दिसले.नानी मोटी मंदिर दोन मजली आहे. तळमजल्यावर पनौती मंदिर व पहील्या मजल्यावर शनी मंदिरआहे.मध्यभागी कुंभेश्वर महादेव,जवळच कालभैरव मंदिर. भैरवनाथा समोर रेलिंगवर काळा कपडा बांधून इच्छापुर्ती साठी भावीक प्रार्थना करतात.असंख्य काळे कापडे बांधलेले दिसले.

नानी मोटी पनौती येथील कुंभेश्वर,काल भैरव, मोटी पनौती,छोटी पनौती,राहू केतू,नर्मदा आणी शनी मंदिर असा पुरातन मंदिरांचा समुह आहे. स्थान महात्म्यानुसार मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्र जप करून भगवान शिव प्रसन्न करून घेतले अमरत्व प्राप्त केले. दुसर्‍या अख्याईके नुसार कुंभेश्वर शिवलिंग ब्रह्माने स्थापन केले. इथेच शनी महाराजांचा राग शमला. नानी पनौती म्हणजे साडेसाती आणी छोटी पनौती म्हणजे शनी अढैय्या, अडिच वर्ष.

पनौती हा हिन्दी भाषेतला शब्द आहे. व्यंजना पुढे "औती", प्रत्यय लावून अनेक शब्द बनले आहेत. जसे,चुनौती,कटौती,मनौती, बपौती, फिरौती. मराठीत पणवती म्हणतात. औती चा अर्थ खुप पुष्कळ. पनौती म्हणजे अशुभ, कठीण परिस्थीती.ज्योतिषशास्त्रानुसार शनी साडेसाती हा आयुष्यातील कठीण,परिक्षा घेणारा काळ असतो. जनमान्यते नुसार इथे केलेली पुजा अर्चना हा काळ सुसह्य करण्यास मदत करते. इथे नर्मदातीरावर जुने कपडे दान करण्याची प्रथा आहे त्यामुळेच किनाऱ्यावर जुन्या कपड्यांचे ढिग पाहिला मिळाले. छोटीशीच मंदिरे अगदी राहत्या घरासारखी.सभोवताली दाट जंगल,मैय्याचे विस्तीर्ण पात्र, निसर्गाचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. प्रकाश चित्रे घेतली नहीत. परिसर इतका सुन्दर होता की फोटो घेण्याचेच विसरलो.
नर्मदा भारताची अध्यात्मिक वाहिनी म्हणले तर वावगे ठरणार नाही.पुरातन काळापासून मध्य भारताला सुजलाम सुफलाम करणारी अनेक अख्यायीका,पुराण कथा आणी जनश्रुतींनी वेढलेली,राजा मैखल पुत्री ही रेवा नावाने सुद्धा बहुश्रुत आहे.या नदीबद्दल अनेक रंजक गोष्टी बरोबरच तटाकी मंदिरे प्रसिद्ध आहेत.

संध्याकाळचे चार वाजताच आले होते. तीथेच टपरीवर मस्त स्पेशल चहा घेतला. आता तरी हाॅटेलवर नेईल या आशेने सर्वजण गाडीत बसले.अमरिशभाई म्हणाले, "एक खास मंदिर दाखवतो आणी मग परत फिरू या.परतीच्या रस्त्यावर आहे". आलिया भोगासी असावे सादर,म्हणून सर्व गप्प बसले. थोड्याच अंतरावर कारवान नावाचे गाव आले.

गाडी, मंदिराच्या प्रांगणात उभी केली. भरपुर मोठे प्रांगण,उत्सवाची तयारी चालू असावी. मंडप,लाईट इत्यादी साहित्य येवून पडले होते. एक दोन टेम्पोतून सामान उतरत होते. चौकशी करता कळाले आठ तारखेच्या शिवरात्री महोत्सवाची तयारी चालू आहे, म्हणजे हे शिव मंदिर आहे हे कळाले. भव्य मंदिरात काळ्या ग्रॅनाईट मधे शिवलिंग, लकुलीश भगवान विराजमान आहेत तर भिंतीवर विवीध देवी देवतांची, आयुध आणी अलंकार युक्त मूर्ती लावल्या आहेत. मंदिर अतीशय स्वच्छ, पारंपारिक पोषाख परिधान केल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही. शार्ट, स्कर्ट व तत्सम पोशाख घालून मंदिरात जाणे प्रतिबंधित आहे. मंदिर नवीन आहे.परिसरात प्रकाश चित्रे घेण्यास प्रतिबंध आहे. काही प्रचि अंतरजालावरून साभार.
-
ka1-----ka2
-
नुकतेच बान्धलेले लकुलीश मन्दिर आणी पुरतत्व विभागाने केलेले उत्खनन जागा.
-
300----ka6
-ka7-----ka8
सर्व मंदिर बघून झाल्यावर," देवादारी विसावा पुनर्जन्म नसावा", म्हणत जरा गारव्यात बसलो. जवळच एक गुजराथी पंडितजी बसले होते. त्यानां बोलते केल्यावर कळाले की शंकराचे २८ वे अवतार भगवान लकुलीश दुसर्‍या शतकात इथेच जन्माला आले. ते पशुपत संप्रदायाचे संस्थापक मानले जातात.
पंडितजी इतीहासावर जास्त प्रकाश टाकू शकले नाही. अमरिशभाईनां सुद्धा काही माहीत नव्हते. एक प्रेक्षणीय शिवमंदिर जिथे शिवरात्रीला गावातील पुरूष शंकराच्या वेशात उत्सवात सामील होतात याच्या व्यतिरिक्त अमरिशभाईनां सुद्धा काही माहीत नव्हते. हॉटेलवर गेल्यावर गुगलवर बरीच माहिती मिळाली.थोडक्यात नमूद करतो.माहिती कळाल्यावर मन हळहळले.इतक्या दुर येवून पुरातत्व विभागाचे उत्खनन व संग्रहालय पहायचे राहून गेले.अधिक माहितीसाठी गुगल खंगाळावे.

कारवन नावाचे हे गाव कायावरोहन या नावाचा अपभ्रंश आहे. ह्या गावाला पुरातत्व विभागाने विषेश दर्जा दिला असून एक संग्रहालय सुद्धा उभारले आहे. पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात दुसर्‍या शतकातील व त्या नंतरची तांब्याची नाणी, दगडी जाती,औजारे,देवाच्या मूर्ती सापडल्या आहेत. सापडलेल्या काही खंडीत,अखंड मूर्त्या संग्रहालयात ठेवल्या आहेत.

अकराव्या शतकात मोहम्मद घोरी व इतर आक्रांतानी मंदिरे तोडली.कारवान हे पवित्र स्थान चारही युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. कायावरोहण या पवित्र स्थानावर चारही कालखंडात शिवाची दैवी शक्ती अस्तित्वात आहे. ऋषीं विश्वामित्रांना रामायण कालात सापडलेले ब्रह्मेश्वर ज्योतिर्शिवलंग हे इथले स्थान महात्म्य आहे. याचा उल्लेख मार्कंडेय पुराण व स्कंद पुराणा आहे असे कळाले. खरे खोटे भगवान लकुलीश जाणे.

इच्छापुरी-सत्ययुग
मायापुरी-त्रेतायुग
मेघावती-द्वापार युग
कायावरोहन- कलियुग

कायावरोहण या बद्दल अनेक अख्यायीका गुगलवर आहेत.

बडोद्यापासून तीस किलोमिटर अंतरावर असल्याने प्रवास पटकन संपला. कुबेरदास यांच्या चेहर्‍यावर संतोष दिसत होता.पण काही म्हणा,दोन्ही पर्यटनस्थळे लौकिक दृष्ट्या प्रसिद्ध नाहीत पण ऐतिहासिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक धरोहर म्हणून निश्चीतच प्रेक्षणीय आहेत.अमरिशभाई पैसे घेऊन, उद्या सकाळी भेटू,जय कुबेर म्हणत निघून गेले.....

दुसर्या दिवशी पावागढ,चंपानेर इथे जायचे ठरले होते. ते वर्णन पुढच्या भागात....

प्रतिक्रिया

कंजूस's picture

20 Oct 2024 - 5:31 am | कंजूस

नवीन जागा कळल्या.

वर्णन चोख झाले आहे. अनंत काणेकर शैली वाटते.
(भटकंती सदरात लेख कसा काय टाकता आला? आम्हाला अजून access denied येते. फोटो दिसत नाहीत. )

अथांग आकाश's picture

20 Oct 2024 - 9:16 am | अथांग आकाश

लेख आवडला!

श्वेता२४'s picture

20 Oct 2024 - 3:59 pm | श्वेता२४

स्वामीनारायण मंदिर पाहिले आहे. पण इतर जागा काही पाहिल्या नाहीत. नवीन माहिती कळाली.

झकासराव's picture

21 Oct 2024 - 11:09 am | झकासराव

छान सचित्र माहितीपूर्ण लेख.
अमरीश भाई उत्साही आहेत

प्रचेतस's picture

22 Oct 2024 - 3:11 pm | प्रचेतस

हाही भाग आवडला.
स्वामीनारायण मंदिर अगदी भव्य, चकचकीत आहे पण अतिशय कृत्रिम वाटते. कारवनचे मंदिर आणि तिथले फोटो आवडले. कुबेरदासचे खास कौतुक वेगळी ठिकाणे आवर्जून दाखवल्याबद्दल.

गोरगावलेकर's picture

30 Oct 2024 - 4:18 pm | गोरगावलेकर

माझे फक्त कुबेर धाम पाहून झाले आहे . वेळेअभावी स्वामीनारायण मंदिर पहिले नव्हते . जवळपासच्या भागातील मंदिरे नव्यानेच कळली .

मैय्याच्या पैलतीरा वरून नीलकंठ धाम मंदीर फार सुंदर दिसते.

हो . पाच वर्षांपूर्वी अनुभवले आहे

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2024 - 12:01 pm | कर्नलतपस्वी

मनापासून आभार.

गोरगावलेकर महोदयांचे पैलतीरावरून दिसणारे सुंदर सूर्यनारायण मंदिर चित्र डकवल्या बद्दल विशेष आभार.

दुर्गविहारी's picture

14 Nov 2024 - 10:56 pm | दुर्गविहारी

खुप छान माहिती असलेला धागा ! कारवान गावात लकुलिशाविषयी माहिती नसणे हे आश्चर्यकारक आहे. थोडी माहिती पोस्ट करतो.

लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. लकुलिश या शब्दाचा अर्थ लाठी धारण केलेल परमेश्वर असा होतो. खरेतर लकुलीश एक सुधारणावादी शैवपंथीय संत होते, ज्यांना शिवाच्या अठ्ठावीस रुपात स्थान मिळाले.
लकुलीश यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कारवान गावात ऋषी अत्री यांच्या गोत्रातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. अर्थात लकुलीशांच्या अनुयायापैकी काही व्यक्तींच्या मते त्यांची एक वेगळीच कथा आहे. भगवान शिवांनी एकदा भगवान विष्णुंना वासुदेव स्वरुपात पृथ्वीवर प्रगट झाल्यावर त्याचवेळी अवतार घेण्याचे वचन दिले होते. जेव्हा विष्णूनी वासुदेव रुपात जन्म घेतला तेव्हा भगवान शिव एका मृत ब्राम्हणाच्या शरीरात प्रवेश करुन पृथ्वीवर प्रगटले.हाच तो लकुलीश अवतार मानला जातो.
लकुलीश हे सतत भ्रमण करणारे भिक्षु झाले. त्यांनीच शैव पंथातून पुढे पाशुपत संप्रदायाची स्थापना केली. तसेच पाशुपत संप्रदायीसाठी अध्यात्मिक जीवन कसे जगावे यासाठी सुत्र लिहीले. पुढे याच संप्रदायातील इतर गुरुंनी त्यात भर घातली.
अर्थात लकुलिश हेच पाशुपत संप्रदायाचे संस्थापक होते का ? तसेच त्यांनीच त्यांनीच पाशुपत सुत्र लिहीली का ? याबद्दल काही तज्ञांना शंका आहे. त्यांच्या मतानुसार पाशुपत संप्रदाय आधीच अस्तित्वात होता किंवा कमी प्रमाणात प्रसार झालेला होता.
त्यांच्या मते पाशुपत आणि इतर शैव संप्रदायाची पुन्रबांधणी आणि संस्थापना, सुधारणा करण्याचे श्रेय लकुलिश यांच आहे. तसेच या तज्ञांच्या मते पाशुपत सुत्र खुप आधीच लिहीले गेले होते, पण लकुलिश यांनी त्यांना सर्वसामान्यांना समजेल अश्या सोप्या पध्दतीने भाषांतरीत केले. एकतर पाशुपत सुत्रांची रचना एकंदरीत प्राचीन वाटते आणि त्यात ती सुत्रे कोणी रचले याचा उल्लेख नाही असा या तज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या सुत्रांची रचना लकुलिश यांनी केलेली नाही असा दावा केला जातो.
पाशुपत संप्रदाय हा सहा मुख्य सिध्दांतापासून बनला आहे. यामध्ये कारण, कार्य, कला, विधि, योग आणि दुखांत हि सुत्र आहेत. लकुलिश यांनी आर्यांच्या आधीच्या काळातील सिंधु संस्कृतीतील कर्मठ परंपरांचे पुनर्संस्थापन केले. तसेच हठयोग आणि तांत्रिक परंपराचे पुननिर्माण केले. तसेच लकुलिश यानी वैदीक, जैन आणि बौध्द धर्माचा हिंसक मार्गाने विरोध केला.

पाशुपत संप्रदाय पाळत असलेली तपस्वी प्रथा :-

पाशुपत संप्रदायी ज्या उग्र प्रथा पाळतात, त्यात दिवसातून तीन वेळा राखेने स्नान करणे, ध्यान करणे आणि ओम मंत्राचा जप करणे, भगवान शिवाची स्तुती आणि आराधना करताना जोरात हसणे, जीभ हासडणे आणि बैलासारखे डुरक्या देणे याचा समावेश होतो.
भगवान शिव यांना समर्पित झालेली व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असु देत पाशुपत संप्रदायी होउ शकते. या लोकांचा पोषाख काळया रंगाचा असतो. तसेच शिवाचे दर्शन घेण्याची आणि पुजेची पध्दत विशिष्ट प्रकारची असते. याच पध्दतीने केल्या जाणर्या काही अस्पष्ट सिध्दांतामुळे आणि काही रहस्यमय प्रथा, तसेच विकृत आणि विभिन्न परंपरा यातून कापालिक आणि काळामुख या दोन तांत्रिक पंथाना जन्म दिला गेला.

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2024 - 5:51 am | कर्नलतपस्वी

काही माहीती पुढील लेखात लिहीणार आहे. परंतू आपण दिलेल्या विस्तृत प्रतिसादामुळे बरीच नवीन माहिती कळाली. मनपूर्वक धन्यवाद.